इतिहास कालीन पुणे.

पुण्यात साहित्य संमेलन नुकतेच होउन गेले. त्यानिमीत्ताने काही इतिहास कालिन पुस्तके विशेष करुन य ना केळकरांचे मिळाल्यास घ्यावे या हेतुने मी दुपारी गेलो होतो. त्या दिवशी अमिताभ बच्चन येणार होते त्यामुळे गर्दीचे आधी जाउन आलो. "मराठे शाहीतील वेचक वेधक" व अजुन दोन पुस्तके मी घेतली. सर्वसामान्यांना नसणारी बरिच माहिती त्यात आहे. आपल्या वाचकांना त्याचा आनंद मिळावा या हेतुने त्यातील एक प्रकरणातील माहिती खाली देत आहे. इतिहासप्रेमी वाचकांनी हे पुस्तक जरुर संग्रही बाळगावे.

आता पुणे खुपच बदललय. पण आताच्या इमारतींच्या जागी पुर्वी म्हणजे दोनशे वर्षापुर्वी किवा पेशव्यांच्या काळात काय होते हे ऐकुन त्याचे चित्र मनःचक्षूंसमोर आणण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.

शनिवारवाडा परिसर

शनिवार वाडा आणि आजूबाजूच्या परिसरात त्या काळापासुन् ऐतिहासिक द्रुष्ट्या महत्वाच्या आणि लक्षणीय अशा इमारती अजुनही आपली नामोनिशाणी टिकवून आहेत.

आपण आता शनिवारवाडा पुलावर वाड्याकडे तोंड करुन उभे आहोत . आता पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याहीच. त्यांचा वाडा शनिवारवाड्यासमोरच. आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता.

आता थोडे पुढे जाऊ या. रस्ता वळतो आणी तिथेच पेशवाईतले प्रसिध्द सावकार सरदार ओंकारांचा वाडा. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.

मेहुणपुरा
आता जेथे दै.सकाळ आहे त्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता. आणि जिथे सकाळ कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणार्या सरदार विसाजीपंत बिनिवाल्यांचा वाडा. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. आता दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिध्द सरदार हसबनीस यांचा वाडा होता. थोडे पुढे आले की गांधर्व संगीत महाविद्यालयाची इमारत आहे तिथेच मेहुणपुरा भाग आहे. हे नाव का पडले याबद्दलही बर्‍याच आख्यायिका आहेत. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात वगैरे पण खरं तर थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता असा उल्लेख सापडतो.

नु.म.वि.शाळा

आता जिथे प्रभात चित्रपट गृह दिसते तिथे पेशवाईतले प्रसिध्द् सावकार किबे राहात्. इंदुरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नुतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौकी मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा.

नू.म.वि. किबे वाड्यात दुसर्‍या मजल्यावर शाळेची घंटा असे. त्यावेळी शाळा एका ठीकाणी भरत नसे. म्हणुन सर्वांना ऐकु जाईल अशा रितीने घंटेची योजना केलेली होती.
प्रभातच्या थोडे अलीकडे घोड्याची पागा होती. तिथे आता एक बोळ आहे. या बोळाच्या आंत एक प्रचंड चौक होता आणि तिथंच एक अंधारी अशी 'तेल्याची तालीम' होती. आसपास तेल्यांची दुकानं असल्यामुळे बहुतेक हे नाव पडले असावे.

अप्पा बळवंत

प्रभातच्या उजव्या हाताला पेशव्यांचे मामा सरदार बळवंत मेहदळे यांचे निवासस्थान. बळवंत मेहेंदळे पानपतच्या लढाईत मृत्युमुखी पडले. पुढे त्यांचे चिरंजीव अप्पा बळवंत मेहेंदळे दरबारी सरदार झाले. त्यांचेच नाव आता त्या चौकाला दिले गेले. मधे मी असाच शनिवार पेठेत फिरत असतांना एका परराज्यीय तरुणानी मला "ए.बी चौक कहां है" असे विचारले तेव्हा अर्थबोध झाला नाही पण नंतर कळल्यावर खुप वाईट वाटले.

असो तिथेच जवळ पुण्यातले पहिले थिएटर 'आनंदत्सोव'. तिथे पुर्वी सर्कस, नाटकं, कुस्त्या, जादूचे प्रयोग होत असत नंतर त्याचे रुपांतर थिएटरमध्ये करण्यात आले. त्याकाळी ते एकमेव असल्यामुळे भलतेच लोकप्रिय झाले होते.

आता सतार मेकर मेहेंदळेंचे जे जुने दुकान आहे तिथे पुर्वी गवत्या मारुती चौक होता. पिंपळाचा पार असलेल्या या चौकात गवताचा व्यवसाय चालत असे. आता पारही नाही आणि काहीच नाही. टार रोड झालेत.

पण त्याच्या लगोलगच आनंदाश्रम ही अजुनही तशीच असलेली इमारत. महादेव चिमणाजी आपटे हे एक मोठे विद्वान आणि वकील गृहस्थ होते. वासुदेव बळवंतांच्या खटल्यात् या आपटेंनी वकिली केली. त्यांनी आनंदाश्रमात अनेक जुन्या, पुराण्या पोथ्या मूळ स्वरुपात संग्रहीत केल्या होत्या. या पोथ्या पुन्हा छापावयाच्या अशी त्यांची इच्छा होती. याचसाठी आश्रमात छापखानाही टाकला होता. महादेव चिमणाजींनी पुढे संन्यास घेतला. त्यांची समाधीही आनंदाश्रमात आहे. या आपटेंचे पुतणे म्हणजे मराठी साहित्यातील प्रख्यात कादंबरीकार हरी नारायण आपटे. ह.ना. आपटे तिथेच रहात असत. मराठी साहित्याला मिळालेली अमोल देणगी या आनंदाश्रमातुन मिळालेली आहे.

आनंदाश्रमाच्या शेजारीच आत्ताची नुतन मराठी विद्यालय प्रशाला. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे त्यावेळी इथे न्यू पूना कॉलेज होतं आणी त्याहि आधी खाजगीवाल्यांचा वाडा या जागेत होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमवीची इमारत उभी आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

माहिती. फोटो जरूर पाठवा.

 
^ वर