वैदिक ऋचांचे रसग्रहण (अथर्ववेद दन्तसूक्त ६:१४०)
ऋग्वेदाचे जे प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे, ते अन्य वेदांना नाही. (अर्थात यजुर्वेदी, सामवेदी घराण्यातल्या लोकांची येथे माफी मागतो.) पण त्यांतही बिचार्या अथर्ववेदाला तर पूर्वी "वेद" असे म्हणतसुद्धा नसत. (पूर्वीच्या काळात "तीन वेद"="त्रयी" असाच उल्लेख होई.)
अथर्ववेदातली पुष्कळशी सूक्ते विशेष कार्य करण्यासाठी यंत्रमंत्र (जंतरमंतर शब्द आठवावा) आहेत. म्हणजे स्त्री-पुरुषाचे वशीकरण करणारे मंत्र, आजार बरे करण्यासाठी मंत्र, बायको पळवणार्याला शाप, वगैरे. म्हणून तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणारे वाचकही अथर्ववेदाकडे तसे दुर्लक्षच करतात.
परंतु बघा - आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींबद्दल मंत्रतंत्र-जादूटोणा करावासा वाटतो, ते विषय काळजाच्या अगदी जवळचे असतात. अशा भावनांबद्दल समर्थ कविता नेहमी हृदयस्पर्शी असतात. साहित्य आणि काव्य म्हणून त्यांचे मोल खूप आहे. इंग्रजी साहित्यातले उदाहरण घेऊया - "मॅक्बेथ" नाटकातल्या चेटकिणींचे मंत्र जादूटोण्याचे "मॅन्युअल" म्हणून निरुपयोगी असले, तरी काय झाले? मॅक्बेथच्या मनःस्थितीचे जे भयावह दर्शन ते घडवतात, तो उच्च कोटीचा साहित्यानुभव आहे.
एक हलकेफुलके, वेगळेच उदाहरण म्हणून मी एक छोटेसे सूक्त येथे देत आहे. बाळाचे पहिले दोन खालचे दात फुटतात, ते गोड चित्र आपण सर्वच मनात साठवतो. पण हिरड्या शिवशिवणार्या बाळाने कचकून चावा घेतलेलेही आठवते ना? तर त्या दातांबद्दल हे दंतसूक्त :
- - -
अथर्व ६:१४०
ऋषि: - अथर्वा, देवता - ब्राह्मणस्पति: दन्ता:, छन्दः - १ उरोबृहती, २ उपरिष्टाज्ज्योतिष्मती त्रिष्ठुप्, ३ आस्तारपङ्क्ति: ।
- - -
यौ व्या॒घ्रावव॑रूढौ॒ जिघ॑त्सतः पि॒तरं॑ मा॒तरं॑ च ।
तौ दन्तौ॑ ब्राह्मणस्पते शि॒वौ कृ॑णु जातवेदः ॥ १ ॥
वाघ दोघे टपलेले खाण्या बापाला आईला
त्यां दातां ब्राह्मणस्पते! शुभ करी जातवेदा!
व्री॒हिम॑त्तं॒ यव॑मत्त॒मथो॒ माष॒मथो॒ तिलम् ।
ए॒ष वां॑ भा॒गो निहि॑तो रत्न॒धेया॑य दन्तौ॒ मा हिं॑सिष्टं पि॒तरं॑ मा॒तरं॑ च ॥ २ ॥
भात खावा, जव खावा, नि उडीद तीळ खावा
तुम्हासाठीचा तो भाग, तुम्हासाठीचा खजिना
नका दोघा दातांनो रे मारू आईला बापाला
उप॑हूतौ स॒यजौ॑ स्यो॒नौ दन्तौ॑ सुम॒ङ्गलौ॑ ।
अ॒न्यत्र॑ वां घो॒रं तन्व॑१॒: परै॑तु दन्तौ॒ मा हिं॑सिष्टं पि॒तरं॑ मा॒तरं॑ च ॥ ३ ॥
दिली हाक सुमंगल छान्या दातांच्या जोडीला
अन्य कडे जाऊ द्या रे घोर अंगाला तुम्हांच्या
नका दोघा दातांनो रे मारू आईला बापाला
- - -
बाळ वाढते, मूल वाढते, तसे मातापित्यांना आनंददायक अनुभव आणि त्याच वेळी त्रासदायकही अनुभव येतात. बालहट्टाचे सामर्थ शिकलेल्या मुलांच्या आईबापांना, पौगंडावस्थेतल्या बंडाने बेजार झालेल्या आईबापांना विचारून बघा.
जिव्हाळ्याच्या आनंदाचे आणि भयाचे असे सरमिसळ स्वरूप दाखवणारे काव्य क्वचितच कधी वाचायला मिळते. गोजिरवाण्या पण चावर्या बाळ-दातांची शांती करणारा मंत्र तुम्हालाही गमतीदार वाटो ही इच्छा!
Comments
शुद्धिपत्र - ब्रह्मणस्पति
"ब्रह्मणस्पति" असे वाचावे.
(अनुक्रमणीत) देवता : ब्रह्मणस्पति
(१ल्या मंत्रात) तौ दन्तौ॑ ब्रह्मणस्पते...
(भाषांतरात) त्यां दातां ब्रह्मणस्पते! ...
गमतीदार
ऋग्वेदात इतके काही गमतीदार असू शकेल याची कल्पना नव्हती.
अथर्व आणि अथर्वा(अथर्वन्?) हे दोन्ही एकच? जातवेद म्हणजे अग्नि हे माहीत असते, पण ब्रह्मणस्पति म्हणजे नेमकी कोणती देवता? त्यातूनही ब्रह्मणस्पति: दन्ता:, यावरून दातांनाही देवता बनवले आहे असे दिसते. त्याशिवाय त्यांना उद्देशून हा मंत्र झालाच नसता. बरोबर?
हे मंत्र ज्या छंदांत रचले आहेत त्या छंदांची माहिती कुठे मिळेल?--वाचक्नवी
छंद, देव, वगैरे
ग्रिफिथच्या पुस्तकाच्या शेवटी त्रोटक छंदवर्णने आहेत (दुवा)
उरोबृहती - ८+१२, ८+८ अक्षरे
उपरिष्टाज्ज्योतिष्मती त्रिष्टुप् - ११+११, ११+८ अक्षरे
आस्तारपङ्क्ति - ८+८, १२+१२ अक्षरे
(वरील सूक्तात प्रत्येक ओळीचा हिशोब जमतो का, पादाचा हिशोब जमतो का नीट बघायला पाहिजे. काहीतरी गडबड वाटते आहे. शक्यतोवर दुसर्या आणि तिसर्या मंत्रात शेवटचा पाद एकसारखा हवा असेही वाटते.)
अथर्वा हे अथर्वन् शब्दाचे प्रथमा एकवचन आहे, हे बरोबर.
ब्रह्मणस्पतीचा संबंध बृहस्पतीशी लावला जातो. हल्ली गणपतीशी संबंध लावतात. पण वैदिक मंत्रांमधून गजमुख-देवतेचा काही थेट संबंध कळत नाही.
दन्तौ - दोन दात, हे अनुक्रमणीत "देवता" म्हणून सांगितलेले आहेत. निरीक्षण योग्य आहे. सूक्तात ज्या-ज्या व्यक्तींना संबोधन असते त्यांची यादी "देवता" या उपशीर्षकाखाली असते. म्हणजे मण्डूकसूक्तात "देवता - मंडूका:" असा उल्लेख अनुक्रमणीत येतो.
छान!!!
खरंच गंमतीशीर. असेच अजूनही लिहित रहावे ही विनंती.
बिपिन कार्यकर्ते
+१
श्री कार्यकर्ते यांच्याप्रमाणेच म्हणतो. अजुन येऊ द्या.
मस्त!
अशी चावरी बाळं कशी आवरायची असा कधीतरी प्रश्न पडतो. मनात नसले तरी त्यांना कधीतरी धपाटा द्यावा लागतो. त्यांच्यासमोर हा मंत्र म्हणून फरक पडतो का पाहिले पाहिजे. गंमतीशीर प्रकार आहे.
चावरे बाळ / उडीद
सध्या घरात चावरे बाळ आहे तेव्हा ह्या मंत्राचा प्रभाव ताडून पाहायला हवा :)
पण नुकते दात येणार्या छोट्या बाळांना उडीद आणि तीळ देतात?
मस्त
अनुवाद वाचायला मजा येत आहे.
और भी आने दो !
-दिलीप बिरुटे
+१
असेच म्हणते. शिवशिवणार्या बाळदातांचे वर्णन गोड आहे.