इंग्रजीचं सोवळं

(खालील वाक्यं संवाद म्हणून वाचू नयेत)
'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या. त्यांच्याकडे न्यूज आहे..'
'तो गे आहे, माहीत नव्हतं का तुला?'
'काय मग, हनीमूनला कुठे जाणार?'
'डॉक्टर, एम. सी. च्या वेळी मला...'
'काही नाही, थोडी डीसेंट्री झाली होती.'
'माझे वडील दोन वर्षांपूर्वीच एक्स्पायर झाले'
'डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास झाला तिला. कॉंम्प्लिकेशन्स झाल्या - युटेरस काढावं लागलं.'
'व्हजायनल इन्फेक्शन...'
'एक किस दे मला...शाणा मुलगा!'
'त्याला अजून ब्रेस्ट फीडींग करतेस?'

असे अनेक संवाद आपल्याला ऐकू येतात, आपण बोलतोही. एकंदरीतच मराठी भाषेत इंग्रजीचे शब्द घुसलेले आहेत. पण ही चर्चा त्या सर्वसाधारण तक्रारीची नाही. ही विशिष्ट विषयांसाठी इंग्लिश शब्द वापरण्याबाबत आहे.

आपण - विशेषत: ब्राह्मणी, शहरी, पांढरपेशा वर्गातले (मला दुसरा कुठला अनुभव नाही त्यामुळे माझी मतं तशी कोती आहेत) खूप लाजरे आहोत असं आपल्या भाषेकडे बघितलं तर वाटतं. शिव्या देणं, लैंगिक अवयवांचा, संबंधांचा उल्लेख करणं वगैरे बाबतीत आपण काहीसे कचरतो. तशा सगळ्याच भाषा, समाज असले विषय थोडे जपूनच हाताळतात हे खरं आहे. पण मराठी भाषेत मला ते जास्त जाणवतं. वरच्या उदाहरणात बघितलं तर सगळेच शब्द कायम वापरले जात नाहीत, त्यातल्या काहींसाठी मराठी प्रतिशब्दही वापरतो (उदा. पाळी, गेले). काही शब्द वैद्यकीय परिभाषेतून आलेले व रुळलेले असू शकतील. पण तरीही काही मूळ मराठी शब्द कधीच वापरत नाही, किंवा खूप कमी ऐकू येतात - उदाहरणार्थ चुंबन, किंवा मुका. किंवा हगवण. ते व्यक्त करण्यासाठी आपण इंग्लिशच्या कुबड्यांचा आधार घेताना दिसतो. इंग्लिशमध्ये त्या विषयावर बोलणं आपल्याला कंफर्टेबल वाटतं. व्हिक्टोरिअन प्यूरिटानिजम प्रमाणे तो ब्राह्मणी सोवळेपणा मला वाटतो. इंग्रजी शब्दांमुळे त्या सोवळेपणाला तडा जाणाऱ्या अर्थाची धार बोथट होते असं वाटतं. संकोच वाटणाऱ्या संकल्पनांना दुसऱ्या भाषेचे रबरी ग्लोव्ह घालून निर्जंतूक करता येतं. दूर ठेवता येतं. कधी कधी ही लाज झाकायला आपण इंग्रजीऐवजी संस्कृत शब्दांचं सोवळं नेसतो. तुकारामाने जितक्या स्पष्ट शब्दात वेगवेगळ्या गोष्टींसाठी अस्सल मराठी शब्द वापरले, तसे आपण आजकाल वापरत नाही. त्याने त्याच्या अभंगांमध्ये - नुसत्या वैयक्तिक संभाषणांमध्ये नाही - गांड किंवा झवणे इत्यादी शब्द वापरले. 'वाघिणीचे दूध प्याया वाघ बच्चे का पडे?' असा प्रश्न माधव ज्यूलियनांनी विचारला. तो वेगळ्या संदर्भात विचारता येतो. आपल्याच आईचं 'ब्रेस्ट मिल्क' प्यायला आपण का लाजतो?
ही अर्थातच माझी मतं झाली. तज्ञांनी अधिक माहिती द्यावी. (अशी चर्चा आधी झालेली असणं खूपच शक्य आहे, तेव्हा तसं असल्यास दुवा द्या)

तुम्हाला असा अनुभव तुमच्या वा इतरांच्या वापराबाबत आहे का? (वरील उदाहरणांना काही मर्यादा आहेत हे मान्य आहे, इतर उदाहरणांनाही त्याच मर्यादा आहेत का?)
तसं असल्यास तुम्हाला माझी कारणं पटतात का, की दुसरी कोणती कारणं आहेत?
त्यासंदर्भात उपप्रश्न : उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?

(कृपया सुरूवातीला तरी शक्यतो तीनही प्रश्नांची उत्तरं द्यावी ही विनंती)

लेखनविषय: दुवे:

Comments

भाषा

पण तरीही काही मूळ मराठी शब्द कधीच वापरत नाही, किंवा खूप कमी ऐकू येतात - उदाहरणार्थ चुंबन, किंवा मुका. किंवा हगवण. ते व्यक्त करण्यासाठी आपण इंग्लिशच्या कुबड्यांचा आधार घेताना दिसतो. इंग्लिशमध्ये त्या विषयावर बोलणं आपल्याला कंफर्टेबल वाटतं.

मला तरी दुसर्‍या भाषेतील शब्दांचा आधार घेण्यात काहीच गैर वाटत नाही. स्वत:ला जे सांगायचे आहे ते स्वत:ला आणि दुसर्‍यालाही कम्फर्टेबल वाटेल त्या शब्दात सांगण्यात काय चूक आहे? मला हगवण लागली आहे या पेक्षा मला डायरिया झाला आहे हे वाक्य बोलणार्‍यालाही आणि ऐकणार्‍यालाही जास्त सुखकर आहे यात शंकाच नाही.
चन्द्रशेखर

साध्यासोप्या मराठीचा वापर

उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?

मला असे वाटत नाही. विषयानुसार किंवा लेखनानुसार भाषा किंवा तिचा बाज बदलणार. उपक्रम माहितीप्रधान संकेतस्थळ असल्यानेही मर्यादा आहेत. अधिकाधिक लोकांपर्यत (चांदा ते बांदा) आपले म्हणणे पोचवायचे असल्यास प्रमाण भाषेला पर्याय नाही. साध्यासोप्या मराठीचा वापर मात्र वाढायला हवा. म्हणजे केवळ साधीसोपी मराठीच हवी असे नाही. मला असे वाटते की आपण जे काही लिहितो ते सगळ्यांपर्यंत पोचेल ह्याबद्दल काळजी , विशेषतः इंटरनेटवर, घ्यायला हवी.

तूर्तास एवढेच. इतर मुद्द्यांवर मते सावकाश मांडीन.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही शक्यता

रोचक विषय.
मराठी/भारतीय/विकसनशील देशातल्या/एकेकाळच्या इंग्रजांची वसाहत असणार्‍या लोकांच्या मनातले इंग्रजी भाषेसंबंधीचे असोसिएशन (मराठी शब्द) हे , कुठल्याही गोष्टीकडे बघण्याच्या शास्त्रीय म्हणा, वस्तुनिष्ठ म्हणा किंवा विवेकी म्हणा - या दृष्टीकोनाशी झालेले आहे अशी एक शक्यता आहे. याउलट् देशी भाषेबद्दलचे असोसिएशन हे अज्ञानाशी, अशास्त्रीय दृष्टीकोनाशी, अप्रगल्भ विचारसरणीशी झालेले आहे ही बाब वरच्या विधानाचाच व्यत्यास होय.

साधे उदाहरण घेऊ. "बेंड आलेले असणे/येणे" या संज्ञेचा (माझ्या समजुतीप्रमाणे )अर्थ पाईल्सचे दुखणे किंवा थ्राँबोसिस् च्या प्रकाराशी निगडीत आहे. द मा मिरासदार यांच्या एका ग्रामीण पार्श्वभूमीशी निगडीत असणार्‍या "साक्षीदार" नावाच्या कथेमधे असा एक विनोद आहे , की एक "भाडोत्री" साक्षीदार बावळटपणाचे आवरण घेऊन असे विनोद करतो , जेणेकरून त्याची साक्ष खरीच वाटावी आणि प्रतिपक्षाचे खच्चीकरण व्हावे. ही साक्ष देताना , तो एका व्यक्तीला "बेंड आले होते" असे विधान करतो. यावर हास्यस्फोट होतो. आता ही कथा एका अमेरिकन सेटअप् मधे उभी करायची झाल्यास हा विनोद संभवणार नाही. "ही अंडरवेंट् ट्रीटमेंट् फॉर् थ्रॉम्बोसिस्" या विधानाने कुठलाही हास्यस्फोट होत नाही. माझ्या पत्नीचा बॉस आठवडाभर या कारणाने रजेवर होता. हे कारण त्याने निर्विकारपणे सांगितले आणि सर्व स्टाफमधे कुठलेही इतर ऑपरेशन असावे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया घडत होती.

यामधे खालील मुद्दे येतात :

१. अशा संवेदनशील (?) विषयांबद्दल चर्चा करताना इंग्रजी (किंवा प्रसंगी संस्कृत ) भाषेत चर्चा करताना आपल्याला देशी भाषेपेक्षा अधिक "प्रगत" "शास्त्रीय" "वस्तुनिष्ठ" दृष्टीकोन अंगिकारल्याची जाणीव होणे.

२. अशी जाणीव येण्यामागे आपल्या वसाहत असलेल्या इतिहासाची असणारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणीव. या पार्श्वभूमीवर , जर्मन किंवा रशियन किंवा जपानी समाजात काय वातावरण असेल असे कुतुहल वाटते.

३. संवेदनशील ( पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह !) विषयांबद्दल आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधे असलेला कमीजास्त मोकळेपणा. [ आणि यात पुन्हा एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. उदाहरणार्थ : शोभा डे यांच्या कादंबर्‍यांमधला - लैंगिक आणि इतर बाबतीतला - मोकळेपणा एखाद्या माणसाला अति वाटू शकतो. मात्र याच माणसाला आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरातल्या स्त्रीवर्गात असलेल्या अज्ञानामुळे वेगवेगळे स्त्रीरोग वेळेवारी उपचार न होण्याबद्दल वैषम्य वाटू शकते. ]

प्रवाही भाषेत शब्दांचे येणे-जाणे होईलच.

>>तुम्हाला असा अनुभव तुमच्या वा इतरांच्या वापराबाबत आहे का?
हो ! असा अनुभव स्वतःचा आणि इतरांचाही आहे. सोपे मराठी शब्द असतांना उगाच इंग्रजी शब्द मुद्दामहून बोलण्यात येतांना दिसतात. अर्थात प्रतिष्ठा आणि संकोच ह्या मुद्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

>>असल्यास तुम्हाला माझी कारणं पटतात का,
हो पटतात.

>>उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?
उपक्रमची भाषा सोपी आणि समजणारी आहे. मात्र काही व्यक्तींची भाषा ही विद्वत्ताप्रचूर आहे, ती सर्वांना समजेल,रुचेल अशी असावी असे वाटते.

-दिलीप बिरुटे

उत्तरे

तुम्हाला असा अनुभव तुमच्या वा इतरांच्या वापराबाबत आहे का?

होय

तसं असल्यास तुम्हाला माझी कारणं पटतात का, की दुसरी कोणती कारणं आहेत?

काहिसा सहमत. मात्र माझ्यामते हल्लीच्या भारतीय समाजात उघडपणे याविषयांवर बोलणे समाजमान्य नाहि. भाषा ही समाजातून तयार होत असल्याने त्या भाषेतला शब्दवापर हा त्या समाजातील शिष्ट-अशिष्ट संमती दर्शवतो. आता भारतीयांत परकीय अश्या केवळ इंग्रजी/फारशी/उर्दू याच भाषा सर्वश्रृत आहेत. त्यातील इंग्रजी बोलणार्‍या समाजात याविषयांवर बोलणे अशिष्ट मानले जात नाहि अशी भारतीय (इथे मराठी) समाजाची समजूत आहे (हे खरे की खोटे इथे गैरलागू आहे). आणि त्यामुळे त्या भाषेतील शब्द वापरले जातात असे वाटते. मात्र जेव्हा समोरच्याशी बोलताना शिष्ट-अशिष्टतेचे बंधन नसते (उदा. जवळच्या मित्रांत) किंवा जाणूनबूजून अशिष्ट बोलायचे असते (भांडणात) तेव्हा हटकून मराठी शब्द दिसतात

त्यासंदर्भात उपप्रश्न : उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?

असे वाटत नाहि.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

मराठीत इंग्रजी अशी नको

ते व्यक्त करण्यासाठी आपण इंग्लिशच्या कुबड्यांचा आधार घेताना दिसतो. इंग्लिशमध्ये त्या विषयावर बोलणं आपल्याला कंफर्टेबल वाटतं. व्हिक्टोरिअन प्यूरिटानिजम प्रमाणे तो ब्राह्मणी सोवळेपणा मला वाटतो. इंग्रजी शब्दांमुळे त्या सोवळेपणाला तडा जाणाऱ्या अर्थाची धार बोथट होते असं वाटतं.

या मताशी सहमत. खरे तर महाराष्ट्रातल्या प्रमाणीकरण करणाऱ्या वर्गाने मराठी भाषा म्हणून आजपर्यंत जो घोशा लावला आहे तो ते जी तथाकथित प्रमाण भाषा बोलतात त्या भाषेपायीच आहे. इंग्रजी शब्दांचा आधार घेत सोवळेपणा जपतांना जी भाषा बोलली जाते ती सुध्दा मराठीच असल्याचा दावा ही मंडळी सहज करु शकतात (उदा.मला तरी दुसर्‍या भाषेतील शब्दांचा आधार घेण्यात काहीच गैर वाटत नाही. ) परंतु यातून एकच जाणीव स्पष्ट होते ती म्हणजे ग्राम्य म्हणून किंवा लोकभाषा म्हणून जी भाषा बोलली जाते ती मराठी मराठी भाषा जंतूसंसर्ग झालेली आहे. (दुसऱ्या भाषेचे रबरी ग्लोव्ह घालून निर्जंतूक करता येतं. ) आपल्याच भाषेतल्या या शब्दसामर्थ्याला आपण संसर्गासारखे टाळत असू आणि त्याहूनही त्यासाठी दूसऱ्या अर्थात प्यूअर भाषेचा आधार घेत असू तर आपण आपल्या भाषेवर अन्यायच करतो. आजकाल नाकाला शेंबूड आला असे न म्हणता नाक आले असे म्हणण्याची पद्धत होते आहे.
चला काही शब्द वाटत असतील आज लाजिरवाणे पण म्हणून मराठीतच त्याला सरळ सोपा पर्याय का शोधू नये. त्यासाठी प्यूअर भाषेचा आधार कशाला. ग्रामीण भागातच वापरले जाणारे पर्याय पहा.
संडासला जाणे - परसाकडे जाणे
साप चावला - पान लागलं
मासिक पाळी असणे - शिवायचे नाही.

अवांतर - जेव्हा एखाद्या परकीय वस्तूसाठी अथवा घटना प्रयोगासंबंधी आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा तो ओढूनताणून मराठीत करायची आवश्यकता नसावी. कॉम्प्यूटर, रेल्वे, कॅलक्यूलेटर, टेलिफोन हे शब्द परकीय उपकरणांचे आहेत. त्यांच्या शोधकर्त्यांनी त्यांना तसे संबोधले मग आपण ते शब्दच मराठी म्हणून (उदा. कॅलक्यूलेटर हाच शब्द मराठी शब्द) वापरायला हवे. ऑक्सफर्ड च्या शब्दकोशात गंगा, कृष्ण हे शब्दच इंग्रजी शब्द म्हणून समाविष्ट झाले आहेत.
या अशा वापराने मूळ मराठी ही नामशेष न होता अधिक विस्तार पावेल.लवचिकता हा भाषा अस्तित्व टिकण्यातला महत्त्वाचा भाग ठरतो. एरव्ही ज्ञानेश्वरी व गाथेतली भाषा आजच्या भाषकांच्या निरुपणाशिवाय पचनी पडत नाही . परंतु तरीही तीही मराठीच होती आणि आजची भाषाही मराठीच आहे. उद्याची कदाचित इंग्रजी शब्दांनी समृद्ध असेल पण तरीही मराठीच असेल. एखादी भाषा ही तिच्या व्याकरणीक व स्वरसंरचनेच्या स्वरुपात मूलभूत स्वरुपात अस्तित्वात असते. उदा. माझे सरनेम जाधव आहे. हे मराठी वाक्य झाले. माझे आडनाव आहे जाधव. हे इंग्रजी .

प्रश्नांची उत्तरे - अनुभव आहेत. कारणेही पटतात. उपक्रमवरची भाषा अर्थात त्या त्या लेखकांची अस्सल आहे. येथे लोक फारतर शब्द जपून वापरत असतील पण ओढूनताणून नक्कीच वापरत नाहीत. असो. सोवळेपणा जपणाऱ्यांची संख्या जास्त असेल त्यामूळे तुपाळलेली (हा एवढाच शब्द अस्सल) वाटत असेल इतकेच.

असे म्हणून बघा

'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या. तिच्याकडे गोड बातमी आहे (इश्श्!) ती गरोदर आहे/ तिचे हवं-नको चे दिवस आहेत/ तिचे पाय जडावलेत, ..'
'तो समलिंगी / 'त्या' तला आहे, माहीत नव्हतं का तुला?'
'काय मग, मधुचंद्राला / शरीरसंबंधाला कुठे जाणार?'
'डॉक्टर, पाळीच्या च्या वेळी मला...'
'काही नाही, पोट थोडं बिघडलं होतं.'
'माझे वडील दोन वर्षांपूर्वीच गेले/ खपले/ चचले'( वडीलांशी नाते कसे होते त्यावर अवलंबून!)
'बाळंतपणात खूप त्रास झाला तिला. गुंतागुंत झाली - गर्भाशय काढावं लागलं.'
'योनीतील जंतुसंसर्ग...'
'एक मुका (चुंबन नव्हे, मुका!) दे मला...शाणा मुलगा!'
'त्याला अजून स्तनपान करतेस?' किंवा त्याहूनही ब्रेस्ट - आपलं बेस्ट- म्हणजे 'त्याला अजून अंगावर पाजतेस?'
असे म्हणायला काहीच हरकत नसावी. हा फक्त सवयीचा परिणाम आहे. 'बॉम्बे' चे मुंबई झाले तेंव्हा लोकांनी जाणीवपूर्वक 'आय हॅड बीन टु मुंबई यस्टर्डे' असं म्हणायला सुरवात केली. हळूहळू ते अंगवळणी पडले.
उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?
असे नाही. नवनवीन धाडसी विषयांना हात घालणार्‍या लिखाणांमुळे उपक्रमाचा पदर ढळलाच आहे.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

बहुतेक वाक्ये जमली आहेत पण..

बहुतेक वाक्ये जमली आहेत पण..

'काय मग, मधुचंद्राला / शरीरसंबंधाला कुठे जाणार?

मधुचंद्र एकवेळ ठीक आहे. पण शरीरसंबंधाला? खरं तर हनिमून हाच शब्द सगळ्यात चपखल. 'कुटं कुटं जायाचं हनिमूनला' ह्या ग्रामिण बाज असलेल्या गाण्यातही तो शब्द असल्याने तो शहरी ब्राह्मणी नक्कीच नाही.

'एक मुका (चुंबन नव्हे, मुका!) दे मला...शाणा मुलगा!'

एक पापी दे मला.... शाणा मुलगा.... असे हवे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

शरीरसंबंध आणि पापी

शरीरसंबंध या शब्दाला इतके घाबरायचे काहीच कारण नाही. पूर्वीच्या काळी लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत हा शब्द सर्रास वापरला जात असे.
पापी वेगळी आणि मुका वेगळा. अनुभवी तज्ज्ञांना हा पोटभेद (की ओठभेद?) समजावून सांगायला नको...
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

किस्

किस् हा शब्द मोठ्या व्यक्तींनी घेण्यासंदर्भात वापरलेलाच मी पाहिला आहे. लहान मुलास/मुलीस किस दे असे म्हटलेले मी कधीही पाहिलेले नाही. ज्या अर्थी उदाहरणात शेवटी शाणा मुलगा असे संबोधन आहे त्या अर्थी तो लहान मुलाविषयीच उल्लेख असावा.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अर्थ

या प्रतिसादांमधे आलेल्या प्रत्येक शद्बाचे मराठीत वेगळे अर्थही होऊ शकतातः

उ.दा. हे वाक्यः "शब्दांचा किस पाडणारा पापी वकील, एका अर्थी अपराध्याची शिक्षा कमी करून, त्याच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना मुका मारच देत असतो."

असो. या चर्चेनिमित्त, त्याच संदर्भातील, येथील सन्माननीय सदस्याचे पुर्वीचे लेखन आठवले:

कार्लिनबुवा आणि कर्वेबाई
आणि रविकर :-)

वरील संदर्भ हे कृपया, "उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?" या प्रश्नाला उत्तर म्हणून सुचवलेत असे समजू नये. :-) जो पर्यंत मराठीत बोलता येते तो पर्यंत नक्की बोलावे. आणि १००% नसेल पण ९९% बोलता यावे असे वाटते... दोन पिढ्या आधी पर्यंत ह्याच मध्यम वर्गातील स्त्रीया (त्यांच्या संदर्भातील जास्त शब्द असल्याने, स्त्रीया म्हणले आहे), सर्व मराठीच शब्द वापरत असत... आजही ते शक्य नक्कीच आहे.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

झक्कास.

असे म्हणायला काहीच हरकत नसावी.
एकदम झक्कास पर्याय दिलेत.
आणि असे हे असे बोलणे तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतोच की. मग राजेशरावांनी त्यांच्या लेखातले जे संवाद ऐकले ते सो कॉल्ड व्हिक्टोरिअन प्यूरिटानिजम प्रमाणे ब्राह्मणी सोवळेपणाच म्हणावा लागेल.

उपक्रमाची भाषा

तुम्हाला असा अनुभव तुमच्या वा इतरांच्या वापराबाबत आहे का? (वरील उदाहरणांना काही मर्यादा आहेत हे मान्य आहे, इतर उदाहरणांनाही त्याच मर्यादा आहेत का?)

हो आहे ना. अनेकदा दोन मराठी माणसे बोलताना इंग्रजी शब्द टाळता येण्यासारखे असतात पण ते करण्यास लोक कचरतात.

तसं असल्यास तुम्हाला माझी कारणं पटतात का, की दुसरी कोणती कारणं आहेत?

तुमच्या कारणांशी सहमत आहेच परंतु याचबरोबर लोक प्रचलीत शब्द अधिक वापरतात. उदा. एखादा डॉक्टर प्रसूतीगृहात किंवा त्याच्या दवाखान्यात अनेक इतर भाषकांशी बोलताना ब्रेस्ट-फिडिंग/ डिसेंट्री वगैरे शब्द वापरत असेल तर घरीही तोच वापरेल. हा डॉक्टर हा शब्द ज्या रुग्णांना सांगतो तेही डॉक्टरने निदान काय केले हे सांगताना हेच शब्द वापरतील. आपण वर दिलेल्या उदाहरणांत न्यूज, डिलिवरी, एक्सपायर, इन्फेक्शन, कॉंम्प्लिकेशन्स हे शब्द अगदीच शिव्या, लैंगिक अवयव वगैरेंशी संबंधीत नाहीत. (म्हटले तर संबंध जोडता येऊ शकेल.) बर्‍याचदा माणूस जो शब्द ऐकतो तसा तो वापरत सुटतो उदा. नित्यानंद स्वामींचे सेक्स स्कँडल. याचे तो भाषांतर करण्याच्या लफड्यात पडत नाही. :-)

तसेच, तुकारामाचे उदाहरण आपण दिलेले आहे ती मला एक पळवाट वाटते. तुकाराम आणि शिवाजीच्या वेळचे अनेक शब्द आहेत जे शिव्या, लैंगिक अवयव वगैरेंशी संबंधीत नाहीत तेही आज रद्दबातल झाले आहेत. आज मी माझ्या "बॉसला" - हुकुम सरकार असे म्हणणार नाही किंवा आज्ञा द्यावी असेही म्हणणार नाही. आईला मांसाहेब म्हणणार नाही आणि वडलांना आबासाहेब म्हणणार नाही. भाषा काळानुसार, स्थळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असते आणि तिला बदलू द्यावे.

त्यासंदर्भात उपप्रश्न : उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?

मला असे अजिबात वाटत नाही. उपक्रमाची भाषा उपक्रमाच्या ध्येय धोरणांना आवश्यक अशीच आहे आणि तिने तसेच असावे. भाषा सोपी समजणारी आणि सरल असावी. अगदीच नावे घेऊन सांगायचे झाले तर उपक्रमावरील आनंद घारे, शरद, चित्रा, चंद्रशेखर, ऋषीकेश या लेखकांची भाषा बघावी. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना समजेल अशी असते आणि उपक्रमाची भाषा तशीच असावी.

नितीन मोरे

वाचापालट, वाचासरळमिसळ, शब्दांची उसनवारी अशा विषयावर नितीन मोरे यांचे चांगले संशोधन आहे. त्यावर एक लेख वाचल्याचे स्मरते. पण आता हाताशी काही नाही. त्यामुळे त्यावर काही लिहिता येणार नाही. पण, दैनंदिन व्यवहारात अनेक शब्द कसे सहज एकमेकात मिसळलेले दिसतात . वेगवेगळ्या वयोगटातील महिला, मुले, पुरुष, बोलतांना मराठी भाषेत किती इंग्रजी शब्दांचा वापर करतात. त्याचे प्रमाण कसे आहे. असे चांगले संशोधन आहे, असे वाचल्याचे स्मरते.

-दिलीप बिरुटे

अवांतर

आजच एका घरगुती चर्चेत सिझेरियन / सिझरिंग हा प्रसुतीच्या अनुशंगाने शब्द आला. त्याला काय बरे प्रतिशब्द वापरावा?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

रोख

भाषेत का बदल होतात, इंग्लिश शब्द का येतात, तशा शब्दांना मराठी प्रतिशब्द काय वगैरेला चांगली उत्तरं मिळताहेत. बाबासाहेबांनी आणि रावांनी मराठीतल्या मराठीतच 'लांबचे' शब्द कसे वापरले जातात-जाऊ शकतात हे दाखवून दिलं आहे. ऋषिकेश आणि सुनीत यांनी सामाजिक फरकांवर बोट ठेवलेलं आहे. प्रियालींनी 'प्रचलित' विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील संज्ञा का रूढ होतात यावर भर दिला आहे.

माझा रोख थोडा वेगळा होता. शब्द काय आहेत पेक्षा, त्याने मराठी स्वभावाची काही वेगळी जाण होते का? हा मुख्य प्रश्न आहे. समांतर कपड्यांचंच उदाहरण घेतलं तर पाश्चिमात्य व मराठी लोकांत तुलना केली तर आपला अंग झाकण्याकडे अधिक कल असतो (विशेषत: स्त्रिया, पण पुरुषही). त्यावरून समाजाच्या 'लाज झाकण्याच्या' प्रवृत्तीबद्दल काही निष्कर्ष काढता येतात. तसं आपल्याला ऐकू येणाऱ्या शब्दांवरू करता येतं का? मराठीचा आणि इतर भाषांचा प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव असतो. त्यांच्या तुलनेत 'सोवळेपणा' मराठीत जास्त आहे असं वाटतं का? की मराठीला तशी शब्द उचलायची 'सोय' आहे आणि विशेषत: इंग्लिशला तशी नाही म्हणून त्या सोवळेपणाला गुंडाळायला काहीतरी कपडा मिळतो?

उपक्रमावरची भाषा आहे तीच ठीक आहे असं बहुतेकांचं मत दिसतंय.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ढंग

भाषेचा ढंग देखील प्रसंगानुसार बदलतो. उपक्रमाची भाषा ही प्रसंगानुसार बदलते. लिखित माध्यमाच्या काही मर्यादा असल्याने तसेच उपक्रमावर अजुन भावमुद्रा वापरत नसल्याने प्रमाणभाषेकडे कडे कल आहे. परंतु प्रसंगानुसार मी अनेकवेळा बोली वापरलेली आहे. उपक्रमाला कोणतीही भाषा वर्ज्य नाही. फक्त ती कोणी व कशी वापरली आहे हे आपसुकच पाहिले जाते. भाषेवर येणार्‍या काही मर्यादा या उपक्रमावर काही स्त्री सदस्य ही आहेत म्हणुन आलेल्या नाहीत तर ती उपक्रमाची प्रकृती नाही म्हणुन आलेल्या आहेत.
तुलनाच करायची झाल्यास ती एकीकडे मनोगत तर दुसरीकडे मिसळपाव शी करावी लागेल. घरी बोलताना व चव्हाट्यावर बोलतान आपली आपल्यावर येणारी बंधन वा मोकळीक यात जो फरक् आहे तोच इथे आहे. येथील सदस्य ( मी स्वतः देखील अपवाद नाही) उपक्रमावर वेगळे वावरतात व मिपावर वेगळे वावरतात. एकाच व्यक्तिच्या लेखनात (भाषेत) सभ्यता व शिवराळपणा असु शकतो. तो कुठे व कसा वापरायचा याचे तारतम्य उपक्रमींमध्ये नक्की आहे.
गावाकडे असताना अनेक शिवराळ माणस देखिल हरिपाठाला आली किंवा माळकरी लोकांच्यात वावरायला लागली कि आपली भाषेत आपोआप बदल करीत. त्या प्रभावातुन बाहेर् आली की परत *** च्या वाटेवर.
कधी कधी व्यक्तिगत रोख यास्वरुपात विशिष्ट मर्यादेपलिकडे झुकले तर उपक्रमपंताचा संपादकीय संस्कार दिसतो. तो बडगा वाटत नाही. ते सावरण असतं.
अनेक विद्वज्जनांचे भाषेचे संतुलन विकारामुळे ढळते. ती ही माणसच आहेत शेवटी.
जाउं द्या वला कुडं किस काढता? उगा लोकांना कांढावल्यावानी व्हतय. ( दाटुन म्हन्लो बर्का)
प्रकाश घाटपांडे

एक प्रश्न

लेख भाषेबद्दल आहे की निरनिराळ्या सामाजिक संदर्भातील लज्जास्पदतेबद्दल (सोशल एम्बॅरेस्मेंट्बद्दल) ? :-) "समाजात रहायचे म्हणजे कपडे घालून राहावे लागते, मात्र त्याचे तत्वज्ञान होऊ शकत नाही" अशा अर्थाचे एक वाक्य वाचलेले आठवते :-)

दोन्ही

लेख भाषेबद्दल आहे की निरनिराळ्या सामाजिक संदर्भातील लज्जास्पदतेबद्दल (सोशल एम्बॅरेस्मेंट्बद्दल) ? :-)

दोन्ही. लज्जास्पद संदर्भात आपण भाषेला विशिष्ट वळण देतो. त्यातून मराठी सामाजिक मनाविषयी, त्याच्या सोवळेपणाविषयी काही निष्कर्ष काढता येतील का?

"समाजात रहायचे म्हणजे कपडे घालून राहावे लागते, मात्र त्याचे तत्वज्ञान होऊ शकत नाही"

तसं जगायचं म्हणजे खावं लागतं तेव्हा त्याचंही तत्वज्ञान करू नये (मुकाट्याने खावं, का खायचं असं विचारू नये). पण तरीही दोन समाज कपडे कसे घालतात, काय व किती खातात याचा तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष काढता येतील असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

काही मते

  1. इंग्रजी ही सायबाची भाषा आहे. (इंग्रजीत कुणी खोटेच बोलू शकत नाही, असेही म्हणतात) तर मराठी ही शेवटी गुलामांची भाषा आहे. (व्हर्नाक्युलर हा शब्द गुलामांशी संबंधित आहे.) त्यामुळे ती अभद्र आहे. त्यामुळेच मराठीतली हगवण हगवण वाटते. इंग्रजीतले डिसेन्ट्री बहुधा निरामय असते. झवाड्या किंवा च्यूत्या म्हटले तर वाईट वाटते. फकयू किंवा यू कंट किंवा प्रिक म्हटले तर अगदी गदगदल्यासारखे. इंग्रजीतली कंबर मराठी कंबरेपेक्षा थोडी वर असते. त्यामुळे इंग्रजीतले कमरेखालचे विनोद ऐकून दिलखुलासपणे हसता येते. ह्याउलट मराठीतले कमरेखालचे विनोद ऐकून शिसारी येते.
  2. शहरी मध्यमवर्गाने मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केलेले नाही. ह्या वर्गाने मराठीला बोथट केले. एक विशिष्ट अभिरुची मराठी जनतेवर लादली. आणि भाषेच्या सभ्यासभ्यतेचे निकषही.
  3. गेल्या जमान्यांत काही ग्राम्य शब्द किंवा उल्लेख बोलण्यात किंवा लिहिण्यात यायचे. इंग्रजीने आम्हाला आमच्या गावठीपणाची जाणीव करून दिलेली असावी. थोडक्यात संस्कृतची जागा इंग्रजीने घेतली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शंभर टक्के सहमत

शहरी मध्यमवर्गाने मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केलेले नाही. ह्या वर्गाने मराठीला बोथट केले. एक विशिष्ट अभिरुची मराठी जनतेवर लादली. आणि भाषेच्या सभ्यासभ्यतेचे निकषही
वरील विचाराशी सहमत आहे. आज मराठीच्या अस्तित्वासाठी जो वर्ग ओरड करतो आहे त्या वर्गाची ती ओरड मध्यमवर्गातल्याच तथाकथित मराठी भाषेसंबंधी आहे. ग्रामीण महाराष्ट्रात आजही मराठी तितक्याच समृद्धपणे व तिच्यातिल नैसर्गिक बदलांसहीत बोलली जाते.

गुलामी ची मानसिकता...

बोलतांना मराठीत इंग्रजी शब्द घुसडण्या साठी शिव्या अथवा लैंगिक विषयच असला पाहीजे असे काही नाही, साधी आपल्या जीवनसाथीची ओळख करुन देतांना लोक माझे मिस्टर/ माझी मिसेस असे बोलतात, मला हा सगळा गुलामीच्या मानसिकतेमधुन बाहेर न येण्याचा प्रकार वाटतो. मी भंगारवाला आहे या ऐवजी माझा सॉलीडवेस्ट मॅनेज्मेण्ट्चा बिझिनेस आहे. :) म्हणणे कसे चमकदार वाटते. ( भंगारवाला ही कामच करत असतो खरे तर)
ही मानसिकता अन्य भाषां मधेही दिसते.

हे चूक

मी भंगारवाला आहे या ऐवजी माझा सॉलीडवेस्ट मॅनेज्मेण्ट्चा बिझिनेस आहे. :) म्हणणे कसे चमकदार वाटते. ( भंगारवाला ही कामच करत असतो खरे तर)
हे जनरलायझेशन ( सामान्यीकरण) चुकीचे आहे. भंगारवाला हा सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटचा ( घन कचरा व्यवस्थापनातला) एज (नगण्य) भाग आहे. घन कचरा व्यवस्थापन ही खूप व्यापक संज्ञा आहे.
इतर मजकुराशी सहमत आहे.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

सॉलिड वेस्ट

कदाचित शिंपी आणि फॅशन डिझायनर किंवा न्हावी आणि हेअर स्टायलिस्ट ही तुलना योग्य ठरेल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

ही देखील अयोग्य तुलना

कदाचित शिंपी आणि फॅशन डिझायनर किंवा न्हावी आणि हेअर स्टायलिस्ट ही तुलना योग्य ठरेल.

शिंपी व फॅ.डी. वेगळे.. एकाचे काम कपडे शिवणे तर दुसर्‍याचे ते कसे शिवावेत हे ठरवणे
तसेच न्हावी व हेअर स्टायलिस्टचे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अभिजनांचे आचार,विचार,उच्चार .....

१. आपल्या भाषेत सोपा सरळ - ( अग्नीरथगमनागमन.... वगैरे सारखा नाही अन्यथा थ्री इडियटस् मधील "मूत्रविसर्जन" सारखी विनोदनिर्मीती होते.) - शब्द असतानाही आम्हाला तो का वापरावासा वाटत नाही? व इंग्रजी मधील शब्द वापरले की बरे/ चांगले/उच्च दर्जाचे का वाटते हा मुद्दा आहे. याला कारण समाजातल्या (तथाकथीत) अभिजनांचे आचार,विचार,उच्चार ही आहेत. कारण त्याचे अनुकरण इतरेजन करत असल्याचे दिसते. एक उदाहरण म्हणून सहज विचार करा आपल्या कुणाच्याही आई/वडीलांचे वाढदिवस त्यांच्या लहानपणी केक कापून/ मेणबत्ती विझवून झाले असतील? हेच प्रमाण आपल्या करता किती व आपल्या मुलांकरता व भविष्यात काय असेल? तसे करावे न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण "तमसो मा ज्योतिर्गमय" किंवा "अत्तदीप भव स्वयंदीप हो" असे म्हणण्याची/ दीपावलीत दीप उजळण्याची संस्कृती/परंपरा असणार्‍या, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते अशी प्रार्थना करणार्‍या माझ्या मुलाने मेणबत्तीची ( असली तर काय झाले ) ज्योत फुंकुन वाढदिवस साजरा करु नये असे मला वाटते कारण ज्योत / प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे, म्हणून तो त्या दिवशी मेणबत्ती फुंकण्याऐवजी लावतो व देवाजवळ ठेवतो मग मुलांना खाऊ वाटतो.(केकही, कारण त्याला/मुलांना फार आवडतो.) जसे जसे वय वाढेल तसे स्वयंदीप हो/तमसो मा ज्योतिर्गमय/शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते चा अर्थ त्याला समजेलच.( हा अर्थ त्याला समजणे ही माझीही जबाबदारी आहे.)

२.चांगली गोष्ट ही आहे की मराठी संकेतस्थळां मुळे लोक नवनवीन अर्थवाही अन त्याच वेळी साधे सरळ शब्द ( जसे नेट सॅव्ही करता जालकुशल) बनवू लागले आहेत वापरतही आहेत. माहितगारांनी यासाठीचे दुवे प्रतिसादा मधे द्यावे ही विनंती.

अनेक उदाहरणांशी सहमत

पण सर्व उदाहरणांबद्दल माहिती नाही. कदाचित आर्थिक वर्ग कुठला त्यावर अवलंबून असेल. वैद्यकीय शिक्षणात असे हटकून जाणवते की मल-मूत्र-संभोग-प्रजनन याबाबतीत सोपे मराठी शब्द आहेत, आणि लोक वापरतातही.

उत्तर १. : होय. कौटुंबिक संदर्भात संभोग-प्रजननाबाबत इंग्रजी शब्द वापरलेले ऐकले आहेत. मराठी शब्द कमी. मल-मूत्र संबंधी मराठी शब्द वापरतो.
- मल : शी, परसाकडे, (आजाराच्या बाबतीत) आव, ढाळ, परसाकडे पातळ होणे, मुरडून येणे.
- स्त्रियांचे लैंगिक-अवयवांचे आरोग्य : पाळी येणे/अंगावरून फार जाणे ऐकलेले आहे. स्त्रियांच्या अवयवांची नावे घरात ऐकलेली नाहीत - घरगुती-सभ्य शब्द माहीत नाहीत. असभ्य (पुच्ची) आणि शास्त्रीय (योनी) असे टोकाचे शब्दच माहीत आहेत. म्हणून मधल्या "सभ्य" अर्थछटेसाठी इंग्रजी वापर होत असावा. त्याच प्रमाणे पुरुष इंद्रियासाठी असभ्य/शास्त्रीय असे दोन टोकांचेच शब्द मला माहीत आहेत.
- "विशुद्ध"-शरीर-हावभाव : मिठी मारणे, पापी घेणे, मुका घेणे
- शारिर-शृंगार : घरात या विषयी फारसे बोलणे होत नाही. "सेक्स करणे" इंग्रजी शब्द ऐकलेला आहे. मात्र रुग्ण लोक "अमक्याशी राहाणे"/"संबंध ठेवणे"
- शरिराच्या आतील अवयव : आमच्या कुटुंबांत इंग्रजी शब्द वापरतात : लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, युटेरस. मात्र मराठी शब्दही : हृदय/हार्ट, आतडी, पोट (जठरासाठी साधा पर्याय म्हणून)
- काही रोगांची नावे : जॉनडीस, डिसेन्ट्री.

उत्तर २. : सोवळेपणाबद्दल थोडेसे मान्य. २०वे शतक-उत्तरार्ध हे मराठीचे व्हिक्टोरियन युग असावे. आजी आणि पणजीच्या काळात शारिर-संदर्भांसाठी मराठी शब्द घरगुती वापरात होते असे वाटते. (आणखी विस्ताराने मत मी येथे दिले आहे.) परंतु काही आरोग्यविषयक शब्द प्रथम इंग्रजी-शिक्षित डॉक्टराकडून ऐकले असल्यामुळे ते तसे प्रचलित झाले असावेत. त्या बाबतीत सोवळेपणा नसावा.

उत्तर ३. : उपक्रमावरची भाषा - व्हिक्टोरियन पद्धतीची लज्जा फारशी लक्षात आलेली नाही. मला स्वतःला "सभ्य" अर्थछटेचे मराठी शब्द माहीत नसल्यामुळे मी संस्कृत प्रतिशब्द वापरतो.

- - -
आमच्या कुटुंबांत बहुधा असे काही ऐकले आहे :
> 'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या.
> त्यांच्याकडे न्यूज आहे..'
अदितीची काहीतरी गडबड आहे.

> 'तो गे आहे, माहीत नव्हतं का तुला?'
(मराठमोळा प्रतिशब्द प्रचलित असल्यास माहीत नाही.)

> 'काय मग, हनीमूनला कुठे जाणार?'
असेच.

> 'डॉक्टर, एम. सी. च्या वेळी मला...'
(डॉक्टरशी आई/आत्या/मावशा काय बोलतात माहीत नाही.) घरी पाळी येणे/ एम् सी दोन्ही वापरतात.

> 'काही नाही, थोडी डीसेंट्री झाली होती.'
"परसाकडे पातळ होत होते."

> 'माझे वडील दोन वर्षांपूर्वीच एक्स्पायर झाले'
"वारले"

> 'डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास झाला तिला.
> कॉंम्प्लिकेशन्स झाल्या - युटेरस काढावं लागलं.'
डिलिव्हरी/बाळंतपण दोन्ही वापरतात
"कॉम्प्लिकेशन" - या संदर्भात पुष्कळदा "त्रास झाला" असा शब्दप्रयोग
"युटेरस" - असाच

> 'व्हजायनल इन्फेक्शन...'
(घरी ऐकलेला आठवत नाही. बहुधा इंग्रजीच वापरतील असे वाटते. "इन्फेक्शन" म्हणजे जंतूंची लागण, हा पारिभाषिक अर्थ आहे. पारंपरिक वैद्यकात जंतू आणि लागण कल्पना नाहीत. मात्र "पित्त उठलं" वगैरे मराठी शब्द सर्रास आमच्या घरात वापरतात, तिथे इंग्रजी प्रतिशब्द वापरत नाहीत. हो, इंग्रजीत प्रतिशब्द आहेत!)

> 'एक किस दे मला...शाणा मुलगा!'
पापी/पापा/पप्पी असेच वापरतो.

> 'त्याला अजून ब्रेस्ट फीडींग करतेस?'
"अंगावर पाजते?" आमच्या कुटुंबात "ब्रेस्ट फीडिंग" ऐकलेले नाही.

स्थलकाल

'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या. त्यांच्याकडे न्यूज आहे..'
न्यूज या शब्दाचा हा अर्थ फक्त शहरातल्या समाजातच आणि अलीकडेच रूढ झाला आहे. खुद्द इंग्रजीमध्ये तसा अर्थ घेतला जात नसावा. गर्भार आहे हे जुने झाले असले तरी गरोदर आहे किंवा अमूक महिना चालू आहे वगैरे अजून कानावर येते.
'तो गे आहे, माहीत नव्हतं का तुला?'
कोणी गे असणे हा विचार अद्याप लाजिरवाणा ठरवला गेला असल्यामुळे त्याची उघडपणे चर्चा होत नाही.
'काय मग, हनीमूनला कुठे जाणार?'
हनीमून ही संकल्पना परदेशातून आलेली आहे. आपल्याकडे नववधूला लग्नानंतर सासरच्या एकत्र कुटुंबात राहून त्यांच्यात समरस होण्याचे प्रयत्न करावे लागत. उगाच मधुचंद्र असे शब्दश: भाषांतर करण्यापेक्षा हनीमून हा मूळ शब्दच बरा वाटतो.
'डॉक्टर, एम. सी. च्या वेळी मला...'
डॉक्टरशी बोलतांना पाळीचा उल्लेख करायलाच कदाचित लाज वाटत असेल. पूर्वीच्या काळातल्या बायका विटाळशी बसत आणि त्यांना अस्पृश्य मानले जात असे. आजकाल कुठल्याही स्त्रीला ते जाहीरपणे सांगण्याची गरज नसते.
'काही नाही, थोडी डीसेंट्री झाली होती.'
हगवण हा शब्द आता मागे पडला असला तरी पोट बिघडले आहे, संडासला जावे लागते वगैरे पर्याय सर्रास वापरले जातात.
'माझे वडील दोन वर्षांपूर्वीच एक्स्पायर झाले' हे मी विशेष कधी ऐकले नाही. ते गेले, वारले वगैरे आदरार्थी आणि खपले हे अनादराने म्हंटले जाते
'डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास झाला तिला. कॉंम्प्लिकेशन्स झाल्या - युटेरस काढावं लागलं.'
डिलिव्हरीच्या ऐवजी बाळंतपण हा शब्दसुद्धा वापरला जातो. कॉम्प्लिकेशन्स या शब्दाला तंतोतंत प्रतिशब्द मराठीत नाही. गुंतागुंत, भानगड वगैरे शब्दांचे वेगळे अर्थ निघतात. पूर्वी शरीरशास्त्रच कोणाला ठाऊक नसायचे युटेरस काढणे वगैरे होतच नसे. या नव्या क्रियेला नवा शब्द आला.
'व्हजायनल इन्फेक्शन...'
हा फारच विशिष्ट प्रकार आहे, पण एकंदरीतच रोगजंतूसंसर्ग हया बोजड शब्दापेक्षा इन्फेक्शन हा शब्द सोपा वाटतो
'एक किस दे मला...शाणा मुलगा!'
शाण्या मुलाला अजूनही पापाच मागतात. मुका, चुंबन वगैरे साहित्यातले शब्द बोलीभाषेत पूर्वीही नव्हते.
'त्याला अजून ब्रेस्ट फीडींग करतेस?'
मुलाला अंगावर पाजणे हे ज्यांना लाजिरवाणे वाटते त्या असे विचारत असाव्यात. या बाबतीत फक्त पाजते एवढेच पुरेसे आहे.

याबद्दल मला असे वाटते की स्थळकाळाबरोबर भाषेत बदल होत असतो. तो नक्की कशामुळे होतो हे सांगता येणार नाही. माझ्या लहानपणी ढुंगण हा शब्द सभ्य होता, गांड असभ्य होता, आता 'शीची जागा' असले काही तरी म्हणतात. पूर्वी घरात अंडे, चिकन मटण वगैरे शब्दांचा उच्चार करायला मनाई होती, नुसती हाताने खूण करायची, आता तीघांनाही खाद्यसंस्कृतीमध्ये मानाची जागा मिळाली आहे. लहानपणी मी अंगात सदरा आणि चड्डी घालत होतो आणि मोठी पुरुष मंडळी धोतर आणि स्त्री वर्ग लुगडे नेसत असे. पुढे चड्डीच्या जागी लेंगा आला. त्यानंतर त्याचा पायजमा झाला. लुगडे अंतर्धान पावले, त्याच्या जागी गोल पातळ आले, त्याला साडी म्हणायला लागले, आता तीसुद्धा समारंभात 'घालतात', नेसत नाहीत.
या बदलामागे कोणी विचार करतो असे मला वाटत नाही. ते उत्स्फूर्तपणे होतात.

सहमती.

घारे काकांच्या प्रतिसादाशी माझा प्रतिसाद् अगदी जुळणारा आहे.

न्युज आहे हे शब्द् मी मालिकांमध्ये आणि हिंदी भाषिकांमध्ये ऐकले आहेत, गरोदर आहे असेच वापरतो.

हनीमुनला मधुचंद्र हा ओढुन-ताणुन दिलेला वाटतो.

एमसी. आताशा पाळी हाच शब्द ऐकला आहे, पण् लहान असताना (जुन्या म्हातार्‍यालोकांमुळे) 'आइ बाजुला आहे' असे ऐकायचो. जसेजसे आम्ही मोठे झालो तश्या घरातल्या ह्या प्रथा बंद झाल्या आणि पाळी शब्द रुळला.

जुलाब मी तरी सहज वापरतो.

पापा दे, किंवा 'पा' दे असेच वापरतो. इ.

प्रॉब्लेम

>>एमसी. आताशा पाळी हाच शब्द ऐकला आहे,

प्रॉब्लेम,अडचण, तिला देवदर्शनाला यायचं नव्हतं, तिला दोन-तीन दिवस काही करायचं नाही.

स्वगत : उपक्रमी, उपक्रमवर काय काय चर्चा करायला लावणार कोणास ठाऊक. :(

-दिलीप बिरुटे

उपक्रमी, उपक्रमवर काय काय चर्चा करायला लावणार कोणास ठाऊक. :(

अहो मग बाजुला बसा की! ;-) (हलके घ्या.)

टोपण नावांचे काय?

असेच मराठीत (बंगालीत?) असलेली नावे सोडून वेगळ्या नावाने हाक मारायची पद्धत आहे.
भाऊ, ताई, तात्या,अण्णा, बाब्या, नाना, आक्का वगैरे.
प्रत्यक्ष नावाने बोलावणे हे बरेचदा अपमानास्पद वाटायचे (वाटते).
धम्मकलाडू, मुक्तसुनित, उंटावरचे ही नावे त्यातलीच का?

प्रमोद

सर्वसंमत भाषा

तुम्हाला असा अनुभव तुमच्या वा इतरांच्या वापराबाबत आहे का?
- नक्कीच आहे. 'लैंगिक बाबींची चारचौघात उघडपणे चर्चा करणे ' हे आवश्यक नाही. ती चर्चा शक्य तितक्या खाजगीत असावी. शक्यतो न कळत्या वयातल्या लहान मुलांच्या कानांवर हे शब्द पडू नयेत असा माझा कल असतो. आपण ज्या व्यक्तींना आपल्या खाजगीतले समजत नाही त्या व्यक्तींशी या विषयावर बोलताना मर्यादा हव्यात. अशा मर्यादाच शहरी, ब्राह्मणी मध्यमवर्गीयांना लैंगिक शब्दांचे इंग्रजी रूप वापरण्यास भाग पाडतात. कारण त्यांना तो पर्याय उपलब्ध असतो. ग्रामीण लोकही असे मराठी शब्द सर्रास वापरत नाहीत. नाहीतर या शब्दांचे 'असभ्य', 'अप्रतिष्ठीत', 'अर्वाच्य', 'शिवीगाळ' असे वर्णन रूढ झाले नसते. ज्याअर्थी अजूनही शहरी अथवा ग्रामीण दोन्ही प्रकारचे लोक हे शब्द इतरांना अपमानीत करताना उघडपणे उच्चारतात त्याअर्थी मराठी संस्कृतीमध्ये अजूनही त्या शब्दांना इतर शब्दांच्या बरोबरीचा दर्जा नाही.
तथाकथित उच्चभ्रू, शहरी, मध्यमवर्गीय, ब्राह्मणी इ. समाजात अशाही व्यक्ती आहेत ज्या उघडपणे असे मराठी शब्द चारचौघात वापरतात, वर्णन करतात. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक आणि अशा व्यक्तींना 'सैल जिभेची' म्हणून ओळखण्यात येते.

तसं असल्यास तुम्हाला माझी कारणं पटतात का, की दुसरी कोणती कारणं आहेत?
-(व्हिक्टोरिअन प्यूरिटानिजम प्रमाणे तो ब्राह्मणी सोवळेपणा मला वाटतो. इंग्रजी शब्दांमुळे त्या सोवळेपणाला तडा जाणाऱ्या अर्थाची धार बोथट होते असं वाटतं.)
हे मत पटत नाही. वर मी म्हटल्याप्रमाणे 'ब्राह्मणी सोवळेपणा' वगैरे सापेक्ष आहे. ब्राह्मणेतर समाजातही कारण नसताना उगाचच कोणी 'ते' मराठी शब्द उच्चारत नाही. याचाच अर्थ असा की ते शब्द उच्चारायला सर्वांना सारखीच लाज वाटते. एकूण सर्व समाजात (केवळ ब्राह्मण नव्हे) पर्याय उपलब्ध असेल तर शक्यतो मराठी शब्द टाळण्याकडे कल असतो.
तुकोबांनी असे शब्द काही ठिकाणी वापरले म्हणून पूर्ण अभंगगाथा याच शब्दांनी भरलेली आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय कालमानपरत्वे समाजातील फरकाबरोबरच भाषेबद्दलचा दृष्टीकोनही बदलत जातो. तुकारामांस जे शब्द सहज वाटले ते शब्द आज डॉ. सदानंद मोरे त्यांच्या व्याख्यानात वापरतील असे वाटत नाही. (त्यांना विचारले पाहिजे. :))

त्यासंदर्भात उपप्रश्न : उपक्रमवरची भाषा ही त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे असं वाटतं का? असल्यास ते योग्य का?
- माहितीची देवाणघेवाण करताना ज्या पद्धतीची भाषा अपेक्षित असते तशीच भाषा उपक्रमावर वापरली जाते. काहीजण क्लिष्ट तर काही स्लिष्ट भाषा वापरतात. ही भाषा 'त्याहूनही उच्चभ्रू, मिळमिळीत, विद्वत्ताप्रचूर, तुपाळलेली आहे' म्हणजे नक्की काय?
कोल्हापुरात आपल्या जवळच्या मित्राला 'ए खुळ्या ***च्या' असे म्हणून बोलवायची पद्धत आहे. ती भाषा तिथे 'ग्राम्य, जळजळीत,मूर्खपणाची, रस्साळलेली आहे' असे समजली जात नाही. ती तिथली नेहमीची भाषा आहे. तशी भाषा उपक्रमावर अपेक्षित नाही हे निश्चित! ही इथली नेहमीची भाषा आहे.

शिवाय -
युटेरससाठी 'पिशवी' अथवा 'गर्भाची पिशवी' असा शब्द ऐकलेला आहे.

मराठी भाषा

या चर्चेतील प्रतिसादांच्यात एक महत्वाचा मुद्दा वगळला जातो आहे असे मला वाटते. कोणतीही भाषा समृद्ध होण्यासाठी त्या भाषेत नवनवीन शब्द येणे आवश्यक असते. साचलेल्या पाण्याप्रमाणे भाषा अप्रवाही राहिली तर थोड्याच कालात तिची उपयुक्तता कमी झाल्याविना रहात नाही. या बाबतीत इंग्रजी भाषेचे उदाहरण घेतले तर प्रथम फ्रेंच भाषेतील अनेक शब्द इंग्रजीत आले. नंतर ब्रिटिश साम्राज्य जसजसे पसरत गेले तसतसे बाकी इतर भाषांतील शब्द इंग्रजीत आले व इंग्रजांनी ते स्वीकारले. ऑक्सफर्ड डिक्शनरी दर वर्षी, इंग्रजीत या वर्षी नवीन आलेल्या शब्दांची सूचि, प्रसिद्ध करते. आम्ही आमचेच जुने शब्द वापरणार नवीन रूढ झालेले असले तरी नाही असा वृथाभिमान बाळगणे भाषेच्या दृष्टीने शेवटी हानीकरकच ठरते.

मराठीत सुद्धा नवनवीन शब्द येतच राहिले. ज्ञानेश्वरांच्यावेळची प्राकृत व सतराव्या किंवा अठराव्या शतकातल्या मराठीत केवढा तरी फरक जाणवतो. या कालातील मराठीत अनेक उर्दू व फारसी शब्द आले. आपणही यातले अनेक शब्द रोजच्या व्यवहारात वापरतो. मग आजच्या काळातील मराठीत जर मूळ इंग्रजी शब्द वापरले तर कुठे बिघडले. उलट ही शब्दसंपदा मराठीत आल्याने मराठीचे शब्दवैभव वाढले आहे हे जाणून या शब्दांचे स्वागतच करायला पाहिजे.
चन्द्रशेखर

सहमत...

उलट ही शब्दसंपदा मराठीत आल्याने मराठीचे शब्दवैभव वाढले आहे हे जाणून या शब्दांचे स्वागतच करायला पाहिजे.

पूर्ण सहमत आहे. मात्र त्याचबरोबर काही नवीन (चांगले) शब्द तयार करू शकलो आणि रूळले तर त्यातही काही गैर नाही असे देखील वाटते. उ.दा.: बस ला बसच म्हणतो, आगगाडी पेक्षा रेल्वे, लोकल हेच जास्त सोयीचे शब्द वाटतात, पण फोनला दूरध्वनी म्हणताना अडखळायला होत नाही अथवा ओढूनताणून म्हणल्यासारखे वाटत नाही. फोनवर भारतीयांशी बोलताना "हॅलो" म्हणायच्या ऐवजी "नमस्कार" अथवा "नमस्ते" म्हणताना पण काही वेगळे वाटत नाही. तेच बोलीभाषेतील शब्द रूळण्यावर आहे. एका अर्थी आपल्याच भाषांमधील मूळांचा वापर करून नवीन शब्द तयार झाले तर ते देखील शब्दवैभवातील भरच आहेत.

यावरून संस्कृत सुभाषित आठवले (आठवणीतून देत आहे, चु.भू.द्या.घ्या):

विलक्षण: शब्दकोशः विद्यते तव भारती
व्ययेन वर्धंते नित्यम् क्षयम् गच्छती संचयात

(हे वाग्देवी, तुझा ज्ञानकोश हा धनकोशापेक्षा वेगळा आहे, कारण तो उधळला तर वाढतो आणि साठवून ठेवू लागलो तर कमी होतो)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहमत

कोणतीही भाषा समृद्ध होण्यासाठी त्या भाषेत नवनवीन शब्द येणे आवश्यक असते.
सहमत.

साचलेल्या पाण्याप्रमाणे भाषा अप्रवाही राहिली तर थोड्याच कालात तिची उपयुक्तता कमी झाल्याविना रहात नाही.

सहमत

आजच्या काळातील मराठीत जर मूळ इंग्रजी शब्द वापरले तर कुठे बिघडले
सहमत

उलट ही शब्दसंपदा मराठीत आल्याने मराठीचे शब्दवैभव वाढले आहे हे जाणून या शब्दांचे स्वागतच करायला पाहिजे.
सहमत

-दिलीप बिरुटे
[चंद्रशेखर यांच्या मताशी टोटल सहमत]

हेच

हेच मी वरील प्रतिसादात थोडक्यात म्हटले आहे. चंद्रशेखर यांनी ते व्यापक आणि योग्य शब्दांत मांडले. मराठी भाषेवर काळानुरुप अनेक इतर भाषांचे संस्कार होत गेले. शिवकालीन भाषेत अरबी आणि फारशी शब्दांची भरणा मराठीत झाली. आजही हरकत, बेमालूम, जरूर, बेनामी वगैरे शब्द अनेकांना पसंत नाहीत परंतु मराठी भाषेत ते रुळलेले आहेत आणि माझ्या मते ते आता मराठी शब्दच आहेत. इंग्रजी भाषेचेही असेच.

अस्तित्व व कारणपरंपरा

आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी वेगवेगळे उत्तम पर्यायी शब्द सांगितले, व त्यांचा वापरही बऱ्याच वेळा केला जातो हे नोंदलं. त्याचवेळी हे व असे शब्द वापरात असताना दिसतात असंही काहींनी म्हटलं. त्या विशिष्ट उदाहरणांतल्या शब्दप्रयोगांची कारणमीमांसाही दिली . त्याचबरोबर असे नवीन शब्द वा शब्दप्रयोग स्वीकारण्यात भाषेचा कमीपणा नाही, अशा आशयाचे मुद्देही मांडले गेले. (ते पूर्णपणे पटतात- त्याबद्दल माझ्या मनात तरी वाद नाही, आणि खूप मोठा विरोध नसावा असं वाटलं)

एकंदरीत तयार होणारं चित्र हे असं आहे - एम्बॅरासिंग/अतिवैयक्तिक/पडद्याआडच्या गोष्टींसाठी काही वेळा, काही लोक इंग्लिश शब्द वापरतात. त्यासाठी बहुतेक वेळा मराठी प्रतिशब्द आहेत, व काही प्रमाणात या नवीन शब्दांचा वापर खेदजनक असला, तरी सरसकट ते त्याज्य म्हणता येत नाही. काही वापर हे विशिष्ट कारणांमुळे आलेले असतात व अर्थ दूर ठेवणं/ निर्जतुकीकरण/ सोवळेपणा या प्रकारची कारणपरंपरा लागू पडतेच असं नाही. इंग्लिश भाषेच्या 'राज्यकर्त्याची भाषा' या स्थानामुळेही काही अंधानुकरण होत असणं शक्य आहे. काही शब्द तर वैद्यकीय परिभाषेतून अपरिहार्यपणे आलेले आहेत. त्यात इतर भाषा, बोलीही असाच सोवळेपणा वेगवेगळ्या प्रमाणात करत असतात. मराठीत तो जास्त असतो का या प्रश्नाचं उत्तर या इतर कारणांमुळे धूसर होतं.

इंग्लिश शब्द वापरण्याच्या पद्धतीचं अस्तित्व - मर्यादित प्रमाणात हो. मराठीत सोवळेपणा अधिक ही कारणपरंपरा - अजून खूपच मर्यादित प्रमाणात हो. अनेक कारणांपैकी एक शक्य कारण, या अर्थाने.

एकंदरीत आत्तापर्यंतच्या चर्चेतून 'हा प्रश्न क्लिष्ट आहे, इतक्या सोप्या पद्धतीने मांडता येण्यासारखा नाही' हे निष्पन्न झालं असं वाटतं. हे चर्चा फसल्याचं लक्षण नाही. या प्रश्नाचे अनेक पैलू बघायला मिळाले. त्यामुळे कुठचा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही, किंवा निदान मांडणीला अधिक खोली हवी हे तरी कळलं. तिसऱ्या उपप्रश्नाबाबत बऱ्यापैकी एकमत झालेलं दिसलं.

असो. हा आत्तापर्यंतचा सारांश आहे, याचा अर्थ चर्चा थांबली आहे असं नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सोवळ्यात वापरायचे इंग्रजी

आपण - विशेषत: शहरी, पांढरपेशा वर्गातले खूप लाजरे आहोत असे आपल्या भाषेकडे बघितले तर वाटते.
ही अगदी खरी गोष्ट आहे, उगीच नाकारण्यात अर्थ नाही. ज्या गोष्टींचा उल्लेख करायचे आपण खाजगीतही टाळतो, त्यासंबंधीचे शब्द बोलताना इंग्रजी शब्द वापरणे सभ्यपणाचे वाटते ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. याचा अर्थ राजेशघासकडवींनी वापलेले सर्वच शब्द आणि शब्दरचना रूढ आहेत असे नाही. आमच्या कुटुंबातले आणि परिसरातले लोकच नाहीत तर आमच्या भागातले डॉक्टरही डिसेन्ट्रीला आंव/रक्ती आंव, डायरियाला पोट बिघडणे व थ्रॉम्बोसिससाठी रक्ताच्या गुठळ्या होणे वगैरे शब्द वापरतात. पाळी, बाळंतपण किंवा खेप, गोड बातमी, वारले-गेले, अंगावर पाजणे, बाळंतपणात त्रास होणे, गर्भाशय काढणे वगैरे शब्दांना आमच्या भागातल्या शिकल्यासवरलेल्या (मोठ्या वयाच्या) स्त्रियाही इंग्रजी शब्द वापरत नाहीत. सिझेरियनला त्या सररास सिझरिन म्हणतात. ज्यूलियस सीझर ज्या पद्धतीने जन्मला तिला मराठी शब्द असण्याचे कारणच नाही. बेंडाला साधारणपणे गळू म्हटले जाते. अर्थात बेंडही वापरतात. मूत्रपिंडालामात्र किडनी असेच म्हणतात आणि त्याचे अनेकवचन किडन्या करतात. म्हणजे हा मराठीत रूढ झालेला शब्द आहे असे मानायला हरकत नाही. पण या किडन्या बहुधा फेल होतात, क्वचित बिघडतातही. जॉनडिसला कावीळ आणि कावीळच. 'हेपाटायटिस् बी'ला मात्र तोच शब्द. त्याला कुणी ब दर्जाची कावीळ म्हणताना ऐकलेले नाही. पाणथरी, जठर, आंतडे, पोट यांच्यासाठी इंग्रजी शब्द वापरायची अजून गरज पडली नसावी.
पाइल्ससाठी मूळव्याध आणि 'डायबेटिस'साठी मधुमेह् अजूनही वापरातून गेलेले नाहीत. स्त्री-पुरुषांच्या इंद्रियांसाठी लहान मुले वापरतात तो शू हा शब्द आमच्या कुटुंबात रूढ आहे. अवयव आणि त्याचे कार्य, दोघांसाठी एकच शब्द. पहिल्या अर्थासाठी शू हा शब्द उच्चारायची गरज सहसा पडत नाही, हे सांगायला नकोच.
भंगारवाला स्वतःला काहीही म्हणत असला तरी लोक त्याला भंगारवालाच म्हणतात आणि त्यात त्याला कुठलाही कमीपणा वाटत नाही. चांभार, सुतार गवंडी तसा भंगारवाला. शिंपी व फॅ.डि. तसेच न्हावी व हेअरड्रेसर/ब्यूटिशियन ह्या शब्दांच्या अर्थच्छटा भिन्न आहेत, ते समानार्थी नाहीतच. त्यामुळे या इंग्रजी शब्दांबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. --वाचक्नवी

 
^ वर