वृद्धावस्थेतील मेंदू

मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (5)
वृद्धावस्थेतील मेंदू

वृद्धावस्था हा आयुष्याचा उतरंडीचा कालखंड असला तरी मेंदूच्या दृष्टीने 'सर्व काही संपले' असे नाही. निवृत्तीच्या काळात यापूर्वीच्या क्षमतेपेक्षा तुलनेने आपण कमी क्षमतेने वावरत असतो, हे सत्य आपण स्वीकारायला हवे. वयाच्या 65व्या वर्षानंतर आपल्याला नावे आठवत नाहीत, चेहरे आठवत नाहीत, काही क्षणापूर्वी बाजूला ठेवलेली वस्तू सापडत नाही, गरम चहाचा कप फ्रीजमध्ये, आयस्क्रीम मायक्रोमध्ये, वेगवेगळ्या रंगाचे पायमोजे पायात, असे काहीना काही तरी लहान सहान परंतु (इतरांना!) त्रासदायक, बालिश गोष्टी सतत घडत असतात. त्यामुळे स्मृतीच्या (बुद्धीच्या!) तल्लखपणाबद्दल प्रश्नचिन्ह उभा राहतो. परंतु या गोष्टी अत्यंत नैसर्गिक आहेत. कारण या अवस्थेत मेंदूमधील अत्यंत महत्वाचा असा समजलेल्या हिप्पोकँपसमधील (hippocampus) - जेथे आपल्या आठवणी साठवल्या जातात - पेशी नाहिशा होऊ लागतात. त्यामुळे विसरभोळेपणा हा वृद्धत्वाचा स्थायीभाव होऊन जातो. परंतु यातही घाबरण्यासारखे काही नाही. ही उणीव भरून काढण्याइतकी लवचिकता मेंदूत असते. परंतु एका टप्प्याला ही लवचिकता संपुष्टात येते. त्यांनंतर मात्र स्मृतीभ्रंशाला दुसरा पर्याय उरत नाही. एक मात्र खरे की अशा प्रकारची म्हातारपणाची लक्षणं वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वयात दिसू लागतात. ते वय कदाचित 55 असेल किंवा 75 - 85 ही असू शकेल. म्हणूनच अगदी आनंदी, उत्साही म्हातारे आणि नैराश्यग्रस्त, कटकटीचे व अगदी क्षुल्लक अशी गोष्टसुद्धा काही क्षणापुरतेसुद्धा आठवणीत न ठेवू शकणारे म्हातारे यांची सीमारेषा ठरवणे शक्य होईल का? नैराश्यग्रस्त वृद्धामध्ये उत्साह, आनंद आणता येईल का? अशा प्रश्नांना उत्तरं शोधावी लागतील.
रोजच्या शारीरिक व्यायामातूनच यासंबंधात आपल्याला मदत मिळू शकेल. आठवड्यातून किमान तीन वेळा - कमीत कमी एक - दीड तास - फिरायला जाणाऱ्या वृद्धांच्या मेदूच्या पेशीत वाढ झाल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. रोजच्या व्यायामामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते. व्यायाम न करणाऱ्यात ग्लुकोजच्या नियंत्रणात अनियमितता असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते. त्याचा परिणाम आपोआपच मेंदूच्या हिप्पोकँपसवर होतो. हिप्पोकँपसमध्येच आठवणी साठत असल्यामुळे आठवणीवर नियंत्रण राहत नाही. शारीरिक व्यायाम ही कसर भरून काढू शकते. त्यातून आपली स्मरणशक्ती वाढण्याची शक्यता आहे.
रोजच्या शारीरिक व्यायामाबरोबरच बौद्धिक खेळामधूनही स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते. 70-80 वयाच्या व्यक्तींना काही बौद्धिक व्यायामाचे धडे दिल्यास त्यांच्यातील जाणीवा तीव्र होऊ लागतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता आपल्याला नातवाच्या हातातील टीव्ही गेम्स मागून घ्यावे लागेल. अशा बौद्धिक खेळामुळे आपल्यात नक्कीच बदल जाणवू लागेल. बुद्धीबळ, ब्रिज, यासारख्या बैठ्या खेळामुळेसुद्धा वृद्धांचा विसराळूपणा कमी होत जाईल. शब्दकोडी वा गणितातील कोडी (सुडोकू) सोडविणे हासुद्धा उत्तम उपाय ठरेल. अशा बौद्धिक कसरतीमुळे मेंदू पुन्हा तल्लख होईल. चेहऱ्यांची नावे आठवू लागतील. नावांची चेहरे डोळ्यासमोर येवू लागतील. भरगच्च भरलेल्या हॉटेलमधील आपल्या सहकाऱ्याचे - नातलगांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येवू लागतील.
त्याचप्रमाणे म्हाताऱ्या व्यक्तीतील एक अविभाज्य गुणविशेष असे समजल्या जाणाऱ्या त्यांच्यातील कटकटीवृत्तीलासुद्धा नियंत्रणात आणणे शक्य आहे. आपल्यातील सकारात्मक भावनेसाठी डोपामाइन रिसेप्टर्स (dopamine receptors) जवाबदार असतात. वृद्धत्वामुळे डोपामाइन रिसेप्टर्सची कमतरता भासू लागते. त्यामुळेच वृद्धांचा कटकटी करणे, तकरार करत राहणे, चिडचिड करणे, नकारात्मक विचार करणे, निराश असणे याकडे कल वाढत जातो. परंतु दही, बादाम, चॉकलेट, व काही निवडक फळे नियमितपणे घेत असल्यास ही उणीव भरून काढता येते. वृद्ध दिवसभर तरतरीत, उत्साही राहू शकतात.
खरे पाहता वृद्धत्वाचा काळ समाधानाचा ठेवण्यासाठी मेंदू नेहमीच कार्यरत असतो. याची तयारी वयाच्या विशी - तिशीच्या तारुण्यात चालूच असते. जगातील चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीत वाढ होऊ लागते. वयाची पासष्टी हा आनंदी अनुभवांच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू असा समजला जातो. साठीनंतर आयुष्यातील दुखद प्रसंग विसरण्याकडे कल वाढू लागतो. तारुण्यात वा प्रौढ वयात दुखद प्रसंगांची आठवण झाली तरी माणूस भावनाविवश होत अस्वस्थ होऊ लागतो. परंतु वृद्धावस्थेत ही भावना तेवढ्या तीव्रतेने सलत नाही. अशा कटू अनुभवाकडे निर्लिप्तपणे बघण्याची सवय होवू लागते. अलिप्त राहणे पसंद करू लागतो.
भावनांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या अमिग्डालांच्या एम आर आय (fMRI) चाचणीत अमिग्डालाचे मेंदूच्या पृष्ठभागावर होणारे परिणाम वृद्धाप्यात वेगवेगळ्या प्रकारे होत आहेत हे लक्षात आले. तरुणांपेक्षा हे परिणाम वृद्धामध्ये सर्वस्वी वेगळे होते. भावनेला नियंत्रणात ठेवणाऱ्या अग्रबाह्यकावर (cortex) त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले. प्रत्येक पेचप्रसंगातील अनुभवावरून प्राप्त झालेला शहाणपणा व सुज्ञपणा भावनांना नियंत्रणात आणू शकतो, हे स्पष्ट झाले. म्हणूनच वृद्धाप्यातील बहुतेक जण जगाकडे नव्या आशेने, नव्या उत्साहाने, जास्त सकारात्मकतेने पाहू शकतात.

मुळात वृद्धाप्य काळ कुणालाही नको असतो. परंतु वृद्धत्व म्हणजे सर्व काही संपले असेही नाही. याविषयी कुठल्याही प्रकारे काळजी करण्याचे कारण नाही. ज्यांना चिंता नाहीत, कुठलेही ताण तणाव नाहीत, त्यानां स्मृतीभंश होण्याची शक्यता फार कमी असते. आरामात जीवन जगणारे एकाकी वृद्धसुद्धा चिंताग्रस्त असलेल्या वृद्धांच्या तुलनेने जास्त तल्लख असू शकतात. आनंदी नसल्यामुळे मेंदूमधील कॉर्टिसॉलचे (cortisol) प्रमाण कमी होत जाते. व त्यामुळे बाह्यक आकसू लागतो. या आकसण्यामुळे अल्झेमेर रोगग्रस्त वा नैराश्यग्रस्त होण्याची शक्यता वाढते.
आपल्या शरीराच्या बाह्य त्वचेप्रमाणे आपल्या मेंदूवर (आणखी) सुरकुते पडत नसले तरी त्याच्या क्रिया-प्रक्रियांकडे जास्त लक्ष न दिल्यास वृद्धत्वाचा काळ जड वाटू लागतो. म्हणूनच वृद्धत्वाचा काळ सुख- समाधानाने घालावयाचे असल्यास नियमित शारीरिक व्यायाम, शब्दकोडी - संगणकखेळातून बौद्धिक कसरत, चारचौघाबरोबर गप्पा-टप्पा, हास्य विनोद, जिभेवर नियंत्रण, निर्लिप्तपणा, इत्यादी गोष्टीकडे जास्त लक्ष दिल्यास तरुण वयात वा प्रौढत्वात केलेले अक्षम्य हेळसांडांची भरपाई होण्याची दाट शक्यता आहे!

...समाप्त

 
^ वर