पुरंदरदास

पुरंदरदास (१४८४ ते १५६४)

कर्नाटकातील एक थोर संत कवी. याचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर किंवा हंपीजवळील पुरंदरगड नावाच्या गावात झाला असावा. याचे वडील एक मोठे सराफ होते. वडीलांनी ठेवलेले नाव श्रीनिवास, तिमप्पा वा शिवप्पा. लहानपणी संस्कृत व कन्नड या भाषांमध्ये अध्ययन केले व शास्त्रीय संगीताचेही शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवले.सरस्वती नावाच्यासुशील मुलीशी लग्न झाले व पाच अपत्येही झाली. वडीलांच्या मृत्युनंतर व्यवसाय स्वत:च्या हुशारीने खूप वाढवला. पण अतिशय कंजुष असल्याने कोणालाही काही दानधर्म करत नसे. एकदा पांडुरंगाने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन, त्याच्या पेढीवर जाऊन,मुलाच्या लग्नाकरिता द्रव्य मागितले. तिमप्पाने त्याला हाकलून दिले. मग तो ब्राह्मण सुशीलेकडे आला. पतीच्या परवांगीशिवाय घरातील काही देणे शक्य नसल्याने तीने आपली नथ ब्राह्मणाला दिली. ती घेऊन तो तिमप्पाच्या पेढीवर आला व नथीचे पैसे मागितले. तिमप्पाला संशय आला पण त्याने पैसे देऊन नथ आपल्या तिजोरीत ठेवली. घरी येऊन आपल्या बायकोला नथ कोठे असे विचारल्यावर ती अतिशय घाबरली व जीव द्यावा म्हणून तिने एका पेल्यात विष घेऊन तो पेला ओठाला लावला. तो तिला त्या पेल्यात आपली नथ दिसली. तिमप्पाने ती नथ पाहिल्यावर तो पेढीवर गेला आणि पहातो तो तिजोरीत नथ नाही. त्याच्या लक्षात आले की देवच ब्राह्मणाचे रूप घेऊन आला होता. आपण परमेश्वराला रिक्त हस्ताने पाठवले याचा त्याला इतका धक्का बसला की त्याने विरक्ती येऊन आपली सर्व मालमत्ता गरिबांना दान केली व भिक्षेची झोळी घेऊन तो विजयनगरला आला.

तेथे त्याने व्यासरायांकडून वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. व्यासरायांनी त्याचे नाव पुरंदर विठ्ठल ठेवले पण तो पुरंदरदास म्हणूनच ओलखू जाऊ लागला.विजयनगरमध्ये रोज सकाळी रस्त्यावर गोड व सुरेल आवाजात भक्तीगीते गाऊन तो भिक्षा गोळा करे. स्वत:च रचलेल्या या पदांना तो स्वत: चाल लावी व त्याची मुले त्याला साथ करत. रसाळ व हृदयस्पर्शी अशी ही पदे फार लोकप्रिय झाली. राजा कृष्णदेवरायाने त्याच्याकरिता तिरुपतीला एक मंडप बांधला. तो दासमंडप म्हणून आजही प्रसिद्ध आहे.

पुरंदरदासाने भारतभर फिरून तीर्थयात्रा केली. त्याचे पंढरपूरला दीर्घ वास्तव्य होते.तेथील एका खांबाला दासरस्तंभ (गरुडस्तंभ) असे त्याच्या स्मरणार्थ म्हणतात.महाराष्ट्रात नामदेवांनी लाखो पदे रचली असे म्हणतात त्याचप्रमाणे पुरंदरदासाने चार लक्ष पंच्याहत्तर हजार पदे रचली असे म्हणतात पण आज काही हजार पदेच उपलब्ध आहेत. कर्नाटकात भक्तीधर्म लोकप्रिय करण्यात या पदांचा मोठा भाग आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांनी जी कामगिरी बजावली तीच कर्नाटकात पुरंदरदासाने बजावली. निस्सिम भक्ती, उत्कट प्रेम व ईश्वरदर्शनाची आत्यंतिक तळमळ त्याच्या काव्यात दिसून येते. तुकारामांप्रमाणे तो बहुश्रुत व व्यवहारी होता व त्याचे पडसाद त्याच्या काव्यात आढळून येतात. त्याने तुकारामांसारखाच पाखंड, ढोंगीपणा, अंधश्रद्धा, जातीभेद यांचा कडक निषेध केला आहे. विष्णुभक्त असूनही त्याने सर्व देवतांच्या स्तुतीची पदे रचली आहेत.मध्वाचार्यांच्या द्वैतमताला अनुसरूनच त्याची रचना आहे.

तो महान संगीतकारही होता. त्याला कर्नाटकी संगीताचा पितामह म्हणतात.त्याची सर्व पदे रागबद्ध आहेत.ताल-लयबद्ध व गेय असल्याने त्याच्या लोकप्रियतेत आजही कमतरता आलेली नाही.पदांचे कीर्तने, सुळादी व उगाभोग असे तीन विभाग केले आहेत. कीर्तने ही भक्तीगीते असून त्यांत पल्लवी,अनुपल्लवी व चरण असे भाग असतात. संगीतशास्त्राच्या दृष्टीने ती सर्वोत्कृष्ट आहेत. सुळादींची रचना अधीक शास्त्रीय व कठीण आहे. उगाभोग हा प्रकार अगदी साधा आहे. त्यागराज, दीक्षितार, शामशास्त्री आदींनी पुरंदरदास हा आदर्श मानला.

(उपक्रमवरील एखादा कन्नड जाणकार पुरंदरदासाची एखादी रचना भाषांतरासकट देऊ शकेल काय ?)

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

आहेत ना!

उपक्रमवरील एखादा कन्नड जाणकार पुरंदरदासाची एखादी रचना भाषांतरासकट देऊ शकेल काय ?

उपक्रमावर कन्नड जाणकार श्री प्रभाकर नानावटी आहेत. त्यांनी अरविंद गुप्ता यांच्या टॉईज फ्रॉम ट्रॅश साठी २-३ मिनिटच्या व्हिडिओचे कन्नड भाषांतर व स्वर देण्याचे काम केले आहे.
प्रकाश घाटपांडे

वा - छान माहिती

वेगवेगळ्या प्रांतातील संतांबद्दल माहिती देण्याची लेखमाला आवडते आहे.

पुरंदरदासांनी कर्नाटक संगीतात मूलगामी कार्य केले आहे, आणि त्यांची भक्ति-पदे आजही लोकप्रिय आहेत. त्या पदांचीही ओळख उपक्रमींनी करून द्यावी - लेखातील आवाहनाला माझाही दुजोरा आहे.

पुरंदरदासाचे पद

पुरंदरदासाने घातलेले (जीवनाच्या निरर्थकतेविषयी!) कोडे
काट्याच्या टोकावर दोन तळे बांधली
दोन रिकामी, व एक भरले नाही ||
न भरलेल्या तळ्याला तीन गवंडी आले
दोघे लंगडे, व एकाला पाय नाही ||
पाय नसलेल्या गवंड्याला तीन म्हैस दिले
दोन दूध न देणारे, व एकाला वासरू नव्हते ||
वासरू नसलेल्या म्हशीला तीन सोन्याचे नाणे मिळाले
दोन खोटे, व एक चालत नाही ||
न चालणाऱ्या नाण्यासाठी तिघे आले
त्यात दोन आंधळे, व एकाला दिसत नव्हते ||
न दिसणाऱ्याला तीन गावांचे दान मिळाले
दोन गावं पडकी, व एका गावात शेतकरीच नव्हता ||
शेतकरी नसलेल्या गावी तीन कुंभार आले
दोघांचे हात कापलेले व एकाला हातच नाही ||
हात नसलेल्या कुंभारानी तीन मडकी भाजली
दोन फुटके व एकाला तळच नव्हते ||
बिनतळाच्या मडक्यात तीन तांदळाचे दाणे टाकले
दोन अर्धवट शिजले व एक शिजलाच नाही ||
न शिजलेल्या शितासाठी तीन नातेवाइक आले
दोघे खायला तयार नव्हते व एकाला भूक नव्हती ||
या सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे
इतर कुणालाही ते कळणार नाही ||

ज्ञानेश्वर

साधारणतः अश्याच अर्थाची एक रचना संत ज्ञानेश्वर यांची आहे, असे वाटते. बहुधा "काट्याच्या अणिवर वसे तीन गांव....." (चुभुद्याघ्या)

काट्याच्या अणीवर

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें दोन ओसाड एक वसेचिना !
वसेचिना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेचिना !
घडेचिना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेचिना !
भाजेचिना त्यांत रांधले तीन मुगे दोन हिरवे एक शिजेचिना !
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेचिना !
जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फ़ळेचिना !
फ़ळेचिना तीला झाले तीन टोणगे दोन मेले एक जगेचिना !
जगेचिना त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेचिना !
चालेचिन तिथे आले तीन पारखी दोन आंधळे एका दिसेचिना !
दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेचिना !
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद गुरुवाचून कळेचिना!
ज्ञानेश्वर महाराजांचे हे पद मागे उपक्रमवर दिले होते. त्यातील व पुरंदरदास यांच्या पदातील साम्य विलक्षण आहे की नाही ?
दुस‍या ठिकाणी आपण महाराजांचे एक पद व राजस्थानातील विराणी यांचेही साम्य पाहिले होते. धन्यवाद, नानावटीजी !
श्री.सुनील यांनी बरोबर आठवण ठेवली आहे.

शरद

विलक्षणच

पदातील साम्य विलक्षण आहे की नाही ?

हे पद ज्ञानेश्वरांचेच की नंतर त्यांच्या चाहत्यांनी (?)त्यांच्या साहित्यात घुसडले. तुकारामांच्या साहित्याबाबत असे घडल्याचे ऐकले आहे म्हणून मनाला शंका आली इतकेच. चुभूदेघे.

हीच कथा आणखी एका मौखिक परंपरेत

संदर्भ : ए. के रामानुजन यांनी संकलित केलेल्या "Folktales from India"
प्रकाशक : पॅनथियॉन प्रकाशन, न्यू यॉर्क; प्रकाशनवर्ष : १९९१

संग्रहात सांगितलेला मूळ स्रोत : मिर्झा महमुद बेग याने संकलित केलेले "North Indian Notes and Queries"; पृष्ठ १३४-१३७; प्रकाशनवर्ष १८९४

या कथेत सांगितलेली माळ अशी :
१. काट्याच्या टोकावर
२. तीन टाक्या, दोन कोरड्या एकात पाणी नाही
३. त्यात तीन कुंभार, दोन थिटे एकाला हात नाहीत
४. त्याने केली तीन मडकी, दोन फुटकी, एकाला तळ नाही
५. त्यात तीन तांदूळ, दोन कच्चे एक शिजला नाही
६. तो खायला तीन पाहुणे, दोन रुसले, एक शांत होईना
७. त्याला मारली तीन खेटरे, दोन हुकली, एक लागले नाही
येथून कथा बदलते. पाहुण्यामागे यजमान लागतो.
यजमानावर हत्ती धावून येतो. हत्तीला त्याने गुद्दे मारले. घाबरून हत्ती झाडावर चढला...
(हत्तीपासून बदलत-बदलत कथा एका राजाची होते...)
जलप्रलयात वाचण्यासाठी राजा-प्रजा मिळून एका मोठ्या कलिंगडात लपतात. कलिंगड नदीच्या पुरात वाहाते.
मासा कलिंगड गिळतो.
माशाला बगळा गिळतो.
बगळ्याला मांजर गिळते.
मांजराला कुत्रा गिळतो.
मांजराला कुत्रा गिळतो.
कुत्र्याला खायला एक बंजारी लमाण पकडतो.
कुत्र्याच्या पोटात त्याला मांजर सापडते.
मांजराच्या पोटात बगळा सापडतो.
बगळ्याच्या पोटात मासा सापडतो.
माशाच्या पोटात कलिंगड सापडते.
ते चिरता राजा-प्रजा मुक्त होतात.
राजा लमाणाला शेती आणि पैसे देतो.

 
^ वर