अशी वाक्यरचना कशासाठीं?

जालावर विवक्षित ठिकाणी खालील प्रकारची वाक्यरचना वेळोवेळी पाहावयास मिळते.

1. तुझे मित्र/मैत्रिणी कुठे जाऊन काय करतात याची जबाबदारी तुझ्यावर नक्कीच नाही आहे.
2. आमच्या कोणाच्या वागण्याबद्दल तू उत्तरदायीही नाही आहेस
3. हा सामाजिक प्रश्न नक्कीच आहे. पण तो केवळ सैनिकांनी केला म्हणून नविन नाही आहे.

अशा स्वरुपाच्या वाक्यरचनेमुळे, वाक्याच्या अर्थाबाबत माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या, घाटी वाचकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. प्रत्येक ठिकाणी "नाही आहे" म्हणण्यापेक्षा सरळ "नाही" एवढेच म्हटले तर वाक्य पूर्ण होत नाही का? (की 'वाक्य पूर्ण होत नाही आहे का?' असे म्हणावे?)

तज्ज्ञांच्या मताच्या प्रतीक्षेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

आन्ना

आन्ना ही बोली भाषा आहे. त्याला अनेक छटा आहेत. चिरफाड केली तर भाषेचे सौंदर्य नाहिसे होईल.
अनेकवेळा गुळगुळीत झालेली वाक्ये ही आपण पहातोच. भाषा रुक्ष होउ नये म्हणुन अलंकार आले. काही वाक्यप्रयोग भाषिक परंपरेतुन चालत आले.
उदा.भीतीने मी गर्भगळीत झालो. तो पुरुष असेल तर त्याला गर्भ कसा?
आनंदाने हवेत तरंगु लागलो - तु काय ईमान हायेस का ? कि पक्षी?

प्रकाश घाटपांडे

सदोष वाक्यरचना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आण्णा चिंबोरी यांनी उपस्थित केलेली शंका योग्य आहे. त्यांच्या विचाराशी मी सहमत आहे.अशी वाक्ये बोलताना एकवेळ क्षम्य मानता येतील. पण वैचारिक लेखनात अशा प्रकारची वाक्यरचना सदोषच म्हणायला हवी. अशी वाक्ये फुटकळ लिखाणात दिसतील. चांगल्या लेखनात आढळत नाहीत.

बरोबर

>>अशी वाक्ये फुटकळ लिखाणात दिसतील<<

बरोबर. फुटकळ लिखाणातच अशी वाक्ये वाचली आहेत.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

वैचारिक लेखनात

पण वैचारिक लेखनात अशा प्रकारची वाक्यरचना सदोषच म्हणायला हवी

सहमत आहे. परंतु सदर वाक्यरचनेचे विवक्षित ठिकाणावरील संदर्भ पाहता ते लेखन अवैचारिक होते असे जाणवले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अशिक्षितस्

हिंदीच्या 'तुम्हारी नही है' अशा प्रकारच्या वाक्यरचना पद्धतीचा हा परिणाम आहे काय?

ऐसाच वाटता हय

हिन्दीच्याच प्रभावाचा परिणाम वाटून राहिलाय ना.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

कोकणातली बोली

ही कोकणातली बोली आहे. यात काही गडबड नाही.

१८९० काळापासून (नवलकरांच्या व्याकरणपुस्तकापासून) या वाक्यरचनेचा उल्लेख आहे.

चांगल्या लेखनात काय आढळते आणि आढळत नाही, हे विधान करण्यासाठी खूप वाचन असावे लागते. माझे तसे वाचन नाही.

माझ्या घरगुती बोलण्यात "असे नाही आहे" [उच्चार : असं नैये] असा वापर सामान्य आहे. ही वाक्यरचना बदलायची मला काहीही गरज वाटत नाही आहे. आणि हा वाक्यप्रयोग प्रमाणलेखनात चालतो, असे माझ्या वाचनावरून स्पष्ट मत आहे.

चर्चाप्रस्तावकाच्या मनात अर्थाविषयी नेमका काय संभ्रम आहे, ते मला समजत नाही. मला तर उदाहरणातील सर्व वाक्यांचे अर्थ स्पष्ट वाटते.

+१

माझ्या घरगुती बोलण्यात "असे नाही आहे" [उच्चार : असं नैये] असा वापर सामान्य आहे. ही वाक्यरचना बदलायची मला काहीही गरज वाटत नाही आहे. आणि हा वाक्यप्रयोग प्रमाणलेखनात चालतो, असे माझ्या वाचनावरून स्पष्ट मत आहे.

असेच म्हणते. असे मी लहानपणापासून ऐकत बोलत आले आहे, त्यामुळे त्यात काही चूक आहे असे मला कधीही वाटले नाही आहे. :)

उदाहरण वाचायला आवडेल

श्री. धनंजय,

हा वाक्प्रयोग प्रमाणलेखनात चालतो याचे उदाहरण वाचायला आवडेल.

किंबहुना तुमच्या प्रतिसादात तुम्ही ४ वेळा वापरलेल्या 'नाही' सोबत केवळ एकदाच 'आहे' वापरलेला आहे. (तोदेखील माझे मत खोडून काढण्यासाठी) यावरुनच ही शब्दयोजना स्वाभाविक नाही हे जाणवते.

नैये वगैरे शब्दप्रयोग कानाला खटकत नाहीत मात्र 'नाही आहे' हे फारच खटकते. मराठीचा स्वाभाविक गोडवा 'नाही आहे' मुळे नष्ट होतो असे वाटते.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

"नाही" आणि "नाही आहे" यांच्या अर्थछटांमध्ये फरक

हा नवलकरांच्या व्याकरणाच्या पुस्तकाचा गूगलबुक्स दुवा.

येथे पान २७२ बघावे (परिच्छेद पानाच्या खालच्या भागात आहे, मुद्दा ५ खालील टिप्पणी).

पुस्तक इंग्रजी माध्यमात आहे. त्यातील परिच्छेदाचा मराठी अनुवाद येणेप्रमाणे :

टिप्पणी : नकारार्थी वाक्यांत "नाहीं" हे "न असणे"शी समसमान आहे. म्हणून "आहे" हे "नाहीं"च्या अंतर्गत समाविष्ट आहे. कोंकणात मात्र "नाहीं"ला "आहे" जोडले जाते, आणि perfect definite रूप बनवले जाते. हे past पेक्षा वेगळे आहे.
He did not come - past - तो आला नाहीं.
He has not come - perfect definite - तो आला नाहीं आहे.

नवलकरांची मराठी भाषेबद्दलची आधारसामग्री सुयोग्य होती की नव्हती, हे ठरवण्यासाठी पुस्तकाचा अन्य भाग, प्रस्तावना, लेखकाची शैक्षणिक तयारी वगैरे तपासावी.

मराठीचे प्रमाणलेखन करताना त्या दोन अर्थछटा मला वेगवेगळ्या वापरायच्या असतील, तेव्हा मी ती दोन वेगवेगळी रूपे वापरेन. कोणाला त्या दोन अर्थछटा वापरायची भाषिक गरज वाटली नाही, तर त्यांनी दोन वेगवेगळी रूपे वापरू नये.

अनुवाद

'He has not come' चे 'तो आलेला नाही' असे भाषांतर चूक आहे काय?

अनुवाद नव्हे

येथे अनुवाद अपेक्षित नाही. तर मूळभाषेचे सम्यक आकलन आणि वर्णन अपेक्षित आहे.

(मराठीमध्ये इंग्रजी मूळपाठ्याचे कुठले भाषांतर योग्य हा प्रश्न मराठी व्याकरणासाठी असंदर्भ आहे. मात्र मराठीचे व्याकरण इंग्रजीत समजावून सांगताना मूळ मराठी पाठ्याच्या अर्थछटा इंग्रजी वाचकाला समजावून सांगण्याचे कर्तव्य व्याकरण-पुस्तक-लेखकाचे असते, हे खरे. जर वाचकाला मुळातच मराठी कळत असेल, तर...)

"तो आलेला नाही" आणि "तो आला नाही आहे" यांच्या अर्थछटांमध्ये फरक आहे. तो दोन सोप्या इंग्रजी वाक्यांमध्ये भाषांतरित करता येईल असे वाटत नाही.

तो फरक सांगण्यासाठी नवलकरांनी दोन प्रकारे प्रयत्न केलेला आहे.
१. एक तर जमेल तितकी सोपे इंग्रजी भाषांतरे दिलेली आहेत.
२. शिवाय perfect definite असे वर्णनात्मक शब्द वापरलेले आहेत.
("तो आलेला आहे" साठी इंग्रजीतून समजावून सांगताना "present perfect" असे काहीसे शब्द वापरायचा प्रघात आहे.)

मराठीभाषकांना इंग्रजी स्पष्टीकरणाच्या कुबड्यांची आवश्यकता भासणार नाही. नवलकरांच्या अभ्यासातून
१. "नाहीं" आणि "नाहीं आहे" हे शब्दप्रयोग कोकणात वापरतात, आणि
२. त्यांच्या अर्थछटांमध्ये फरक आहे
इतके आपल्याला समजते. १८९० काळापासून भाषेबद्दल असे निरीक्षण झालेले दिसते, ही माहिती आपल्याला कळते. त्या अर्थछटांचे इंग्रजी भाषांतर करायची नवलकरांची खटपट आपल्यासाठी आवश्यक नाही.

राहिला हा प्रश्न
'He has not come' चे 'तो आलेला नाही' असे भाषांतर चूक आहे काय?
संदर्भास योग्य असेल तर* हे भाषांतर ठीक आहे.

*इंग्रजीमध्ये दोन "टेन्स" आहेत - present आणि past. शिवाय सहायक क्रियापदांच्या साह्याने future, वेगवेगळ्या प्रकारचे perfect, continuous वगैरे अर्थ सांगितले जातात.

मराठीमध्ये मूळ ७-८ आख्याते आहेत (इंग्रजीतील "टेन्स" सारखी). सहायक क्रियापदांनी त्यांचे आणखी काही अर्थ प्रकाशित केले जातात.

म्हणून इंग्रजी "टेन्स" वाक्यरचनांचा मराठी "आख्यात" रचनेशी एकास-एक जुळवणे अशक्य आहे, हे तर अंकगणिताने कळते. मात्र कुठल्याही संदर्भात जो काय संदेश पोचवायचा आहे, तितपत सुयोग्य भाषांतर होऊ शकते.

टेन्स आणि टेन्शन

कशाला या वादात पडलो असे वाटते आहे. पण perfect definite चे उदाहरण ही हॅज बीन कमिंग सारखे आहे.

करत्ये, जातोय, येतोय, नाहीये

आम्ही बोलीभाषेत वरील शब्द सर्रास वापरतो.

मी करत्ये (करत आहे) ना हे काम.

तो जातोय (जात आहे) संध्याकाळी

माझ्याकडे नाहीये (नाही आहे) अमुक गोष्ट.

वैचारिक लेखनात मात्र अशी वाक्यरचना मी वापरली नसल्याचे आठवते.

करते-करत्यें.

करत्यें ( त्यें वरचा अनुस्वार उच्चारित) हे जुन्या काळचे प्रथमपुरुषी स्त्रीलिंगी बोली आणि लेखी क्रियापद हल्ली ’करते’ असे लिहिले/बोलले जाते. करत्येचा ’करत/करीत आहे’शी संबंध नाही. बोलीभाषेतले हल्लीचे वाक्य : मी करतेय असे आहे.
इतरपुरुषी(?) बायकी वाक्ये : तू करतेयस; तुम्ही/आपण करतांहात; तो/ती करतेय; ते/त्या करतांहेत. --वाचक्‍नवी

दख्खनीची पुणे भागातली बोली

"करत्ये, करत्येस" ही रूपे पुणे परिसरातल्या बोलीतली अजून वापरात असलेली रूपे आहेत.

(सहमत : यांचा "करीत आहे"शी थेट संबंध नाही. "करती आहे" किंवा "करते आहे"शी व्युत्पत्तीजन्य संबंध आहे का? असा प्रश्न मला पडला आहे.)

करत्यें

करत्यें, जात्यें अश्या प्रकारची त्येंकारान्त रूपे कोंकणी लोकांच्या भाषेत आहेत अशी माझी कल्पना होती. श्यामच्या आईतल्या दुर्वांच्या आजीच्या तोंडी अशीच रूपे आहेत.
पुण्याच्या आणि इतर कुठल्याही दखनीत ’मी’साठी मैं, अपन, अपुन, हम ही सर्वनामे येतात. आणि क्रियापदांची रूपे वर्तमानकाळात हटकती, देई, होई; भूतकाळात बांध्या, मिल्या, जमी अशी तर भविष्यकाळात जासी, करसी वगैरे. अर्थात पछानीसारखे रूप तिन्ही काळात ऐकू येते. तिस कोई तो पछानी? अपुन पछानी. तूने कल हमकु ना पछानी तो कूं करी? ही तिन्ही काळातली वाक्ये.
मराठीतही मोरोपंतांनी ’न धरी शस्त्र न करीं मी’ मध्ये धरी हे रूप धरीन अशा अर्थी वापरले आहे.--वाचक्‍नवी

दख्खनी मराठी!

"दख्खनी" म्हणजे दख्खनी उर्दू नव्हे, तर दख्खनी मराठी असे अभिप्रेत होते :-)

दक्षिण महाराष्ट्रातील काही मराठी बोली प्रमाणबोलीच्या खूप जवळ आहेत - या बोलींना "दख्खनी" म्हटल्याचे वाचलेले आहे. आठवल्यावर संदर्भ देतो.

हा दुवा

सापडला तो वाचक्नवी ह्यांच्या प्रतिपादनाला दुजोरा देणारा वाटतो आहे, मागे ऐकल्याप्रमाणे कोकंणी मुसलमानांची भाषा ही असावी असे आठवते.

दुवा

संदर्भ

स्रोत :
अभिनव मराठी-मराठी शब्दकोश
द. ह. अग्निहोत्री
प्रकाशक : व्हीनस पब्लिशिंग हाऊस
पहिली आवृत्ती - ऑक्टोबर १९८३

खंड १, प्रस्तावना पृष्ठ एकवीस, "मराठीच्या प्रमुख बोली व त्यांची उच्चारवैशिष्ट्ये"

मराठी भाषेच्या तीन उपभाषा किंवा पोटभाषा मानण्यात येतात. १. (उत्तर) कोकणची मराठी. २. दक्खनची किंवा देशावरची मराठी आणि ३. वर्‍हाडी किंवा महाविदर्भाची मराठी.
या तीन उपभाषांपैकी दक्खनची मराठी हीच प्रमाण मराठी भाषा मानण्यात आलेली आहे. याच भाषेत ग्रंथनिर्मिती होत असून व्याकरणग्रंथसुद्धा याच मराठीविषयी आहेत. ...
... वर उल्लेखलेल्या (मराठीच्या) पोटभाषांची भौगोलिक क्षेत्रे अशी : उत्तर कोकण (ठाणे ते राजापूर) भागात जी मराठी बोलली जाते ती कोकणची प्रमाण मराठी. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे व जळगाव आणि या जिल्ह्यांना लागून असलेला मराठवाड्याचा भाग, यात बोलल्या जाणार्‍या मराठीला भाषाशास्त्रज्ञांनी दख्खनची किंवा देशावरची मराठी असे नाव दिले आहे. या क्षेत्रातील प्रमाण मराठी पोटभाषा हीच महाराष्ट्राची प्रमुख मराठी मानली जाते. कारण ग्रंथलेखन याच भाषेत होते...
महाविदर्भ भागात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाल, वर्धा, चांदा, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांत बोलल्या जाणार्‍या बोलींच्या गटाला वर्‍हाडी असे नाव देण्यात आले आहे.
मराठीच्या या तीन पोटभाषा म्हणजे त्या तीन मोठ्या भौगोलिक क्षेत्रातील अनेक बोलींचे गट होत. ...

वरील परिच्छेदांत फक्त "दक्खन/दख्खनची मराठी" असा शब्दप्रयोग सापडतो. मात्र पृष्ठ अठ्ठावीस वरती असे वाक्य दिसते :

दक्खनी (प्रमाण) मराठीत वाक्यांचे मुख्यतः सहा प्रकार आहेत...

येथे "दक्खनी" असा शब्दप्रयोगही आढळतो.

हैदराबाद आणि परिसरात

हैदराबाद आणि परिसरात बोलली जाणार्‍या भाषेला दखनी म्हणतात हे आठवतं. यासंदर्भात श्रीधर रंगनाथ कुलकर्णी या इतिहासकारांचे पुस्तकही आहे बहुधा. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत यासंदर्भात कुठल्याशा वादात या कुलकर्णींनी या भाषेच्या उत्पत्तीविषयी बरेच लेख लिहिल्याचे आठवते. त्यांनी या दखनी भाषेचे मूळ शोधून काढले होते. याच कुलकर्णींचे शिवरायांवरही पुस्तक आहे.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

सहमत आहे...!

>>हैदराबाद आणि परिसरात बोलली जाणार्‍या भाषेला दखनी म्हणतात हे आठवतं.
सहमत आहे. मराठवाडा हा निजामाच्या राजवटीत असल्यामुळे हैदराबाद राजवटीचा सर्व किंवा काही भाग बहुदा दख्खनीत येत असे. या दख्खनीचे काही वैशिष्टे मला उर्दू भाषेच्या निमित्ताने वाचल्याचे स्मरते. या बोलीचे उर्दू शेरोशायरीवर बराच परिणाम आहे असे काही तरी आहे. चुभुदेघे [संदर्भ नाहीत]

-दिलीप बिरुटे

सहमती कशाबद्दल?

हैदराबाद-परिसरातल्या उर्दूच्या बोलीला "दक्खनी म्हणतात याविषयी येथे कोणाचेच दुमत नाही.

त्याबद्दल सगळ्यांचीच सहमती असावी.

त्याबद्दल मतप्रदर्शनाचा संदर्भ समजला नाही. (बिरुटेसरांच्या आदल्या प्रतिसादकांचासुद्धा - काय संदर्भ आहे?) उदाहरणार्थ : "नागपुरी" ही हिंदीची बोली झारखंडात अस्तित्वात आहे, म्हणून काय "नागपुरी" अशी मराठीची बोली नाहिशी होते का? या दोन बोली एकच नव्हे. वेगवेगळ्या भाषा आहेत. नागपूरच्या मराठीबद्दल काही सांगताना कोणी सारखेसारखे "झारखंडात नागपुरी बोलतात - सहमत" असे म्हणू लागले, तर कोड्यात पडणार नाही तर काय?

त्यातून असे काहीसे वाटू लागले आहे - "दक्खनी नावाची उर्दूची बोली असल्यामुळे देशावरच्या मराठीला मराठीची दक्खनी बोली असे म्हणता येत नाही."
वरील प्रतिसादकर्त्यांना असे काही म्हणायचे आहे का?

सुरुवातीला कोणाला संदिग्धता वाटली असेल म्हणून वर एका प्रतिसादात मी स्पष्टीकरणही दिलेले आहे, की येथे "दक्खनी मराठी अभिप्रेत आहे". देशावरच्या मराठीला "दख्खनी मराठी" म्हणतात त्याबद्दल विस्तृत संदर्भ दिलेला आहे.

त्यानंतरही हे सगळे प्रतिसाद का येत आहेत? - गोंधळून गेलेलो आहे. दक्खनी उर्दूचा "मी जात्ये" या देशावरच्या मराठी शब्दप्रयोगाशी संबंध काय आहे? या संदर्भात स्पष्टीकरणानंतरसुद्धा संदिग्धता का भासावी?

सहमत कशासाठी

>>हैदराबाद आणि परिसरात बोलली जाणार्‍या भाषेला दखनी म्हणतात हे आठवतं.
हैदराबाद परिसरात बोलली जाणारी जी बोली तिला भोचक जे 'आठवतात' असे म्हणत आहेत त्या विधानाबद्दल मला खात्रीने म्हणायचे आहे की त्या बोलीला 'दख्खनी' असेच म्हणतात. त्यासाठी सहमती व्यक्त केली आहे. आपल्याही प्रतिसादात 'दख्खनीच' आहे. पण भोचकांनी प्रतिसाद देऊन विधानात 'संशय' व्यक्त केला तो दूर करण्यासाठी सहमतीचा प्रतिसाद दिला, बाकी काही नाही.

बाकी, 'मराठीच्या प्रमुख बोली व त्यांची उच्चारवैशिष्ट्ये' अगदी योग्यच आहेत. कृपया गोंधळू नका. आणि गैरसमजही करुन घेऊ नका.

बाकी, बोलीच्या प्रदेशाबद्दल आणि त्यांची वैशिष्टे यावर विचारांची अजून देवाण-घेवाण करु म्हणजे माहिती मिळत राहील.

-दिलीप बिरुटे
[आपलाच]

धन्यवाद...!

माहितीपूर्ण चर्चा आहे !

-दिलीप बिरुटे

कोकणी मराठी

नाहीये अशासारख्या उच्चाराचा शब्द सामान्यपणे उच्चारला जातो. तो व्याकरण दृष्ट्या चूक असेलही.

तसेच कोकणात 'त्याने आंबे आणलेन'. 'त्याने मला बोलावून घेतलेन' असेही शब्द प्रयोग केले जातात. (अगदी चिपळूण रत्नागिरीत 'मला बोलावून घेतलेनी' असेही म्हणतात). हेही प्रयोग अप्रमाण असावेत.

'काल मी मुंबईला गेलो होतो' ऐवजी 'काल मी मुंबईला गेलेलो' हा वाक्यप्रयोगही अप्रमाण आहे का? तो मुंबई परिसरात जास्त वापरला जातो. पुणे परिसरात कमी.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

निरिक्षण

मला नियम माहित नाहि. मात्र स्वतःबद्दल निरिक्षण असे की माझ्याकडून शक्यतो नाहि हे एखाद्या क्रियापदानंतर आले तर केवळ नाहि वापरले जाते मात्र कियापदापासून वेगळे आल्यास त्यास आहे लावला जातो. (अर्थातच हा नियम असणे शक्य नाहि कारण मी देखील तो प्रत्येक वाक्यात पाळेनच असे नाहि)

जसे
अशी वाक्ये लिहिण्यासाठी प्रमाण मानावा असा नियम नाहि आहे.
मी घरी येताना आंबे आणायला विसरलेलो नाहि.
मात्र
भूतकाळातही बहुतेक वेळा 'नाहि' चे रूपच (नव्हते) वापरतो. तिथे 'आहे'चे रुपे वापरत नाहि ( नाही होते).
भविष्यकाळात मात्र ठोस निरिक्षण देता येईल का शंका आहे, कारण नसेल किंवा अमूक अमूक करेन असे नाहि हे दोन्ही प्रयोग वापरले जातात

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छान निरिक्षण

छान !

दुसरे वाक्य

लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या वाक्यांतले दुसरे वाक्य : आमच्या कोणाच्या वागण्याबद्दल तू उत्तरदायीही नाही आहेस. या वाक्यातला ’आहेस’ काढून चालणार नाही. काढायचाच असेल तर ’नाही’ऐवजी ’नाहीस’ करावे लागेल. कर्ता द्वितीयपुरुषी असेल तर, तू आहेस, तुम्ही/आपण आहांत(अनुस्वार आवश्यक!) अशीच वाक्यरचना होईल.
उदा. कल्पवृक्षकन्येसाठी लावुनिया बाबा गेलां येथे गेलांतल्या ’ला’वरचा अनुस्वार काढला तर कोणीतरी तृतीयपुरुषी बुवा कल्पवृक्ष लावून गेला असा अर्थ होईल. शुद्धलेखनाच्या ’नवीन’ नियमांतही अनेकवचनदर्शक अनुस्वार काढलेले नाहीत. वेदात=एका वेदात; वेदांत=अनेक वेदांमध्ये --वाचक्नवी

अनुस्वार

>>लावुनिया बाबा गेलां

सहमत आहे. या अनुस्वारासारखाच आवश्यक अनुस्वार 'मीं सांगितले' यात मी वर आहे. पन तो नव्या (माझ्या लहानपासून अस्तित्त्वात असलेल्या) शुद्धलेखनात नाही.
त्यामुळे मी (अनुस्वाररहित) सांगितले पेक्षा 'मीनी सांगितले' हे जास्त शुद्ध आहे.
(म्या केले - मया कृतं हे मी केले पेक्षा जास्त शुद्ध आहे का?)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अपूर्ण काळ हे 'निश्चित'काळ असतात.

अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ वगैरे निश्चित घडणार्‍या घटनेची माहिती देत असतात.
मी शाळेला जाते./मी शाळेला जात नाही-- साधे विधान दर्शवणारा साधा वर्तमान काळ/भूतकाळ.
मी (नेहमीच)शाळेला जात असते/नसते. --रीति वर्तमान काळ.
मी शाळेला जात आहे./जात नाही आहे. -- अपूर्ण वर्तमान काळ. अर्थ : या घटकेला मी (निश्चित) शाळेला जात आहे/नाही(आहे).
अवांतर : मी शाळेत जाते, या वाक्याला मी शाळेच्या इमारतीत जाते, असाही एक अर्थ आहे. तो अर्थ ’मी शाळेला जाते’ला नसावा.
तसेच भूतकाळाची रूपे : मी (नक्की)शाळेला जात (नाही होते)नव्हते.
भविष्यकाळात : मी (नक्की)शाळेला जात (नाही असेन)नसेन.
थोडक्यात काय तर होणे/असणेची रूपे लावल्याखेरीज नकारार्थी अपूर्णकाळी वाक्यांत निश्चितपणा येत नाही.
--वाचक्‍नवी

विवक्षित ठिकाण या मित्राशी गप्पा होत्या. (२/३)

अरे वा, वरच्या तीनपैकी दोन वाक्य मी जशीच्या तशी दुसरीकडे लिहीली होती. मित्राशी केलेल्या गप्पांवरून व्याकरणासंबंधी एवढी घनगंभीर चर्चा झडू शकते असं तेव्हा अजिबातच वाटलं नव्हतं. असण्याचा एवढा बाऊ होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही हो मला!!

मराठीवर हिंदीचा प्रभाव

इकडे इंदूरमध्ये मराठीवर हिंदीचा प्रभाव असल्याने असे 'नाही आहे' प्रयोग नैमित्तिक आहेत. लिखाणातही ते उतरतात. इतकेच नाही, तर 'खूब सारे' च्या धर्तीवर 'खूप सारे' असा नव्या पद्दतीचा शब्दसमूहही वापरात आहे. 'खूप सारे लोक आले होते.' बरेच हा शब्द तुलनेने वापरात नाही. वाक्यरचनाही अनेकदा हिंदीच्या चालीवरच होते. त्यामुळे अनेकदा क्रियापद वाक्याच्या मध्ये येते. 'मैं वहॉं गया नहीं' हे 'मी तिथे गेलो नाही. 'तू मला सांगितलेलं नाही समजलं' अशी अनेक वाक्ये सर्रास ऐकू येतात.

भाषेची साजरी रूपे इथे आणि इथे पहा.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

बापरे

मी पूर्वजन्मात इंदुरी होते की काय अशी शंका आली! (ह. घ्या.)
कारण वर दिलेले तू मला सांगितलेलं नाही समजलं अशी वाक्यरचना चुकीची आहे, हेच मला माहिती नव्हते!
असो.
खूप सारे अलिकडची तरूण पिढी (पुण्यातील) वापरताना ऐकले आहे.

समजले नाही आणि नाही समजले

(१)तू मला सांगितलेलं नाही समजलं (नाहीवर आघात). आणि, (२)तू मला सांगितलेलं समजलं नाही. (आघात नाही).
दोन्ही वाक्ये व्याकरणदृष्ट्या बरोबर आहेत, पण ती समानार्थी नाहीत.
पहिल्या वाक्यात 'नाही'वर जोर असल्याने 'मला नाही समजलं, काय म्हणणं आहे? आधी सांगताना घोटाळा केलास, त्यातून टीव्हीचा मोठा आवाज, कसं समजणार?' हा आविर्भाव!
दुसरे वाक्य साधे. 'तू मला सांगितलंस खरे, पण मला ते नीट समजलं नाही; पुन्हा सांगशील? तू सांगत होतीस तेव्हा किनई, माझं लक्ष भलतीकडेच होतं.' अशा अर्थाची गोड सारवासारव.
पूर्वजन्मी इंदुरी होतां की नव्हतां, ते महत्त्वाचे नाही. पण जर या जन्मी असलांत तर मात्र, पहिल्या तर्‍हेचेच वाक्य बोलावे लागणार. पण जर इंदुरी नसालच, तर महाराष्ट्रात दोन्ही वाक्ये वेगवेगळ्या अर्थच्छटांसाठी वापरायला मोकळ्या.--वाचक्नवी

नाही आणि नाही आहे.

१. तुझे मित्र/मैत्रिणी कुठे जाऊन काय करतात याची जबाबदारी तुझ्यावर नक्कीच नाही. (त्रिकालाबाधित सत्य. जबाबदारी आज नाही, उद्या नाही आणि कालही नव्हती.)
२. तुझे मित्र/मैत्रिणी कुठे जाऊन काय करतात याची जबाबदारी तुझ्यावर नक्कीच नाही आहे.(निदान आजतरी नाही, कदाचित उद्या असू शकेल.)
'आहे' हा शब्द विधानाची कालमर्यादा(व्हॅलिडिटी) स्पष्ट करतो. --वाचक्नवी

 
^ वर