साम्यवाद्यांची लबाडी
साम्यवादी (Communist) विचारवंत व त्यांचा मुद्दाम केलेला विपर्यास (Deleberate distortion)
या विषयावरील माझी मते बर्याच उपक्रमवासीयांना आवडली नव्हती व त्या बद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. किंबहुना मी "हिन्दुत्ववादी" आहे या समजास हेही एक कारण असावे. त्याच वेळी एक लेख लिहावयाचा संकल्प सोडलाही होता. त्यानुसार श्री. देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी " चार्वाकदर्शन " यावर लिहलेल्या "Lokaayat" या ग्रंथातून मांडलेले विचार व त्या पुस्तकावर बेतलेले मराठी लेखकांचे लिखाण यात ह्या लोकांनी मुद्दाम केलेला विपर्यास दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी सांगण्याचे कारण की जर कोणाला या विषयावर अभ्यास करून प्रतिसाद द्यावयाचे असतील/स्वतंत्र लेखन करावयाचे असेल तर पुरेसा वेळ मिळावा. अभ्यास करावयास पाहिजेच असे मुळीच नाही, पण तसे कोणी केले तर बरे वाटेल हे खरेच.
(१) डॉ. सदाशिव गाडगीळ
(२) डॉ. आ.ह.साळुंके
(३) श्री. शरद पाटील
(४) श्री.गणेश थिटे.
या शिवाय श्री. नरहर कुरुंदकर यांचेही या विषयावर लिखाण आहे.
आज याच विषयावर पण दुसर्या मुद्द्यावर लिहित आहे. राम जन्मभूमी व बाबरी मस्जीद यावर JNU मधील श्री. थापर, सर्वपल्ली गोपाल, बिपन चंद्र, हरबन्स मुखिया, आदी २५ लोकांनी एक पत्रक छापले होते.त्यातील काही मुद्दे येथे देत आहे. इथे सर्व मुद्दे देत बसणे शक्य नाही पण मला जे सांगावयाचे आहे तेवढ्याला इतके पुरे.
पत्रकाचे नाव "The Political Abuse of History", issued by the faculty members of the Centre for Historical Studies, JNU. त्यात त्यांना सिद्ध करावयाच्या गोष्टी दोन. (१) या ठिकाणी वाल्मिकीच्या नायकाचा जन्म झाला याला पुरावा नाही ; (२) येथे देऊळ पाडून वा त्याचा ढाचा बदलून मशीद उभारलेली नाही. आज ह्या दोनही गोष्टींवर, बरोबर-चूक असे काहीच लिहावयाचे नाही. फक्त पत्रकातील लबाडी उघड करावयाची आहे. हे पत्रक JNU मधील २५ फ़ॅकल्टी मेंबर्स लिहित आहेत म्हटल्यावर त्यांना बिनचूक लिहणे अवघड जाऊ नये. जर काही चूका सापडल्या तर त्या मुद्दाम केल्या आहेत असे म्हणावयास हरकत नाही.
(१) बाबराच्या सांगण्यावरून मशिद बांधली गेली याला मशिदीवरील कोरलेल्या पर्शिअन कवितेशिवाय दुसरा "प्राथमिक" पुरावा नाही.
याच पत्रकात पुढे अशोकाने बुद्धाच्या जन्मस्थानाविषयी बुद्धाच्या मृत्यूनंतर दोनशे वर्षांनी लिहलेला असाच लेख पुरावा म्हणून मान्य केला आहे. एके ठिकाणी त्याच काळातला पुरावा अमान्य, दुसरीकडे दोनशे वर्षांनतरचा मान्य.
(२) वरील लेखावरून, बाबरचा सरदार मीर बेग याने मशिद बांधली हे मान्य करायाचे, बाबराने नव्हे असे सांगावयाचे.
त्याच लेखातील By the commaand of Emperor Babur " हे मात्र विसरून जायचे !
(३) ऐन-ए-अकबरी व तुलसीच्या भक्ती काव्यात उल्लेख नाही ह्याची आठवण करून द्यावयाची.
जा ठिकाणी उल्लेख व्हावयासच पाहिजे अशा ठिकाणी अनुल्लेख असेल तरच तो पुरावा मानला जातो. या दोनही ठिकाणी तसे नाही.
ऐन-ए-अकबरी हे Gazetteer आहे. त्यात एखादे मंदिर पाडले याचा उल्लेख येण्याची आवष्यक्यता नाही. तीच गत तुलसीच्या भक्तीकाव्याची. ते इतिहासलेखन नव्हे. या दोन्ही ठिकाणी असा उल्लेख शोधणे ..amounts to looking for penguins in the Sahara and camels in the Antarctic.
मुसलमान राज्यकर्ते हिंदु समाजाबाबत कसे सर्वधर्मसमावेशाची (Secular) भुमिका घेत असत हे दाखवण्याचा प्रयत्नही पत्रकात केला आहे.
(बहुदा यामुळे बाबराने मंदिर पाडले नाही याला दुजोरा मिळत असावा) त्याकरता उदाहरण घेतले आहे औधच्या नबाबांचे.
(अ) सफदरजंगच्या दिवाणाने देवळे बांधली, दुरुस्त केली.
(ब) असफद्दौलाच्या दिवाणाने हनुमान गढीत देवालय बांधावयाला मदत दिली.
(क) नबाबाच्या मुस्लिम अधिकार्याने हिंदु रितीरिवाजांना मदत दिली.
(ड) हिंदु-मुसलमान दंग्यात दरवेळी मुस्लिमांनाच मदत केली असे नाही.
(क) मध्ये मुसलमान अधिकार्याचा उल्लेख केला आहे पण (अ) व (ब) मध्ये दिवाण हिंदु होते ते सांगितले नाही. लबाडी लक्षात आली का ?
हिंदु दिवाण मदत देणार, आव मात्र सर्वधर्मसमावेशाचा.
(ड) ची गंमत काही और आहे. दंगा होता हिंदु नंगा साधू व सुन्नी मुसलमान यांच्या दरम्यान नबाब होता शिया. सुनी-शिया- मुसलमानातले दंगे आजही भारतातच नव्हेत तर पाकिस्थानातही होतात. तेव्हा नबाबाने सुन्नींना मदत केली नसेल तर (फार काय तो गंमत बघत बसला तर) फार कौतुक करण्याची बाब नव्हे. पत्रकात हे सत्य दडवून ठेवले.
आणखीनही मुद्दे आहेत पण इथे एवढे पुरे.
शरद
Comments
आश्चर्यचकित
आताच जालावरती हा निबंध वाचला. (दुवा : मात्र हा दुवा विद्यापीठापाशी "जेस्टोर"ची आंतरजालीय वर्गणी असल्यामुळेच मला उघडता आला, असे वाटते.)
शरद म्हणतात :
(अधोरेखन माझे)
निबंधात "बाबराने बांधली नाही" अशा अर्थाचे वाक्य मला तरी सापडले नाही. शरद ते पूर्ण वाक्य (आजूबाजूच्या वाक्यांसह) देतील का? नजरचुकीने वाक्य न दिसल्याची शक्यता आहे.
मला सापडलेली वाक्ये अशी :
या भागात "देवळाचा नाश केल्याची नोंद नाही" असा काही निष्कर्ष "By the command of the Emperor Babur... Mir Baqi built the alighting place for angels" या वाक्याला कुठल्याही प्रकारे विसरत/नकारत नाही. शरद मात्र लिहितात :
निबंधात दुसर्या कुठल्या ठिकाणी "बाबराने मशीद बांधली नाही" असे शरद यांनी वाचले असावे, त्यांनी ते जरूर सांगावे.
स्वतःच उद्धृत केलेले वाक्य लेखक विसरतात हे खरे असल्यास निश्चित विस्मयकारक आहे.
(शरद यांनी खुद्द हा निबंध वाचला आहे, की केवळ दुय्यम स्रोतांवर विसंबून आहेत?)
"सर्वधर्मसमावेशाचा आव" म्हणून शरद ज्या परिच्छेदाचा उल्लेख करतात, त्याचा सारांश निबंधलेखक असा करतात :
पुनश्च मला कुतूहल वाटते : शरद यांनी मूळ लेख वाचला आहे, की केवळ विपर्यस्त दुय्यम टीका-स्रोत?
शरद म्हणतात :
वरील लेखातील (स्वतःचे मत प्रस्थापित न करणार्या=) वितंडवादाने त्यांना त्यांना काय सिद्ध करायचे आहे. ("लेखकांची लबाडी सिद्ध करायची" असे ध्येय ते सांगतात.)
लबाडी सिद्ध करतानाचे शरद यांचे स्वतःचे लेखन घिसाडघाईचे झाले आहे असे वाटते. कुठलासा दुय्यम स्रोत त्यांनी लक्षपूर्वक वाचला असला, आणि त्यावरून त्यांचे ठाम मत झाले असले, तर त्या दुय्यम स्रोताची लबाडी मात्र सिद्ध करण्यात शरद यांना यश प्राप्त झाले आहे.
**पांढर्या ठशात मजकूर सुरू :अवांतर (लेखात उल्लेख झाल्यामुळे अवांतर नाही, असे सुद्धा) : लोकायतावर देबीप्रसाद चट्टोपाध्यायांच्या पुस्तकाचा काही भाग मी वाचला आहे. त्याच प्रमाणे त्याबाबत नरहर कुरुंदकरांचा लेख वाचला आहे. नरहर कुरुंदकरांनी चट्टोपाध्यायांच्या पुस्तकात सांगितलेले काही दोष मला पटतात. कुरुंदकरांचे परिशीलन मुळीच विपर्यस्त नाही, असे मूळ चट्टोपाध्यायांचे पुस्तक वाचून मला निश्चित वाटते. त्याच प्रमाणे पुणे विद्यापीठाच्या परामर्श प्रकाशनाने वेगवेगळ्या बिगर-मराठी निबंधांच्या मराठी भाषांतराचे संकलन "चार्वाकदर्शन" प्रसिद्ध केले आहे. त्यातील निबंधही (चट्टोपाध्यायांच्या पुस्तकाची टीका करणारेही) विपर्यस्त नाहीत. नीरक्षीरविवेक करताना कित्येक अभ्यासकांना या "लबाडी"च्या वितंडवादात पडायची गरज वाटली नाही, हे खास. या वरील लेखामुळे चार-पाच पानी लेख मासिक शोधून वाचावा लागला - (स्वतःच्याच उद्धरणाकडे कोणी लेखक दुर्लक्ष करू शकतो याबद्दल मला अविश्वास वाटला म्हणून) - उगाचच वाचावा लागला असे मला वाटते आहे. शरद यांच्या आगामी लेखात काय-काय असेल कोणास ठाऊक. पण त्यातील वाक्य-वाक्य तपासावे लागणार असल्यास फुकाफुकी चट्टोपाध्यायांचे जाडजूड पुस्तक वाचावे लागेल. त्यातील काही दोष माहीत असल्यामुळे ते वाचन पूर्ण करायची माझी सध्यातरी मनीषा नाही. म्हणून शरद यांच्या आगामी लेखाला वाचायचे मी टाळणार आहे. विचारांची एलर्जी आहे म्हणून नव्हे. घिसाडघाईने लिहिलेले विचार, किंवा दुय्यम स्रोतांनी विपर्यास केलेले विचार वाचल्यावर शहानिशा करायला मला वेळ नाही म्हणून वाचन टाळणार आहे. पांढर्या ठशात मजकूर समाप्त.**
एक शंका
जवाहरलाल नेहरु युनिवर्सिटीतील पत्रक छापणारे हे २५ च्या २५ प्राध्यापक साम्यवादी आहेत का? इतके साम्यवादी प्राध्यापक एका ठिकाणी एकावेळेस उपलब्ध आहेत याची कल्पना नव्हती.
साम्यवादी आणि इतिहास
आपल्या 'अर्ग्युमेंट' साठी साम्यवादी मंडळी, इतिहास आपल्याला पाहिजे तसा फिरवून लिहितात यात नवीन काहीच नाही.सर्वच हेकेखोर मंडळी तसे करतात. सनातन हिंदुत्ववाद्यांनी दुसरे काय केले आहे? किंवा पाकिस्तानमधील शाळांच्यात जो इतिहास शिकवला जातो तो पूर्णपणे त्या देशाच्या राज्यकर्त्यांच्या सोईनुसार बदलला आहे. अशा मंडळींचे लेखन, सुजाण वाचकांनी कचरा पेटीत टाकून द्यावयाचे असते. त्याच्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.
चन्द्रशेखर
सहमत पण...
साम्यवादी विचारधारा या तुलनेने अर्वाचीन आहेत. त्यामुळे त्यापूर्वीचा इतिहास हा स्वतंत्रपणे उपलब्ध असतो. त्यामुळे साम्यवाद्यांचे
एकांगी 'मूल्यमापन'- असे ज्याला वाटते त्याला-पुनर्तपासणीस घेता येते. उजवे मात्र इतिहास पूर्ण पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात.
आपल्याला गैरसोयीची पात्रे 'असुर' ठरवतात. गैरसोयीचे मुद्दे घटना संपूर्णपणे नष्ट केले जातात (उदा. चार्वाक व लोकयत).
आम्ही सद्गुणी व 'ते' दुर्गुणी' अशी सोपी मांडणी करतात. यात वस्तुनिष्ठता पूर्णपणे फाट्यावर मारली जाते. साम्यवादी मूल्यमापनाचे
कुंपण असते हे खरे, परंतु त्या कुंपणाच्या मर्यादेत तरी वस्तुनिष्ठता राहू शकते एवढाच फरक.
असो. या चर्चेला अंत नाही.
वैयक्तिक मत: सामान्यतः अशा स्वयंघोषित उजव्या वा डाव्या मंडळींशी चर्चा टाळतो. त्यांचे ग्रन्थ म्हणजे त्यांचे ब्रह्मवाक्य असते.
त्यांची चर्चा 'तुमचे प्रबोधन' करण्यासाठी असते. चर्चेमध्ये त्यांचे एखादे मत खोडले जाऊ शकते यावर त्यांचा विश्वास नसतो (मदतीला
ग्रंथप्रमाण असतेच). त्यामुळे या एकतर्फी चर्चेने काही साधते असे मला वाटत नाही.
>>अशा मंडळींचे लेखन, सुजाण वाचकांनी कचरा पेटीत टाकून द्यावयाचे असते. त्याच्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.
चर्चा करावी की नाही हा मुद्दा वैयक्तिक म्हणून सोडून देऊ. पण अहो असे लिखाण कचरा पेटीत टाकून देऊन कसे चालेल. ते तपासावेच लागते.
अन्यथा मूलतः विचारभीरू समाज ते खरे मानून पुढे जाऊ शकतो. (गोबेल्सचे तंत्र आठवते ना? ). यातील कोणती तरी एक बाजू अधिक वस्तुनिष्ठ
म्हणून स्विकारावी लागते, कारण पूर्णपणे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्यच असते. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, अभ्यासा जरूर.
-(निर्विचारवंत) रमताराम
प्रतिवाद
धनंजय यांच्या प्रतिसादानंतर लिहिण्याची काहीच गरज शिल्लक राहिलेली नाही.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
असेच!
धनंजय यांच्या प्रतिसादानंतर लिहिण्याची काहीच गरज शिल्लक राहिलेली नाही.
असेच. धनंजय ह्यांनी केलेल्या चिरफाडीनंतर लिहावेसे काहीच राहिलेले नाही !
उजवे विचारवंत (राइट विंग इंटलेक्चुअल) हा वदतोव्याघात (ऑक्सिमोरॉन) आहे असे मानणारा,
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सहमत
>> नितिनः धनंजय यांच्या प्रतिसादानंतर लिहिण्याची काहीच गरज शिल्लक राहिलेली नाही.
सहमत. लिहिण्याचा फार उपयोग ही होत नसते असे अनुभव आहेत.
>>उजवे विचारवंत (राइट विंग इंटलेक्चुअल) हा वदतोव्याघात (ऑक्सिमोरॉन) आहे असे मानणारा,
>>धम्मकलाडू
सहमत. विशिष्ट विचारसरणी आधारे मूल्यमापन करणारा त्या विचारसरणीचा बंदी असतो. तो वस्तुनिष्ठ विचार
वा मूल्यमापन करू शकत नाही. हीच बाब 'मार्क्सवादी विचारवंत' या शब्दप्रयोगालाही लागू पडते.
विचारवंत हा मूलतः कोणत्याही विचारसरणीचा बंदी नसतो असे मानणारा
-रमताराम
ता.क. श्री चंद्रशेखर यांच्यासाठी: उजव्या मंडळींना न पटणारे विचार मांडणारे सगळेच (या २५ जणांचे काय् घेऊन बसलात) 'साम्यवादी' (त्यांना बहुधा 'मार्क्सवादी' म्हणायचे असावे) असतात साहेब. :) . अहो त्यांना 'मार्क्सवादी' आणि 'कम्युनिस्ट' यांच्यातील फरक समजतो असे दिसत नाही. बाकीचे'डावे' विचार तर सोडूनच द्या. (जाणण्याची उत्सुकता असलेल्यांनी कामूचे 'द रेबेल' वाचावे).
उजवी मंडळी भावनेच्या आहारी गेलेली असतात
सहमत. उजवी मंडळी भावनेच्या आहारी गेलेली असतात. त्यामुळे ते वस्तुनिष्ठ विचार करू शकत नाही. 'मार्क्सवादी' भावनेच्या आहारी जाताना दिसत नाहीत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हेच म्हणतो.
अगदी असेच म्हणतो.
सहमत
अक्षय यांच्याशी सहमत आहे.
२५ नावे
श्री. प्रियाली यांच्या समाधानाकरिता :
सर्वपल्लि गोपाल, रोमिला थापर, बिपन चंद्र, सब्यसाची भट्टाचार्य, सुइविर जैस्वाल, हरबन्स मुखिआ, के.एन.पन्निकर, आर.चंपक लक्ष्मी, सतिश साबरवाल, बी.डी. चटोपाध्याय, आर. एन.वर्मा, के.मिनाक्षी, मुझफ्फर आलम, दिलबाग सिंग, मृदुला मुखर्जी, माधवन पलत, आदित्य मुखर्जी, एस.एफ़..रत्नागर, नीलाद्री भट्टाचार्य, के.के.त्रिवेदी, योगेश शर्मा, कुनाल चक्रवर्ती, भगवान जोश, राजन गुरुकुल व हिमांशु रे.
Historians of JNU यांच्या नावाखाली प्रसिद्ध झालेल्या पत्रकावर ही नावे आहेत. ही सर्व मंडळी त्यावेळी JNU मध्ये इतिहास विभागात प्राध्यापक होती का हे मला माहीत नाही. उत्साह असलेल्यांनी JNU शी पत्रव्यवहार केल्यास माहीती मिळावयास अडचण नसावी.
शरद
२५ नावे
हे २५ जण साम्यवादी असल्याचे कसे ठरले? ते 'सीपीआय' किंवा 'एमसीपीआय'चे सभासद आहेत का?
चन्द्रशेखर
गोंधळात गोंधळ
फॅकल्टी मेंबर्स म्हणजे प्राध्यापकच असे नाही हे ठीक आहे परंतु नाहीच असेही नाही. शरद हे स्वतः वरील दोन्ही वाक्ये लिहितात आणि वर आपल्याला नेमके माहित नाही असेही सांगतात तेव्हा कशाच्या आधारावर ते या सर्वांना साम्यवादी ठरवतात असा प्रश्न पडतो. तसा जाहीर् खुलासा या २५ जणांनी लेखात केला आहे का किंवा आपल्या निष्ठा जाहीर केल्या आहेत का? (लेखाचा ढाचा पाहून शरद यांचा हे सर्व २५ जण साम्यवादी आहेत असा ग्रह झाला असल्यास तो भाग अलहिदा. ते स्वतः फुटकळ हिंदुत्ववादी विचारांत गुरफटलेले आहेत असा माझाही ग्रह आहे. असे ग्रह चुकीचे असू शकतील.)
कुरुंदकर...
यांचे नाव जवळजवळ तळटीपेत - अन्य पाच लेखकांनंतर - आलेले पाहून मौज वाटली. (की हे जाणीवपूर्वक/सोयीचे म्हणून की अजाणतेपणातून...????)
तसेच या लेखकांचा, लोकायत दर्शनाचा आणि बाबरी मशीद/राम जन्मभूमी प्रश्नाचा संबंध काय हे ही कळले नाही.
असो. चालू द्या.
-रमताराम
हाहाहाहा....
धनंजयांशी सहमती.
शरद यांचा लेख वाचल्यानंतर पहिल्यांदा मनात उमटलेली प्रतिक्रिया म्हणजे या प्रतिसादाचे शीर्षक. शरद यांनी केलेला युक्तिवाद, धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे, याआधीही खोडला गेला आहे (लगेच संदर्भ मागू नका. एकूणच असल्या चर्चेसाठी, धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणेही, कष्ट करत बसण्याची गरज नाही). मूळ लेख १९९० चा आहे. तो आत्ता मध्येच कसा आला, 'देव' जाणे!
संदर्भ
हल्ली आपणास पटत नसलेली मते कोणी मांडली तर त्याला उजवे, हिन्दुत्ववादी वगैरे म्हणावयाची "फॅशन" आहे की काय?
मी लिहलेल्या लेखात ५-६ मुद्दे होते. त्यातील एकाला श्री. धनंजय यांचा आक्षेप आहे. त्यांनी १९९० चा दस्तऐवज वाचला
आहे, इतरांच्या प्रतिसादात तसे उल्लेख दिसत नाहीत. असो.
आता एक खुलासा. या हिन्दुत्ववादी विचारसरणीवरून.
Prof. A.R.Khan, H.P.University, Simala, यांनी २५ फ़ेब्रु.१९९० ला Indian Express (magazene section) मध्ये Political Abuse वर एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यावर श्री. थापर आदींनी एक प्रत्युत्तरही दिले होते. या सर्वावर आधारीत एक पुस्तक Ayodhya Syndrome या नावाने प्रा.खान यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी या विषयावर आलेल्या समाजातील अनेक थरातील व्यक्तींची पत्रेही दिली आहेत. त्यात अनेक निरनिराळ्या विश्वविद्यालयातील प्राध्यापकांची (इतिहासाच्या) पत्रेही आहेत. या सर्वांना "उजवे" म्हणून हेटाळणे उचित होणार नाही. या सर्वांची JNU मधील कंपूबद्दलची मते पहाणेही अभ्यासाला उपयुक्त ठरेल.
माझ्या लेखातील सर्व उदाहरणे या पुस्तकातून घेतली आहेत. त्यात Political Abuse व Rejoinder शब्दश: दिले आहे.(प्रिन्टिन्ग मिस्टेकही दुरुस्त न करता). तेव्हा मी न दिलेली पण प्रो. खान यांनी दिलेली इतर उदाहरणेही आपणास या पुस्तकात पहावयास मिळतील. (तेव्हा मी मूल स्रोत वाचला आहे म्हणावयास हरकत नाही.) लेख लिहतांना पुस्तक माझ्यासमोर होते व आजही आहे. तो संदर्भ त्याच वेळी देणार होतो. पण त्यावेळी माझ्या घरी श्री. प्रकाश घाटपांडे आले होते व त्यांच्याशी बोलतांना असे ठरले की "प्रतिसाद आधी बघू, दुवा नंतर."
The Ayodhya Syndrome
A.R.khan.
Kitab bhavan , New Delhi-
110002' रु.१५०
प्रतिसादातील बर्याच प्रश्नांची उत्तरे त्यात मिळू शकतील.
हा सर्व लेखप्रपंच कशाकरिता ? "लोकायत" मधील देवीप्रसाद यांचे विचार हा खरा विषय होता. वरील पुस्तक समोर आले म्हणून आधी हे लिहले. पण आता वाटू लागले आहे की अशा लिखाणाकरिता हे पीठ नव्हे. दोन ओळी लिहण्याकरता वीस पाने वाचा व मग या फालतू Thesis मधे हे का नाही, ते कुठे वाचलेत ? अशा प्रश्नांना उत्तरे देत बसा. यात प्रश्न विचारणार्यांना दोष देण्याची मुळीच इच्छा नाही. ते इथे शक्य नाही एवढेच. तेव्हा आता... बा शरदा, " करू नको धुसपुस, शेंडी दिसते, खाली बस " (आठवते का हे जुने गाणे?)
शरद
किंचित बदल
या ऐवजी
माझे उत्तर हो असे आहे.
एका मुद्द्याचा हिशोब
लेखातील मुद्दा १ + २ = एकच मुद्दा. वरील प्रतिसादात उल्लेख सापडेल.
लेखातील मुद्दा ३ - हा काय मुद्दा आहे? कुनराड एल्स्टचे "पेंग्विन" वाक्य म्हणजे केवळ "र्हेटॉरिक" आहे. उल्लेख+अनुल्लेखांनी मिळून काही ऐतिहासिक संकेत मिळतात. शरद यांनी त्यांना पटणार्या कुठल्या ऐतिहासिक पुस्तकात बघावे आणि उल्लेख-अनुल्लेखांचा दोहोंचा वापर केलेला दिसेल. त्या लेखात प्रत्येक अनुल्लेखाबरोबर "तशा प्रकारच्या अन्य घटनेचा उल्लेख त्या-त्या स्रोतात झाला आहे" या उल्लेखांकडे बघावे. त्या स्रोतात अशा प्रकारचे उल्लेख सापडत असतील तर मग कसली पेन्ग्विने आणि कसले उंट...
मागे शरद यांनी देवळांच्या स्थापत्याबद्दल सुंदर मालिका लिहिली होती. त्यात ते म्हणतात (योग्यच) की पूर्वीच्या वैदिक देवांमध्ये पुराणकालीन देव नसावेत.
... आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या. पुराणांनी जेव्हा शंकर, विष्णु असे "सगुण" देव "हिंदू" धर्माला दिले तेंव्हा देवळे बांधावयाची सोय झाली... [दुवा] वैदिक वाङ्मयात अन्य श्रद्धावस्तूंचा उल्लेख झालेला आहे, पण पौराणिक देवांचा अनुल्लेख असल्यामुळे वैदिक काळात पौराणिक देव नसावेत, असा काही योग्य तर्क आहे. की वेगळा कुठला तर्क आहे? अनुल्लेखावेगळा, देवळांच्या अनुपलब्धतेवेगळा असा काही तर्क शरद यांना माहिती असेल, तर त्यांच्या लेखातून तो दिसत नाही. अन्य उल्लेख, अन्य उपलब्धता यांच्या संदर्भात अनुल्लेख आणि अनुपलब्धता यांच्यातून काही तर्क करता येतो हे शरद यांना ठाऊक आहे, अशी मला खात्री आहे. पेंग्विने आणि उंटांच्या दृष्टांताच्या केवळ रंजकतेमुळे तो इतिहाससंशोधनाबद्दल सार्थ होऊ लागत नाही.
(एका विचार येतो, या ठिकाणच्या शरद यांच्या घाईच्या वाचनाचे मी काय म्हणून खंडन करावे? मी त्या मूळ २५ लेखकांचा वकील लागत नाही. पण येथे माझ्या "एकच" मोजण्याच्या शक्तीचे समर्थन करावे लागते आहे! )
मुद्दे अ-ब. शरद यांच्या लेखातीलच मुद्दे १-२ बघावे. बाबराच्या सरदाराने मशीद बांधली तर मशीदबांधणीचा बाबराशी संबंध लागतो ते शरद यांना जाणवते. हे योग्यच. आणि निबंधलेखकांनी काही वेगळे सांगितलेले नाही. मात्र येथे दिवाणांनी केलेल्या कार्यात त्यांच्या पोशिंद्यांचा संबंध नव्हता असे काही शरद यांच्या अ-ब टीकेमधून ध्वनित होते. कारण जर पोशिंद्यांचा संबंध होताच, तर अ-ब मधील मूळ माहिती ठीकच आहे - टीकास्पद नाही. शरद यांचे या "राजाच्या अंकिताच्या कृती" बाबतीत निकष आहेत तरी काय? माझ्या वरील प्रतिसादात मुद्दे १-२ आल्यानंतर अ-ब आपोआपच गणतीत येतात. वेगळे काही सांगावे लागत नाहीत.
मुद्दा क काय आहे?
मुद्दा ड. माझ्या वरील प्रतिसादात याविषयी लिहिले आहे. "सर्मधर्मसमावेशाबद्दल परिच्छेद" असा काहीसा उल्लेख वरील प्रतिसादात आहे.
- - -
"एकच"चा हिशोब बोटे मोजून करता-करता गोंधळ होऊ लागला आहे. सोडचिठ्ठी आधीच दिली होती, पुन्हा, यावेळी खरोखरची देतो. जिथे एक-दोन-तीन मोजणे संदिग्ध होऊ लागते आहे, तिथे या एका धाग्यासाठी हा निर्णय आहे.
"लिखाणाकरिता पीठ नव्हे" की "संवादाकरिता पीठ नव्हे" याचा निर्णय प्रति-संदर्भ अनु-संदर्भ (केस-बाय-केस) करावा, तो इथे मी केला आहे.
हे
हे स्पष्ट आहे - "हा सर्व लेखप्रपंच कशाकरिता ? "लोकायत" मधील देवीप्रसाद यांचे विचार हा खरा विषय होता. वरील पुस्तक समोर आले म्हणून आधी हे लिहले."
पण त्यासाठी तुम्ही जो आधार घेतला तो खोडला जात असेल तर त्याविषयी अशी प्रतिक्रिया का? चर्चा करावयाचीच असेल तर आपण घेतलेले काही आधार, काही संदर्भ खोडले जाणारच. प्रश्न हाच तर आहे - लोकायतविषय हाच खरा विषय असेल तर तेच थेट लिहिता येते. मध्येच हा वेगळा दिसेल असा फाटा का काढला हे मला समजले नाही.
माझ्या प्रतिसादात मी तुम्हाला उजवा वगैरे म्हटलेले नाही.
युक्तिवाद
बाबरी मशीद प्रकरण हे तीन (की चार) मुद्द्यांभोवती फिरत होते.
१. रामाचा जन्म 'त्याच' जागी झाला-अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
२. 'त्या' ठिकाणी गुप्तकाळात (की कोणत्यातरी काळात) बांधलेले भव्य मंदिर होते.
३. ते मंदिर 'पाडून' बाबराने तेथे ही मशीद बांधली.
४. एका रात्री भगवान राम त्या मशिदीत गूढपणे प्रकट झाले. (याला चौथा मुद्दा म्हणावे की नाही याबाबत साशंक आहे)
साहजिकच हे मुद्दे खरे की खोटे यावर दोन्ही बाजू युक्तिवाद करीत होत्या. जुन्या मंदिराच्या अस्तित्वाच्या संदर्भात त्या युक्तिवादात केवळ तुलसीदासाच्या ग्रंथाचाच उल्लेख नव्हता तर पूर्वी भारतात येऊन गेलेले परदेशी प्रवासी वगैरेंच्या प्रवासवर्णनातही असे भव्य मंदिर पाहिल्याचे उल्लेख नाहीत असा युक्तिवाद होता. शरद इथे तो युक्तिवाद देत नाहीत. त्यामुळे पेंग्विनचा उल्लेख अनाठायी. या प्रवासवर्णनांत मंदिराचा उल्लेख जर तसे मंदिर अस्तित्वात असेल तर आवश्यक आहे.
(माझ्या वैयक्तिक मते काहीही असले तरी १६ व्या शतकात घडलेल्या घटनांचा बदला २०व्या शतकात घेणे हा फारच आचरट प्रकार आहे. शिवाजीने शाहिस्तेखानाची बोटे तोडली म्हणून आज कुणा खान आडनावाच्या माणसाने कुणा भोसले नावाच्या माणसाची बोटे तोडण्यासारखे).
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)