विंदा

सारे तिचेच होते...
विंदा गेले. गेले कशाला म्हणावयाचे ? गेली साठ वर्षे ते आमच्याबरोबर होतेच व आहोत तोपर्यंत असणारच आहेत. मागे काही कवींची ओळख करून देतांना राहिले पण कालोह्ययं निरवधि: बघू. आज त्यांची एक कविता देतांना काय द्यावी याचा विचार करत होतो बकी, धोंड्य़ा न्हावी, झपताल, दंतकथा, घेता, काय निवडणार ? असो. त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या एका रसिक मित्राच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेली कविता पहा .
साठीचा गझल

सारे तिचेच होते,सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो-- खोटे कशास बोला--
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी !

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

प्रत्यक्ष भेटली का ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी !

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी !

शरद

Comments

विंदा

विंदा

खरच ,गेले कशाला म्हणावयाचे ? गेली साठ वर्षे (माझी ३२ वर्ष) ते आमच्याबरोबर होतेच व आहोत तोपर्यंत असणारच आहेत.
आदरांजली. ईश्वर चिर शांती देवो.

शैलु.

'उंटावरचा एक शहाणा' ते 'अष्टदर्शने'

उंटावरचा एक शहाणा
सोन्याच्या घालून वहाणा
भीक मागतो दारोदारी
म्हणतो, "सगळे कंजूष भारी"
- कविवर्य विंदा करंदीकर

माझ्या पाचव्या वाढदिवशी आजोबांनी दिलेल्या पुस्तकातील ही कविता. मला त्यावेळी फारशी उमगली देखील नव्हती. वरवर लहान मुलांची वाटणारी ही कविता म्हणजे दुनियादारीचे मोठे तत्त्वज्ञान आहे. मला वाचनाची गोडी लागली ती सशाचे कान, राणीचा बाग ह्या कवितांमधूनच.

अलिकडेच माझ्या मामंजींनी भेट दिलेले "अष्टदर्शने" म्हणजे तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा छोटेखानी कोशच आहे. उंटावरच्या शहाण्यापासून सुरु झालेली माझी वाचन यात्रा विंदांच्या "अष्टदर्शने"ला पोचली आहे. देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे आणि बर्गसॉ या सात पाश्चात्य व चार्वाक या भारतीय तत्त्ववेत्त्याची ओळख करून देणारे हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.

सामान्यत: तत्त्वज्ञान म्हटले की जाडजूड ग्रंथ डोळ्यासमोर येतात. पण ह्या पुस्तकात आठ तत्त्ववेत्त्यांवर फक्त एकेक अभंग आहे. प्रत्येकाची कहाणी विंदा उलगडत जातात. कॉलेजांतून शिकवला जाणारा हा गहन विषय विंदांनी अगदी सहजसुलभ भाषेमध्ये हाताळला आहे. सुरवातीला त्या तत्त्ववेत्त्याची जीवनकहाणी व नंतर
त्याचे विचार काय होते ते दिलेले आहे.

चार्वाकदर्शनातील काही ओळी इथे टंकत आहे.

जड्द्रव्यांचाच । संयोग होऊन
’चैतन्य’ निर्माण। असे होत.
चैतन्य हा असे। जडाचा विकार;
ते नसे स्वतंत्र। असे तत्त्व.
........
......
आत्मा होई नष्ट । माणसाचा.
मृत्यूने द्रव्याचे । होई विघटन
आणिक चैतन्य। नष्ट होई.
आत्मा राहणारा । शरीर सोडून
प्रत्यक्ष प्रमाण । दाखवी ना.
अतींद्रिय आत्म्याचे।अस्तित्व म्हणून
चार्वाक दर्शन ।नाकारीते.
त्याचा जडवाद । नाही नाकारीत
मंगल, उदाच । आणि भव्य.
त्यांचा अनुभव । होई प्रत्यक्षात
चैतन्याला प्राप्त । माणसाच्या.
-चार्वाकदर्शन ( अष्टदर्शने- पृ. ७७-७८, विंदा करंदीकर, २००३)

नास्तिक चार्वाकाने । नाकारला आत्मा
कविवर्य विंदा । तुमचा आत्मा मात्र
कवितांमधून अमर । झाला आहे
मजसारख्या । पामरांना
करीत आहे । मार्गदर्शन
सिंधुदुर्गातील । दीपस्तंभाप्रमाणे

गौरी दाभोळकर ( १५-३-२०१०)

कुर्निसात

नास्तिक चार्वाकाने । नाकारला आत्मा
कविवर्य विंदा । तुमचा आत्मा मात्र
कवितांमधून अमर । झाला आहे

असेच. महाकवी विंदांना कुर्निसात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

निळा पक्षी, दातांपासून दातांपर्यंत

या दोन कविता मला नेहेमी आठवतात.
'काही केल्या काही केल्या निळा पक्षी जात नाही' हे तर कोरून ठेवल्यासारखं डोक्यातनं, त्या निळ्या पक्ष्यासारखंच जात नाही. विंदा गेले पण तो निळा पक्षी आहेच.
तो आपण जपून ठेवला, तर तेवढंच यश आपल्याला रगड.

साध्यासुध्या राहाणीच्या, दैदिप्यमान प्रतिभेच्या कवीला आदरपूर्वक श्रद्धांजली.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अगदी...

तो आपण जपून ठेवला, तर तेवढंच यश आपल्याला रगड.

क्या बात है!!! अगदी अगदी....

बिपिन कार्यकर्ते

सारे तिच्याचसाठी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांनी विन्दा करंदीकरांची ही छान कविता दिली आहे.ती कवींच्या मुखातून ऐकण्याचा योग आला होता.पुण्यात सिंबायोसिस् संस्था प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यात चार दिवसांचा कार्यक्रम आयोजित करते.२००८ साली विंदा करंदीकरांचे कवितावाचन होते. प्रस्तुत कविता सादर करण्यापूर्वी ते म्हणाले " कवि बा.भ. बोरकर यांची गझल चालीची एक कविता आहे:
डोळे तुझे बदामी, करिती मला सलामी|
त्यानेच हा असा मी, झालो गडे निकामी||"
ती वाचून मीही एक गझल कविता लिहिली. ती आता वाचतो:..."

 
^ वर