मोडी लिपी

गेल्या महिन्यात मला ईतिहास संशोधक मंड्ळाच्या सौजन्याने मोडी लिपी शिकण्याचा योग आला. ह्या क्लास मध्ये माझ्या सकट अनेक् तरुण तरुणी व जेष्ट नागरीकांचा सहभाग होता. १९ दिवसांच्या या क्लास ने माझी एका विस्मरणात गेलेल्या लिपीची ऑळख झाली व टाकाची छापील मोडीतील लेख वाचण्या इतपत माझी प्रगती झाली. श्री मंदार लवाटे हे तरुण् शिक्षक आम्हाला खुपच जिव्हाळ्याने शिकवीत. महाराष्ट्राच्या शिवकालीन व पेशवेकालीन ईतिहासाची ओळख करावयाची असेल तर मोडी वाचता येणे व त्याचा सतत अभ्यास करणे आवश्यक आहे हे त्त्यांनी आमच्या मनावर यशस्वी रित्या बिंबवले. ते स्वतः गेल्या ८ वर्षांपासुन यात रस घेत असुन त्यांची प्रगती आश्चर्य कारक आहे याचे कारण त्यांनी आपला व्यवसाय सांभाळुन या विषयाला वाहुन घेतले आहे.

या वर्गाचा एक महत्व पुर्ण फायदा म्हणजे मिळालेली खुपच रंजक माहिती. एक म्हणजे ईतिहासाची मोडी लिपीत जवळ जवळ १५ लाख पाने अशी आहेत कि जी अजुन वाचल्या गेली नाहीत आणी त्यात दडलेला इतिहास ही आपणास माहीत नाही. दुसरी बाब म्हणजे मोडी लिपी चे जाणकार अख्ख्या महाराष्ट्रात केवळ १०० आहेत हेही कारण या अप्रकाशीत इतिहासामागे असावे.

पुर्वि मोडी लिपीतच सर्व खाजगी व कार्यालयीन व्यवहार महाराष्ट्रात होत असले तरी हिचा उगम नक्की माहित नाही. एका विचार प्रवाहानुसार महादेव यादव व रामदेव यादव् यांचे काळात(१२६०-१३०९) हेमाडपंतांनी(किंवा हेमाद्री पंडीत) ही लिपी विकसीत केली तर काहीच्या मते हेमाडपंतानी हि लिपी श्री लंके हुन आणली.

काही विद्वांनाच्या मते मोडी हा शब्द मौरयी या वरुन आला असावा यावरुन असे निदर्शनास येते कि मोडि चा उगम किवा याचे हे रुप मौरयी लिपी वरुन प्राप्त झाले असावे. मौरयी लिपी ही मौर्य वंशाच्या काळात वापरली जात असे. भारतावर मौर्य वंशाचे राज्य हे ई.स्.पुर्वी ३२२ ते १८५ या दरम्यान होते. मोडी लिपी हि लिहीण्यास जलद असल्याने देवनागरी पेक्षा तिला अधिक महत्व प्राप्त झाले. लेखणी न उचलता हि लिपी लिहीता येते कारण देवनागरी सारखे मोडीत शब्द तोडावे लागत नाहीत.

चार्लस विल्कीन याने ह्या लीपीचे टाईप तयार केले जेणे करुन काही मर्यादित स्वरुपात छपाई साठी त्याचा उपयोग झाला. हि लिपी १९५० पर्यंत वापरात होती त्यांनंतर मात्र तिचा वापर अधिक्रुत पणे बंद केला गेला कारण छापण्यासाठी ती अवघड होती. आणी तेंव्हापासुन मराठी देवनागरीत् लिहील्या जाउ लागली.

आपल्याला मोडी वाचता येते हा अनुभव खरच सुखद आहे. उपक्रमावरिल मित्रांनी हि लिपी अवगत करण्याचा जरुर् प्रयत्न करावा व ईतिहासाची अप्रकाशीत पाने उजेडात आणण्यास हातभार लावावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

मोडी लिपी

आंतरजालावर मोडी शिकण्याची काही सुविधा उपलब्ध हो ऊ शकेल का?

चन्द्रशेखर

ह्यो दुवा घ्या

दुव्यावरुन मोडी उतरून घ्या आन शिका मोडी भाषा.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

धन्यवाद

बाबूराव

धन्यवाद मी बरेच दिवस अशा दुव्याच्या शोधात होतो.

चन्द्रशेखर

मोडी लिपी

या साइट मोडी लिपी ची माहिती आहे पण् सरावासाठी मोडी ची पुस्तके ढवळे प्रकाशनाची उपलब्ध आहेत्.
विश्वास कल्याणकर

पंधरा लाख पानं!

इतकं असूनही मोडी शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी स्वत:चा व्यवसाय सांभाळून हे कष्ट करावे लागतात ही वाईट परिस्थिती आहे. शैक्षणिक खातं, संस्था यांची या बाबतीत उदासीनता आहे असं वाटतं.
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मौरयी?

मी मौरयी नावाची लिपी असल्याचे आधी कधी ऐकलेले नाही. मोडी ही मौरयीवरून आली नसावी असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. याचे कारण मोडी हे नागरी किंवा देवनागरी लिपीचे जलद टंकलेखन आहे. मौर्यकाळात नागरी लिपी अस्तित्वात नव्हती त्यामुळे मोडी असणे अशक्य आहे.

हेमाडपंतांनी ती प्रचलित केली असे अनेक ठिकाणी वाचलेले आहे आणि तेच मला योग्य वाटते.

इतिहासातील १५ लाख पाने अशीच पडून आहेत हे वाचून खेद झाला. शासकीय दरबारातील लेखाजोखीचे दस्त ऐवज असले तरी त्यातून महत्त्वाची माहिती कळू शकते.

मोडी शिकून आपण नेमके तिचा उपयोग कसा करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ऐतिहासिक पाने सरकारदरबारी कड्या कुलुपांत बंद असतील तर?

मोडी लिपी

तंजावर येथे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधुंचे वंशजांनी त्या काळातील कामकाजाचे दस्तावेज मोडी लिपीत व्यवस्थीत जपुन ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे.

विश्वास कल्याणकर

वाचून पहा

मग आता आपण मोडी शिकला आहात तर ती वाचून पहा आणि आम्हाला सांगा.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सरस्वती महाल ग्रंथालय

तुम्ही सरफोजी राजांच्या सरस्वती महाल ग्रंथालयाबद्दल म्हणत आहात असे वाटते. तुमचे म्हणणे बरोबर आहे. सामान्य जनतेला या ग्रंथालयात अशा दस्त ऐवजांचा ऍक्सेस असेल तर उत्तम आहे. तुम्ही किंवा तुमच्या परिचितांनी यावर काही मोडी वाचन केले तर अवश्य कळवा.

+ १

असेच म्हणतो.

१५ लाख हा आकडा प्रचंड मोठा आहे :(
व फक्त १०० मोडी जाणकार.... डोके सुन्न्न झाले आहे.. !

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

विखुरलेले मोती

प्रियालींच्याच विखुरलेले मोतीवरून.. "सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भकोश म्हणून वापर करता येतो". अर्थात याचा अर्थ दस्तऐवज खुले असतील असे नाही. अशी अनेक हस्तलिखिते मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या गंथालयात आहेत, पण त्यांतले एक नुसते बघायला मला भरपूर वशिला लावायला लागला होता.
सरस्वतीमधील अनेक पुस्तके ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली असून ती पुस्तक प्रदर्शनांमध्ये विक्रीला ठेवलेली दिसतात. --वाचक्नवी

मोडीवरील् संशोधन्..

प्रियालींना मी फार पूर्वी मोडीवरील गो.का. चांदोरकरांच्या ई-पुस्तकाचा दुवा पाठवला होता. तेव्हा त्यांना ते पुस्तक उघडायला फार त्रास झाला होता आणि पुस्तक आवडलेही नव्हते. आर्यलिपी नावाचे ते पुस्तक बहुतेक या ठिकाणी होते.(या स्थळावर मराठीतली अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत असे आठवते.) हे पुस्तक आणि इतर पुस्तके एकदा उघडून वाचायला हरकत नाही.--वाचक्नवी

मोडी प्रशिक्षण वर्ग -

असाच एक मोडी प्रशिक्षण वर्ग १९९४ मधे पुणे अर्काईव्हजने आयोजीत केला होता. त्यावेळेस आम्हाला मोडी लिपी तर शिकवलीच आणि त्याबरोबर जुने कागदपत्र वाचता येण्यासाठी हीजरी कालगणना, नाणी व आर्थिक व्यवहार, वजने, मापे, राजशिष्टाचाराची संबोधने, ईत्यादी गोष्टींची माहिती दिली होती. सध्या असा प्रशिक्षण वर्ग तेथे घेतला जातो का हे माहित नाही, पण अर्काईव्हजमधील मोडी कागदपत्रे अभ्यासकांना पाहता येतात.

शिपाईगडी

प्रियाली ताईंचे म्हणणे बरोबर

तुम्ही सरफोजी राजांच्या सरस्वती महाल ग्रंथालयाबद्दल म्हणत आहात असे वाटते. तुमचे म्हणणे बरोबर आहे. सामान्य जनतेला या ग्रंथालयात अशा दस्त ऐवजांचा ऍक्सेस असेल तर उत्तम आहे. तुम्ही किंवा तुमच्या परिचितांनी यावर काही मोडी वाचन केले तर अवश्य कळवा.

प्रियाली ताईंचे म्हणणे बरोबर आहे. मात्र सरस्वती महालातील हस्तलिखितांना सहजासहजी नुसते पहायला शक्य आहे पण शोधकार्यासाठी ती हाताळायला - शांतपणे नोट्स काढायला सध्या तरी शक्य नाही अशी परिस्थती आहे.
नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यांच्या संदर्भात, मी सर्फौजी राजेंच्या सध्याच्या वंशजांशी ओळख काढून काही ताडपट्ट्या मिळवायचा प्रयत्न केला होता. त्यांनी डॉ. विवेकानंद (यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून मोडी शिकून तंजावरमधील संग्रहालयातील काही महत्वाच्या दस्तऐवजांचे रुपांतर केले आहे) ज्यांचे पुर्वज मराठी होते अशा तेथे स्थाय़िक झालेल्या शोधकर्त्यामार्फत सरस्वतीमहालात नेऊन अनेक ताडपट्ट्यांचे दर्शन घडवले होते. उपलब्ध कॅटलॉगमधे नाडी ग्रंथांचे पुरावे मिळाले नाहीत. तीच गोष्ट कोन्नेमिरा, मद्रास विश्वविद्यालय व थिऑसॉफिकल सोसायटीच्या पुस्तक संग्रहालयांची आहे. चाळायला नाही म्हटले जात नाही पण तेथील टेबलावर बसून शांतपणे वाचायला मागितले तर तमिळमधे फार कुरकुर करून शेवटी दुरुत्साहित करतात. असा अनुभव मला नाडी ग्रंथांच्या ताडपट्यांच्या शोधाच्या संदर्भात आला आहे.
असो चालायचेच.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

मोडी लिपीला व्यवसाय म्हणून सुद्धा निवडता येईल

शासकीय कार्यालयं, पुरातत्व विभाग आणि कोर्टात मोडी लिप्यांतराची वारंवार गरज भासत असते. इतर क्षेत्रामधे करिअर करता करता मोडी लिप्यांतरामुळेही स्वयंरोजगार मिळवता येतो. मराठी भाषेवर प्रभुत्त्व असलेल्यांना हे क्षेत्र खुणावतंय.
मध्यंतरी ठाण्याच्या कोर्टात काही कामानिमित्त जाणं झालं, तेव्हा तिथे एक तरुण भेटला. केमिकल इंजिनीअरिंगचा हा ओळखीचा विद्याथीर् इथे काय करतोय, या प्रश्नाने मनात कुतूहल निर्माण झालं. फावल्या वेळात मोडी लिपीतल्या मजकुराचं देवनागरीत लिप्यांतर करण्याचं काम करतो, हे कारण त्याने सांगितल्यानंतर थक्क व्हायला झालं.
सरकारी कार्यालयं, पुरातत्त्व विभाग आणि कोर्टात अशा प्रकारची कामं निघतच असतात, त्यामुळे या क्षेत्रात लिप्यांतराची वारंवार गरज भासत असते. पण मोडी लिपीच्या जाणकारांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने या क्षेत्रातील कामांना मर्यादा येत आहेत. या ठिकाणाहून आपल्याला अधून-मधून बोलावणं येत असल्याचं तो तरुण सांगत होता. बारावीची परीक्षा झाल्यावर हौस म्हणून त्याने मोडी लिपी प्रचारक संस्थेचा काही आठवड्याचा कोर्स केला होता. तो परीक्षाही उत्तम मार्काने पास झाला होता. आज, या क्षेत्रात काम करून शिक्षणाला पूरक पैसे मिळवता येत असल्याचं त्याने सांगितलं.
अवघ्या जगाला आज मंदीने ग्रासलंय. भल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही या परिस्थितीपुढे माना टाकत असल्याने उच्चपदस्थांच्या नोकऱ्याही संकटात आल्या आहेत. अशा वेळी या तरुणाने शोधलेला हा स्वयंरोजगाराचा मार्ग खूपच प्रशंसनीय वाटला. याकडे अद्यापि कुणाचं फारसं लक्ष गेलेलं नसावं. मोडी ही तशी प्राचीन भारतीय लिपी आहे. देवगिरीच्या महादेव आणि रामदेवराव यादव यांच्या कारकीदीर्त १२६० मधे हेमाडपंत महामंत्री होता. त्याने वेगवान लिहिण्याच्या गरजेपोटी या लिपीचा स्वीकार केला, त्यानंतर त्याचा प्रसार झाला असं संशोधक मानतात. हेमाडपंताने लंकेतून ही लिपी आणली, असंही काही जाणकारांनी म्हटलंय.
.
मुंबईतील काही मंडळी एकत्र येऊन मोडी लिपीचे वर्ग चालवतात. कोणताही तरुण या प्रशिक्षण वर्गातून शिकून लिप्यंतरासाठी तयार होऊ शकतो. मराठीचा उत्तम जाणकार काही महिन्यातच हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला. या कामासाठी दैनंदिन जीवनातील केवळ काही तासच खर्च करावे लागतात. मोबदल्याची रक्कम बऱ्यापैकी रोख आणि त्वरित मिळते. भाषेत रस असल्यास लिप्यंतरही सहज जमू शकतं.
देवनागरीत प्रत्येक अक्षर सुटं असतं आणि ते लिहिताना प्रत्येक वेळी लेखणी उचलावी लागते. त्यामुळे लिहायला वेळ लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी हेमाडपंताने देवनागरीतली अक्षरं मोडून जलद लिहिता येईल, अशी मोडी लिपी शोधून काढली. विसाव्या शतकापर्यंत ही लिपी प्रचारात होती. पेशवे दप्तर संपूर्णपणे मोडी लिपीतच आहे. मोडी लिपित चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणं प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला.
तंजावरला मराठ्यांचं राज्य होतं. तिथे अशी मोडी लिपीतली अनेक कागदपत्रं दुर्लक्षित आहेत. त्यांचं वाचन, लिप्यांतर करण्याचं काम हे एक प्रकारे समृद्ध इतिहास जतन करण्यासारखं आहे. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मोडी लिपीतील सहीची बरीच कागदपत्रं पाहायला मिळतात. मिशनऱ्यांची पहिली मराठी पुस्तकंही मोडीतच आहेत. लिप्यंतराचं काम पैसे मिळवून देणारं आहेच, शिवाय त्यातून भाषिक ज्ञान आणि समाधानही मिळतं. मूळातच भाषेची आवड, भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची तयारी आणि वेगळं काही करून दाखवण्याची इच्छा असलेल्या तरुणांना हे क्षेत्र करिअरसाठी उत्तम आहे.

 
^ वर