गुरू: एक कोडे. भाग २. मला वाटते

गुरू : एक कोडे. भाग २ . मला वाटते...
गुरू व शिक्षक यात जो फरक केला तो शिक्षकांबद्दल कमी आदर म्हणून नव्हे. वयाच्या साठाव्या वर्षीही मी माझ्या शिक्षकांच्या पायावर डोके टेकवूनच नमस्कार करत होतो. पण त्यांनी जे शिकवले ते मला कष्टाने का होईना स्वसाध्य होते. एकलव्याने (गुरूचा पुतळा समोर ठेवून, मोठ्या श्रद्धेने का होईना) जी धनुर्विद्या मिळवली, ती अशीच स्वसाध्य होती. ती अपार कष्टाने मिळवलेली विद्याही त्याने गुरूभक्तीने मातीत फेकली एवढेच. प्रश्न येतो आत्मज्ञान, जे श्रमाने, वाचनाने, श्रवणाने,मेधाने, ज्ञानाने, कशाने कशानेही मिळणे शक्य नाही, ते मिळवण्याच्या वेळी. पहिल्या भागात यादी दिली ती इतिहास सांगावयाचा या उद्देशाने नव्हे.तर अत्यंत बुद्धीवान माणसेही या संकल्पनेवर विश्वास ठेवत होती हे सांगण्याकरिता. आधुनिक काळात विवेकानंद, गुरूदेव रानडे इत्यादींची भर घालावयास हरकत नाही.
कोडे आहे ते या लोकांनाही असे का वाटावे याचे." का ?" हा प्रश्न सुरदासाबद्दल नाही, कबीराबद्दल आहे. नामदेव-जनाबाईबद्दल नाहे, ज्ञानेश्वराबद्दल आहे.

ब्रह्माची, आत्मज्ञानाची गाठ फ़क्त गुरूच घालून देईल, इतर कोणीही नाही, प्रत्यक्ष परमेश्वरही नाही, यावर सर्वांचा धृढ विश्वास होता. त्यामुळे गुरू म्हणजे सगुण रुपातील ब्रह्मच येथपर्यंत शिष्य पोचले व मग "आपल्या तुटपुंज्या आयुष्यात भवसागरातून वर काढणारा "एकमेव गुरूच" या भावनेनेच ते जगले. दुसर्‍या कुणाचा वा कशाचा आधार घ्यावा असे त्यांना कधी वाटलेच नाही.

गुरू हा एक श्रद्धेचा विषय आहे. ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही (व श्रद्धा पाहिजेच असा आग्रहही नाही), अशांना हे कोडे सोडवण्याच्या माझा प्रयत्न काय हे वाचण्यात वेळ घालवावा असे वाटावयाचे कारणही नाही. तरीही आज कोट्यावधी लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास आहे हे लक्षात घेऊन कुतुहल म्हणून वाचावयास हरकत नसावी. यात एक गृहीत धरले आहे की माणसाचे आयुष्य मर्यादित आहे. या थोड्या वेळात मला सर्व गोष्टी माझ्या बुद्धीसामर्थ्याने कळतीलच असे कोणी मानू नये. परवाच वाचले की एक गणिताचा सिद्धांत १८९० साली मांडला गेला व तो सिद्ध करावयाला १९५० उजाडले.(सन मागे-पुढे) तर समजा की तुमच्यासमोर प्रश्न आहेत " मी कोण ?, या जगात मी रहातो ते जग म्हणजे काय ? व माझा या जगाशी संबंध काय ?" तुमच्याकडे याची उत्तरे शोधावयास पन्नास वर्षे आहेत. आता कोणीही कबूल करेल की या विषयावर जगात गेल्या शेकडो वर्षात इतके लिहले गेले आहे की ते सर्व वाचावयास आणि त्याचा अभ्यास करावयास, काही नित्कर्ष काढावयास ही पन्नास वर्षे अपूरी आहेत. मी किती बुद्धिवान आहे याला काही अर्थ नाही. मग मी काय करावे ? दोन सोपी उदाहरणे घेऊन काय शक्य आहे ते पाहू. "मला वाटते" म्हणण्यातला उद्देश हा की ही कल्पनाभरारी आहे, तर्ककर्कशता नाही.

(१) तुम्ही शनवारवाड्यापेक्षा विस्तीर्ण अशा एका जंतरमंतर वास्तूत हिंडत आहात.जायलायायला ५-६ दरवाजे आहेत. एकदम तुम्हाला लाऊडस्पीकरवरून सांगण्यात येते की "पाच मिनिटात बाहेर पडा, नंतर सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. आत राहिलेल्यांना सकाळपर्यंत आतच अडकून रहावे लागेल." कितीही धावपळ केलीत तरी पाच मिनिटात पोचता येईल असा जवळचा दरवाजा कोणता हे तुम्हाला माहीत नसेल तर काय कराल ? अवघड आहे, हो की नाही ? पण जर तुमच्या बरोबर एखादा जाणकार मार्गदर्शक असेल तर ? तो सुलभतेने तुम्हाला बाहेर आणून सोडेल. काही "टेन्शन" घ्यावयाचे कारण नाही.

(२) दुसरे उदाहरण जरा "हाय टेक" घेऊ. तुम्हाला ५० आकड्याचे कुलुप(Numerical lock) असलेली एक पेटी दिली व सांगितले " पेटी उघडा, घाई करावयाचे कारण नाही, चांगला अर्धा तास आहे !" आली का पंचाईत ? डोके फोडावयाचे की पेटी फोडावयाची ? उत्तर शोधून काढणे तर अशक्यच आहे. पण जर पाठीशी उत्तर माहित असलेला जाणकार असेल तर ? क्षणार्धात तुम्ही पेटी उघडलेली असेल.

जाणकार मार्गदर्शकाशिवाय हे तिढे सुटणे शक्य नाही. असे मानले जाते की शक्तीपात हा या विश्वातला एक प्रकार आहे, ज्यात गुरू आपले ज्ञान क्षणार्धात केवल स्पर्शाने, दृष्टीने, मनाने शिष्याकडे वळवू शकतो. आधुनिक विज्ञानकथेतील Tele-trasportation सारखे. शक्तीपातावरूनच वरील कल्पना सुचल्या हे उघड आहे.

तुमच्या आत्मज्ञानासंबंधी प्रश्नांची उत्तरे देणारा जाणकार, मार्गदर्शक म्हणजे गुरू. जर तुम्हाला आत्मज्ञान मिळावे अशी खरीखुरी गरज भासत असेल व हे ज्ञान गुरूशिवाय मिळणे अशक्य आहे हेही पटले असेल तर असे ज्ञान देणार्‍या गुरूबद्दल तुमच्या मनात अपरंपार भक्तीभावच उपजणार.याशिवाय आणखी एक ध्यानात घेण्याची गोष्ट म्हणजे गुरूला परिसापेक्षा श्रेष्ट का मानावयाचे तर परीस लोखंडाचे सोने करतो तर गुरू तुम्हाला परीसच करतो. गुरू शिष्याशी अद्वैत साधून त्यालाही गुरू करतो. ज्ञानेश्वर-एकनाथ हे निवृत्ति-जनादर्नच झाले. प्रत्येक संताने, हो, प्रत्येक संताने, गुरूमहात्म्य आळवले त्याचे कारण हे तर नसावे ?

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

फरक

हा भाग वाचून असे वाटले की एजुकेशन आणि ट्रेनिंग यात जो फरक आहे तोच शिक्षक आणि गुरू यात आहे काय?
किंवा शिक्षक म्हणजे पाठ्यपुस्तक आणि गुरू म्हणजे गाईड. प्रश्नाचे उत्तर शिष्याला स्वतः शोधायला लावण्याऐवजी तयार उत्तर पटकन सांगणारा.

पण तसे बहुधा नसावे.

सध्याच्या वापरातल्या अर्थाप्रमाणे ज्या क्षेत्रात शिक्षण देण्याची फॉर्मल व्यवस्था नाही त्या क्षेत्रातले शिक्षण देणार्‍याला गुरू म्हणतात.

तसेच ज्या कला/गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवून आणि शिष्य त्या कशाप्रकारे करतो याचे सतत निरीक्षण करून सुधारणा सुचवणे हे करणार्‍याला गुरू म्हणत असावेत. शरीरशास्त्र पुस्तक वापरून सुद्धा शिकता येईल पण स्टेथोस्कोप मध्ये कसा आवाज ऐकू आला तर त्याचा काय अर्थ लावायचा हे प्रत्यक्ष शिकवायला लागेल, ते शिकवणार्‍याला गुरू म्हणावे असे वाटते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

शिक्षक व गुरु

मला गुरु या शब्दातून "आदर्श शिक्षक जो नुसतीच शिक्षणाची पाटी न टाकता शिष्याच्या भलावणीसाठी त्याच्याशी नाते साधतो व त्याला पदोपदी मार्गदर्शन करतो" हा अर्थ प्रतीत होतो. त्याने दिलेल्या ज्ञानाचा इतका उपयोग होतो की शिष्याला आपुलकीच्या नात्यामुळे व मार्गदर्शनामुळे शिष्याच्या पोटी आदर व भक्तीची भावना निर्माण होते. थोडक्यात सांगायचे झाले तर गुरु म्हणजे उत्तम शिक्षक व प्रेमळ पालक यांचा मेळ - mentor.

ब्रह्माची, आत्मज्ञानाची गाठ फ़क्त गुरूच घालून देईल, इतर कोणीही नाही, प्रत्यक्ष परमेश्वरही नाही

यावर अधिक खुलासा हवा. जर गुरु-शिष्य नाते हे केवळ आध्यात्मिक अर्थानेच घेत असाल तर माझी वरची व्याख्या जास्त व्याप्त आहे असे मी म्हणेन. उदाहरणार्थ अल्लरखा हे झाकिर हुसेनचे खर्‍या अर्थाने गुरु होते असे मी म्हणेन. पण त्यांनी तबला वादन शिकवले म्हणून ते आपल्या व्याख्येत बसत नाहीत का? त्याला हरकत काहीच नाही, शब्दांची आपण हवी तशी व्याख्या करावी, मी फक्त आपली व्याख्या समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

असे मानले जाते की शक्तीपात हा या विश्वातला एक प्रकार आहे, ज्यात गुरू आपले ज्ञान क्षणार्धात केवल स्पर्शाने, दृष्टीने, मनाने शिष्याकडे वळवू शकतो.

यावर वैज्ञानिक पुरावा मिळणार नाही, पण निदान काही उदाहरणे सांगता येतील का? याचाच पुढचा प्रश्न म्हणजे असा गुरु कसा ओळखावा? कारण 'मला सगळे समजले आहे' असा दावा करणारे भामटे खूप असतात.

व्यक्तिसापेक्ष

श्री शरद, तुमच्या मतांचा आदर आहे. पण दोन्ही लेखांतून गुरू म्हणजे नेमके काय? हे कळले नाही. कोणी कोणास गुरू म्हणावे हे ज्याचे त्याने ठरवावे. थोडक्यात गुरू व्यक्तिसापेक्ष आहे, हे मात्र लक्षात आले. मी ज्यांना गुरू म्हणू शकेल त्या लोकांनी माहीत नसलेल्या उत्तरांबद्दल 'माहीत नाही' असे प्रांजळपणे सांगितले आहे. ज्यांना सर्वच उत्तरे माहीत नाहीत, ज्यांचे आयुष्य परिपूर्ण नाही असे लोकही गुरू वाटू शकतील. पण गुरू म्हणण्यासाठी किमान आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी करता येणे शक्य असावे. श्रद्धा हे त्या किमान यादीत येईल असे वाटत नाही. श्रद्धा निर्माण होण्यासाठीची किमान पार्श्वभुमी मात्र त्या यादीत येऊ शकेल.

 
^ वर