ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट

अठराव्या शतकात कधीतरी औद्य़ोगिक क्रांती झाली आणि तेव्हापासून जग काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माणसाने भरमसाठ जंगलतोड, वारेमाप ऊर्जावापर, बेसुमार प्रदूषण करून रम्य निसर्गाचे राडे करून ठेवलेले आहेत. त्यात गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, रासायनिक उत्पादन, कृत्रिम पदार्थ यामुळे निसर्गाशी नातं तुटलेलं आहे. आणि आता तर ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचं अस्तित्वच त्याने धोक्यात आणलं आहे.

हे झालं पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवजातीचं चित्र. अर्थातच अतिरंजित आहे, पण त्यात तथ्यही नाही असं नाही. यावर उपाय काय? तर एक उपाय असा सांगितला जातो की ऊर्जेचा वापर करून आपण जो कार्बन डाय ऑक्साइड (याला सुटसुटीतपणे कार्बन म्हणण्याची आजकाल प्रथा आहे, ती मी पाळेन - न चा पाय मोडून.) निर्माण करतो, त्यामुळे हे सर्व होतं. तेव्हा काहीही करून कार्बन् कमी केला पाहिजे. त्यासाठी ऊर्जावापर कमी केला पाहिजे. शहरीकरणात रम्य बालपण हरवलेल्या, कॉंक्रीटच्या जंगलात घुसमटणाऱ्या व आपण आपली मुळं विसरलो अशी अपराधी भावना असणाऱ्या आपल्या मनाला हे चटकन पटतं, आकर्षक वाटतं. पण हे खरं उत्तर आहे का? त्यासाठी आपल्याला काही गणितं करून अधिक चांगलं उत्तर सापडतंय का हे पाहावं लागेल.

सुरूवातीला काही आकडेवारी. या पृथ्वीवर सुमारे ६.७ अब्ज लोक राहातात. ते सगळे मिळून सुमारे वीस टेरावॉट ऊर्जा सतत वापरत असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दरडोई हजार वॉट (एक किलोवॉट) पॉवरचे तीन दिवे दिवसरात्र सतत ढाणढाण जाळत असण्याइतकी ऊर्जा वापरतात. त्यात अर्थातच विद्युत ऊर्जेचा भाग किती आहे हा प्रश्न उत्तर द्यायला कठीण आहे. कारण मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापर हा वाहतूक व उत्पादनासाठी होतो. हिशोबाच्या सोयीसाठी एक तृतियांश ऊर्जा ही विद्युत स्वरूपात किंवा विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी खर्च होते असं धरूया. जर थोडे वेगळे आकडे असले तर या गणिताच्या आकडेस्वरूपातल्या उत्तरात फरक पडेल, पण संकल्पनेत फारसा फरक पडणार नाही असं वाटतं. जर कोणी अधिक अचूक आकडेवारी दिली तर मी ती गणितात व उत्तरात समाविष्ट करेन. नाहीतर येणाऱ्या उत्तराची एरर मार्जिन जास्त गृहित धरून आपण निष्कर्ष काढू. विद्युत ऊर्जेचा वापर आपण दरडोई सरासरी (सुमारे) एक किलोवॉट इतका करतो. म्हणजे दरडोई दर ताशी एक युनिट. आता तुम्ही म्हणाल की आमचं बिल तर तेवढं येत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे, विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी ही संपूर्ण ऊर्जा आहे. त्यात ही सगळ्या जगाची सरासरी आहे, व इतर प्रगत देश भारताच्या कितीतरी पट अधिक वीज करतात. शिवाय काही भाग अप्रत्यक्षपणे उत्पादनासाठी वापरलेल्या विद्युत ऊर्जेत सामावलेला आहे.

प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी ही ऊर्जा वाचवणं हा प्रभावी उपाय आहे का? वर्षात ३६५ * २४ = ८७६० तास असतात. जगातल्या सर्वांनी तासभर ऊर्जा वापरली नाही, तरी दशसहस्रांशापेक्षा फार जास्त फरक पडणार नाही. त्यात पुन्हा उत्पादनाची ऊर्जा त्यात नाहीच - त्यामुळे तो परिणाम त्याहूनही कमी. आणि हे फक्त विजेचं - तेल, पेट्रोल वाचवण्यासाठी तुम्हाला प्रवासही कमी करावा लागणार. म्हणजे एक तास वीज वाचवली तर २० टेरावॉट सतत वापरल्याऐवजी १९.९९९५ टेरावॉट सतत वापरल्याप्रमाणे आहे... हेही सर्वांनी केलं तरच.

असल्या दशसहस्रांश वा लक्षांश टेरावॉटच्या मागे लागण्याऐवजी एक आख्खा टेरावॉट जर वाचवता आला तर? आणि तेही फारसे कष्ट न घेता?

तसा उपाय आहे. तो सर्वांना माहीतही आहे, पण आपल्याला त्याचं गणित माहीत नसल्याने तो किती प्रभावी आहे याची आपल्याला कल्पना येत नाही.

सर्वांनी झाडं लावावीत. पण किती?

एक झाड लावल्याने किती फरक पडू शकतो? याचं उत्तर आहे की सौ सोनार की, एक लुहार की या म्हणीत! मनुष्य सोनाराच्या दोन वर्षाच्या मुलाच्या खेळण्यातल्या हातोडीप्रमाणे २० टेरावॉटचे टक टक करत असतो. तर त्याच वेळी सूर्य आपल्या प्रचंड घणाने १,७४,००० टेरावॉटचे घाव घालत राहातो. ग्लोबल वॉर्मिंग होतं ते मुख्यत्वे सूर्यामुळे असं म्हटलं तर त्यात काही गैर नसावं. सौर ऊर्जा म्हटली की आपल्याला महाग सोलर पॅनेल वगैरे डोळ्यासमोर येतात. पण सूर्यप्रकाश शोषून घेऊन ती ऊर्जा साठवून ठेवणारी अत्यंत स्वस्त 'यंत्रं' आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत. आसपास असलेल्या झाडांमध्ये शेकडो टेरावॉट शोषले जात असतात. त्यातले अजून काही शोषले गेले तर त्याचा दुप्पट ते तिप्पट फायदा होईल. एक म्हणजे, उष्णता रासायनिक ऊर्जेत शोषली गेल्याने पृथ्वी तापणं कमी होईल. दुसरं म्हणजे घरं गार करण्यासाठी जी त्याहून अधिक ऊर्जा लागते ती वापरणं कमी होईल. तिसरं म्हणजे झाडं कार्बन् शोषून घेतील, त्यामुळे भविष्यातलं ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. तर प्रश्न असा आहे की एक टेरावॉट वीज वाचवण्याचा परिणाम साधण्यासाठी प्रत्येकी किती किंवा (किती शे) झाडं लावावी लागतील?

सुर्याची पृथ्वीवर पडणाऱ्या ऊर्जेचा आपण साधारण अंदाज करू. सूर्य भर माथ्यावर असताना ती प्रत्येक स्क्वेअर मीटरला सुमारे १४०० वॉट असते. पण अर्थातच चोवीस तास ती कायम नसते, त्यामुळे बारा तास सूर्यप्रकाश गृहित धरला तर त्याचं उत्तर सुमारे साडेतीनशे वॉट इतकी येईल. पावसाळ्यात ती कमी असते वगैरे गोष्टी गृहीत धरल्या तरी ते उत्तर साधारण २५० वॉट इतकं येतं. तुम्ही जर १ स्क्वेअर मीटर इतका सूर्यप्रकाश शोषून घेतला तर तुमचा किमान २५० वॉटचा फायदा होतो. पण तो तिथेच थांबत नाही. जर ती उष्णता घरात येण्यापासून वाचवलीत तर तुम्हाला घर थंड करण्यासाठी एसी, पंखा यासाठी तितकीच कमी ऊर्जा वापरावी लागेल. घर जर थंड राहिलं, तर तुमचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा वापर करणारा फ्रिज अधिक कार्यक्षमपणे चालतो. त्यामुळे तेवढी विद्युत निर्मितीसाठी कोळसा व तेल जाळणं वाचेल. १ युनिट वीज निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतली इनएफिशियन्सी, ट्रान्समिशन लॉसेस वगैरे लक्षात घेतले तर सुमारे ५ युनिटचा कोळसा किंवा तेल लागतं. याचा अर्थ २५० वॉटमुळे तुम्ही सुमारे १२५० वॉटइतकी अधिक शक्ती वाचवाल. म्हणजे होणारा परिणाम हा जवळपास सव्वा किलोवॉटइतकी ऊर्जा न जाळण्याने होईल इतका असेल. आणि हे तासाभरापुरतं नाही, तर जोपर्यंत तुम्ही ती झाडं जगवाल तोपर्यंत दर तासाला १.२५ युनिट इतकी बचत होईल. आधी सांगितलेल्या गणिताप्रमाणे, जर जगातल्या प्रत्येकाने दरडोई १ स्क्वेअर मीटर इतकी ऊर्जा शोषून घेतली व तीमुळे वीज वाचली तर सुमारे नऊ टेरावॉट इतकी ऊर्जा वाचेल.

प्रथमदर्शनी या गणितात घोळ वाटतो. पुन्हा पुन्हा वाचून बघितलं तरी नक्की काय यावर बोट ठेवता येत नाही. थंड करण्याची ऊर्जा वाचवून आपण वापरतो तितकी सगळीच ऊर्जा कशी वाचेल? पण चूक तर काही काढता येत नाही. घासकडव्यांनी काही तरी गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं वाटतं. उत्तम. हे गणित थोडं गंडलेलं आहे, त्याचं खरं उत्तर मी तुम्हाला सांगेन. फक्त त्यापूर्वी एवढंच म्हणेन की हाच सुधृढ शंकाखोरपणा पर्यावरणवादी जेव्हा काहीतरी गणित करून सांगतील तेव्हाही ठेवा. दुर्दैवाने आपल्याला गाळीव आकडेच मिळतात, ते आकडे जितक्या काटेकोरपणे तपासले जावेत तितके जात नाहीत. ते खोटे नसतात, पण त्यातली गृहितकं फाईन प्रिंटमध्ये राहातात. पुढच्या काही लेखात पर्यावरणवाद्यांच्या असल्या गंडलेल्या गृहितकांच्या गणितांवर प्रकाश टाकता येईल का बघीन.

यात गंडलेला भाग आहे तो तुम्ही २५० वॉटची उष्णता कमी केलीत तर तितकीच वीज थंड करण्यासाठी वाचेल या गृहितकात. घर थंड करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही तितकीशी वाचत नाही - कारण ती विशिष्ट महिन्यांतच व विशिष्ट प्रदेशातच लागू असते. म्हणजे या आकड्याला सरळसरळ दहा पटीने भागावं लागतं. तरी सुमारे एक टेरावॉट उरतोच. तो खोटा नाही. या गणितातल्या त्रुटी दाखवून कोणी हा १ टेरावॉट नसून ०.१ टेरावॉट आहे असं सिद्ध करून दाखवलं तरी ०.१ टेरावॉट म्हणजे १०० गिगावॉट हे लक्षात घ्या. पन्नास कोयना प्रकल्प. कायमचे बंद. १ टेरावॉट आकडा जर बरोबर असेल तर सुमारे पाचशे कोयना प्रकल्प. कायमचे बंद.

आता तुम्ही म्हणाल की आम्ही शहरवासीय, आम्ही कुठून इतकी झाडं लावणार. तर ते तितकं बरोबर नाही. आपल्या प्रत्येक घरांना खिडक्या असतात, भिंती असतात. पुण्यात तर सर्व खिडक्यांना, ग्यालऱ्यांना ग्रिल लावण्याची सर्रास पद्धत आहे. या सर्व ठिकाणी आपल्याला मनीप्लॅंट वगैरेसारख्या वेली चढवून देता येतात. (कुठचे वेल चढवायचे याबाबत मला फारशी माहिती नाही. पण ती माहिती शोधण्यासारखी आहे) एक स्क्वेअर मीटर खऱ्या अर्थाने करण्यासाठी उभे सुमारे अडीच ते तीन स्क्वेअर मीटर करावे लागतात. (पूर्वाभिमुखी खिडक्यांना निम्माच वेळ पूर्ण सूर्यप्रकाश मिळतो, त्यात उभ्याचा फ्याक्टर वगैरे धरून...) पण जर सर्व खिडक्यांवर वेल चढवले तर पाच ते दहा स्क्वेअर मीटर अगदी अशक्य नाही. हा उपाय घरी करता येईल त्याहीपेक्षा अधिक परिणामकारकपणे वेगवेगळ्या ऑफिस बिल्डिंगींमध्ये करता येईल. अनेक कंपन्यांमध्ये दिवसभर एसी असतो. तसंच सद्यस्थितीत अनेक कंपन्याना आपली हिरवी प्रतिमाही सादर करण्याची इच्छा आहे. संपूर्ण बिल्डिंगसाठी लागणारा एसीचा खर्च व ऊर्जा यामुळे कितीतरी प्रमाणात कमी करता येईल. तुमच्या कंपनीत चौकशी करून बघा. तुमच्या बिल्डिंगला जर गच्ची असेल तर तिला वेलींचा मांडव घालून घेता येईल का याचा विचार करा, विशेषत: तुम्ही जर सर्वात वरच्या मजल्यावर राहात असाल तर.

वेली, झाडं लावण्याने नुसताच एक टेरावॉट वाचेल असं नाही, हिरवाईने वेढलेलं घर असण्यातनं जी प्रसन्नता मिळते तिची किंमत कुठच्याच एककात करता येत नाही हेही आहेच. इतकंच नाही तर ते एक प्रतीकदेखील आहे. दिवाळीत आपण पेटवलेल्या ज्योतीप्रमाणे ती हिरवी ज्योत सतत पेटती राहाते. आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना त्याविषयी सांगता येतं. यातूनच सकारात्मक लोकशिक्षण होतं. आपल्या घरी आलेल्यांना उत्साहाने सांगता येतं - एक स्क्वेअर मीटरची पानं फुलवा. तो एक सकारात्मक कार्यक्रम होतो. आणि ज्योतीने ज्योत पेटवता येते. प्रतीकं ही त्या प्रश्नाचा अर्क असणारी, कायम फुलणारी, काहीतरी हाताला लागणारी, डोळ्याला दिसणारी असावीत असं मला वाटतं. गांधींनी असहकार चळवळ पुकारली. ही मूलत: नकारात्मक चळवळ होती. पण त्यांनी त्या चळवळीचं प्रतीक निवडलं ते म्हणजे मीठ. त्यांनी लोकांना मीठ खाऊ नका असं सांगितलं नाही (तसं सांगणं खरं तर गांधींच्या अतिरेकी कठोर आत्मनकारी मनोवृत्तीला अधिक भावलं असतं तरीही...). ते शेकडो किलोमीटर चालत गेले, आणि समुद्रावर जाऊन त्यांनी मीठ बनवलं. एक दिवस मीठ न खाऊन जितकं लोकशिक्षण झालं असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शिक्षण लाखो लोकांनी एकाच वेळी मीठ बनवण्याने झालं.

पहिल्या परिच्छेदात पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवाचं 'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं. पण त्याचबरोबर एवढं लक्षात घेतलं पाहिजे की गेली साडेचार अब्ज वर्षांच्या पृथ्वीच्या आयुष्यात तिची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. मनुष्य आत्ता आत्ता तिची काळजी घेण्याचा विचार देखील करू लागला आहे. ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. पण अजून मनुष्याची शक्ती - साधक व बाधक दोन्ही, मर्यादितच आहे. जेव्हा मनुष्यजात आपल्या सर्व जीवघेण्या प्रश्नातून मुक्त होईल तेव्हा पर्यावरणाचा नक्कीच विचार करेल. दहा अब्ज सक्षम, सुशिक्षित, समृद्ध लोक काय करू शकत नाहीत? आपल्या मध्यमवर्गीय घरात वेल लावणं आपल्याला काहीच वाटत नाही. ते प्रत्येक घरटी करणं शक्य आहे. पण हा प्रश्न एकदाचा कायमचा धसाला लावण्यासाठी गरज आहे ती म्हणजे सहारा, गोबी, थर वाळवंटात नवीन वृक्षराजी लावून त्यांचं नंदनवन करण्याचा. तसं झालं तर वर्षाला हजारो टेरावॉटचा कार्बन् शोषला जाईल. ते अशक्य नाही. त्यासाठी पैसा पाहिजे, शक्ती पाहिजे, ऊर्जा पाहिजे. पण जोपर्यंत आपल्याच घरात रोगराई, निरक्षरता, बालमृत्यू, अन्याय, गरीबी, भ्रष्टाचार, सामाजिक शोषण, बालकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत हा पैसा व शक्ती झाडं लावण्यात खर्च करता येणार नाही हे वास्तव आहे. पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आधी हे प्रश्न सोडवावे लागतील. अगदी पूर्णपणे नाही, पण निदान अमेरिकेत आत्ता ज्या पातळीपर्यंत सोडवले गेले आहेत तिथपर्यंत तरी. त्यासाठी या बाबतीत मागे असलेल्या भारत, चीन, आफ्रिकन राष्ट्रांनी तरी आधुनिकीकरण करून अधिकाधिक शिक्षण, आरोग्य व समृद्धी यावर भर दिला पाहिजे. जेव्हा सर्व जग आत्ताच्या अमेरिकेइतकं समृद्ध होईल तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न हातात घेता येईल. हा दिवस दूर नाही. गेल्या तीस वर्षातला विकासाचा दर बघितला तर जगाची नव्वद टक्के लोकसंख्या त्या पातळीवर जायला अजून फारतर ५०-७५ वर्षं लागतील. तोवर आपल्याला जमेल तितकं व्यक्तिगत पातळीवर करत राहाणं व ही हिरवी ज्योत जिवंत ठेवणं हेच आपल्या हाती आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

वृक्षारोपण-शिक्षण-आरोग्य: सहमत. २५० वॉटचे झाड? "भरी"चे मोजमाप?

झाडाची सौर पावर-शोषण सरासरी २५० वॉट असल्याचे गणित वर दिलेले आहे.

ऊर्जेची राशी ही बदलत नसल्यामुळे (कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी) ही सर्व शोषलेली ऊर्जा रासायनिक ऊर्जेत परिवर्तित होत असावी. (असे होत नसल्यास "ऊर्जा शोषली" या शब्दाचा अर्थ कळत नाही.) दर ४.२ कॅलरी शोषलेल्या ऊर्जेतून ~१ग्रॅम ग्लूकोज/सेल्युलोज/लिग्निन/लाकूड हे पदार्थ तयार होतात (लाकडाचे "सुके" वजन).

लेखात सांगितल्याप्रमाणे साधारण झाड जर ६ वर्षे जिवंत राहिले, तर
२५०*२४*३६५.२५*६ = १३१४९००० वॉट-तास इतकी ऊर्जा शोषतील.
म्हणजे ३१३०.७०४ किलो सुकलेले वजन असलेले लाकूड तयार होईल. झाडातील पाण्याचा अंश साधारणपणे ५०% असतो. म्हणजे या झाडाचे पूर्ण वजन ~६२०० किलो = ~६ मेट्रिक टन इतके असेल.

येथे झाडांचे वजन आणि त्यांचे आकारमान यांच्याबद्दल गणित दिसेल :
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2140927/pdf/725.pdf
(या अहवालात अमेरिकेतली aspen, bitternut, hickory, oak, ash, maple, cedar, hornbeam, and beech झाडे - बर्‍याच प्रकारची झाडे अभ्यासली आहेत. ही झाडे आंबा-फणस बगैरे झाडांच्या इतकी मोठी असतात.)

६ वर्षांत वाढलेले ६ टनांचे झाड शक्य असेल... खरेच? (साधारणपणे वृक्षारोपित झाडांचे वजन १०-१५ वर्षांत शेकडो किलो असते, हजारो किलो नव्हे.) तरी हे शक्य आहे, असे मानूया.

सहा (किंवा कितीका) वर्षांनी ते झाड मेल्यावरती, ही सर्व शोषलेली ऊर्जा कुठे जाईल - हा प्रश्न उद्भवतो. नाहिशी तर होणार नाही. मेलेल्या झाडाने मुक्त केलेली ऊर्जा शोषून घ्यायला एक झाड, आणि सौर ऊर्जा शोषून घ्यायला एक झाड, अशी त्यानंतर दोन झाडे लावावी लागतील.

म्हणजे हा टेरावॉट स्थायी स्वरूपात वाचवण्यासाठी पहिल्या वर्षी मला १ झाड लावावे लागेल, सहाव्या वर्षी २ झाडे लावावी लागतील, बाराव्या वर्षी चार झाडे लावावी लागतील, (बुद्धिबळाच्या पटाच्या एका चौकोनावर तांदळाचा एक दाणा, पुढच्या चौकोनावर दोन दाणे, पुढच्यावर चार... असे करता करता पट पूर्ण करण्यासाठी जगातले तांदूळ पुरणार नाहीत - हे गणित आपण सर्वांनी शाळेत केलेलेच असेल.)

झाडे लावली पाहिजेत, हा लेखातील मुद्दा पटतो आहे. पण ऊर्जेचे गणित काही केल्या लक्षात येत नाही आहे.

(दिवसा शोषलेली ऊर्जा काही प्रमाणात रात्री जाळून झाडे पुन्हा वातावरणात पसरवतात. बाकी रासायनिक ऊर्जा तेवढी झाडाचे वस्तुमान वाढवते. झाडे वस्तुमानाने वाढत नसली, तर "नेट" ऊर्जा मुळीच शोषली जात नसते. ऊर्जेच्या गणितामध्ये हे मुद्दे न आल्यामुळे काही हिशोब चुकले असतील का? अशी शंका येते आहे.)

- - -
झाडाने शोषलेल्या रासायनिक ऊर्जेचे गणित : आणखी एक उपयुक्त पीडीएफ दुवा. येथील गणित ठीक असेल, तर सामान्य वृक्षारोपणाची झाडे सरासरी २ वॉट सौर पॉवर शोषतात. (२४० वॉट नव्हे.) आणि झाड मेल्यावर ती सर्व ऊर्जा वातावरणात परतण्याचा मुद्दा बदलत नाही.
- - -

भारत, चीन, आफ्रिकन राष्ट्रांनी तरी आधुनिकीकरण करून अधिकाधिक शिक्षण, आरोग्य व समृद्धी यावर भर दिला पाहिजे.

सहमत.

("भर" म्हणजे अंदाजपत्रकाच्या/जीडीपीच्या किती टक्के? "समृद्धी" हे अंदाजपत्रकीय खाते नाही, मात्र शिक्षण आणि आरोग्य ही खाती आहेत. या खात्यांवर अंदाजपत्रकांत १००%, ८०%, ५०%...५%... नेमका किती खर्च केला तर "भर दिला" असे आपल्याला म्हणता येईल? याची योग्यता कशी ठरवावी? जर या दोन-तीन खात्यांवर १००% पेक्षा कमी खर्च अंदाजपत्रकात असला, तर उरलेल्यापैकी काही ऐवज पर्यावरणावर खर्च केल्यास हरकत नाही ना? पर्यावरणाच्या बाबतीत सुयोग्य हलका भर असलेली जीडीपीची टक्केवारी किती? ०.००१%, ०.०१%, ०.१%, १%, १०%... याची योग्यता कशी ठरवावी? हल्ली पर्यावरणावरती जीडीपीची किती टक्केवारी खर्च होते आहे?)

लेखाच्या एका भागात आकडे देऊन गणित दिलेले आहे, तर पुढच्या भागात आकडे नसलेली विधाने आहेत. त्यामुळेसुद्धा लेखाचा हा भाग समजायला मला कठिण जातो आहे.

शोषली जाणे म्हणजे काय?

धनंजय यांनी जे गणित सांगितलं आहे ते बरोबर आहे. सर्वसाधारण वेली, झाडं उष्णता शोषून त्याचं लाकडामध्ये किंवा बायोमासमध्ये रूपांतर करण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. पानांवर पडणारी बरीच उष्णता परावर्तितच होते याबद्दल वाद नाही. माझ्या लेखात मी 'शोषली जाणं' हा शब्दप्रयोग वापरून या गोंधळात भर टाकली याबद्दल क्षमस्व.

याचा अर्थ माझं गणित चुकलं असा नाही. २५० वॅटचं जे गणित आहे, ते उष्णता पूर्णपणे झाडात शोषली जाईल यावर आधारित नाही.
ती उष्णता घरात येणार नाही यावर ते आधारित आहे. प्रत्यक्ष सूर्याची इन्सिडेंट शक्ती कमी करून, अथवा शोषून घेऊन ग्लोबल वार्मिंग करण्याची ही पद्धत नाही. पावणेदोन लाखात एकाने काही फरक पडत नाही. पण घरात येणाऱ्या उष्णतेमुळे तिचा प्रतिकार करण्यासाठी मनुष्य जी वीज वापरतो ती कमी करण्याची ही पद्धत आहे. ती वीज कमी झाली की त्यासाठी इंधनं जळणं कमी होईल, व त्यायोगे वातावरणात जाणारा कार्बन् कमी होईल - अशा आडवळणी मार्गाने हा उपाय जातो.

या विशिष्ट मार्गात ती उष्णता झाडात शोषली किंवा परावर्तित झाली याने फरक पडत नाही. हाच परिणाम झाडांऐवजी परावर्तक पडदे लावल्यानेही होईल. पण मग ते खूपच तांत्रिक,कृत्रिम उत्तर होईल, व अशी बिनहिरवी उत्तरं समाजमनाला तितकीशी भावत नाहीत. :)

मात्र जागतिक पातळीवर ग्लोबल वार्मिंग कमी करायचं असेल तर तेसुद्धा सूर्याची उष्णता नुसती शोषून घेऊन साधणार नाही. हवेतला कार्बन् शोषणारी झाडे लावायची व त्यायोगे ग्रीनहाऊस परिणाम कमी करायचा व अधिक उष्णता अवकाशात परावर्तित करायची हे उत्तर आहे. मी दिलेला घरगुती उपाय हा त्याच धर्तीचा पण थोड्या भिन्न प्रकारचा आहे. कार्बन् चक्रावर प्रत्यक्ष परिणाम होऊन परावर्तन वाढवण्याऐवजी, परावर्तन करून, वीज खाणाऱ्या जागा अधिक एफिशियंट बनवाव्या व त्यायोगे ऊर्जावापर कमी, व त्यायोगे थोडा कार्बन् कमी करणे असा.

पर्यावरणासारख्या क्लिष्ट विषयाची गणितं करणं, त्यामागची गृहितकं समजावून घेणं, त्यांचा योग्य अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढणं किती कठीण असतं हेही या लेखमालेत दाखवून द्यायचं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

समजायला मला कठिण जातो आहे.

समजायला मला कठिण जातो आहे.

लेख समजायला मला कठिण जातो आहे.झाडे लावायाला पर्याय नाही( त्याने )झाडाने शोषलेल्या रासायनिक ऊर्जेचे गणित कसेही असले तरी.याबद्दल कोणी असहमती दाखवणार नाही प्रश्न आहे तो झाडे जगविण्याचा.

महाराष्ट हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.

शैलु.

उर्जा बचतीचा एक मार्ग

(१) खिडकीच्या ग्रिलवर वेल चढवा.
हे अवघड आहे कारण खिडकी ही प्रामुख्याने वारा-उजेड यांकरिता आहे. वेल चढविल्याने दोनही बंद होतील.
(२) गच्चीवर वेलीचा मंडप घाला.
हेही अवघड आहे कारण माती-पाणी याचा प्रश्न उद्भवतो. पण आमच्या घराच्या छपरावर हिरव्या रंगाची जाळी सधारणत: २-३ फूट उंचीवर बांधली आहे. केवळ त्यामुळे दीड टन एसी ऐवजी एक टन एसी पुरतो. उर्जेची भरपूर बचत.
शरद

प्राथमिक हिशोब

लेखात दिलेला हिशोब खूप प्राथमिक स्वरूपाचा आहे असे नाही वाटत? मूळ तत्व म्हणून हे मान्य आहे की झाडे लावल्याने भू ताप वृद्धी कमी होईल. परंतु काही राष्ट्रांनी 80 किंवा 90 टक्के वीज खर्च करायची व बाकी राष्ट्रांनी त्यांना ती करता यावी म्हणून झाडे लावायची हे तितकेसे पटत नाही. माझ्या अमेरिकेतील वास्तव्यात मी तो देश उर्जा कशी वाया घालवतो हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. अमेरिका व युरोप यांनी आपला उर्जा वापर कमी केला तर जगाचे उर्जा गणित सहज सुटेल असे वाटते.
चन्द्रशेखर

बाकी राष्ट्रांनी काही करण्याची गरज नाही...

उपक्रमावरीलच एका चर्चेच्या उत्तरात मी भारत व अमेरिका यांच्या ऊर्जावापरातल्या फरकाचा अंदाज घेऊन म्हटलं होतं की अमेरिकेने एक तासाऐवजी एकसष्ठ मिनिटं दिवे बंद ठेवले तर भारतातल्यांनी तसलं काहीही करण्याची गरज नाही. ऊर्जावापरातली विषमता अतिशय महत्त्वाची आहे. प्रगतीच्या टप्प्यावर अमेरिका सुमारे पन्नास वर्षं पुढे आहे तेव्हा तिने पन्नास वर्षं आधी बंधनं घालून घ्यावी असं माझं मत आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

संदर्भ

अमेरिकेने एक तासाऐवजी एकसष्ठ मिनिटं दिवे बंद ठेवले तर भारतातल्यांनी तसलं काहीही करण्याची गरज नाही.

याचा संदर्भ जर "अर्थ अवर" शी असला तर ते लोकशिक्षण आहे हे आधी पण सांगून झाले आहेच. आणि तो मुद्दा बरोबरच आहे, हे आपणही इतरत्र मान्य केले आहेतच. फरक असेल तर तुमचा म्हणून सकारात्मक मार्ग वेगळा आहे असे आपल्याला म्हणायचे आहे असे जसे आपले म्हणणे आहे आणि त्या संदर्भात झाडं लावणं हे प्रतिक म्हणूनही आपण मानत आहात.

ऊर्जावापरातली विषमता अतिशय महत्त्वाची आहे.

तो भाग महत्वाचा आहेच. येथील सदस्यांच्या माहीतीसाठी म्हणूनच उर्जा वापराचा आलेख परत देतो:

प्रगतीच्या टप्प्यावर अमेरिका सुमारे पन्नास वर्षं पुढे आहे तेव्हा तिने पन्नास वर्षं आधी बंधनं घालून घ्यावी असं माझं मत आहे.

हे अमेरिकेबद्दलच काय सगळ्याच प्रगत राष्ट्रांविषयी हे मत असावे आणि (माझे) आहे. भारत-चीन-ब्राझील-द्.अफ्रिका यांनी देखील प्रगत राष्ट्रांच्या दादागिरीवरून या संदर्भात आवाज उठवला होता. क्योयोटो प्रोटोकोल हा त्याच संदर्भात सुरवात होती. मात्र अमेरिकेने त्याला मान्यता देण्याचे ऐनवेळेस टाळून स्वतःला सांभाळले. कोपनहेगनच्या बाबतीतही फार काही वेगळे झालेले नाही...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

तिकडे

लेख आधी 'तिकडे' प्रसिद्ध केल्यामुळे प्रतिसादही तिकडेच

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हिरवळी विरुद्ध

गवत, वेली, झुडुपे यांचा वातावरणातला कार्बन डॉय ऑक्साईड शोषण्यात काहीच उपयोग होत नाही. याचे कारण नंतर ती कुजतात. या कुजण्यातून परत कार्बन डॉय ऑक्साईड बाहेर पडतो, एवढेच नाही तर मिथेन बाहेर पडतो. जो एक महत्वाचा ग्रीन हाऊस वायु समजला जातो. लावलेली आणि जगवलेली हिरवळ (गवताची/झुडुपांची) ही नुसतीच बिन उपयोगाची नाही तर पाण्यासारखी मौल्यवान गोष्ट खाणारी आहे.

नेचर (?) मधे मी बर्‍याच वर्षांपूर्वी झाडांविरुद्ध असेच काहीसे वाचले होते.

प्रमोद

झाडे उपयोगीच

झाडांचा फायदा
(१) झाडे लावून कार्बन डायॉक्साईड कमी होतोच. या काडॉ.मधील कार्बन आपल्या वाढीकरता वापरून (लाकूड, सेल्युलोज तयार करण्याकरता) झाडे ऑक्सिजन बाहेर फेकतात. वरील प्रक्रिया करतांना झाडे सुर्याची ऊर्जाही वापरतात. झाडे लावणे उपयोगी आहेच.
(२) वाळलेल्या झाडापासून (लाकूड) कुजण्याने मिथेन तयार होत नाही. झाडाचा फारच थोडा भाग ओला राह्तो व त्या पासून मिथेन तयार होण्याचे प्रमाण हे काडॉ. कमी करण्याच्या उपयोगाच्या प्रमाणात दुर्लक्ष करण्याअएवढे कमी आहे.
शरद

झाडे लावा, झाडे जगवा

वगैरे...घोषणेला पाठिंबा. रुक्ष, वैराण पठारापेक्षा हिरवीगार वनराई निदान डोळ्यांना तरी अल्हाददायक आहे.
असे असले तर निव्वळ झाडे लावल्याने काय होईल?झाडे लावण्याचा फायदा तात्पुरत्या स्वरुपात दिसत असला तरी ते काही दूरगामी उत्तर नव्हे.
या पानावर अमेझॉन जंगले, वृक्षतोड आणि शेती या विषयी काही चक्षुर्न्मिलित करणारी वाक्ये आहेत.
ती चुकीची आहेत काय? (An example of Myth Perpetuation: Deforestation of the Amazon Rain Forest greatly contributes to the Greenhouse effect).
याच ठिकाणीसौर ऊर्जेचे गणित आकृतीआधारे दिले आहे.

मग "जाळा... कुजू देऊ नका!"??? अशी घोषणा द्यावी काय?

गणित

याचा अर्थ माझं गणित चुकलं असा नाही. २५० वॅटचं जे गणित आहे, ते उष्णता पूर्णपणे झाडात शोषली जाईल यावर आधारित नाही.
ती उष्णता घरात येणार नाही यावर ते आधारित आहे. प्रत्यक्ष सूर्याची इन्सिडेंट शक्ती कमी करून, अथवा शोषून घेऊन ग्लोबल वार्मिंग करण्याची ही पद्धत नाही. पावणेदोन लाखात एकाने काही फरक पडत नाही. पण घरात येणाऱ्या उष्णतेमुळे तिचा प्रतिकार करण्यासाठी मनुष्य जी वीज वापरतो ती कमी करण्याची ही पद्धत आहे. ती वीज कमी झाली की त्यासाठी इंधनं जळणं कमी होईल, व त्यायोगे वातावरणात जाणारा कार्बन् कमी होईल - अशा आडवळणी मार्गाने हा उपाय जातो.

अगदीच डोक्यावरुन जातयं!
झाडांमुळे गारवा वाढेल आणि त्याच कारणाने आपण उर्जेचा वापर कमी करु.
माझ्या घराच्या मागे आमच्या वाड्यात एक लींबाचे(निम) एक शेवग्याचे तर थोड्या अंतरावर पिंपळाचे झाड आहे तर आम्ही २५०*३=७५० वॅट वाचवतो का?
गणित नाही कळले बुवा.
(गणिताचा मी कच्चा विद्यार्थी आहे क्षमस्व.)

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.

शैलु.

सावलीच्या झाडांचे गणित

येथे कॅलिफोर्नियामध्ये किती वीज वाचू शकेल त्याचा दुवा.
थोडक्यात : प्रत्येक घराजवळ ३ झाडे योग्य दिशेला लावली (कॅलिफिर्नियाभर ५ करोड झाडे), १५ वर्षे वाढू दिली, तर त्यानंतर लावलेल्या झाडांमुळे होणारी वीज-पावर बचत ~७०० मेगावॉट इतकी असेल. म्हणजे दर वृक्षामागे १४ वॉट.

(यू.एस. वनविभागाच्या त्याच संकेतस्थळावरील अन्य दुवे.)

वृक्षामागे किती वॉट...

७०० मेगावॉटची वीज निर्माण करायला त्याच्या सुमारे चार ते पाचपट ऊर्जेचा कोळसा किंवा तेल जाळावं लागतं. तेव्हा ते गणित घरटी २०० वॉटच्या आसपास येतं. हे केवळ झाडाच्या सावलीमुळे. ३००० ते ३५०० मेगावॉटच्या कोळशाची बचत ही दीड कोटी घरांमधनं. जगात दीड अब्जाच्या आसपास घरं आहेत. किमान १०० गिगावॉट इथेच झाले.

आधीच्या प्रतिसादात विचारलं आहे की आम्ही ७५० वॉट वाचवतो का? तर त्याचं उत्तर वरील गणितानुसार २०० च्या आसपास आहे - हो तुम्ही २०० वॉट इतक्या पॉवरचा कोळसा वाचवता. तुम्ही घरात एसी बसवला आहे का? तुम्हाला तो एसी लावण्याची गरज नाही, यातच ती बचत आली.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

दांडीयात्रा उपमेबद्दल विचारणा

गांधींनी असहकार चळवळ पुकारली. ही मूलत: नकारात्मक चळवळ होती. पण त्यांनी त्या चळवळीचं प्रतीक निवडलं ते म्हणजे मीठ. त्यांनी लोकांना मीठ खाऊ नका असं सांगितलं नाही (तसं सांगणं खरं तर गांधींच्या अतिरेकी कठोर आत्मनकारी मनोवृत्तीला अधिक भावलं असतं तरीही...).

या उपमेबद्दल विचारणा आहे.
मीठ बनवण्याची सकारात्मक चळवळ यशस्वी झाली होती का? त्याच्या यशाचे काही निकष काय आहेत?
निकष १. ब्रिटिश सरकारने मिठावरचा कर हटवणे. (तथ्य : हटवला नाही.)
निकष २. लोकांनी कर लादलेल्या मिठाऐवजी स्थायी स्वरूपात स्वतः मिठाचे उत्पादन सुरू करणे. (तथ्य : बहुधा असे नसावे. माझ्या ओळखीचे त्या पिढीतले लोक मीठ विकत अणत. स्वतः बनवत नव्हते - असा काही उल्लेख कधी आला नाही. "चुलत-चुलत" आजे-आज्या धरल्या तर माझ्या सँपलमध्ये सत्याग्रही लोकसुद्धा होते.)
निकष ३. जनजागृती होणे. जनजागृती झाली खरी. मला असे वाटते की गांधींच्या कुठल्याशा चळवळीमध्ये "विदेशी कपडे वापरू नका" वगैरे "नकारात्मक" मुद्देही होते. [बाकी "सकारात्मक" आणि "नकारात्मक" हे कसे ठरवायचे, हा प्रश्नच आहे, म्हणा."अमुक अयोग्य कृती नको" असे शब्द असलेले "नकारात्मक" मुद्दे आणि "अमुक सुयोग्य कृती हवी" असे म्हणणारे "सकारात्मक" असे कामचलाऊ वर्गीकरण करूया.] चळवळीमध्ये सकारात्मक-नकारात्मक दोन्ही प्रकारच्या सांकेतिक कृतींचे मिश्रण होते. लोकांनी सकारात्मक मीठ स्व-उत्पादन स्थायी स्वरूपात केले नाही. तसेच विदेशी कपडेही वापरतच गेले. दोन्ही संकेत केवळ संकेत म्हणून.

चळवळीने लोकजागृती झाली हे निर्विवाद. मात्र ती "सकारात्मक" मुद्द्यांनी किती झाली, आणि "नकारात्मक" मुद्द्यांनी किती झाली. याचे पृथक्करण करणे शक्य आहे काय?

म्हणून ही ऐतिहासिक उपमा मला समजलेली नाही.

- - -

वृक्षारोपण झाले पाहिजे, या लेखातील मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे. मात्र लेखाची तार्किक चौकट मला पटलेली नाही.

लेखामधून असे काहीसे प्रतीत होते :
लेखकाला वाटते की "वीज/इंधन कमी वापरा" असे "नकारात्मक" बोलणारे लोक "झाडे लावा", "मुलांना शिक्षण द्या", "आरोग्य सुधारा" अशा सकारात्मक प्रक्रियेच्या विरुद्ध आहेत.
म्हणून का काय लेखकाच्या मते "झाडे लावा" हा मुद्दा पटवला तर "इंधन वाचवा" या भंपक नकारात्मक मुद्द्याचे खंडन होते.

वस्तुतः "इंधन वाचवा" आणि "झाडे लावा" आणि "शिक्षण-आरोग्य सुधारा" असे एकाच वेळी पटलेले लोक काही प्रमाणात तरी अस्तित्वात असावे. मला बरेच भेटलेले आहेत. हे लोक [म्हणजे मीसुद्धा] भ्रमात आहेत का? या सर्व गोष्टी एकाच वेळी करता येत नाहीत असे काही आहे का?
जर शिक्षण+आरोग्य = १००% राष्ट्रीय उत्पन्न
असे असते, तर "सर्व गोष्टी एकत्र करा" असे माझे म्हणणे भ्रमिष्टपणा होय. कारण उत्पन्नाच्या १००%हून अधिक खर्च शक्य नाही. (अंदाजपत्रकीय तूट ही चलनफुगवट्याने भरून काढली जाते - १००%च्या हिशोबाचे गणित अबाधित राहाते.)
मात्र असे समीकरण यू.एस. किंवा भारत या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे तथ्यवर्णन नाही. म्हणून माझ्यासारख्यांच्या विचारांचा भ्रम मला अजून समजलेला नाही. किंवा माझ्यासारखे नगण्य अल्पसंख्याकांत असू, तर तशी आकडेवारी मिळाली तरी चालेल. तशी लेखकाची कल्पना असू शकते :

लेखक म्हणतात :

पहिल्या परिच्छेदात पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवाचं 'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं.

अरेरे. "पर्यावरणवादी=माणूसद्वेष्टे" हे असेच अनुभव लेखकाला आलेले आहेत का? किंवा माणूसद्वेष्ट्या पर्यावरणवाद्यांची टक्केवारी इतकी जास्त आहे, की नगण्य टक्केवारीच्या मनुष्यप्रेमी पर्यावरणवाद्यांचा लेखामध्ये उल्लेख न केल्यास चालेल, असे लेखकाचे मत आहे का? लेखकाला याविषयी मत आहे खास. पहिला परिच्छेद आणि वर उद्धृत वाक्य काहीतरी मत असल्याशिवाय लिहिले जाणे कठिण वाटते.

मनुष्यद्वेष्टे पर्यावरणवादी?

अठराव्या शतकात कधीतरी औद्य़ोगिक क्रांती झाली आणि तेव्हापासून जग काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माणसाने भरमसाठ जंगलतोड, वारेमाप ऊर्जावापर, बेसुमार प्रदूषण करून रम्य निसर्गाचे राडे करून ठेवलेले आहेत. त्यात गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, रासायनिक उत्पादन, कृत्रिम पदार्थ यामुळे निसर्गाशी नातं तुटलेलं आहे. आणि आता तर ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचं अस्तित्वच त्याने धोक्यात आणलं आहे.

हे अतिरंजित चित्र आहे असे लेखक म्हणतात. त्यात काही तथ्य आहे, हेही त्यांना मान्य आहे. पर्यावरणवाद्यांनी हे चित्र रंगवले आहे म्हणून ते दोषी आहेत असाही लेखकाचा सूर आहे.
(काही/बरेच) पर्यावरणवादी जरी हे चित्र रंगवत असतील तरी ते मनुषद्वेष्टे कसे? शेवटी निसर्गावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे म्हणूनच ते असे म्हणतात ना? मानवजात वाचावी म्हणूनच तर त्यांचे प्रयत्न आहेत ना? की - मानवजात नष्ट झाल्यासच पर्यावरणाच्या समस्या संपतील असे त्यांना (पर्यावरणवाद्यांना) म्हणायचे आहे?

थोडे अवांतर...

एक गोष्ट मधे ऐकली होती पण माझ्या वाचनात कधी प्रत्यक्ष आलेली नव्हती त्यामुळे त्यातील सत्यासत्यता माहीत नाही:

ब्रिटीश हे त्यांच्या कापडगिरण्यांसाठी कच्चा माल नेत असत आणि येथे जसा पक्का माल आणत तसेच बर्‍याचदा त्यांची जहाजे ही बर्‍यापैकी मोकळी असत. त्यांना समुद्रात समतोल ठेवण्यासाठी म्हणून मिठाच्या गोण्या ठेवल्या जात. ते बरेच येणारे मिठ विकायला तसेच येथे स्वतःच्या अख्त्यारीतील मिठ उत्पादन कुठल्याही स्पर्धेशिवाय विकता यावे म्हणून त्यांनी मिठावर कर लावला होता. हेतू हा की स्वतःचे मिठही खपेल आणि ते पुरणार नसल्याने जे काही स्थानीक लोकं तयार करतील त्यावर कर लादल्यामुळे त्यातून पैसे मिळतील. गांधीजींनी यातील आर्थिक व्यवहार ओळखला आणि (संकेतस्थळांवरील नाही तर) योग्य तेथे नाड्या आवळल्या.

बाकी, मूळ लेखातील, "त्यांनी लोकांना मीठ खाऊ नका असं सांगितलं नाही," या वाक्यांसंदर्भातः मला वाटते खाऊ नका असे सांगितले तर लोकं न खाल्या मिठाला कशी जागणार हा प्रश्न त्यांना पडला असावा. ;)

बाकी मूळ विषयावरील उत्तर नितिन यांच्याप्रमाणेच इतरत्र... :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

माझे मत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*श्री.राजेश घासकडवी यांचे लेख वाचनीय आणि विचारप्रवर्तक असतात. या लेखमालेच्या प्रास्ताविक लेखनात विषयाची मांडणी इतक्या उत्तम पद्धतीने केली आहे की प्रस्तावना लेखनाचा हा अभ्यसनीय असा वतुपाठच आहे.तो वाचताना लेखमालेचे पूर्वनियोजित असे पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आहे,हे प्रतीत होते.
*संपूर्ण जगासाठी अशी ऊर्जेची गणिते करणे शक्य होईल असे मला वाटत नाही.यांतील अनेक घटकांची मोजमापे (व्हॅल्युज) विश्वसनीय आधाराविना केवळ गृहीत धरावी लागतील.त्यामुळे गणित वास्तवापासून दूर जाईल.
* लेख क्र.२ मधे ते म्हणतात: " हिरवी पणती तेवत ठेवावी." पण त्यासाठी पाणी लागेल.ते वर चढवण्यासाठी वीज लागेल.त्याचे काय? सदनिकेतील सज्जाबाग आणि इमारतीतील गच्चीवाटिका(टेरेस गार्डन) यांनी काही साध्य होईल असे मला वाटत नाही.एक मजली स्वतंत्र घर असेल तर ठीक.सबाग सदनिका(गार्डन फ्लॅट) या संकल्पनेमुळे पाण्याचा अपव्यय होतो आणि काहीच साध्य होत नाही असे माझे मत आहे. जमिनीत पावसाच्या पाण्यावर वाढणारी झाडे लावणेच योग्य.
*पाणी,वीज, इंधन(गॅस,डीझेल, पेट्रोल,कोळसा,लाकूड) यांचा वापर प्रत्येकाने काटकसरीने करायला हवा. "अमेरिकेत उधळपट्टी करतात मग आपण का काटकसर करायची?" हा विचार योग्य नाही.(संदर्भःश्री.चन्द्रशेखर यांचा प्रतिसाद)

पाणी,वीज, इंधन(गॅस,डीझेल, पेट्रोल,कोळसा,लाकूड) यांचा वापर प्रत्य

श्री यनावाला

अमेरिकेत उधळपट्टी करतात मग आपण काटकसर कशाला करायची? असे माझे अजिबात म्हणणे नाही. पृथ्वीवर रहाणार्‍या प्रत्येकाने ती करायलाच हवी. मला असे म्हणायचे आहे की अमेरिका युरोप मधे रहाणार्‍यांनी उर्जेची उधळपट्टी थांबविणे ही प्राथमिक गरज आहे. ती थांबवली तर सध्या जो असमतोल दिसतो आहे तो नाहीसा होईल.
वैयक्तिक पातळीवर बोलायचे झाले तर मी गेली 15 वर्षे सूर्यशक्तीवर चालणारे पाणी गरम करणारे यंत्र वापरत आहे. माझ्या घरात मी सगळीकडे सीएफएल दिवे बसवले आहेत व सध्या मी अशी एक प्रणाली बसवण्याचा अभ्यास करतो आहे की ज्यामुळे दिवसा माझ्या घरात फिरणारे पंखे व आवश्यक दिवे हे सूर्य शक्तीवरच चालतील. पुढच्या 1 वर्षभरात ही प्रणाली कार्या न्वित होईल अशी मला आशा आहे.
चन्द्रशेखर

 
^ वर