सरलतेकडून क्लिष्टतेकडे : तोंडओळख

कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या
निळ्या वायूच्या लगडी सलग
कधी ?
कधी अन् जडतेला त्या
मनामनाचे आले पोत ?
- बा. सी. मर्ढेकर

मर्ढेकरांचा हा प्रश्न या लेखमालेचा आधारस्तंभ आहे. "काही नाही" या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला? वायूच्या लगडी जमून त्यांची हवा, पाणी, जमीन तयार झाली याची एक वेळ कल्पना करता येते - साध्या भौतिक आणि रसायन शास्त्राच्या नियमांनी ते समजता येतं. पण निर्जीव, अचेतन पदार्थांपासून हाडामांसाचे जीव आणि धडधडणारी हृदयं कशी काय झाली? मर्ढेकरांनी ही कविता लिहून साठेकच वर्षं झाली असतील पण शतकांनुशतकांपासून मानवाला या प्रश्नाने झपाटलेलं आहे.

अधिक खोलात जाऊन पाहिलं तर हा प्रश्न केवळ जीवसृष्टीपुरता मर्यादित नाही. हा जास्त व्यापक आणि सर्वसाधारण प्रश्न आहे. तो म्हणजे, "एखादी व्यवस्था (सिस्टिम) साध्या सोप्या स्थितीपासून अधिक क्लिष्ट स्थितीपर्यंत कशी काय जाऊ शकते?" आपण रोजच्या जीवनातच असे कितीतरी बदल बघतो. गेल्या काही शतकांतच माणसाचं जीवन आमूलाग्र बदललेलं आहे. आपली समाजव्यवस्था, नाती, जीवनपद्धती, पर्यावरण, दळणवळण यात प्रचंड फरक झालेला आहे. संगणक, आंतर्जाल, व सेलफोन यामुळे तर गेल्या तीसच वर्षांत आयुष्य बदललेलं आहे. मामूली गरजा आंतर्गत भागवणारी खेडी जात जाऊन अधिक गरजा जास्त समर्थपणे भागवणारी शहरी, औद्योगिक समाजव्यवस्था स्थिरावते आहे. संपूर्ण विश्वच एक गाव होत चाललेलं आहे. सोप्या सरल आणि मर्यादित कुवतीच्या व्यवस्था (बलुतेदार) जाऊन अधिक सक्षम पण अधिक क्लिष्ट व्यवस्था (औद्योगिकीकरण) त्यांची जागा घेत आहेत. या सर्व बदलांची संगती लावता येण्यासाठी बदल का होतात आणि विशेषतः सरलतेपासून क्लिष्टतेकडे जाणारे बदल कसे होतात हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. या बदलांमागच्या कारणांची चर्चा करणं आणि वाचकांमध्ये ती घडवणं हा या लेखमालेचा उद्देश आहे.

प्रथम सरलता आणि क्लिष्टता या शब्दांविषयी. हे शब्द मी काहीश्या तांत्रिक अर्थाने वापरतो आहे, त्यामुळे रोजच्या वापरातल्या त्याच शब्दांपासून ते कसे वेगळे आहेत हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. वरवर पाहता सरल शब्दाला सोपेपणा, सुगमता, साधेपणा हे अर्थ लागू होतात. आणि क्लिष्ट या शब्दाचा किचकट, गुंतागुंतीचं, कठीण हे अर्थ आपण लावतो. यात सोपं म्हणजे चांगलं आणि क्लिष्ट म्हणजे वाईट असा गुणारोप होणं सहाजिक आहे. पण मला जी सरलता अभिप्रेत आहे ती कुठच्याही व्यवस्थेची - त्यामुळे सोपेपणा हा उघडपणे चांगला गुण नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मित्राशी बोलण्याचे दोन भिन्न मार्ग बघू. एक म्हणजे त्याच्या घरी जायचं आणि सरळ हाक मारायची. दुसरी म्हणजे त्याला सेलफोनवर कॉल करायचा. आधुनिक युगात आपल्याला दुसरी पद्धत "सोपी" वाटेल, पण संवादासाठी आवश्यक व्यवस्थेचा विचार केला तर पहिली पद्धत अधिक सरल आहे. यात फोनची आवश्यकता नाही, सिग्नल असण्याची आवश्यकता नाही, की हे सगळं बनवणारी तंत्रप्रधान संस्कृती असण्याची गरज नाही. हजारो वर्षांपासून पहिली पद्धत चालू आहे, याउलट दुसरी पद्धत आताआताच शक्य आहे. सरल पद्धती, व्यवस्थांमध्ये पातळ्या, आवरणं, पुटं कमी असतात, याउलट क्लिष्ट व्यवस्थांमध्ये अनेक पायर्‍या ओलांडाव्या लागतात. सरल व्यवस्था या बनवायला सोप्या असतात पण त्यांचा आवाका कमी असतो, व बंधनं अधिक असतात. पहिल्या पद्धतीत मित्र जवळच रहाणं आणि कायम गावात असणं गृहित आहे. याउलट दुसर्‍या पद्धतीत ते बंधन नाही.

सरल व क्लिष्ट शब्दांच्या बोकांडी बसलेल्या गुणारोपाच्या ओझ्यापासून वाचण्यासाठी "अरचित" आणि "सुरचित" हे शब्द वापरता येतील. काही ठिकाणी ते अधिक रास्त आहेत तिथे मी ते वापरीन. पण त्याही शब्दांना स्वतःची ओझी आहेत. त्या दोन्हींमध्ये एक रचनाकार अद्ध्याहृत आहे. तो रचना या शब्दानेच येतो. आणि आपल्याला जर या प्रवासाची कारणं शोधायची असतील तर मुळातच "कोणीतरी ढकललं" असं गृहित धरून चालणार नाही. शिवाय "अ" आणि "सु" मुळे दोन काळे-पांढरे गट डोळ्यासमोर येतात, आणि त्यांमध्ये दरी निर्माण होते. सरलता व क्लिष्टता हे कमी जास्त होणारे, एकमेकांत मिसळणारे गुण आहेत...

एवढा शब्दच्छल करण्याचं मुख्य कारण म्हणजे मी शब्द कुठच्या अर्थाने वापरतो आहे याबद्दलची शंका कमी व्हावी. अर्थ स्पष्ट असले की संवाद जास्त चांगला होतो. त्याचबरोबर मला काय म्हणयच नाही हेही उघड व्हावं. हे लेख "सरल चांगलं की क्लिष्ट चांगलं" या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी नाहीत. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडल्यावर "ते सफरचन्द वर असावं की खाली?" अशी चर्चा झाली तर ती चर्चा जशी अनाठायी होईल तशीच. मी अर्थातच न्यूटन नाही, पण हे लेख त्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी व त्यातून बोध घेता येतो का हे पाहाण्यासाठी आहेत. या प्रक्रियेच्या अनुषंगाने काही गुणावगुण चर्चा होणारच. पण तो मुख्य उद्देश नाही. या लेखावर "बलुतेदार पद्धती जाऊन औद्योगिकीकरण झालं हा समाजाचा र्‍हास आहे" किंवा "गाव गेलं आणि सेलफोन आले त्यामुळे माणसा माणसातले दुवे तुटले असं वाटतं" अशा प्रतिक्रिया आल्या तर माझी निराशा होईल.

रचनेच्या वाढीच्या या प्रवासात पहिल्याप्रथम अडसर येतो तो भौतिकीचा. उर्जाशास्त्राच्या नियमाप्रमाणे "कुठच्याही सीलबंद व्यवस्थेतली रचना किंवा क्लिष्टता कमी होत जाते. (एंट्रॉपी वाढत जाते)" असं असताना आपल्याला कुठच्याही व्यवस्थेत रचनेची वाढ कशी दिसेल? चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल की खरी गोम दडली आहे ते "सीलबंद" या शब्दात. ज्या व्यवस्थांमध्ये "बाहेरून" उर्जा मिळवण्याची सोय असते त्यांत रचना वाढू शकते. उदाहरणार्थ - फ्रिज. उर्जाशास्त्राच्या नियमांनुसारच फ्रिज बनवलेला असतो. बर्फ हे पाण्याचं अधिक रचनेचं किंवा कमी एंट्रॉपीचं रूप आहे. खोलीत पाणी ठेवलं तर त्याचा बर्फ होत नाही. पण फ्रिजमध्ये ते होतं. याचं कारण म्हणजे ती रचना वाढवण्यासाठी उर्जा खर्च होते. फ्रिज, पाणी व खोली या तिन्हींमध्ये मिळून संपूर्ण रचना कमी होते. कारण फ्रिज पाण्यातून जितकी उष्णता काढून घेतो त्यापेक्षा अधिक उष्णता बाहेर टाकतो. उर्जा वापरता येण्याची क्षमता ही रचनेच्या वाढीसाठी नितांत गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, एकमेकांशी जोडल्या गेलेल्या व्यवस्थांत एकीची रचना कमी तर दुसरीची वाढणं असा प्रकार होतो.

पुढच्या काही लेखांमध्ये मर्ढेकरांच्या मूळ गाभ्याच्या प्रश्नाला हात घालणार आहोत - अचेतनातून सचेतनाची निर्मिती कशी झाली? कारण त्याइतका नाट्यमय आणि चमत्कारिक प्रवास दुसरा कुठलाही नाही. त्यातून जो बोध होइल तो जमल्यास इतर झंझावाती (संगणक, आंतर्जाल, सेलफोन) व मंदगती (शेतीव्यवस्था, भाषा, राज्यपद्धती ) बदलांना लावून पाहू. शेवटी निष्पन्न काय होईल याची खात्री नाही. मर्ढेकरांच्या त्याच कवितेच्या पुढच्या काही शब्दात सांगायचं झालं तर,

खंत कशाला जिरेल का रग
आकाशाची? जगेन पोळत;
फक्त तुझी जर दगडी भिवयी
चळेल थोडी डोळ्यादेखत!

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

मर्ढेकरांच्या कवितेच्या अनुषंगाने तत्त्वचर्चेचा उपक्रम रोचक आहे, सुयोग्य आहे.

लेखात ऊर्जाशास्त्राच्या दुसर्‍या कायद्याशी संबंध दाखवला आहे. आणि विश्वाचा दृश्य भाग सीलबंद नाही, यामुळे दुसर्‍या कायद्याचे गणित करता येत नाही, हा अंगुलिनिर्देशही केला आहे.

गुंतागुंत/क्लिष्टता/सुरचित वगैरे शब्दांबद्दल सूक्ष्म विचार करणे योग्यच आहे.

(यात "रचना" बघणार्‍याच्या/मोजणार्‍याच्या पूर्वकल्पनेमध्ये आहे, असे जाणल्यास रचयित्याबद्दल पूर्वग्रह न करता "रचना" हा शब्द वापरता येईल, असे वाटते.)

मितीच्या वेगवेगळ्या आवाक्यांमध्ये (स्केल ऑफ मॅग्निट्यूडमध्ये) याची उत्तरे वेगवेगळी येऊ शकतील, असे वाटते.

पाण्यात विरघळणारे गोलाकार-लंबगोलाकार रेणूंपासून लांबलचक सेंद्रिय रेणूंपर्यंत जे काल-संक्रमण झाले तो घटनाक्रम वेगळा. आणि गुहांमध्ये राहाणार्‍या छोट्या टोळ्यांपासून पृथ्वीभर पसरलेला-जोडलेला समाज तयार झाला, त्या घटनाक्रमाचा विचार आमूलाग्र वेगळा असावा.

लहान रेणू->सेंद्रिय रेणू या संक्रमणात गुंतागुंतीत जी प्रचंड वाढ आहे, त्या मानाने गुहावासी->इमारतवासी या संक्रमणात गुंतागुंतीतली वाढ क्षुल्लक आहे. परंतु मानवी जीवनासाठी, सामाजिक प्रश्नांच्या विचारासाठी हे संक्रमण महत्त्वाचे असल्यामुळे "क्षुल्लक" नाही. परंतु पल्ल्याच्या फरकामुळे संक्रमणांचा विचार फारच वेगळ्या प्रकारे करावा लागेल.

दृष्टांत असा :
न्यू यॉर्कच्या विमानतळापासून मला गोव्यातील एका खेडेगावात जायचे आहे. न्यू यॉर्क विमानतळ ते गोवा विमानतळ हा हजारो मैलांचा पल्ला आहे. ते संक्रमण करताना "विमानाची उड्डाणक्षमता" अवघ्या भूखंडावरचे हवामान, वगैरे विचार करावा लागेल. मात्र गोवा विमानतळ ते खेडेगाव हा छोटा प्रवास करणे बरेच त्रासाचे आहे - रस्त्यातील खड्डे, तासभर पडलेला वळिवाचा पाऊस - या असल्या गोष्टींचे विघ्न होऊ शकते. घरी पोचण्यासाठी विमानातील आणि मोटार-दुचाकीवरील, अशी दोन्ही संक्रमणे त्यांच्या जागी महत्त्वाचीच. मात्र अंतराच्या वेगवेगळ्या पल्ल्यांमुळे त्या दोघांना लागू असलेले विचारव्यूह कमालीचे वेगळे आहेत.

लेखमालेबद्दल उत्सूकता वाटते आहे.

बघू...

आपली प्रतिक्रिया आवडली. अजून तरी लेखमाला तिच्या बाल्यावस्थेत असल्यामुळे ज्ञाताच्या सुरक्षित वर्तुळात वावरते आहे. त्या पलिकडे - सत्य व कल्पनाविलासाच्या संधीरेषेवर पाऊल टाकेल तेव्हा आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांचा विचार आवश्यक ठरेल. मितीच्या आवाक्याचा प्रश्न रास्त आहे - पण एक नमूद करावेसे वाटते की त्यासंबंधीचे काही प्रश्न normalization ने (प्रतिशब्द?) सुटू शकतात, काही नाही.

दृष्टांत पटला - त्यावर दोन मार्ग असतात. एक आपण सुचवलेला - प्रवासमाध्यमाच्या वैशिष्ट्यानुसार वेगळे सिद्धांत मांडण्याचा. दुसरा असा की विमान व एस्टीचा/दुचाकीचा प्रवास या दोन्हींचा "प्रवासातील शक्य मार्ग व त्यात येणारे अडथळे" असा सर्वसाधरण (generalized ) विचार करून दोन्हींना त्याची विशिष्ट रूपे म्हणून वागवायचे. यातले काय स्वीकारायचे व काय नाही हे उत्तराच्या उपयुक्ततेवरून ठरते. सध्या तरी माझी त्याबाबतीत प्रतिक्रिया ही "बघू" अशीच आहे. उपक्रम वर जाणते, विचारी वाचक नजर ठेवून आहेत या जाणीवेमुळे या प्रकल्पाला काटेकोरपणाशी इमान ठेवण्याचा उत्साह आला आहे. पण त्याचबरोबर कल्पनाविष्कारचे पंख छाटायलाही माझे मन धजावत नाही...

बघू...

राजेश

उत्तम चर्चाप्रस्ताव

छान लेख आणि उपक्रम.
पुढच्या लेखांमधून काय विचार मांडणार आहेत याची कल्पना येत नाही (त्याबद्दल अर्थातच तक्रार नाही) पण पहिल्याभागात तरी वैज्ञानिक सिद्धांतांची सोयिस्कर गल्लत केलेली नाही हे छान.

पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

रोचक

श्री घासकडवी, रोचक सुरूवात. लेखमाला 'इमर्जन्स' या संकल्पनेबाबत असणार आहे असे वाटते. पुढील लेख वाचण्यास उत्सुक आहे.

लव्ह ऍट...

तोंडओळख वाचताक्षणीच लेखमालेबद्दल आत्मियता वाटू लागली आहे.
आपोआप वाढत्या एंट्रॉपीच्या (भौतिकीच्या) सर्वसामान्य नियमाला झुगारून देऊन त्याविरुद्ध प्रवास करण्याची प्रेरणा का होते? या प्रश्नाचा उहापोह निश्चितच होईल अशी अपेक्षा आहे.
शुभेच्छा!
वाचत आहे.

उपक्रमाला शुभेच्छा...!

लेखाचा उपक्रम मस्तच...! बाकी विज्ञान, भौतिकशास्त्र, उर्जा, हा नावडता विषय असला तरी,
''मर्ढेकरांच्या मूळ गाभ्याच्या प्रश्नाला हात घालणार आहात' त्यामुळे ते 'गाभ्याचे'लेखन कसे असेल त्याची अधिक उत्सूकता आहे.

आपल्या लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा आणि उत्सुकता

अचेतनातून सचेतनाची निर्मिती कशी झाली? कारण त्याइतका नाट्यमय आणि चमत्कारिक प्रवास दुसरा कुठलाही नाही.

या चमत्कारीक प्रश्नाचे साक्षात्कारी उत्तर शोधायला या चर्चेतून दिशा मिळेल असे वाटते. पूढील लेखनास शुभेच्छा. आणि उत्सुकताही..

खूप् उत्सुकता

हे तुम्ही कसे साधणार आहात त्याची खूप् उत्सुकता लागली आहे. बाकी धनंजयने जी मते मांडली आहेत् त्यांशी सहमत्.

रोचक

साध्या सोप्या भाषेतली तोंडओळख अत्यंत रोचक झाली आहे. धनंजय ह्यांचा प्रतिसादही आवडला. मालिकेला शुभेच्छा.

उर्जा वापरता येण्याची क्षमता ही रचनेच्या वाढीसाठी नितांत गरजेची गोष्ट आहे.
पुढे मागे ब्रह्मांड प्रसरण पावते आहे म्हणजे नक्की काय होते आहे जाणून घ्यायची इच्छा आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर