होमींग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर

कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासुन होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळाले की, कबुतरांमधेच असे काहीतरी विषेश आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही.

दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफित मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला. भारतात ओरीसातील पोलिस खाते कबुतरांचा वापर दुर्गम भागातील ख्याली-खुशाली कळवण्यासाठी अगदी अलिकडे पर्यंत करत होते पण आंतर्जालाच्या माध्यमाने ती गरज आता उरली नाही.

ह्या कबुतरांबद्दल माझे कुतूहल परवा चाळवले गेले ते गुगलच्या सर्च इंजिनबद्दल आमची चर्चा सुरु होती तेव्हा. एकाने माहिती पुरवली की, गुगलच्या ऑफिसमधे काही कबुतरे मुद्दाम "पाळली" आहेत व त्यांच्या ह्या घर शोधण्याच्या कुशलतेने प्रोत्साहन मिळावे अशी त्यांची धारणा आहे. मला कौतुक तर वाटलेच, पण ते कबुतर पाळण्याचे आणि त्यामागची भूमिका ऐकून नव्हे तर, कबुतरांची घाण कोण साफ करत असेल आणि एअर कुलिंग सिस्टीममधून त्याचा वास सर्वत्र पसरु नये म्हणून घेतलेली असावी त्या काळजीचे.

कबुतरं अर्थातच आपल्याला हव्या त्या व त्यांच्या दृष्टीने नव्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत- त्यांना घरी परतायची कला येते. काही ठिकाणी कबुतरांच्या शर्यतीही लावल्या जातात व १८०० किमी पेक्षा जास्त अंतर त्यांना पार करुन अचूकतेने व वेगाने परतायचे असते. मालकाला भरगोस बक्षीस मिळते. अर्थातच हे खूपच अचंबित करणारे आहे कारण, त्यांची जी काही विदा साठवण्याची पद्धत आहे त्याच्या वापराने ते १८०० किमी पर्यंतचा विदा ते लक्षात ठेवू शकतात व विदा परत मिळवून त्याचा वापर करु शकतात.

मानवाला त्यांच्या ह्या कुशलतेचे नेहमीच कुतूहल वाटत आले आहे व अनेकांनी त्यांच्या ह्या वाटाडेगिरीचा छडा लावण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. काही प्रयोगांमधे त्यांना भूलीचे औषध देऊन, तर काही वेळा दोन्ही- भूल व झाकून नेऊन त्यांच्या घरापासून लांब नेले तरी ते अचूकतेने घरी परतले. असा एक समज आहे की ते त्यांच्या घराचे ठिकाण कोऑर्डीनेट (अक्षांश-रेखांक्ष) लक्षात ठेवतात व त्यासाठी ते सूर्याच्या फिरण्याच्या कक्षाच्या/ स्थितीचा अथवा त्याबरोबरच पृथ्वीच्या चूंबकीय शक्तीचा वापर करतात.

प्रवास करतांना ते खूपसे सरळ रेषेत ऊडतात, जणू काही त्यांना त्यांच्या घराच्या ठिकाणाबद्दल आत्मविश्वास असतो. त्यांचा मागोवा विमानाने केला गेला आहे व त्यातून असे निश्कर्ष काढले गेले आहेत. घरी परततांना ते दिवसाच उडण्याचे पसंत करतात (शिकवले तर रात्रीही ऊडतात), जोराचा पाऊस असेल तर विश्रांती घेतात व वाऱ्याची दिशा कशीही असली तरी ते उडू शकतात असे दिसून आले आहे.

एकावेळेस एकापेक्षा जास्त कबुतरे त्यांच्या घरापासून दूर नेऊन जर एकाच वेळेस सोडली तर सगळी कबुतरे घरी परततात पण थोड्या विखूर्लेल्या वेगळ्या वाटा प्रत्येक कबुतर निवडते. (ते रांगेने एकामागोमाग ऊडत नाहीत).

अनेकांचा कबुतरांच्या ह्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न आजही चालू आहे पण अजुन खात्रीने कोणीच काही सांगू शकलेले नाही. मला वाटते की, कबुतराला बोलता आले तरच त्या रहस्याचा उलगडा होईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

मानवाला त्यांच्या ह्या कुशलतेचे नेहमीच कुतूहल वाटत आले आहे व अनेकांनी त्यांच्या ह्या वाटाडेगिरीचा छडा लावण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. काही प्रयोगांमधे त्यांना भूलीचे औषध देऊन, तर काही वेळा दोन्ही- भूल व झाकून नेऊन त्यांच्या घरापासून लांब नेले तरी ते अचूकतेने घरी परतले. असा एक समज आहे की ते त्यांच्या घराचे ठिकाण कोऑर्डीनेट (अक्षांश-रेखांक्ष) लक्षात ठेवतात व त्यासाठी ते सूर्याच्या फिरण्याच्या कक्षाच्या/ स्थितीचा अथवा त्याबरोबरच पृथ्वीच्या चूंबकीय शक्तीचा वापर करतात.

ही फारच आश्चर्यकारक माहिती आहे. त्यापेक्षा घराच्या विस्तृत खाणाखुणा लक्षात ठेवत असतील का? तसे असल्यास कबुतरे फारच बुद्धिमान दिसतात.

अवांतर - भाग्यश्री/सलमान खान च्या मैने प्यार किया मधले कबुतर आणि "कबूतर जा, जा, जा" आठवले! :)

कबुतरे

कबुतरांप्रमाणेच कासवे, सॅलमन आणि स्थलांतर करणारे इतर पक्षीही आपापल्या मूळ ठिकाणी परततात असे दिसते. विशेषतः कबुतरे, घरे, रस्ते आणि इतर खाणाखुणा लक्षात ठेवतात असे म्हटले जाते.

कबुतरांची घाण कोण साफ करत असेल आणि एअर कुलिंग सिस्टीममधून त्याचा वास सर्वत्र पसरु नये म्हणून घेतलेली असावी त्या काळजीचे.

हे बाकी खरेच. कबुतरे घरात घुसून जी घाण घालतात त्यामुळे कबुतर या प्राण्याविषयी मला भयंकर अनास्था आहे. यांतही कबुतरांचा चिवटपणा दिसून येतो. विणीच्या हंगामात त्यांना कितींदा हुसकावून लावा, अतिशय स्थितप्रज्ञपणे पुढच्या वेळेस हजर होणारे हे पक्षी आहेत. या पक्ष्यांचे निरीक्षण केले असेल तर लक्षात येईल की एखाद्या आवाजाने कबुतरांचा थवा उडतो आणि आकाशात दोन-चार घिरट्या मारून पुन्हा आपल्या जागी स्थित होतो. यावरून हा पक्षी बथ्थड असावा असा अंदाज मी लहानपणी बांधला होता. अर्थात, त्याला काही बेस नाही. यामुळेच कबुतरखाने, मंदिरांच्या, मशिदींच्या बाहेर अव्याहत दाणे टिपणारी कबुतरे एका जागी चिवटपणे टिकून राहत असावीत असे वाटते.

विकीवरील हा लेख वाचण्याजोगा आहे.

बथ्थड

>>हा पक्षी बथ्थड असावा
सहमत. आमच्या येथील मांजरे ज्या सहजपणे कबुतरे पकडतात त्यावरून तरी तसेच वाटते.
अर्थात या स्वसुरक्षेबाबत बथ्थड असली तरी पत्ता शोधण्यात कदाचित स्मार्ट असावीत.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

छान

लेख आवडला.

चांगली माहीती

छान माहीती आहे! लेख आवडला.

कबुतरांची घाण

कुठेही असेल कदाचीत, पण अमेरिकेत pigeon dropping हा एक मोठ्ठा समजला जाणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अनारोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे तसे जर कुठे झाले तर ते साफ करायला येणार्‍या कंपन्या उद्योगधंद्यांचे खिसे पण साफ करतात...

बाकी त्यांच्या घरी परतून येण्याच्या स्मरणशक्तीवरून आता, "सुबह का भूला शाम तक लौट आए तो उसे भूला नही कहते... कबूतर कहते है!" असे म्हणले पाहीजे. ;)

-------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

... कबूतर कहते है

""सुबह का भूला शाम तक लौट आए तो उसे भूला नही कहते... कबूतर कहते है!" असे म्हणले पाहीजे. ;)"..

छान कोटी आहे!! :-)

 
^ वर