हायकू

हायकू : मराठीत न रुजलेला

एवढी आवडते जपानी हायकू,
तर कशाला केलीत मराठी बायकू ?

महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार हाताळलाच नाही. असे का झाले ?

मला वाटते याला दोन गोष्टी कारणीभूत असाव्यात. पहिली म्हणजे हायकूची जन्मभूमी जपान. जपानी भाषा आपल्याला पूर्णपणे अपरिचित. म्हणजे आपण हायकू वाचणार ते मूल(original) नाहीत, त्यांची इंग्रजी भाषांतरे. जपानी नियम पहिल्यांदीच तोडफोड होऊन समोर येणार व या भ्रष्ट रूपावरून आपण मराठीत प्रयत्न करणार.तुम्ही म्हणाल, गझलबद्दलही हा आक्षेप घेता येईल पण ते तेवढे खरे नाही. मराठी हिंदी या भाषाभगिनी आहेत व उर्दूतील फारशी-अरेबिक शब्द सोडले तर उर्दू-हिंदीच्या साम्यामुळे बाकी मोठा भाग आपल्या आवाक्यातला असतो. हिंदी सिनेमाही आपणाला गझल समजण्यास मदत करतो. इतिहासात आपण बरेच फारसी शब्दही आपल्या मराठीत सामावून घेतले आहेत. या सगळ्याचा गझल आत्मसात करण्यास मोठा हातभार लागला. हायकूबाबत तसे झाले नाही. भाषेची अनभिज्ञता एक मोठा अडसरच ठरला.

दुसरे मह्त्वाचे कारण म्हणजे हायकूचे तांत्रिक अंग.जपानी भाषा उच्चारनुसारी असल्याने नियम त्यानुसार बांधले गेले.संपूर्ण हायकू तीन ओळींचा एवढी माहिती सर्वांना असते.पण या तीन ओळीही, (अक्षरवृत्तातील गणांप्रमाणे) तीन ओळीत उच्चारांचे गट पाडून, ७,७,५ अश्या असाव्यात व यमक पहिल्या-दुसर्‍या किंवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत असावे. अल्पाक्षरत्व ही महत्वाची अडचण आहे. जे काही सांगावयाचे ते इतक्या थोड्या जागेत बसवावयाचे आहे की कवीला बर्‍याच विषयांना रजा द्यावी लागते. माझे प्रेयसीवरील प्रेम यावर काही सांगावयाला हायकू हा काव्यप्रकार सोयिस्कर नाही. (असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते !). अर्थात हे सर्व भाषांनाच लागू पडते, अगदी जपानीलाही, म्हणून आणखीन एक बंधन घतले गेले. हायकू हे सरळ व साधे विधान असले पाहिजे. तीन ओळी एका विधानाला पुरेशा व्हावयास पाहिजेत. त्याचबरोबर अचूक शब्दांची निवड अनिचार्य होते. परत या तीन ओळी स्वतंत्र पंक्ती नकोत. एका अनुभवाच्या रचनेकरता केलेली ती एक विभागणी आहे.

हे झाले तंत्र. त्यावर प्रभुत्व मिळवणे एक वेळ सोपे होईल पण पुढचा भाग हा अवघड आहे. हायकू हे वाङ्मयीन चित्र असले पाहिजे. चित्रकार चित्र काढतांना रंगाचा उपयोग करतो, काही जागा मोकळ्या सोडतो व त्याच्या मनांत उमटलेले भाव तुमच्यासमोर उभे करावयाचा प्रयत्न करतो. प्रेक्षक रंगसंगती, रेखा, मोकळी जागा सर्वांचा एकत्र विचार करून चित्रकाराच्या भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करता. तसे हायकू वाचतांना व्हावयास पाहिजे. चित्र म्हणजे सिनेमा नव्हे तसेच हायकू म्हणजे काव्य नव्हे, कादंबरी नव्हे. एक क्षण,त्यावेळचे चित्र व त्यामुळे कवीच्या मनात उमटलेल्या उर्मी, या सर्वांना तीन ओळीत बंदिस्त करावयाचे आहे. लक्षात घ्या, एक चित्र असलेच पाहिजे, नुसत्या तरल भावना उपयोगाच्या नाहीत. अवघड आहे, नाही ? मला वाटते एखादे छायाचित्र हा परिणाम घडवून आणण्यास जास्त सफल होऊं शकते. उपक्रमवरील काही छायाचित्रे (उदा. अब्द) आठवून पहा. पु.शि.रेग्यांच्या कविता, त्या हायकू नव्हेत, या कल्पनेच्या जवळ पोचतात.

मराठीत हायकूची, किंवा जास्त बरोबर म्हणजे हायकूसदृष, रचना करावयाची असेल तर तंत्राची बंधने ढिली केलीच पाहिजेत. तीन ओळी ठेवा,७,७,५ वगैरे सोडून द्या. वृत्ती जोपासा, तंत्र मुरडून वापरा.आज काही उदाहरणे देत आहे. आपल्या वाचनातील दिलीत तर सगळ्यांनाच आनंद मिळेल.

(१) समुद्र दूर गेलेला
किनार्‍यावरचे पक्षी स्तब्ध
नको या वेळी एकही शब्द
शिरीष पै

(२) सुकत सुकत पिवळं पान
फांदीवरून खाली गळलं
एका फुलाला सारं कळलं
शिरीष पै

(३) तारेवरील फाटका पतंग
वार्‍यावर फडफडणारा
मी.. आतल्या आत तडफडणारा

(४) सकाळच्या कोवळ्या उन्हात
लाजरी कळी उमलणारी
एक आठवण जागवणारी

पुढच्या भागात शिरीष पै यांनी काही जपानी हायकूंची केलेली भाषांतरे

शरद

Comments

हायकू

शिरीष पै याच्या काही कविता वाचण्यात होत्या. हायकूचा प्रचार चद्रकात गोखलेनी प्रसीद्धीस आणले का? त्याचा चारोळ्या मस्त आहेत.पुढच्या भागाची वाट् पाहत आहो.

शैलु.

अरे वा...!

हायकूची ओळख आवडली.
शिरीष पै यांच्या हायकूच्या प्रतिक्षेत.

पहिल्या दोन ओळीनंतर तिसर्‍या ओळीत काहीतरी अनपेक्षित, जरासा धक्का, हायकूचे वैशिष्टे म्हणावे नाही का ?

>> पु.शि.रेग्यांच्या कविता, त्या हायकू नव्हेत,
हम्म, यावर जाणकार बोलतीलच..!

-दिलीप बिरुटे

हायकूला काय म्हणावे

हायकू म्हणजे एक छोटीशी क्षणभंगूर, तरल, जाणीव किंवा उपमा/रूपक असं वाटतं. कवितेप्रमाणे भाष्य करण्याची त्यात अपेक्षा नाही, जीव लहान आहे. पण काही रचना अर्कासारख्या येतात त्यामुळे फुलांच्या उधळणीपेक्षा अत्तराचा थेंब वाटतात.

क्षणिका? कणिका? तीनोळी? रूपिका?

तीन रेषांचा अत्तरभास
क्षणभंगूर तरल रूपकश्वास
दे जाणीवेला गंधध्यास

नावं सुचवा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

त्रिवेणी

त्रिवेणी चालू शकेल कदाचित. मात्र गुलजार यांनी तीन ओळींच्या एका वेगळ्या काव्यप्रकाराला हे नाव दिलेलं आहे. शांता शेळक्यांनी मराठीत त्यांचा समर्थ अनुवाद केला आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

त्रिज्या

त्रिज्या असे नाव सूचवावेसे वाटते.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

तिहाई किंवा तिय्या

नादमाधुर्य आणि संक्षिप्तता दोन्ही आहे...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हायकूला हायकूच म्हणावे

हायकूला हायकूच म्हणावे. आंब्याला पेरू म्हणून कसे चालेल?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बरोबर

आंब्याला पेरू म्हणून कसे चालेल
लस्सीला दारु म्हणून कसे चालेल
जे ते त्या त्या ठिकाणी हवे

हीपण एक हायकूच...
सन्जोप राव
एक तो ये आंख की लडाई मार गयी
दुसरी वो यार की जुदाई मार गयी
तीसरी हमेशा की तनहाई मार गयी
चौथी वो खुदा की खुदाई मार गयी
बाकी कुछ बचा तो मंहगाई मार गयी

का बरं?

पण आपण मॅंगोला आंबा म्हणतोच ना. सॉनेटला सुनीत म्हणतो. आता मूळ शब्द आठवत नाही, पण त्याला धम्मकलाडू म्हणतोच ना...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शब्दबंबिका

क्षणिका? कणिका? तीनोळी? रूपिका?

तीन रेषांचा अत्तरभास
क्षणभंगूर तरल रूपकश्वास
दे जाणीवेला गंधध्यास

नावं सुचवा.

सध्यातरी शब्दबंबिका हे नाव सुचते आहे.

अवांतर
शब्दबंब हे नाव राखून ठेवावेसे वाटते आहे. (शब्दबंधआठवले ना.)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जपानी हायकूबद्दल मला मिळालेली माहिती

जपानी हायकूबद्दल मला मिळालेली माहिती अन्यत्र मी दिलेली आहे. तेथून उद्धरण :

हायकू हा जपानी काव्यप्रकार शांताबाईंनी आणि अन्य कवींनी मराठीत रचला आहे. ... मूळ जपानी नियमांप्रमाणे ... काही फरक ... (:)
यात जास्तीत जास्त ३ ओळी असतात, आणि जास्तीतसास्त १७ मात्रा असतात. स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात.
अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे.
तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे.

जितपत आंतरजालावर वाचायला मिळते, त्यावरून असे वाटते की जपानी भाषेतील हायकूमध्ये यमक नसते.
शक्यतोवर ५, ७, ५ मात्रांच्या ओळी असतात. (लेखात टंकनदोषामुळे ७, ७, ५ असे दिसते आहे.)

विकीवरून एक जपानी उदाहरण साभार :
फुरुइके या (५ मात्रा, शेवटचा 'या' ह्रस्व)
कावाजु़ तोबिकोमु (७ मात्रा, सर्व स्वर ह्रस्व)
मिजु़ नो ओतो (५ मात्रा, सर्व स्वर ह्रस्व)

(जपानी-इंग्रजी-मराठी करत) भाषांतर :
जुनाट तळे
बेडूक मारे सूर
पाण्याचा ध्वनी

(हे भाषांतर करताना ५-७-५ अक्षरे घेतली आहेत, मात्रा नव्हे, क्षमस्व.)

वरील हायकू मात्सुओ बाशो (ई.स. १६४४-१६९४) या कवीने रचला आहे, आणि कदाचित जगात सर्वात प्रसिद्ध हायकू आहे. तो मुळात देण्याचे कारण हे - ५-७-५ मात्रा, आणि यमके नसणे, दोन्ही लगेच दिसते. आता शेवटच्या ओळीत कलाटणी आहे का? कोणास ठाऊक. (१) तळे, (२) बेडूक, (३) ध्वनी अशी प्रत्येक ओळीतील वाक्यांची उद्देश्ये वेगवेगळी आहेत. त्यात कलाटणी अशी वेगळी दिसत नाही.

हायकू प्रसिद्ध असल्यामुळे शिरीष पै यांनी बहुधा भाषांतर केलेले आहे. केले असेल, आणि ते उत्तम भाषांतर शरद देतील तर फार आनंदाची गोष्ट आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट

स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात.
अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे.

तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली की हो. त्यामुळे मी.. आतल्या आत तडफडणारा, एक आठवण जागवणारी वगैरे हायकूत चालणार नाही बहुधा. बहुधा हे मराठी हायकू असावेत. (इंडियन चायनीजच्या धरतीवर.)

बाकी तुमचे उन्हाळ्यातले थेंब झकास आहेत.
दवाचा एक बिंदू
पानाला लोंबतो
तसा जड नाही तो

सुरेख शब्दचित्रे. आणखी लिवा की हायकू. तुमच्या इतर कवितांपेक्षा हायकू अधिक आवडले.

तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे.

तोडू वाक्य आहे. पण साध्यासु्ध्या मराठीत काय म्हणायचे? भावनागर्भाचा साक्षात्कार म्हणजे काय? वाचकाच्या जाणिवा हायकूने प्रेग्नंट होतात की काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

साधेसुधे मराठी

होय. भावना सांगणार्‍या मराठी कविता "इंडियन चायनीज"सारख्या आहेत :-)
- - -

साध्यासुध्या मराठीचे ध्येय चांगले. पण अट्टाहास योग्य नाही.

"तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे."

म्हंजी पघा. मनात कायबाय व्हत आसतं. गान्यात तसं कायबी नाय. पन आयकतो ना आपन? तवा आपसूक मनात कायबाय व्हतं. मनात म्हंजी काय? कळत पन न्हाय. इक्त्या खोलामंदी. तस झाल ना? मंग म्हनाव गानं ब्येस. न्हायतर न्हाई.

वरील बोली मला नीट येत नाही. मला येत असलेल्या बोलीत -
खरे तर कवीला भावना सांगायच्या असतात. पण हायकूत उघड भावना सांगत नाही. वाचताना त्या भावना मनात आपोआप उमलतात. नसांगितल्या तरी. कवीला हव्या त्या भावना उमलल्या पाहिजेत. तरच हायकू सफल. नाहीतर नाही.

वाक्ये तोडून अर्थ कमी झाला. असे मला वाटते.

"भावनागर्भ" मध्ये गरोदरपणाची उपमा आहे, हे तुम्हाला समजले तर योग्यच.

गरोदर स्त्रीच्या पोटातले मूल उघड दिसत नाही, त्याच प्रकारे या कवितेच्या आतमध्ये भावना असते, ती अजून दिसत नाही. गरोदर स्त्रीचे मूल पुढे जन्मते. तेव्हा स्पष्ट दिसते. मुलाला बघून आनंद होतो. कवितेतली भावना पुढे स्पष्ट होते. तेव्हा आनंद देते.

"साक्षात्कार" -> साक्षात् म्हणजे "डोळ्यांसमोर" -> डोळ्यांसमोर स्पष्ट दिसणे. मात्र मराठीत हा शब्द चमत्कारी दृश्यांबाबत वापरतात.

एखादी गोष्ट सामान्यपणे दिसत नाही. पण कधीतरी इतकी स्पष्ट दिसते, वाटते की डोळ्यासमोर असावी. इतका की तो चमत्कार वाटतो. अशा अनुभवांना "साक्षात्कार" म्हटलेले ऐकलेले आहे. एखाद्याला कुलदैवताचा साक्षात्कार होतो. एखाद्याला सद्गुरूचा होतो.

कवितेतली भावना उघड नाही. पण मग मनातल्या मनात खूप स्पष्ट दिसते. जणूकाही उघड सांगितलेली असावी. तो चमत्कार वाटतो. आनंद होतो. तसा आनंद दिला तर हायकू सफल होतो.
- - -

वरील वाक्ये एकत्र :

गरोदर स्त्रीच्या पोटातले मूल उघड दिसत नाही, त्याच प्रकारे या कवितेच्या आतमध्ये भावना असते, ती अजून दिसत नाही. गरोदर स्त्रीचे मूल पुढे जन्मते. तेव्हा स्पष्ट दिसते. मुलाला बघून आनंद होतो. कवितेतली भावना पुढे स्पष्ट होते. तेव्हा आनंद देते. स्पष्ट होते म्हणजे कशी? कवितेत उघड तर नसते. पण मग वाचकाच्या मनातल्या मनात खूप स्पष्ट दिसते. डोळ्यासमोर असल्यासारखी स्पष्ट. जणूकाही उघड सांगितलेली असावी. तो चमत्कार वाटतो. आनंद होतो. तसा आनंद दिला तर हायकू सफल होतो.

वरील परिच्छेद पुढील वाक्यात अगदी थोडक्या शब्दात सांगितलेला आहे :

"तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे."

एखाद्या वाक्यात चार-पाच अक्षरी शब्द आहेत, म्हणून ते वाक्य निरर्थक आहे, असे नव्हे. त्यातल्या उपमा तुम्हाला पटल्या नाहीत तर हुकल्या म्हणा. गरोदरपणाची उपमा तुम्हाला कळली आहे, पण पटलेली नाही. ठीक आहे. दुसरी कुठली उपमा चांगला लेखक देईल.

गल्लत होते आहे

एखाद्या वाक्यात चार-पाच अक्षरी शब्द आहेत, म्हणून ते वाक्य निरर्थक आहे, असे नव्हे. त्यातल्या उपमा तुम्हाला पटल्या नाहीत तर हुकल्या म्हणा. गरोदरपणाची उपमा तुम्हाला कळली आहे, पण पटलेली नाही. ठीक आहे. दुसरी कुठली उपमा चांगला लेखक देईल.

गल्लत होते आहे. मला गरोदरपणाची उपमा पटलेली नाही असेही मी कुठे म्हटलेले नाही. (माझ्या प्रेग्नंट टिप्पणीमुळे तसे वाटण्याची शक्यता आहे, हे खरे.) एकाच गोष्टीकडे बघण्यासाठी असंख्य झरोखे असू शकतात. कवितेचे रसग्रहण, रसास्वाद हा ऍक्सेसिबलदेखील असल्यास उत्तम. (अट्टाहास नाहीच.) आणि तुम्ही वरील प्रतिसादात ते उत्तमपणे सांगितले आहे. तुमच्या त्या वाक्यानंतर हा प्रतिसाद वाचला तर सगळे स्पष्ट होते.

धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मात्रा?

शक्यतोवर ५, ७, ५ मात्रांच्या ओळी असतात
मात्रा नसावे...अक्षरे असावीत. मात्रा मोजतांना लघु-गुरु मोजावे लागतील...ज्यात बसवणे अवघडच वाटतंय.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

पैं चे भाषांतर

बाशोच्या हायकूच श्री. पै यांनी केलेले भाषांतर

एक तळं...जुनाट स्तब्ध
एक बेडूक बुडी घेतो त्यात
जराशी खळबळ आणि पुन्हा शांत

एक लेख फार लांबू नये म्हणून हायकूबद्दल सर्व लिहणे शक्य नव्हते. पुढील भागात बघू. येथे फक्त बाशो दिला आहे. दोन
भाषांतरे तुलना करून पहाण्यासारखी आहेत.
शरद

पै

पै असे शेवटचे नाव असलेल्या व्यक्तिने हा काटकसरी काव्यप्रकार मराठीत रूजवण्याचा प्रयत्न करावा, हे रोचक आहे. धनंजयचे भाषांतर मात्र मला पैंच्या भाषांतरापेक्षा उजवे वाटले. 'बुडी घेतो' मध्ये 'लिप्ड इन'सारखे (इंग्रजी भाषांतर अचूक असल्यास) 'बाहेरून कोसळलेले' यासारखी चलबिचल जाणवत नाही जे धनंजयच्या 'सूर मारणे'मध्ये जाणवते. एक, त्यात, स्तब्ध, खळबळ, जराशी, पुन्हा, शांत म्हणजे हायकूसाठी शब्दबंबाळ असावे, धनंजयच्या भाषांतरात तसे आढळत नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

सहमत

धनंजयचे भाषांतर मात्र मला पैंच्या भाषांतरापेक्षा उजवे वाटले. 'बुडी घेतो' मध्ये 'लिप्ड इन'सारखे (इंग्रजी भाषांतर अचूक असल्यास) 'बाहेरून कोसळलेले' यासारखी चलबिचल जाणवत नाही जे धनंजयच्या 'सूर मारणे'मध्ये जाणवते. एक, त्यात, स्तब्ध, खळबळ, जराशी, पुन्हा, शांत म्हणजे हायकूसाठी शब्दबंबाळ असावे, धनंजयच्या भाषांतरात तसे आढळत नाही.

पूर्णपणे सहमत. धनंजय ह्यांनी इतर काही काव्यप्रकार हाताळलेले मी बघितलेले आहेत. पण त्यांना हायकू हा काव्यप्रकार चांगला साधला आहे असे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वरील हायकूची काही भाषांतरे

बाशोच्या वरील हायकूची काही भाषांतरे/ अनुवाद एकाच ठिकाणी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हायकू

तीन रेषांचा अत्तरभास
क्षणभंगूर तरल रूपकश्वास
दे जाणीवेला गंधध्यास

व्वा ...त्रिताल...

"तुझं वाचन किती?
"तुझा पगार किती?
"तू बोलतोयस किती?

हे पण 'हायकू 'का?

हायकू नाही

तीन रेषांचा अत्तरभास
क्षणभंगूर तरल रूपकश्वास
दे जाणीवेला गंधध्यास

वरील तरल शब्दबंबाळ ओळींना हायकू म्हणता येणार नाही.

स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात.अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. हे धनंजय ह्यांनी आधी सांगितले आहेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद


मजकूर संपादित. (धन्यवाद संपादक)

स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात.अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. हे धनंजय ह्यांनी आधी सांगितले आहेच.

धम्मकलाडू

त्या तीन ओळींना आत्तापर्यंत कोणीच हायकू म्हटले नव्हते. ते तुम्हीच गृहीत धरलेत.
त्यांचा प्रश्न
तुझं वाचन किती?
तू बोलतोयस किती?
तुझा पगार किती

या वरच्या तीन ओळीतल्या मजकूर संपादित बद्दल होता. असो. तुमचे उत्तर कळले. धन्यवाद.
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हाहाहाहाहायकू

तुझं वाचन किती?
तू बोलतोयस किती?
तुझा पगार किती

हाहाहाहाहाहाहाहायकू नाही....पाठकांचा प्रश्न उशीर कळला आणि फार आवडला. ट्यूबलाइट. दुसरे काय.
पण असे असले तरी त्या ओळींचा तरल शब्दबंबाळपणा काही कमी होत नाही.

माझी सही स्वगतार्थी आहे. एवढी मनावर घेऊ नये कोणी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हायकू

तुझं वाचन किती?
तू बोलतोयस किती?
तुझा पगार किती

माझी सही स्वगतार्थी आहे, असे नाही मला पण लागु पडते...

शैलु.

नक्की काय ते सांगा...

तुझं वाचन किती?
तू बोलतोयस किती?
तुझा पगार किती
हाहाहाहाहाहाहाहायकू नाही....पाठकांचा प्रश्न उशीर कळला आणि फार आवडला. ट्यूबलाइट. दुसरे काय.
पण असे असले तरी त्या ओळींचा तरल शब्दबंबाळपणा काही कमी होत नाही.

या प्रतिसादात उद्धृत केलेल्या पहिल्या तीन ओळीसुद्धा तुम्हाला शब्दबंबाळ वाटतात! (नशीब मजकूर संपादित वाटत नाहीत)
कमाल आहे! बरं खाली उद्धृत केलेल्या तरी तुम्हाला पचतील असं वाटतं...

कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

आणि हे हायकू आहे का ते सांगता येईल का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सपाट

कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

आणि हे हायकू आहे का ते सांगता येईल का?

हेदेखील हायकू नाही. वरील सपाट ओळींनी कुठलाही "भावगर्भ साक्षात्कार" झालेला नाही. वरील ओळी उमलतच नाहीत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असफल - कदाचित, पण हायकूच

असं कसं, भावगर्भ साक्षात्कार झाला तर ते सफल हायकू. त्यामुळे तुम्हाला साक्षात्कार नाही झाला असं म्हणा हवं तर. तुम्हाला असफल वाटलं तरी ते हायकू आहेच.

आणि नीट विचार केला तर अर्थ लावता येतो - हे कमळाच्या घरा - म्हणजे चिखला - बघ, स्वत:कडे , आणि आता कमळ बघ... मला वाटतं खूप छान अर्थ आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तसे बघीतले तर...

राजेशघासकडवी
पाच आठवडे चार दिवस
तरी इतकी प्रगती?

यालाही हायकू म्हणता येईल. इथे कमळ, घर, बघ असे निकष लावल्यास अर्थ उघड आहे. भावगर्भ साक्षात्कार होतो की नाही, ते देवाला ठाऊक.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

हे दोन हायकू.

प्रशांत मनोहर ह्या महाजालावरील माझ्या तरूण मित्राचे दोन हायकू पाहा.
५-७-५ अशा पद्धतीने अक्षरे योजून तीन ओळीत काही तरी सांगणारी ही कविता

१)अचल असे
धृवतारा तो पाहा
उत्तरेकडे

२)शांत शीतल
चांदणे पुनवेचे
प्रेम आईचे

मी ह्यांना चालही लावलेय. ;)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हायकू

त्याचा ह्या नेहमीच्या ओळया सहज घेतल्या..

"तुझं वाचन किती?
"तुझा पगार किती?
"तू बोलतोयस किती?

हे पण 'हायकू 'का

हे मी विनोदाने म्हटले होते..

शैलु.

चालू द्या

सकाळी लॉग इन केल्यावर
वरचा शिमगा नजरेस पडला
हायकूचा "लाडू" अनेकांना नडला

शांताबाई शेळके

फार पुर्वी कुठेतरी शांताबाईंनी एका जपानी हायकूचा केलेला अनुवाद् वाचला होता.
काहिसा असा होता.

"देवळामधली प्रचंड घंटा
नाद धजेना करु
तिच्या कडेवर गाढ झोपले होते फुलपाखरु"

नेमके शब्द् आठवत नाहीत. चु.भू.दे.घे.

जयेश

अचंबा वाटतो

श्री. शांताबाईंची ही रचना तीन ओळीत दिसली तरी ती खरी अशी असली पाहिजे
(१) देवळामधली प्रचंड घंटा नाद धजेना करू
तिच्या कडेवर गाढ झोपले होते फुलपाखरू !!
वा
(२) देवळामधली प्रचंड घंटा
नाद धजेना करू !
तिच्या कडेवर गाढ झोपले
होते फुलपाखरू !!
श्री. जयेश यांना नम्र विनंती की त्यानी रचना कोठे मिळाली त्याचा संदर्भ द्यावा म्हणजे मागेपुढे बघून काही शोध लागतो का बघता येईल. श्री. शांताबाईंना कवितेतील आंतर्गत लयीचे अचूक भान होते व सहज गुणगुणले तरी घंटा व झोपले यां नंतरचा विश्राम (pause) नैसर्गिक रीत्या येतो. तेव्हा हायकू म्हणता यावे म्हणून श्री. शांताबाई अशी बेढब मोडतोड करतील असे वाटत नाही.
शरद

नजरचुक

ही बेढब मोडतोड माझ्या नजरचुकीने झाली आहे. त्याबद्दल् क्षमस्व
शब्दांमध्ये मात्र फारशी गल्लत नसावी
मला नेमके आठवत नाही परंतु सात आठ बर्षांपुर्वी बहुतेक एका दिवाळी अंकात सदर रचना वाचल्यासारखे आठवते

जयेश

चांगला प्रकार... कवितेचा

आज नको काम
वैतागलेला जीव
पर्ज्यन्यतुशार बाहेर...

असाच प्रयत्न केला...
चुक् भुल माफि आसावि.......

विनय आगसे.
हैद्राबाद्. आंन्ध्रप्रदेश. भारत

माझाही एक प्रयत्न

वरील सर्व विवेचन वाचून मीही दोन हायकू लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

१) पुस्तके गेली
किलोच्या 'रेट' वर
रद्दीच्या वाटेवर

२) पुस्तकांची रद्दी
'रेट'ची घासाघीस
लेखक कासावीस

कृपया सहन कराव्या.

ही कशी वाटते

चार डोळे दोन कांचा दोन खाचा
मग येतो प्रश्न कुठे आसवांचा

आरती प्रभु

शैलु.

बाशो चे हायकू...

http://marathihaiku.blogspot.com या स्थळावर काही माझे, तर काही जपानी अनुवादित हायकू देण्याचा विचार आहे. अनुवाद या पूर्वीच्या एखाद्या अनुवादाशी मिळते जुळते असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.. ( ता.क. पाच सात् पाच हा आकृतीबंध मराठी हायकू साठी समर्पक / उपयुक्त नाही असे वाटते..)

बाशो चे हायकू...

1.

तू बघणार नाहीस
हे अथांग एकाकीपण
किरी झाडाचं एखादं गळणारं पान

2.

शिशिरातल्या या संध्याकाळी
मी एकटाच
चालत जातोय

3.

वर्षातला पहिला दिवस
विचारांमध्ये गुरफटलेलं एकाकीपण
शिशिरातली संध्याकाळ दाटून आलेली

4.

एक जुनाट तळं
एका बेडूक उडी मारतो
छपा़क!

5.

विजा चमकताहेत
हेरॉन पक्षांचं रडणं
अंधार भोसकून जातंय

6.

सिकाडा किड्यांची किरकिर
सांगत नाही
ते किती दिवस जगणारेत अजून

7.

चांदणं न्याहाळतंय
तांदूळ दळता दळता
गरिबीचं मूल

8.

देवळांच्या घंटा विझल्या तरी
संध्याकाळ ताजीच ठेवून आहेत
हे सुगंधी बहर

9.

आज समुद्र खवळलेत
साडो बेटावर झाकोळून आलेत
तारकांचे ढग

10.

कशासाठी झुरतंय, हे सुकलेलं मांजर
उंदरांसाठी, माश्यांसाठी
की परसबागेतल्या प्रेमासाठी

11.

हे दवबिंदूंनो
मला तुमच्या लहानशा गोड्या पाण्यात
धुऊ देत हे जीवनाचे धूमिल हात...

12.

मी
आपली न्याहारी उरकतो
पहाटेची प्रभा बघत बघत

13.

शांत पहुडलेलं जुनं गाव
फुलांचा सुगंध दरवळत जातोय
दूर कुठेतरी सायंकाळची घंटा वाजतेय....

मुक्त अनुवाद : अनंत ढवळे
http://www.manogat.com/node/19468

 
^ वर