मराठी संकेतस्थळांची स्पर्धा

अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ह्या वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईटस् ची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे.
ही स्पर्धा १. शासकीय संकेतस्थळे आणि २. अशासकीय संकेतस्थळे अशा दोन गटांत घेण्यात येईल. पहिल्या शासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे १५०००, १०००० आणि ५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. तर दुसऱ्या अशासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे ३५०००, २०००० आणि १५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.
दि. २०/०२/२०१०पासून दि. ०६/०३/२०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या http://maharashtra.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशपत्रिकेचा दुवा (लिंक) राज्य मराठी विकास संस्थेच्या http://rmvs.maharashtra.gov.in/rmvs तसेच http://www.cdacmumbai.in आणि http://bosslinux.in/support-centres/mumbai ह्या संकेतस्थळांवरही देण्यात येईल. वरील कालवधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्ण भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे. प्रवेशपत्रिका स्वीकारण्याची अंतिम मुदत ०६/०३/२०१० ही आहे. वरील गटांपैकी प्रत्येक गटाला पहिले, दुसरे आणि तिसरे अशी तीन पारितोषिके देण्यात येतील.
संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डर्ड्स्), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्याचा सहभागाची सोय (इण्टरअॅक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.
शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

?

इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

हे परिक्षक कोण आहेत? ही मंडळी पुलं, कुसुमाग्रज यांच्या तोडीची आहेत काय?

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हयात?

पुलं आणि कुसुमाग्रज यांच्या तोडीची हयात मंडळी कोणी आहेत का?

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तोडीचे परीक्षक कुठल्याच स्पर्धेसाठी उपलब्ध नाहीत.

आणि त्यांच्या हयातीतही त्यांना स्पर्धापरीक्षणासाठी कितीसा वेळ उपलब्ध होता, कोणास ठाऊक.

तस्मात् सर्व स्पर्धा - भूतकाळातल्या, वर्तमानकाळातल्या आणि भविष्यातल्या - पुलं-कुसुमाग्रजविरहित जाणाव्यात. हे जाणूनच त्यांच्याबद्दल विचार करावा.

नवीन नावं, जुना प्रश्न...

कुणी सांगावं, पंचवीस-तीस वर्षांनी हाच प्रश्न दुसरी नावं घेऊन लिहील... व ती आज कदाचित हयातही असतील.
ती मंडळी कोण हे कसे जाणावे?
आयला, इथेच, इथेच कालप्रवास-यंत्राची उणीव जाणवते. अर्थात कालप्रवास यंत्र असतं तर सगळेच पुलंकडे गेले असते... मग त्यांना लेखनाला वेळ मिळाला नसता ... व मग ते पुल झाले असते का...
किंवा पुलंच्या काळीसुद्धा सगळे अत्र्यांकडे गेले असते, किंवा त्याहीआधी - म्हणजे ह. ना. आपटेंकडे गेले असते... मागे जात जात शेवटी सगळा भार तुकाराम, किंवा ज्ञानेश्वरांवर पडला असता. आणि कोणालाच काही साहित्याची सेवा करायला वेळ मिळाला नसता...
बहुधा हे संकट ओळखूनच (न जाणो, अशा यंत्राचा शोध लागला तर?) त्यांनी काही भरीव काम केल्याचे लक्षात येताच ताबडतोब समाधी घेतली असावी. तुकारामांच्या अचानक नाहीसे होऊन 'सदेह वैकुंठी गेलो ' अशी कंडी पिकवण्यामागे हीच चिंता असावी. कारण ते न्येक्ष्ट इन लायन होते ना.

ज्ञानेश्वरांनी आपल्या शिष्याला उद्देशून लिहिलेले अभंग नुकतेच हाती लागले आहेत...

ऐशा संस्थलांचा विचार, ज्ञानिया म्हणे जाला भार
भिंत पळवुनी आरपार, समाधी घेतो...

बा विसोबा खेचरा, तूस सृष्टी दृगोच्चरा
तुम्हीच ह्या कार्या करा, आमी जातो.

राजेश
(इथे हलक्यानेच घेणे असं लिहिणे म्हणजे तमाम उपक्रमींच्या बुद्धीचा अपमान होईल असे वाटते)

परीक्षक

चालणे राजहंसाचे उत्तम म्हणून इतरांनी चालूच नये की काय? (कोण बरं म्हणालंय असं...)

असो . मूळ लेखात लिहिल्या प्रमाणे..
संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डर्ड्स्), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्याचा सहभागाची सोय (इण्टरअॅक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

या सगळ्या निकषांमध्ये पुलं आणि कुसुमाग्रजांचं काय काम? उगाच आपलं...

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सहभाग

उपक्रमाने जरुर सहभाग घ्यावा! चला उपक्रमाची मशागत सुरु करु.
प्रकाश घाटपांडे

+१

आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.

+१

असेच म्हणते.
उपक्रमाला आणि सर्व स्पर्धक संस्थळांना शुभेच्छा!

उपक्रम

उपक्रम हे मराठीच नाहि तर एकूणच 'माहिती' क्षेत्रातील अग्रगण्य व्यासपीठ ठरावं.
भाग घेण्याच्या प्रकाशरावांच्या सुचनेला अनुमोदन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

उपक्रमाला दुसरे पारितोषिक विभागून

This comment has been moved here.

विशेष आनंद

This comment has been moved here.

आनंद

This comment has been moved here.

 
^ वर