नटरंग आणि अतुल कुलकर्णी

कागल गावच्या गुणा पैलवानाची तमाशा फडाची कथा असे नटरंगचे वर्णन वाचून खरं तर चित्रपट आवडेल की नाही अशी शंकाच वाटत होती, कारण विनोदी चित्रपटांची सुमार लाट यायच्याआधी मराठी चित्रपट ग्रामीण तमाशा पटांनी वात आणला होता. पण प्रत्यक्षात मात्र चित्रपट फारच आवडला. कथेचा वेग, पात्र निवड संकलन फोटोग्राफी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अतिशय चुरचुरीत संवाद. कुठल्याही गावाच्या कट्ट्यावर इरसाल टोळक्यात ऐकायला मिळतील असे अस्सल मसालेदार संवाद जमले आहेत

सगळे जमून आलेले असताना एकच गोष्ट खटकते ती म्हणजे अतुल कुलकर्णी. चित्रपटातील भूमिकेमुळे अतुल कुलकर्णी सर्वात जास्त प्रशंसा होताना दिसत असली तरी मला मात्र ना अतुल कुलकर्णीला ना पैलवान जमला आहे ना नाच्या असेच वाटले. एखाद्या भूमिकेवर मेहनत घेणे म्हणजे अक्षरशः अंगमेहनत घेणे असा अर्थ काढून अतुलने जीवापाड मेहनत करुन् पीळदार बनवलेले शरीर आणि नंतर नाच्याच्या रोलसाठी हडकवलेले शरीर ह्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत इतके सोडले तर अतुल कुलकर्णीच्या खात्यात काहीही जमा होत नाही. अंग मेहनत थोडी कमी करुन् तो वेळ कागल गावचा गडी कसा असतो किंवा नाच्या हा प्रकार काय असतो ह्याचा अभ्यास करण्यात अतुलने वेळ दिला असता तर चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला असता असे वाटते. अतुल हा गुणी अभिनेता आहे ह्यात प्रश्नच नाही पण त्यामुळेच त्याच्यावर अपेक्षांचे ओझे आहे जे वाहण्यात तो सपशेल कमी पडला आहे. गुणा कागलकर म्हणजे 'गुणा कुलकर्णी' नव्हे ह्याचे भान अतुलने बऱ्याच प्रसंगात ठेवलेले दिसत नाही.

ग्रामीण भागातले बेअरिंग उत्तम जमले आहे पांडबाचे काम करणार्‍या किशोर कदमांना. कसलेही शारीरिक चमत्कार न करता निव्वळ अभिनयाच्या जोरावर हा पांडबा अप्रतिम साकारला आहे. ही भूमिका करण्यापूर्वी कुठलातरी पर्सनल ट्रेनर वगैरे ठेवणार्‍या अतुलने आधी कदमांची शिकवणी लावायला हवी. नाच्या म्हणजे कृश मलूल आजारी दिसणारे पात्र नव्हे. नाच्या सारखे चालता आले तरी हावभाव, मुरके,किनरा पण खणखणीत आवाज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नाच्याची ऊर्जा अतुलच्या पात्रात कुठेही दिसत नाही.

एकंदरीत अतुलचा अभिनय आणि पटकथेतले इतर काही कच्चे दुवे वगळता चित्रपटाची भट्टी जमून आली आहे असे वाटते

Comments

ऍपेटायजर...

छान जमलंय. जरा कथेविषयीच्या (वेग योग्य आहे पलिकडे) चर्चेचा मेन कोर्स येऊ द्या की राव...
तुम्ही चांगलं चापून घेतलं आणि आम्हाला वाढपी तितका ठीक नव्हता म्हणून बोळवण करता होय?
(आयला, मी वपुंचं वचन वापरेन असं कधी वाटलं नव्हतं :-)

बरं, प्रश्न विचारतो - पैलवान व नाच्या या दोन भूमिकांवरून एकंदरीत पौरुष म्हणजे काय याविषयी पिक्चरला काही म्हणायचंय असं वाटलं. तर ते म्हणणं नीट झालंय का?

राजेश

मेन् कोर्स :)

छान जमलंय. जरा कथेविषयीच्या (वेग योग्य आहे पलिकडे) चर्चेचा मेन कोर्स येऊ द्या की राव...

कथेमध्ये फारसे नविन असे काही नाही. शून्यातुन धडपड करुन यश मिळवणे त्यासाठी अनेक संकटांना तोंड देणे असे साधे सूत्र आहे.

तुम्ही चांगलं चापून घेतलं आणि आम्हाला वाढपी तितका ठीक नव्हता म्हणून बोळवण करता होय?
(आयला, मी वपुंचं वचन वापरेन असं कधी वाटलं नव्हतं :-)

आचार्‍याची चव चाखायला त्याच्याच हातुन खाऊन बघा की, माझ्या हाताला ती चव कशी येईल? ;)

बरं, प्रश्न विचारतो - पैलवान व नाच्या या दोन भूमिकांवरून एकंदरीत पौरुष म्हणजे काय याविषयी पिक्चरला काही म्हणायचंय असं वाटलं. तर ते म्हणणं नीट झालंय का?

हो आणि नाही. म्हणजे थोडं फार जमलं आहे पण अजून चांगले करता आले असते.

वा

'नटरंग' पाहिला नाही, पण पाहीन असे वाटते. अतुल कुलकर्णीची सगळीकडे वाहवा होत असताना तोच या चित्रपटातला कच्चा दुवा आहे असे धाडसी विधान केल्याबद्दल अभिनंदन. नाहीतर त्याच्या कमावलेल्या आणि गमावलेल्या शरीरयष्टीबद्दलच ('पा' मधल्या अमिताभसारखे किंवा कमल हासनच्या कुठल्याही चित्रपटासारखे) सगळीकडे ऐकायला मिळते...
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

धाडसी विधान नाही बहुतेक....

अतुल कुलकर्णीने चांगला अभिनय केला आहे हे म्हणणारे, नटरंग बाबत जी एकदम कौतुकाची लाट आली त्यात वाहून गेले आहेत. मला त्याने खू़प उत्कृष्ट अभिनय केला आहे असे वाटत नाही. ठीक अभिनय केला आहे. उत्कृष्ट मुळीच नाही. नाच्या आणि पहिलवान यांच्या शरीरयष्टीत फरक दाखवायलाच हवा होता. तसे केले नसते तर हसे झाले असते त्यामुळे त्यात विशेष वाटण्यासारखे काही नाही.
नटरंग हा अनेक भिकार मराठी चित्रपटांमध्ये उजवा आहे इतकेच. शिवाय ग्रामीण विषयाचा चित्रपट असूनही मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांना घेतलेले नाही यातच चित्रपटाचे यश समावलेले आहे. (वा वा!)

कोलबेरपंत, अतुल कुलकर्णी गुणा कुलकर्णी वाटतो हे एकदम पटले बुवा. काही ठिकाणी संवादांमधले शहरी पाणी बिलकूल लपलेले नाही. माझ्यामते तरी हे दिग्दर्शकाचे काम आहे. अशी वाक्ये कानाला लगेच खड्यासारखी लागून ती सुधारायला हवी होती. पण दिग्दर्शकाने तशी मेहनत घेतलेली दिसत नाही.

-सौरभ.

दिग्दर्शकाच्या कामाकडे पाहिले तर हरिश्चंद्राची फॅक्टरी जास्त चांगला जमून आला आहे. विशेषतः तो अगदी भावभावनांचे दळण, हालअपेष्टा, परिस्थितीशी झगडा असा न दाखवता विनोदी अंगाने जाणारा बनवल्याने जास्त परिणामकारक झाला आहे.

==================

पांडोबा 'ब्येष्ट'.

संपूर्ण सहमत. मलाही अतुल कुलकर्णीने आव्हानात्मक भूमिका केलीय असे कुठेही वाटले नाही. उलट किशोर कदमांचा पांडोबा 'ब्येष्ट'.

पटकथेतल्या त्रुटी निराळ्याच.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

अतुल

अतुल कुलकर्णीची सगळीकडे वाहवा होत असताना तोच या चित्रपटातला कच्चा दुवा आहे असे धाडसी विधान केल्याबद्दल अभिनंदन.

धन्यवाद! 'वळू' नंतर लागोपाठ दुसर्‍यांदा अतुलने निराशा केल्याने राहवले नाही.

चांगला पिच्चर

कोलबेरा, चित्रपट परिक्षण किंचितच आवडले. 'नटरंगवर' अशा आशयाचे लेखन पेप्रात लै छापून आले आहे.* मराठी पीच्चर आता निराळ्या [म्हणजे कोणत्या] वाटेने जातोय त्याचं आपण सर्वांनी कौतुक करायला हवं. मागच्या दशकातले चित्रपटातले विनोद, विनोदी अभिनय, रडारडीच्या कथेपेक्षा, आणि मराठी चित्रपट म्हणजे मकरंद अनासपुरे, भरत जाधव अशी छबी मराठी चित्रपटाची होत असतांना त्याच-त्याच वाटा सोडून निघालेलेल्या 'नटरंग' चे आणि त्यातले कलाकार,दिग्दर्शक, गीतकार, गायक, यांचे स्वागत केले पाहिजे. वरील सर्वांना आम्ही पैकीच्या पैकी मार्क देतो.

मुख्य मुद्याकडे वळतो. अतुल कुलकर्णीचा 'नाच्या' अज्याबात भावला नाही. इथे गणपत पाटील डोळ्यासमोर येतो, त्याची आठवण झाल्याशिवाय होत नाही. अतुल कुलकर्णीच्या 'नाच्या'पेक्षा पहिलवान भारी वाटतो. नाच्याचा अभिनय आणि बोलण्याची शैली अतुल कुलकर्णीला अज्याबात जमली नाही. पण, नाच्यासारखा दिसावा म्हणून अतुल कुलकर्णीने खूपच कष्ट घेतलेत याच्याशी सहमत. कष्ट इतके जास्त झाले आहे की, काही प्रसंगात तर तो आजारी असल्यासारखाच वाटतो. पण तेवढा भाग सोडला तर, शेतातील वगाची तयारी, पांडबाचे काम, आणि पिच्चर देतो तो संदेश जबरा आहे. सोनाली कुलकर्णी आणि तिची पीच्चरमधील आंग मोडून केलेल्या डान्सची इंट्री अहाहा.....

* असे काही वाक्ये लिहिल्याशिवाय प्रतिसाद पूर्ण होत नाही. :)

'माय नेम इज.... च्या चित्रपट परिक्षणाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

सहमत

सहमत आहे. गणपत पाटील म्हणे 'तसला' नाहीये असे जेव्हा कळले तेव्हा आश्चर्य वाटले होते. आत्ता ग बया! म्हणणारा गणपत पाटील किती ताकदवान अभिनेता होता हे आता समजते
प्रकाश घाटपांडे

या परिक्षणाशी १००% सहमत

अतुल कुलकर्णीपेक्षा सूर्यकांत चंद्रकांत पैलवान म्हणून् जास्त शोभले. पैलवानकी करणार्‍याचं सौष्ठ्व आणि ६-पॅक्स वाल्याचं सौष्ठव यात अंतर् आहे.. (कुणाला शंका असेल् तर् सकाळी जेव्हा मातीतली कुस्ती खेळणारे पैलवान जोर घुमवत असतात तेव्हा तालमीत चक्कर टाकून् या..)

बाकी हा पिक्चर काय संदेश देतो? हे मला अजून् कळालं नाही?

पिक्चरच्या शेवटी गुणा कागलगर ला बक्षीस मिळतं म्हणून् आधीच्या भागात त्याने कुटुंबाबर केलेला अन्याय (मुलाला पाटी हवी असताना तमाशाला जाणं, १२ रूपयातले ६ रू तमाशात् उडवणं, फालतू माज करणं) कसा काय जस्टिफाय होतो? बक्षीस मिळालं म्हणून् "त्याने केलेल्या त्यागाची किंवा सोडून् दिलेल्या संसाराची " लोकं स्तुती करत आहेत्. बक्षीस मिळालं नसतं तर्?

कोलबेरांशी सहमत!

>>नटरंगचा कच्चा दुवा...अतुल कुलकर्णी
सहमत.

नटरंगचा सर्वात उत्तम भाग म्हणजे त्यातली बहुसंख्य गाणी(एखादा अपवाद सोडून).
सगळ्यात कच्चा दुवा म्हणजे अतुल कुलकर्णी.....नाच्या तर साफ फसलाय.
कोणताही तमाशा हा बाईवर चालतो...असे आजवर ऐकलेले समीकरण होते....त्याला सुरुंग लावणारे विधान म्हणजे...नाच्याशिवाय तमाशा कसा चालणार? आणि त्यासाठी गुणाशिवाय दुसरा कुणी मिळू नये...हे तर अतिशयोक्तीचे उत्तम उदाहरण. आणि म्हणे त्यांचा तमाशा गाजतो तो गुणाच्या नाच्यामुळे.....हाहाहा. इतक्या भिक्कार नाच्यामुळे जर चित्रपटातील तमाशा गाजला असेल तर त्या सर्व रसिकांची कींव करावीशी वाटते. ;)
गुणा तमाशा पाहात पाहातच मोठा झाला....तरीही त्याला नाच्या कसा काम करतो हे माहित नसते...ह्यावर कसा विश्वास ठेवायचा?
एकूणच नसलेल्या प्रश्नांभोवती गोष्ट केंद्रित केलेय.
थोडक्यातः जाहिरात जितकी मोठी तितकाच चित्रपट सामान्य आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

कच्चे दुवे

आणि म्हणे त्यांचा तमाशा गाजतो तो गुणाच्या नाच्यामुळे.....हाहाहा. इतक्या भिक्कार नाच्यामुळे जर चित्रपटातील तमाशा गाजला असेल तर त्या सर्व रसिकांची कींव करावीशी वाटते. ;)

नाच्या भिक्कार आहे ह्याबाबत सहमत पण तमाशा गाजतो तो नाच्याच्या लिखाणामूळे असे दाखवले आहे त्यामूळे थोडा बेनिफिट ऑफ डाऊट रसिकांना द्यायला हरकत नाही. :)

कोणताही तमाशा हा बाईवर चालतो...असे आजवर ऐकलेले समीकरण होते....त्याला सुरुंग लावणारे विधान म्हणजे...नाच्याशिवाय तमाशा कसा चालणार?

त्यापेक्षा अनाकलनिय म्हणजे नाच्याच्या नखर्‍यांचा वापर करुन सुपारी मिळवणे किंवा नाच्यावर बलात्कार होणे हे प्रसंग. तमाशातील बाईने लगट करुन सुपारी मिळवलेली दाखवली असती तर ते पटलं असतं पण नाच्याच्या चाळ्यांनी पाघळून जाऊन कुणी सुपारी देत असेल तर अवघड आहे.दुसरे म्हणजे, एकवेळ हा सुपारी देणारा राजकारणी समलिंगी आहे असे मानून त्याचे पाघळणे समजून घेऊ शकतो पण त्याचा प्रतिस्पर्धी राजकारणी हा नाच्यावर बलात्कार करताना दाखवले आहे, तोही समलिंगीच की काय? ये बात कुछ हजम नही हुयी...

समलिंगीच असेल् असं नाही..

समलिंगीची व्याप्ती फार मोठी आहे.. नेत्याने केलेला बलात्कार आणि नाच्याच्या नखर्‍याकडे आकर्षित झालेला दुसरा नेता हा एक् "फेटिश" चा प्रकार असू शकतो.

असे प्रकार अजूनही चालू आहेत्. उदा. क्रेगलिस्ट वर "t4m" किंवा "m4t" च्या अनेक जाहिराती आहेत.

बोलट या व्यक्तिचित्रात पु.ल.नी पण या गोष्टीचा पुसट उल्लेख केला आहे.

शिवाय बलात्काराची व्याप्तीसुद्धा आकर्षणापेक्षा मोठी

शिवाय बलात्काराची व्याप्तीसुद्धा आकर्षणापेक्षा मोठी आहे.

बलात्कार हा अत्यंत दहशत उत्पन्न करणारी हिंसा म्हणून वापरला जातो, तेव्हा आकर्षण असतेच असे नाही. (गुप्त पोलिसांकडून "इंटेरॉगेशन"मध्ये, तसेच युद्धांमध्ये सामूहिक बलात्कार वगैरे प्रकार पुष्कळदा केले जातात, याबद्दल आपल्याला वृत्ते माहीत आहेत. गुंडगिरीच्या दहशतीतसुद्धा हिंसेचा हा प्रकार वापरला जात असावा काय? - बहुधा होय.)

सहमत

बलात्काराचे कारण आकर्षण असेलच असे नाही.

चाळ्यांना भुललेल्या राजकारण्याचा वचपा काढण्यासाठी प्रतिस्पर्धी असे करणे शक्य आहे. (चित्रपट पाहिला नसल्याने निव्वळ कयास आहे. चूभूदेघे.)

वचपा

बलात्काराचे कारण आकर्षण असेलच असे नाही.

बरोबर आहे! पण लैंगिक भावना उद्दीपीत झाल्याशिवाय बलात्कार करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. विषमलिंगी असूनही पुरुष-पुरुष बलात्कार झालेले ऐकायला मिळते. (उदा. तुरुंगांमधे, मुंबईतील हॉटेलात काम करणारे पोरे) पण अशा उदाहरणांमधे लैंगिक भावना दबल्या गेल्याने त्यांचा निचरा बलात्कारावाटे झालेला दिसून येतो. चित्रपटातील बलात्कार करणारा राजकारणी हा त्या कॅटेगीरीतला नक्कीच नाही. निव्वळ वचपा काढण्यासाठी (आकर्षण नसताना/ लैंगिक भावना उद्दीपीत झालेल्या नसताना) बलात्कार करणे कसे शक्य आहे?

रूपक

हा सिनेमा मी पाहिलेला नाही, पण पाहाण्याची खूप इच्छा होते आहे.

मी जे काय वाचलंय (बहुतांशी याच चर्चेत) त्यावरून ही कथा पैलवानाची-नाच्याची नसून समाजाची आहे असं वाटतं. एका वेडापायी भुलून तो समाज आपलं पौरुष, रग, मर्दुमकी हरवतो. व त्याच्यावर राजकारणी आसक्तीची नजर ठेवून असतात. एक त्याच्यावर बलात्कारही करतो. हे सरळ सरळ रूपक असावं, व त्याचा त्या अंगानेच विचार व्हावा असं वाटतं. हा समाज कुठचा- संपूर्ण समाज की अशिक्षित, गावचा समाज? तो आपल्या जुन्या परंपरा फेकून देताना त्याला दु:ख होतं का? नवीन भूमिकेत शिरताना काय त्रास होतो? कुठे जुळवून घ्यावं लागतं? तो ज्या वेडापायी नाच्या होतो, ते तरी त्याला मिळतं का? ते मिळवण्यासाठी दिलेली किंमत जास्त आहे का?

प्रसंग सत्य, संभाव्य आहेत का हा थोडा गौण मुद्दा आहे असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उद्दीपन

लैंगिक भावना कशाने उद्दीपीत होतील हे सांगणे कठीण आहे. केवळ एखाद्या व्यक्तिवर नियंत्रण मिळवण्याच्या कल्पनेनेच काहींचे उद्दीपन होते. तेव्हा आकर्षण 'उद्दीपन ज्यामुळे होते' त्याचे आहे. त्यात हिंसा, नियंत्रण, समर्पण, बदला आणि काय काय गोष्टी येऊ शकतील. विषमलिंगी पुरूषांनी पुरूषांवर बलात्कार करण्याची दमन ही एकमेव प्रेरणा नसावी असे वाटते.

या निमित्ताने

मी हा चित्रपट पाहिलेला नाही. चान्स मिळाला तर पाहीन पण ह्या समीक्षा वाचायला जास्त आवडते. हे कुणी ठरवून घडवून आणते का माहित नाही पण एखाद्या चित्रपटातील कुठल्या तरी गोष्टीचा अफाट गाजावाजा केला जातो. इंग्रजीत ज्याला हाईप म्हणतात. बहुतेक मध्यममार्गी मंडळी ह्या हाईपला बळी पडून इतके लोक म्हणतायत ते चूक कसे असेल म्हणून त्या गाजावाजा करणार्‍यात सामील होतात. लगान हा एक सिनेमा ह्या जातकुळीतला आठवतो. पा, ब्लॅक हेही बहुधा तसेच. नटरंगचे कौतुकही अतुल कुलकर्णीच्या कमावलेल्या व गमावलेल्या शरीरयष्टीचेच होते. असल्या खोट्या हाईपला बळी न पडता आपले मत मांडल्याबद्दल कोलबेरचे अभिनंदन.

बाकी नाच्या हा प्रकार अगदी गणपत पाटलांपासूनचा, मला किळसवाणा वाटतो. असे स्त्रैण पात्र घेण्याऐवजी कुणी पुरुष वा स्त्री हे काम करू शकणार नाहीत का?

खर्‍याखुर्‍या तमाशाशी परिचय असणारे कुणी सांगतील का की खर्‍या तमाशात् नाच्या प्रकार हा कायम असायचाच का? नाच्या हा पारंपारिक तमाशाचा अविभाज्य घटक आहे का?

बाकी ह्यातली गाणी खूप चांगली आहेत् असे ऐकून आहे.

माझं मत

>>खर्‍या तमाशात् नाच्या प्रकार हा कायम असायचाच का?

नाही.

>>नाच्या हा पारंपारिक तमाशाचा अविभाज्य घटक आहे का?

नाही.

तमाशाच्या कलाकारांच्या छायाचित्रांचे एक चांगले पुस्तक माझ्या पाहण्यात आले*. त्या सर्व फोटोंमधे मला कुठेही नाच्या दिसला नाही. मलातरी या नाच्याची ओळख मराठी चित्रपटांमधूनच झाली. 'मावशी' हे पात्र नेहमी पाहण्यात आहे.

*[तमाशा एक रांगडी गम्मत ; संदेश ज्ञानेश्वर भंडारे. लोकवाड्मय गृह प्रकाशन, मूल्य ५०० रु. ]

-दिलीप बिरुटे

तोच तो जुना प्रश्न

चित्रपट कोठे पाहिलात?

हेच

श्री कोलबेर, प्रताधिकाराची वाट न लावता अमेरिकेत चित्रपट पाहता येईल का?

अपली मराठी

मी तरी अपली मराठी वर पाहिला. प्रताधिकाराची वाट न लावता अमेरिकेत पाहायला मिळणे अवघड असावे.

प्रताधिकार

यापुर्वी 'सखाराम बाइंडर' हे नाटक मी याच संकेतस्थळावर पाहीले होते. त्यामुळे एकदा वाट लावलीच आहे तर तीच वाट पकडून हा चित्रपटही पहावा असे म्हणतोय. परीक्षणे खूप वाचली. आशा आहे की परीक्षणांचे प्रतिबिंब चित्रपटात न शोधता चित्रपट पाहू शकेन.

एक चर्चा

या विषयावरील एक चर्चा
http://www.misalpav.com/node/10892

या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा या विषयावरील एक चर्चा

बऱ्यापैकी निर्मितिमूल्य

एखाद्या भूमिकेवर मेहनत घेणे म्हणजे अक्षरशः अंगमेहनत घेणे असा अर्थ काढून अतुलने जीवापाड मेहनत करुन् पीळदार बनवलेले शरीर आणि नंतर नाच्याच्या रोलसाठी हडकवलेले शरीर ह्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत इतके सोडले तर अतुल कुलकर्णीच्या खात्यात काहीही जमा होत नाही.

असेच. मला चित्रपट ठीक वाटला. एवढा काही नाही. थोडे बऱ्यापैकी निर्मितिमूल्य असले की आजकाल मराठी चित्रपटाचा प्रेक्षक गदगदून जातो की काय?
अतुलने अपेक्षाभंग केला. गुणा कुलकर्णी वाटतो हे खरेच. दिग्दर्शकाचाच दोष. शेवटी चित्रपट गुंडाळल्यासारखा वाटला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चित्रपट आवडला

मला चित्रपट आवडला. तमाशा/वग/बाई सगळे आवडले. कथा तर खूपच आवडली
बराचसा श्री. राजेशघासकडवींच्या वरच्या मताशी (रुपक) सहमत. मुळे कादंबरी वाचताना हे रूपक अधिक जाणवते.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चित्रपट पाहील्यानंतर... नाच्या, नाच्या, नाच्या

मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांनी गणपत पाटलांना विसरावे. नाहीतर ते चित्रपटात नाच्याला नपुंसक समजणार्‍या प्रेक्षकांइतकेच स्टिरीओटाइपच्या आहारी गेले आहेत असे म्हणावेसे वाटते. गुणा कागलकरची नाच्या होण्याची इच्छा नाही. नाच्या व्हायचे ठरवल्यानंतर काही महिन्यांतील त्याच्या व्यक्तिमत्त्वात आलेल्या स्थित्यंतराचा भाग चित्रपटात आहे. त्यात ऊर्जा, आवाज वगैरे पाहणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. अतुल कुलकर्णीच्या पैलवानकीच्या अभिनयात उच्चारांबाबत घोळ सोडल्यास बाकी काही उणीव आढळत नाही. नाच्या झाल्यानंतर अतुल थोडासा वास्तुपुरूषमधील भुमिकेतच असल्यासारखा वावरतो, हा दोष आहे. एकूणात मात्र अतुल कुलकर्णीचा अभिनय चांगलाच झाला आहे.

बलात्कार, राजकारणातील वैर वगैरे पटकथेतील दोष आहेत. श्री कोलबेर यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे, बलात्कार अनाकलनीय आहे. अतुल कुलकर्णी नाच्या झाल्यानंतर चित्रपट तितकासा पकड घेत नाही १.कथानकाच्या अवास्तवेमुळे आणि २. पात्रांचे वर्धन खुंटल्यामुळे.

अतुल कुलकर्णीला मुलगा आहे पण तो वडिलांकरिता पटका खरेदी करतो हे काही पटले नाही. त्याचे (बायकोविषयी सोडून द्या पण मुलाविषयीचे प्रेम केव्हाच दिसत नाही) पण अचानक सगळ्यांनी नाकारल्यानंतर तो मुलाला तरी बरोबर येतोस का असे विचारतो. हे अतिशय विसंगत आहे. अतुल कुलकर्णीच्या बायकोला काही स्वभावच नाही. सुरूवातीला सोशीक. मग अचानक विरोध. प्रेक्षक म्हणून आम्हाला प्रवास पहायचा आहे, हे भान चित्रपटात पूर्णपणे विसरले गेले आहे. चित्रपट काळाबाबत कुठेच सरकत नाही (काहीच महिन्यांची गोष्ट आहे) पण प्रेक्षकांनी बदलाला स्विकारावे अशी अपेक्षा करतो.

काही गंमती: गुणा ज्याच्या शेतावर नोकरी करतो, तो भर पावसात छ्त्री उघडत कोल्हापुरी चपलांनीशी पावसात निघतो. गुणाचा सासरा 'नाक कापले; असे म्हणण्याआधी गुणाच्या बायकोचे (विभावरी देशपांडे?) नाक ठळकपणे दिसते.

एकूणात चित्रपट ठीक आहे. अतुल कुलकर्णीही ठीक आहे. ज्यांना आवडला नाही त्यांचे मतही ठीक आहे.

नाच्या

नाच्या व्हायचे ठरवल्यानंतर काही महिन्यांतील त्याच्या व्यक्तिमत्त्वात आलेल्या स्थित्यंतराचा भाग चित्रपटात आहे. त्यात ऊर्जा, आवाज वगैरे पाहणे हे तितकेसे संयुक्तिक नाही.

स्थित्यंतराच्या भागात अपेक्षीत नाही. पण स्थित्यंतर पूर्ण झाल्यावर, नाच्या म्हणून रंगमंचावर पदार्पण केल्यानंतरच्या भागात नाच्याची एनर्जी (उर्जा) दिसणे आवश्यक आहे असे वाटते.

अतुल कुलकर्णीच्या पैलवानकीच्या अभिनयात उच्चारांबाबत घोळ सोडल्यास बाकी काही उणीव आढळत नाही.

उच्चारांचा घोळ (संवादफेक) सोडल्यास अभिनय म्हणजे मेन कोर्स सोडल्यास बाकीच्या जेवणात काही उणीव आढळली नाही म्हंटल्यासारखे झाले. (थोडी अतिशतयोक्ति आहे, पण मुद्दा लक्षात यावा :))

बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.

मला जाऊ द्या ना घरी........

अरे, गाण्यांविषयी कोणीच बोलले नाहीत!
काय एक से एक गाणी आहेत!
काय ती अमृता आणि सोनाली....फॅण्टास्टिक
(विशेषतः सोनालीची एण्ट्री सही आहे)

||वाछितो विजयी होईबा||

चित्रपट ठीक आहे

चित्रपटाची निर्मिती मूल्ये चांगली आहेत. मराठी चित्रपटांचा गेल्या काही वर्षांतील खालावलेला दर्जा बघता आणि त्यामानाने अलिकडे सुधारणारा दर्जा पाहिला तर थोडे सुखावल्यासारखे होते इतकेच.

यापुढे मात्र चित्रपट मनाला भिडला नाही. याचे कारण गुणाला बरेच फूटेज दिले असले (आणि त्याखालोखाल बहुधा पांडोबाला) तरी त्याचा अभिनय मनाला भिडणारा नाही. गुणा कुलकर्णी दिसतो हे कोलबेर यांचे निरीक्षण योग्य आहे. इतर पात्रांना तर शेंडा-बुडखा नसल्यासारखीच ती वावरतात. तसेच त्यांच्या बोलण्याचालण्यात अस्सल ग्रामीणपणा आढळत नाही. गुणावरील बलात्काराचा प्रसंग तर ओढून ताणून आणल्यागत वाटला. तमाशात बाईपेक्षा (ती देखील गोरी, गोमटी, नखरेल असताना) नाच्याला मोठे करण्यापायी कथेवर बलात्कार झाला आहे की काय असे वाटून गेले. (पेप्रात बातमी मात्र बाया आणि नाच्यावर बलात्कार - हे गौडबंगाल समजले नाही.) दुसर्‍या एका प्रसंगातही असेच वाटले जेव्हा बाई म्हणते - नाच्याची जिंदगी वाईट. म्हातारा झाला की कोणी विचारत नाही. (मग तमाशातील बाईची जिंदगी वेगळी असते असे म्हणायचे का काय तिला?)

गंमत म्हणजे चित्रपटातील पहिल्या तमाशात नाच्या नाही. बाईही म्हणते 'आपल्याला नाच्या हवा कारण तो चित्रपटांतील तमाशांत असतो म्हणजे आपला तमाशा चित्रपटागत होईल.' म्हणजे नाच्या हा तमाशातील मुख्य व्यक्ती नाही किंवा तो असतोच असे नाही.

 
^ वर