सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ५ : पेन्सिली व खोके

राजूच्या वाढदिवसाला त्याचे बाबा नेहेमीच काहीतरी गमती देत असत. त्यामुळे आज काय मिळणार याची त्याला उत्सुकता होती. बाबा सकाळी लवकर बाहेर गेले होते. राजूने बघितले तर टेबलावर एक त्याच्या बोटाहूनही छोटी पेन्सिल होती. बरोबर एक चिठ्ठी होती "राजूसाठी. वाढदिवसानिमित्त" फक्त पेन्सिल बघून राजू खट्टू झाला. पण त्याने पुन्हा चिठ्ठी वाचली तर खाली बारीक अक्षरात लिहिले होते "कपाटावर". राजू धावत गेला. तिथे पाहतो तर एक मोठी पेन्सील होती. चिठ्ठीवर लिहिले होते "राजूसाठी. वाढदिवसानिमित्त" व खाली लिहिले होते "सोफ्यामागे". तिथे त्याला अजून एक पेन्सील मिळाली ही जवळ जवळ पहिल्या पेन्सिली इतकीच होती. चौथ्या ठिकाणची पेन्सिल दुसरीपेक्षा थोडी लांब होती. पाचवी पुन्हा छोटी होती, सहावी लांब होती.

पहिल्या सहा पेन्सिली

त्याच्या लक्षात आले की हा एक खेळ आहे. पुढची पेन्सील लांब असेल की छोटी असेल हे ओळखण्याचा. म्हणून त्याने आपले किती वेळा बरोबर येते हे लक्षात ठेवायला सुरुवात केली. त्याला अजून नऊ पेन्सिली मिळाल्या. त्यात त्याचं तीन वेळा बरोबर आलं, एकदा चुकलं. काही पेन्सिली मात्र पहिलीइतक्या लहानही नव्हत्या, की दुसरी इतक्या लांबही. त्याने त्या वेगळ्या ठेवल्या. शेवटच्या पेन्सिलीच्या चिठ्ठीवर लिहिलं होतं. "खेळ संपला. वाढदिवसाचं खरं बक्षीस संध्याकाळी मिळेल." बाबा घरी आल्यावर त्याने त्यांना आपले तीन गट दाखवले.

राजूचे खोके - छोट्या, मध्यम व लांब पेन्सिली

बाबा हसले. त्यांनी त्या सर्व पेन्सिली राजूच्या तीन खोक्यांमधून बाहेर काढल्या, व उंचीप्रमाणे लावल्या.

पेन्सिली खोक्याबाहेर

त्या दिवशी राजू काही तरी नवीन शिकला. बाबांनी त्याला बक्षिस म्हणून चित्रकलेची वही दिली. व त्याला पेन्सिलींनी गडद काळ्यापासून ते जवळपास पांढर्‍यापर्यंत हळुवार बदलत जाणार्‍या छटांनी चित्रण करायला शिकवलं.

आपल्यालाही जग असंच दिसतं - तुकड्या तुकड्यांनी. राजूला सापडलेल्या पेन्सिली सारखं. कधी हा अनुभव, कधी ते चित्र, काही लहान प्रसंग, काही मोठे. आणि आपण ते खोक्यांमध्ये भरून ठेवतो. सारख्या वस्तु सापडल्या की आपल्याला पुनर्प्रत्यया चा आनंद मिळतो. अरे, हे तर माझ्या माहितीतलं आहे. आपण लागलीच योग्य तो खोका काढतो, त्यातल्या इतर वस्तूंशी तुलना करून खात्री झाली की समाधानाने त्या खोक्यात टाकून देतो. काही काही वेळा आपल्याला काही नवीन गोष्टी दिसतात - पण त्याने काही बिघडत नाही. त्यासाठी नवे खोके तयार करण्याची थोड्या फार प्रमाणात सोय असते. काही पेन्सिली लहान मोठ्या असतात पण त्याचबरोबर लाल किंवा हिरव्या सुद्धा असतात. सुदैवाने त्या बाबतीत आपली ही संकल्पनांची फायलिंग पद्धती खूप प्रगल्भ आहे. आपण बिनधास्त त्या दोन वेगवेगळ्या खोक्यात टाकू शकतो. इतकंच काय, एका खोक्यात आपण अनेक खोके सुद्धा ठेवू शकतो.

हे खोके येतात कुठून? जन्मापासूनच आपल्या मेंदूत अशी व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता असते. आपल्याला प्रत्येक खोका स्वतंत्रपणे तयार करावा लागत नाही. आपले आई वडील, शाळा, मित्र-मैत्रिणी आपल्याला त्यांच्याकडचे खोके सरसकट शब्दांची लेबलं लावून देतात. आपण त्यातले काही घेतो, काही टाकतो, काही पुन्हा रचतो... फारच थोड्या वेळा नवे खोके तयार करण्याची गरज पडते. तरुणपणी ही व्यवस्था बदलणं सोपं असतं. खोके तसे हलके असतात. मुळात ते व त्यातील ऐवज दुसर्‍या कडूनच घेतलेला असतो. त्यामुळे त्यांच्यावर तितका जीवही जडलेला नसतो. राजूचे खोके त्याच्या बाबांना सहज मोडून टाकता आले. पण जसजसं वय वाढतं, तसतसे अनुभव प्रगल्भ होतात, खोके वजनदार होतात, त्यांच्या भिंती जाड व मजबूत होतात. त्या खोक्यांमध्ये आपण आपल्या हातांनी ठेवलेल्या वस्तु असतात. त्या वस्तु सापडताना आणि त्या ठेवण्यासाठी अचूक (किंवा साधारण योग्य तरी) खोका सापडल्याचा आनंद त्यांच्याशी निगडीत झालेला असतो. आणि आजवर इतकी सुंदर साथ दिलेल्या त्या खोक्यांना टाकून देऊ नये, इजा पोहोचू नये असं वाटायला लागतं. त्यामुळे अशी वेळ आली की काय करावं कळत नाही.

अशी वेळ का येते? याचं मुख्य कारण म्हणजे खोकेपद्धती मध्येच आहे. मुळात तो मेंदूच्या क्षमतेच भाग आहे असंच म्हणावं लागेल. या पद्धतीत एका खोक्यात जवळपास समान गोष्टी ठेवता येण्याचीच अट आहे. लांब पेन्सिली एका खोक्यात, छोट्या दुसर्‍या खोक्यात. त्याच्या मधल्या आल्या तर त्यांच्यासाठी नवीन खोका करावा लागतो. आणि असे वाटेल तितके खोके करणं सोयीचं नसतं. कारण आपण त्यातल्या कल्पनांविषयी बोलताना त्यांची लेबलं - शब्द वापरतो. शब्द काही अनंत नसतात. आणि असूही नयेत. त्यामुळे एकच लेबलाखाली थोड्या भिन्न भिन्न संकल्पना फाईल करता येतात, कराव्या लागतात. वर्गीकरणाचा फायदा साधायचा असेल, आणि संवाद नेटका ठेवायचा असेल, तर मर्यादित खोके असणं जास्त सोयीचं असतं. या मर्यादितपणामुळे एक डिजिटल/तुटक स्वरूप येतं.

या खोक्यांच्या डिजिटलपणामुळे, जगालाही एक डिजिटल - काळं पांढरं रूप येतं. राजूचं झालं तसं. त्याच्या दृष्टीने पेन्सिली या लांब, छोट्या किंवा फार तर मधल्या या तीन खोक्यांमध्ये बसतात. ते खोके जर त्याच्या बाबांनी मोडले नसते तर पुढच्या पेन्सिली त्याने या तीन गटात टाकल्या असत्या. आणि पेन्सिली या अनंत वेगवेगळ्या उंचीत येतात या ऍनालॉग सत्या ऐवजी पेन्सिली तीन उंचीत येतात असं त्याच्या ज्ञाना चं स्वरूप झालं असतं. हे रूपक इथे थोडं ताणलेलं आहे - कारण उंची किंवा लांबी ही अनालोग आहे हे सत्य आपल्याला सर्वांनाच जाणवतं. त्यासाठी आपण लेबलं सुद्धा जास्त तन्य ठेवतो, त्यांना इतर लेबलं लावतो. (उंचच म्हणण्यासारखा, बर्‍यापैकी उंच, चांगलाच उंच, जरा जास्तीच उंच इत्यादी.) पण सर्व कल्पनांचं तसं होत नाही.

प्राण्यांच्या वर्गीकरणात हाच प्रश्न येतो. एखादं नवीन जीवाश्म सापडलं की तो जीव नक्की अलीकडच्या प्रजातीत टाकायचा की पलीकडच्या? काही वेळा असंही झालेलं आहे की त्यांना कायम अलीकडे किंवा पलिकडे टाकल्यामुळे मध्ये दरी निर्माण झाल्यासारखी वाटते. त्यामुळे त्यांच्यात असलेले हळुवार ऍनालॉग बदल लक्षात येत नाहीत. एका टोकापासून दुसर्‍या टोकाकडे जाण्याचा तो सपाट अल्लद चढणारा हत्तीमार्ग नसून, उडी मारण्याची गरज असलेल्या पायर्या वाटतात. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीनेच अशा दर्या निर्माण होतात व मग इथून तिथे उडी कशी मारायची असा प्रश्न पडतो.

बदलणारी अक्षरे

या चित्रामध्ये दोन अक्षरं "अ" आणि "स" दाखवलेली आहेत. त्यातल्या मधल्या आकृती ह्या बदलत्या अवस्था (transitionary forms) आहेत. मुळातच त्या दोन अक्षरांमध्ये साम्य असल्यामुळे ही चित्रं काढणं मला तितकं कठीण गेलं नाही. अ च्या उजवीकडे गेलो तर पहिल्या काही दोन निश्चितपणे अ वाटतात. मधली आकृती अर्धवट अ वाटते. तसंच स पासून डावीकडे गेलो तर होतं पण मधली आकृती अर्धवट स वाटते. बहुतेकांना यात तीन अ, तीन स व एक त्यामधलं काहीतरी असं दिसतं. (काही लोक तीन अ व चार स म्हणतील) इथे डावीकडून उजवीकडे "अ"पण हळू हळू कमी झालेलं आहे व "स"पण वाढलेलं आहे या क्रमिक स्वरूपात मांडल्या आहेत. लेखाच्या मर्यादेमुळे मला राजूच्या बाबांची ट्रिक वापरता आली नाही. जर तुम्हाला मी या आकृत्या या क्रमाने न दाखवता एक एक रान्दाम क्रमाने दिली असती तर तुम्हाला हा पतार्ण लक्षात आला असतं का? तुम्हाला हो असं खात्रीने वाटत असेल तर इतर अक्षरं झाकून फक्त डावीकडून दुसर्‍या अक्षराकडे पहा व म्हणा "हा थोडासा स आहे" (१/६ स +५/६ अ)- तुमचं मन त्याला हे बरोबर नाही असं म्हणेल. प्रत्येक आकृतीसाठी आपण अ आहे का? स आहे का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी डिजिटल उत्तरं शोधतो. आणि त्याचे तीन पर्याय येतात (अ आहे, स नाही ; अ नाही स आहे ; अ ही नाही स ही नाही). राजूच्या पेन्सिल प्रमाणे आपण तीन गठ्ठे करून ते तीन खोक्यात भरतो. या खोक्यांच्या द्वारे विचार केल्यामुळे आपल्याला अनालोग, हळुवार फरक दिसत नाही.

विशेषत: ज्या कल्पनांचा विचार आपण "असते/नसते" अशा काळ्या पांढर्या स्वरूपात करतो त्या बऱ्याच वेळा मधल्या अवस्थांना नाव न दिल्याने आपण या किंवा त्या खोक्यात टाकलेल्या असतात. हे चुकीचं आहे असं नाही - कारण तशी वर्गवारी करणं उपयुक्त असतं. (उदाहरणार्थ बर्फ किंवा पाणी) फक्त आपण ते करतो आहोत याचं भान विसरता कामा नये. कारण जेव्हा एका स्थितीचा दुसर्यात बदल होतो तेव्हा त्या मधल्या अवस्थांचाच विचार करावा लागतो. साध्या रेणूंपासून ते विचार करणाऱ्या जीवांपर्यंतचा प्रवास बघायचा असेल, तर मधल्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात. आपण निळ्या ठिणग्या च्या टिकण्य ला त्यांचा पिवळ्या ठिणग्या शी "संघर्ष" झाला आणि त्यात विजय झाला असं म्हटलं. किंवा स्वजनकांचा असाच विजय झाला असं म्हटलं तेव्हा आपल्याला "जणु काही" "after the fact" "टिकणे म्हणजे विजय गृहीत धरलं तर" असे क्वालीफायर वापरूनच संघर्ष व विजय हे शब्द वापरता आले. कारण प्रेरणा, व त्यातून उद्भवणारे संघर्ष हे आपल्याला रोज दिसणाऱ्या प्राण्यामध्ये व माणसांमध्ये दिसतात. दगडांमध्ये या गोष्टी दिसत नाहीत. प्राणी विचार करून कृती करताना दिसतात, एखादं विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यंत्रं ते करताना दिसत नाहीत. प्राणी पुनरुत्पादन करतात काच करत नाही. पण हे खरं आहे का? दिसतात व दिसत नाही या "हो किंवा नाही" प्रश्नाचं उत्तर डिजिटल 'हो वा नाही' मागून आपण त्यांना खोक्यात टाकतो आहोत का?

एक उदाहरण देतो. बुद्धिबळ खेळताना आपण काही विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्याकडे राजा व हत्ती असेल, व प्रतिस्पर्ध्याकडे फक्त राजा असेल तर मात करणं सोपं असतं. आपल्या हत्तीने त्याचा राजा पटाच्या एका बाजूला ढकलत न्यायचा. त्याच्या राजाला ती रेषा ओलांडता येत नाही. हत्तीपाठोपाठ आपला राजा न्यायचा. मग त्याचा राजा शेवटच्या ओळीत अडकला की तिसर्‍या ओळीत आपला राजा नेऊन हत्तीने शह द्यायचा. मी जे वर्णन केलं ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी छोटी छोटी लघु-उद्दिष्ट तयार करून प्रश्न सोडवण्याचं, योजना आखण्या चं. मी हे न सांगता जर करून दाखवलं तर बघणारा इतरांना याच भाषेत सांगेल. "तो त्या काळ्या राजाला ढकलत मागे नेतोय. इ. इ." केवळ हत्ती-इ६ अशी खेळी सांगण्या ऐवजी माझा प्रयत्न काय चाललाय या भाषेत बोलणच अधिक अर्थपूर्ण ठरतं. पण माझ्या ऐवजी एखादा संगणक खेळत असेल तर? माझे प्रयत्न चालू आहेत तसेच त्याचेही चालू आहेत असं नाही म्हणता येणार? किंबहुना डीप ब्लू कास्पोरोव बरोबर खेळत असताना याच प्रकारच्या भाषेत कॉमेंट्री चालू होती. मग डीप ब्लू ला प्रयत्न करण्याची शक्ती आहे असं म्हणता येणार नाही का? किंवा मी जे करतो ते "जणु काही विचार करून; जणु काही उद्दिष्ट समोर ठेवून" असं का नाही म्हणायचं? मला बेनिफिट ऑफ डाउट का द्यायचा?

हे वाचताना, मी कुठे जातोय हे दिसल्यावर, तुमच्या मनात काय विचार आले? "नाही, पण कॉम्प्युटर ला प्रोग्राम ..." "हो पण कॉम्प्युटर ..." हा प्रतिसाद बोलका आहे. हा "पण" शब्द बोलका आहे. प्रयत्नशीलता या खोक्यात आपण सजीव, सचेतन टाकलेले आहेत. काँप्युटर त्यात बसत नाही. किंवा दुसर्‍या पद्धतीने असं म्हणता येईल की निर्जीव कप्प्यामध्ये आपण यंत्र टाकलेली आहेत, व यंत्र लेबलाखाली काँप्युटर टाकलेला आहे त्यामुळे तो निर्जीवच दिसतो. टोक तुटलेला अ (दुसरी आकृती) हा आपल्याला अ च वाटतो तसं. या खोक्यांना एक प्रकारची आकर्षण शक्ती असल्याप्रमाणे ते आपल्याला दिसणारे छोटे बदल दुर्लक्षित करून जवळच्या कल्पना आतमध्ये खेचतात. त्यामुळे कॉम्प्युटर हा थोडासा सजीवाप्रमाणे वागणारा निर्जीव होत नाही. (पुन्हा "वागणं" शब्दाच्याही आड त्याच सजीव निर्जीवतेची काळ्या पांढर्‍या मधली दरी येते. )

आता आपण दुसरं उदाहरण बघू. एक प्रकारची माशी (wasp - नक्की प्रतिशब्द माहीत नाही) असते. ती अंडी घालायच्या आधी एक चिखलाच पोळं तयार करते. प्रत्येक कप्प्यात एक एक अंडं. पण ती ते अंडं घालण्यापूर्वी एका किटकाला डंख मारून अचल करते. व त्या कीटकाच्या शरीरातच अंडं घालते. कीटक मरत नाही आणि जेव्हा लार्व्हा बाहेर येतो तेव्हा पहिले काही दिवस तो त्यावर जगतो. खरी गम्मत त्याआधी आहे. अंडं घालून झालं की ती त्या किटका चं शरीर खेचून त्या पोळ्याच्या कप्प्याच्या दारापाशी आणते. मग एकटी आत जाते, सर्व काही व्यवस्थित आहे हे पाहते. मग बाहेर येऊन तो कीटक (अंड्यासकट) खेचून आत नेते व बाहेर येऊन दार चिखलाने लिंपून बंद करते. जाणीवपूर्वक, विशिष्ट उद्दिष्ट साधणारी वागणूक. पण जीव शास्त्रज्ञांना खोड्या काढण्याची सवय असते. एकाने हे निरिक्षण करून झाल्यावर एकदा ती आत गेलेली असताना तो किडा दारापासून थोडा लांब नेऊन ठेवला. माशी बाहेर आली, तो किडा कुठे आहे ते बघून पुन्हा त्या किड्याला खेचून दारापाशी आणलं, आणि आश्चर्य म्हणजे सर्व काही ठीक आहे की नाही हे पहायला पुन्हा आत गेली. तीस सेकंदा पूर्वी जाऊन आलेली असताना. पुन्हा त्याने तो किडा हलवला. पुन्हा तोच प्रकार. दर वेळी ती आत गेली की हा तो किडा सरकवून ठेवायचा. प्रत्येक वेळी ती किडा खेचून आणला की आत जाऊन पुन्हा तपासून पहायची. असं त्याने पन्नास साठ वेळा केलं तरी दर वेळी तोच प्रकार. कितीही लांब न्या जवळ न्या, माशीच तपासून बघणं काही थांबलं नाही. शेवटी त्यालाच कंटाळा आला, पण एकदाही त्या माशीने, "इतक्या वेळा बघितलाय, यावेळी बघण्याचं काय कारण? सरळ आत घेऊन जाऊ" असं म्हटलं नाही. वर वर सदिश विचारी वाटणाऱ्या वागणुकी पाठी एक साधा "प्रोग्राम" होता.

हे वाचून आलेले विचार "कदाचित" ने सुरू झाले असणार अशी माझी खात्री आहे! इथे benefit of doubt माशीला मिळतो.

मुद्दा यंत्र विचार करू शकतं का, किंवा सजीव यांत्रिकपणे वागू शकतात का हा नाही. मुद्दा असा आहे की संघर्ष, पुनरुत्पादन, प्रेरणा, विचार, आकान्क्षा या चेतनेशी निगडीत असलेले गुणधर्म आपण काळ्या-पांढर्या हो-नाही या डिजिटल स्वरूपात मांडतो. ते तसे गृहीत धरल्यामुळे चेतनायुक्त व चेतनाहीन असे दोन गट करतो. (नक्की कार्य कुठच व कारण कुठचं यावर वाद घालता येईल) या खोक्या मुळे त्यांच्यात एक प्रकारचं धृवियीकरण होतं. या ध्रुवीय मांडणीमुळे आपल्याला त्यांमध्ये दरी दिसून येते. ही दरी उडी मारून ओलांडता येत नाही. उत्क्रांतीवादाची पद्धत ही दोन टोकांना जोडणारे मधले टप्पे शोधून त्यामार्गे प्रवास कसा झाला हे सांगण्याची आहे. पण जर आपल्याच विचार पद्धतीमुळे अनालोग जग आपल्याला डिजिटल, ध्रुवीय दिसत असेल तर ती बदलली पाहिजे.

"जडतेला मना मनाचा पोत" कसा आला हे पाहायचा असेल तर... "अ"चेतनाचा "स"चेतन कसा झाला हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हे निरुपयोगी खोके तोडून टाकले पाहिजेत व खोक्याच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे.

लेखनविषय: दुवे:

Comments

खोके, मोठे खोके, रिफ्लेक्सिविटी

राजेश, लेख वाचनीय आहे. (एरिक वॉन डॅनिकेन, कुठले कुठले ज्योतिषी यांचेही म्हणणे ते खोक्याबाहेर पडले आहेत असेच असते.)

खोके तोडता येणार नाही. आपण खोक्यातच विचार करू शकतो. मोठ्या खोक्यातील एका खोक्यातून बाहेर पडून दुसर्‍या खोक्यात जाऊ शकतो.

काहीही करून एका खोक्यातच असल्याने आपल्या विचारांनी ज्या खोक्याचा विचार करतोय त्यावरच परिणाम होणे शक्य आहे. मला सरलतेकडून क्लिष्टतेकडे जातांना हे जाणवते. नेमके कसे ते व्यक्त करता येत नाही.

मर्यादित अर्थ

खोक्याबाहेर पडणं हा खूप व्यापक अर्थाचा शब्दप्रयोग आहे, मार्केटिंग वाल्यांनी वापरून बुळबुळीत केलेला, व बदनाम झालेला. माझा रोख आपल्या विशिष्ट संकल्पनांच्या खोक्यांविषयी जागरुक असण्याबद्दल होता. या लेखातलं शेवटचं वाक्य तोडून "खोक्याच्या बाहेर जाऊन विचार "चा उल्ले़ख काढून टाकला तर अधिक योग्य होईल की काय असं वाटतं. ते लेख रोचक व्हावा म्हणून आलेलं चमकदार वाक्य आहे, पण या लेखनात त्याने अर्थाला बाधा येऊ नये.

एरिक वॉन डॅनिकेन, कुठले कुठले ज्योतिषी यांचेही म्हणणे ते खोक्याबाहेर पडले आहेत असेच असते

माझ्या लेखनाची, विचारांची त्यांच्याशी तुलना होऊ नये असे मनापासून वाटते. वैज्ञानिक दृष्टीकोन हा खोका नसून योग्य खोके (संकल्पना) बांधण्याची व चुकीचे फेकून देण्याची पद्धती आहे. हा दृष्टीकोन व तदनुषंगिक वैचारिक शिस्त न बाळगणे याला मी खोक्याबाहेर विचार करणे म्हणत नाही. डॅनिकेन व ज्योतिषी स्वतःला त्या शिस्तीबाहेर - म्हणून खोक्याबाहेर - म्हणवतात.

राजेश

तुलना नाही

माझ्या लेखनाची, विचारांची त्यांच्याशी तुलना होऊ नये असे मनापासून वाटते.

मलाही तसेच वाटते. 'त्यांच्या' विचारांवर मत व्यक्त करण्याचीही तसदी मी घेणार नाही. परंतु अशा (खोक्याबाहेर विचार) गुळगुळीत वाक्प्रचारांपासून ही लेखमाला लांब रहावी असेही वाटते.

 
^ वर