साहित्य आणि समाजातील संबंध, कितपत खरे ?
साहित्य ही जेव्हा कला मानली जाते तेव्हा तिच्या उपयोगितेचा मुद्दा बाद ठरवला जातो. परंतु साहित्यामधील समाजवादी, जीवनवादी आणि तत्सम विचारधारा माननारे साहित्याला जीवनापासून अलग मानन्याला नकार देतात. साहित्य आणि समाज या विषयात समाजाच्या अंगाने साहित्याचा आणि साहित्याच्या अंगाने समाजाचा अशा दोन पद्धतींनी विचार केला जातो. यामध्ये साहित्य हे समाजव्यवहारांना प्रभावित करते हा समाजवादी साहित्यिकांचा आवडता सिद्धांत आहे. किंबहूना साहित्य हे समाजाला वळण लावते असेही म्हटले जाते. या विधानांची सिद्धता करणारे संशोधन करून कुणी पदवी मिळवली की नाही याची माहिती नाही. परंतु अनेक चर्चा प्रसंगी या विचारांची मांडणी करणारे अनेक विचारवंत आढळतात. पण थोडा खोलवर विचार करु पाहता साहित्य हे समाजावर कितपत परिणाम करते ही या बद्दल शंका व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. तिच गोष्ट समाजव्यवहारांचा साहित्यावर होणारा परिणाम किती या प्रश्नाची आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो हे विधान ही असेच फसवे आहे. मुळात वास्तवचित्रण हा साहित्यगुण मानायलाच साहित्यसमीक्षेत स्पष्ट नकार दिला जातो. सैद्धांतिकच्या पातळीवर साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधाच्या बाबतीत निश्चितपणाचा अभाव आहे. तरीही समाजव्यवहारावर साहित्य काही परिणाम करते किंवा करु शकते हे विधान निश्चितपणे नाकारता येते. अर्थात हे विधान आधूनिक मराठी वाङ्मयाला अधिक चपखलपणे लागू पडते. ज्या साहित्याने समाजावर काही परिणाम केला असेल त्या साहित्याला साहित्य म्हणून मान्यता देण्यास प्रस्थापित साहित्यजगत खळखळ करते हे ही ओघाने आलेच. स्वांतंत्र्याची स्फुर्तीगीते असो की कष्टकऱ्यांची गीते ज्यांनी जगण्याला नवा हूरुप दिला ती काव्ये म्हणून मात्र मान्यता पावू शकती नाहीत. मराठी साहित्यात फडके, खांडेकर यांच्या साहित्याने कुणाच्या जीवनव्यवहारावर मनोरंजनापलिकडे जाऊन प्रभाव टाकला आणि तो एकूण मराठी भाषक समाजाच्या प्रमाणात किती होता या प्रश्नाच्या उत्तरातच समाज आणि साहित्य यांच्यात रेखाटला गेलेला संबंधांचा बडेजाव फुकाचाच असल्याचे सत्य दडलेले आहे. मराठी साहित्याला नवे वळण देणारे त्याला अभिनव स्वरुपात प्रस्तुत करणारे म्हणून ज्या मर्ढेकर नि नेमाडय़ांच्या साहित्याचा उल्लेख केला जातो ते महाराष्ट्राच्या समाजव्यवहारांचे परिणामस्वरुप किती होते आणि जागतिक साहित्यप्रवाहाच्या आणि जागतिक घडामोडींच्या किती छायेखाली होते या ही प्रश्नचाचे उत्तर साहित्य आणि तत्स्थलकालिन समाजाच्या संबंधातला दूरावा सांगणारेच आहे. आज बहूतांशी महाराष्ट्राचा समकालिन साहित्याशी संबंधच राहिलेला नाही. वृत्तपत्रे, चटपटीत मजकूर, चकचकीत पाने आणि चमचमीत छायाचित्रे यांनाच आता वाचणारे नि पाहणारे शिल्लक आहेत. समाजाच्या साहित्यव्यवहाराची चिंता वाहणाऱ्या तथाकथिक धूरीणांनी जो साहित्यव्यवहार अख्ख्या महाराष्ट्राचा म्हणून जोपासला आहे तो खरेच तसा आहे का याचा विचार आता व्हायला हवा. पुलं, अत्रे किंवा तत्सम साहित्यिकांचे नाव माहित नाही असे घर महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही असल्या टाईपची वाक्ये म्हणजे तद्दन खोटारडेपणा आहे हे आपण कधी मान्य करणार. महाराष्ट्राच्या घराघरात आढणाऱ्या पुस्तकात फार तर वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या भुलथापा मारणाऱ्या चोपडीचा उल्लेख तेवढा करता येईल. याउप्पर महाराष्ट्राच्या मनावर आणि एकूणच जीवनव्यवहारांवर ज्ञानदेव, तुकारामांच्या मध्ययुगीन साहित्याने आणि रामायण, महाभारता सारख्या पौराणिक कथांनी काय जो परिणाम केला तेवढाच साहित्य आणि समाजाचा संबंध...... बाकी काय ते चर्चेतून पूढे येईलच.
Comments
रोचक पण ...
लेख रोचक आहे. पण लेखक दोन स्पष्ट विधाने करतात :
या ठामपणाविषयी मला शंका वाटते. लेखात अनेक रास्त प्रश्न उठवले आहेत, उदाहरणार्थ : समाजव्यवस्थेवर काय परिणाम झाला? पण झाला नाही असे अध्याहृत आहे. परिणाम झाला की झाला नाही याबद्दल निकष मात्र कुठलेच नाहीत.
"आरसा बद्दल" : गेल्या शतकातल्या वेगवेगळ्या खंडांतील साहित्य वाचता काही फरक आहे असे मला तरी जाणवते - म्हणजे गडकर्यांची नाटके, अत्र्यांची नाटके, पु ल देशपांडे यांची नाटके, ही केवळ नाटककार वेगवेगळे व्यक्ती म्हणूनच भिन्न नव्हेत - नाटककार वेगवेगळ्या कालखंडातले असल्याचेही जाणवते. ललित साहित्याचे ध्येय "रंजन करणे" असे असते, तथ्यदर्शन हे ध्येय दुय्यम असते - बाबासाहेब जगताप यांचे मत "मुळात वास्तवचित्रण हा साहित्यगुण मानायलाच साहित्यसमीक्षेत स्पष्ट नकार दिला जातो" काही प्रमाणातच मान्य करावेसे वाटते.
परंतु रंजन करताना रसिकाच्या वास्तवाशी काही संदर्भ राहिला, तरच साहित्यिकाला यश मिळू शकते (असे मला वाटते). वेगवेगळ्या कालखंडातील नाटककारांमधला फरक बघता ही गोष्ट दिसते. एकच प्याल्यातल्या उदात्त-गलित सिंधूसारखी स्त्री कुठल्या आधुनिक नाटकात दिसत नाही. आणि "चारचौघी" मध्ये चितारलेल्या चार स्त्रियांसारखी पात्रे गडकर्यांच्या काळच्या नाटकांत दिसत नाहीत.
सिद्धांत काही का म्हणेना, मला तरी काही प्रतिबिंबे आहेत, असे निश्चित वाटते.
समाज बदलतो आहे, आणि साहित्य बदलते आहे. कार्यकारण भावाबद्दल वरील लेखात केलेले प्रश्न रास्त आहेत. पण संबंधच नाही असे मला पटवलेले नाही.
महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गात दर्जेदार साहित्याबद्दल हवे तितके ममत्व नाही याबाबत लेखक विषाद व्यक्त करतात. तो ठीकच आहे. दर्जेदार साहित्य अधिकाधिक वाचले जावे, ही त्यांची कळकळ स्तुत्य आहे.
साहित्य आणि समाज
कोणत्याही अभिजात साहित्याचा समाजावर अगदी अस्पष्ट(सटल्) असा परिणाम होतच असतो असे मला वाटते.हा परिणाम ताबडतोब दृष्टोत्पत्तीस कदाचित येणार नाही. परंतु काही कालानंतर् हा परिणाम जाणवतोच. एक उदाहरण देतो. आचार्य अत्र्यांचे 'तो मी नव्हेच" हे नाटक घ्या.
चन्द्रशेखर
साहित्याचे प्रयोजन काय !
चर्चाप्रस्ताव चांगला आहे. काही विचार 'गृहित' धरुन मांडणी केलेली दिसते. त्यामुळे प्रतिसाद लिहिण्यास खूप वाव आहे, असे वाटते. संधी दिल्याबद्दल आभारी.
पदवीपर्यंतच्या मराठी विषय शिकणार्या विद्यार्थ्यांना साहित्यशास्त्रातील 'साहित्याचे प्रयोजन काय' हे प्रकरण शिकवल्या जाते. प्रत्येक वस्तूच्या निर्मितीमागे कोणता ना कोणतातरी उद्देश असतो. तेव्हा साहित्यनिर्मितीच्या पाठीमागेही काहीतरी उद्देश असलाच पाहिजे. भारतीय,पाश्चिमात्य,समीक्षकांच्या विचारांच्या मत-मतांतरे याचा आढावा घेऊन यश,अर्थ,अशुभ निवारण,व्यवहार विज्ञान,उपदेश,पलायनवाद,इच्छापुर्ती,जिज्ञासा,भावनांचे विरेचन,आनंद,प्रचार,अनुभवाची समृद्धी,आत्माविष्कार, इत्यादी. साहित्याचे प्रयोजन सांगता येतात. पण याचा समाजजीवनाशी संबंध असतो का ? तर त्याचा समाजजिवनाशी सबंध असतोच असे माझे मत आहे. एखाद्या लेखकाकडे प्रतिभा असली तरी त्याला वास्तवतेचाही अभ्यास असला पाहिजे, तरच त्याला उत्तम लेखन करता येईल असे वाटते. एखाद्या लेखकाला एखादे पौराणिक नाटक लिहायचे असेल तर त्याला तो काळ, संस्कृती, सामाजिक जीवन,धार्मिक परिस्थिती, भाषा, याचे ज्ञान असले पाहिजे नुसते कल्पनेच्या भरारीवर ते लेखन उत्तम ठरणार नाही.
साहित्य हा समाजाचा आरसा असतोच हे विधान फसवे वाटत नाही. कारण साहित्यामधील असे अनेक साहित्यप्रवाह सांगता येतील ज्यात समाजातील वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. जसे, दलित साहित्य,ग्रामीण साहित्य,अदिवासी साहित्य,स्त्रीवादी,इत्यादी. त्यातही कल्पना असतील पण वरील काही साहित्यप्रवाहातून मला वाटते की, ते समाजातील काही एक वास्तवचित्रण करण्याचा प्रयत्न करतात.
असे म्हटल्या जाते की, काय सांगायचे ? याचा 'कसे सांगायचे' याच्याशी जसा सबंध आहे तसा तो 'कुणाला सांगायचे' याच्याशीही संबंध असतो. सत्यशोधक साहित्यिकांना बहुजनांशी बोलायचे होते. म्हणून त्यांनी बहुजनांच्या भाषेतून अधिक वास्तविक लेखन केले आणि ते समाजाच्या पचनी पडले असे दिसून येते. उदाहरण सांगायचे तर, बाबुराव बागुलांच्या 'जेव्हा मी जात चोरली होती' मधील काही कथांमधून 'जात' या व्यवस्थेला कशी आडवी येते त्याचे चित्रण त्यांच्या कथांमधून वाचायला मिळते. तेव्हा त्यांच्या लेखनातील अनुभव काही नवीन नव्हता, तो अनुभव समाजात होताच ते लेखनामुळे सर्वच वाचकांपर्यंत पोहचले. याचाच अर्थ असा की, समाजातील चित्रण साहित्यातून पाहावयास मिळतात. साहित्य हा समाजाचा आरसा असतो.
पुल,आणि त्यांचे समकालीन लेखकांचे लेखन वाचणारे कोण होते. अशा वाचकांसाठी त्यांनी लिहिले असे वाटते. काही एक मध्यमवर्गीय जाणिवा त्यांच्या लेखनातून येत होत्या असे वाटते. कारण वाचणारा वर्ग त्या अनुभवांसहित मनोरंजनासाठी वाचत होता. विद्रोह,समता,सामाजिक जाणिवा असे लेखन फार उशिरा वाचकापर्यंत पोहचले. स्वातंत्र्यानंतर बहुजनांमधे शिकण्याची जाणीव निर्माण झाली. शिकलेली पिढी आपल्या भाव-भावना, अनुभव चितारु लागली होती. आणि तो अनुभव समाजातील तळागाळातून येणारा, एक वेगळा अनुभव होता असे वाटते.
म.फुले,डॉ.आंबेडकर,यांच्या प्रेरणेने लिहिणार्या लेखकांनी समाजात अस्मिता जागृत करण्याचे प्रयत्न केले.स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,आणि प्रसंगी विद्रोहाचाही विचार मांडला. तेव्हा 'साहित्याने' समाजाचे प्रबोधनही करण्याचे निश्चितच प्रयत्न केले असे वाटते.
सारांश, शिक्षणाने लिहिणार्यांची संख्या वाढली. चौफेर वाचन करुन लेखनात नव्या जाणींवाबरोबर समृद्धपणा आला का इतकाच माझ्यापुढे तरी प्रश्न आहे !
-दिलीप बिरुटे
अनुभवविश्व
वृत्तपत्रे, चटपटीत मजकूर, चकचकीत पाने आणि चमचमीत छायाचित्रे यांनाच आता वाचणारे नि पाहणारे शिल्लक आहेत.
चटपटीत मजकुरामध्येही समाजाचेच प्रतिबिंब पडलेले असते ते नाकारता येत नाही. थोडासाच वेळ असलेल्या, पोटाच्या कामात गर्क असलेल्या समाजाला माहितीचे छोटे छोटे तुकडे चटपटीत मजकुरातूनच मिळतात. माहिती म्हणजे साहित्य नव्हे हे झालेच. पण त्यात पडलेले समाजाचे प्रतिबिंब हे नाकारता येत नाही.
दुसरे राहिले ते ज्याला आपण खरेखुरे अभिजात लेखन म्हणतो - ते साहित्य वाचणारे कमी आहेत असे म्हणता येईल, पण त्यात समाजाचे प्रतिबिंब पडत नाही, हे म्हणणे योग्य नव्हे. जेव्हा मध्यमवर्गीय वाचत होते, तेव्हा मध्यमवर्गियांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब त्यात पडत होते. जेव्हा स्त्री-मुक्ती वादी चळवळ जोरात होती, तेव्हा तिचे प्रतिबिंब तत्कालिन साहित्यात पडत होते आणि त्याने प्रभावित होणारा वर्गही होता. अर्थात हा वर्ग संख्येने लहान होता, तेव्हाही आणि आजही.
स्वांतंत्र्याची स्फुर्तीगीते असो की कष्टकऱ्यांची गीते ज्यांनी जगण्याला नवा हूरुप दिला ती काव्ये म्हणून मात्र मान्यता पावू शकती नाहीत.
कष्टकर्यांची काव्ये समाजमान्यता मिळवू शकली नाहीत, असे नाही. त्या कष्टकर्यांकडे बघण्याचा समाजाचा दुर्लक्ष करण्याचा गुणधर्मच त्यात प्रतिबिंबित झाला आहे असे वाटते.
आज बहूतांशी महाराष्ट्राचा समकालिन साहित्याशी संबंधच राहिलेला नाही.
ते वाचन हल्ली कमी झाले आहे, म्हणण्यापेक्षा आधीही ते विशेष होते असे मला वाटत नाही. माझ्या लहानपणी असताना आजूबाजूच्या काहीच घरांमध्ये खरी, साहित्याची अशी आवड म्हणता येईल अशी होती. सगळ्यांच्या घरी पुस्तके आणली जात नव्हती. आजही इथे अमेरिकेतही अशी फार थोडीच मराठी घरे आहेत जिथे अभिजात (इंग्रजी किंवा मराठी) साहित्य वाचले जाते.
पण मला एक वेगळेच म्हणायचे आहे , कदाचित अवांतर असेल - वाचन हे समाजाला ओळखण्याचे एक लक्षण झाले. पण केवळ वाचनातून अनुभवांची समृद्धी येते असे नाही. किंबहुना कधीकधी अनुभव कमी असल्याने ते वाचण्यातून मिळवले जातात. माझे मत असे आहे की पूर्वी महाराष्ट्रातील लोकांचे अनुभवविश्व हे अतिशय मर्यादित होते. अलिकडे वाचन कमी असेल, पण उलट अनुभवांची समृद्धी होत असताना आपण अलिकडच्या या संकेतस्थळांवरच्या (कदाचित अभिजात साहित्य म्हणता येईल, किंवा नाही येणार अशा) लेखनातून बघतो. अगदी मी वर वर्णन केलेल्या समाजातही वाचणारे लोक कमी असतील पण आता त्यांचे अनुभवविश्व हे खूप मोठे, व्यापक आहे. त्यांनी ते लिहीले किंवा न लिहीले तरी आजचे जे अनुभव आहेत ते उद्या लिखित स्वरूपात निश्चित येतील (अगदी साहित्य म्हणूनही) याबद्दल मी आशावादी आहे.
आकडेवारी...
धनंजय यांच्या मताशी बहुतांशी एकमत, तेव्हा त्यांचे मुद्दे पुन्हा मांडत नाही.
माझा रोख आहे तो बदलत्या काळाबरोबरच बदलत्या वाचक विश्वाबद्दल. पु. ल., अत्रे यांनी जेव्हा लिखाण केले तेव्हा केवळ १०% च्या आसपास महाराष्ट्रीय वाचन करत असत - आता ते प्रमाण ३०% ते ४० च्या आसपास असावे असा माझा अंदाज आहे. त्यामुळे "वृत्तपत्रे, चटपटीत मजकूर, चकचकीत पाने आणि चमचमीत छायाचित्रे यांनाच आता वाचणारे नि पाहणारे शिल्लक आहेत" असे नसून एक मोठा प्रचंड वाचकवर्ग निर्माण झाला आहे, व संख्येमुळे (व चकचकीत पाने आणि चमचमीत छायाचित्रे आताआताच आल्यामुळे) तो दिसतो आहे असे मला वाटते. यावरची आकडेवारी कंवा अधिक चान्गला अन्दाज जरी उपलब्ध झाला तरी साहित्याचा समाजावरील परिणाम (वाचकवर्गाच्या संख्येनुसार अपेक्षित परिणाम) किमान किती असावा व तो मोजण्यासाठी काय मानदंड वापरावे हे ठरवता येईल. या मानदंडांशिवाय विचार व तर्क हे हवेतील मनोरेच राहतील. पण किमानपक्षी वाचकसंख्या वाढली हाच साहित्याचा सर्वात व्यापक परिणाम झाला असे नाही का वाटत?
मर्ढेकरांच्या सहित्यावर तत्कालीन समाजाचा परिणाम नव्ह्ता असे म्हणणे अन्यायाचे ठरेल असे वाटते. "बडवीत टिर्र्या.." "अहा कोळसेवाला काळा..." "अबलख पिस्टन.." "फिटेल (होती वेडी आशा).." "किती तरी दिवसांत...""मी एक मुंगी..." या सहा कविता मला तीन मिनिटांत सुचल्या ज्या समाजातल्या मागासलेपणातून, परिवर्तनातून, यंत्रसंस्कृतीतून, तत्कालीन घडामोडींतून आणि शहरी संस्कृतीतून आलेल्या आहेत. खचितच अजूनही आहेत...