शिक्षणाचा मूलभूत हक्क की कारस्थान

एखादी चांगली गोष्ट घडत असली की काहीतरी कुजक्या शंका काढून त्यात खोडा घालायची सवय काही महाभागांना असते. अर्थात ज्याचा त्याचा विचार करण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याने मला तरी वाटते की अशा शंकासुरांचा मूळ बाब निर्दोष ठरण्याला बऱ्याचदा उपयोग होतो. कधीकधी सामोऱ्या न आलेल्या बाजू अचानक दृष्टीक्षेपात येतात.
केंद्रशासनाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार माननारे ऐतिहासिक वगैरे असे एक विधेयक सध्या मंजूर केले आहे. ज्यामूळे शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत अधिकारात समावेश झाला आहे. महाराष्ट्राने आपला पूरोगामीपणा दाखवत (की मिरवत) हे विधेयक तात्काळ राज्यात लागू केले आहे. यानुसार नुकत्याच राज्यशासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार आता इयत्ता आठवीपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला अनुउत्तीर्ण करता येणार नाही. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नापास घोषित केले असेल त्यांना पूढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असो.
तर शंका अशी की विद्यार्थ्याचा घरी करवून घ्यावयाचा अभ्यास ही जी काही शाळाबाह्य संकल्पना आहे ती फक्त संख्येने अतिशय मर्यादित असणाऱ्या मध्यमवर्गाबाबतीत अवलंबली जाणारी बाब आहे. महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मुलाचा गृहपाठ घरी करुन घेणे तर सोडाच पण त्याने त्याच्या शाळेच्या वेळेत काळी केलेली पाने पाहण्यासही त्याच्या आईबापाला वेळ नसतो. हे घडून येते ते त्यांच्या गरीबीपायी किंवा अज्ञानापायी. नोकरदार व तत्सम मध्यमवर्गात मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायच्या वेळापत्रकाचे नियोजन आईवडीलांनी व्यवस्थितपणे पाळलेले दिसून येते. या सगळ्यातून एक बाब समोर येते की नापास करु न शकणाऱ्या भाबड्या शिक्षकाची इथून पूढे काडीचीही भीती न बाळगणारे मूल निदान आईवडीलांच्या गृहपाठाने तरी किमान ज्ञानाचे धडे गिरवत राहील. (शिक्षकाने विद्यार्थ्याला भीती दाखवलीच पाहीजे का? ही बाब इथे दूर्लक्षिली जरी गेली असली तरी पास होणे ही जबाबदारी मानूनच भाबडी मूले कष्ट करुन शिक्षकाला सहकार्य करीत असतात. आपणाला ज्ञान मिळवायचे आहे या भावनेतून शिकायचे असा विचार करण्याची त्यांची क्षमता असते का याची मला शंका आहे.)
या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिकणारे लाखो विद्यार्थी कोणत्या उद्दीष्टाला समोर ठेऊन ज्ञान संपादन करतील हा प्रश्नच आहे. शिक्षकांना (अपवाद क्षमस्व) आजपर्यंत ज्या पोरांच्या परीक्षा घेतल्या त्यांचे नियमानुसार पेपर तपासून त्यांना पास करता करता नाकीनऊ येत होते. ती पोरे आता विनासायास वरच्या वर्गात जात असतांना पाहून हायसे वाटेल. (विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या नव्या पद्धतींनी शिक्षकाची जबाबदारी निश्चित केली जाईल असे शासन म्हणते आहे हा एक दिलासा.) पोरगा पास झाला का याची तरी ग्रामीण भागात पूर्वी विचारणा होत होती आता त्याचीही सोय राहीली नाही. शिक्षणतज्ञांचे या विधेयकानंतर दर्जाबाबतचे मत पाहीले तर त्यांना मूल पहील्यांदा शाळेत आले व टिकले पाहीजे हे महत्त्वाचे वाटते. अनेक मुले आज शाळाबाह्य ठरली आहेत हे मान्य पण जी शाळेत येतात. नियमित अभ्यास करतात. एकेका मार्कासाठी शिक्षकांना भांडतात. अभिमानाने दरवर्षी गुणपत्रक मिरवतात त्यांना आता आपण अभ्यास कशासाठी करायचा ह्याचे काहीतरी संयुक्तीक कारण पटवून द्यावेच लागेल. अन्यथा सगळी मूले आठवी पास होतील आणि नववीत अर्धी व दहावीत अर्धी गळतील. ही सगळी गळती अर्थातच ग्रामीण भागातल्या मुलांची असेल. कारण आज फक्त ग्रामीण भागात औपचारीक शिक्षण हे शंभर टक्के शाळेवर अवलंबून आहे. पहीलीत घातलेल्या पोराची प्रगती कितपत झाली हे खेड्यापाड्यातल्या आईबापांना मुलगा दहावीत पास/नापास झाल्यावरच कळते. एरवी आजही फक्त परीक्षेला गैरहजर राहणारी मुलेच फक्त नाईलाजाने नापास केली जातात. आता तर गैरहजर राहीला तरी शिक्षक या विद्यार्थ्यांची मिनतवारी करुन त्याला पूढच्या वर्गात प्रवेश देणार आहेत. म्हणजे ग्रामीण भाग त्यातही ग्रामीण भागातल्या अशिक्षित, मोलमजुर, शेतकरी लोकांची पोरे फक्त आठवीपर्यंत शिकतिल आणि मग पुढचे सगळे मार्ग शहरी मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय मुलांच्या पाल्यासाठी मोकळे उरतील. आठवी पर्यंत सक्तीचे शिक्षण म्हणजे फक्त आठवीपर्यंतच शिक्षण असे होण्याचीच शक्यता जास्त वाटते. शिक्षणाचा अधिकार मूलभूत नसतांनाही लाखो मूले शिकत होतीच. शिक्षणाचा हक्क देण्याची भाषा करतांना आपण समाजाच्या मोठ्या भागाला फक्त प्राथमिक शिक्षणापूरते मर्यादीत करण्याच्या मोठ्या कटकारस्थानात तर सहभागी होत नाही नाही ना याचा ही या निमित्ताने विचार व्हायला हवा.

Comments

शिक्षकांनी शिक्षा करायची नाही,आई वडिलांनी करायची नाही तर मग शिक्

thanthanpal.blogspot.comशहरी काय आणि ग्रामीण काय संपूर्ण शिक्षणाचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्ण सत्यानास झाला आहे. यात ग्रामीण आणि शहरी असा भेद राहिला नाही. महत्वाचे आज बालमानस शास्त्राने मुलांचे नको एव्हडे लाड करणे सुरु केले आहे. शिक्षकांनी शिक्षा करायची नाही,आई वडिलांनी करायची नाही तर मग शिक्षा कोणी करायची? वेळीच चूक गोष्टीची शिक्षा केली नाही तर मोठे पाणी यांना शिक्षा काय असते यासाठी काय तुरुंगात पाठवणार.या करता तुरुंग पण कमी पडतील. फक्त कोणी मान्य करत नाही. राहिले महाराष्ट्रा सरकारचे. आज महाराष्ट्रा सरकार HER MASTERS VOICE चे काम करत आहे.

वैचित्र्यपूर्ण अधिनियम

अधिनियम वैचित्र्यपूर्ण आहे खरा.

प्राथमिक शिक्षण

केंद्र सरकारने मूलभूत अधिकार म्हणून राष्ट्रघटनेत शिक्षणाचा केलेला समावेश व त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आठवी पर्यंत परिक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय या दोन्ही गोष्टींकडे थोडे निराळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. इंग्रजांनी आपल्या देशात जेंव्हा सध्याची शिक्षण पद्धती आणली तेंव्हा त्याला इतके विकृत स्वरूप येईल ही कल्पनाही त्यांना स्वप्नात सुद्धा कधी आली नसेल. आजच्या शिक्षणाचे ध्येय ज्ञानप्राप्ती व आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल अशी कौशल्ये प्राप्त करणे हे राहिलेले नसून परीक्षा कशीतरी उत्तीर्ण होण्याचा मार्ग एवढेच राहिलेले आहे. या सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हे परिक्षार्थी न होता ज्ञानार्थी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने ही दोन्ही पाऊले अत्यंत महत्वाची आहेत असे वाटते.
या पुढे जाऊन मी तर म्हणेन की दहावी व बारावी या परिक्षांच्यात देण्यात येणारे वर्ग, गुण या गोष्टी हळू हळू बंद करून. या परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या सर्वांना त्या विद्यार्थ्याने ही परिक्षा देण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आत्मसात केले आहे एवढेच प्रमाणपत्र दिले पाहिजे. अर्थात यासाठी सर्व शिक्षण संस्था आणि शिक्षणवर्ग यांच्या गुणवत्तेत प्रचंड सुधारणा होणे आवश्यक आहे व ती ताबडतोब होणारही नाही.
या विषयावर मी काही दिवसांपूर्वी एक ब्लॉगपोस्ट लिहिले होते. ज्यांना रुची असेल ते वाचू शकतात.
चन्द्रशेखर

शाळा = पब्लिक ट्यूशन्स

या अध्यादेशामधून शासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला 'पास' म्हटलेले आहे.
जर शाळेत परीक्षाच नसतील तर शाळेत जायचेच कशाला?
ज्यांना आपल्या पाल्यांची काळजी आहे त्यांनी मुलांना घरी शिकवावे अथवा प्रायव्हेट ट्यूशन्स लावाव्यात.
थेट नववीची परीक्षा द्यावी.(शाळांमधल्या मुलांची आणि रस्त्यावरल्या स्कूलबसेसची गर्दी टाळण्यासाठी सरकारनेच तशी सोय करावी.)
शाळा या आता केवळ पब्लिक ट्यूशन्स उरलेल्या आहेत आणि प्रत्येक 'पब्लिक' सरकारी योजनेप्रमाणे शिक्षणाचाही बट्ट्याबोळ झालेला आहे.
देशाचे महान शिक्षणमंत्री शिक्षणक्षेत्रात स्पर्धा आणू पहात आहेत. त्यांना येत्या पाच दहा वर्षात देशभरात ५०० नवी (खासगी) विद्यापीठे
उभी करायची आहेत. विद्येचे पीठ आधुनिक तंत्रज्ञानाचा गिरण्या वापरून दळायचे आहे.
खरा उद्देश शिक्षण क्षेत्राचा 'उद्योग'बनवून त्यात खुली अर्थव्यवस्था आणि खासगीकरण आणून 'परमिटे' वाटताना भरपूर कमिशन खाणे हा आहे.
थोडक्यात, अजून वीसेक वर्षांनी भारतातही सं. रा. अमेरिकेप्रमाणे सर्वत्र पब्लिक स्कूल्स आणि प्रायव्हेट स्कूल्स सुरू होऊन 'पैसा असेल तर शिक्षण'
अशी अवस्था येईल.
अमेरिकेत निदान स्कॉलरशिप मिळवताना तरी गुणवत्तेचा उपयोग होतो. इथे स्कॉलरशिप देणारेही पैसा खाऊन त्याचे वाटप करतील.
भारतातील प्रचंड लोकसंख्येने विधीनिषेधाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

शिक्षणाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी न होता काही मूठभर लोकांच्या तिजोर्‍या भरण्यासाठी होणार आहे.
सरकारी शिक्षणसंस्थांना दिले जाणारे अनुदान ९०%-१०% न्यायाने विविध पातळ्यांवर झिरपेल आणि
खासगी विनाअनुदानित शिक्षणसंस्था पुढार्‍यांची कमिशने, योग्यता-प्रमाणपत्र देणार्‍या अधिकार्‍यांची चिरीमिरी, स्वतःचा फायदा
यांची बेरीज करून विद्यार्थ्यांच्या माथी मारतील.

२०३० साली १८ वर्षांवरील प्रत्येक भारतीय साक्षर असेल पण सुविद्य नसेल.

राज्यशासनाकडून

परीक्षा नकोत... हव्यात... नुसत्या घटक चाचण्या?... नाही, तीन परीक्षा?... नको त्यापेक्षा परीक्षाच नको..

२००६ शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्याबद्दल मराठी वृत्तपत्रात काय म्हटले आहे पहा -

"महाराष्ट्रातील सर्व शाळांत घटक चाचण्या घेण्याच्या पुरके सरांच्या निर्णयाला गेल्याच महिन्यात झालेला सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय विरोध बघितल्यावर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून त्यास स्थगिती द्यावी लागली होती. पण त्यानंतर पुरके सर पुन्हा काही तरी नवे आणि भव्य दिव्य करून दाखवण्याच्या मोहात सापडले असून, आता त्यांनी इयत्ता चौथी आणि सातवी अशा दोन स्तरांवर एसएससीच्या धतीर्वर बोर्डाची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. "

" शाळांच्या तुकड्या कायम ठेवण्यासाठी सतत वरच्या वर्गात मुले ढकलली जातात, त्यावर उपाय म्हणून पहिली ते दहावी या कालावधीत बोर्डाच्या तीन परीक्षा पुरके सर विद्यार्थ्यांवर लादू पाहत आहेत. "
(महाराष्ट्र- टाईम्स २००६)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1945113


औपचारिक शिक्षण द्यावे का अनौपचारिक शिक्षण?

"अनौपचारिक शिक्षण हे एका अर्थाने मुक्त शिक्षण आहे. ज्याला हवे, त्याला तसे शिक्षण घेण्याची मुभा ही पद्धती देते. तिच्या प्रवेशावर बंधने नसतात. प्रवेशासाठी तिथे गुणवत्तेचा आग्रह नसतो. आमच्या दृष्टीने ज्यात आपण स्वत: जातीने लक्ष घालावे व पुन्हा एकवार ही शिक्षण पद्धती सखोलपणे तपासून घ्यावी व त्यानंतर योग्य निष्कर्ष व निर्णय घ्यावे, अशी आपणासमोर कळकळीची विनंती आहे." (श्री. अभिजित राणे, ग्रेट मराठा एज्युकेशन ट्रस्ट)
http://editorabhijeetrane.blogspot.com/2009/08/blog-post_9746.html
मात्र हे अनौपचारिक शिक्षण देणार कोण आणि कसे याविषयी काही बोलत नाही. सध्याचे शैक्षणिक धोरण या अनौपचारिक शिक्षणाकडे सुरू झालेली वाटचाल आहे की काय असे वाटते आहे.

प्रत्येक नव्या शिक्षणमंत्र्याबरोबर असे क्रांतीकारक निर्णय यायला लागले, तर यापैकी कुठच्याही एका निर्णयामागे खरोखर विचार झालेला आहे का नाही, हे कसे कळणार?

साक्षर - सुविद्य

२०३० साली १८ वर्षांवरील प्रत्येक भारतीय साक्षर असेल पण सुविद्य नसेल.

सध्या परिस्थिती आहेत की भारतात काहि टक्के लोक साक्षर व त्यातील फारच काहि सुविद्य आहेत. जर प्रत्येक जण साक्षर होणार असेल तर त्यातून सुविद्य जनता वाढण्याची शक्यता अधिक आहे असे वाटते. मग होतोय हा बदल चांगलाच नाहि का?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर