अशिक्षितांची कैफियत

फोर्थ डायमेन्शन 43

अशिक्षितांची कैफियत

शालेय शिक्षणाचे गुणगान गाणाऱ्या मित्रानो, तळागाळातल्यांना निरक्षरतेच्या गाळातून बाहेर काढू इच्छिणाऱ्या मसीहानो,
तुम्ही आमच्या आडरानात असलेल्या खेड्यात आला, काही दिवस आम्ही दिलेली भाजी-भाकरी गोड समजून खाल्ली, आम्हाला शिक्षणाचे वारेमाप स्तुती करणाऱ्या गोष्टी सांगितल्या, शिकण्याचे महत्व पटवून देणारी गाणी गायली, यामुळे - उशीरा का होईना - आम्हाला जाग आली. आपण शहरातून या आडवळणाच्या खेड्यात भरपूर पायपीट करून आला याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुम्ही, शहरातली मंडळी आमची काळजी घेत आहात याबद्दल मी आभारी आहे.
तुम्ही इतके दिवस जे काही सांगत होता ते मी लक्षपूर्वक ऐकत होतो. मला समजल्याप्रमाणे आमची निरक्षरता, आमचा हा अशिक्षितपणा या देशाला काळिमा आणणारा आहे. आमच्या या अशिक्षितपणामुळे तुम्हाला मान खाली घालावे लागते. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो.
आजपर्यंत तुम्ही जे काही सांगत होता ते सर्व मी मुकाट्याने ऐकत होतो. आज मात्र मला याविषयी थोडेसे बोलायचे आहे. आपण ऐकून घ्यावे. मी माझ्या अस्सल बोली भाषेत बोलल्यास तु्म्हाला कितपत कळेल याविषयी माझ्या मनात शंका आहेत म्हणून तुमच्याच भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतो.
1. एक लक्षात ठेवा की आम्ही पण आमच्या दृष्टीने अक्षरच गिरवत असतो. त्यासाठी आम्हाला तुमच्यासारखी खडू-पाटी वा पेन्सिल-पेपर लागत नाहीत. आमच्यासाठी पाटी म्हणजे ही काळी सुपीक जमीन. माझे हे नांगर, पेन्सिल वा खडू. आम्ही आमची अक्षरं या मातीत गिरवतो. या अक्षरातून तुमचे पोट भरते. तुम्ही विनातक्रार ते खात सुखाने राहता.
2. तुम्हीसुद्धा एकदा पेनऐवजी हातात कुदळ-फावडे घेऊन दाखवा. कागदाऐवजी शेतात गिरवून दाखवा. तुमच्या त्या कागदावर काय पिकत असते, हे मला गौडबंगाल वाटते. तेथे काही तरी पिकू शकेल का?
3. तुम्ही दूध देणाऱ्या गायी-म्हशी-शेळीपासून कायमचेच चार हात लांब राहता. परंतु त्याच वेळी तुम्हाला दूध पिणे आवडते. दही, लोणी, तुपाशिवाय तुम्हाला तुमचे जेवण बेचव लागते.
4. आपल्या दोघांच्या राहणीमानात जमीन-आसमानाइतका फरक आहे, हे जाणवते. आम्ही दिवस रात्र कष्ट करत काही उत्पादन करण्याच्या प्रयत्नात असतो. तुम्ही मात्र ते संपवून टाकण्याच्या मार्गावर असता. आम्ही आहे त्यात सुख-समाधानाने राहतो. तुम्हाला मात्र कायम कुठल्याही गोष्टीची तक्रार केल्याशिवाय चैन पडत नाही. समाधान मिळत नाही.
5. आमचं जिणं, जगणं, व इतरांशी वागणं यातून आम्हाला दिवसागणिक भरपूर काही शिकायला मिळतं. तुम्हाला मात्र प्रत्येक पावला-पावलाला कुणाची तरी मदत लागते. शिक्षक, सल्लागार, तज्ञ व्यावसायिक इत्यादींच्या मदतीशिवाय तुमचं पान हलत नाही.
6. तुमच पढिक शिक्षण पुस्तकांच्या पानात अडकून पडलेले असते. परंतु आमचे अस्तित्वच या मातीच्या श्रीमंत ज्ञानाशी निगडित असते.
7. तुमची शाळा तुम्हाला ज्ञानाचा भांडार वाटत असेल. परंतु आज या शाळा शिक्षणव्यवस्थेला बाजारी स्वरूप देण्यात, एका निगरगट्ट दलालासारखे पुढाकार घेत आहेत. शिक्षणाचा मूळश्रोत श्रमात आहे, याचाच आपल्याला विसर पडला आहे. त्या श्रमाचीच आम्हाला जीवनभर साथ मिळते, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो.
8. तुम्हाला माझ्यासारख्या कष्टकऱ्यांच्या (अ)ज्ञानाविषयी कीव वाटत असेल. परंतु आम्हीच खरेखुरे व सातत्याने प्रयोग करत असणारे कृषीसंशोधक आहोत. दुग्धव्यवसायातील कौशल्य आमच्याजवळ आहे. व आम्ही आमच्या बोलीभाषेचे तज्ञ आहोत.
9. खरे पाहता आमचे 'शिकणे' हेच अधिकृत 'शिकणे' असेल. आमच्या या शिकण्यासाठी कुणाचीच शिफारस लागत नाही. किंवा मी किती शिकलो हे सांगण्यासाठी कुठल्याही कागदी सर्टिफिकेटची गरज नाही.
10. खर शिकणं हे शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त राहत नसते. किंवा जीवन जगण्यासाठीचे मूलभूत शिक्षण अआइईच्या बाराखडीत वा आकड्यांच्या जंजाळात अडकून पडलेले नसते.
11. या विश्वातील कणा-कणात ज्ञानाचे कण असतात. शिक्षण कधीच संपत नसते. शिक्षण हा एक आयुष्यभराचा ध्यास आहे.
12. शिक्षणाच्या व्यापक स्वरूपाकडे पाहिल्यास ते एक वैश्विक आविष्कार आहे. आज शाळेत शिकवत असलेले एकसुरी, कंटाळवाणे, साचेबंद व ठराविक शिक्षण ज्ञानसंपादनाच्या बहुविध मार्गात अडथळा आणणारा ठरत आहे.
13. एक लक्षात ठेवा की एखाद्या खेड्यात कोंबडा आरवला नाही तर तेथे दिवस उगवत नाही, सकाळ होत नाही, असा समज करून घेवू नका. शिकणे हे सगळीकडे - जेथे शाळा नाही तेथेसुद्धा - शक्य होत असते. त्यासाठी एकही पैसा मोजावा लागत नाही.
14. मला अजून भरपूर शिकायचे आहे, हे प्रांजळपणाने कबूल न करण्याइतका हेकेखोर मी नाही.
15. माझ्या सुशिक्षित बांधवानो, तुम्हाला खऱ्याखुऱ्या शिक्षणाची व्याख्या कळली नाही, हे सांगण्यास मला दु:ख वाटते. त्यामुळेच कदाचित तुम्ही स्वत:ला सुशिक्षित म्हणून घेत असावेत.
16. खरे शिक्षण केवळ एखाद्याच्या वर्तनात वा त्याच्या बोलीभाषेत बदल केल्यामुळे मिळत नसते. शिक्षणाचा उद्देश माणसाची नीतीमत्ता उंचावणे व त्याला चारित्र्य संपन्न बनवणे हा असावा.
17. खरा सुशिक्षित माणूस वस्तुनिर्मितीच्या प्रत्यक्ष व्यवहारात सहभागी न होता इतर कशातही रुची दाखवणार नाही. स्वार्थपूरित व्यवहारातून आप्पलपोटेपणाने सगळे माझे, इतरांचे काही नाही असे कधीच म्हणणार नाही, वा त्याप्रमाणे वागणार नाही. स्वत:च्या गरजा व मागण्या अत्यंत कमी ठेवण्याकडे त्याचा कटाक्ष राहील.
18. खरा सुशिक्षित स्वत: काही खायच्या अगोदर इतर सहकाऱ्यांना मिळाले आहे की नाही याची विचारपूस करून त्यासाठी प्रयत्न करेल. सहकाऱ्यापासून तो लांब जाणार नाही. त्यांची काळजी घेत राहील.
19. दुर्बलांच्यासमोर तो कघीही हिरोगिरी करणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त सशक्त असल्यासमोर मान तुकवणार नाही.
20. सुशिक्षित माणसाला नैतिक वर्तनांसाठी बाहेरच्या रखवालदाराची गरज भासणार नाही. तो स्वतच आपल्याकडून काहीही वाईट घडणार नाही यासाठीचा वॉचमन असतो. सत्यापासून तो ढळणार नाही वा नैतिकतेचा अपवाद करणार नाही.
21. शिक्षण म्हणजे आपले काम मन:पूर्वक करणे. शिक्षण म्हणजे सत्यम्, शिवम्, सुंदरम् च्या शोधात असणे.
22.शिक्षण म्हणजे केवळ कौशल्य प्राप्ती किंवा बाष्कळ ज्ञान वा परीक्षा पास झालेल्याचे ढीगभर सर्टिफिकेट्स नव्हे.
23. परीक्षेच्या वेळी विचारलेल्या प्रश्नांची (अचूक वा मोघम) उत्तरं तीन तासात देण्यावरून शिकण्याचे मूल्यमापन करता येत नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकणे हे चालू असते व चालू असायला हवे.
24. त्यामुळे तुमच्या दृष्टीने अशिक्षित वाटणारा हा माणूस जास्त विश्वासार्ह असेल. विश्वासघाती सुशिक्षितापेक्षा हाच जास्त शिक्षित असेल.
25. तुमच्या शाळेतील शिक्षण मुलांमधील उपजत स्वभावांना मारक ठरणारा आहे. या वयात भरपूर खेळ व खुल्या मैदानात दंगा मस्ती करण्यासाठी ते मुख्यत्वे शाळेत येत असतात. परंतु तुम्ही मात्र त्यांना शाळेच्या बंदिस्त खोलीत जबरदस्तीने ठेवण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे शाळेत येण्यास ते नाखुष असतात.
26. असले शिक्षण मुलांना आवडत नाही, हे माहित असूनसुद्धा तुमची शाळा मित्रां-मित्रामध्ये स्पर्धा लावून परीक्षेच्या चाबकाची भीती दाखवते. त्यामुळे नवीन काही तरी शिकण्याच्या खऱ्याखुऱ्या उत्साहाऐवजी पाठ्यक्रम संपवण्यासाठीचा कृत्रिम उत्साह त्यांच्यात असतो. खरे काही शिकण्याऐवजी परीक्षेच्या टांगत्या तलवारीमुळे व त्या भीतीतून थोडीशी अक्षर ओळख होत असेल.
27. त्यामुळेच शाळेत काय शिकतो यापेक्षा शाळेतला हा विद्यार्थी वैरत्व व स्पर्धेच्या विषचक्रात अडकून पडलेला असतो. त्यामुळे प्रेम, विश्वास, बंधुत्व, सहकार इत्यादी सद्गुणांची पायमल्ली होत राहते. समता, संतृप्ती यांना शाळेच्या आवारातच गाडल्या जातात.
28. शाळा-कॉलेजमधून शिकून बाहेर पडलेल्यांना इतरांकडून काय घ्यावे व कसे घ्यावे एवढेच माहित असते. परंतु आपणही कुणाचे तरी देणे लागतो व इतरांनाही काही द्यावे याविषयी ते पूर्ण अनभिज्ञ असतात वा तसे सोंग वठवत असतात. इतरांकडून मिळालेल्या मदतीचे क्षुल्लकीकरण करण्यातच ते धन्यता मानतात. व तसे करत राहण्याची तार्किक कसरत कायम करत असतात. ही मंडळी आक्रमक असतात. त्याच्यात दया-माया नसते व संवेदनाविहीन असतात. इतरांनी भाजून ठेवलेल्या पोळीवर त्यांची नजर असते व त्यावर ते गुजराण करतात.
29. मी बोलतो, तुम्ही ऐकत रहा, मी इतरांचे मूल्य मापन करणार, तुम्हाला माझे विश्लेषण करण्याचा हक्क नाही. हीच त्यांची वृत्ती असते. या विश्वाचा मीच मध्यबिंदू आहे. हे जग माझ्याभोवती फिरते. इतर म्हणजे किस झाडकी पत्ती! इतराच्या पिकांची नासधूस, वाताहत झाली तरी चालेल. परंतु माझे शेत भरपूर पाणी पिऊन हिरवेगार असायला हवे. असेच या सुशिक्षितांना वाटत असते.
30. आपल्या समाजाची खरी समस्या कष्टकरी अशिक्षित आहेत हे नसून समाजातील सुशिक्षितांमध्ये श्रमाविषयी सुप्त ( वा उघड) घृणा आहे. विशेषकरून शारीरिक श्रमाविषयी जास्त. ते श्रमाचा तिटकारा करतात. ऐषारामी (आळशी) जीवन हेच सुखी जीवन असे त्यांना वाटते.
31. माझ्या मित्रांनो, अशिक्षितांमधील निरक्षरतेचे उच्चाटन करत असतानाच सुशिक्षितांमधील श्रमासंबंधीच्या या चुकीच्या भावनेचा पण उच्चाटन करायला विसरू नका. शैक्षणिक, बौद्धिक, प्रशासकीय व्यवस्थेतील विनाश्रम कमविण्याच्या वृत्तीला वेळीच वेसण घालावे ही माझी कळकळीची विनंती आहे.
32. सुशिक्षितांच्या मते जे काही कष्ट घ्यायला हवे होते ते सर्व कष्ट परीक्षा पास होत असतानाच आम्ही पूर्वीच घेतलेले आहेत. आता कष्ट करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता बुद्धी खर्ची घालण्यासारखे काहीही राहिले नाही.
सुशिक्षितांकडेच भाषणाची मक्तेदारी असलेल्या या काळात माझ्यासारख्या अशिक्षितानी बडबड करणे योग्य नसेलही. तरीसुद्धी आपल्याला माझ्या या बडबडीचा राग येणार नाही याची मला खात्री आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

28. शाळा-कॉलेजमधून शिकून बाहेर पडलेल्यांना इतरांकडून काय घ्यावे व कसे घ्यावे एवढेच माहित असते. परंतु आपणही कुणाचे तरी देणे लागतो व इतरांनाही काही द्यावे याविषयी ते पूर्ण अनभिज्ञ असतात वा तसे सोंग वठवत असतात. इतरांकडून मिळालेल्या मदतीचे क्षुल्लकीकरण करण्यातच ते धन्यता मानतात. व तसे करत राहण्याची तार्किक कसरत कायम करत असतात. ही मंडळी आक्रमक असतात. त्याच्यात दया-माया नसते व संवेदनाविहीन असतात. इतरांनी भाजून ठेवलेल्या पोळीवर त्यांची नजर असते व त्यावर ते गुजराण करतात.

विचार एकदम पटले. शाळा-कॉलेजमधे शिकायला पैसे मोजावे लागतात व त्या नंतर इतरांकडून काय घ्यावे व कसे घ्यावे ह्याची माहिती मिळते.

खरे आहे

29. मी बोलतो, तुम्ही ऐकत रहा, मी इतरांचे मूल्य मापन करणार, तुम्हाला माझे विश्लेषण करण्याचा हक्क नाही. हीच त्यांची वृत्ती असते. या विश्वाचा मीच मध्यबिंदू आहे. हे जग माझ्याभोवती फिरते. इतर म्हणजे किस झाडकी पत्ती! इतराच्या पिकांची नासधूस, वाताहत झाली तरी चालेल. परंतु माझे शेत भरपूर पाणी पिऊन हिरवेगार असायला हवे. असेच या सुशिक्षितांना वाटत असते.

30. आपल्या समाजाची खरी समस्या कष्टकरी अशिक्षित आहेत हे नसून समाजातील सुशिक्षितांमध्ये श्रमाविषयी सुप्त ( वा उघड) घृणा आहे. विशेषकरून शारीरिक श्रमाविषयी जास्त. ते श्रमाचा तिटकारा करतात. ऐषारामी (आळशी) जीवन हेच सुखी जीवन असे त्यांना वाटते.

32. सुशिक्षितांच्या मते जे काही कष्ट घ्यायला हवे होते ते सर्व कष्ट परीक्षा पास होत असतानाच आम्ही पूर्वीच घेतलेले आहेत. आता कष्ट करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता बुद्धी खर्ची घालण्यासारखे काहीही राहिले नाही.

सुप्पर...एकदम पटलं. काही गोष्टी रोज अनुभवतो.. (सुशिक्षितांची वैचारिक दिवाळखोरी असा शब्दप्रयोग कुठेही न केल्याबद्दल धन्यवाद. कान किटलेत तेच तेच शब्द ऐकून. :-))

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

ते समर्थ आहेत!

कैफियत मांडणारा अशिक्षित खूपच विद्वान् दिसतो. अशा विद्वानांना शहरात दिलं जाणारं शिक्षण देणं निरर्थक आहे. तेव्हा या विद्वान् समाजाची काळजी सुशिक्षित शहरी समाजानी करण्याचं कारण नाही. ज्या तर्‍हेचं शिक्षण या शहराबाहेरील समाजाला मिळत आहे (मुद्दा क्रमांक १ ते ८) ते त्याला स्वतःची काळजी स्वतः घेण्यास समर्थ बनवील असं वाटतं.

उपयुक्त शिक्षण

शिक्षण उपयुक्त असले पाहिजे. आपल्याकडचे किंवा बर्‍याच ठिकाणीचे शिक्षण हे सरळ कामाशी संबंधित नसते. आणि वाईट असे, की ही गॅप आहे हे बरेच उशीरा लक्षात येते.
तरी शालेय शिक्षणाची (मूलभूत विषय - गणित, विज्ञान आणि भाषा) यांची गरज तर आहेच. पण ते कसे द्यावे याच्या पद्धती प्रचंड वेगळ्या असल्या पाहिजेत हे मान्य होण्यासारखेच आहे.

लय भारी!

प्रत्येकाने ठराविक गोष्टी ठराविक पद्धतीनेच शिकाव्यात तरच तो सुशिक्षित ह्या विचारसरणीला उभा छेद देणारे मुक्तक आवडले :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

मोजक्या शब्दात व्यवस्थित समाचार

फार सुंदर आणि चाबूक-फटके मारले आहेत तुम्ही. मोजक्या शब्दात व्यवस्थित समाचार घेतला आहे.

वाचतांना विचार करत होतो, की असेच मनातले विचार एखाद्या "शिकलेल्या" माणसाने (त्यांच्या दृष्टीने असलेल्या) अशिक्षिताला जर शिक्षणाचे महय्व पटवून देण्याकरता मांडले असते तर् ते खूप शब्दबंबाळ व त्या पामराला समजूच नये अशा शब्दात मांडले असते.

फारच बाळबोध

शिक्षण हे केवळ लेखी, पढीक नसत या मुख्य कल्पनेला कोणाचाच विरोध नसावा इतकी ती साधी आणि सोपी आहे. पण काळ्या मातीत रोज अगदी गावरान प्रेमाने डोळे खुपसून बसल तरी त्यातले जीवाणु दिसण्यासाठी सूक्ष्मदर्शीच लागतो. आणि सूक्ष्मदर्शी शोधायचा असेल तर काही सुशिक्षितांना संशोधन करणं आवश्यकच आहे. सर्वांना सरसकट शेतात नेण्याचे प्रचंड अयशस्वी प्रयत्न चीनमध्ये झालेले आहेत.

"एक होता कार्व्हर" जर वाचल असेल (नसल्यास वाचा - अप्रतिम आहे) तर त्यात कार्व्हरला याच पवृत्तीशी संघर्श दयावा लागला होता. अति उत्पादनाने नापीक झालेल्या जमिनीला नत्राची गरज आहे हे त्याने कितीही कानी कपाळी सांगितलं तरी याच प्रवृत्तीने (जरा कमी नम्रपणाने, अर्थातच !) त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. एका वर्शात उत्पादन दहापट करून दाखवल्यावर मग आपोआप त्या "चार बुकं पढूलेल्या कालच्या पोराकडे" "गेली वीस वर्शं काळ्या मातीत घाम गाळणारे" शेतकरी शिकायला गेले. जवळपास वाळवंट झालेल्या अलाबामाच्या मातीला नवं जीवन देण्यात त्याचा मोठा हातभार लागला.

चाबूक-फटके, समाचार वगैरे ऐकायला चांगलं वाटतं, पण मुख्य गरज आहे ती प्रत्येकानेच आपल्या ज्ञानाचा गर्व सोडून जिथे जे उपयुक्त ज्ञान मिळेल तिथून ते मिळवण्याची आणि वापरण्याची. मग ते पुस्तकात मिळो वा शेतात.

असेच काही

"केवळ साक्षर/नागर म्हणून लोकांनी असाक्षरांना उपदेशाचे डोस पाजू नयेत, " अशा प्रकारच्या मूळ लेखातील भावनेशी सहमत आहे. अधोरेखित वाक्यावेगळा कुठलाही बोध मला पहिल्या एक-दोन परिच्छेदांनंतर मिळाला नाही. म्हणून लेखन बाळबोध झाले आहे, किंवा अतिरेकी लांबले आहे, असे वाटते.

१. बाजारभाव वाचता येत नाही आणि कर्जपत्रे वाचता येत नाहीत, त्यांनी काळ्या मातीत नांगराने कितीही सुरेख कित्ता गिरवला तरी काय? ज्या नागर-साक्षर लोकांना कानपिचक्या दिल्या जात आहेत, ते ढोपरांनी खणून नेणार. स्वतःचे नुकसान होते, त्याबद्दल कैफियत सांगायची, त्याऐवजी लेखातील निरक्षर "साक्षर नसूनही मातीत लिहितो" अशी प्रौढी मिरवतो आहे. स्वतःचा तोटा केल्याची शाबासकी मागणारा कारागीर ... येथे कैफियतीचा नेम चुकला आहे असे वाटते.

२. "तुम्ही कुदळ फावडे घेऊन दाखवा". बरे फावडेवालेदादा - तुम्ही सुया-धागा घेऊन कपडा विणून-शिवून दाखवा. विजेचे सर्किट बनवून दाखवा. कारागीर असणे आणि निरक्षर असणे यांच्यात अवश्य-संबंध असा काय आहे? छे - कुठलाही संबंध काय आहे?

३. "गायीपासून दूर दूध-दुभते खाता..." देशावरच्या निरक्षरदादा! तुम्हाला मीठ बनवता येत नाही. मात्र मीठभाकर मात्र खाता... उत्पादनाच्या बाबतीत अनेक विशेष क्षेत्रे आहेत. सगळ्या आवश्यकतांची स्वतःहून निर्मिती करणारा अगदी-अगदी क्वचित सापडेल. याचा साक्षर-निरक्षरतेशी संबंध काय आहे?

४. "आम्ही सुखासमाधानाने राहातो" - मग भूकबळी, आत्महत्या, मार्‍यामार्‍या, या सर्व बातम्या खोट्या म्हणायच्या का?...

वगैरे... अशा प्रकारे ही सर्व कैफियत "रोमँटिक" कल्पनाविलासी नगरवासीयाच्या सुपीक डोक्यातून निघाल्यासारखी भासते आहे.

पुनश्च : सामान्य नगरवासी साक्षरांनी देशी लोकांना हिणावणे चूक आहे, आंधळे आहे, आणि अमानुष आहे, या लेखातील भावनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मात्र लेखातील मुद्दे मला प्रामाणिक वाटत नाही - म्हणजे खर्‍याखुर्‍या निरक्षराला काय टोचते त्या भावनांचे हे यथार्थ वर्णन वाटत नाही. आणि अर्थकारणाच्या दृष्टीने ही बिंदुगामी टीका वाटत नाही.

तर्काचे तेलही गेले भावनांचे तूपही गेले.

 
^ वर