भारतीय पक्षी

कालचा प्रसंग आहे. माझी ऑफीस बस नॅशनल पार्कवरून सुटते. तिची वाट बघत मी उभा होतो. इथे दरवेळी विविध पक्षी दिसत असतात. आज मात्र पक्ष्यांचा रंगढंग और होता. कावळे, साळुंक्या अविश्रांत फडाड करीत होते, ओरडत होते. का ते कळेना. बस यायला थोडा वेळ होता.. मीही जरा उत्सूकतेने बघु लागलो.. कावळे, साळुंक्या एका झाडाकडे बघत ओरडत होते. त्या झाडात नीट बघितले तर एक कबुतरासारखाच पण गुलाबी छातीचा बाणेदार पक्षी ह्या पक्षांच्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करीत ताठ बसला होता. हे पक्षी त्याच्या अस्तित्त्वामुळेच घाबरून ओरडत होते. नंतर बस आली आणि मी निघालो मात्र घरी येईपर्यंत तो पक्षी डोक्यातून जात नव्हता. आल्या आल्या माझ्याकडचं, पक्ष्यांच्या दैवताने लिहिलेलं भारतीय पक्षी काढलं.. एकामागून एक फोटो बघत होतो अखेरीस एक फोटो त्या पक्ष्याचाही होता.. तो पक्षी होता "शिक्रा". त्याची माहिती वाचल्यावर कळलं की हा पक्षी धूर्त असून लपून बेमालूम वार करण्यात, पिलं मारण्यात हा निष्णात आहे. व तेव्हा इतर पक्ष्यांच्या कल्लोळाचा अर्थ लागत होता.

तर असं हे पुस्तक "भारतीय पक्षी". त्याचे लेखक आहेत डॉ. सलिम अली आनि सहलेखिका ख्यातनाम पक्षीप्रेमी लईक फतेहअली. भारतात पक्षीविज्ञान या निसर्ग इतिहासतील अभ्यास शाखेला प्रामुख्याने डॉ. सलिम अली (मृत्यू: १९८७) यांनी लिहिलेल्या पक्षीविषयक ग्रंथांमुळेच चालना मिळाली. सामान्यांना समजेल अश्या भाषेत शास्त्रिय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमधे असते. डॉ. अली त्यापैकीच एक!. संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते भारतातच नाहि तर जगातील एक सर्वात प्रमुख पक्षीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

हे पुस्तक म्हणजे डॉ. सलिम अली व सहलेखिका लईक फतेहअली या दोन पक्षीप्रेमींची मौल्यवान भेट. भारतातील पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी परकीय लेखकांच्याच्या पुस्तकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा आपल्या भारतीयाचे हे पुस्तक खूप नवी आणि एकत्रित माहिती देते. रा. वि. सोवनी यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मोठ्या परिश्रमाने मराठी नावे शोधून तीही दिली आहेत.

आतापर्यंत भारतीय पक्षी परदेशी व्यक्तींनी बरेच अभ्यासले होते. नव्या पक्षांना नावे देण्याचे, त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्याचे काम त्यांनी केले होते. मात्र ह्या पुस्तकातून आपल्याला भेटतात ते भारतीय पक्षी, भारतीय नावांसकट. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातही जरा सावध नजर ठेवली तर आपल्यालाही अनेक पक्षी दिसतात हा स्वानुभव आहे. ह्या पुस्तकात पक्षांचे कुल कसे ठरवायचे, त्याची वर्गवारी कशी करायची व त्यामार्गे पक्षी अचुक कसा शोधायचे ते नीट दिले आहे.

जाता येता पक्षीनिरिक्षण करणार्‍या तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींना पक्ष्यांसंबंधी नवी गोष्ट शोधता येणे (आणि शोधली तरी ती नवी आहे हे कळणे) जवळजवळ अशक्य आहे. पण पक्ष्यांची चांगली ओळख झाली की हा निरिक्षणाचा छंद टिकतो व जगाच्या पाठीवर कुठेही टिकवता येतो. ह्या पुस्तकात प्रत्येक भारतीय पक्ष्याचे चित्र, त्याच्या सवयी, विणीच्या हंगामातील बदल, आवाज, घरटे याबद्द्ल नीट माहिती दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक निरागस पक्ष्यांची तोंडओळख करू पाहणार्‍या प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे

पुस्तकः भारतीय पक्षी
लेखकः डॉ. अलिम अली व लईक फतेहअली
अनुवादः रा.वि.सोवनी
प्रकाशकः नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया
किंमतः रु. ३२
पृष्टे: १०४

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

छान पुस्तक परिचय. पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार यांनी एकत्र येऊन एखादी सचित्र लेख मालिका उपक्रमावर लिहिली तर छानच. :)


सुन्दर् पुस्तक् परिचय्

आपण् चहा पिशवि प्रमाणे असतो. गरम् पाण्यामधे बुड्वल्याशिवाय आपलि ताकत कळ्त् नाहि

शिक्रा

शिक्रा पक्षाचा शोध घेताना ही लिंक सापडली.

पण तुम्ही म्हणता तशी गुलाबी छाती वाटत नाही.

पण गरुड फॅमिलीतला असल्याने बाणेदार नक्कीच आहे..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

ह्म्म्म्

विकीवरच्या लिंक मधे शेवटचा फोटो आहे ना.. साधारण तसाच होता.. राखी रंगाचा मात्र छाती गुलाबीसर होती.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छान लेख

ओळख आवडली.

असेच

म्हणतो. पुस्तक वाचनीय यादीत टाकले आहे.

अवांतर : न्याट जिओ किंवा डिस्कव्हरईवर पक्षी-प्राणी बघताना वेळ कुठे जातो कळत नाही.

ओळख करून देणे फार आवडले

फारच छान लेखन आहे.
एखाद्या प्रसंगातून पुस्तकाची आणि त्या लेखकाचीही अल्प ओळख करून देणे फार आवडले.
आता एका ओळखीचे बोट धरल्यावर लेखमाला द्या असे हात धरणे, विचारणे आलेच ;))

तेव्हा पक्ष्यांवरील पुस्तकाच्या ओळखींची लेखमाला येउ द्या!

मुळात हे पुस्तक खरं तर इतके स्वत आहे प्रत्येकाने त्याची मागणी जरूर नोंदवा *
मुळात पक्षीनिरिक्षण खूपच आनंददाई प्रकार आहे. मारुती चितमपल्लींनीही यात भर घातली आहे.
सलीम अलि आणि ते बरोबरच मोहिमांवर फिरत असत असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते.

नाशिकजवळ नांदुर मध्यमेश्वर नावाचे एक पक्षी अभयारण्य आहे. पण त्याची आता पार वाट लागली आहे.
पूर्वी येथे पक्षी असायचे पण त्यावेळी आमच्याकडे कॅमेरे नव्ह्ते. आता चांगले कॅमेरे आहेत पण त्यासाठी फोटो काढायला पक्षीच नाहीयेत...

माडगुळकरांनी (?) यावर त्यांच्या एक पुस्तकात असाच किस्सा लिहिला आहे. ते जुन्या वाचलेल्या माहितीच्या आधारावर पक्षी शोधण्याचा अपयशी प्रयत्न असे त्याचे काहीसे स्वरूप आहे. तेथील स्थानिकांनाही ते पक्षी आता आठवत नसतात वगैरे...

पुस्तकाचे नावही आता आठवत नाही.

आपला
(धड आठवू न शकणारा)
गुंडोपंत

* मी त्या प्रकाशन गृहासाठी वगैरे काम करत नाही ! ;)

मारुती चितमपल्ली

सकाळमध्ये मारुती चितमपल्ली यांची लेखमाला यायची. तसेच् त्यांची बरीच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत..

ही घ्या लिस्ट

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

पेक्षा

त्या पानापेक्षा मारुती चितमपल्लींचे हे पान जास्त चांगले वाटते बघायला.
तुम्हालाही वाटेल... अशी खात्री आहे.

आपला
गुंडोपंत

माहिती महत्त्वाची

मराठीतलं पान छानच आहे. ते आहे हे आधी माहित नव्हते नाहीतर तीच लिंक दिली असती. त्याचबरोबर सर्वांना माहिती देण्याचा प्राथमिक उद्देश इंग्रजी पानातूनही साध्य होतो.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

सहमत...

ऋषिकेश, पुस्तक परीक्षणबद्दल धन्यवाद. हे पुस्तक माझेही आवडते आहे. कधीही उघडून त्यातली माहिती वाचणे आणि चित्रे बघणे, चांगला विरंगुळा आहे.

परंतु त्यातली चित्रे फारशी चांगली नाहीत. अर्थात पुस्तकाची किंमत बघता चांगलीच आहेत त्यामुळे तक्रार करता कामा नये मात्र कधीकधी पक्षी ओळखताना गल्लत होते. बाकी हे मुखपृष्ठ देतो.

==================

+

सहमत

परंतु त्यातली चित्रे फारशी चांगली नाहीत. अर्थात पुस्तकाची किंमत बघता चांगलीच आहेत त्यामुळे तक्रार करता कामा नये मात्र कधीकधी पक्षी ओळखताना गल्लत होते.

सहमत आहे. हे पुस्तक लेखात म्हटल्याप्रमाणे पक्ष्यांची तोंडओळख करू पाहणार्‍या मंडळींसाठी (पुरते) आहे. जसजसा छंद वाढीस लागेल तस तसे स्वतःहून अनेक ठिकाणी इच्छूक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतील , पुस्तके शोधतील. एकदा पक्ष्यांमधे वर्गीकरण करता आले, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय झाली की मग छंद जोपसण्यासाठी ह्या पुस्तकापेक्षा (जवळून व अचूक चित्र, अधिक माहिती वगैरे असलेली) अनेक उत्तम पुस्तकं आहेतच.. ये तो बस्स् शुरुआत है| ;)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छोटेखानी ओळख

छोटेखानी ओळख आवडली. कधीचा राहून गेला होता प्रतिसाद देणे.

अमेरिकेत पहिल्यांदा आले तर चित्र-विचित्र पक्षी दिसत. त्यांची नावे माहित नव्हती पण हळूहळू नेटावर शोधल्यावर कळू लागली.

लाल भडक रंगाचा कार्डिनल, हळदीच्या रंगाचा अमेरिकन गोल्डफिंच आणि हमिंग बर्डस नेहमी ब्याक यार्डात दिसतात.

 
^ वर