महाराष्ट्रातील वीज पुरवठ्याचे कोडे

सध्या उपक्रमवर या विषयावर बरीच गरमागरम चर्चा चालू आहे असे दिसते. राज्यकर्त्यांच्या नावाने आरडा ओरडा करून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही कारण प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. हा प्रश्न पुढच्या 3 ते 4 वर्षात कसा सोडवता येऊ शकेल याबद्दलचे माझे काही विचार खाली मांडत आहे.

महाराष्ट्रात वीज पुरवठा करण्यासाठी सध्या एकूण 5 (चू.भू.द्या घ्या) मोठ्या कंपन्या आहेत. यापैकी टाटा व रिलायन्स यांना कोठे व कोणत्या ग्राहकांना व किती वीज पुरवायची याबद्दल बरीच बंधने आहेत. थोड्याफार प्रमाणात या कंपन्या एकमेकाना मदत करतात पण सर्व महाराष्ट्राचा विचार करावयाचा म्हटला तर या दोन कंपन्याचा विचार करण्यात सुद्धा काही अर्थ नाही. उरलेल्या 3 कंपन्या या पूर्वीच्या एम.एस.ई.बी. ची नवी स्वरूपे आहेत. यापैकी एक कंपनी वीज निर्मितीचे काम करते. दुसरी कंपनी वीज ग्राहकांच्या गावापर्यंत पोचवण्याचे काम करते तर तिसरी म्हणजे आपला रोज संबंध येणारी कंपनी, जी आपल्या घरापर्यंत वीज पुरवते.

यापैकी पहिल्या कंपनीची वीज निर्मितीची क्षमता अतिशय मर्यादित आहे. नवीन प्रकल्प हातात घेण्यासाठी त्यांच्याकडॆ पैसे नाहीत. आहेत ते प्रकल्प जुन्या यंत्र सामुग्रीमुळे नीट चालत नाहीत व उन्हाळ्यात पाण्याची बोंबाबोंब होऊ लागली की जलविद्युत निर्मिती केंद्रे व काही औष्णिक केंद्रे बंद पडतात. भांडवल बाजारातून ही कंपनी पैसे उभे करू शकत नाही कारण यांचे शेअर महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे आहेत. थोडक्यात म्हणजे सर्व महाराष्ट्राला पुरेल एवढी वीज ही कंपनी निर्माण करूच शकत नाही. ग्राहकांच्या गावापर्यंत वीज पुरवणारी कंपनी, वरील पहिली कंपनी, मध्यवर्ती सरकारच्या मालकीच्या वीजनिर्मिती कंपन्या व इतर खाजगी उत्पादक याकडून वीज विकत घेऊन पुढे पोचवू शकते. परंतु मध्यवर्ती सरकारच्या मालकीच्या कंपन्या व खाजगी उत्पादक हे व्यापारी तत्वावर वीज निर्मिती करत असल्याने त्यांचे दर या दुसर्‍या कंपनीला परवडत नाहीत. त्यामुळे अशी महाग वीज फार कमी प्रमाणात विकत घेतली जाते. आता राहिली तिसरी कंपनी. या कंपनीचे वीज वाहक जाळे अत्यंत जुनाट व अकार्यक्षम आहे. सरकारी कंपन्यांचे जेवढे म्हणून तोटे असतात ते त्यांना आहेत. त्यांची देखभालीची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम व मोडीत काढण्याच्याच लायकीची आहे. या सर्व गोष्टींमुळे वीज गळती, चोरी या सारख्या अपप्रवृत्तींचे चांगलेच फावले आहे.

या अशा परिस्थितीत जर काही मूलभूत आणि नवीन दिशा सुधारणा केल्या तरच परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. मी सुचवीत असलेल्या प्रस्तावित वीज यंत्रणेचे स्वरूप काहीसे असे असावे असे मला वाटते.
1. भौगोलिक स्थाने लक्षात घेऊन एका तालुक्याला एक वीज ग्राहक म्हणून मान्यता देणे. या तालुक्यात या साठी एक वीज ग्राहक कंपनी स्थापन करणे. या कंपनीची मालकी संपूर्णपणे त्या तालुक्यातील लोकांच्याकडे राहील. त्या तालुक्यातील वीज पुरवठा यंत्रणेची देखभाल ही कंपनी यासाठी तज्ञ ठेकेदार नेमून करेल. या कंपनीकडे स्वत:चा नोकरवर्ग अतिशय अल्प म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढाच राहील. वीज पुरवठ्याच्या संपूर्ण यंत्रणेची मालकी या ग्राहक कंपनीकडेच राहील. त्यात सुधारणा करणे, तिचा विकास करणे ही सर्व जबाबदारी या कंपनीचीच राहील. या कामांसाठी ही कंपनी व्यापारी तत्वावर पैसे उभे करू शकेल. मोठ्या शहरांच्यासाठी, एका म्युन्सिपल वॉर्डची अशी एक वीज ग्राहक कंपनी राहील.
2. प्रत्येक वीज ग्राहक कंपनी दर 3 वर्षांसाठी, वीज पुरवठा करणार्‍या कोणत्यातरी कंपनीशी, या बाबत करार करेल. उदाहरणार्थ हवेली तालुका, टाटांशी असा करार करू शकेल. या करारात 3 वर्षांसाठी किती वीज पुरवायची? दर काय? न पुरवल्यास पेनल्टी किती? जास्त विजेची मागणी आल्यास त्याचा दर काय? हे सर्व मुद्दे असतील. कराराची मुदत संपल्यावर त्या तालुक्याची ग्राहक कंपनी दुसर्‍या वीज पुरवठा कंपनीने जास्त चांगले दर किंवा अटी मान्य केल्यास त्यांच्याशी करार करू शकेल.
3. या पद्धतीत ग्राहक कंपनी जर चांगल्या रितीने कार्य करीत नसेल किंवा पैसे वेळेवर देत नसेल तर त्यांच्याशी करार करणारी कंपनी त्यांना अधिक दर लावू शकेल.
4. वीज पुरवठा कंपन्या स्वत: वीज निर्माण करू शकतील किंवा राष्ट्रीय उर्जा बाजारातून वीज विकत घेऊ शकतील किंवा मध्यवर्ती सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्याकडून वीज विकत घेऊ शकतील.

या पद्धतीत मुख्य फायदे काय आहेत असे विचारले तर एकतर ही पद्धत पूर्णपणे स्पर्धात्मक तत्वावर आधारित असल्याने तिची कार्यक्षमता उत्तम राहील. ग्राहक कंपन्यांना आपले वीज पुरवठा जाळे कार्यक्षम ठेवावेच लागेल नाहीतर त्यांना ज्या दराने वीज मिळते तो दर वाढू शकेल. किती वीज पुरवायची आहे हे वीज पुरवठादार कंपनीला माहिती असल्याने त्या 3 वर्षाचे असे करार उत्पादकांशी करू शकतील व त्या योगे त्यांना कमी दरात वीज मिळू शकेल.

अर्थात ग्राहकांना वीज पुरवण्याची ही पद्धत अंमलात आणण्यासाठी एम.एस.ई.बी.च्या सध्याच्या तीन वारस कंपन्यां, खाजगी मालकीच्या कराव्या लागतील किंवा त्या वाईंड अप तरी कराव्या लागतील. यासाठी मोठ्या राजकीय आत्मशक्तीची गरज आहे. या आत्मशक्तीचा संपूर्ण अभाव आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमधे दिसत असल्याने खरोखर असे काही घडू शकेल यावर विश्वास बसणे कठिण आहे. परंतु माणसाने आशा करत रहावे एवढे मात्र खरे!

लेखनविषय: दुवे:

Comments

आमदनी आठन्नी

'वीजेचा जमाखर्च' तुटीत असल्याने या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
थोडा जुना अहवाल पाहिल्यास सरकारी पातळीवर ही तूट भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण हा जगन्नाथाचा रथ हाकणे म्हणजे सोपे प्रकरण नाही ही कल्पना येते.
आपण दिलेले उपाय त्या प्रयत्नात काही वाटा उचलू शकतील असे वाटते.
पण भारतात सर्व राज्यात वीजतुटवड्याचा प्रश्न आहेच. तो सहजासहजी संपेलसे वाटत नाही.

आपण मुळा-प्रवरा या खाजगी वीज वितरण कंपनीचा अनुभव लक्षात घेता हा

भौगोलिक स्थाने लक्षात घेऊन एका तालुक्याला एक वीज ग्राहक म्हणून मान्यता देणे.आपण मुळा-प्रवरा या खाजगी वीज वितरण कंपनीचा अनुभव लक्षात घेता हा प्रत्येक तालुक्याचा प्रयोग परवडणारा नाही . तसेच वीज निर्मिती, वितरण करता प्रचंड भांडवल लागते.त्या प्रमाणात लहान तालुक्यातून नफा झाला नाही तर भांडवलदार तेथे जाणार नाहीत. वीज निर्मितीला मान्यता दिल्या नंतर प्रत्यक्ष वीज निर्माण होण्यास १० वर्ष लागतात.
प्रत्येक तालुक्याला एकच कंपनी असल्या मुळे स्पर्धात्मक नव्हे तर मक्तेदारीचे वातावरण निर्माण होईल
आज तातडीचा वीज पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करावयाच्या आणि मुंबईला 24 तास वीज पुरवठा आणि बाकी महाराष्ट्रात 10-16 तास वीज बंद .मुंबई करता जेंव्हा वीज कमी पडते तेंव्हा या टाटा आणि रिलायंस कंपन्या MSEB कडून वीज घेतात त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राला जास्त वीज कपातीस तोंड द्यावे लागते . मुंबईचा वीज कपात केली तर बाकी महाराष्ट्रात वीज कपातीच्या वेळेत कमतरता होईल अखंड महाराष्ट्रात सर्व विभागांना समान न्याय द्या एव्हढीच मागणी आहे.
thanthanpal.blogspot.com

मुंबईची वीज

मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे हा जास्तीत जास्त करून एक तात्पुरता उपाय होईल. हे महाराष्ट्राच्या वीज समस्येचे उत्तर नव्हे. स्पर्धात्मक व्यवसाय करणार्‍या वीज कंपन्या हेच फक्त या कोड्याचे उत्तर आहे.
आदर्श म्हणून अनेक वीज पुरवठा करणार्‍या कंपन्या असाव्यात हे मान्य. परंतु हे करणे अशक्य आहे. त्यामुळे वीज ग्राहक कंपनी एक व पुरवठादार अनेक अशी स्थिती प्रत्यक्षात आणणे शक्य व्हावे असे मला वाटते.
चन्द्रशेखर

तोडून?

>>मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे
या वाक्यात संकल्पनात्मक घोळ आहे. महाराष्ट्राची वीज तोडून मुंबईला दिली जात आहे ती थांबवली तर महाराष्ट्राच्या वीज परिस्थितीत किती फरक पडेल याचा हिशेब करायला हवा.

(वीज नियामक आयोग नावाची एक एन्टिटी अस्तित्वात आल्यावर एम् एस् इ बी चे विभाजन करण्याची सक्ती आयोगाने केली. निर्मिती पारेषण आणि वितरण यासाठी एक कंपनी असता कामा नये असे सांगण्यात आले. टाटा आणि रिलायन्सला मात्र अशी सक्ती केली गेली नाही).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

एक प्रश्न

आमचे एक स्नेही भिवंडी तालुक्यामधल्या एका गावात राहातात. तीनेक वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे एमेसीबी ची सेवा (!) होती. त्यावेळी रोज आठेक तास वीज जायची. तीन वर्षांपासून त्यांच्याकडे टोरंट् नावाच्या कंपनीची सेवा आहे आणि त्यांच्यामते एकंदर नाट्यपूर्ण फरक पडला आहे. अजूनही व्यत्यय येतो ; परंतु त्याची वारंवारता बरीच कमी झाली आहे.

चंद्रशेखर यानी प्रस्तावात उल्लेख केलेल्या नव्या कंपन्यांपैकी ही आहे काय ? असा बदल का घडू शकला असावा ? अन्यत्र हे होणे शक्य आहे काय ?

वीजेबद्दल बोलवतच नाही.

'वीज भारनियमनाचा' आनंद घेत असल्यामुळे वरील उपाय किती फायद्याचे ठरतील ते माहिती नाही. एकीकडे ज्यांची वीजबिलाच्या बाबतीत शंभर टक्के वसूली आहे तिथे सिंगलफेज देऊन पूर्णवेळ वीज देण्याचे धोरण वाचले होते. आता प्रीपेड योजनेबद्दल बातम्या वाचतोय. उदा. एक हजार रुपये देऊन त्या मोबदल्यात काही वीज मिळेल. ते व्हावचर संपले की रीचार्ज मारायचे वीज हजर. असे काही तरी व्हावे.
ज्यामुळे वीज चोरीला आळा बसेल आणि वीज सर्वांना मिळेल. कारखान्यांना वीज भारनियमनातून का वगळल्या जाते आणि त्यांना सबसिडी का दिली जाते त्याचे धोरण तर मला अज्याबात कळत नाही.

मुंबई शहराला वीज पुरवतात त्या रिलायन्स,बेष्ट, आणि टाटा या कंपन्या महाराष्ट्रात वीज पुरवू शकतात का ? आणि त्यांना जर तसे करता येत असेल तर त्यांनी तसे करायला हरकत नाही. मात्र तिथेही शासकीय धोरण आडवे येत असेल असे वाटते ?

-दिलीप बिरुटे
[वीज आणि पाण्यासाठी आसूसलेला]

प्रीपेड वीज मीटर

जकार्ता मधे असे प्रीपेड वीज मीटर मी पाहिले आहे. पेन ड्राइव्ह असते तेवढेसे उपकरण होते. त्यावर तुम्हाला अमुक रुपयाची वीज भरून मिळायची. मीटर घरीच आत असायचे. तुम्ही ते उपकरण काढले की साधारण अर्धा तास वीज अबाधित राहायची. तोपर्यंत जवळपासच्या दुकानात जाऊन ते रिफील करून मिळायचे. त्यावर आपली किती रुपयाची वीज राहीली आहे हे कळायचे.

मला वीजेची बचत करण्यासाठी हा चांगला उपाय वाटला. मोबाईल मधे प्रीपेड वापरणारे पोस्टपेड पेक्षा जपून वापरताना दिसतात त्यासारखे. शिवाय वीज कापायची व परत जोडणी करून घ्यायची अशी भानगड त्यात रहात नाही ते वेगळे.

मला दुसरेही वाटते की वीजेचा दर चांगला वाढला पाहिजे. म्हणजे रिलायन्स, टाटा, ज्या दरात वीज देतात त्याच दरात वीज दिली (गळती थांबवून) तर वीज महामंडळाकडे नवीन प्रकल्पात घालायला पैसा राहील. दरामुळे नुकसान हे भोंगळपणाचे लक्षण नाही. वीज मंडळात तो आहे हे नक्की.

यासोबत एक अजून तांत्रिक मुद्दा शिल्लक राहतो. तो म्हणजे या कंपन्यांचा खरेदीदार हा एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज खरेदी करतो. साहजिक त्यांचे भांडवल (तारा, ट्रान्सफॉर्मर) हे कमी लागते. त्याउलट विखुरलेल्या खेड्यांमधे वीज पुरवणे हे भांडवल आणि वितरणातील घाटा यामुळे अधिक खर्चिक असते. त्यामुळे बहुदा अशा कंपन्या खेडोपाडी वीज पुरवण्यास तयार नसतील असे वाटते. किंवा खाजगीकरणात ते खेड्यात शहरांपेक्षा अधिक दर लावतील.

विजेची मागणी सतत बदलत असते. संध्याकाळचा काळ हा सर्वोच्च मागणीचा असतो. जसजशी मागणी वाढत जाते तसतशी चढ्या दराने वीज खरेदी करावी लागते. किंवा ठेवणीतले धरणातले जनित्र वापरावे लागते. या उलट रात्री वीजेची मागणी एवढी कमी असते की वीज निर्मीती बरेचदा खूप जास्त खर्चिक होते. त्यामुळे मागणीनुसार दर करण्याची योजना ऐकिवात होती.

प्रमोद

मि. बीन...

मि. बीन मालिकेच्या एका भागात बीन टीव्ही बघत असताना अचानक वीज जाते तेव्हा तो मीटरसारख्या एका यंत्रात नाणे टाकतो व वीज परत सुरु होते असे काहीतरी पाहिल्याचे आठवते. ब्रिटनमध्ये अशी सोय होती काय? अजूनही आहे का?

==================

काही प्रश्न

उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एकंदरीत मूळ प्रश्नाची व्याप्ति समजलेली नसल्यामुळे काही शंका. या शंका ठणठणपाळ यांच्या लेखावर विचारणं कदाचित अधिक रास्त झालं असतं. पण जाणकाराचा लेख दिसला म्हणून इथे विचारतो. जर आकडेवारी मिळाली तर प्रश्न स्पष्ट व्हायला मदत होईल असं वाटतं.

१. मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात. अंदाजे २५ ते ३०% उद्योगधंदे मुंबईत असावेत. महाराष्ट्राला मिळणाऱ्या टॅक्सपैकी सुमारे ३०% मुंबईतून येत असावा असाही माझा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्राच्या संपूर्ण वाट्यापैकी नक्की किती वीज मिळते? किती मिळणं न्याय्य आहे? (जाणकारांनी माझे आकडे सुधरावेत)

२. महाराष्ट्रात राहाणाऱ्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी सुमारे ७५ ते ८०% मुंबईत असावीत असा एक ढोबळ अंदाज आहे. शिवाय मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व त्याहीपलिकडे देशाची आर्थिक राजधानी आहे. असं असताना जर मुंबईला अधिक वीज मिळत असेल तर त्यात गैर काय? (पुन्हा किती अधिक मिळते यावर या प्रश्नाची वैधता अवलंबून आहे)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मुंबई

महाराष्ट्राची एकूण वीज मागणी सुमारे १७००० मे वॅ. त्यापैकी मुंबईची ३००० मे वॅ (१७%). ही साधारण ठीक आहे. हे आकडे पीक लोडचे आहेत. या पीक लोडला मुंबईला पुरवठा करणार्‍या कंपन्यांकडे ७०० ते ८०० मे वॅ चा तुटवडा आहे (सुमारे २५ टक्के). महाराष्ट्रातला एकूण तुटवडा ४०००-५००० मे वॅ म्हणजे साधारण तेवढाच. तरीही मुंबईला मात्र २४ तास वीज आणि खेड्यात १२ ते १५ तास लोडशेडिंग आहे. हे मात्र नक्कीच चुकीचे आहे.

महाराष्ट्राला मिळणाऱ्या टॅक्सपैकी सुमारे ३०% मुंबईतून येत असावा हे तद्दन दिशाभूल करणारे वाक्य आहे. त्या वाक्यामागची कल्पनाच वायफळ आहे.

भिवंडीच्या टोरेंट कंपनीच्या साईटवरील माहिती वरून ती महावितरणची फ्रॅन्चायजी म्हणून काम करते आणि तिला "लागणार्‍या" विजेचा पुरवठा करणे ही महावितरण ची "जवाबदारी" आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अनेक पदरी प्रश्न

अधिक टॅक्स भरणाऱ्याला जास्त चांगली वागणुक असावी असं म्हणत नाही. काय प्रत्यक्षात असतं याची साधारण कल्पना मांडण्याचा प्रयत्न करत होतो. मूळ वादाला शहरी संस्कृती वि. ग्रामीण असा काहीसा स्वर होता. ते नव्या किंवा अधिक योग्य फ्रेममध्ये ठेवून गरीब वि. श्रीमंत अशी मांडणी आहे (काहीशी) असं दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी पंधरा टक्के श्रीमंतांना जगातल्या साठ टक्के गोष्टी मिळतातच. मग या बाबतीत काय वेगळं चाललंय? असं काहीसं... त्यात ते जस्टीफाय करण्याचा हेतू नव्हताच. आकडेवारी डोळ्यासमोर असली की असमानता नक्की किती आहे हे जाणून घ्यायला मदत होते. तुम्ही दिलेल्या आकडेवारीवरून अन्याय फारसा नाही असं दिसतंय.

दुसरा, अधिक तांत्रिक मुद्दा असा आहे की वीज कपात किती काळ यावरून केवळ योग्य की अयोग्य हे ठरवता येत नाही. रीटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर वेगवेगळ्या फंड्समध्ये कसं डिस्ट्रिब्यूशन असावं याची थिअरी आहे. मुंबईला (किंवा शहरांना) दिली जाणारी वीज व ग्रामीण भागाला दिली जाणारी वीज यात तसं डिस्ट्रिब्यूशन असू शकेल.

तिसरा मुद्दा केवळ प्रतिमेचा. मुंबई हा परदेशीय पाहुण्यांना दिसणारा चेहेरा आहे. तो गोरामोरा ठेवण्याने महाराष्ट्रात नवीन भांडवल येण्यासाठी मदत होऊ शकेल असं आर्ग्युमेंट करता येईल. गरीब संस्थानांच्या काळातही राजवाडा उजळलेला असायचाच, व तो अंधारला जावा अशी जनतेचीसुद्धा इच्छा नसायची.

असो, हा मुद्दा इतकी वीज व ती इतक्या प्रमाणात वाटायची एवढा सोपा नाही हे त्या लेखावरून कळलंच. वाटप यंत्रणा महागाची असते, व एका शहराला क्ष वीज देणं, व तीच शंभर गावांत विभागणं, या दोन समान गोष्टी नाहीत असं वाटतं.... या सर्व क्लिष्टता डोळ्यासमोर आणण्यासाठी आकडेवारीचा प्रतिसाद होता.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चूक

माझा मुख्य मुद्दा टॅक्स कुठे जमा होतो हे अगदीच बिन महत्त्वाचे आहे कारण तो टॅक्स देशभर केलेल्या व्यवसायातून आलेला असतो. कोकाकोलाने समजा ऍटलांटामध्ये काही बिलिअन डॉलर टॅक्स भरला तर ऍटलांटाच्या रहिवाशांचा त्या रकमेवर किती अधिकार? तो टॅक्स कोकाकोलाने जगभर केलेल्या व्यवहारातून झालेल्या नफ्यावर भरलेला टेक्स आहे. ऍटलांटाच्या रहिवाशांनी भरलेला टॅक्स नाही.

दुसरे म्हणजे मागे कुठल्यातरी चर्चेत आलेला मुद्दा येथे लागू होईल. भाकरी खूप मोठी असताना अंबानीने ती बरीचशी खाल्ली तर ठीक आहे. भाकरी लहान असताना नाही. ५ -६ तासाचे लोड शेडिंग सहन करण्यायोग्य असू शकते. १५ तासाचे नाही. मुंबईत ५-६ तास लोडशेडिंग केले तर उर्वरित महाराष्ट्रात ते ७-८ तासांवर आणता येईल. १५ तास लोडशेडिंग असले की जवळजवळ सर्व व्यवहार ठप्प होतात. अगदी पीठ दळायला गिरणी रात्री १० ला चालू होणार आणि सकाळी ७ पूर्वी बंद होणार याची कल्पना करून पहावी. आणि ही परिस्थिती १२ महिने.

उर्वरित महाराष्ट्रातही ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई या सहरांत लोडशेडिंग नाही, दुसर्‍या दर्जाच्या शहरांत जरासे लोडशेडिंग हे चोचलेही नकोत.

परदेशी पाहुण्यांना दाखवायच्या चेहर्‍याचा मुद्दा खरा नाही हे मी गुरगाव, नौएडा वगैरेच्या उदाहरणाने दाखवले आहे. ८ तास लोड शेडिंग असलेल्या गुरगावात आमच्या आय बी एम ची तीन कार्यालये आहेत. स्वतःचे जनरेटर वापरून काम भागवतात. मग मुंबईत चालवायला कुणाला काय प्रॉब्लेम आहे?

मुंबईत वीज पुरवणार्‍या कंपन्यांकडे जेवढा तुटवडा आहे तेवढ्या प्रमाणात त्यांनीही लोड शेडिंग करावे. त्यातही हवे तर फोर्ट, नरिमन पॉईंट, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, सीप्झ वगैरे भागात २४ तास वीज, उर्वरित भागात लोड शेडिंग असे करावे. (निदान रिलायन्स/टाटा आहेत म्हणून लोडशेडिंग नाही सरकारी एमेशीबीत लोडशेडिंग असते हा समज तरी घालवावा).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मुंबईत ५-६ तासाचे लोडशेडिंग करून बघायला हवे

दुसरे म्हणजे मागे कुठल्यातरी चर्चेत आलेला मुद्दा येथे लागू होईल. भाकरी खूप मोठी असताना अंबानीने ती बरीचशी खाल्ली तर ठीक आहे. भाकरी लहान असताना नाही. ५ -६ तासाचे लोड शेडिंग सहन करण्यायोग्य असू शकते. १५ तासाचे नाही. मुंबईत ५-६ तास लोडशेडिंग केले तर उर्वरित महाराष्ट्रात ते ७-८ तासांवर आणता येईल.

मुंबई आणि काही शहरे हावरटासारखी वीजप्राशन करीत आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १ आठवडाभर ह्या शहरात ५-६ तासाचे लोडशेडिंग करून बघायला हरकत नाही. पण मुंबई जास्त वोसिफोरस (मराठीत काय म्हणायचे?) आहे.

१५ तास लोडशेडिंग असले की जवळजवळ सर्व व्यवहार ठप्प होतात. अगदी पीठ दळायला गिरणी रात्री १० ला चालू होणार आणि सकाळी ७ पूर्वी बंद होणार याची कल्पना करून पहावी. आणि ही परिस्थिती १२ महिने.

खरेच. हे विदारक आहे. लोडशेडिंगमुळे समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर किती परिणाम होतो ह्यावर कुणी नीट अभ्यास केला आहे काय? करायला हवा असे वाटते. असो. तुमचे सगळेच प्रतिसाद आवडले. ऍटलांटावाला मुद्दा मुंबईवाल्यांना गप्प करायला मस्तच आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विजेचा तुटवडा

विजेचा तुटवडा ही एम.एस.ई.बी ने निर्माण केलेली संकल्पना आहे. भारतात विजेचा आता एक बाजार आहे. या बाजारात मागणी व पुरवठा यांच्या प्रमाणात विजेच्या किंमती बदलत राहतात. आयत्या वेळी वीज खरेदीदारांना (स्पॉट) जास्त दर पडतो. अधिक कालासाठी करार केल्यास दर कमी असतो.एम.एस.ई.बी ला एका विशिष्ट दरानेच वीज विकत घेणे शक्य असते. त्यामुळे वीज बाजारात वीज उपलब्ध असली तरी एम.एसई.बी ती खरेदी करू शकत नाही. यामुळे विजेचा तुटवडा त्यांना येतो. देशात निर्मिती क्षमता असून सुद्धा. टाटा व रिलायन्स वेळप्रसंगी ही महाग वीज खरेदी करतात. थोडक्यात सांगायचे तर सर्व प्रश्नांचे मूळ एम.एस.ई.बी ची मक्तेदारी हेच आहे. स्पर्धात्मक व्यवसाय हेच याचे उत्तर आहे.

चन्द्रशेखर

केवळ हेच उत्तर?

स्पर्धात्मक व्यवसाय हेच याचे उत्तर आहे.
केवळ हेच उत्तर? आम्हाला हवी तेवढी वीजनिर्मिती करण्याची क्षमता खरेच आमच्याकडे आहे? म्हणजे पैसे फेकले तर वीजनिर्मितीची सर्व केंद्रे मिळून देशातला विजेचा तुटवडा सहजासहजी भरून काढू शकतात का?

बाकी चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण. ह्या विषयावर जाणकार लिहिते झाले ह्याचे श्रेय काही अंशी ठणठणपाळांनाही द्यायला हवे. विजेच्या बचतीवरही चर्चा करायला हवी. (थांबा एक बल्ब बंद करून येतो.)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुंबईच्या वीजेचा दर

आकडे थोडे चुकीचे वाटतात.

मुंबईची म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या भागाची लोकसंख्या कदाचित १० टक्याच्या आसपास असेल. ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाइंदर, वसई, अंबरनाथ-बदलापूर अशा मोठ्या लोकसंख्येचा भाग जोडला तर मुंबई महानगराची लोकसंख्या २० टक्याच्या घरात जाईल. (अंदाज)

आता नितीन म्हणतात त्या मुंबईला वीज पुरवणार्‍या कंपन्या (रिलायन्स, टाटा आणि बेस्ट) फक्त मुंबई महानगरपालिकेतील साधारणपणे ८०-८५ टक्के भागात वीज पुरवतात. उरलेल्या भागात (भांडूप मुलुंड) मधे आणि बाकी सर्व (ठाणे वगैरे) ठिकाणी महावितरण वीज पुरवते. एवढेच काय मूळ मुंबईत बेस्टलाही काही प्रमाणात महावितरण वीज पुरवते. हा सगळा हिशोब लागल्या शिवाय टक्केवारीचे गणित उलगडणार नाही.

मुंबई काय दराने वीज घेते, एकत्रित एका ठिकाणी वीज घेतल्याने आणि एकंदर चांगल्या वितरणामुळे मुंबईचा ट्रान्स्मिशन लॉस प्रकार कमी असावा. याशिवाय सबसिडी म्हणून अनेकांना महावितरण कमी दरात वीज देते. समजा या सर्वाचा परिणाम दुप्पट धरला (कदाचित तो दीडपट असेल) तर मुंबई १७ टक्के वीजेसाठी ३० टक्के पैसे देत असेल. ही तोडली तर महावितरण कंपनीस अधिक नुकसान होईल. (मी आकडे नीट गणित करून लिहीत नाही कारण आकडे निश्चित नाहीत.)

दिल्लीत रिलायन्स, भिवंडीत टोरेंट, मुंबईत बेस्ट ह्या केवळ वितरण करणार्‍या कंपन्या होत्या. भिवंडीत वीज बीलवसूली साठी महावितरणला एके काळी पोलिसांची गरज भासे. महाराष्ट्रात वसूली व वीज चोरी यामुळे गांजलेले भरपूर पॉकेटस असावेत.

प्रमोद

परीस्थिती सुधारते आहे.

चंद्रशेखर यांनी सुचवलेले उपाय अभिनव आहेत पण ह्या उपाययोजना व्यवस्थेला मुळापासून बदलणाऱ्या आहेत. आणि ते थोडे शक्यतेच्या पातळीवरून दूर जाते. सध्या वीजमंडळाचे त्रिभाजन झाल्यापासून परिस्थितीत काही योग्य बदल घडतांना दिसत आहेत. उदाहणार्थ वीज चोरीचा गुन्हा अजामिनपात्र झाला आहे. राजकीय हस्तक्षेप बऱ्यापैकी कमी झाला आहे. आणि दिलिप वळसे पाटलांपासून सुरु झालेले वीज निर्मितीचे प्रयत्न आता अजित पवारांच्या कारकिर्दीत वेग घेत आहेत. म्हणजे अपेक्षित निधीची तरतुद वगैरे या प्रक्रिया जलद गतीने होत आहेत. शेवटी पाण्याची कमतरता हा प्रश्न कायमचा आहेच पण मागणी वाढत असतांना त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीत वाढ करु शकले नाही हे ही सत्यच. गोडबोले समितीने महाराष्ट्राला आगामी काळात नव्या निर्मिती प्रकल्पाची आवश्यकता नाही असा अहवाल दिला होता. ( चालू वीज गळती (म्हणजे वीज चोरीच) थांबली की महाराष्ट्राला पूरेशी वीज उपलब्ध आहेच असे या समितीते म्हणणे होते. आणि ते खरे ही होते.) पण वीज चोरी थांबवण्यात आलेले अपयश आणि वाढत्या मागणीचा चुकलेला अंदाज या पायी महाराष्ट्र वीजेच्या बाबतीत दीनवाण्या परिस्थितीत येऊन पोहोचला आहे. पण पूर्वी सर्रास गावेच्या गावे आकडे टाकून वीज वापरायची ते चित्र आता दिसत नाही. मध्यमवर्गातही वेगवेगळ्या युक्त्या वापरून होणारी वीजेची चोरी नव्या डिजिटल मिटर मुळे कमी झाली आहे. विनाकारण वीज उपकरणे चालू ठेवण्याचे प्रमाणही (बील जास्त येईल म्हणून) कमी झाले आहे. एकंदरीत आगामी काही वर्षात वीजेची परिस्थिती समाधानकारक असेल अशी आशा करायला हरकत नाही.

तिसरी कंपनी. या कंपनीचे वीज वाहक जाळे अत्यंत जुनाट व अकार्यक्षम आहे. सरकारी कंपन्यांचे जेवढे म्हणून तोटे असतात ते त्यांना आहेत. त्यांची देखभालीची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम व मोडीत काढण्याच्याच लायकीची आहे. या सर्व गोष्टींमुळे वीज गळती, चोरी या सारख्या अपप्रवृत्तींचे चांगलेच फावले आहे.

लेखकाचे वरील मत मात्र एकांगी वाटते. वीज काही तांत्रिक कारणामूळे जाते व नंतर ती पंधऱा मिनीटे ते तासभरात पूर्ववत होते हे म्हणजे मोडीत काढण्याच्या लायकीच्या यंत्रणेचे काम नक्कीच नसावे. महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळात व आजच्या त्याच्या नव्या स्वरुपातही त्रुट्या असतील यात वाद नाही पण तरीही या व्यवस्थेचे मानंदड आणि कामातील आजवरची प्रगती ही देखील नजरेआड करता कामा नये.

अवांतर आणि संशयास्पद
केंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाने दगडी कोळशाच्या खाणी असणारे काही ब्लॉक्स खाजगी कंपन्यांना कोळसा काढण्यासाठी दिलेले आहेत. या कंपन्या पूरेशा कार्यक्षमतेने कोळसा काढत नाही म्हणून मंत्रालयाने नुकत्याच काही कंपन्यांना नोटीसा दिल्या. पाच कंपन्यांचे परवानेही रद्द केले. काही दिवसांपूर्वी राज्यांच्या उर्जामंत्र्यांची बैठक केंद्राच्या वतीने घेण्यात आली त्यात अजित पवारांनी या कंपन्या पूरेसा कोळसा पूरवत नसल्याबद्दल तक्रार केली. जो पूरवठा होतो तो ही निकृष्ट दर्जाचा कोळसा असल्याने तो वीज निर्मिती क्षमतेवर तसेच उपकरणांच्या आयुष्यावरही विपरीत परिणाम करणारा ठरतो.

यातल्या काही कंपन्या स्वतः वीज निर्मिती करणाऱ्या आहेत. महानिर्मिती कडून जेव्हा वीज कमी प्रमाणात निर्मीती होते तेव्हा महावितरणला ती खाजगी कंपन्यांकडून विकत घ्यावी लागते. (अर्थातच वाढीव दराने) महावितरणला अशी वीज विकणाऱ्या काही कंपन्याच कोळशाचा उपसा व पूरवठ्याची कामे कंत्राटी पद्धतीने करतात. परिणामी त्यांच्या या वागणूकीत काही संशयास्पद आहे काय अशी विचारणाही अजितपवारांनी या बैठकीत केली आहे. केंद्रातही राष्ट्रवादी सत्तेत भागीदार असल्याने हा प्रश्न गोपीनाथ मुंड्यांच्या मार्फत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्याची व्यवस्था करण्यामागेही कदाचित आपल्या राज्याचे उर्जामंत्री असावेत.

अवांतर

माहीतीपूर्ण चर्चा. जेंव्हा काहीतरी अनेक काळांचा प्रश्न सुटत नसतो, तेंव्हा तो business as usual म्हणत सुटणार नसतो हे नक्की... त्यामुळे यावर आऊट ऑफ बॉक्स विचार करणे गरजेचे आहे. प्रिपेड वीजेची कल्पना मस्त वाटली...जरी ते पूर्ण उत्तर होऊ शकणार नसले तरी.

आपल्याकडे होणार्‍या वीज चोर्‍या थांबवणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा मला वाटतो तो असा की, जो पर्यंत आपण नियमांचे पालन करणे प्राथमिक ठरवत नाही तो पर्यंत कशाचाच फायदा नाही. कारण बर्‍याचदा नियमांबरोबर त्यातून पळवाटा देखील काढल्या जातात आणि त्या नियम आमलात येण्याआधीच आमलात येतात...

असो. वरील चर्चेत एक शब्दप्रयोग थोडा पटला नाही म्हणून सुचवावेसे वाटत आहे:

"मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे", "महाराष्ट्राची वीज तोडून मुंबईला दिली जात आहे", "मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात" वगैरे वाक्यातून नकळत मुंबई आणि महाराष्ट्र आपण करतो असे वाटते. उ.दा. हेच जर मुंबई ऐवजी पुणे/नागपूर, औरंगाबाद असते तर, आपण तसे कदाचीत म्हणले नसते, उर्वरीत महाराष्ट्र म्हणले असते असे वाटते...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे,

"मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे", "महाराष्ट्राची वीज तोडून मुंबईला दिली जात आहे", "मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात" वगैरे वाक्यातून नकळत मुंबई आणि महाराष्ट्र आपण करतो असे वाटते. उ.दा. हेच जर मुंबई ऐवजी पुणे/नागपूर, औरंगाबाद असते तर, आपण तसे कदाचीत म्हणले नसते, उर्वरीत महाराष्ट्र म्हणले असते असे वाटते...

तुमचा मुद्दा घेतला. मुंबई महाराष्ट्रात असली तरी फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे, असे म्हणणाऱ्याचे म्हणायचे असेल. मुंबईकर मंडळी मुंबईबद्दल (म्हणजे ह्यात ठाणेबिणेही आलेच) नको तिथे, नको तेवढे सेंटी आहेत/होतात, असे कधी कधी वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पैसे

राजकारण्यांनी पैसे खाल्ले नाही तर वीज नक्की भेटेल्.

पण इथे कोन् पैसे खात नाही?
शरद पवरचे नाव पन एन्रोन मध्ये घेतले होते.
पन् काय् झले?
सेनेने पन् तेच् केले

कितीही पैसे खा
कोनाचे कही वाक्डे होत नाही आनि वीज पन् येत् नाही.

गावात काय करायचे आमी? वीज येत नाही पंप नाहे पानी नाही काहीच नाही.

आपला
अण्णा

 
^ वर