खुले मन की बुद्धिप्रामाण्यवाद?

अन्नपाण्याशिवाय जगण्याचा दावा करणारे अनेकजण आहेत. प्रल्हाद जानी यांचे म्हणे तज्ञांनी निरीक्षण केले. तुलनेने हिरा रतन माणेक यांच्याविषयीची बातमी पहा. दोघांना प्रसिद्धी देण्यात एका डॉ. सुधीर शहांचा हात आहे.
खुले मन ठेवण्यास नको एवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. माझी भूमिका अशी आहे की या लोकांना चर्चेसाठी उभे करणेच चूक आहे. पूर्वग्रहरहित चिकीत्सा, आणि 'कुछ भी हो सकता है' मनोवृत्ती, यांमध्ये फरक आहे. माझ्याशी कोणी सहमत आहे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

उपयुक्तता आणि सत्य

नुसते कोरिलेशन हे 'कारण' नसू शकते, उदा. गॉयटर आणि श्वसनविकार दोन्ही सोबत होतात परंतु डोंगरावरील वास्तव्य हे त्यांचे 'कारण' असल्याचे समजण्यास उशीर लागू शकतो. म्हणजे रॅन्डमनेस नसतानाही, कारणाशिवाय कोरिलेशन येऊ शकते. परंतु नुसते कोरिलेशन प्रतिपादून काहीच हाती लागत नाही. तुटपुंज्या ज्ञानावर आधारित उपचार करण्यापूर्वी त्या कोरिलेशनलाच कारण मानावे अशी माझी मागणी आहे. "कारण सापडले तरच भाकित करता येईल" हा नियम भौतिकशास्त्रातही लागू राहील. गुरुत्वाकर्षणाचे समीकरण नुसते कोरिलेशनच असेल तर त्यातून केलेली भाकिते 'कार्गो कल्ट' बनतील. त्यामुळे भाकिते करण्याच्या हक्कासाठी 'अनलेस...' ही अट आवश्यक आहे.

सापेक्षतेच्या सिद्धांताच्या चर्चेत "कोन ऑफ कॉझेशन" म्हणून जो प्रकार असतो, त्यातील घटना निरपेक्ष रीतीने प्रस्तुत घटनेच्या आधी असते.

जर दोन निरीक्षक भिन्न भिन्न वेगांनी (एकमेकांच्या शंकूच्या आत असो की बाहेर) प्रवास करीत असतील तर एकाच्या मते आधी घडलेली घटना दुसर्‍याच्या मते नंतर घडलेली असू शकते.

प्रश्न

'कोरिलेशन इम्प्लाईज कॉजेशन अनलेस अदरवाईज प्रूव्हड' याचे भाषांतर कसे करता येईल ?

दोन गोष्टींचा परस्परांशी संबंध आहे. म्हणून त्यांच्यात कार्यकारणभाव आहे असे गृहित धरता येते - जर का त्याविरुद्ध पुरावा आढळला नाही तर.

माझे वरचे भाषांतर बरोबर असेल , तर मग हे विधान धनंजय यांच्या विवेचनातल्या "सामान्यनियमांच्या सत्यतेच्या पडताळणीच्या क्षमतेच्या अभावाचा" प्रतिवाद मानायचे काय ?

विज्ञान

विज्ञानाचा स्रोत हा पूर्णपणे उपमानावर (एम्पिरिसिज्म) अवलंबून असतो.
उपमानाशिवाय विज्ञान राहू शकणार नाही त्याचे गणित वा लॉजिक होईल.
अनुमान (डिडक्शन) हे त्यामुळे एक साधन राहते. क्वचितप्रसंगी त्याचा त्याग केला जाऊ शकतो. जसे क्वांटम. मात्र प्रयोगसिद्ध अनुमानाचा त्याग करणे विज्ञानाला जड जाते.

म्हणून विज्ञानात उपमान (इंडक्शन) तर गणितात अनुमान (डिडक्शन) एकमेकापेक्षा महत्वाचे ठरतात. (धनंजय यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरून).

एका प्रतिसादात विज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर द्यायचा हा प्रयत्न.

कोरिलेशन हे कार्यकारण भाव मानता येते हे विधान थोडे सुधारावे असे वाटते. कार्यकारणभावात सहसा एकानंतर एक गोष्टी होत असतात. पहिल्याला कारण आणि दुसर्‍याला कार्य म्हणतो. कोरिलिशेन असण्यासाठी असे जरुरी नाही. उदा. खूप पाऊस पडतो तेथे जंगले असतात. जर आपल्याला माहित असेल की जिकडे खूप पाऊस पडायचा आणि मग तिथे अरण्य झाले. तर तो कार्यकारण भाव. मात्र तसे माहित नसले तर नुसतेच कोरिलेशन.

प्रमोद

मान्य

विज्ञानाचा स्रोत हा पूर्णपणे उपमानावर (एम्पिरिसिज्म) अवलंबून असतो.

+१
मला तर ऍड हॉकिझम सुद्धा चालेल, फक्त ऑकॅमला सांभाळले की झाले.

अनुमान (डिडक्शन) हे त्यामुळे एक साधन राहते. क्वचितप्रसंगी त्याचा त्याग केला जाऊ शकतो. जसे क्वांटम.

क्वांटमच्या बाबतीत काय आहे?

कोरिलेशन हे कार्यकारण भाव मानता येते हे विधान थोडे सुधारावे असे वाटते. कार्यकारणभावात सहसा एकानंतर एक गोष्टी होत असतात. पहिल्याला कारण आणि दुसर्‍याला कार्य म्हणतो. कोरिलिशेन असण्यासाठी असे जरुरी नाही. उदा. खूप पाऊस पडतो तेथे जंगले असतात. जर आपल्याला माहित असेल की जिकडे खूप पाऊस पडायचा आणि मग तिथे अरण्य झाले. तर तो कार्यकारण भाव. मात्र तसे माहित नसले तर नुसतेच कोरिलेशन.

विद्युतचुंबकीय शास्त्रातील उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, इ. मला तरी 'कारण' पातळीवर समजत नाहीत. म्हणजे अमुक दिशेला चुंबकीय क्षेत्र असेल आणि त्याला काटकोनात एखादी तार हलली तर त्या तारेत वीजप्रवाह का वाहतो? मॅक्सवेलची समीकरणे नुसती कोरिलेशन पातळीवरच वाटतात. उलट यांत्रिकीचे नियम 'पटतात'.

क्वांटम

'एकच गोष्ट कधी कणात तर कधी तरंगात असते' , ' एकच वस्तु मधे मार्ग नसताना दुसरीकडे जाते. ' हे डिडक्शनच्या विरोधात आहे असे हे मत आहे.
या मताला प्रतिवाद करता येतो पण तो एक वेगळा विषय होईल.
प्रमोद

पाथ इंटेग्रल

एकच गोष्ट कधी कणात तर कधी तरंगात असते' , ' एकच वस्तु मधे मार्ग नसताना दुसरीकडे जाते. ' हे डिडक्शनच्या विरोधात आहे असे हे मत आहे.

सहमत आहे.

फिनमन यांच्या पाथ इंटेग्रल फॉरम्युलेशनमध्ये क्वांटम मेकॅनिक्सची वेगळ्या प्रकारे सिद्धता करता येते. यामुळे नेहेमीच्या सिद्धतेमधील ऍड हॉक अझम्प्शन्स करावी लागत नाहीत. तरीही वरील वाक्य तिथेही लागू पडावे.

नाही

मान्य नाही.

वरील उदाहरणे म्हणजे संदिग्ध व्याख्यांचा शब्दखेळ आहे.

'एकच गोष्ट कधी कणात तर कधी तरंगात असते' याच्यात विचित्र काय आहे? अशा प्रकारची वाक्ये शतके-हजारो वर्षे वापरात आहेत :
'हेच तूप कधी घट्ट असते, तर कधी पातळ असते."

' एकच वस्तु मधे मार्ग नसताना दुसरीकडे जाते. '
हे वाक्य बहुधा निरर्थक आहे. "मध्ये" आणि "मार्ग" शब्दांचा या संदर्भात अर्थ काय आहे?

बहुदा

बहुदा त्यांना बोगदा (टनल) परिणामाचा संदर्भ असेल. पण या मताचा प्रतिवाद करता येतो असे सहस्रबुद्धे यांनी दिले आहेच.

एकाच निरीक्षणात कण आणि तरंग हे दोन्ही गुण दिसू शकतात असे वाचले होते.

होय, बोगदाच समजले

पण बोगद्याच्या संदर्भात "मार्ग" आणि "मध्ये" शब्दांना अर्थच नाही.

खुद्द "बोगदा" ही उपमाच खेळकर आणि निरर्थक आहे.

कण आणि लहरी एकाच निरीक्षणात दिसले ते कसे हे कळले नाही.

उदाहरणार्थ - डबल-स्लिट प्रयोगात :
१. दोन खाचांमधून झोत जाऊन "लहरींचा" इंटरफेरन्स दिसतो (पण "कण"स्वभाव दिसत नाही.)
२. खाचेमध्ये डिटेक्टर ठेवला तर "कणांचा" इंटरफियरन्स दिसत नाही (पण "लहरी"स्वभाव दिसत नाही.)

मात्र एकाच वेळी कण आणि लहरीचा निरीक्षण करायचे तर काय दिसेल?

अर्थ

प्रमोद यांच्या वाक्यांचा अर्थ मी असा काढला.

'एकच गोष्ट कधी कणात तर कधी तरंगात असते'
क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपल्या रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळे परिणाम बघायला मिळतात. फोटॉन आणि क्रिकेटचा चेंडू यांच्या वागण्यात फरक असतो. फोटॉन कधी कण असतो तर कधी प्रकाशलहरी. क्रिकेटचा चेंडू मात्र आपल्याला नेहेमी चेंडू म्हणूनच दिसतो. (तत्वतः त्याच्याही लहरी असतात पण त्या मोजता येणार नाहीत.)

एकच वस्तु मधे मार्ग नसताना दुसरीकडे जाते.

बहुधा प्रमोद क्वांटम टेलेपोर्टेशनबद्दल बोलत असावेत. (ही संकल्पना वर्म होललाही लागू पडावी.)
वाक्य संदिग्ध आहे हे मान्य.

--

होय पण डिडक्शनचा संबंध काय?

आपल्या रोजव्यवहारात न दिसणारी कित्येक प्रमेये डिडक्शनने प्रमाणित करता येतात.

उदाहरणार्थ : काही आजारांमध्ये रोजव्यवहारात न-दिसणारे जंतू सूक्ष्मदर्शिकेखाली शरीरद्रवात दिसतात दिसतात. जगातील प्रचंड बहुसंख्य लोकांनी आजपर्यंत रोजव्यवहारात "स्ट्रेप्टोकॉकस" जंतू सूक्ष्मदर्शिकेखाली बघितलेला नाही. तर हे डिडक्शन घेऊया :

सामान्यनियम : जेव्हा जेव्हा र्‍हुमॅटिक ताप चालू असतो त्याच्या आदल्या दोन आठवड्यांतल्या घशाच्या द्रवाला सूक्ष्मदर्शिकेखाली घातल्यास स्ट्रेप्टोकॉकस हा जंतू आढळतो. (जेव्हा जेव्हा मानव असतो, तेव्हा तेव्हा मर्त्य असतो.)
विवक्षित उदाहरण : श्री. जॉन डो यांना र्‍हुमॅटिक ताप चालू आहे. (सॉक्रेटीस मानव आहे.)
अनुमान : श्री जॉन डो यांच्या गेल्या दोन आठवड्यांतल्या घशाच्या द्रवाला सूक्ष्मदर्शिकेखाली घातल्यास स्ट्रेप्टोकॉकस हा जंतू आढळतो. (सॉक्रेटीस मर्त्य आहे.)

हे तर रोजव्यवहारात नसलेले डिडक्शन आहे. लुई पास्तरने काही शतकांपूर्वी जंतूंबाबत सिद्धांत सांगितला. तेव्हा त्याचा सिद्धांत आणि त्याची निरीक्षणे रोजव्यवहारापेक्षा खूपच वेगळी होती. मग या बाबतीत क्वांटम मेकॅनिक्सचे काय विशेष आहे?

क्वांटम मेकॅनिक्सने विज्ञानाचा तार्किक पाया बदललेला नाही याचे चांगले वर्णन रिचर्ड फाइनमन यांनी केलेले आहे (मराठी भाषांतराचा दुवा).

तुलना

पाश्चर यांचा सिद्धांत आणि क्वांटम मेकॅनिक्स यांची तुलना तत्वतः बरोबर आहे पण प्रत्यक्षात थोडी अवघड. अर्थात याला माणसाचे परसेप्शन कारणीभूत आहे असे वाटते.

जंतूंवर विश्वास नसणार्‍या एखाद्या माणसाला जंतूंची चित्रे/चित्रफिती दाखवता येतात. इलेक्ट्रॉन एकाच वेळी एकाहून अधिक ठिकाणी असू शकतो हे उमजायला* वेळ लागतो. मला क्वांटम मेकॅनिक्स उमजायला इतर शास्त्रांपेक्षा कठीण गेले होते. काही लोकांना अर्थातच हे पटकन जमते. बहुधा यासाठी ऍबस्ट्रॅक्ट विचार करण्याची क्षमता चांगली हवी. हाच प्रकार तीनहून अधिक मितींची कल्पना करणे (स्ट्रिंग थिअरीमध्ये ११ मिती मानल्या आहेत) किंवा वर्म होलची संकल्पना उमजून* घेणे यासाठीही लागू व्हावा.

इथे उमजून घेणे असा शब्द वापरला आहे. समजून घ्यायला तुलनेने कमी वेळ लागतो.

प्रकाटाआ

दोनदा प्रतिसाद.

खुले मन आणि नाडी ग्रंथ

काही जण सजीवांना देखील डिटर्मिनिज्ममधे गोवतात. (त्यात चूक आहे असे मला वाटत नाही.) त्यांच्यासाठी सामाजिक-मानसिक कृती देखील कारण शब्दाशिवाय सांगता येतील.

आपली माहिती सिमीत असताना आपण र्‍यांडमनेस असतो असे मानतो. तेंव्हा कारण शब्द अर्थपूर्ण रित्या वापरू शकतो.

कारण शब्द वापरायची दुसरी वेळ म्हणजे आधी -नंतर संबंध. आधी आग लागली मग धूर झाला. हे वाक्य ' धुराचे कारण आग आहे.' मधे कारण शब्दाने परिवर्तित होऊ शकते. यात ऑकमचा वस्तरा कसा लागेल मला समजत नाही. अशा वेळी कारण शब्द आधी काय घडले हे सांगत असतो.
कित्येकदा आधी घडणारी क्रिया ही नंतर घडलेल्या क्रियेसाठी एक आवश्यक क्रिया असते. उदा. धूर येणे हे आगीशिवाय होत नाही असे मानले तर धुराचे कारण आग आहे हे जास्त सयुक्तिक वाटते.

मी सायन्सचा विद्यार्थी नाही. वरील धाग्यातून जे थोडे फार समजले त्यातून मनाला वाटले त्याबद्दल लिहितो. आग व धुराचे नाते आधी व नंतरचा संबंध दर्शवते. जसे धुराचे अस्तित्व आगी शिवाय उत्पन्न होऊ शकत नाही हे जितके खरे आहे.
तसे व्यक्ती जन्माला आल्याशिवाय त्याचे भविष्य निर्माण होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे आहे.
आता जर नाडीग्रंथांत व्यक्तीच्या जन्माच्या आधी त्याचे भविष्य लिहिलेले असेल तर कार्य कारण भावाचा अर्थ कसा लावायचा.
सजीवांना डिटर्मिनिझनचे तत्व लागू होते का नाही यावरही नाडी ग्रंथांतून प्रकाश टाकला जाऊ शकतो.
डॉ. अरसे कुलरत्ने यांनी या संदर्भात एक प्रबंध सादर केला आहे. त्यात क्वांटम सिद्धांताची तुलना त्यांनी नाडी ग्रंथांच्या व्यक्तीच्या पुर्वआयुष्याच्या कथनाला क्वांटम सिद्धांतातील कणाचे (मॅटर)रुप मानता येईल तर आणि व्यक्तीच्या जीवनातील नंतरच्या भविष्य कथनांना लहरीचे (वेव्ह) रुप मानता येईल असे सुचवले आहे.
त्यांनी डॉ.एस.संबंधम यांच्या सह त्या आधी सादर केलेल्या २ प्रबंधांतुन नाडी ग्रंथांवर भरपूर केसेसचा संदर्भ देऊन व नाडी पट्टयातील लिखाणाचे लिपि, भाषा यासह अनेक कोनांतून विश्लेषण करुन प्रबंध सादर केलेले आहेत.
प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी नुकत्याच लिहिलेल्या "The Scientific Basis of Naadi Granthas" या इंग्रजी लेखातून ते ही असेच प्रतिपादन करताना दिसतात. त्याचा विचारही करता येईल.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

मुद्दा काय आहे?

नाडी ग्रंथांतून प्रकाश टाकला जाऊ शकतो.

टाका ना! केसेसचे संदर्भ नको. आमची आव्हाने स्वीकारा.
आपण एक मत 'विकत' आहात. तेव्हा कृपया ते आमच्या गळी उतरवता येईल असे पुरावे सादर करा.

BTW, "आम्ही खुले मन बाळगतो त्यास आपण आक्षेप घेता का?" असे मी आपणास विचारले होते...

 
^ वर