फिलिप्स डिझाइन टीमची कमी प्रदूषणाची चूल
फोर्थ डायमेन्शन 44
फिलिप्स डिझाइन टीमची कमी प्रदूषणाची चूल
भारताच्या ग्रामीण व निमशहरी भागात स्वैपाक करण्यासाठी चुलींना पर्याय नाही, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या गोरगरीबांना गॅसवरील स्वैपाक ही लक्झरी असून त्यावर फक्त शहरवासियांचीच मक्तेदारी आहे, असे वाटत असल्यास ते मान्य करावेच लागेल. त्यामुळे खेड्यापाड्यातील स्त्रिया व मुलं, पारंपरिक चुलीत जळणाऱ्या इंधनातून होणाऱ्या प्रदूषणाचे बळी ठरत आहेत. गेल्या साठ वर्षात ही स्थिती सुधारण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले, अनेक प्रकारच्या चुलींच्या रचना आल्या आणि गेल्या, परिस्थिती मात्र आहे तशीच आहे. एका अंदाजानुसार जगभरात दरवर्षी सुमारे 16 लाख जण चुलीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मृत्युमुखी पडतात. भारतातील ही संख्या सुमारे 4 लाख असेल. शिवाय जगभरात सुमारे 8 लाख मुलं या संबंधातील दूषित वातावरणामुळे दगावतात.
स्वैपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळेच स्त्रिया वा मुलं रोगग्रस्त होऊ शकतात. गरीबी व महागडे इंधन यामुळे जवळच्या जंगलातून गोळा करून आणलेली लाकडं, चिपाड, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणी इत्यादींचाच वापर करून ग्रामीण भागातील स्त्रियांना अन्न शिजवावे लागते, आंघोळीसाठी पाणी गरम करून द्यावे लागते. यासाठी स्त्रियांना व लहान मुला-मुलींना भरपूर पायपीट करावी लागते. त्यामुळे चुलीभोवतीच ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. तळागाळातल्यांनासुद्धा परवडणारे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करायला हवे. परंतु माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान व नॅनो तंत्रज्ञान याभोवतीच सर्व योजना, ध्येय-धोरणं, आर्थिक तरतूद, शासकीय उत्तेजन यांचा मारा होत असल्यामुळे चुलीपुढे बसून अश्रू ढाळणाऱ्यांकडे बघणार कोण? त्यांच्या अश्रू पुसणार कोण?
भरमसाठ नफा कमावणाऱ्या कार्पोरेट्सना मात्र समाजाला आपण काहीही देत नाही याची अलिकडे जाणीव होऊ लागली आहे. या साक्षात्कारामुळे हे कार्पोरेट्स आजकाल आपापल्या भोवतालच्या सामाजिक संस्थांना देणग्या देत आहेत, बालवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, क्रीडा स्पर्धा इत्यादींना (जुजबी) उत्तेजन देत आहेत. समाजाचे ऋण फेडण्याचे हे छोटे-मोठे प्रयत्न असले तरी समस्यांच्या स्वरूपात फार मोठा फरक पडला नाही.
यावर तोडगा म्हणून फिलिप्स या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील कंपनीने आपले सामाजिक ऋण फेडण्यासाठी सर्वस्वी वेगळा मार्ग चोखाळला आहे. 2005 साली आयोजित केलेल्या या कंपनीतील तज्ञांच्या कार्यशाळेत अविकसित व विकसनशील देशातील मागासलेल्या समाजगटांच्या समस्यांवर चर्चा करून सुमारे 80 प्रकारच्या उत्पादनांची यादी करण्यात आली व अशा उत्पादनांच्या संशोधन-प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहाय करण्याचे ठरवले. त्यापैकी ग्रामीण भागासाठी चूल हा प्रकल्प राबवण्यासाठी एका डिझाइन टीमची निवड करण्यात आली. खरे पाहता हा एक चाकोरीबाहेरचा सर्वस्वी वेगळाच प्रयोग होता. केवळ समाजहित हाच उद्दिष्ट असणारा, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नसलेला, कुठलाही अंतस्थ हेतू न ठेवता व प्रसंगी पदराला खार लावून हा प्रकल्प राबवायचा होता.
पुण्यातील उन्मेश कुलकर्णी, प्रवीण मरेगुद्दी व टीमचे मुख्यस्थ स्टेफानो मार्झानो यांच्या प्रयत्नातून चुलीचा ढोबळ आराखडा तयार झाला. Appropriate Rural Technology Institute (ARTI) चे श्री कर्वे, त्यांचे सहकारी, व काही महिला बचत गट यांच्या मार्गदर्शनातून चुलीचे प्रारूप तयार करण्यात आले. या चुली सर्व चाचण्यामधून गेल्या असून मोठ्या प्रमाणातील उत्पादन व विक्री व्यवस्था यावर आता डिझाइन टीम प्रयत्नशील आहे.
चुलीची मूळ रचना व तिला अंतिमस्वरूप देत असतानाच आपल्या ग्रामीण भागातील सवयी, स्वैपाकाची पद्धत, चूल बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता, उत्पादन पद्धती, रास्त किंमत, व प्रदूषणमुक्त रचना इत्यादी अनेक इन-पुट्सचा तौलनिक अभ्यास करून प्रारूपांची रचना करण्यात आली. पारंपरिक चुलीतील उणीवांचा अभ्यास करताना स्वैपाकघरात साठत जाणारा धूर बाहेर कसा काढायचा यावर जास्त भर देण्यात आला. त्यासाठी जुजबी उपाय किंवा काहीही न केल्यास इंधनाच्या जळणातून CO2, CO सारखे विषारी वायू व ब्लॅक कार्बनचे कण घरातल्यांच्या आरोग्याला हानी पोचवू शकतात. स्वैपाकघराच्या छतावर धुराड्याची सोय असल्यास काही प्रमाणात प्रदूषण कमी होत असले तरी धुराड्याची किचकट रचना, त्यासाठीचे बांधकाम, लागणारा खर्च इत्यादीमुळे काही अपवाद वगळता आपल्या ग्रामीण भागात या गोष्टी दिसत नाहीत. याशिवाय धुराड्यात वरच्यावर वर साठत जाणाऱ्या काजळीमुळे धूर अडकून पुन्हा एकदा घरभर पसरू लागतो. व धुराडे निकामी होते. शेवटी घरातल्या बाईलाच काजळी काढण्याचे काम करावे लागते. छतावरून वरखाली करावे लागते. काही वेळा अपघात होवून पाय मोडून घेण्याचे प्रसंग तिच्यावर गुदरतात. ही भानगड नको म्हणून ती मुकाट्याने धुरामधील विषारी वायू पुफ्फुसात ढकलत राहते.
या प्रकारच्या अडचणी समजून घेऊन डिझाइन टीमने धुराड्याच्या संकल्पनेवर जास्त लक्ष केंद्रित केले. वजनाला हलके, तीन-चार भागात सुटे सुटे होणारे, काजळी स्वच्छ केल्यानंतर सुलभरीतीने जोडता येईल अशी रचना असलेली, व चुलीलाच जोडता येईल अशी धुराड्याची रचना केलेली आहे. एकीकडे लावलेला जाळ दोन्ही भांड्यांना पुरवता यावा म्हणून चुलीच्या पृष्ठभागावर खाचा दिल्यामुळे जळणात बचत होते. जळणात बचत म्हणजेच जळण गोळा करण्यातील कष्ट कमी, पायपीट कमी. चूल तयार करण्यासाठी एका खास मोल्डची रचना केलेली आहे. त्यात निर्दिष्ट प्रमाणात सिमेंट कॉंक्रीट ओतून इतर काही प्रक्रियेनंतर चूल वापरण्यायोग्य ठरते. सिमेंट कॉंक्रीटच्या चुलीला स्थानिक मातीचा लेप देऊन ती जास्तीत जास्त आकर्षक बनविण्यात आली आहे. सुरुवातीच्या प्रारूपांचा महिलागटातील बायकांनी घरात वापरून काही बहुमोल सूचना केल्या. त्या सूचनेप्रमाणे सूक्त बदल करून आता त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
या डिझाइनला 2009 सालचे 1 लाख युरोचे (सुमारे 65 लाख रुपये) पारितोषक मिळाले असून स्टेफानो मार्झानोच्या मते ही सर्व रक्कम भारतात या चुली लवकरात लवकर कशा उपलब्ध होतील यासाठी वापरण्यात येणार आहे. या पैशातून ग्रामीण उद्योजकांना मोल्ड पुरविण्यात येणार आहे. काही उद्योजकांनी याविषयी उत्साह दाखविला असून अशा चुलींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे करता येईल यावर चर्चा होत आहे.
केवळ भारतातच नव्हे तर आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील कित्येक देशांना या प्रकारच्या चुलींची अत्यंत गरज आहे. फिलिप्स कंपनीच्या 80 वर्षाच्या डिझाइनच्या अनुभवाचे फलित असलेली ही चूल लवकरच बाजारात येईल. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात अग्रेसर असलेल्या या कंपनीचे माती, कॉंक्रीट व फायबर मधील हे डिझाइन त्या क्षेत्रातील तज्ञांना आश्चर्यचकित करत आहे.
Comments
माहितीपूर्ण लेख
या सुयोग्य तंत्रज्ञानाबद्दल (अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी बद्दल) माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
बिनधुराचा (स्मोकलेस) चुल्ह्याबद्दल आपण कित्येक वर्षे ऐकत आहोत. ती चूल न वापरण्याचा दोष चूल वापरणार्या घरकुलांना देणे हे अदूरदृष्टीचे होय. परंतु येथे सांगितल्याप्रमाणे आदल्या बांधणीमध्ये धुराडे साफ करण्यास कठिण होते, ते उपभोक्त्यांकडून जाणून, मग तंत्र बदलणे - ही तंत्रज्ञानाची योग्य दिशा.
कौतुकास्पद!
पुण्यातील संरचना
पुण्यातील श्री. कर्वे यांनी चुलीवर बरेच काम केले असून त्याला आंतर्राष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. त्या बद्दलची माहिती येथेच आली असती तर बरे झाले असते.
शरद
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
ही नवीन प्रथा बर्याच कंपन्यांनी सुरू केली आहे.
प्रियदर्शिनी कर्वे आणि त्यांचे वडिल आनंद कर्वे अनेक वर्षे हे काम करीत आहेत असे ऐकून आहे.
http://www.hedon.info/User:PriyadarshiniKarve
प्रकल्प छानच आहे, मॉडेल्स आवडली. स्त्रियांना होणार्या अनेक आजारांचे कारण या इंधनांमुळे तयार होणार्या धुरात असते. या चुलीच्या बाजूला स्वयंपाकघरात काम करण्यार्या गृहिणीचा फोटो फारच वेधक आला आहे.
+१
चांगला प्रकल्प!
किंचित अवांतरः इन्फोसिस फांउन्डेशन तर्फेसुद्धा शहरी आणि ग्रामिण भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मांडणीचा प्रकल्प "व्यवसायांची सामाजिक बांधिलकी" दाखवते (फांउन्डेशनचा मुख्य इन्फोसिसशी अ(/न)सलेला संबंध आणि इतर गोष्टी अलहिदा).
अशी अनेक उदाहरणे अर्थात देता येतील.
आता मुळ मुद्दयाशी संबंधित शंका: साधारण ९५सालच्याआसपास किस्त्रीमच्या दिवाळी अंकात अनिल अवचटांचा अशाच धूर विरहित, पण कमी (प्रतीच्या आणि प्रमाणात)जळण वापरणार्या चुलीबद्दल लेख आला होता. कुणाला त्याचा नेमका संदर्भ आठवत असेल तर इथे देता येईल काय?
उपयुक्त यंत्र
उत्तम माहिती. लेख आवडला.
@ विंजिनेर
हा लेख इतर काही लेखांबरोबर अनिल अवचटांच्या कार्यरत या पुस्तकात आहे. अशी चुल तयार करणर्याचं नाव आता आठवत नाही...पण संपुर्ण पुस्तक खुपच वाचनीय आहे...अगदी चुकवु नये असं...
धन्यवाद...
पटवर्धन साहेब! नक्कीच मिळवून् वाचिन आता.
उत्तम प्रकल्प, चांगली माहिती
हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. जगातल्या श्रीमंतांसाठी आय् फोन, आय् पॅड बनवण्यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च होतात. पण सोळा लाख मृत्यू थांबवण्यासाठी साधं तंत्रज्ञान विकसित करायला एकविसावं शतक उजाडावं लागतं ही दैना आहे. असो, उशीरा का होईना, पण जाग येतेय हेही नसे थोडके. या प्रकल्पाच्या कल्पनेपासून ते पूर्तीपर्यंत काम करणार्या सर्वांचे आभार.
उत्तम माहितीबद्दल धन्यवाद!
लेख चांगला लिहिलाय, विशेष म्हणजे चित्रे बोलकी आहेत.
श्री. कर्वे यांच्या Appropriate Rural Technology Institute (ARTI) मधील सराई कुकर व कांडी कोळसा ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा अतिशय उपयुक्त वाटल्या. त्यांचेही मार्केटींग सर्वत्र झाले पाहिजे.
गौरी