बूलियन तर्कशास्त्र: आणि,किंवा,नाही इ.इ.
"गॅस संपला आहे? मग खाणं घरी मागवू किंवा मग बाहेर जेवायला जाऊ"
(खाणं घरी मागवलं काय किंवा बाहेर जेवलो काय, निकाल एकच. जेवणाची व्यवस्था झाली.)
"ज्याचे शिक्षण या पदाला साजेसे आहे आणि ज्याच्या पगाराच्या अपेक्षा आम्हाला परवडतील त्या माणसाला आम्ही नोकरी देऊ."
(साजेसे शिक्षण, आणि पगाराच्या अपेक्षा या दोन्ही गोष्टी जुळल्या तरच अपेक्षित निकाल. त्या उमेदवाराची निवड.)
आपण बोलता बोलता 'आणि' व 'किंवा' या शब्दांचा वापर कितीदा तरी करतो. व्यवहारात स्वत:लाच काही अटी घालून घेतो. त्यातली एक आणि/किंवा अनेक अटी एकाचवेळी पूर्ण झाल्या तरच त्या अटींवरुन अवलंबून असलेला अपेक्षित निकाल(आउटपुट) आपल्याला मिळतो. आता या अटी आपल्याला हव्या तशा एक किंवा अनेक एकाचवेळी पूर्ण होतायत का, तपासणार कोण? आपलं मन. बूलियन तर्कशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या मनात अनेक 'लॉजिक गेटस' आहेत, जी अशा अनेक अटी सतत तपासून त्याप्रमाणे काय करायचं याचा निर्णय घेत असतात.
हा 'लॉजिक गेट' काय प्रकार आहे बरं? 'गेट'. प्रवेशद्वार.या प्रवेशद्वारापाशी काळे आणि पांढरे कपडे घातलेल्या एक माणसांचा गट उभा आहे. आणि आपण सांगितलेल्या पद्धतीने तपासणी करुन रखवालदार त्या गटातल्या एकाच काळ्या किंवा पांढऱ्या प्रतिनीधीला आत सोडतो आहे. प्रवेशद्वाराला 'दिलेले काळेपांढरे नग' अनेक. पण 'प्रवेशद्वारातून पार होऊन आपल्याला भेटणारा, काळा किंवा पांढरा' नग एकच. आज आपण या प्रवेशद्वारांचे काही प्रकार अभ्यासणार आहोत.
१. 'अँड'- आणि
२. 'ऑर'- किंवा
३. 'नॉट'- नाही
४. 'नँड'- नकारर्थी आणि
५. 'नॉर'- नकारर्थी किंवा
६. 'एक्सॉर'- तुम्ही दोघे सारख्याच प्रकारचे असाल तर आम्ही नाही जा पांढऱ्याला सोडणार!
७. 'एक्सनॉर'-इथे गणवेशाची सक्ती आहे. तुम्ही दोघं वेगवेगळे कपडे घालून आलात तर आम्ही नाही जा पांढऱ्याला सोडणार!
--------------------------------------------------------------------------------
१. अँड :
'अँड' तर्कशास्त्रीय प्रवेशद्वार हे गुणाकाराचे, किंवा 'सिरीज'(एकसर) जोडणीचे प्रातिनीधीत्व करते. तुम्ही कधी बँकेतल्या तिजोरीत दागिने, कागदपत्रे आदी ठेवले आहेत? तिजोरी उघडताना दोन चाव्या लावल्या तरच तिजोरी उघडते. या दोन चाव्यांतली एक आपल्याकडे व दुसरी बँकेच्या अधिकाऱ्याकडे असते. कोण्याही एकेकट्याने त्याच्याजवळ असलेली एकच चावी लावून तिजोरी उघडायचा प्रयत्न केला तर ती उघडणार नाही.हेही एक प्रकारचे 'अँड' प्रवेशद्वार. सर्वसामान्यपणे डिजीटल शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर 'काळे' म्हणजे 'ऑफ' म्हणजे 'फॉल्स' म्हणजेच 'शून्य' म्हणजेच 'लो' आणि पांढरे म्हणजे 'ऑन' म्हणजे 'ट्रू' म्हणजेच 'एक' म्हणजेच 'हाय'. यापुढे आपण या 'शून्य (०)' आणि 'एक (१)' च्या भाषेतच शिकणार आहोत. खाली दिलेले 'अँड' गेटचे चिन्ह आणि माहिती पाहूया:
'क' आणि 'ख' बटणे एकसर जोडणीत. 'क' किंवा 'ख' पैकी एक, किंवा दोन्ही बंद असली तर विद्युतमंडल पूर्ण होत नाही, दोन्ही एकावेळी चालू असली तरच विद्युतमंडल पूर्ण होऊन दिवा लागतो. क आणि ख आणि त्यावरुन निकाल ग ची स्थिती मांडणाऱ्या या वरील तक्त्याला 'ट्रुथ टेबल' अशी संज्ञा आहे.
(अवांतर: विद्युतमंडलातील विद्युतधारा मोजण्यासाठी जोडलेला 'ऍमिटर' ही नेहमी एकसर जोडणीतच जोडायचा असतो.कधी ऍमिटर विद्युतमंडलाच्या समांतर जोडणीत जोडून पाहिला आहे?पाहू नका.विद्युतस्त्रोत(बॅटरी)चे धन ऋण ध्रुव हे शून्य रोध असलेल्या ऍमिटरमुळे एकमेकांना जोडले जाऊन (शॉर्ट सर्किट होऊन) लहानसा स्फोटसदृष्य प्रकार घडतो! )
--------------------------------------------------------------------------------
'ऑर':
'ऑर' तर्कशास्त्रीय प्रवेशद्वार समांतर जोडणीचे प्रातिनीधीत्व करते. 'एक होगा तो भी चलेगा! दोनो एकसाथ नही तो भी काम चला लेंगे!' अशी या लॉजिक गेटची सामंजस्याची भूमिका आहे. 'अँड' सारखा 'सगळे एकत्र पाहिजेतच' वाला काटेकोरपणा नाही. 'ऑर' गेटचे चिन्ह आणि विद्युतमंडलीय आकृतीने स्पष्टीकरण पाहूया:
बटणे क आणि ख ही समांतर जोडणीत जोडलेली आहेत. क आणि ख पैकी एक चालू केले किंवा दोन्ही एकावेळी चालू केली तरी दिवा लागेल. हां, आता क आणि ख दोन्ही एकावेळी बंद केली तर मात्र विद्युतमंडलाचा नाईलाजच होईल आणि ते पूर्ण होणार नाही.
--------------------------------------------------------------------------------
'नॉट':
चार (मराठी!) माणसं एकत्र जमून गप्पाटप्पा करत असतील, त्यांच्यात बहुतेकदा एखादा तरी 'तू काळं म्हणालास तर मी पांढरं म्हणणारच' या धोरणाचा (वितंड)वादी मनुष्य दिसतोच. 'नॉट' प्रवेशद्वाराचंही हे असंच आहे. तुम्ही शून्य पाठवलं की नॉट गेट एक म्हणणार आणि तुम्ही एक पाठवला तर त्याचं शून्य बनवणार. 'नॉट' गेटचे चिन्ह आणि माहिती पाहूया:
या ठिकाणी एकच बटण क हे विद्युतमंडलात जोडले आहे. 'क' या बटणाला दोन स्थिती आहेत. या बटणाला इलेक्ट्रॉनिक्स भाषेत 'सिंगल पोल डबल थ्रो(एस. पी डी.टी.) स्विच' म्हणतात. बटण क हे सर्वसामान्य स्थितीत जमिनीला जोडले आहे. ('जमिन' म्हणजेच 'ग्राउंड' तीन आडव्या रेषांनी दर्शवले आहे.) क बटण 'चालू' स्थितीत असल्यावर विद्युतधारा जमिनीकडे वाहून दिवा बंद राहतो आहे. मात्र क बटन 'बंद' अवस्थेत असताना ते दिव्याला जोडलेले असल्याने दिव्याला विद्युतप्रवाह मिळून दिवा लागतो आहे. नॉट गेटला दुसरी संज्ञा 'इन्व्हर्टर' हीसुद्धा आहे.
--------------------------------------------------------------------------------
'नँड':
नँड म्हणजेच नकारर्थी अँड प्रवेशद्वार, हे अँडच्या बरोबर उलटे वागते. 'कमी किंवा शून्य मिळाले तर त्याच्यात समाधाने राहू,मात्र जास्तीत जास्त मिळाले तर डोक्यात हवा जाऊन होत्याचे नव्हते करु' असे काहीसे या गेटचे धोरण आहे. नँडचे चिन्ह अँडच्या चिन्हापुढे एक गोळा असे दर्शवले जाते. हा गोळा म्हणजे 'उलटण्याचे' वा 'इव्हर्जन' चे प्रतिक दाखवण्यासाठी म्हणून वापरला जातो. नँडचे चिन्ह आणि माहिती पाहूया:
क किंवा यापैकी एक, किंवा दोन्ही बटणे एकावेळी 'बंद'(अनुक्रमे प आणि फ बिंदूंना) असली तरी विद्युतमंडल पूर्ण होऊन दिवा लागेल. मात्र दोन्ही बटणे 'चालू' स्थितीला एकावेळी असली तर विद्युतमंडल पूर्ण होणार नाही आणि दिवा लागणार नाही.
--------------------------------------------------------------------------------
'नॉर':
नॉर हा प्राणी 'ऑर' प्रवेशद्वाराच्या अगदी उलट. पूर्ण शून्यात हा समाधानी, पण जरा संपत्ती मिळायला लागली की नाखूश. मिळालेल्या दोन्ही संख्या '०' असल्या तरच निकाल चांगला. एक किंवा दोन्ही संख्या एक असल्या तर निकाल शून्य. खाली दिलेली 'नॉर' ची माहिती पहा:
बटण क आणि बटण ख दोन्ही 'बंद' बिंदूंकडे असले तरच विद्युतमंडल पूर्ण होऊन दिवा लागेल. क चालू, किंवा ख चालू, किंवा दोन्ही चालू असले तरी विद्युतधारा जमिनीकडे जाईल व दिवा प्रकाशित होणार नाही.
--------------------------------------------------------------------------------
एक्झॉर:
'एक्झॉर' गेट हे फुटीरतावादी किंवा वैविध्यताप्रेमी आहे. दिलेल्या माहित्या वेगवेगळ्या प्रकारच्या नसणे, किंवा सारख्या नसणे ही निकाल चांगला लागायची अट आहे. एक्झॉरचे सूत्र असे लिहीता येईल:
((क च्या उलट माहिती) गुणिले ख) अधिक ((ख च्या उलट माहिती) गुणिले क)
आता क आणि ख दोन्ही '१' असले तर काय होईल?
(१ च्या उलट म्हणजे ०) गुणिले १ अधिक (१ च्या उलट म्हणजे ०) गुणिले १=म्हणजे शेवटी उत्तर शून्यच!
क आणि ख दोन्ही शून्य असले तरी तेच.
(० च्या उलट म्हणजे १) गुणिले ० अधिक (० च्या उलट म्हणजे १) गुणिले ०= म्हणजे परत उत्तर शून्यच!
समजा क १ आणि ख ० असला तर?
(१ च्या उलट म्हणजे ०) गुणिले १ अधिक (० च्या उलट म्हणजे १) गुणिले १=वा! उत्तर १ आले.
ख १ आणि क शून्य असला तरी उत्तर १ येईल. एक्झॉर गेट काही नँड गेटांचा वापर करुन हे असे तयार करता येईल:
--------------------------------------------------------------------------------
'एक्सनॉर':
एक्सनॉर चे वागणे एक्झॉर च्या अगदी उलट. जर दिलेल्या माहित्या एकसारख्या असल्या तरच निकाल चांगला, अन्यथा शून्य. एक्झॉरचे सूत्र हे असे:
(((क च्या उलट माहिती) गुणिले ख) अधिक ((ख च्या उलट माहिती) गुणिले क)) या पूर्ण हिशोबाच्या उलट.
काही नँड गेटांच्या सहाय्याने एक्सनॉर गेट हे असे बनवता येते:
--------------------------------------------------------------------------------
सर्वसमावेशक प्रवेशद्वारे(युनिव्हर्सल लॉजिक गेटस):
नँड आणि नॉर यांना 'युनिव्हर्सल गेटस' म्हणतात, कारण कोणतेही इतर तर्कशास्त्रीय प्रवेशद्वार एकापेक्षा जास्त नँड किंवा एकापेक्षा जास्त नॉर चा उपयोग करुन बनवता येते. कशी बनवणार नँड आणि नॉर वरुन इतर गेटे? अंदाजपंचे? नाही. त्यासाठी आपण डीमॉर्गनची दोन सूत्रे वापरतो.
सूत्र १: 'उलट' (माहिती क 'आणि' माहिती ख)= उलट(माहिती क) 'किंवा' 'उलट'(माहिती ख).
सूत्र २: 'उलट' (माहिती क 'किंवा' माहिती ख)= उलट(माहिती क) 'आणि' 'उलट'(माहिती ख).
आंग्लभाषेत 'उलट' हे त्या अक्षरावर आडवी रेष असे दाखवतात. आंग्लभाषेत डी मॉर्गनचा सिद्धांत हा असा:
उदा. आपण 'नॉट' गेट नँड च्या साहाय्याने कसे बनवू?
उलट(क)= उलट(क)+(०). (० अधिक केले तर संख्येत काही फरक पडणार नाही.)
= उलट(क)+उलट(१)
=उलट(क आणि १) (डीमॉर्गनचे पहिले सूत्र वापरुन)
आता आपण विचार केला तर 'क आणि १' हे अँड गेटला दिले तर मिळणारा निकाल सर्वस्वी क च्या किंमतीवर अवलंबून असेल. क ०, निकाल ०. क १, निकाल १.
म्हणून आपण या १ ची जागा क नेच घेतली तर?
उलट(क)=उलट(क आणि क)
अरे हो! उलट(काहीतरी आणि काहीतरी) म्हणजे नँड गेट. म्हणून अर्थ असा झाला की आपण नँड गेटला दोन्ही माहिती क दिल्या तर उत्तर क च्या उलट येईल. हे असे:
लेख संपवल्यावर डीमॉर्गनची सूत्रे वापरुन हा गृहपाठ सिद्ध नक्की करुन पहा:
१. नँडच्या साहाय्याने ऑर
२. नँडच्या साहाय्याने अँड
डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स हा एक अफाट समुद्र आहे. त्यातल्या 'लॉजिक गेटस' या एका लहानशा सुईने कशिदा काढण्याचा हा प्रयत्न केला आहे.
(-अनुराधा कुलकर्णी)
डिस्क्लेमरे:
१. लेखातील माहिती विकीपीडीया व लेखिकेच्या आठवणींच्या आधारे लिहीली आहे.
२. माहितीत व आकृत्यांत सुधारणेला वाव असू शकेल.
३. लेखात दाखवलेली दिवा आणि बटणांची विद्युतमंडले ही केवळ चांगल्या स्पष्टीकरणासाठी वापरलेली आहेत. प्रात्यक्षिकासाठी वापरताना त्यात आवश्यक त्या किंमतीचे रोध, इंडक्टन्स आदी वस्तूंची आवश्यकता आहे याची नोंद घ्यावी.
४. हा लेख प्रकाशित केल्याबद्दल मनोगत आणि उपक्रम या संकेतस्थळांचे आभार.
Comments
अरे वा! मस्तच
अनुताई,
उपक्रम मस्त आहे. अतिशय आवडला. समजवण्याची पद्धत मस्तच! कुडोस.
ही चित्रे तुम्ही कशी काढता? म्हणजे त्यांचे मराठीकरण कसे करता? ते मात्र सांगा.
असो.
हे वाचून तोंडी परीक्षेची आठवण झाली. 'युनिवर्सल गेट कोणते आणि का?' असा प्रश्न विचारला होता. जेव्हा माहित असायला हवे तेव्हा नेमके उत्तर माहित नसते, नंतर जन्मभर लक्षात राहते. त्यातला हे गेट्स् एक प्रकार आहे. ;-)
उपक्रमाच्या विशेष लेखांत या लेखाची भरती व्हावी असे वाटते.
मस्त/बुलियन
लेख मस्त आहे. आकृत्या आणि सोपे स्पष्टीकरण यामुळे याविषयाची माहिती नसलेल्यांच्याही पदरात बरेच काही पडेल असे वाटते. या लेखमालेतील पुढचा लेख बुलियन अल्जीब्राची तोंडओळख करून देणारा असेल का?
अवांतर - निर्जीव वस्तूंवर सजीवत्वाचा केलेला आरोप की काहिसा अलंकार आहे ना? त्याचा छान वापर केला आहे, लॉजिकल गेट्स जिवंत झाल्यासारखी वाटली :)
अलंकार
चेतनागुणोक्ती.
मी पण या अलंकाराचं नाव आठवू लागले. मग म वरच्या कालातीत गद्याचे खोदकाम केले त्यात ही अप्रतिम रत्ने मिळाली:
नीलहंसांचे भाषेचे अलंकार
प्रवासींचे दागिने
धन्यवाद/दुवा
दुव्यांबद्दल धन्यवाद! मीही नीलहंसाने मनोगतावर दिलेल्या लेखाचा शोध घेत होतो पण मला मराठी विकिपीडियावरील हा लेख मिळाला.
आदर्श शिक्षिका!
अनुजी खरेच आपण एक आदर्श शिक्षिका आहात आणि त्याच वेळी एक समर्थ लेखिका देखिल आहात हे आजच्या लेखाने सिध्द केले आहे.
गेटस्(दरवाजे .. हो दरवाजेच! इलेक्ट्रॉनिक्स संबधी असले म्हणून काय झाले?) बद्दल इतक्या सोप्या आणि सहजसुंदर भाषेत लिहिलेले मी आजवर कुठेही वाचलेले नाहीये. माझी विनंती आहे की जमेल तसे आणि जमेल तितके तुम्ही ह्या विषयाबद्दल असेच जरूर लिहा आणि संधी मिळालीच तर पुस्तक रुपाने छापून घ्या. पुढची पिढी तुम्हाला नक्की दुवा देईल.
हुशार लोक मी खूप पाहिलेत पण आपल्याला असलेले ज्ञान अशा सहजतेने आणि सुलभतेने पोहोचविण्याचे तुमचे कौशल्य वादातीत आहे असे मला मनापासून वाटते.सगळेच शिक्षक जर तुमच्यासारखे असतील तर विद्यार्थ्यांना कोणतीच शंका राहणार नाही असे वाटते.
तुमच्या वर्गात बसू इच्छिणारा एक प्रौढ(फक्त वयाने बरं का!) विद्यार्थी.
सुंदर
उत्तम लेख. सोप्या भाषेतील स्पष्टीकरण आणि उदाहरणे यामुळे हा लेख विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. असेच लेखन करीत रहावे.
पुढे याचे पुस्तक करता येईल.
अतिशय सुंदर
हा लेख आधी मिळाला असता तर आम्हाला बीई प्रथम वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक्स च्या परीक्षेत ४० गुणांवर समाधान मानावे लागले नसते.
पुढील के मॅप वगैरे डिटेलवारीमध्ये पण जा.
भयंकर सुंदर लेख आहे.
अवांतरः उपक्रमपंत, वरील लेखास दृष्ट लागू नये म्हणून अनुताईंनी खालील व्याकरणदृष्ट्या चुकीच्या शब्दांचे तीट लावले असावे.
कृपया दुरुस्त करा.
१. प्रतिनीधीला
२. नकारर्थी
३. प्रातिनीधीत्व
४. नाखूश
५. वैविध्यताप्रेमी
अवांतर २: "नॉर वरुन इतर गेटे" मधील गेटे हा शब्द आवडला.
(प्रूफ रीडर!) योगेश
मराठी टंकलेखनासाठी वापरा
हो... योगेश यांच्याशी सहमत्..
के - मॅपींग तर येऊच देत.. मस्त प्रकार होता तो! जमले तर किमान ८ गुण एक-गठ्ठा मिळुन जायचे..
खूप छान लिहीले आहे.. खरंच या सर्वावर पुस्तक काढा एक! खूप दुवा मिळतील तुम्हाला! :)
:-)
अ = ६५८४; ब=३३९३. ;-)
अनु, लेख देखणा झाला आहे. चित्रे आणि दैनंदिन उदाहरणांमुळे फंडे एकदम क्लियर. :-) मला लागलेले आणि विझलेले दिवे विशेष आवडले.
आवडले...
विषय आणि शैली दोन्हीही आवडले.
मस्त!
अतिशय सुंदर लेख!
अप्रतिम
ओघवती शैली आणि सुंदर विवेचन वाचतांना मजा आली! या विषयावर आपण खरोखरच एक पुस्तक लिहा. खूप लोक तुमचे ऋणी होतील.
आभार
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभार.
अनु.
आजपासून मी लिखाण करताना वापरणार आहे. तुम्हीसुद्धा वापरणार ना?
वा
अश्या विषयावर मराठीतून् काही वाचायला मिळेल् याची कल्पनासुद्धा केली नव्हती! गेटे म्हणजे काय ते कळले पण या गेटांचा उपयोग कुठे होतो बरे?
- अमृतांशु
अँड
इच्छाशक्ती , नियोजन व अधिकार यांचे अँड गेट असेल तरच काहीतरी विधायक आउटपुट मिळेल.हे गेट सर्व स्तराला लागू आहे.
यातूनच यशश्वी झाला असावा.
अभिनंदन ...
या विषयावर मराठीत लिहाच...
अत्यंत मूलभूत स्वरूपाची माहिती आपण देता आहात. मी कलाशाखेतून शिकलो परंतु भाऊ इंजिनियरिंगला होता तेव्हा त्याने हा भाग मला समजाऊन सांगितला होता. त्या गमतीदार आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. बायनरी - ऑक्टेल इ. पुसट झाले आहे. मराठीतून तुम्ही असे लिहिलेत तर नक्कीच प्रसिद्ध करता येईल. आकृत्या उत्तम.. भाषाशैलीही सुगम..
--
उदय
बूलिय तर्कशास्त्रावरील आपला लेख
उत्तम! खूप छान.
तुम्ही वापरलेली उदाहरणे मी माझ्या लेखात वापरण्यास परवानगी द्याल का?
- अभिजात
--------------------------
अभिजात विचारे
पुणे
--------------------------
मराठी words remember करायला difficult असतात.
- आजची "शुद्ध" मराठी ;-)
--------------------------