मुलगा माझाच

आज लायब्ररीत विजया जोशी यांचे "मुलगा माझाच" हे पुस्तक हातात पडले. मलपृष्ठावरील सारांश वाचून उत्सूकता चाळवली गेली म्हणून घरी आणले.. आणि वाचायला सुरूवात केली ते सगळी (शे-दिडशे) पाने वाचेपर्यंत पुस्तक खाली ठेवलेच नाहि. आजपर्यंत अनेक नाटकांतून, कथा कादंबर्‍यांतून "नवरा" ह्या विषयावर शेकडो पाने लिहिली गेली. त्यात क्वचित चांगले व बायकोला नीट सांभाळून घेणारे नवरेही रंगवले गेले मात्र बहुतांश वर्णन नवर्‍यांनी केलेल्या छळाचं होतं. या सगळ्यात कडी केली ती "नॉट विदाअऊट माय डॉटर" म्हणणार्‍या बेटी मेहमुदी यांनी. इराण मधील - तिसर्‍या जगातील - मुस्लिम देशातील ही कथा वाचून अनेकांनी आपापल्या वकुबानुसार इराणी, तिसर्‍या जगातील किंवा मुसलमान नवर्‍यांच्या क्रुरपणावर बोटे मोडली होती.

मात्र ह्या पुस्तकातील कथा घडते ती पहिल्या जगातील पहिल्या देशात - अमेरिकेत. ती ही एका परदेशी नवर्‍याची कहाणी नसून - एका भारतीय नवर्‍याच्या जुलूमांची कहाणी आहे. ही एका परधर्मियाची कहाणी नसून - किंवा उत्तरप्रदेशातील किंवा मागास राज्यातील कहाणी नसून -- एका हिंदु-मराठी कुटुंबाची कथा आहे. ही सत्यकथा आहे लेखिकेच्या मुलीची. लेखिका शिकलेल्या घराची, पुरोगामी विचारसरणीची, स्वतंत्र विचारांची -आचारांची. तेच बाळकडू घेऊन मुलगी मोठी झालेली. चांगली शिकून विमान कंपनीत नोकरी करू लागलेली. वय झाल्यावर लेखिका मुलीसाठी स्थळ शोधु पाहते तेव्हा मुलगी नकार देते. एका स्वातंत्र्यप्रिय मुलीला बळजबरी करण्याचा प्रश्नच नसतो. पुढे मुलगी नव्या नोकरीसाठी अमेरिकेत जाते. आणि अचानक दोन महिन्यात फोन येतो की मुलीने परस्पर लग्न ठरविले आहे. बरं प्रेमविवाहदेखील नाहि तर नीट जाहिरात देऊन, मुलं बघुन, मुलीने कारभार परस्पर केला आहे. आणि नवरा जवळजवळ दुप्पट वयाचा घटस्फोटीत आहे. लेखिकेला नाहि करायचा अवधी मिळायच्या आत लग्न होतं.

आपण केलेले संस्कार इतकेही नकलादु नसतील व मुलीने स्वतःला आवडलेल्या एका चांगल्या मुलाशी लग्न केले असेल अशी लेखिकेला असलेली आशा किती फोल आहे हे २-३ महिन्यातच कळू लागते. त्यातच मुलीला दिवस राह्तात आणि मुलाचा जन्म होईपर्यंत ती नवर्‍याचा त्रास सहन करते. बाळंतपणासाठी जेव्हा लेखिका तिथे जाते तेव्हा हादरून जाते. मुलीचा नवरा अत्यंत सनातनी, बायकोला कस्पटासमान लेखणारा तर असतोच पण त्याही पुढे, तो खुनशी व बायकोवर प्रेम करणारा दिसत नाहि. पुढे मुलाचा जन्म झाल्यावर तर त्याचा आक्रस्ताळेपणा वाढतच जातो. तो लेखिकेकडे पैशाची मागणी करतो. ती नकार देताच लेखिकेला घराबाहेर जाण्यास सांगतो. त्यालाही नकार देताच त्या रात्री लहान बाळाला बाहेर बर्फात सोडून येतो. शेवटी लेखिका घर सोडून दुसरीकडे रहाते.

आता मात्र त्यांना कळून चुकतं की त्याला बायको-सासूची पडली नसून त्याचा इंटरेस्ट फक्त मुलात आहे. आणि मग त्यांच्यापुढे पलायनाशिवाय मार्ग उरत नाहि. तरीही त्या दोघी घरातून तर पळून जातात.. मात्र हा त्यांचा पिच्छा सोडत नाहि. आधी अमेरिकन कायदे, तिथून पलायन पुढे १४ वर्षे भारतातील विविध कोर्टे करून शेवटी लेखिकेच्या मुलीस काय व कसा न्याय मिळतो हे वाचण्यासाठी हे पुस्तक वाचाच!

नवर्‍याचा त्रास हा एखाद्या विशिष्ट प्रांताची, समाजाची , शैक्षणिक वर्गाची मक्तेदारी नसून तो प्रश्न अगदी तुमच्या आमच्या घराशेजारी कसा घडतो आहे याचे हे पुस्तक म्हणजे जाज्वल्य उदाहरण आहे. केवळ त्या नवर्‍याचीच नव्हे तर विविध स्तरावर समाजाची मानसिकता किती पुरुषकेंद्री व त्याहिपेक्षा किती वैभवकेंद्रीत आहे याचे समर्पक वर्णन ह्या कथेत मिळते. लेखिकेने, तिच्या मुलीने, नातवाने आणि इतर काहि भेटलेल्या सहृदांनी १५ वर्षे अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत दिलेला हा लढा खचितच स्फुर्तीदायक आहे.

मुलाच्या कस्टडीसाठी त्या नवर्‍याने केलेले "उपाय" भयंकर आहेत. आणि त्याविरुद्ध लढताना यांनी अवलंबिलेले कित्येक प्रसंग "कल्पनेहून सत्य अद्भुत" या प्रकारात मोडणारे आहे. मात्र या आत्मचरित्रपर कथेत लेखिकेच्या कुटुंबाची फरफट अस्वस्थ करतेच पण त्याहून अस्वस्थ करते ते ह्या सगळ्या मान खाली घालायला लावणार्‍या गोष्टी "त्यांच्या"कडे घडत नसून "आपल्या"कडे, आपल्या परसात घडताहेय ही!

पुस्तक: मुलगा माझाच
लेखिका: विजया जोशी
प्रकाशनः मॅज्स्टीक प्रकाशन
किंमतः रु. १००/-

Comments

त्रोटक ओळख

ऋषिकेश, ओळख जरा त्रोटक झाली. :-( कारण मला बरीचशी पुस्तके वाचायला मिळत नाहीत त्यामुळे विस्तृत ओळख बरी वाटते.

बेटी महमूदीच्या गोष्टीला इराणमध्ये अडकून पडण्याची आणि मदतीला जवळचे कोणी नसण्याची पार्श्वभूमी आहे परंतु अमेरिकेसारख्या देशात दुप्पट वयाच्या घटस्फोटित माणसाशी तडकाफडकी लग्न लावण्याचे कारणच मला कळले नाही आणि अशा स्वतंत्र विचारांच्या मुलीने नवर्‍याचा जाच बाळंतपणापर्यंत का सहन करावा तेही कळले नाही. थोडे अधिक विस्ताराने लिहिलेस तर आवडेल.

असो.

मुखपृष्ठावर आयसीस आणि होरसची प्रतिकृती का वापरली असावी याचा विचार करते आहे. आयसीसला नवर्‍यापासून (ओसायरिस) त्रास नव्हता परंतु होरसच्या जन्मानंतर तिच्या नवर्‍याच्या मारेकर्‍यापासून (सेत) तिला आणि होरसला बराच त्रास झाला आणि पळूनही जावे लागले. बहुधा, हेच सूचित करायचे असावे.

कारणे

याला अनेक पदर आहेत.. एकतर आधी लेखिकेला लग्नाला न बोलण्यापर्यंत मुलगी स्वतंत्र असते. त्यामुळे मी हे हँडल करू शकेन हा (अनाठायी) विश्वास.. शिवाय पुढे सत्य परिस्थिती कळल्यावर लेखिका भारतीय स्त्री प्रमाणे सल्ला देते.. की आता मूल होऊ दे मग तो आपोआप चांगला वागु लागेल वगैरे वगैरे.. शिवाय मुलीचा पासपोर्ट नवर्‍याने जप्त केलेला असतो. इतकेच काय घरखर्चालाही तिच्याकडे पैसे नसतात (नवरा रोज सामान आणतो), मुलीला गाडी शिकण्यास बंदी केली जाते. बाकी त्या मुलीने तो निर्णय का घेतला हे त्या पुस्तकात जरी ठळकपणे/थेट सांगितले नसले तरी एका बेसावध क्षणी घेतलेला चुकिचा निर्णय इतकेच त्याचे स्वरूप असल्याचे वाटते.

यात या चुकीची शिक्षा म्हणून त्या धनिक नवर्‍याने पाठिमागे लावलेले पासून, आजीने नातवाला घेऊन परागंदा होणे, मुलाच्या आईने ऑस्ट्रेलियामार्गे भारतात येणे ते भारतीय सुप्रीम कोर्टातील लढतीपर्यंतचा १५वर्षांचा प्रवास विस्मयकारकच आहे. मुख्य म्हणजे मुलीने केलेल्या चुकीला न लपवता किंवा त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन न करता तिच्या चुका दाखवत हे केलेले हे कथन आहे. (लेखिकेच्या मनोगता नुसार अश्या फसलेल्या बायकांनी काय चुका करू नये देखील समजावे हाही एक दुसरा हेतू आहे.)

मुखपृष्टावरील चित्र कोणाचे हे माहित नव्हते. मात्र तुम्ही दिलेल्या कथेचा पुस्तकातील कथेशी एक "झुंज" सोडल्यास फारसा संबंध नाहि. केवळ आईने मूलासाठी केलेला झगडा इतपत साधर्म दाखवता यावे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

आयसिस

मात्र तुम्ही दिलेल्या कथेचा पुस्तकातील कथेशी एक "झुंज" सोडल्यास फारसा संबंध नाहि. केवळ आईने मूलासाठी केलेला झगडा इतपत साधर्म दाखवता यावे.

नेमके तसे नसेल. मीच पहिल्या प्रतिसादात संपूर्ण लिहिले नाही. आयसिस ही मातृत्वाची आणि समृद्धीची देवता आहे आणि इजिप्शियन संस्कृतीत अतिशय निश्चयी आणि प्रबळ गणली जाते. क्लिओपात्राही स्वतःला आयसिसचा पुनर्जन्म ;-) म्हणवून घेत असे. आई आणि मुलांतील प्रेमबंध नेहमी आयसीस आणि होरसमार्गे दाखवले जातात आणि ही गोष्ट त्याच संबंधांवर असल्याने मुखपृष्ठावर आयसिस आहे.

असो.

खुलासेवार प्रतिसादासाठी धन्यवाद!

पुस्तकाची ओळख आवडली

पुस्तकाची ओळख आवडली. पुस्तक कधी वाचायला मिळेल कल्पना नाही.
अशा काही बाबतींत बर्‍याचदा आपण खूप जजमेंटल असतो असेच जाणवते.
पटकन चुका शोधतो, त्या चुकांचे खरेखोटे धनी आणि असेच काही.
पण सगळी चूक मुलीची नसावी असे पुस्तकाच्या ओळखीवरून वाटते.

उत्तम

पुस्तकपरिचय.

नवर्‍याचा त्रास हा एखाद्या विशिष्ट प्रांताची, समाजाची , शैक्षणिक वर्गाची मक्तेदारी नसून तो प्रश्न अगदी तुमच्या आमच्या घराशेजारी कसा घडतो आहे याचे हे पुस्तक म्हणजे जाज्वल्य उदाहरण आहे

--- अगदी, अगदी. दहाएक वर्षांपूर्वी डॉट कॉमचा फुगा फुटल्यानंतर नोकरी गमावलेल्या, उच्चशिक्षित नवर्‍यांनी आपल्या घरी येऊन त्याचा राग काढल्याची काही प्रकरणं आतापर्यंत ऐकीवात होतीच. अर्थात, ह्या पुस्तकात वर्णन केलेली केस कितीतरी अधिक अमानुष.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आवडली

पुस्तक ओळख आवडली
अवांतरः बेंबट्या, शिंच्या दुसर्‍यांचे पाळणे कसले रे बघतोस?
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

चांगला पुस्तक परिचय

पुस्तक परिचय चांगला झाला आहे. विजया जोशी या लेखिकेचे नाव यापूर्वी ऐकले नव्हते. अर्थात यावरुन कुठल्याही पुस्तकाची वाचनियता ठरत नाही हे सिद्धच झाले.

नवर्‍याचा त्रास हा एखाद्या विशिष्ट प्रांताची, समाजाची , शैक्षणिक वर्गाची मक्तेदारी नसून

माणसाचे माणुसपण आणि त्याच्यातले पशुत्व या सगळ्या बाबी वैश्विकच...

 
^ वर