चल रे भोपळ्या, एक मौलिक संशोधन
सांप्रत जालावरील संस्थळांवर कठीण काळ ओढावलेला दिसतो; विशेषत: येथे. नाहीतर आम्हाला न उमजणारे (कोणीतरी त्यांना "डोक्यावरून जाणारे" असेही म्हटल्याचे स्मरते) लेख लिहण्याचा ठेका घेणारे अनेक लोक ( व त्यांचे लेखही ) उपलव्ध असतांना परत भाकड कथांवर आधारित प्रश्नावली विचारणारा लेख का बरे आला असता ? येथे कोणाही विद्वान/विदुषींच्या गाढ अभ्यासाबद्दल शंका घेतलेली नसून आमच्या यत्तेबद्दल माहिती दिली आहे.आमची धाव ती किती ? तेव्हा वेद-महाभारत यात काय लिहले आहे त्याचा विचार थोरांवर सोडून आम्हाला कळू शकणारी गोष्ट "चल रे भोपळ्या" या वरील आमच्या संशोधनाबद्दल थोडीशी माहिती देत आहे. थोडीशी म्हणण्याचे कारण आमचे मित्र तर्कसेन यनावालासर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपुरतीच आज मर्यादा आखून घेतली आहे. सर्व संशोधन दिले तर कोणीही त्याची कापी मारून एक पीएचडी पदरात पडून घेईल. असो
(१) ही गोष्ट कोणत्या काळात रचली गेली ? पूर्व मर्यादा : रामायणाच्या काळी वानर, पक्षी वगैरे मानुष वाणीत बोलत; तेव्हा ही पूर्वमर्यादा.
उत्तरमर्यादा : श्री. धक्का जर चवथ्या वर्षी या गोष्टीवर विचार करत असतील तर त्या पूर्वीच ही गोष्ट रचली गेली असली पाहिजे. १९८५ धरून चाला. ( श्री. धक्का दर वर्षी पास होत होते असे गृहित धरले आहे. चु.भु.दे.घे.)
(२) अख्खी म्हातारी मावू शकेल असे भोपळे महाराष्ट्रात कोठे व केव्हा निपजत ? लाल भोपळा टिकावू असतो व नेण्या आणण्यास अवघड नसतो. त्यामुळे भोपळा महाराष्ट्रातलाच पाहिजे असे नाही. या भोपळ्याला काशी भोपळा असेही म्हणतात,(१*) यावरून आमचा नित्कर्ष असा की तो वाराणशीहून आणला असावा. काही वर्षांपूर्वी ५ फ़ूट उंचीच्या दूधी भोपळ्याचे छायाचित्र आले होते. तेव्हा मोठे भोपळे सर्व काळात उपलब्ध असावेत.जास्त माहिती (३) मध्ये बघा.
(३) भोपळ्याचा व्यास किती सें.मि. ? म्हातारी चित्रात वाकलेली दाखवत. उंची ५ फ़ूट धरू. म्हातारी भोपळ्यात बसली तरी स्वत:च चालत होती व वाघाने तीला ओळखले यावरून भोपळा तीचा गुडघा ते डोके इतका पाहिजे. पोकळ भोपळ्याचा आंतरव्यास चार फ़ूट धरा. १ फ़ूट= ३०.४८ सें.मि.(२*) भोपळ्याचा व्यास = १२१.९२ सें.मि.+ यात सालीच्या जाडीचे २.०८ सें,मि. मिळवले की नैसर्गिक व्यास १२४ सें.मि.
(४) भोपळ्याचे वजन किती ? काय करावयाचे आहे ? खानावळ घालावयाची आहे काय ? गोष्टीत म्हातारीने पोखरलेला भोपळा घेतला आहे. फार तर वाटेत खायला सोललेल्या बीया घेतल्या असतील. असंबंधित प्रश्न तर्कतीर्थांनी येथे विचारू नयेत.वाट चुकवण्याकरिता त्यांच्या कोड्यांत ते ठीक आहे तरीही गणितच करावयाचे असेल तर सालीचे वजन काढा.( कसे ते सांगावयास पाहिजे का? सालीची घनता १.०४ )(३*)
(५) सुनेने सासूचा जांच करावयाची पद्धत कधी रूढ झाली ? कसली पद्धत रूढ झाली विचारता ? सगळ्या थापा. म्हातारी स्वतालाच "चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक" म्हणत असावी. लेकीकडे जावून लठ्ठ मुठ्ठ होईन हे सांगणे वाघोबाला फसवण्याकरिता ! परतीच्या प्रवासात वाघोबाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकणारी नक्कीच "काष्ठवत" नसणार, खाष्ट असणार. हां, या खाष्ट म्हातारीची मुलगी मात्र सासूला गुंडाळून ठेवणारी असावी. आईला इतकी तूप-रोटी खायला देणारी नक्कीच घरातली "कर्ती" असणार.
एक पाठभेद नोंदवून थांबू या. आमची देशावरील म्हातारी भविष्यकाळ दाखवावयाला लेकीकडे "जाईन", तूपरोटी "खाईन" असे म्हणते, इथे "जाते", "खाते" असे म्हणते. द.कोंकणात अशी पद्धत आहे का बघावयास पाहिजे.
संशोधन म्हतल्यावर संदर्भ दिलेच पाहिजेत.
१* परसातील भाजी. २* प्राथमिक अंकगणित. ३* स्वयंपाकघरातले उद्योग, भाग १. इतर दुर्मिळ पुस्तकांची यादी देत नाही, ती बागेतल्या भेळवाल्याकडे असतात.
प्रथम कबूली : येथे कोणाचाही उपमर्द करावयाचा उद्देश नाही. मनोरंजन म्हणूनच वाचावे.
प्रो. शरद (मी काही कॉलेजात शिकवत नाही, पण दुकानांच्या बर्याच पाट्यांवर मालकाच्या नावाआधी प्रो. लिहलेले असते, आपणच कां सोडा ?)
Comments
मौलिक संशोधन
प्रो शरद यांचे संशोधन खरोखरच मूलगामी आहे.
एक कथा आठवते. एक वाटसरु चालला होता. वाटेत आंब्याच्या झाडाखाली विसावला. तेथे एक भोपळ्याची वेल होती. तो विचार करु लागला छ्या काय या विध्यात्याला अक्कल नाही. एवढे मोठे झाड आन् त्याला इवडुश्या कैर्या. अन इथे एवढा मोठा भोपळा अन इवडुशी वेल. तेवढ्यात वार्याने एक झुळुक येते व कैरी पडते त्याच्या टाळक्यात. वाटसरुला लागते. तो विचार करतो अरे बापरे! इथे जर भोपळा असता तर आपला कपाळमोक्षच झाला असता.
गृहपाठ
१) म्हातारीच्या गोष्टीत भोपळा नसता घेतला तर अन्य कोणत्या फळाला वाव असता?
२) सिंह जंगलचा राजा असताना वाघ याच प्राण्याला स्थान का दिले गेले?
३) म्हातारी ऐवजी गोष्टीत म्हातारा का घेतला नाही?
प्रकाश घाटपांडे
मत ..
१) म्हातारीच्या गोष्टीत भोपळा नसता घेतला तर अन्य कोणत्या फळाला वाव असता?
लेकीचा मुख्य उद्द्येश्य हा म्हतारीला वाघापसुन वाचवणे होता आणि वाहन नसल्यामुळे तिला लपुन-छपुन जाण्यासाठी वजनाला हलके आणि शरीर मावेल एवढे काहीतरी हवे होते.
वरील गोष्टी पाहता टरबूज (हे थोडे वजनदार आहे..) , दूधी भोपळा हे योग्य राहतील. (पण परिस्थिती पाहता भोपळा इज बेस्ट)
२) सिंह जंगलचा राजा असताना वाघ याच प्राण्याला स्थान का दिले गेले?
महाराष्ट्राच्या व जवळपासच्या जंगलामधे सिंह कमी आढळतात (वाघांपेक्षा) म्हणून लेखकाला वाघ आणि लांडगा असे सुचले असावेत.
३) म्हातारी ऐवजी गोष्टीत म्हातारा का घेतला नाही?
१. आजोबां हे भेकड या वर्गात मोडत नाहीत. त्यांच्या इमेज ला धक्का बसला असता.
२. आजीवर जास्त प्रेम करतात लहान मुले (ठोस सबुत नाही पण लहान मुलांचे संगोपणाची जबाबदारी आई आणि आजीवर असते ). सो ,
आजी गोष्टीमधे छान वाटेल .
हा हा हा
ह्यांच्या दुकानात आजकाल चांगलं काही मिळत नाही असे वाटत असतानाच, प्रोपरायटरसाहेबांनी क ड क माल आणला.
सही!
हाहाहा!
सकाळी सकाळी उठून काही थोर विचारवंतांच्या शंकांना नाहक उत्तरे द्यावी लागल्याने वैतागलेल्या मेंदूला आराम मिळाला. ;-) आता माझी उत्तरे -
(१) ही गोष्ट कोणत्या काळात रचली गेली ?
गोष्ट केवळ रचलेली आहे यासाठी काही पुरावा आहे का? कदाचित ती घडलेली असू शकते. पर्यायाने, हा आपला थोर इतिहास असू शकेल.
(२) अख्खी म्हातारी मावू शकेल असे भोपळे महाराष्ट्रात कोठे व केव्हा निपजत ?
महाराष्ट्रात निपजायला हवेत म्हणजे ही गोष्ट मराठी लेखकाने रचलेली/ लिहिलेली आहे का? या गोष्टीत महाराष्ट्र या राज्याचा उल्लेख आहे का? की काहीजणांना "सर्व काही भारतभूमीतच झाले आणि येथूनच बाहेर गेले." असे वाटते तसे प्रश्नकर्त्याला महाराष्ट्रच सर्व गोष्टींचा उगम असे वाटत आहे? असो, पण यावरून मराठी माणसे पूर्वीही महाराष्ट्राबाहेर जात नसत असे दिसते का कारण महाराष्ट्राबाहेर मोठे भोपळे निपजत असतील यावर प्रश्नकर्त्याचा विश्वास दिसत नाही. मराठी माणसे उत्तरप्रदेशात जाऊन आपली दादागिरी का करू शकत नाहीत याची ऐतिहासिक कारणे येथे मिळावीत.
(३) भोपळ्याचा व्यास किती सें.मि. ?
म्हातारीचा घेर पुरेल इतका? आधी त्यासाठी म्हातारीच्या कमरेचा घेर किती होता ते सांगा बघू.
(४) भोपळ्याचे वजन किती ?
काय करावयाचे आहे ? खानावळ घालावयाची आहे काय ? - हाहाहा! हे उत्तर भारीच आवडले म्हणून तेच कायम ठेवत आहे. बहुधा या प्रश्नावर हे चपखल उत्तर आहे.
(५) सुनेने सासूचा जांच करावयाची पद्धत कधी रूढ झाली ?
लग्न करण्याची पद्धत रुजू झाल्यावर. आता लग्न करण्याची पद्धत कधी रुजू झाली? कशी होती? कोणत्या प्रथा होत्या यासाठी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास वाचावा. ;-)
ही चर्चा गंभीर का गंमतीत? जशी चर्चा तसा प्रतिसाद हं! - अरे भोपळ्या (देवा म्हणायचीही भीती उपक्रमावर) अशी स्पष्टीकरणेही द्यावी लागतात.
बारीकसा फरक
चर्चा वाचत आहे.
प्रस्तावनेच्या परिच्छेदामधला एक फरक नोंदवला पाहिजे.
भोपळा आणि म्हातारी या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. "भोप फलम् वृद्धा" (धम्मपद : ४२०) असे बौद्ध धर्मशास्त्रातही आढळून येते. कथांमधील म्हातारी ही अमर असून भोपळा हा नाशवंत आहे.वाघ सिंहाच्या चक्रातून म्हातारीची सुटका झाली तरी भोपळ्याची नाही हा पाठभेद ध्यानात यावा.
(मग "कालमर्यादा ठरवावी कशी?" हा प्रश्न उभा राहातो. सुरुवातीला निरुत्तर करणारा प्रश्न वाटला तरी, त्याचे बर्यापैकी तर्कशुद्ध उत्तर झुलू तत्त्वज्ञानात सापडते. ते उत्तर आश्चर्यकारक आणि रोचक असले, तरी या चर्चेत अवांतर आहे. हा पूर्ण प्रतिसादच अवांतर वाटायची शक्यता आहे. परंतु हे तत्त्व इतिहासातील एक विचारपद्धती सांगते. त्याचा संदर्भ म्हणून प्रतिसाद समर्पक(ही) आहे.)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
प्राचीन
काही अर्वाचीन दस्तावेजांमध्ये प्रस्तुत भोपळ्याचे चित्र उपलब्ध झाले आहे. गरजूंनी त्रिज्या काढावी.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
म्हातारीही सापडली
अर्वाचीन दस्तावेजांमधे म्हातारीही सापडली..ती ह्या भोपळ्यात मावू शकेल का? ह्याचे गणित गरजूंनी मांडावे.
कृपया उत्तरे व्यनिने नकोत.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
ही तरुणी
सुरकुत्या-विरहित कातडीमुळे ही तरुणी असल्याचा विचारही केला जाऊ शकतो.
ही तरुणी (किंवा म्हतारी) भोपळ्यामध्ये बसायचा प्रयत्न करत नाही आहे. हातातल्या बटव्यात शिरायचा प्रयत्न करत आहे. (पाश्चिमात्त्यांच्या भाषेत कॉइनपर्स [मूळपाठ्य गो-इन-पर्स] म्हणतात ते मिथक याच्याशी संबंधित असावे.)
त्यावरून प्रश्न उद्भवतात :
नाणी ठेवायचे एतद्देशीय बटवे छोटे भोपळे कोरून पूर्वी बनवत असत काय?
अगदी-अगदी
>>सुरकुत्या-विरहित कातडीमुळे ही तरुणी असल्याचा विचारही केला जाऊ शकतो.
संशोधनाची पायरीच ही आहे की विधान आणि माहितीवर शंका घ्यायची. तेव्हा आपले निरिक्षण पाहता
ती तरुणीच असावी असे वाटते. त्यामुळे सदरील व्यक्ती त्या कथेची नायिका होऊ शकत नाही. अशा निष्कर्षाकडे जाता येईल
बापरे...! विषय रंगणार असे दिसते.
-दिलीप बिरुटे
सुरकुत्या
ती भोपळ्यासारखी फुगल्यामुळे सुरकुत्या दिसत नसतील.
स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा मुळीच हेतु नाही.
काहीही काय?
चित्रात एवढी स्पष्टपणे म्हातारीची काठी आणि नातवंडे दिसत असताना तिला तरुणी म्हणण्याचे धाडस तुम्ही केलेच कसे? :-)
२५ पौंडाचा भोपळा
मागे एकदा आम्हाला २५ पौंडाचा भोपळा मिळाला होता. त्यात घरातले कोण मावते हे पाहायला हवे होते. मी नसते हं मावले. ;-)
:)
शरदराव तुमच्यासारखे लिहिणारे भले लोक आहेत म्हणून उपक्रमवर जरा जीव लागतो. :)
(१) ही गोष्ट कोणत्या काळात रचली गेली ?
आपल्याला ही गोष्ट शोधायची असल्यास आपल्याला लोकवाड्मयाचा अभ्यास करावा लागेल. त्यातील वर्गीकरण पाहता आपल्याला 'कथात्मक लोकवाड्मयाचा' अभ्यास करावा लागेल. त्यात लोककथेचा उगम कोणत्या देशात झाला त्याचा शोध घ्यावा लागेल. पण संशोधनात पहिली अडचण ही दिसते की, अनेक अभ्यासकांनी लोककथेचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यात काही एकवाक्यता दिसली नाही. लोककथेच्या उगमाबाबत काही मतं अशी आहेत की, लोककथांचा उगम भारतात झाला. भारतात झाला म्हटला की आपण आर्यांकडे वळलोच पाहिजे. त्यांचे निवास मध्यआशियात होते. [पाहा : उपक्रमचे जुने धागे] तेव्हा पहिल्या काही कथा,लोककथा,गोष्टी त्यात आपल्याला शोधता येतील. दुसरी गोष्ट भारतात वेद,पुराण,प्राचीन कथासंग्रहाचे जनक पाहता ही गोष्ट फार दूरच्या काळातील नसावी असे वाटते.[ कथा,कविता,गाणी, गोष्टी किंवा अन्य मौखिक वाडःमय, यांचे संशोधन करतांना प्रास्ताविक असेच लिहावे. ;) ]
तुर्तास, लिखित स्वरुपात 'चल रे भोपळ्या' ची गोष्ट मागच्या वर्षी पुतणी पहिलीला होती तेव्हा वाचलेली आठवते. तेव्हा पुरावे पाहता ही गोष्ट २००९ ची असावी अशीही एक शक्यता वाटते. :)
-दिलीप बिरुटे
[ शरदरावांकडे पीएच.डी करणारा थापाड्या संशोधक ] :)
प्रतिसाद संपादित
कृपया, व्यक्तिगत चर्चा खरडवहीतून करावी.
धन्यवाद
हा प्रतिसाद मी बिरुट्यांच्या खरडवहीत मी टाकला आहे. धन्यवाद.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वाळलेला भोपळा
हा भोपळा तंबोर्याच्या भोपळ्यासारखा वाळलेला असावा. म्हणजे भरपूर हलका.
गोष्टीत भोपळ्याबद्दल अप्रुप नाही. याचा मी अर्थ असा करतो की अशा प्रकारचे कवच घालण्याची तेव्हा पद्धत असावी.
प्रमोद
अजून एक निष्कर्ष
अख्खी म्हातारी मावू शकेल असे भोपळे महाराष्ट्रात कोठे व केव्हा निपजत ?
याचे उत्तर माहीत नाही. गडकर्यांनी, महाराष्ट्राला दगडांच्या देशा म्हणले आहे, भोपळ्यांच्या देशा असे नाही. ते असोत. पण "म्हातारी मावेल इतका भोपळा" या संकल्पनेवरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की आमच्या पूर्वजांना जेनेटिकली मॉडीफाईड शेती जमत असावी. अर्थात बायोटेक विज्ञानाचे मूळ संशोधन आपणच केले आहे, असे स्पष्ट होते.
अथवा, हॅलोविनची मूळ संकल्पना भारतातील असेल आणि म्हातारीने नुसते खालील भोपळा दाखवून वाघाला घाबरवले असेलः
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आपले पूर्वज महान
म्हणजे काय? अद्यापही शंका आहे का तुम्हाला? आपले पूर्वज महान होते यावर?
उपक्रमींनी...
तोडलेले तारे बघून हसून हसून पुरेवाट झाली.
एक शंका: मी पाहिलेल्या चित्रांनुसार म्हातारीचे पाय भोपळ्यातून बाहेर येऊन तिला चालता यावे म्हणून सोय केलेली होती. पण चाके वापरलेली नव्हती. मग ही कथा चाकाचा शोध लागण्या आधीची की नंतरची? नंतरची असेल तर चाके का बसवली नाहीत?
मग
नंतरची असेल तर चाके का बसवली नाहीत?
मग ती म्हातारी नसती, सिंड्रेला असती. :-)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
धो धो
धो धो हसतोय
चालु द्या!
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
+१
असेच म्हणते.
धमाल लेख.
प्रश्न
मला वाटतं प्रश्नाची मांडणी चुकलेली आहे. (मुख्य चर्चा हुकल्यावर असंच म्हणायला हवं...) म्हातारी मावेल इतका मोठा भोपळा नसून भोपळ्यात मावेल इतकी लहान म्हातारी कुठे सापडली असा प्रश्न हवा.
आपले पूर्वज थोर नसून खुजे होते असाच निष्कर्ष यातून निघत नाही का?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
नाही
आमच्या मते यातुन आपले पुर्वजांकडे आकारमान बदलण्याची क्षमता होती असा निष्कर्ष यातुन निघतो. राजा जनमेनजयापर्यंत पोहचण्यासाठी तक्षकाने आपले आकारमान अळीपर्यंत आकुंचित केले होते ही कथा याला पुरावा आहे.
प्रकाश घाटपांडे
कैच्या कैच्!
आधीच सिद्ध झालेलं आहे, आपले पुर्वज हवे ते रुप् घेउ शकत् होते. भोपळ्यातल्या बीचं रुप् घेतलं असलं म्हातारीनं, हाय् काय् अन् नाय् काय्!
उत्तर
>> आपले पूर्वज थोर नसून खुजे होते असाच निष्कर्ष यातून निघत नाही का?
म्हतारी खुजी असती तर वाघने तिला हटकले नसते, आणि गोष्टीमधे हे लक्षात घ्या की म्हतारी तुप रोटी खाऊन - जाड जुड होण्याचं आश्वासन देते आणि
वाघ ते मान्य पण करतो कारण सद्ध्याची म्हतारी एवढी मस्कुलार नाहीये. हे पाहता लक्षात येते की पुर्वज खुजे नसुन भोपळाच मोठा होता.
प्रश्न
का?
हे कसं?
खुजे किडकीडीत् असु शकत् नाही?
ससा.
वाघाने सस्याला (सश्याला) मारण्या साठी खुप कष्ट घेतले अस पहिलं ऐकलं आहे का ? खुजे म्हणजे सस्यायेवढे असतील ना (भोपळ्यामधे मावतील ससे).
माणुस चिमण्यांची शिकार का करत नाही ? (खुप कष्ट करुन काय विशेष मिळणार)
जर वाघ आणि लांडगा एका खुज्या ( सस्याएवढ्या ) म्हतारीसठी भांडन करतायेत हे गोष्टं आइकनार्याला कसे वाटेल ?
आँ!!
आता हे काय् नविन्! खुजे म्हणजे फक्त ससेच्! माझ्या बालमनाला धक्का बसला! असो.
लोल.
आहो भोपळ्यामधे बसतील आणि खुजे असतील म्ह्णजे कशाएवढे असतील.. ससा ही तुलना आहे हो.
कदाचित
त्याकाळचे वाघ व लांडगेही खुजे असतील तर? भोपळे सोडून सगळंच लहान लहान होतं बहुतेक. मांजरीएवढे वाघ, भोपळ्याएवढी म्हातारी, व झुरळाएवढे ससे... एवढी सगळी गृहितकं धरली की माझंच बरोबर....भूतकाळाविषयी काही माहीत नसल्याने अशी गृहितकं धरण्याची प्रथा आहेच. (या प्रथा देखील पूर्वी खुज्या होत्या का?)
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
त्यापेक्षा ..
त्यापेक्षा ..
त्यापेक्षा असं म्हणा की > भोपळा त्याकळी मोठा होता आणि कालांतराने तो लहान झाला.
मग तुमचं अधीक बरोबर वाटेल.
ही बघा - चल रे भोपळ्याची गोष्ट
गोष्टीत सून बिन कोणी नाही. खाष्ट सुनेची या गोष्टीत भरती करणे म्हणजे सर्व सासू-सुनांचे वितुष्ट असते असे दाखवून लोकांची दिशाभूल करणे आहे. ;-)
सामाजशास्त्रीय निस्कर्ष
१. भोपळ्याचा माल पन् चान्गला येत् नाही.
२. भोपळे म्हाग झाले आहे फार सध्या.
पूर्वीचा गोश्टीतला माल चांगला मोठा होता म्हन्जे शेतकरी कामसू होते. पण आत माल छोट झाल्याने ते आळशी झाले आनि व्यापारी जास्त फायदा काढू लागले आहेत्
आसा
सामाजशास्त्रीय निस्कर्ष पन् मांडून थेवतो.
आपला
अण्णा
वर्षातील सर्वात उत्तम पोस्ट
श्री शरदरावांना उपक्रमवरचे या वर्षाचे सर्वोत्कृष्ट लेखक हे पारितोषिक दिल्याचे आम्ही जाहीर करतो.इतर उपक्रमींचे अनुमोदन असेलच असे गृहित धरले आहे.
चन्द्रशेखर
अनुमोदन
आमच अनुमोदन आहे
प्रकाश घाटपांडे
छे छे
आजी त्या भोपळ्यात बसु शकणार नाही. ती तर काउ चिउची मनोरंजनात्मक गोष्ट आहे सांगणार्यां(सर्व मॅकलेप्रणीत शिक्षणाने आपल्या पुर्वजांची महती विसरलेल्यां)नो. येथे पहा विश्वास बसणार नाही अश्या जागेत् बसता येतेच.
ही आजी कण्टॉर्शनिस्ट (डोंबारी???) होती. व जाताना तिने एक दोन लोकांना लिफ्ट देखील दिली होती, म्हणजेच कनवाळू, पर्यावरणप्रेमी इ इ देखील होती. जरुर चिकित्सकांनी तिला इलीगल ह्युमन ट्रफिकिंग करणारी होती असे म्हणाले आहे.
महर्षींनी हे सर्व एका नाडीपट्टीवर लिहले आहे पुरावा पाहीजे असल्यास अभ्यासुंनी जाउन शोधावी.
इन्फीडल चिकित्सकांनो आता बंद करा हा तमाशा.
आय विल बी बॅक
(चंद्रधारे)
सुफळ संपूर्ण
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांचा लेख आणि त्यावर भरभरून आलेले प्रतिसाद यांवरून , काल्पनिक आणि असंभाव्य गोष्टींवर कशा प्रकारची चर्चा(?) संभवते ते स्पष्ट झाले.पुराणकथांवरील चर्चेचा वैय्यर्थ(निरर्थकपणा) अधोरेखित झाला.
एवंच साठा उत्तरांची कहाणी या पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण जाहली.
..........................
अवांतरःभगवद्गीतेच्या विषयप्रवेशाकरिता भारतीय युद्धारंभप्रसंग (सिच्युएशन) वापरला आहे.तो अर्जुनविषादयोगापुरताच आहे.पुढे कृष्णार्जुन संवादाचा विषय औपनिषदिक तत्त्वज्ञान हा आहे.(सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः..हा गीतानमनातील श्लोक प्रसिद्धच आहे.)तिथे पुराणकथांचा काही संबंध नाही.
...............................
चूक
या वरून पुराणकथांवरील चर्चेचा निरर्थकपणा अधोरेखित झाला नसून चर्चाप्रस्तावकाने ज्या हेतूने चर्चा टाकली तो हेतू सफल झाला कारण तो हेतू (आजही आपल्याखेरीज) प्रत्येकाने समजून घेतला आणि त्यानुसार प्रतिसाद दिले.