सरलतेकडून क्लिष्टतेकडे भाग ३ : उत्क्रांतिवादाचं उत्तर
And God said, Let there be light: and there was light
- Book of Genesis, 3rd verse.
या विश्वात पसरलेल्या जडाच्या अंधारात चेतनेचा प्रकाश कसा भरून आला? या जगाच्या प्रत्येक सांदी-कोपर्यात पाहिलं तर प्राणी, पक्षी, जीव, जीवाणू आपापलं जीवन जगत असलेले दिसतात. हे कुठून आले? कुणी सर्वोच्च शक्तीने ते आपल्या इच्छेच्या बळावर आपोआप तयार केले का? "प्रकाश होवो" म्हणून एकाच फटकार्यात सगळं जग उज्ज्वल झालं तसंच एकाच फटकार्यात सर्व जीव निर्माण झाले का? बायबलचं यावर मत ठाम हो, असंच आहे. परमेश्वराने त्याच्या आंतरिक शक्तीने हे सगळं आपोआप सहा दिवसात घडवलं. आणि त्याची आंतरिक शक्ती कुठून आली? ती होतीच, आहेच, व ती वादातीत आहे. गेल्या लेखात आपण बघितलं की असा किमयागार पुढे करायचा म्हणजे वैचारिक दिवाळखोरी कबूल करण्यासारखं आहे. जेव्हा आपण अशक्य हे शक्य आहे असं मानतो तेव्हा त्याचा अर्थ काहीही शक्य आहे असा होतो. केवळ एकच अशक्यतेला होकार पण इतर बाबतीत तार्किक दृष्टीकोन हे विसंगत आहे. शून्यापासून या क्लिष्टतेच्या शिखरापर्यंत एका उडीत पोचणं अशक्य आहे. त्यामुळे योग्य उत्तरात या टोकापर्यंत टप्प्या टप्प्याने कसं जाता येईल याचं चित्रण हवं. आपल्याला मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी नकाशाची आवश्यकता असते. पण नुसत्या नकाशाने प्रवास होत नाही, त्यासाठी वाहन लागतं. एकदा या दोन गोष्टी सापडल्या की प्रवास कसा झाला याविषयी प्रश्न राहात नाही. उत्क्रांतीवादाने या दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. मार्ग आणि त्या मार्गावर अव्याहतपणे पुढे ढकलणारी प्रक्रिया. काटेकोर पणे बोलायचं झालं तर ती एका अपरिहार्यतेने जाणारी व त्यायोगे आपल्या पाउलखुणातून मार्ग उमटवत जाणारी प्रक्रिया आहे. नकाशा तिच्या मार्गक्रमाने तयार होतो.
ही प्रक्रिया काय आहे हे समजावून घेण्यासाठी आपण थोडा वेळ प्रकाशाचंच उदाहरण - रूपक म्हणून वापरू. अंधारात प्रकाश कुठून येतो? निसर्गात:च काही दगड एकमेकांवर आपटतात आणि त्यातून ठिणगी पडते. अशा ठिणग्या अंधारात कुठे ना कुठे पडत असतात. पण त्यांनी काही सारं रान उजळून जात नाही. पण घटकाभर धरून चाला की एक जादूची ठिणगी निर्माण झाली. तिची जादू अशी की ती पडली की तिच्या आसपासचे दगड हलतात, एकमेकांवर आपटतात, आणि दोन ठिणग्या - हुबेहूब तिच्यासारख्याच पडतात. त्या अगदी पुढच्या क्षणीच पडत नाहीत, एकच वेळी ही पडत नाहीत पण साधारण पुढच्या मिनिटाभरात केव्हाही पडतात. अर्थात ह्या नवीन ठिणग्याही जादूच्याच असल्यामुळे त्यांच्यापासून प्रत्येकी आणखीन दोन ठिणग्या तयार होतात. सुरुवातीची काही मिनिटं काहीच फरक जाणवणार नाही. पण प्रत्येक मिनिटाला दुप्पट, दुप्पट करत गेलं तर अर्ध्या तासातच ते आख्खं जंगल उजळून निघेल. किंबहुना हे एक तास चाललं तर दर सेकंदाला अणुस्फोट झाल्यासारखा वाटेल. चक्रवाढ टोकाला नेली तर फार लवकर गोष्टी हाताबाहेर जातात, वा निरर्थक उत्तरं यायला लागतात. अर्थातच निसर्गात चक्रवाढ या पातळीला जात नाही, कारण इतर बंधनं पुढे येतात. तेव्हा ही जादूची दुनिया थोडीशी खर्यासारखी करण्या साठी आपण असंच एक बंधन घालूया. ही जादूची ठिणगी पाडल्यामुळे दगडांची शक्ती खर्च होते आणि ते मिनिटभर गपगार पडून राहतात. तेव्हा प्रकाश कायम वाढत जाणार नाही. एक वेळ अशी येईल, की तिथले सर्व दगड एक तर ठिणग्या पाडत असतील, किंवा नुकतीच ठिणगी पाडून मिनिटभर विश्रांती घेत असतील. आणि रान थोड्याफार प्रमाणात उजळून निघालेलं असेल.
आता तुम्ही म्हणाल की त्यात काय विशेष? एक अंधाराची स्थिर स्थिती होती ती जाऊन काही सतत पडणार्या ठिणग्यांची स्थिर स्थिती आली. थोडा प्रकाश निर्माण झाला, पण त्यासाठी जादूचा वापर करावाच लागला ना? कबूल. या काहीशा ओढून ताणून आणलेल्या रूपकाचे उद्देश दोन होते. एक म्हणजे एक छोटीशी जादू वापरली तर तिच्यातून खूप मोठा परिणाम होऊ शकतो हे दाखवणं. आपल्याला शेवटचं चित्र तेच ठेवायचं आहे, पण जादू हळू हळू कमी करायची आहे. दुसरा उद्देश हा थोडा पहिल्याशी संबंधित आहे. तो म्हणजे, ही छोटी जादू विस्तृत परिणाम साधते, याचं कारण म्हणजे पुनरुत्पादानातून निर्माण होणार्या चक्रवाधीच गणित. या चक्रवाधीमुळे निसर्गात खूप दूरवरचे परिणाम घडतात. उत्क्रांतीच कोडं सुटायलाही या चक्रवाढ चीच मदत झाली.
पेलीने आपलं लेखन केलं (१८०२) - विश्वाची जटिलता परमोच्च निर्मात्याचं अस्तित्व सिद्ध करते हे सांगणारं - त्याच सुमाराला किंबहुना त्याच्या थोडं आधी १७९८ मध्ये थॉमस माल्थसने आपला "लोकसंख्या-तत्त्वाचा निबंध" प्रसिद्ध केला. त्यात तो दोन गृहीतक मांडतो १. मानवाच्या अस्तित्वासाठी अन्नाची गरज आहे - व ती कायम राहील . २. लैंगिक आकर्षण ही मूलभूत प्रवृत्ती आहे (व तिचे परिणाम - लोकसंख्या वाढ) ती कायम राहतील. [तो सर्वोच्च शक्ती यात ढवळा ढवळ करणार नाही हेही गृहीत धरतो, पण ती गोष्ट अलाहिदा ] या दोन गृहीतकांतून तो काही भयंकर निष्कर्ष काढतो. एक म्हणजे समाजात दिसणारी विषमता ही कधीच संपणार नाही. दुसरं म्हणजे आदर्श समाजाचे स्वप्न ज्यात सर्व लोक खाऊन पिऊन सुखी आहेत ते कधीच साध्य होणार नाही. गरीब, आळशी, कर्तृत्वहीन लोक उपासमारीने मरत राहणार. औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्या पलिकडे असलेल्या त्या काळाच्या सर्वात श्रीमंत देशात - इंग्लंड मध्ये राहून तो हे म्हणतो हे विचारात घेण्या सारखं आहे. [पण त्याच्या सिद्धांतात तत्कालीन श्रीमंत, उच्चवर्गीयांना एकच वेळी इगो सुखावण्याची व सामाजिक बंधनातून मुक्त करण्याची सोय आहे.] बरं त्याच्या गणितात काही चूक काढावी तर त्यात काही नव्हती. तो म्हणतो की उत्पादनाची साधनं फार तर सरळ व्याजाने वाढतात पण लोकसंख्या ही चक्र वाढीने वाढते. आणि तुम्ही कितीही मोठा सरळ व्याजाचा दर घेतलात, आणि तरी नैसर्गिक लोकसंख्या वाढ त्याला कधी ना कधी मागे टाकणार. याचा अर्थ तुम्ही कितीही अन्न उत्पादन वाढवलं तरी शेवटी लोकसंख्येच्या वाढीच्या दाबामुळे ते अपुरं पडणार. अगदी तळा गाळातले लोक शेवटी उपासमारीने, दुष्काळ ग्रस्त होऊन मरणारच. आणि हे कळण्यासाठी काहे मोठे तत्त्वज्ञ, विचारवंत, गणिती असण्याची गरज नाही. साधं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कळलं की झालं.
माल्थसचा सिद्धांत हा, अचूक गणित बांधलं तरी ते चुकीच्या गृहीतकांवर आधारित असलं की कसा अनर्थ होतो याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने हे विचार मांडून २०० वर्षे होऊन गेली. पण उपासमारीने मारणार्या लोकांची संख्या घटत चाललेली आहे. लोकसंख्या नक्की कुठे स्थिरावणार हाच फक्त एक प्रश्न शिल्लक आहे, ती स्थिरावणार की नाही हा नाही. अर्थात, त्याला दोष देण्याचं कारण नाही, तो ज्या काळात वावरत होता त्यात कुटुंब नियोजनाची तितकीशी खात्रीलायक सोय नव्हती. पण मुद्दा तो नाही. माल्थसने काही बाबतीत खोलात विचार केला - साध्या गणिताच्याही पुढे जाऊन. ते म्हणजे लोकसंख्या वाढीचा प्रश्न दिसतो त्या पेक्षा गंभीर आहे. समजा आत्ता तुम्हाला चक्रवाढ एका दराने होते आहे असं दिसतंय. पण जर तुमच्या समाजात त्याहीपेक्षा अधिक दराने पुनरुत्पादन करणारे गट असतील तर शेवटी लोकसंख्या वाढ त्यांच्या वेगाने होणार. म्हणजे दोन चाक्रवाढीचे दर असतील, तर ज्याप्रमाणे चक्रवाढ सरळ व्याजावर मात करते त्याच प्रमाणे अधिक मोठ्या चाक्रवाढीचा दर हा लहान दरावर मात करेल. यात एक अध्याहृत आहे की विशिष्ट गटाचा पुनरुत्पादनाचा दर हा पुढल्या पिढीतही कायम राहील. उत्क्रांतीवादाच्या जडण घडणीतला हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे.
हे कसं हे पाहण्या साठी आपण पुन्हा आपल्या जादूच्या अरण्यात जाऊ. आपल्या पेटणार्या ठिणग्या प्रत्येकी दोन ठिणग्यांना जन्म देतात, आणि हा क्रम सतत चालू आहे. समजा, आणखी एक जादू झाली, आणि एका ठिणगीच्या पोटी एक नवी विचित्र ठिणगी जन्माला आली. आधीच्या सर्व पिवळ्या होत्या, ही निळी आहे. आणि हिच्या पोटी केवळ हिच्या सारख्याच म्हणजे निळ्याच ठिणग्या जन्माला येतात. केवळ रंगातच फरक असता तर काही विशेष परिणाम होणार नाही. सुरुवातीला निळ्या ठिणग्या वाढतील, पण पिवळ्याची मुळात संख्या इतकी जास्त आहे की निळ्या त्यात बुडून जातील. कदाचित थोड्याशा वाढतील, कदाचित नाही... पण संपूर्ण प्रकाश बघितला तर तो पिवळाच राहील. पण समजा त्या निळ्या ठिणगीला रंगाव्यतीरिक्त इतरही वेगळे गुणधर्म आहेत. ती दोना ऐवजी तीन ठिणग्या पैदा करते. इथे चाक्रवाढीचा दर बदलला. आता निळ्या ठिणग्यांची वाढ जास्त झपाट्याने होणार. पिवळ्या मिनिटाला दुप्पट होतात तर निळ्या मिनिटाला तिप्पट. त्यामुळे कितीही कमी संख्येने निळ्यांची सुरुवात झाली, तरी केवळ वीसच मिनिटात निल्यांची सापेक्ष संख्या ३००० पटीने जास्त होणार. संपूर्ण अरण्याकडे तुम्ही वरून बघितलं तर सुरुवातीला काही ठिकाणी हिरवे डाग दिसतील. ते हळू हळू निळे होताना दिसतील. त्यांचा विस्तार वाढेल. पेट्री डिश मध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरीया प्रमाणे. पुरेशा वेळाने पाहिलं तर पिवळ्याची नामो-निशाणी ही राहिलेली दिसणार नाही.
आपल्या जादूच्या अरण्यात दगड आहेत आणि ठिणग्या आहेत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याबाबत बोलताना कुठेही "प्रेरणा", "इच्छा", "जीजिवीषा" हे शब्द वापरले नाहीत. कारण अंध पुनरुत्पादना शिवाय दुसरं काही होत नाही. पण निळ्या आणि पिवळ्या - वेगवेगळे पुनरुत्पादनाचे दर असलेल्या ठिणग्या परस्पर संबंधात आल्या तर माल्थसच्या नियमाप्रमाणे अधिक पोरे काढणार्या ठिणग्या राहतात हे दिसून येतं. आपल्याला असंही म्हणता येईल की मर्यादित रानासाठी निळ्या व पिवळ्या मध्ये संघर्ष झाला व त्यात निळ्यांचा जय झाला. पण संघर्ष हा शब्द योग्य आहे का? संघर्ष मध्ये आपण आधीच प्रेरणा गृहीत धरतो, जाणीव गृहीत धरतो. हा प्रश्न रास्तच नव्हे, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या सारख्या प्रश्नात गल्लत केल्यामुळेच आपल्याला अचेतना पासून सचेतना पर्यंतच्या प्रवासाची कल्पना करताना अडथळे येतात. प्रेरणा, कामना, व विरोधी कामनांतून उद्भवणारा संघर्ष हा सचेतनांचा प्रांत आहे. पण आपण जे उत्तर बघतो आहे ते हळुवार चढाचे, हळुवार बदलाचे. जर चेतना हळुवार येणार तर त्याचप्रमाणे प्रेरणाही. आणि इतक्या सुरुवातीला संघर्षही तितक्याच कमी पातळीचा. शब्द हे काळे- पांढरे असतात. पण ते शब्द आपण ज्या संकल्पना व्यक्त करायला वापरतो त्या खूप छटा घेतात. गेल्या लेखात उडण्याची कल्पना अशीच ताणली होती. हवेवर भिरभिरणारं पान हे "उडतं" आणि हिंडेनबर्गही "उडतं". या दोन्ही उडण्यात जसा फरक आहे तसाच आपल्या निळ्या पिवळ्याच्या संघर्षात व दोन मानवी जमातींच्या संघर्षात आहे. आपल्या जादुई जंगलात जो संघर्ष आहे तो प्रेरणेतून किंवा प्रयत्नातून नाही, तो आपल्याला अंतिम परिस्थितीतून दिसतो. एका पक्षाचं पारडं जड झालं. निळे जिंकले पिवळे हरले. का तर, बघा ना, निळेच शिल्लक आहेत. या अर्थाने निसर्गात कायमच संघर्ष चालू असतो, तो करणार्यांना "आपण संघर्ष करतो आहोत" हे जाणवण्याची जाण ही जाणीवे बरोबरच वृद्धिंगत झाली.
माल्थसने मांडलेले विचार होते ते मानवी समाजाविषयी. मानवाला विचार करण्याची शक्ती आहे. लोकसंख्येचं संकट ओळखून त्याबाबत पावलं उचलण्यासाठी यंत्रणा आहेत. पण प्राण्यांचं काय? मानवाची लोकसंख्या त्या मानाने खूपच आटोक्यात आहे. पण प्राण्यांच्या बाबतीत लोकसंख्येची आंदोलनं मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. एका वर्षी मुबलक अन्न असताना लोकसंख्या दुप्पट होणं आणि पुढच्या वर्षी सामान्य अन्नपुरवठ्या पायी त्यातली निम्मी (किंवा त्याहूनही अधिक) नष्ट होणं हे चक्र वारंवार चालताना दिसतं. जेव्हा खाणारी तोंडं जास्त, व अन्न कमी, त्यावेळी काही जगतात व उरलेले मरतात. यात एकमेकांशी प्रत्यक्ष लढाई चालू नसली तरी हा संघर्षच आहे. ज्या प्राण्यात या नवीन, कठीण परिस्थितीत टिकाव धरण्याची क्षमता असते ते टिकतात. जे या तुलनेत कमी पडतात ते मरतात. जीवन मरण ही अगदीच गळ्याशी येणारी लढाई झाली. बहुतेक वेळा संघर्षाच स्वरूप हे प्रत्येक जीव आपल्यापाठी आपल्याच गुणधर्माचे किती सक्षम जीव सोडू शकतो या पातळीला येतं. चक्रवाढीचा दर कोणाचा जास्त आहे तो विजयी ठरतो. पुन्हा इथे "विजयी ठरणं" याची व्याख्या आपल्या ठिणग्या प्रमाणेच "अंती कोण टिकून राहतो" ही आहे.
पण अंती कोण टिकतं? सर्व प्राणी तर मरूनच जातात ना? मग हा संघर्ष आहे कोणात? आपल्या जादूच्या रानाताही वैयक्तिक ठिणग्या शिल्लक राहात नाहीत. त्या क्षणभंगुर आहेत. टिकून राहतो तो पिवळा किंवा निळा प्रकाश. पण प्रकाश काही रंगामुळे टिकत नाही. ते रंग केवळ डोळ्यासमोर चित्र स्पष्ट व्हावं म्हणून मी दिलेले आहेत - आपण प्राण्यांना नावं द्यावी त्याप्रमाणे. टिकून राहतो तो त्या ठिणग्यांचा गुणधर्म - विशिष्ट पद्धतीने दगडांमधून प्रकाश निर्माण करण्याचा व ही पद्धत पुढे चालू ठेवणार्या आपल्याप्रमाणेच इतर ठिणग्या उत्पादन करण्याचा. आणि या गुणधर्मात जेव्हा बदल होतो तेव्हा नवीन गुणधर्म आणि जुना गुणधर्म यात "संघर्ष" होतो. ठिणग्या उत्पन्न करण्याच्या दोन पद्धती मध्ये. आपल्या व्याख्येप्रमाणे "विजयी" होतात (टिकून राहतात, वृद्धिंगत होतात) किंवा "पराभूत" होतात (नाहीसे होतात) ते हे गुणधर्म. बाकी सर्वच क्षण भंगुर. ठिणग्या केवळ माध्यम.
डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीवादात याच गुणधर्म बदलण्याच्या प्रक्रियेची परिणती प्राण्यांच्या शरीर रचनेच्या बदलात कशी व्यक्त होते व त्यापासून नवीन जाती कशा निर्माण होतात याचं वर्णन आहे. डार्विन नंतर उत्क्रांतीवादाची क्षितिजं खूप विस्तारली - नकाशा अधिक स्पष्ट झाला, गाडीची रचना काय असावी हे जास्त स्पष्ट झालं तरी मूळ गाभा तोच आहे, इंजिन तेच आहे, प्रक्रिया तीच आहे. पुनरुत्पादन करणारा समुदाय आपल्या अंगचे गुणधर्म पुढच्या पिढीत देतो. काही ना काही कारणाने या गुणधर्मात मर्यादित स्वरूपात बदल नैसर्गिक रीत्या होतात. यातले जे बदल तत्कालीन परिस्थितीत अधिक प्रमाणात पुढची पिढी निपजवायला, जोपासायला कारणीभूत ठरतात/मदत करतात ते बदल अधिकाधिक स्वरूपात पुढच्या पिढीत दिसतात. ही प्रक्रिया चालू राहिली की या बदलांची बेरीज होते. कालांतराने समुदाय इतका भिन्न होतो की त्याला नवीन जात (specie) म्हणता येते. आज आपल्याला जे वैविध्य दिसतं त्याचं कारण म्हणजे अब्जावधी वर्ष चालू असलेली ही प्रक्रिया. छोट्या छोट्या बदलांची बेरीज करून अंती मोठा बदल होण्याची. उंच उडी न मारता हत्तीमार्गावरून हळू हळू पण निश्चित मार्गक्रमणा करण्याची.
सर्वसाधारण थियरी मांडून झाली. तांत्रिक शब्द मी कटाक्षाने टाळलेले आहेत. जोपर्यंत अंतर्भूत कल्पना नक्की होत नाहीत तोपर्यंत या शब्दांचा उपयोगापेक्षा अपायच जास्त होतो. असो. पण अजूनही अचेतनापासून सचेतना पर्यंत प्रवासाचं वर्णन बाकीच आहे. पुढच्या दोन लेखांमध्ये या प्रवासातले काही मधले टप्पे, खाचखळगे, आणि पुनरुत्पादन या गुणधर्माचीच मुळात उत्क्रांती कशी झाली यावर चर्चा करेन. त्यात अचेतन ते सचेतन प्रवास होईलच. त्यानंतर आपण सजीव सृष्टीपलीकडे अशा क्षणभंगुर entities च्या माध्यमात गुणधर्मांची चढाओढ दिसते का ते पाहू. कदाचित तिथेही हीच प्रक्रिया आपल्याला कार्यरत दिसेल.
Comments
लिखाण
लेखमालेचा आनंद घेतो आहे. लेखाची भाषा , मांडण्याची शैली अत्यंत लोभसवाणी, सुबोध. एकेका परिच्छेदात मांडलेल्या संकल्पना वाचताना मजा येते आहे.
आजवर जे वाचले तेच नव्याने वाचल्यासारखे वाटते आहे; मात्र मूळ विषय मांडताना जी भूमिका मांडली , विचार करण्याच्या पद्धतीचे जे मंडन झाले त्यातून, मूलभूत संकल्पनांना कसे भिडावे याचेच प्रात्यक्षिक मला मिळते आहेसे वाटले. ज्ञान करून घेण्याच्या प्रक्रियेचे एक अतिशय परिणामकारक डेमॉन्स्ट्रेशन.
लेखमाला कुठल्या दिशेने जाणार , छोट्या छोट्या परिच्छेदातून जमवलेल्या कणातून निर्माण होत असलेली आकृती कशी असेल , त्याचे सम्यक् आकलन मला होईल किंवा नाही याबाबत उत्सुकता वाटते आहे.
सहमत
मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाशी मी पूर्ण सहमत आहे.
काही प्रश्न
श्री घासकडवी, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
उत्क्रांतीच्या संदर्भात आधीचे माहीत असलेले विसरून लेख वाचण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम 'गुणधर्म टिकणे/ टिकवणे' हे माध्यमांच्या आपापसातील तसेच इतर माध्यमांशी सततच होत असणार्या संघर्षाची मूलभूत प्रेरणा आहे. हे माझे आकलन बरोबर आहे का? तसे असल्यास 'गुणधर्मांचे सातत्य टिकावे' यास मूल किंवा आद्यप्रेरणा व संघर्षास दुय्यम प्रेरणा असे वर्गीकरण करता येईल. त्यामुळे पहिला प्रश्न पडतो तो हा की दुय्यम प्रेरणा आद्यप्रेरणेशी नेहमीच सुसंगत असेल काय? आद्यप्रेरणेच्या विपरीत दुय्यम प्रेरणेने (सुसंगत असूनही) होणारे बदल हे आद्यप्रेरणेने अपेक्षित असलेल्या बदलांपेक्षा विसंगत असू शकतील काय? (उदाहरण म्हणून इस्टर बेटांवरील लोकांचा परस्परात होत असलेला संघर्ष आणि मानव जमातीस टिकवून ठेवण्याची प्रेरणा. यात संघर्ष अनेक पातळीवरील आहे पण हा संघर्ष त्या बेटावरील लोकांचे अस्तित्त्व (गुणधर्म) संपवण्यात झाला.) याच अनुषंगाने पुढे जाऊन किंबहूना लेखमालेच्या 'स्पिरिट ऑफ इन्क्वायरीच्या' प्रेरणेशी सुसंगत राहून पडलेला प्रश्न म्हणजे 'गुणधर्म टिकणे/ टिकवणे' या प्रेरणेचा स्त्रोत काय असावा?
*हे प्रश्न माझे आकलन व्यवस्थित नसल्याने पडले असण्याची तीव्र शक्यता आहे.
आद्य व दुय्यम
आपण प्रेरणांचे वर्गीकरण दोन पातळ्यांवर केले आहे. ते रास्त आहे. केवळ प्रेरणा या शब्दाबद्दल मी एक लाल कंदील आधी दाखवू इच्छितो. आपण जी "आद्य" प्रेरणा म्हटली आहे ती गुणधर्म जनकांची आहे. ती आरोपित प्रेरणा असे मी म्हणेन कारण ती आपल्या सामान्य वापरातल्या इच्छा, आकांक्षा यातून येत नाही. 'गुणधर्मांचे सातत्य टिकावे' किंवा 'गुणधर्म जनकांचे (गुणकांचे) सातत्य टिकावे' ही जणू काही आहे असे गृहित चालल्यास अनेक गोष्टींचे उत्तर मिळते म्हणून तिला मी प्रेरणा म्हणेन.
दुसरी बाब अशी की दुय्यम प्रेरणा या गुणधर्मांखाली मोडतात (माणसाने समाजात राहून काही नवीन अंगिकारल्या आहेत त्या सोडून - सर्वसाधारण प्राण्यासाठी हे चर्चा आहे.) तेव्हा त्या गुणकांच्या अधिकाराखाली येतात.
या दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या तर तुमचा प्रश्न रास्त आहे. गुणकांमधले बदल हे आंधळे असल्यामुळे असेही गुणक झाले असतील ज्यांनी उंच कड्यावरून उडी मारण्याची प्रेरणा (गुणधर्म असलेले प्राणी) निर्माण केले. ते लवकरच मरून गेले. त्यामुळे गुणक संचात ते दिसत नाहीत. दुसरे उदाहरण नि:स्वार्थीपणाचे. जे गुणक मधमाशांमधे आत्मनाशी डंखाची प्रेरणा निर्माण करतात ते इतर (वाचलेल्या) मधमाशांच्या शरीरांतून टिकून राहातात.
ही खर्या अर्थाने प्रेरणा नाही. हा त्या प्रक्रियेचा उत्पादित भाग आहे. आपण after the fact "गुणक जणू स्वतःला टिकवण्याचा, विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत" असं म्हणू शकतो.
धन्यवाद
श्री घासकडवी, स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
हे योग्यच आहे. यास प्रेरणा अशी संज्ञा वापरणे तितकेसे संयुक्तिक नव्हते. गुणके आणि त्यांची सचेत वाहक माध्यमे यांच्या आंतरक्रियेतून उत्क्रांती घडत आहे, असे म्हणता येणे शक्य असावे.
काही प्रश्न अजुनही आहेत पण पुढील लेखांतून त्यांची उत्तरे मिळतील अशी रास्त अपेक्षा आहे. किमान पक्षी नेमके प्रश्न काय आहेत, ते तरी उलगडेल.
उत्तम
लेख उत्तम झाला आहे. ठिणग्यांचे रूपक आवडले.
वा!
वा! लेखमाला उत्तरोत्तर रंगत आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे