दलपतसिंग येता गावा
२६ जानेवारी प्रजासत्त्ताक दिनी आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य केल ते म्हणजे दलपतसिंग येती गावा नावाचा शुभारंभाचा नाट्यप्रयोग भरत नाट्य मंदिरात पाहिला.पुण्यात लोकशाही उत्सव समिती च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत या शुभारंभाचा प्रयोग दणक्यात झाला. ५ जानेवारीला आपले उपक्रमी मुक्त्त सुनीत पुण्यात होता. त्याच्या सोबत (खर म्हणजे त्याच्या ओळखीने ) मी, बिपीन कार्यकर्ते मंडळी अतुल पेठेंना भेटलो. तेव्हा गप्पांमधे त्यांच्याकडुन जांबसमर्थ नावाचे गाव प्रथमच ऐकले.
जालन्यापासून सुमारे १०० कि. मी. अंतरावर हे छोटे गाव आहे. तिथे लेखक राजकुमार तांगडे आणि दिग्दर्शक संभाजी तांगडे हे दोघे नाटकवेडे तरुण गेली काही र्वष अनेक अडीअडचणींशी सामना करत मोठय़ा निष्ठेने नाटकं करीत आहेत. त्यांची ग्रामीण भागातील वीजचोरीवरील 'आकडा' ही एकांकिका अतुल पेठेंनी पाहिली होती. या दोघांची कणकवलीला एन.एस.डी.च्या नाटय़प्रशिक्षण शिबिरात दिग्दर्शक अतुल पेठे यांच्याशी गाठ पडली होती. त्या गाठीभेटीतून दलपतसिंग येती गावा..’ या प्रयोगाचा जन्म झाली. मकरंद साठे या नाटककाराने यांनी विशेष अभ्यास करून लिहिलेल्या पटकथेचे हे नाटय़रूपांतर आहे. ते अतुल पेठे, मकरंद साठे आणि राजकुमार तांगडे यांनी केले आहे. संकल्पना व दिग्दर्शन अतुल पेठे यांचे आहे.पेठे यांनी जांबसमर्थ, लिंबी, पिंपळगाव, मूर्ती आणि जालना या गावांतील तरुणांना एकत्र करून जांबसमर्थ आणि जालना येथे एक कार्यशाळा घेतली. यांनी त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. अभ्यासाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थी नर्मदा खोऱ्यात जाऊन आले. तिथे ते योगिनी खानोलकर या स्वयंसेवी कार्यकर्तीबरोबर हिंडले आणि रोजगार हमी योजनेबाबतची जनसुनवाई त्यांनी पाहिली. आर्थिक स्थिती नसूनही हे शेतकरी तरुण स्वखर्चाने फिरले. चार महिन्यांच्या या प्रशिक्षण शिबिरातून दलपतसिंग येती गावा..’ या नाटकाची निर्मिती झाली आहे. जगण्याचेच प्रश्न तीव्र असताना नाटकाद्वारे आपले आयुष्य मांडावे, असे या तरुणांना वाटते. दलपतसिंग येती गावा..’ हे नाटक त्यातलंच. हे नाटक अरुणा रॉय यांनी माहितीच्या अधिकारासाठी दिलेल्या लढय़ावर आधारीत आहे. आजचे गावपातळीवरील राजकीय व सामाजिक ताणतणाव त्यात पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साहाय्यक दिग्दर्शन संभाजी तांगडे यांनी केले असून, गाणी विनोद जैतमहाल आणि राजकुमार तांगडे यांनी लिहिली आहेत. यात राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, अशोक देवकर, विनोद जैतमहाल, अरुण घोडे, सचिन जैन, गजेंद्र तांगडे, सपना देशमुख, अश्विनी भालेकर आणि वीणा जामकर हे कलाकार आहेत.
नाटकाच्या सुरवातीला अतुल पेठे यांनी निर्मितीत सहाय्य केलेल्या अनेकांचे आभार मानले
नाटय़प्रशिक्षण व निर्मितीत इंद्रजित खांबे, राजेंद्र बापट, कणकवलीचे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान यांनी खर्चाचा काही भार उचलला आहे. अरुणा रॉय, नसिरुद्दीन शहा, डॉ. वाणी, मजदूर किसान शक्ती संघटन, स्क्विझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन, के. एस. वाणी मेमोरियल ट्रस्ट, जालना पत्रकार संघ आणि मॉटले ग्रुप, मुंबई यांनीही यास सहकार्य दिले आहे.
हे नाटक मनोरंजन म्हणुन कोणी पहायला आला तर तो अस्वस्थ होउन बाहेर पडेल. नाट्याविष्कार हा लोकनाट्य कलेच्या माध्यामातुन आहे. हे प्रबोधननाटय आहे, इंग्रजांच्या काळात झाले असते तर अतुल पेठे व त्त्यांच्या या टोळीला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला असता. आजही तो विद्रोहच आहे. पण लोकशाहीचे संरक्षक कवच असल्याने व अजुन तरी राज्यघटना कागदावर का होईना अस्तित्वात असल्याने ते घडत नाही.
सुरवात महारष्ट्रातील हरिभाउ या स्थानिक राजकारण्याच्या उदोउदो लोकगीतातुन करुन कागदावरच संडास बांधणार्या ग्रामीण विकासातुन केली आहे. बतावणीतुन झालेली संवादफेक थेट घडलय बिघडलय ची आठवण करुन देते. फ्लॆशबॆकमधे भुरासिंग हा राजस्थानातील जमीनदाराने गावच्या गायरानाचा कब्जा घेउन गावकर्यांवर सत्ता गाजवण्यातुन झालेल्या संघर्षाची कहाणी घेतली आहे. पुर्वी पोलिसात ऒर्डर्ली म्हणुन काम करीत असलेला दलपतसिंग हा एसीपीच्या बायकोने सांगितलेली खाजगी कामे ऐकत नाही. फक्त प्रशिक्षणात अंतर्भुत असलेली कायदेशीर कामेच करीन असा पवित्रा घेतो. त्याविरोधी आंदोलन करतो. या 'विद्रोहा' साठी नोकरीतुन शिस्तभंग, बेकायदा आंदोलनाचा कायदेशीर बडगा दाखवुन त्याला नोकरीतुन काढुन टाकतात. तो परत गावी येतो. पारंपारिक सुतारीचे काम येणार्या दलपतला काम शोधताना एका जनआंदोलनाचे काम करणार्या एका एनजीओ ची ओळख होते. तिथे सहभाग घेउन तो काम करतो. रोजगारहमी योजनेत काम करणारे असंघटीत गावकरी मजुर असहाय्यपणे भ्रष्टाचार सहन करीत असतात. त्यांना संघटीत करुन तो भुराविरुद्ध संघर्ष करतो. गोपनीयतेचे कायदे संघर्षात आड येतात. तेव्हा माहिती अधिकार नसतो. माहिती अधिकाराच्या निर्मितीचा हा भाग त्यात घेतला आहे
सतीश शेट्टीच्या खुन प्रक्ररणाची दखल व आदरांजली ही संहितेतील केलेला सुनियोजित बदल हा लक्षवेधी आहे.कुठलेही प्रथितयश कलाकार न घेता केलेल्या या नाटकाला बोजड प्रबोधन नाट्य होउ न देण्यात अतुल पेठे यशस्वी झाले आहेत. नाटकाला अनेक कला नाट्य साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी आली होती. श्रीराम लागु पण होते बरं का! नाटकातील ओ का ठो न कळणार्या मला हे नाटक जाम आवडल व अस्वस्थ करुन गेल. नाटक संपल्यावर पुणेरी पद्धतीने चपळाईने आत जाउन अतुल पेठे व टीमचे अभिनंदन केल.
[ अतुल पेठे व मकरंद साठे कलाकार चमुसमवेत]
मुंबईत १ फेब्रुवारीला वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात, तर २ फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी मंदिरात याचे प्रयोग होणार आहेत. नाटकाचा कालावधी सलग पावणेदोन तास आहे.
Comments
चांगला विषय
नाटकाचा विषय, आशय आणि लेखन चांगलेच दिसत आहे. आम्हाला कधी बघायला मिळणार कोणास ठाऊक! तरी देखील ओळख पोचवल्याबद्दल धन्यवाद!
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
नाटकाची ओळख
नाटकाची ओळख आवडली. अतुल पेठेंनी डीव्हीडी काढली की मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.
लेखाबद्दल धन्यवाद.
माझे मत
प्रकाशराव, आपली भेट हुकली म्हणायची मग. मी होतो की...
नाटकाविषयी माझी मते थोडी वेगळी आहेत तुमच्यापेक्षा.
अभिनय (हे सारे कलाकार हौशी आहेत हे ध्यानी घेता) उत्तमच. विशेषतः अलकाच्या भूमिकेतील मुलीने अनेकदा (आजूबाजूला पहात असलेल्या) काही प्रख्यात स्त्री कार्यकर्त्यांची छाप जाणवून दिली (म्हणजे दिग्दर्शकाचेही त्यांच्याविषयीचे निरिक्षण बारीक असावे Smile ).
गाणी/पदं चांगली. अर्थपूर्ण. मुख्यतः त्यांना दिलेला साज पोवाडा वगैरेचा असल्याने अगदी प्रभावी. संगीतही तसेच. पाऊल आपटतच होतो मी.
पण... नाटकातील भाषा... अस्सल गावरान मटणात गूळ घातला की जे होईल ते अनेक ठिकाणी होत होतं. शहरातून अशा भागांत जाणारी कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता समजून घेण्यातही कमी पडले की काय मकरंद साठे? मला आठवतं, एकजूट हा शब्द ज्यांच्या अनुभवात नसतो तिथं तो वापरून उपयोग नसतो. तिथं ती, एक काटकी सहज मोडता येते आणि दहा एकत्र असतील तर मोडता येत नसतात ही, युक्ती कामी येते. अशा पद्धतीने तिथल्या पर्यावरणाशी कार्यकर्ते समरूप होत जातात. त्याऐवजी इथं ज्या पद्धतीनं हक्क, अधिकार यांची भाषा होते ती मटणात गूळ ठरते. ग्रामीण भागातील लोकांना आपण खूप काही शिकवत असतो हा आविर्भावही दिसतो. गावाकडच्या माणसाला सरकारी कामात कोण पैसे खातंय हे कळत नसतं असा एक समज आहे. तो खोटा असतो. ग्रामीण माणसाचं शहाणपण असं असतं की, तो त्याला हे ज्ञान आहे हे दाखवत नसतो, कारण त्याला कायमचं तिथं रहायचं असतं. समोरच्याची खात्री होईपर्यंत तो त्याचे पत्ते उघडत नसतो. हे व्यवहारज्ञान त्याच्याकडं असतं. त्याचं भान या स्क्रिप्टमध्ये दिसलं नाही. अलका शिकवते आणि ती मंडळी शिकत जातात. हे सारं कोणाच्या तोंडून ऐकायचं तर ज्यानं पोलिसांमध्ये ऑर्डर्ली असताना आपल्या प्रमुखाविरुद्ध धरणं आंदोलन केलं आहे आणि त्यापोटी नोकरी गमावली आहे, त्याच्याकडून. इतकी सोपी नसते ही प्रक्रिया.
नाटकांत अनेकदा अनेक प्रसंग लाऊड केले गेले. तुम्ही वर दिलेल्या दुसर्या छायाचित्रातील प्रसंग आठवा. कितीही सरंजामी असला तरी तो इतका हुशार असतो की, समोर आलेल्याचा थंड डोक्याने काटा काढणं त्याला ठाऊक असतं. ग्रामीण भागातील असा सरंजाम बाहेरून, तेही शहरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी (इथं तर ही अलका आयएएस, माजी जिल्हाधिकारी आहे) या प्रसंगाप्रमाणे वागतात यावर माझा अनुभवान्ती विश्वास नाही. त्यांच्या वागण्यात एक सॉ़फिस्टिकेशन असतं. ते त्या पहिल्या भेटीतून भलताच मेसेज कधीही जाऊ देत नाहीत. कारण तिथं इतर कटकटी असतात. तसाच प्रकार ते जिल्हाधिकारी अलकाच्या घरी येतात तेव्हाचा. हे जिल्हाधिकारी एखाद्या हेड कॉन्स्टेबलनं वागावं तसं वागतात. ट्रंक किती आहेत किंवा माणसं किती आहेत याची चौकशी ते ज्या पद्धतीनं करतात ते पाहिलं तर हसू येतं. असं होत नसतं. जिल्हाधिकाऱ्याकडे असली माहिती काढण्याचे इतर सोर्सेस असतात. प्रांताशी होत असलेल्या चर्चेवेळीही तोच प्रकार. त्याचा सूर पाहिला तर गावगुंड वाटतो तो. त्याच चर्चेवेळी प्रांत सांगतो की 'कलेक्टर ऑर्डर काढेल' आणि त्याचे म्हणणे ऐकून मंडळी उठतात? अलका स्वतः कलेक्टर होती. गायरानाची ऑर्डर, कलेक्टरचा रोल, इतर खाती... कळत नाही!!! हे सगळं या विश्वाविषयीच्या अल्पसमजातून आलेलं आहे असं कसं म्हणायचं? साठे, पेठे चळवळींशी संबंधित आहेत.
नाटकाची कथा तितक्या पकडीची नाही, जितकी पकड अशा चळवळीत प्रत्यक्षात असते. अरूण रॉय यांनी राजस्थानात जे केलं, त्याविषयी एक एकरेखीय प्रतिमा नाटक निर्माण करून देतं. माहितीच्या अधिकाराची लढाई त्यापलीकडं आहे. ती न घेताही गावापुरतं बोलायचं होतं तरीही त्यात पेच आहेत. ते येत नाहीत. योगिनी आत्ता जे करते आहे त्यातील किंवा अरूण रॉय यांचा तो काटेदार संघर्ष नाटकाची एकूण लांबी ध्यानी घेता समाविष्ट करता आला नसता असे थोडेच आहे. म्हणजेच आहे या जीवात हे नाटक आणखी आटोपशीरही झाले असते.
अचानक आणलेला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट व माहितीचा अधिकार हा संदर्भही फसवा. तेच सतीश शेट्टी संदर्भात. हे असे काही आणून प्रभाव वाढतो? मला शंका आहे.
कच्चे दुवे खूप राहिले असे. त्यातच नाटकासाठी निवडलेला फॉर्मही गोची करतो की काय असे वाटत राहिले. ना धड पथनाट्य, ना धड स्टेजचं नाटक असं काही तरी शेवटपर्यंत वाटत राहिलं. एकूण बरीचशी कसरत.
आठेक जण गातात तेव्हा माईकच्या ते फार जवळ येण्याची गरज नसते. ते आले आणि एकूण कल्लोळ झाल्यासारखे झाले. मला तर अनेकदा या कलाकारांना माईकची गरज नाही असेही (अत्यंत पॉझिटिव्हली) वाटत होते. अलका किंवा ती दुसरी मुलगी, शाहीर, ऑर्डर्ली झालेला, सरंजामदार यांचे आवाज पुरेसे बोलकेच होते.
पुन्हा एकदा, कलाकारांना मात्र दाद!
अवांतर: अरूण रॉय हीच व्यक्तिरेखा न घेता अलका ही व्यक्तिरेखा का घेतली असावी? पुन्हा बाकी संदर्भ तेच. आयएएस, माजी जिल्हाधिकारी, दिल्लीतील मैत्रीसंबंध वगैरे!
उत्सुकता
श्रावण मोडक यांनी लिहिलेली तळमळीची प्रतिक्रिया आवडली. नाटकाच्या लेखनातल्या त्रुटी त्यांनी चपखलपणे हेरल्याचं नाटक न पहाताही कळलं... भाषाही मोठी मार्मिक आहे - मटणात गूळ - वा:
अर्थातच नाटक पहाण्याची उत्सुकता वाढली. मूळ लेखक व प्रतिक्रियाकार - दोहोंना धन्यवाद...
राजेश
विषय, आशय आवडला.
विषय, आशय आवडला. आता बघायला हरकत नाही.
आमच्या कोल्हापुरात येणार आहे की नाही ? सी.डी किंवा डी.व्ही.डी पेक्षा प्रत्यक्ष बघायला आवडेल.
अवांतर
जालन्यापासून सुमारे १०० कि. मी. अंतरावर हे छोटे गाव आहे. तिथे लेखक राजकुमार तांगडे आणि दिग्दर्शक संभाजी तांगडे हे दोघे नाटकवेडे तरुण गेली काही र्वष अनेक अडीअडचणींशी सामना करत मोठय़ा निष्ठेने नाटकं करीत आहेत.
वरील विषयावर मिपावर पोच दिलीच आहे. पण जरासे अवांतराचा मोह आवरत नाहीहे.नाटकवेड्या वरील लेखक, दिग्दर्शकांचं कौतुक आहेच. पण जांब समर्थचे [ता.घनसावंगी] गावातच नाट्यवेड आहे. गावातल्या तरुणांना नाटकातल्या अभिनयाचं वेड परंपरेने आलेले आहे. गाव जत्रेत गावातले लोक हौशीनं प्रयोग करत असतात. शिकलेले-अडाणी असे सर्वच. आम्ही खूप नाटकाचे प्रयोग करायचो असे म्हणनारे यागावातून इतरत्र व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले अनेक आपल्या आठवणी सांगतील. याच गावातला एक इंग्रजीविषयाचा प्राध्यापक माझ्या महाविद्यालयात आहे. त्याने 'एकच प्याला' चा प्रयोग केल्याच्या आठवणी आजही सांगतो. अजून एक असेच गाव आहे, सोयगाव. [जि.औरंगाबाद] इथे तर पुण्या -मुंबईची नाटकं एक मान म्हणून हजेरी लावत होती. असो, त्या विषयावर फीर कभी.
इतनी जगे कहा है दिल दागदार में !!
येत्या शुक्रवारी पुण्यात
शुक्र दि. १२ फेब्रु २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदिरात रात्री ९.३० वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजीत केलेला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
कालावधी: सलग पावणेदोन तास. जनता तिकीट दर: बाल्कनी ५ रुपये फक्त