महिला आरक्षण विधेयक.. गरज की धोका?

आज महिला दिनानिमित्त सादर होणारे महिला आरक्षण विधेयक संमत झाले नाहि हा सरकारचा पराभव वगैरे चर्वित चर्वण चालु रहाणार आहे. या निमित्ताने वेगवेगऴ्या माध्यमातील महिलांचे, तज्ञांचे मत जेव्हा जेव्हा घेतले जात आहे ते सगळे या विधेयकाच्या विरोधात दिसत आहेत.
विरोधाची कारणे

  • या विधेयकामुळे प्रत्येक खासदाराला आपला मतदारसंघ पुढच्या निवडणूकीला आपल्याकडे राहिल की नाहि याची खात्री नसेल. त्यामुळे त्यांचे मिळाले आहे तर ओरबाडून घ्याही प्रवृत्ती वाढेल
  • या विधेयकामुळे बायका राजकारणात येतील मात्र त्या प्रॉक्सी असतील. पडद्याआडून त्याचे पती, वडील, भाऊ, दीर राज्य चालवतील. हे म्हणजे जबाबदारीशिवाय सत्ता मिळणे झाले
  • भारतीय घटनेमधे आरक्षण देतेवेळी अश्या घटकांचा विचार करण्यात आला ज्यांना स्वबळावर संधी मिळणे शक्य नाहि. मग भारतात ५०% इतकी संख्या असलेल्या महिलांना आरक्षण देणे घटनाबाह्य आहे. मात्र मागासवर्गीय महिला, अनुसुचित जमातीतील महिला या खरंतर सत्तेपासून वंचित आहे त्यांना आरक्षण दिल्यास आनंदच आहे.
  • ग्रामपंचायती, म्युनिसिपाल्टी मधे हे आरक्षण आहे. जिथे महिलांना प्रतिनिशित्त्व मिळत आहे. अश्या वेळी राष्ट्रीय स्तरावर अश्या 'आरक्षणाची' गरज नाहि.
  • भारतातील सर्व क्षेत्रात महिला आरक्षणाशिवाय स्वकर्तृत्त्वावर पुढे येत असताना व हे आरक्षण राष्ट्रीय राजकारणात सरसकट असावं हा अट्टाहास का?

या प्रकारामुळे प्रश्न उभा रहातो की
तज्ञांचे मत जेव्हा विधेयकाच्या विरोधात असतानाही फक्त महिला आरक्षणाच्या रोमँटीसिझममधे व १४ वर्षे वाया गेल्याच्या बोचणीमुळे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावर फार घाई होतेय का?
आणि दुसरा प्रश्न
असे सरसकट आरक्षण खरोखरच गरजेचे आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

तज्ञांची कारणं पटत नाहीत

उपयुक्ततेविरोधीकारणं दिलेली आहेत ती अशी
•या विधेयकामुळे प्रत्येक खासदाराला आपला मतदारसंघ पुढच्या निवडणूकीला आपल्याकडे राहिल की नाहि याची खात्री नसेल. त्यामुळे त्यांचे मिळाले आहे तर ओरबाडून घ्याही प्रवृत्ती वाढेल
-यात स्त्रिया चंचल असतात त्या कसं मत देतील भरवसा नाही अशी विचारसरणी आहे की विधेयक पास झाल्यावर होणाऱ्या वर्षांना ते लागू आहे? जर बदल आवश्यक असेल तर त्यासाठी एका वेळची किंमत द्यायला तयार असलं पाहिजे. मिळाले आहे तर ओरबाडून घ्या ही प्रवृत्ती आज कमी आहे हे कशावरून?
•या विधेयकामुळे बायका राजकारणात येतील मात्र त्या प्रॉक्सी असतील. पडद्याआडून त्याचे पती, वडील, भाऊ, दीर राज्य चालवतील. हे म्हणजे जबाबदारीशिवाय सत्ता मिळणे झाले
-सध्या त्यांना प्रॉक्सी म्हणून सुद्धा महत्त्व नाही. त्यामुळे जी परिस्थिती येईल ती महिलांच्या राजकारणात सहभागाच्या दृष्टीने सुधारणाच असेल. या सुधारणेमुळे फायदा होईल का हा वेगळा प्रश्न आहे.

रास्ततेविरोधी कारणे
•....मात्र मागासवर्गीय महिला, अनुसुचित जमातीतील महिला या खरंतर सत्तेपासून वंचित आहे त्यांना आरक्षण दिल्यास आनंदच आहे.
-हे थोड्याफार प्रमाणावर पटतं. पण पूर्णपणे नाही. महिलांना आरक्षण द्या, व अनुसूचितांना आरक्षण द्या - व दोन्ही कोटे जुळणीने पुरा करण्याची सोय द्या.
•ग्रामपंचायती, म्युनिसिपाल्टी मधे हे आरक्षण आहे. जिथे महिलांना प्रतिनिशित्त्व मिळत आहे. अश्या वेळी राष्ट्रीय स्तरावर अश्या 'आरक्षणाची' गरज नाहि.
जर स्थानिक पातळीवर आरक्षण आहे, तर राष्ट्रीय पातळीवर गरज नाही हा तर्कच समजत नाही. हेच वाक्य 'तशीच राष्ट्रीय स्तरावर अश्या 'आरक्षणाची' गरज आहे'. असं लिहिलं तरी तितकंच प्रभावी होतं.
•भारतातील सर्व क्षेत्रात महिला आरक्षणाशिवाय स्वकर्तृत्त्वावर पुढे येत असताना व हे आरक्षण राष्ट्रीय राजकारणात सरसकट असावं हा अट्टाहास का?
आरक्षण असतं तर त्या अधिक वेगाने पुढे आल्या असत्या का? या प्रश्नाच्या उत्तराशिवाय हाही मुद्दा निरर्थक होतो.

मुळात प्रश्न असा आहे की आरक्षणाचा 'फायदा' काय आहे? केवळ राज्यसभा व लोकसभा यांचं चेहेरा पोलिटीकली करेक्ट करण्यासाठी आहे का? स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवले जावेत ही इच्छा असेल तर ती चांगली आहे. तसंच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांना पक्षामध्ये अधिक प्राधान्य मिळेल असंही वाटतं. मला तफावत दिसते ती म्हणजे उपयुक्ततेबाबतीत काहीही डेटा मांडलेला नाही. जर स्थानिक पातळीवर हे आरक्षण आहे तर त्यातून काही 'फायदा' झाला का? (तो झाला नाही असं म्हणत नाही, पण कोणी मोजलाय का, अंदाज घेतलाय का...)

या डेट्याअभावी बोलायचं म्हणजे माझा अंदाज सांगणंच झालं - मला वाटतं आरक्षणाचा फायदा होईल. तोटे फारसे दिसत नाहीत. पंचवीस टक्क्यांच्या आसपास आरक्षण असायला हरकत नाही. जर त्या मार्गाने जायचंच असेल तर लवकर जाणं जास्त चांगलं. कारण हळुहळू होणाऱ्या प्रगतीला त्याने जंप स्टार्ट करता येईल. पंचवीस वर्षांच्या गाडी ढकलण्यानंतर त्याची कदाचित गरज असणार नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

स्थानिक-राष्ट्रीय

काहि तर्क (हे माझे मत असेलच असे नाहि) लिहितो आहे:

सध्या त्यांना प्रॉक्सी म्हणून सुद्धा महत्त्व नाही. त्यामुळे जी परिस्थिती येईल ती महिलांच्या राजकारणात सहभागाच्या दृष्टीने सुधारणाच असेल.

सहमत

या सुधारणेमुळे फायदा होईल का हा वेगळा प्रश्न आहे.

आरक्षण मिळाल्याने स्त्रियांच्या जीवनमानात सुधारणा होईल का? तर याचे उत्तर माझ्या अंदाजाप्रमाणे "नाहि" असे आहे.

महिलांना आरक्षण द्या, व अनुसूचितांना आरक्षण द्या - व दोन्ही कोटे जुळणीने पुरा करण्याची सोय द्या.

आपली सुचना नीटशी समजली नाहि. एखादे उदा. देता येईल का?

"जर स्थानिक पातळीवर आरक्षण आहे, तर राष्ट्रीय पातळीवर गरज नाही हा तर्कच समजत नाही."

स्थानिक पातळीवर व्यक्तीसापेक्ष मतदान व्हावे अशी अपेक्षा आहे. तिथे महिलांचे रोजचे प्रश्न मांडण्यासाठी स्त्रियांच आरक्षण योग्य वाटतं. राष्ट्रीय पातळीवर मात्र व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व दिलं जावं अशी अपेक्षा असते, तिथे मुख्यतः धोरणात्माक निर्णय होतात. शिवाय अश्या ठिकाणी स्त्रियांना प्रतिनिधित्त्व नाही असे नाहि व त्या मिळावू शकत नहित असेही नाहि. अश्यावेळी अधिक प्रतिनिधित्त्व हवे ही मागणी बरोबर असली तरी सक्तीच्या आरक्षणाची गरज आहे का हा प्रश्न आहे.

मला वाटतं आरक्षणाचा फायदा होईल. तोटे फारसे दिसत नाहीत.

तोटे दिसत नसले तरी राष्ट्रीय पातळीवर ३३% जागा सक्तीने एखाद्या वर्गाला राखीव ठेवण्या इतके फायदे दिसत आहेत का?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

महीला आरक्षण

या डेट्याअभावी बोलायचं म्हणजे माझा अंदाज सांगणंच झालं - मला वाटतं आरक्षणाचा फायदा होईल. तोटे फारसे दिसत नाहीत. पंचवीस टक्क्यांच्या आसपास आरक्षण असायला हरकत नाही. जर त्या मार्गाने जायचंच असेल तर लवकर जाणं जास्त चांगलं. कारण हळुहळू होणाऱ्या प्रगतीला त्याने जंप स्टार्ट करता येईल. पंचवीस वर्षांच्या गाडी ढकलण्यानंतर त्याची कदाचित गरज असणार नाही.

+१

मोगलकालखंडा पासुन महीला पडदा नशीन व रक्षणीय झाल्या जवळपास त्याच बरोबर त्यांचा सामाजिक व राजकीय सहभाग संपला यात सुधारणा व्हावी या हेतुने महीला आरक्षण आले का?
चु. भु. द्या. धा.

आरक्षण हवे.

शैलु.

मोगलकालीन स्त्रिया

मोगलकालीन स्त्रिया राजकारणात उत्तमप्रकारे सक्रिय होत्या. नूरजहां, जहांआरा, रोशनआरा, महम अंगा वगैरे सर्व स्त्रियांनी मुघल राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली होती.

बाकी प्रश्न राहिला आरक्षणाचा तर हे केल्याने ते होईल हे गणित कधीही न संपणारे आहे. स्त्रीच्या ऐवजी "क्ष" डॉनचा भाऊ निवडणूकीत जिंकला तर खरी सत्ता डॉनचीच असेल वगैरे पासून पुरुषांच्या बाबतही असेच ठोकताळे मांडता येतील.

सर्व मनोवैज्ञानिक कयासांबाबत अनुभवांची जोड हवी

वरील बहुतेक मुद्दे मनोवैज्ञानिक धाटणीचे कयास आहेत. अनुभवांची जोडणी हवी.

बहुधा सर्व मुद्दे कुठल्या एका तज्ञाचे नसावेत, तर्क एकसंध वाटत नाही.

उदाहरणार्थ : एखादा मतदारसंघ आयुष्यभर (किंवा दीर्घ काळ) आपल्याला लढवता येईल असे माहीत असल्यामुळे हल्लीचे खासदार "ओरबाडून घेत" नसल्यासच पहिला मुद्दा ग्राह्य आहे.

ग्रामपंचायती-नगरपालिका वगैरे मधून अनुभव-अधिष्ठित कयास मिळू शकतील काय? तिथे महिलांसाठी जागा आरक्षित असतात. राजेश म्हणतात :

मुळात प्रश्न असा आहे की आरक्षणाचा 'फायदा' काय आहे? केवळ राज्यसभा व लोकसभा यांचं चेहेरा पोलिटीकली करेक्ट करण्यासाठी आहे का? स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवले जावेत ही इच्छा असेल तर ती चांगली आहे. तसंच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांना पक्षामध्ये अधिक प्राधान्य मिळेल असंही वाटतं. मला तफावत दिसते ती म्हणजे उपयुक्ततेबाबतीत काहीही डेटा मांडलेला नाही. जर स्थानिक पातळीवर हे आरक्षण आहे तर त्यातून काही 'फायदा' झाला का? (तो झाला नाही असं म्हणत नाही, पण कोणी मोजलाय का, अंदाज घेतलाय का...)

हे पटण्यासारखे आहे. "फायदा-तोटा" मोजण्याचे परिमाणही हवे.

+१

सहमत आहे.

ग्रामपंचायतींमध्ये (सुरुवातीला प्रॉक्सीसारख्याच) निवडून आलेल्य अनेक महिलांनी नंतर स्वतंत्र ओळख निर्माण केल्याची आणि प्रॉक्सी होण्यास नकार दिल्याची उदाहरणे वाचली आहेत. (पण हा ही पुन्हा डेटा नव्हे

मतदारसंघ राखीव नसला तरी पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्याने ओरबाडणे चालू असतेच.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

काहिस सहमत मात्र..

ग्रामपंचायती-नगरपालिका वगैरे मधून अनुभव-अधिष्ठित कयास मिळू शकतील काय?

काहिसा सहमत.. मात्र ग्रामपंचायत / नगरपालिकांमधे उमेदवाराचे महत्त्व अधिक आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर, पक्ष अधिक मोलाचा आणि पॉवरचा ठरतो. एखाद्या स्त्रीला एखाद्या विधेयकाला "स्त्री" ह्या भुमिकेतून विरोध करायचा असेल आणि पक्षाने व्हीप काढला असेल तर स्त्रीपुढे पक्षादेश मानणे सक्तीचे ठरते. स्थानिक पातळीवर पक्ष इतकी दखलबाजी करत नाहित व महिलांच्या कार्याला थेट वाव मिळतो.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

पुरुषांना निवडनुकीला उभे राहण्याची बंदी

सध्या कोणत्याही मतदारसन्घात स्त्रियाना निवडणुकीला उभे राहण्यासाठी बंदी नाही. पण ३३% आरक्षण करुन त्या मतदारसंघात पुरुषांना निवडनुकीला उभे राहण्याची बंदी मात्र या आरक्षणामुळे येईल. हे लोक़शाहीच्या तत्वाविरोधात आहे.

+१.. हाच तर मुद्दा आहे

या डेट्याअभावी बोलायचं म्हणजे माझा अंदाज सांगणंच झालं - मला वाटतं आरक्षणाचा फायदा होईल.

+१
हाच मुद्दा आहे.. सरकार कोणताही विदा समोर न ठेवता हे विधेयक रेटू पाहतंय. त्याने खरंच फायदा होणार आहे का? असल्यास तो कोणाला होणार आहे? ज्या दुर्बल वर्गाला सध्या प्रतिनिधित्त्व नाहि त्यांना ते कसे मिळेल? का हे अख्खे विधेयक भावनांवर आधारीत आहे व त्याच भावनेच्या भरात कोणत्याही ठोस आधाराशिवाय / विदा असल्याशिवाय संमत होणे बरोबर आहे?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अन्यायकारक

महिला आरक्षणाला माझा पूर्णपणे विरोध आहे आणि अशा पद्धतीचे आरक्षण हे पुरुषांसाठी (पदासाठी इच्छुक आणि मतदार अशा दोन्ही) अन्यायकारक आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षणे आहेत तिथे महिलांनी काहीही वेगळ्या पद्धतीचे दिवे लावलेले नाहीत. दोन पुरुष कॉर्पोरेटर एकमेकांच्या कॉलरी धरुन भांडणे करायचे तिथे महिला कॉर्पोरेटर एकमेकांच्या झिंज्या ओढताना दिसतात. चर्चाप्रस्तावात मांडलेल्या आक्षेपांशी पूर्णपणे सहमत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ऍनेक्डोटल पुरावे

श्री आजानुकर्ण यांच्याकरता काल-परवाच मिसळपाव या संकेतस्थळावर झालेल्या चर्चेतील वाक्य खाली देत आहे.

अशा प्रकारच्या चर्चांमध्ये अ‍ॅनेक्डोटल पुरावे, स्वानुभवांवर आधारित अपर्‍या सँपल स्पेसवरून काढलेले निष्कर्ष ठामपणे मांडले जातात.

हा प्रतिसादहा उपप्रतिसाद पहावा.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

स्पष्टीकरण

श्री अक्षय, श्री आजानुकर्ण यांनी येथे कोणताही निष्कर्ष मांडलेला नसून त्यांचे स्वतःचे मत मांडलेले आहे या गोष्टीकडे तुमचे दुर्लक्ष झालेले दिसते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संख्याशास्त्रीय निष्कर्ष

  • महिला प्रतिनिधी महिला व पुरुष या दोन्ही गटांचे प्रतिनिधीत्व करण्यास पुरुष प्रतिनिधींपेक्षा जास्त सक्षम असतात. हा निष्कर्ष विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभुमी असतांनाही लागू होतो. (भारतातील २४ खेड्यांचा अभ्यास, दुवा)
  • आरक्षण काढून घेतल्यानंतरही पुर्वी आरक्षित असलेल्या मतदारसंघांमध्ये महिला प्रतिनिधी पुन्हा निवडून येण्याची शक्यता ही पुर्वी आरक्षित नसलेल्या मतदारसंघापेक्षा पाच पटीने जास्त असते. यावरून महिलांना आरक्षण दिल्याने त्या समर्थ प्रतिनिधीत्व करू शकतात, हा संदेश समाजात व्यापक प्रमाणात रुजतो हे सिद्ध होते. (मुंबई महापालिका मतदारसंघांचा अभ्यास, दुवा)

वरील दोन निष्कर्षांवरून महिला प्रतिनिधींमुळे सरकारची कार्यक्षमता वाढेल व समाजातील महिलांचे स्थान उंचावेल, असा युक्तिवाद करता येतो. श्री ऋषिकेश यांनी नमूद केलेल्या कारणांवरून मात्र महिलांविषयीचा पूर्वग्रहदुषित दृष्टिकोन दिसून येतो. त्या कारणांमध्ये विरोधाभासही आहे. एका कारणात महिला स्वबळावर पुढे येण्यास सक्षम आहेत असे म्हटले आहे तर दुसर्‍या कारणात त्या प्रॉक्सि किंवा कठपुतळे होण्याइतपत अशक्त असल्याचा दावा केला आहे.

*वर उल्लेखलेले दोन्ही निबंध हे जर त्या नियतकालिकांचे सदस्यत्व तरच पूर्णपणे वाचता येतील. सदस्यत्व नसल्याने फक्त संक्षिप्त सारांश पाहता येईल.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

चांगली माहिती

सारांश बघितला... चांगली माहिती..
पूर्ण माहिती वाचलेली नाहि , मात्र सारांश वाचून उत्तरांऐवजी नवे प्रश्न समोर आले :)

१. जर एकदा संधी दिल्यावर स्त्रियांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता वाढते तर कायमच्या "आरक्षणाची" गरज काय? फार तर एका निवडणुकीला असे आरक्षण / सक्ती करावी व त्या संधीचा फायदा महिलांनी कायमचा उचलावा नाहि का?

२. यातून हे सिद्ध होते की अश्या आरक्षणाची गरज ही कायमची नाहि. तेव्हा ह्या विधेयकामधे आरक्षण किती वर्षांसाठी आहे हयाला मर्यादा आहे का?

टीपः बाकी मुळ विषयात दिलेली कारणे माझे विचार नसून विविध व्यक्तींच्या विचारांचे संकलन आहे. माझे विचार अजून (तरी) कोणत्याही बाजूने झुकलेले नाहित.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

काही कयास

श्री ऋषिकेश, या विधेयकाविषयी मला असलेल्या तुटपुंज्या माहितीवरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

  1. हे आरक्षण स्थानिक लोकसभा मतदारसंघांकरता फिरते असणार आहे. तसे असल्यास परभणी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील आरक्षणाचा जळगाव जिल्ह्यातील मतदारांवर होणारा परिणाम फारसा नसेल. तेव्हा जोपर्यंत कमीत कमी सर्व मतदारसंघांत (किंवा प्रातिनिधिक भागात) एकदातरी आरक्षित मतदारसंघ असणार नाही, तोपर्यंत व्यापक पातळीवर निवडून येण्याच्या शक्यतेत वाढ होणार नाही.
  2. कालावधीची मर्यादा विधेयकात आहे किंवा नाही (बहूधा नसावी) याबाबत निश्चित माहिती नाही. अर्थातच या आरक्षणाची गरज कायमस्वरुपी नाही. पण किती वर्षे आरक्षण असावे हे आधीच ठरवण्याविषयी एकमत नसावे. परिणाम पाहून याबाबत ठरवता येऊ शकेल. (याबाबत गासवर्गीयांना असलेली आरक्षणे आजपर्यंत (जवळ जवळ ६० वर्षे) टिकून आहेत, तेव्हा महिलांची आरक्षणे कधीच जाणार नाहीत, असा कयास कोणी बांधू शकेल.) किंवा सुरूवातीला २० वर्षे असा कालावधी ठरवून नंतर गरजेप्रमाणे किती काळ आरक्षण असावे, अशी सुधारणा विधेयकात करता येणे शक्य असावे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

अरूण जेटलींची सुचना

पुरक माहिती:
आता लोकसभेचे क्लिपिंग पहात होतो त्यात अरूण जेटलींनी क्र. २ वर भाष्य केले आहे. त्यांनी अशी सुचना केली आहे की १५ वर्षात भारतातील प्रत्येक मतदारसंघात एकदातरी महिला आरक्षण येऊन गेले असेल. तेव्हा या आरक्षणाचा कालावधी तुर्तास १५वर्षे ठेवाव व नंतर पुनरावलोकन करावे.
अर्थात ही सुचना विधेयकात समाविष्ट झाली की नाहि याबाबत कळले नाहि

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

संख्याशास्त्राबाबत

१. नंबर्स डोन्ट लाय, दे हाईड
२. स्टॅटिस्टिक्स आर लाईक बिकीनीज्. व्हाट दे रिविल इज सजेस्टिव, व्हाट दे कन्सील इज व्हायटल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संख्याशास्त्र, मत, निष्कर्ष

श्री आजानुकर्ण, वरील उपप्रतिसादास व या स्पष्टीकरणास एकत्र उत्तर देत आहे, जेणेकरून या अवांतर मुद्द्यांपायी चर्चा पन्नास प्रतिसादांच्याजवळ जाणार नाही. (किंबहूना ही चर्चा खरडवहीतच करायला हवी.)

वरील उपप्रतिसंदर्भातः
दोन्ही विधाने रोचक आहेत. मी इतरत्र दुसरे एक विधान नुकतेच नोंदवले होते ते असे: लायर्स कॅन फिगर अँड फिगर्स कॅन लाय. असो.
या दोन्ही विधानांचे जनक आधुनिक वैद्यकशास्त्राने उपयुक्त ठरवलेली औषधे कदाचित घेत नसावेत. तसेच संख्याशास्त्राने सुरक्षित ठरवलेल्या वाहनांतून प्रवासही करत नसावेत. तरीही संख्याशास्त्राच्या उपयुक्ततेबाबत शंका असणे स्वाभाविक आहे. राजेश, धनंजय, श्री थत्ते आणि श्री ऋषिकेश या सर्व चर्चासहभागकांनी विद्याची आवश्यकता व्यक्त केल्याने मी प्रतिसादात काही विदाधारीत निबंधांचे निष्कर्ष मांडले.


या स्पष्टीकरणासंदर्भातः

हा क्ष व य चा संवाद पहा.
क्ष: सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे माझे मत आहे.
यः क्षराव, तुम्ही असा निष्कर्ष कसा काढलात?
क्षः यराव, मी येथे कोणताही निष्कर्ष मांडलेला नसून स्वतःचे मत मांडलेले आहे या गोष्टीकडे तुमचे दुर्लक्ष झालेले दिसते.
य (मनातल्या मनात): मी क्षच्या मताकडे पूर्ण दुर्लक्ष* करण्याचा निष्कर्ष का काढला नसावा बरे?

*दुर्लक्षवरून: मिसळपाव या संकेतस्थळावरचा हा लेख जरूर वाचा.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

धन्यवाद

दुर्लक्ष संदर्भातील दु्व्याबद्दल धन्यवाद.

हा क्ष व य चा संवाद पहा.
क्ष: सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे माझे मत आहे.
यः क्षराव, तुम्ही असा निष्कर्ष कसा काढलात?
क्षः यराव, मी येथे कोणताही निष्कर्ष मांडलेला नसून स्वतःचे मत मांडलेले आहे या गोष्टीकडे तुमचे दुर्लक्ष झालेले दिसते.
य (मनातल्या मनात): मी क्षच्या मताकडे पूर्ण दुर्लक्ष* करण्याचा निष्कर्ष का काढला नसावा बरे?

संवाद वाचला. माफक विनोदी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संख्याशास्त्र, आकडेवारी वगैरे

आपण केलेली विधानं चमकदार आहेत, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसावर उतरत नाहीत.

१. नंबर्स डोन्ट लाय, दे हाईड

ज्या सत्यासाठी कोपर्निकसने आपलं आयुष्य वहावलं, ज्या सत्यासाठी गॅलिलिओला पोपचा रोष ओढवून घ्यावा लागला, जे सत्य न्यूटनने सांगितलं व आईन्स्टाईनने विस्तारलं ते आकडेवारीशिवाय शक्य नव्हतं. त्यात आकड्यांनी सत्य प्रकाशात आणलं, ज्यावेळी प्रस्थापित व्यवस्था ढोबळ, सामान्य जाणीवेला पटतील अशा अर्धसत्याला - मिथकाला कवटाळत होती.
(इतर अनेक अशी उदाहरणं देता येतील, ज्यात आकडेवारी व योजनाबद्ध मोजमापांनी प्रस्थापित विचारसरणी उलटवली. मी खगोलशास्त्रातली, भौतिकीतली काही मोजकी निवडली आहेत)

२. स्टॅटिस्टिक्स आर लाईक बिकीनीज्. व्हाट दे रिविल इज सजेस्टिव, व्हाट दे कन्सील इज व्हायटल.

यावर मी म्हणेन की अॅनेक्डोट्स आर लाईक बुरकाज् विथ न्यू़ड वूमन पेंटेड ऑन देम, पुट ऑन अ स्केअरक्रो. दे मॅनेज टू कंप्लीटली मिसगाई़़ड यू.
(दंतकथा या बुजगावण्यावर घातलेल्या, नागड्या बाईचं चित्र असलेल्या बुरख्याप्रमाणे असतात - दुरून बघायला सुंदर पण हाताला काही लागत नाही अशा)

जगात वाईट गायक असतात, त्यांची चेष्टा करता येते म्हणून संगीत हा मूर्खपणा होत नाही. तसंच संख्याशास्त्राचं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाभूत झालेल्या शास्त्राची खिल्ली इतक्या सहजपणे उडवू नका. तुम्ही वापरत असलेली प्रत्येक वस्तू - मोबाईल फोन, टी. व्ही., कार, विमान, घड्याळं, तुम्ही ज्यावर लेखन करता तो संगणक - सगळे वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेल्या संशोधनातून आले आहेत. त्या प्रत्येक वस्तूला संख्याशास्त्राचा जादूई स्पर्श आहे.

तेव्हा थोडा मान द्या. अगर या सगळ्या वस्तू वापरणं सोडून द्या...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ओके

तेव्हा थोडा मान द्या. अगर या सगळ्या वस्तू वापरणं सोडून द्या...

ओके


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सरकार्-आपण

>>सरकार कोणताही विदा समोर न ठेवता हे विधेयक रेटू पाहतंय.

पुन्हा येथे सरकार ही तुमच्या माझ्यापेक्षा काही वेगळी शक्ती/एण्टिटी आहे अशा दृष्टीने हे वाक्य लिहिलेले आहे. (घटनेवर लेखमाला लिहिणारे आपणच ना?)

लोकांच्या प्रतिनिधींनी अशा आरक्षणाची मागणी केलेली आहे. बहुतेक पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात गेली २० एक वर्षे हा विषय आहे. आजच्या लोकसभेत या विधेयकाच्या पासिंगसाठी बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी पाठिंबा देणार आहेत. ज्यांचा विधेयकाला विरोध आहे अशा लोकप्रतिनिधींचा विरोधही डिटेल्सना आहे (आरक्षणांतर्गत आरक्षण).

मग सरकार हे विधेयक रेटू पाहतंय या म्हणण्याला काय अर्थ आहे?

सर्वांच्या मागणीवरून सरकारने हे विधेयक मांडले आहे. विदा सरकारनेच पुरवला पाहिजे अशी अपेक्षा का असावी?

रोटेटिंग पद्धत तितकीशी चांगली नाही असे माझे मत आहे. त्या ऐवजी काय करावे हे मात्र मला स्वतःला समजत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हे विधेयक

हे वाक्य असे वाचावे
मग सरकार हे विधेयक रेटू पाहतंय.
विधेयक ही प्रतिनिधिंची मागणी आहे ह्याबाबत दुमत नाहिच. मात्र हे विधेयक (आहे त्या फॉर्मॅटमधे) काहि घटकांवर अन्याय करणारं असेल तर ते फक्त १४ वर्षे लांबलं आहे ह्या अपराधीपणाच्या भावनेवमुळे काहि प्रश्न अनुत्तरीत ठेऊन आहे तसं संमत व्हावं का? हा प्रश्न आहे.

बाकी, यासाठी जे या विधेयकाच्या बाजूने आहेत त्यांनी विदा द्यावा.. व तो सरकारने विधेयक मांडताना जनतेसमोर ठेवावा असे म्हटल्यास काय चुकले? माझे मत बनविण्याआधी हे विधेयक मांडणार्‍यांकडे त्यामागील विदा / तर्क मागण्यात मला काहि चुक वाटत नाहि. आणि विधेयकाला विरोध करण्यात तर काहिच चुक नाहि.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

पक्षीय राजकारण

आपल्याकडे पक्षीय राजकारण आहे. सत्ताधारी पक्षाचे हायकमांड पक्षाची ध्येयधोरणे व कामाची पद्धत ठरवते. अशा परिस्थितीत संसदेत किंवा मंत्रीपदावर पुरुष असले काय नी स्त्रिया असल्या काय, त्यानी काय फरक पडणार आहे?

अवघड प्रश्न आहे...?

संवर्गातील महिलांनाही आरक्षण मिळालं पाहिजे याच्याशी सहमत आहे. पण आपण म्हणता तसे ''पडद्याआडून त्याचे पती, वडील, भाऊ, दीर राज्य चालवतील. हे म्हणजे जबाबदारीशिवाय सत्ता मिळणे झाले'' हीच मोठी गोची आहे. स्त्रिया केवळ पुरुषांचेच हातातील बाहुले बनणार असतील तर मग महिला आरक्षणाचा फायदा काय ?

नगरपालिका, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती* इथे महिला निवडून आल्यावर आपण पाहतो की कामाच्या बाबतीत निर्णय घेतो कोण ? त्यामुळे मग त्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो. महिला सक्षम आहेत यात वाद नाही. पण निर्णयप्रक्रियेत त्यांना काही ठरविता येत नसेल तर मग महिलांना आरक्षण नको असे वाटायला लागते. बरं, ज्या काही महिला राजकारणात येतात त्यांच्याकडे पाहतांना समाजाची दृष्टी तितकी नितळ दिसत नाही. [क्षमा असावी या विधानाला कुठलाही आधार नाही, हे मान्य] ते आपले काम नाही अशी एक भावना सामान्य स्त्रियांची असते. स्त्रिया अंतराळात गेल्या, पंतप्रधान, राष्ट्रपती झाल्या हे खरे आहे. पण, सामान्य महिला राजकारणात येण्यास किती उत्सूक आहेत, हाही एक अभ्यासाचा विषय ठरावा.

स्त्रिया सत्तेत सहभागी झाल्या तर शासनातला भ्रष्टाचार कमी होईल. शासनाचा कारभार पारदर्शक होईल. स्त्रियांचे शोषण संपेल, कडक कायदे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दडपण आणतील अशा आणि अजून ब-याच गोष्टी स्त्रिया प्रामाणिकपणे करतील असे वाटते, म्हणून मी संवर्गासहीत महिला आरक्षणाचे समर्थन करतो.

अवांतर : सरसकट आरक्षणाला जे पक्ष विरोध करीत आहेत त्यांनी किती मागासवर्गीय स्त्रियांना प्राधान्य देऊन निवडणूकीस उभे केले आणि निवडून आणले हाही विषय तितकाच महत्त्वाचा आहे.

* ग्रामपंचायत शब्द टंकायला लागल्यावर function map() { [native code]असे का उमटत आहे ?

-दिलीप बिरुटे

का?

स्त्रिया सत्तेत सहभागी झाल्या तर शासनातला भ्रष्टाचार कमी होईल. शासनाचा कारभार पारदर्शक होईल. कडक कायदे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दडपण आणतील अशा आणि अजून ब-याच गोष्टी स्त्रिया प्रामाणिकपणे करतील असे वाटते,

असे आपणाला का वाटते? स्त्रिया पुरुषांपेक्षा प्रामाणिक असतात ह्या गृहितकाला काय आधार आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

अगदी संख्याशास्त्रीय नसले तरी ऍनेक्डोटल पुरावे दिले तरी चालतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काहीही आधार नाही

>>असे आपणाला का वाटते?
असेच वाटते.

>>>स्त्रिया पुरुषांपेक्षा प्रामाणिक असतात ह्या गृहितकाला काय आधार आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
काहीही आधार नाही.

-दिलीप बिरुटे

कबूल.. पण...

स्त्रिया सत्तेत सहभागी झाल्या तर शासनातला भ्रष्टाचार कमी होईल. शासनाचा कारभार पारदर्शक होईल. स्त्रियांचे शोषण संपेल, कडक कायदे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दडपण आणतील अशा आणि अजून ब-याच गोष्टी स्त्रिया प्रामाणिकपणे करतील असे वाटते, म्हणून मी संवर्गासहीत महिला आरक्षणाचे समर्थन करतो.

हे तुमचे मत चर्चेपुरते बरोबर मानले तरी हे सगळे केव्हा तर महिलांना सत्ता देतील तेव्हा. हे विधेयक महिलांना सत्ता देण्यासंबंधी नाहि तर केवळ निवडून आणण्यासंबंधी आहे. त्या निवडून आल्यानंतर त्यांना सत्ता (पक्षी मंत्रीपद, समिती वगैरे) देणे / न देणे पक्षाच्या पर्यायाने पुरुष सदस्यांच्याच हातात आहे.

सध्या नगरपालिकांमधे परिस्थिती अशी आहे की महिला प्रतिनिधी ह्या समस्या मांडतात पण त्यांचे निराकरण करण्याचा अधिकार त्यांना नाहि. नगरपालिकाच कशाला मुंबईच्या महानगरपालिकेच्या स्त्री महापौरांचे अनेक स्वागतार्ह आदेश पक्षादेशापुढे चालेनासे झाले / मागे घ्यायला लागले.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

विधेयक मंजूर झालेच आहे.

>>>सगळे केव्हा तर महिलांना सत्ता देतील तेव्हा.
हो, आता अर्धी लढाई तर महिलांनी जिंकली आहे. आता अर्धी लढाई लोकसभेची बाकी आहे.
महिला आरक्षण झाले म्हणजे महिला निवडून येणारच. राहिला सत्तेचा प्रश्न, ते तर पक्ष ठरविणार ना ?

-दिलीप बिरुटे

पुरूषी चरफड

पुरूषांवर अन्याय?
या आरक्षणामूळे पुरूषांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असले तरी तरी ते तसे नसुन माझ्या मते आजवरच्या पूरुषी वर्चस्वाचे परिमार्जन ठरावे. आजही शंभरटक्के जागांवर स्रियांना उभे राहण्याचे स्वातंत्र्य असले तरी किती टक्के स्रियांना लोकसभेला उभे राहण्यासाठी त्यांच्या घरातील पूरुष परवानगी (!) देतील याचा ही विचार व्हायला हवा.
पुरूषांना बंदी ?
स्रियांसाठी आरक्षित केलेल्या फक्त तेहतिस टक्के जागांवर पुरूषांना उभे रहायला बंदी असणार आहे. हा पदांसाठी इच्छुक पुरूषांवर अन्याय असला तरी आजवर पुरूषांनी स्रियांना शंभरटक्के जागांवर उभे राहायला अलिखित बंदी घातलेली आहे त्याचे काय?
पुरूष मतदारांवर अन्याय?
एखाद्या मतदारसंघात सगळे पुरूष उमेदवार असले तर तो स्रीमतदारांवर अन्याय ठरतो असे आपण म्हणू शकत नाही. त्याच न्यायाने स्री साठी आरक्षित मतदारसंघातील पूरुष मतदारांना उभ्या असलेल्या स्रियांपैकी कुणालाही मत देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतांना त्याला अन्याय कसे म्हणता येईल. कोणत्याही एका चांगल्या, सुशिक्षित, विकासाची जाण व तळमळ असलेल्या स्री उमेदवाराला मत देण्याचे स्वातंत्र्य (जे की आपण आजवर पुरूष उमेदवारांच्या संदर्भात भोगून आपल्या लायकी परीक्षणाचे अनेक नमूने उभे केले आहेत) असतांना एका स्रीला मत द्यावे लागणार म्हणून अन्यायाची बोंब ठोकणे हे अप्पलपोटेपणाचे लक्षण आहे.
पडद्यामागचे पुरूष?
स्रियांच्या आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कारभार पडद्यामागून पुरूष चालवतील, चालवतात हे मान्य. मूळात त्या स्रीला निवडणूकीला उभे करण्यासाठी तयार करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत हे पडद्यामागचे पुरूषच कार्यरत असतात. मग ते त्या सत्तेच्या वापर करणारच झाले. पण एकदा सत्तास्थानी पोचलेली स्री ही नंतर आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय घेण्याच्या (प्रसंगी पुरूषांचा विरोध टाळून) क्षमतेपर्यंत येईलच.
मागासवर्गीय स्री?
स्रियांसाठीच्या आरक्षणात मागास व मुस्लीम स्रियांना आरक्षण असावे ही मागणी म्हणजे मागास स्रियांचे कैवारी असल्याचा डंका मिरवत पूरुषांचे फायदे जपण्याचा प्रकार दिसतो. परंतु तरीही स्रियांसाठीच्या आरक्षणांतर्गत मागास स्रियांसाठी आरक्षण ही या आरक्षणाची अनुभवांती पूढची पायरी होऊ शकते. या मुद्यापायी सगळ्या स्रियांच्याच आरक्षणात खोडा घालणे योग्य ठरत नाही.
एकंदरीत
स्री आजवर पूरुषाच्या हातचे शारीरिक, सांस्कृतिक आणि मनस्वी खेळणे बनून राहीली. पूरुषांनीही तिला कधी दासी तर कधी माता तर कधी देवी म्हणून झुलवत ठेवले. पण आपल्या अज्ञानापोटी आणि या अज्ञानातच आपला आत्मसन्मान मानण्याच्या व्यवस्थित (पूरुषांकडून) जोपासल्या गेलेल्या मानसिकतेपोटी स्रीने आजवर खऱ्या अर्थाने पूरुषाला आपले सर्वस्व बहाल केले आहे. तिने तिच्या अस्मितेची झापडे बंद केली असेही म्हणता येते त्याच बरोबर सगळे जाणवत असूनही पुरूषाशी मांडलेल्या सहजीवनापायी सारे सोसले असेही म्हणता येते. आज स्री आरक्षण म्हणा की अजून काही अशा बाबी म्हणा पूरुषांकडून स्रीला काहीतरी अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करतांना निदान जाणीवेच्या कक्षा विस्तारलेल्या माणसांनी तरी त्यांच्यातल्या पुरूषाला चरफडू देऊ नये असे वाटते.

परिमार्जन

स्त्रियांवर पुरुषीवर्चस्वाने आतापर्यंत केलेल्या अन्यायाचे काही अंशी का होईना परिमार्जन करण्याची संधी म्हणजे महिला आरक्षण असे काहीसा सुर मला दिसतो. विधेयकाच्या बाजुने न बोलणे म्हणजे महिला विरोधी असणे असे चित्र उभ करण्यात काही गट प्रयत्न करतात. आणी महिला विरोधी असणे म्हणजे पुढे विवेकी , पुरोगामी नसणे व अविवेकी व मागासलेले असणे असे पुढे ताणता येते. संख्या शास्त्राला वेठीस धरण्यापेक्षा तारतम्याने अनेक गोष्टी कळतात. सांख्यिकी हे साधन आहे पण एकमेव साधन नव्हे. १० चे १२ झाले हे ऐकायला फार फरकाचे वाटत नाही पण २० टक्के वाढ असे म्हणले की काहीतरी ठळक परिणामकारक वाटते.
मला हा विषय बुद्धीदांडग्यांचा खेळ वाटतो. थोड सौम्य बोलायचे झाले तर ती शाब्दिक कसरत आहे. महिलांचे सबलीकरण हे आरक्षणाने होईल हे तितकेसे पटत नाही. आरक्षण हे दुर्बल घटकांसाठी असत. आरक्षण ही सुरवातीला काळाची गरज असते व नंतर काळानुसार त्यात धोकाही असतो. त्यामुळे अशा द्विमितीत प्रश्नाला अडकुन ठेवणे हे इतर बाजु झाकुन टाकण्यासारखे होईल. आरक्षण हा नेहमीच चर्चेचा म्हणजे गुर्‍हाळाचा विषय आहे. या विषयाला अनेक पैलू आहेत.त्यावर सरसकट भाष्य करणे अतार्किक ठरेल. या पुर्वी उपक्रमावर जात आरक्षण या निमित्ताने झालेली चर्चा आठवा.
मला स्वतःला महिला आरक्षण पेक्षा महिला सबलीकरण हा मुद्दा मह्त्वाचा वाटतो. स्त्रीला ती केवळ स्त्री आहे म्हणुन संधि नाकारणे असे घडु नये यासाठी प्रयत्नाची दिशा असावी.
प्रकाश घाटपांडे

परिमार्जन नाही

श्री घाटपांडे काही सदस्यांनी 'अन्यायाचे परिमार्जन'सदृश मत मांडले आहे पण त्यांचे मत तेवढ्यापुरतेच सीमीत नाही. या चर्चेचा तो प्राथमिक सूर नव्हे. विरोधकाच्या बाजूस उभे न राहणार्‍या लोकांना कोणी लेबले लावत असेल तर तो लेबले लावणार्‍यांचा प्रश्न आहे. वर कोणीही कोणाला लेबल लावलेले दिसत नाही.

१० चे १२ झाले हे ऐकायला फार फरकाचे वाटत नाही पण २० टक्के वाढ असे म्हणले की काहीतरी ठळक परिणामकारक वाटते.

१० चे १२ होणे ही खरोखरच परिणामकारक वाढ आहे. टक्केवारी वापरली नाहीतर ४० चे ४२ हे १० चे १२ सारखेच वाटेल. सांख्यिकी हे एकमेव साधन अजिबात नाही. ते अनेक साधनांपैकी एक आहे हे मान्य. पण त्या अनेक साधनांना सांख्यिकीची जोड नसल्यास त्या साधनांच्या उपयुक्ततेसंदर्भात काहीच भाष्य करता येणार नाही. 'बुद्धिदांडग्यांचा खेळ' असे म्हणून तुम्ही ज्या लेबले लावण्याला वर आक्षेप घेतला आहे तेच केले आहे.

महिलांचे सबलीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी आरक्षण एक आहे - एकमेव नाही. लोकशिक्षण, शिक्षणात संध्यांची वाढ असे इतर उपाय आरक्षणाने थांबणार नाहीत. काही प्रमाणात आरक्षण या उपायांना पूरक ठरेल. महिला प्रतिनिधींना महिलांच्या प्रश्नांची जास्त चांगली कल्पना असू शकेल. (उदा. नीधपतै यांनी मांदलेली प्रसाधनगृहांची समस्या) आरक्षण कायम स्वरुपाचे असू नये असेच माझेही मत आहे. परंतु ते कायमस्वरुपाचे होण्याची शक्यता भविष्यात आहे म्हणून मी त्याला विरोध करणार नाही. कायमस्वरुपाचे समजा झाले आणि ७०% महिला प्रतिनिधी निवडून येऊ लागल्या तर आरक्षणास लोकांचा पाठींबा मिळणे कठीण जाईल.

चर्चाप्रस्तावातील (चर्चाप्रस्तावकाच्या नाही) मुद्द्यांमध्ये आरक्षण असावे किंवा नसावे अशा प्रकारचे द्विमितीय आहेत. तेव्हा चर्चेत बहूमितीय कारणांतून द्विमितीय प्रश्नाबाबत उत्तर मिळणे अपेक्षित असावे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

आज एका चर्चेत ऐकलेले वाक्य

"प्रागैतिहासिक प्रवृत्तींनी थांबवलेले एक ऐतिहासिक विधेयक. "
:-)

आरक्षण

राज्यसभेत आरक्षण मंजुर झालं.विरोधक असण्यारयांचा दु:खात व सहमत असणारयाचा पार्टी (कोरडया) मी सहभागी आहे.

शैलु

(माझ्याकडून) समाप्त

चर्चेतून फलनिष्पत्ती व्हायच्या आत राज्यसभेत आरक्षण बिल संमत झालं. महिलांच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय पातळीवर आरक्षण हे गरजेचे आहे असे मानणार्‍यांचे मनापासून अभिनंदन करतो.

मात्र इतक्या वैविध्यपूर्ण चर्चेनंतरही मी माझे याविषयी असं ठाम मत बनवू शकलो नाहि याबद्दल मला वैयक्तीक खेद वाटतो आहे. असो तूर्तास ही चर्चा माझ्याकडून संपवतो.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर