वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन
वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन
अनेक रामायणे निरनिराळ्या कालात रचली गेली असल्याने त्यात निरनिराळे उल्लेख मिळतील. आज फक्त वाल्मीकी रामायण विचारात घेत आहे.
रामायणातले स्त्रीजीवन म्हटले की एकच गोष्ट समोर येते व ती म्हणजे सीतेवरील अन्याय. हजारो वर्षे आपणा सर्वांना वाटणारा अन्याय. आणि मग सीतेला त्यावेळी तो अन्याय वाटला नाही हेही आपण विसरतो. तेव्हा आज आपण याबाबत आपणास रामायणात काय सापडते तेवढेच पाहू. मग यातील काही गोष्टी आज त्याज्य वाटतील तर काही आजही भारतातल्या स्त्रीयांना अप्राप्य वाटतील अशाच आहेत. एक उदाहरण म्हणून कैकयीने मागितलेले वर पहा. सर्वांनी तिला शिव्या घातल्या पण सामान्य नागरिक वा वशिष्टांसारखे ज्ञानी राजगुरू, कोणीही तिच्या अधिकाराबद्दल चकार शब्दही काढलेला नाही. जातीबाहेरच्या वा सगोत्र मुलाशी लग्न ठरवले म्हणून आज मुलीला जाळले जाते, व सगोत्र विवाहाला बंदी घालणारा कायदा करा अशी मागणी केली जाते ! असो.
(१) कन्येचे घरातील स्थान : कन्या जन्माला आली की मात्यापित्यांना काळजी सुरू होई. एक शक्यता अशी की काही वेळी नवजात कन्येला वनात सोडून देण्यात येत असावे. सीता ही त्यातली एक असावी. अशोकवनातील सीतेच्या विलापाचे वर्णन करताने वाल्मीकी म्हणतो :
कांतारमध्ये विजने विसृष्टा !
बालेव कन्या विललाय सीता !!
अर्थात हे अपवादात्मक असावे. सर्वसाधारणपणे कुटुंबात मुलीची आबाळ केली जात नसे व त्यांना प्रेमाने वाढवले जात असे.
(२) कुमारी कन्या मंगलसूचक मानल्या जात. राज्यारोहणासारखे प्रसंग, रामाचे अयोध्येत पुनरागमन इत्यादी प्रसंगी कुमारीकांची उपस्थिती शुभद समजली गेली आहे. मुली पुष्पवर्षाव ब जलसिंचन करत व मिरवणुकीत अग्रभागी चालत.
(३) मुलींना आईवडीलांच्या घरी योग्य ते शिक्षण मिळत असे. हे शिक्षण धार्मिक, नैतिक व व्यावहारिक असे त्रिविध असे. श्रुति-स्मृती-पुराणे यांचे जरूरीपुरते शिक्षण दिले जाई. कौसल्येने अग्नीला समंत्रक आहुती दिल्याचा तसेच तारेला मंत्रजित् म्हटल्याचे उल्ल्लेख आहेत. नृत्य, संगीत इत्यादि ललित कला तर शिकवतच पण मह्त्वाकांक्षी मुलींना युद्धशिक्षणही मिळत असावे. उदा. कैकयी दशरथाबरोबर युध्दात हजर होती व तिने दशरथाचे प्राण वाचवून त्याच्याकडून वर मिळवले होते.
(४) रामायणकाली मुली गोषा किंवा कडक नियंत्रणे यांपासून मुक्त होत्या व त्यांना समाजात मिसळू दिले जाई.राजपरिवारात मात्र थोडी बंधने असावित.
(५) पत्नीची पतीविषयी निष्ठा व सेवा याविषयी वाल्मीकी आग्रही दिसतो. तसेच बंधन पतीवरही होते. साध्वी स्त्रीचा त्याग पतीने करू नये असे समजले जाई.पत्नीच्या नैतिक गुणांबरोबर शारीरिक आकर्षणाचीही अपेक्षा केली जाई.
(६) स्त्री ही तत्कालीन कौटुंबिक जीवनाच्या केंद्रस्थानी असे. सतीची पद्धत नव्हती पण उत्तरकांडात एका प्रसंगी अग्नीप्रवेशाचा उल्लेख आहे. मांगलिक प्रसंगी विधवांची उपस्थिती अशुभ समजत नसत.
(७) वेश्यावर्गाचा राजकीय परिस्थितीसाठी उपयोग हा प्रकार भारतीय संस्कृतीत रामायणातच प्रथम दिसतो. ऋष्यशृंग ऋषीची राजधानीत आवश्यकता आहे म्हटल्यावर रोमपाद राजाने वेश्या पाठवून त्याला आणवले. ( ही सुरस कथा माहीत नसल्यास, विनंतीवरून देण्यात येईल) रामाच्या राज्याभिषेक प्रसंगी आवश्यक असलेल्या यादीत वसिष्ठांनी वेश्यांची नोंद केली आहे.आणि हो, शत्रूवर चाल करून जातांना त्यांना बरोबर घेतले जाई. वेश्या हे नागरी जीवनाचे अभिन्न अंग होते.
(८) रामायणकाली, दासी वर्गाच्या सुंदर स्त्रीया उपहार म्हणून देण्याची प्रथा होती.रामाला कररुपाने सुंदर दासी मिळाल्या व श्राद्धवेळी इतर वस्तूंबरोबर त्यांना दान म्हणून दिलेही गेले. हा प्रकार म्हणजे स्त्री ही संपत्तीच्या अनेक वस्तूंपैकी एक मानली जात असे.
(९) थोरल्या भावाच्या पत्नीला मातेसमान मानले जात असे. पुरुषांनी स्त्रीयांचे सर्वप्रकारे संरक्षण करावे, असा आग्रह होता. स्त्रीयांचा अपहार हा गुन्हा मानला जाई. स्त्रीया अवध्य मानल्या जात. कन्या, पत्नी, माता व विधवा या चारही स्त्रीयांना सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या व त्यांना काही अधिकारही होते. एकूण स्त्रीयांचा दर्जा बराच वरचा होता.
(१०) त्या काळी घडलेले काही अन्याय आजही घडत आहेत व ही एक समाजाचीच सर्वकालीन शोकांकिका आहे असे म्हणावयास हरकत नाही.
शरद
Comments
हम्म!
शरदराव तुम्ही नेहमीच अशा निष्कर्षांवर कसे पोहोचता? पण निष्कर्ष रोचक आहेत हे बाकी खरे.
हे विधान सार्वत्रिक आहे असे वाटत नाही. या विधानाचा आणि महाभारत काळात लग्नाआधी बायांना पोरे झाली की त्यांना नदीत सोडून देत या विधानाचा संबंध दाट वाटतो. :-)
मागे तुम्ही महाभारत काळी बुरखा पद्धत होती असे लिहिले होते ना. :-) फारच तफावत दिसते इथे. :-)
तरीच सुवर्णमृगाच्या कथेप्रसंगी सीता लक्ष्मणाची अवहेलना करते की राम मेला तर तुला माझी आशा असावी, वालीने सुग्रीवाच्या बायकोला आपल्याकडे ठेवणे, सुग्रीवाने तारेला आपल्याकडे ठेवणे वगैरे उदाहरणांवरून पतीनंतर स्त्रीने दिराशी घरोबा करण्याची पद्धत होती असेही म्हणता येईल. फार मोठ अपराध नसता शूर्पणखा या स्त्रीला नाक-कान कापण्याची शिक्षा मिळणे हे काही रामासारख्या पुरुषोत्तमाकडून अपेक्षित नाही. नाक-कान लक्ष्मणाने कापले तरी रामाच्या उपस्थितीत.
अवश्य द्यावी. वाचण्यास आतुर आहे.
तरीच रामाला एकपत्नीव्रत पाळणे शक्य झाले असावे. ;-)
कथा
जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये स्त्रियांचे शोषण झालेले दिसते. रामायणात वेगळे असते तर आश्चर्य होते.
ऋष्यशृंग ऋषिंच्या कथेची वाट पहात आहे. :)
रोचक संकलन
रोचक संकलन आहे.
तटस्थ वर्णन की समीक्षा
एखादे मत पटवून द्यावयाचे असल्यास त्याला समर्थन देणाऱ्या बाबीच सारख्या सारख्या नजरेसमोर येण्याची शक्यता असते. वाल्मिकी रामारायणातील स्रीजीवन या शीर्षकावरून हा लेख तत्कालिन स्रीजीवनाचे तटस्थपणे वर्णन करणारा हवा होता. हे स्रीजीवन योग्य होते की अयोग्य, स्रीचे स्थान वरचे होते की दुय्यम असले निष्कर्ष काढण्याच्या नादात काही बाबी डोळ्याआड होऊ शकतात. वाल्मिकी रामायणाच्या इतर अभ्यासू वाचकांनी यात विषयानुरुप वर्णनपर भर घालायला हवी.
स्त्री ही संपत्तीच्या अनेक वस्तूंपैकी एक मानली जात असे.
एकूण स्त्रीयांचा दर्जा बराच वरचा होता.
तटस्थ वर्णनाची पातळी सुटली की असले विरोधाभास होतात.
विरोधाभास
राजा रवीवर्मा या प्रसिद्ध चित्रकाराने पौराणिक प्रसंगांची चित्रे काढताना ती चित्रे त्याच्या कालातील प्रेक्षकाना रुचावी म्हणून त्याच्या चित्रातील स्त्रियांना महाराष्ट्रीय नऊवारी लुगडे नेसवले होते ही माहिती पुष्कळांना असेलच. यावरून जर पौराणिक स्त्रिया (प्रत्यक्षात त्या स्त्रिया पुराणकाळी कधी जन्माला आल्या असल्या तर) नऊवारी लुगडे नेसत होत्या असे अनुमान काढले तर ते जसे चुकीचे ठरेल तसेच येथे झाले आहे.
शरदरावांनी वाल्मिकी रामायणातील स्त्रीजीवन असे शीर्षक आपल्या लेखाला देऊन आपली तर सुटका करून घेतली आहे. परंतु वाल्मिकी या कवीने रामायणाच्या आख्यायिकेवर हे काव्य बर्याच नंतरच्या कालात रचले आहे असे जर गृहित धरले तर त्याच्या कालातील स्त्री जीवन व रामायण कालातील स्त्री जीवन यांच्यातील फरकामुळे एक विरोधाभास निर्माण झाला आहे. त्यामुळे
स्त्री ही संपत्तीच्या अनेक वस्तूंपैकी एक मानली जात असे.
एकूण स्त्रीयांचा दर्जा बराच वरचा होता.
यासारखी असणारी वाक्ये लेखात आली आहेत. त्यात शरदरावांचा दोष नाही असे मला वाटते.
चन्द्रशेखर
+१
सिक्स पॅक्स विश्वामित्राला सिड्यूस करणारी काकुबाई मेनका पाहून हसू फुटले होते.
यावरुन
सिक्स पॅक्स विश्वामित्राला
यावरून एट(की टेन) पॅक्ड् भगवान परशुरामाचे (दाढीमिशा सोडल्यातर) पक्के युरोपियन वाटणारे कल्पनाचित्र आठवले.
रामायण वाचले नाही
पण रोचक चर्चा. वाचते आहे.
बाकी कलेवरून एवढेच म्हणता येईल, की कलाकार आपल्या काळाचे प्रतिनिधित्व करीत असतात. आपल्याला कपड्यांमुळे, केशभुषेमुळे जी मेनका आता काकूबाई वाटते ती ज्या पद्धतीने विश्वामित्राजवळ बसली आहे तसे पुरूषांजवळ बसणे रविवर्म्याच्या काळातील स्त्रियांसाठी निषिद्ध असावे. (अजूनही बरेच ठिकाणी रीतीला धरून नसावे).
खुलासा
(१)प्रियाली
रामायणावरील एका विधानाशी महाभारतावरील दुसर्या विधानाशी तुलना कशी करता येईल ? वाल्मीकीच्या रामायणात गोषा आढळत नाही व व्यासांच्या महाभारतात तो आढळतो या दोन विधानात विरोध कुठे येतो ?
"तरीच रामाला एकपत्नीपद पाळणे शक्य झाले असावे..."कोट्यावधी लोकांची जाच्यावर श्रद्धा आहे अशा व्यक्तीबद्दल असे विधान करणे मला खेदजनक वाटते.आपण टिंगळटवाळी करतांना इतरांच्या भावनेचा विचार करणे हा सुसंस्कृतपणाचा भाग आहे; विशेषत: तसा काही पुरावा नसतांना.
"फार मोठ अपराध नसतांना..." येथे मी संस्कृत श्लोक देत नाही, मराठी भाषांतर देत आहे.
"विरूप, दुराचरिणी, ओबडधोबड, पोट खबदाडीला गेलेली आणि वृद्ध अशी जी ही भार्या तिच्यावरील प्रेमामुळे तू माझा अव्हेर करीत आहेस, तेव्हा मी आज या तुझ्या नुष्यजातीच्या स्त्रीला तुझ्या समक्ष्भक्षन करून टाकीन आणि याप्रमाणे माझी सवत नाहिशी झालेली मी तुझ्याबरोबर सुखाने संचार करीन ". याप्रमाणे रामाला बोलून रोहिणीकडे धावणारी मोठी जळजळीत उल्काच की काय, अशा रीतीने अलातचक्रासारख्या नेत्रांनी युक्त असलेली ती शूर्पणखा अत्यंत कृद्ध होऊन सीतेच्या अंगावर धावली..." रामाने काय करावयास पाहिजे होते ? सहजशक्य असून त्याने "ठार न मारता फक्त विरूप कर "असे लक्ष्मणाला सांगितले. अशा प्रसंगीही तो स्त्री अवध्य समजतो.
(२) बाबासाहेब जगताप
आपण म्हणता त्याप्रमाणे केवळ माहीती देणारा लेख लिहता येतो. पण तो निरस होण्याची शक्यता वाढते. तुलना व थोड्याश्या टिपण्या वाचनियतेकरिता देत असतो. हा भाग कोण्या विद्वानाचा गाढ अभ्यासानंतरचा नित्कर्ष समजण्याचे कारण नाही. पटले, पटले, नाही तर सोडून द्या वा वेळ असेल तर आपले विचार मांडा. सर्व लेखातली २-४ वाक्ये सोडून देऊन किमान थोडीफार माहीती देता आली तरी माझ्यासारख्याला ते पुरेसे वाटते.
दास-दासी हा रामायणातला अविभाज्य भाग आहे. दासी आहेत, तरीही स्त्रीचा दर्जा बराच वरचा असावयास हरकत नाही. हे माझे मत. आता वेश्यावर्ग आदी काळापासून आहे व अनंत कालापर्यंत रहाणारच म्हणून सर्व जगात स्त्रीचा दर्जा कायमचा खालचा असे आपण म्हणणार का ? (८) मध्ये दासी वर्गाबद्दल माहीती आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
वाल्मीकि रामायणाच्या इतर अभ्यासू वाचकांनी विषयानुरुप वर्णनपर भर घालावयास हवी.... १०० % मान्य. वैयक्तिक मला टिपण्यासहित जास्त आवडेल.
(३) चंद्रशेखर
विरोधाभास. साहेब, हे असे काही तरी फाटे फुटतात हे लक्षात घेऊन "रामायणातील" हे स्वच्छ लिहले आहे व (रामायणकालीन नव्हे) हे कळावे म्हणून "वाल्मीकि रामायण", इतर नव्हेत हेही लिहले. तुलसीदासांच्या रामायणात स्त्रीजीवन निराळे असणारच !
शरद
कोट्यावधी लोकांची श्रद्धा
सर्वप्रथम महाभारतात गोषा पद्धत होती या वाक्यावर माझा काडीचाही विश्वास नाही. मी तफावत दाखवली कारण महाभारतात गोषे येण्याइतपत कोणती परिस्थिती बदलली होती यावर आपण प्रकाश टाकू शकता काय? आपण आपल्याला सोयिस्कर असे निष्कर्ष काढत असता हे दाखवून देण्याचा तो प्रयत्न होता इतकेच. तारेचे, रोमाचे आणि सीतेने केलेल्या लक्ष्मणाच्या अवहेलनेचे उदाहरण आपण सोयिस्कर रित्या नजरेआड केलेत. आपल्या अशा घिसाडघाईच्या निष्कर्षांमुळे आपले वाचन विपुल असूनही लेख उथळ होतात असे वाटते.
शूर्पणखेला हुसकावूनही लावता आले असते किंवा समजवताही आले असते. हे रामाने काय करायला हवे होते हा प्रश्न विचारलात म्हणून हे उत्तर. अन्यथा, रामाला जे करायचे होते ते त्याने केले. शूर्पणखेची मस्करी करताना तो खोटेही बोलला. मूर्खांची मस्करी करू नये ती अंगाशी येते हे बहुधा त्याला ठाऊक नसावे. :-) आणि त्याचे परिणामही भोगले. बाकी, उल्केने रोहिणीच्या रोखाने धावून जाणे वगैरे रामायण या काव्यातील अतिशयोक्ती अलंकार आहेत. खरेतर, रामायणात त्राटकेचा वध, परशुरामाने केलेली रेणुकेची हत्या वगैरे गोष्टीही रामायणात येतात. यावरून स्त्रिया अवध्य होत्या असा काही प्रकार दिसत नाही. दुर्बलांचे रक्षण करणे आणि त्यानुसार स्त्रियांचे रक्षण करणे हे योग्य वाटते. यांत मुले, म्हातारेकोतारेही आलेच. तसेही, पूर्वी गायी आणि स्त्रिया यांची हत्या केली जात नसावी. याचे कारण वंशवृद्धीसाठी दोन्ही उपयोगी असतात हे असावे आणि बहुपत्नीत्वाची पद्धतही असावी. त्यात फार मोठे उदार धोरण दिसत नाही. स्त्रीगर्भाची, मुलींची हत्या वगैरे एकपत्नीत्वाची पद्धत रुजू झाल्यावर होऊ लागली की का अशी शंका येते.
शरद यांचा राम या पुरुषाचे किंवा राजाचे स्त्रियांविषयक धोरण आणि रामायण कालातील स्त्रियांविषयक धोरण यांच्यात गोंधळ झालेला दिसतो. कारण रामायण कालीन म्हटले की विदेहातील जनकाचे स्त्रियांविषयक धोरण, किष्किंधेतील सुग्रीव वालींचे स्त्रियांविषयक धोरण, लंकेतील रावणाचे स्त्रियांविषयक धोरण आणि अयोध्येतील भरताचे किंवा दशरथाचे स्त्रियांविषयक धोरण याचीही माहिती हवी.
\
खरेच? रामाला दास्या मिळाल्याने त्याने दुसरे लग्न केले नाही ही टिंगलटवाळी आहे की सत्य असू शकेल? आणि कोट्यावधी लोकांची श्रद्धा वाल्मिकींच्या कथा नायकावर आहे. ज्याला अवतार मानल्याने त्याचे मनुष्यपण लोकांनी संपवून त्याला देवत्व बहाल केले आणि त्याच्या नावावर आपल्याला हवे ते खपवले. दोष त्या लोकांचा मात्र नाही कारण ते "श्रद्धावान" हे किती हास्यास्पद आहे हे आपल्या लक्षात येते आहे का? इतरांच्या भावनांचा विचार करताना सत्य दडवून ठेवणे हे देखील माझ्यामते सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. रामाला दास्या मिळाल्या असतील तर दास्यांचा उपयोग जसा करतात तसाच रामाने केला असावा त्यासाठी आणखी पुरावे कोणते हवेत. रामाने दास्यांना दास्यातून मुक्त करून त्यांचे लग्न करून दिले असे संदर्भ रामायणात आहेत का?
सत्य दडवून आपल्याला हवे ते पुढे सादर करायचे आणि लोकांना त्यावर श्रद्धा ठेवण्याची सक्ती करायची* ही आपली संस्कृती झाली आहे आणि हा प्रकार किती खेदजनक आहे याची कल्पना शरद यांना येत नाही यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते?
* कोट्यावधी लोकांची ज्यावर श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल वेगळे उद्गार काढलेत तर खबरदार आणि कोट्यावधी लोकांची जाच्यावर श्रद्धा आहे अशा व्यक्तीबद्दल असे विधान करणे मला खेदजनक वाटते या दोन्ही वाक्यांतून एकच भावना दिसते. :-) व्यक्तिपूजेचे अमाप स्तोम माजवल्याचा आपल्याकडे जो गलिच्छ प्रकार दिसतो त्यातला एक भाग म्हणजे अनेकांची ज्यावर श्रद्धा आहे त्याच्या विरुद्ध काही एक बोलायचे नाही, आमच्या भावना दुखावतात असे सांगायचे.
माहिती हवी
(१) परशुरामाने केलेली रेणुकेची हत्या, (२) रोमा नावाची व्यक्ती, मला माझ्याकडील (संस्कृत व पं.सातवळेकर यांचे भाषांतर)
वाल्मीकि रामायणात सापडली नाही.
कृपया कांड /सर्ग देऊन उपकृत करावे.
समित्पाणी शरद
हेच म्हणतो..!
ही रोमा कोण ?
-दिलीप बिरुटे
रोमा किंवा रुमा
रोमा किंवा रुमा (इंग्रजी भाषांतरात तिला रोमा म्हटल्याचे आढळले. वर्तक रुमा म्हणतात. विकीवर रोमा म्हटले आहे.) ही सुग्रीवाची पत्नी. उच्चारछटेतील थोड्याशा फरकाशिवाय इतर कोणत्याही नावाने ती आढळत असेल असे वाटत नाही. (उदा. रोमिला [थापरांची], रम्या [दाक्षिणात्यांची] वगैरे) त्यामुळे ती वाल्मिकी रामायणात सापडली नाही असे म्हणणे कोड्यात टाकते. असो.
परशुरामाची कथा ही अरण्यकांडात येत असावी किंवा अयोध्याकांडात. मला संदर्भ शोधावे लागतील. आता देणे कठिण आहे. सप्ताहाखेरीस देईन.
धन्यवाद,,,!
रोमा / रुमा बद्दल अजून काही माहिती येऊ द्या.
मराठी विकिपिडियावर रोमा/ रुमा या पात्राची भर घातली. :)
-दिलीप बिरुटे
आदर आणि सहिष्णुता
बिल माहर या विनोदकाराचे एक वाक्य मला खूप आवडते "यू कॅन हॅव माय टॉलरन्स, यू कान्ट हॅव माय रिस्पेक्ट". म्हणजे करोडो लोकांच्या श्रद्धेचा मी आदर करीत नाही, त्यांचा अज्ञपणा मी सहन करतो.
जर "स्त्री ही संपत्तीच्या अनेक वस्तूंपैकी एक मानली जात असेल" तर होय.
मर्यादापुरुषोत्तम
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
रामायण या महाकाव्याचा नायक राम याचे व्यक्तिचित्र वाल्मीकीनी मर्यादापुरुषोत्तम असे रेखाटले आहे. तो एकपत्नी,एकवचनी होता असे म्हटले आहे. संपूर्ण महाकाव्यात या गुणांचा परिपोष आहे. अयोद्धाकांडांतः
"न रामः परदारान्सः चक्षुर्भ्यामपि पश्यति| (तो राम परस्त्रियांकडे डोळेवर करून सुद्धा पाहात नाही." असे वाक्य आहे. असा नायक रेखाटण्यात त्यांचा काही हेतू असेल नसेल.पण तसे व्यक्तिचित्र आहे एव्हढे खरे.
रामचरित्रातील दोष (शंबूकवध,वालीवध, सीतात्याग) चिकित्सकांनी दाखवलेच आहेत. तसेच राम दैववादी तर लक्ष्मण प्रयत्नवादी दाखवला आहे. मात्र रामाच्या एकपत्नीव्रताविषयी कोणीही संशय व्यक्त केलेला नाही. कारण अशा संशयाला पोषक असा एकही उल्लेख रामायणात नसावा. त्यामुळे तसा आरोप करणे उचित ठरणार नाही असे मला वाटते.
आरोप(?)
चला या निमित्ताने विज्ञानवादी आणि दैववादी एकत्र आल्याचे पाहून परम संतोष झाला. :-) अन्यथा, माझ्या मूळ प्रतिसादातील विधानात आरोप नाही केवळ अंदाज आहे. रामाच्या एकपत्नीव्रताविषयी या लेखातही संशय व्यक्त केलेला नाही. रामाने एकपत्नीव्रत पाळले याबद्दल कोणाच्याही मनात किंतु दिसत नाही. याचा अर्थ रामाने स्त्रीसुख भोगले नाही असा होत नाही. केवळ त्याला दुसरी पत्नी नव्हती असा होतो. राम परस्त्रीकडे डोळे वर करून पाहत नसावा यावरही माझा विश्वास आहे. परंतु कररुपाने त्याला मिळालेली दासी ही परस्त्री कशी ठरेल? ती त्याची स्त्री झाली ना. त्याने या स्त्रियांचा अव्हेर केला किंवा उद्धार केला याचेही उल्लेख रामायणात नसावेत. तेव्हा त्याने तत्कालीन पद्धतीला अनुसरून दासी ही स्त्री जशी वापरली जाते तशीच वापरली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात गैर ते काय?
संयुक्तीक अंदाज
दासी ही स्त्री जशी वापरली जाते तशीच वापरली असावी
आपला अंदाज संयुक्तीक व पटणारा आहे. असाच वस्तुनिष्ठ विचार केला तर भाबड्या श्रद्धेपायी होणारे बरेच पौराणिक गैरसमज दूर होतील.
रोचक
एकपत्नीवरून एक मनात असणारा जूना प्रश्न आठवला:
रामायणकाली 'लग्नविधि' होता का? असल्यास तो कसा होता आणि त्यापैकी किती विधी आताच्या लग्नात दिसतात?
बाकी, लेखातील संकलन-निष्कर्ष / अंदाज रोचक आहेत
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
वैदिक विधी होत असावेत असे वाटते
लग्नविधीतले बरेचसे तपशील वैदिक आहेत. रामायण (साहित्यकृती आणि साहित्यकृतीतली घटनासुद्धा) हे स्वतःला वेदांनंतरचे म्हणून सांगते.
रामायण कथानकात आणि लेखकांच्या काळातही हे विधी होत होते, असे मला वाटते.