सूरदास
सूरदास (१४७८-१५८३)
अखियां हरि दरसनकी प्यासी !!ध्रु!!
देख्यो चाहत कमलनैनको
निसदिन रहत उदासी !!१!!
किंवा
सुनेरी मैने निर्बलके बल राम !!ध्रु.!!
द्रुपदसुता निर्बल भई ता दिन गहलाये निज धाम
दु:शासनकी भुजा थकित भइ वसन रूप भये शाम !!१!!
वा
प्रभु मेरे अवगुन चित न धरो !!ध्रु!!
अशा विविध प्रकारे प्रभूला आळवणार्या सुरदासांच्या भजनात खिन्नता, उदासिनता, व्यथा, करुणा, यांच्या इतक्या निरनिराळ्या छटा आढळतात की एखादे वेळी
सुरदासके कृष्ण कन्हैया, मनमोहन मुरलीके बजैया !
नटखट नंदकिशोर, शाम हमारे चोर, मधुकर शाम हमारे चोर !!
अशी नटनागर,चितचोरट्या कृष्णाची संभावना करतांना वापरलेल्या "मधुकर " या विशेषणाने एक सुखद झुळुक अंगावरून जाते. हा मनमोहन, रंगाने भुंग्यासारखा असलेला शाम व त्याची फुलाफुलांवरून उडण्यासमान गोकुळाती गोपींबरोबरची भ्रमरवृत्तीही डोळ्यासमोर उभी रहाते. या अशा काव्यामुळे त्याची भजने अतिशय लोकप्रिय झाली आहेत एवढेच नव्हे तर शास्त्रीय गायकांनी ती नानाविध रागात बांधली व मोठ्या आवडीने ती जलसात म्हटली जातात.
सुरदासांचा जन्म दिल्लीजवळच्या सिही या खेड्यात झाला. त्यांना जन्मजात भविष्य व शकून सांगण्याची विद्या अवगत होती. सहाव्याच वर्षी त्याचा नावलौकीक एवढा झाला की आईवडील घाबरूनच गेले ! त्यानी लहानपणीच घर सोडले व एकांतात रहावयास गेले. पण तेथेही माणसांची रीघ लागे व अनेक शिष्यही येऊन चिकटले.
सर्वाला वैतागून त्यांनी मथुरेला प्रयाण केले. पण जनसंपर्क सुटेना. लोक भविष्य व शकुनाकरिता गर्दी करावयाचेच.मग मथुराही सोडली.
आता सत्पुरुष म्हणून त्यांचा लौकिक सर्वत्र पसरू लागला. एकदा महाप्रभू वल्लभाचार्य त्यांना भेटावयास आले व त्यांनी सुरदासांना श्रीकृष्ण्भक्तीचा उपदेश केला व त्यांना गोकुळात गेले. तेथे गुरु आज्ञा म्हणून श्रीकृष्णलीलेवर शेकडो पदे रचली.
अकबराच्या कानावर सुरदासांचे कीर्ती गेली व तो त्यांना भेटावयास गोकुळाला गेला. तेथे सुरदासांची पदे ऐकून तो इतका लुब्ध झाला की की बरेच द्रव्य व काही गावे इनाम म्हणून त्याने देऊ केली. तसेच आपल्यावरही पदे रचावीत अशी सूचनाही केली. सुरदासांनी सर्व नाकारले व सांगितले की "परत माझ्या भेटीला येऊ नका." अकबराने सुरदासांच्या पदांची फारशीत भाषांतरे करून घेतली व आपली दुधाची तहान ताकावर भागवून घेतली.
सुरदासांनी आपले उर्वरित आयुष्य कृष्णभक्तीत, पदे रचण्यात व शिष्यांना उपदेश करण्यात घालविले. १५८३ ला परासौलीच्या चंद्रसरोवराच्या तीरावर, जेथे श्रीकृष्ण रासक्रीडा करत असे, आपला देह ठेवला.
शरद
Comments
सुंदर माहिती
सुरदासांचे शरदरावांनी उद्धृत केलेले पद नुसते वाचतांनाच त्यातल्या नादलयार्थाच्या आनंदाची झुळूक अनुभवाला येते. मग रागदारीत गुंफलेली त्यांची पदे ऐकतांना काय बहार येईल. सुरदासांबद्दल थोडक्यात पण सुंदर माहिती दिल्याबद्दल शरदरावांना धन्यवाद.
त्यांना जन्मजात भविष्य व शकून सांगण्याची विद्या अवगत होती.
सामान्य माणसाला त्याच्या वर्तनावरून तुझे भले होईल की वाईट असा उपदेश सत्पुरूष करत असतात. त्यांच्या सुसंगत विचार करण्याच्या पद्धतीमूळे बरेचदा हे उपदेश अथवा अंदाज अचूकही ठरतात. यातुन आपल्या भविष्याचे कथन करावे या मागणीसाठी सुरदासांना त्याच्या तथाकथित चाहत्यांनी भंडावून सोडले असावे. अन्यथा त्यांना अशी विशेष विद्या अवगत असती तर त्या विद्येच्या माध्यमातून त्यांना समाजाचे खुप काही भले करता आले असते. शरदराव म्हणतात त्या प्रमाणे सर्वाला वैतागून त्यांनी मथुरेला प्रयाण केले नसते.
अजून
लेख त्रोटक झाला आहे असे वाटले.
अजून काही सूरदासांविषयी माहिती?
मोठा आणि माहितीपूर्ण लेख वाचायला आवडेल.
हा लेख (किंवा ही लेखमाला) येथून विकिवरही टाकला तर चालेल का?
आपला
गुंडोपंत