आज्ञापत्र
नुकतेच रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेले आज्ञापत्र मराठीपुस्तके वर टाकण्यात आले आहे. http://www.marathipustake.org/
रामचंद्रपंत अमात्यांनी हे पुस्तक आपल्या वयाच्या सरतेशेवटी लिहिले. शिवराज्याभिषेकानंतर शिवाजी, संभाजी,राजाराम, शिवाजी २ आणि संभाजी २ (हे अनुक्रमे ताराबाई आणि राजसबाई यांचे मुलगे. बहुतकरुन त्यांच्या आयांनीच सत्ता गाजवली.) अशा ऐतिहासिक गुंतागुंतीच्या कालखंड त्यांनी पाहिला. ते छत्रपतीशाहुंच्या राज्यात अधिकारी नव्हते. या पुस्तकात राज्यकारभार कसा करावा याचे विवेचन आहे. यासोबत काही इतिहासही आहे. त्यांनी लिहिलेल्या इतिहासात काही तृटी आढळतात. त्या बढायांसारख्या वाटतात. ते लिहितात.
स्वामी सुमुहूर्ते नर्मदापार जाहले. श्रीकृपें अचिरकालेंच मुख्य शत्रूचा पराभव करून दिली, आगरें, लाहोर, ढाके, बंगाले, ढंकामकर आदिकवरून संपूर्ण तत्संबंधीं देशदुर्ग हस्तवश्य करून श्रीवाराणसीस जाऊन स्वामी विश्वेश्वर स्थापना करीत; तावत्काळपर्यत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्रीमत्सकलतीर्थौकतीर्थ श्रीमन्मातुश्री राहिली आहेत. त्यांसनिध श्रीयासह चिरंजीव जीविताधिक प्रियतम राजश्री राजकुमार यांस ठेविले आहेत. त्या उभयतांच्या सेवेसी तुम्हांस ठेविलें आहे.
वर्णाप्रमाणे लोकांचा उल्लेख करणे त्यावेळी प्रचलित होते. शामल (जंजिर्याचा सिद्दी), ताम्र (मोगल) असे उल्लेख यात आहेत.
राजाचा व काव्य/विनोदाचा संबंध काय असावा याबाबत ते लिहितात.
कवीश्वरांमुळे कीर्ति प्रसरते. त्यांणीं केले श्लोक, सुभाषित, कवित्वें यांमुळें शांति राहते. याकरितां, कवीश्वर, गुणी, शास्त्रज्ञ, प्रामाणिक, निर्व्यसनी यैसे पाहून त्यांचा आपल्या सामर्थ्यानुरूप संग्रह करून त्यांचें यथायोग्य बहुमान पुरःसर चालऊन ते संतोषरूप राहून स्वउद्योगीं तत्पर रहात तें करावें. परंतु, केवळ स्वस्तुति प्रिय होणें हाहि दोषच आहे. याकरितां कारभार अंतरून त्याचे भरीं मरूं नयें. तैसेच भाटहि मजलसींत, स्वारीमध्यें पूर्वील जाले राजे यांणीं संरक्षिले आहेत. याकरितां थोडे बहुत गुणी पाहून त्यांचाहि संग्रह करावा. परंतु, हे लोक कारभाराचे समयीं आणू नयेत. काये म्हणोनि कीं, कारभाराविरहित रिकामे लोक कारभारांत आलिया कितेक कार्ये प्रगट बोलावयाचीं, कितेक गौप्य करावयाचीं आहेत. त्यास कारभारी लोकांस इतर लोकांचा संकोच प्राप्त होऊन अंतर पडतें. याजकरितां कारभारांत इतर लोकांचा प्रवेश होऊं न द्यावा.
राजे लोकांस विनोदाचें व्यसन येकंदर नसावें. सुहृद जाले तरी सेवक लोक; मर्यादा राहत नाहीं. ते आपली अमर्यादा आपण करून घेतली यैसें होतें. यखादे समयीं क्रोध आलियानें त्यांचा घात होऊं नये. याकरितां विनोद प्रवृत्ति नसावी. आणि आपले शहाणपणाचीच रीझ चित्तांत आणू नये. चित्तांत आले कार्यभागाचे गुणदोष स्वतां शोधून पाहावें. कार्यभागीं बुध्दिवंत असतील त्यांस पुसावें. आणि ज्याची जे अधिक बुध्दि असेल ते घेऊन जेणेंकडून योजिलें कार्य सिध्दिस जाय तें करावें. आपलेच युक्तीचा आग्रह करून असलिया सेवकांच्यानें कार्याचे गुणदोष परिच्छिन्नवादें बोलवत नाहींत. त्यामुळें त्यामुळें चाकरलोकांची बुध्दिविशेषता प्रत्ययास न येतां त्यांचा गुणलोप होतो, आणि कार्यहि नासतें.
Comments
मराठीपुस्तके.ऑर्ग
मराठीपुस्तके.ऑर्गवर टिचकी मारण्याची इच्छा असूनही धाडस होत नाही. गेल्या दोन्हीवेळेस तेथून माझ्या संगणकावर व्हायरस आला होता. इतर कोणाचाही असा अनुभव आहे काय?
हे नेमके कोणाबद्दल लिहिले आहे? या परिच्छेदाला बढाया म्हणावे की कल्पनाविष्कार ते नेमके ठरवता आले नाही.
असो. शेवटचा परिच्छेद रोचक वाटला.
धन्यु...!
>>माझ्या संगणकावर व्हायरस आला होता. इतर कोणाचाही असा अनुभव आहे काय?
नाही. अशा कोणत्याही व्हायरस चा अनुभव नाही.
'मराठी पुस्तके' संकेतस्थळावरुन 'स्त्री पुरुष तुलना' हे ताराबाई शिंदेचे पुस्तक मी डाऊनलोड केले आहे.
'आज्ञापत्र' पुस्तक मराठी पुस्तके संकेतस्थळावर टाकल्याबद्दल धन्यु....!
-दिलीप बिरुटे
हे बघा
काही काळापूर्वी या साईटवर गेले असता अनेकांना असा संदेश आला होता. यानंतर (सुमारे महिनाभरापूर्वी) मी या साईटवर गेले असता पुन्हा असाच संदेश आला. तुम्हाला असा अनुभव नसेल तर "अभिनंदन!" :-) आपला संगणक बाधित असण्याची शक्यता आहे.
ती तेव्हाची गोष्ट !
आज्ञापत्राच्या निमित्तानं गेलो ही ताजी भेट. :) तेव्हा आपण बिंधास्त 'आज्ञापत्र' डाऊनलोड करुन, ते वाचून राजाचा आणि काव्य विनोदाचा संबंध आणि इतर गोष्टीबद्दल इथे लिहावे. किंवा सध्या स्त्रीयांच्या बदलत्या जाणीवांबद्दल खूप चर्चा होत आहे. तेव्हा 'स्त्री पुरुष तुलना' वाचून ताराबाईंनी पुरुषांना कसं ठोकलंय त्यावर वेळ मिळाल्यास लिहा. आणि लेखनाचे शिर्षक ठेवा ''स्त्री आजची प्रतिमा'' भाग पाच. :)
-दिलीप बिरुटे
शिवाजी २
स्वामी सुमुहूर्ते नर्मदापार जाहले.
हा संदर्भ बहुदा शिवाजी २ साठी असावा.
असे शक्य आहे की ही स्थिती शाहु परत येण्यापूर्वीची आहे. त्यावेळी मराठ्यांनी बुंदेलखंडापर्यंत स्वारी केली होती व मोगलांना हरवले होते असे वाचले. याचेच काहीसे हे वर्णन असू शकेल. मूळ पुस्तकासोबत प्रसिद्ध इतिहासकार श्रीध्ररराव (?) कुलकर्णी यांचे भाष्य होते. ते स्वामित्व हक्काखाली असल्याने आम्ही गाळले. मात्र अशी परवानगी मिळवून (तोंडी संमती घेतली आहे.) ते यासोबत द्यावे असा विचार आहे. कधी जमेल ते सांगता येत नाही.
गेल्या महिन्यात मराठी पुस्तके चा सर्वर बदलला. माझी तांत्रिक माहिती व्हायरस बाबत अपूरी आहे. काही जण म्हणतात की गुगल कडे याबबत काहितरी करावे लागते. पण ते नेमके काय हे मला कळले नाही. माझा संगणक जो यावर नियंत्रण ठेवतो तो व्हायरसमुक्त असावा असे वाटते.
बर्याच जणांनी तक्रार केली होती. हल्ली तशी तक्रार आली नाही. माझ्या माहितीतल्यांना व्हायरसचा काही त्रास होत नाही.
प्रमोद
धन्यवाद
खुलाशासाठी (दोन्ही प्रश्नांच्या) धन्यवाद.
मी घरून लॉग इन करून बघते आणि कळवते. तशी तक्रार नसेल तर उत्तम झाले.
अडचण आली नाही
व्हायरसची अडचण आता आली नाही. पुस्तके पीडिएफ स्वरूपात उघडता आली. धन्यवाद.
बूकात काय ?
प्रमोद काका. बूकात काय हाय त्यायची आजूक वळख करुन द्या.
राज्यकारभाराबद्दल मार्गदर्शन करनारे बूक म्हून
व्याखानमालेत एका वक्त्याने वळख करुन दिल्ती. तेवढेच ध्यानात हाय.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
थोडी अवतरणे
पुस्तक खूप लहान आहे. पण महत्वाचे आहे. राज्य व्यवस्था कशी करावी याबद्दल त्यात आहे. सर्व विषय त्यात नाहीत हे दिसते. राज्य व्यवहार, वतने, किल्ले, आरमार याबाबत त्यावर लिहिले आहे. यात नैतिकतेचा आव नाही. तर म्यान्युएल सारखे आहे. चाणक्यनीति/पंचतंत्रा सारख्या ग्रंथातील प्रच्छन्न राजनीति इथे दिसत नाही.
वाचायला फारसे कठीण नाही. तरी त्याकाळच्या शब्दांचे अर्थ सांगणार्या तळटीपांची गरज वाटते. त्या देण्याचा विचार आहे कोणी सहाय्य केले तर.
खालील अवतरणे मूळ पुस्तक वाचायला उद्युक्त करतील असे वाटते.
वेतनवाढ
परंतु ज्या हुद्यावर जे वेतनाची मोईन असेल त्याच हुद्दयावर कार्यविशेष केल्याने अधिक वेतन न करावें. काय म्हणोन कीं, येकाचें वेतन अधिक केलियाने त्या प्रतीचे वरकड सेवक आहेत ते आपले अधिक वेतनाचे मुदे घालितात, दिलगीर होतात. कदाचित येकाचे भिडेनें त्यास अधिक केलियाने सारेच चाकर त्या प्रतीचे येकासारखे येक आहेत, तेव्हां तितकियांसहि अधिक वेतन करावे लागेल. मग साराच बंद ढासळोन जातो. हे गोष्ट बरी नव्हे. याकरितां कोण्ही येका कार्यास जो मोइनेचा बंद केला असेल त्यास न्युनाधिक सर्वथैव करू नये.
वारसाहक्क
किल्याचा हवाला अथवा सरनोबती करीत असतां तो मृत्यु पावला तरी तो मामला त्याचे पुत्रास अथवा भावाबंदास न सांगावा. त्याचे पुत्र अथवा भाऊबंद असतील त्यांचे समाधान करून त्यांचे स्वरूपानुसार आणखी उद्योग सांगून चालवावें. लस्कराचे सरदाराचे भावाबंदांस अथवा त्याचे निसबतीचे लोकांस परिच्छिन्न किल्याचा मामला सांगूं नये.
गडव्यवस्था
तैसेंच गडावरी आधीं उदक पाहून किला बांधावा. पाणी नाहीं आणि ते स्थळ तर आवश्यक बांधणें प्राप्त जालें तरी आधीं खडक फोडून तळीं-टाकीं पर्जन्यकाळपर्यत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसीं मजबूद बांधावीं. गडावरीं झराहि आहे, जैसें-तैसें पाणीहि पुरते, म्हणोन तितक्यावर निश्चिंती न मानितां उद्योग करावा. किंनिमित्त कीं, जुझामध्यें भांडियाचे आवाजाखालें झरें स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरितां तैसे जागां जकेरियाचे पाणी म्हणोन, दोन-चार तळीं-टाक़ीं बांधोन ठेऊन त्यांतील पाणी खर्च होऊं न द्यावें. गडाचें पाणी बहुत जतन राखावें.
झाडे
गडावरील झाडें जीं असतील ती राखावी. यांविरहित आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ, आदिकरून थोरवृक्ष व लिंबे व नारिंगें आदिकरून लहान वृक्ष, तैसेच पुष्पवृक्ष व वल्ली, किंबहुना प्रयोजक, अप्रयोजक, जें झाड होत असेल तें गडावरीं लावावे, जतन करावें. समयीं तितकेंहि लाकडे तरी प्रयोजनास पडतील.
स्वराज्यांतील आंबे, फणस आदिकरून हेहि लाकडे आरमाराचे प्रयोजनाचीं. परंतु, त्यास हात लाऊं न द्यावा. काय म्हणोन कीं, हीं झाडें वर्षा दो वर्षानी होतात यैसें नाहीं. रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखीं बहुत काळ जतन करून वाढविलीं तीं झाडें तोडलियावरीं त्यांचे दुःखास पारावार काये? येकास दुःख देऊन जें कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारासहित स्वल्पकालेंच बुडोन नाहींसें होतें. किंबहुना धण्याचेच पदरीं प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानीहि होते. याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित यखादें झाड जें बहुत जीर्ण होऊन कामांतून गेलें असेल, तरी त्याचे धण्यास राजी करून त्याचे संतोषें तोडून न्यावें. बलात्कार सर्वथा न करावा.
प्रमोद
छान आहे
धन्यवाद.
"स्वराज्यांतील आंबे, फणस आदिकरून हेहि लाकडे आरमाराचे प्रयोजनाचीं. परंतु, त्यास हात लाऊं न द्यावा. ...बलात्कार सर्वथा न करावा."
फार वर्षांपासून वसलेल्या गावांमध्ये असे वागणे महत्त्वाचेच होते.
पण नव्याने वसत असलेल्या अमेरिकेत याच सुमारास लाकडे तोडून वखारी घालणे सुरू झाले होते हे पाहिले तर या परिस्थितीची गंमत वाटते. किंबहुना पहिल्याप्रथम अमेरिकेत आलेल्या लोकांना लाकडे कापणे/तोडणे/विक्री याच व्यवसायाने हमखास उत्पन्न मिळवून दिले होते. इंग्रजांच्या लाकडांच्या वखारी तर प्रसिद्धच आहेत.