आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग ८

महाभारतकाल

आपल्या सर्व धार्मिक ग्रंथांमधे, महाभारत हा ग्रंथ अद्वितीय आहे यात शंकाच नाही. अंदाजे 18 लाख शब्द असलेल्या या ग्रंथात नव्वद हजार श्लोक व अनेक गद्य पंक्ती आहेत. या ग्रंथाचे लघुरूपच 24000 श्लोकांचे होते व मूळ स्वरूपात हा ग्रंथ 'जय' या नावाने लिहिला गेला व तो 8800 श्लोकांचा होता असे मानले जाते. महाभारतात काय आहे असे विचारण्यापेक्षा महाभारतात काय नाही? असे विचारणे सयुक्तिक ठरेल.या महाकाव्याची मुख्य कथावस्तू अतिशय प्रभावी आहे. अनेक सुरस व चमत्कारीक उपकथांमुळे हा ग्रंथ वाचताना काही वेळेस गोंधळल्यासारखे सुद्धा होते. या ग्रंथाच्या सहाव्या पर्वात, भारतीय किंवा हिंदु संस्कृतीचे संपूर्ण तत्वज्ञान किंवा नैतिक अधिष्ठान, भगवद्‌गीतेच्या माध्यमातून प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सांगितले आहे.

असा हा सर्वांग परिपूर्ण ग्रंथ एका रचनाकाराने थोड्याश्याच कालावधीत रचला असेल हे संभवनीयच नाही. त्यामुळे महाभारताचा कालखंड काय असू शकेल हेच बघावे लागेल. महाभारताच्या कथेत दोन महत्वाचे संदर्भ कालनिश्चितीच्या दृष्टीने आढळतात.
या संदर्भांचा विचार आपण प्रथम करू.
1.उत्तरायण लागण्याची वाट पहात भीष्माचार्यांचे शरपंजरी पडून रहाणे.
2.गीतेच्या अकराव्या अध्यायात, मार्गशीर्ष हा सर्व महिन्यांमधे श्रेष्ठ असा महिना असल्याचे श्रीकृष्णाचे कथन.

आपण मागच्या भागात(भाग 6) हे बघितले आहे की ऋग्वेदकालात, आर्यांचे वर्ष वसंतसंपात दिनापासून चालू होत असे व पहिल्या सहा मासांना देवायन असे म्हणत व उरलेल्या सहा मासांना पितरायन असे म्हटले जाई. पुढे कधीतरी हा वर्षारंभदिन, Winter Solstice च्या दिवशी, अज्ञात कारणास्तव हलवण्यात आला व यानंतर पहिल्या सहा मासांना उत्तरायण व पुढच्या सहा मासांना दक्षिणायन असे म्हटले जाऊ लागले.
महाभारत कथेत उत्तरायणाचा उल्लेख असल्याने साहजिकच असे अनुमान काढता येते की वर्षारंभाचा दिन, 22 सप्टेंबर रोजी हलवण्यात आल्यानंतरच, महाभारताची रचना झाली. यावरून अर्थ एवढाच काढता येतो की ऋग्वेदकाल आणि महाभारतकाल यांच्यामधे बराच मोठा कालखंड गेला असला पाहिजे.

गीतेतील उल्लेखाप्रमाणे, सर्व महिन्यांत मार्गशीर्ष हा श्रेष्ठ महिना आहे. याचा अर्थ जर मार्गशीर्ष हा प्रथम मास आहे असा घेतला तर तो वर्षारंभाच्या दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबर च्या आसपास सुरू होत असला पाहिजे. भारतीय महिन्यांची नावे, त्या महिन्यात सूर्य अस्ताला गेल्याबरोबर पूर्व क्षितिजावर जे नक्षत्र दिसू लागते त्यावरून बहुतांशी आली आहेत. महाभारतातील इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली. या शहराजवळ, 22 डिसेंबरच्या जवळपास, सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर, कोणत्या कालखंडात, पूर्व क्षितिजावर, मृगशीर्ष नक्षत्र दिसत असले पाहिजे याचा शोध संगणकाच्या सहाय्याने घेणे कोणालाही सहज शक्य आहे. असा शोध घेतला तर हा कालखंड इ.स.पूर्व 500 ते इ.स.500 असा असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. महाभारताची रचना, या कालखंडात झाली असल्याची शक्यता आपण इतर काही मुद्यांच्या आधारे तपासू शकतो.

1.कच्छ्मधील द्वारका हे शहर श्रीकृष्णाच्या यादव राज्याची राजधानी मानली जाते. या ठिकाणी भारतीय पुराणवस्तू संशोधन खाते व गोवा येथील समुद्रासंबंधी संशोधन करणारी National Institute of Oceanography यांनी समुद्रात व जमिनीवर बरेच उत्खनन केलेले आहे. या संस्थेने प्रथम द्वारका येथील काही अवशेषांचे Dating इ.स.पूर्व 1500 एवढे केले होते. परंतु आता नवीन अभ्यासाप्रमाणे हे आधीचे निष्कर्ष चुकीचे असल्याचे आढळून आले आहे. या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की द्वारका हे व्यापाराचे मोठे केंद्र हडप्पा कालापासून म्हणजे इ.स.पूर्व 2500 या कालापासूनच होते. व येथे या कालापासून सतत वस्ती होती. या संशोधनात मातीच्या भाजलेल्या भांड्यांचे जे तुकडे सापडले आहेत ते प्रामुख्याने दोन कालखंडांतील आहेत. इ.स.पूर्व 2500 ते 200 व इ.स.पूर्व 50 ते 10. हा कालखंड एवढा दीर्घ आहे की यावरून महाभारत कालाला पुष्टी देणारा काही पुरावा येथे सापडला आहे हे म्हणणे धाडसाचेच ठरेल.
2.गंगेच्या खोर्‍यात सापडलेल्या पुराणवस्तूंच्या Dating बद्दल असेच म्हणावे लागते की या ठिकाणी सतत इतकी सहस्त्र वर्षे वस्ती आहे की उत्खननात सापडलेल्या कोणत्याही वस्तूचा महाभारत कालाशी सबंध जोडण्याचा प्रयत्न बादरायणीच ठरेल.

3.या वरील दोन मुद्यांवरून लक्षात येऊ शकते की महाभारत कालाचा अंदाज हा केवळ Exclusion Principle नेच करता येणे शक्य आहे.
4.आर्य टोळ्या भारतात इ.स.पूर्व 1500 च्या आसपास आल्या हे मानले तर महाभारत रचनेचा वर उल्लेख केलेला काल सयुक्तिक वाटतो. आर्य संस्कृती, भारतीय द्वीपकल्पात सुस्थापित होण्यासाठी एक सहस्त्राहून आधिक वर्षांचा काल पुरेसा वाटतो.
5.वाल्मिकी रामायणात, महाभारतातील कोणतीच पात्रे दिसत नाहीत. मात्र महाभारतात हनुमान आहे तसेच जांबुवंत आहे. यावरून महाभारत, वाल्मिकी रामायणानंतर लिहिले गेले असावे असे अनुमान काढले तर हाच कालखंड इ.स.पूर्व 300 ते इ.स.500 असावा असे म्हणता येणे शक्य आहे.
6.इ.स.600(मौर्य घराण्याचा काल) मधे बौद्ध धर्माचा भारतात उगम झाला. या नंतर महाभारताची रचना झाली असल्याचे कठिण वाटते.
या चर्चेवरून महाभारताचा मूळ ग्रंथ 'जय' व त्याचे एका महाकाव्यात रूपांतर हे इ.स.पूर्व 300 ते इ.स.500 या कालखंडात पूर्ण झाले असावे असे वाटते.

कालदर्शक रेषा

या लेखमालेच्या सुरवातीला मी एका कालदर्शक रेषेचा उल्लेख केला होता. ही कालदर्शक रेषा अशी असू शकेल.

1. इ.स.पूर्व 74000 - भारतीय द्वीपकल्पामधील सर्व मानव प्रजाती टोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाने नष्ट झाल्या.
2.इ.स.पूर्व 60000- मूळ दक्षिण भारतीयांचे अंडमान द्वीपाकडून आगमन

3.इ.स.पूर्व 40000- मूळ उत्तर भारतीयांचे अफगाणिस्तान-इराण कडून आगमन

4.इ.स.पूर्व 6000- भारतीय द्वीपकल्पातील सुरवातीचे नगरीकरण

5.इ.स.पूर्व 5000- रामायणाची आख्यायिका

6.इ.स.पूर्व 4000- ऋग्वेदाची रचना (मध्य एशिया मधे)

7.इ.स.पूर्व 1500- आर्यांचे सप्तसिंधु प्रदेशात स्थलांतर

8.इ.स.पूर्व 500 - वाल्मिकी रामायणाची रचना

9.इ.स.पूर्व 300 ते इ.स.500 - महाभारताची रचना

आभार

लेखमाला खूपच लांबली. सर्व वाचकांचे प्रतिसादाबद्दल आभार. विशेष आभार प्रियाली, शरद, गुंडोपंत नितिन थत्ते, ऋषिकेश यांचे.

लेखनविषय: दुवे:

Comments

आभार व अभिनंदन

"सर्व महिन्यांमधे श्रेष्ठ असा महिना " संपणार्‍या दिवशी लेख टाकला आहात :)
असो.
लेख माहितिपूर्ण.. किंबहूना लेखमालेमुळे या तीन ग्रंथाच्या कालनिशिचितीबद्दल लेखकाची मते कळलीच पण त्याहूनही महत्त्वाचे असे संदर्भ, पुरवणी माहिती मिळाली. अनेक प्रतिसादातून मिळालेली माहितीदेखील तितकीच रोचक आहे.

मालिकेबद्दल श्री. चंद्रशेखर यांचे आभार व पूर्ततेबद्दल अभिनंदन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

मालिका तडीस लावलीत

कितीही लिहिले तरी स्वल्पच असा विषय आहे. त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

या ठिकाणी "आख्यायिकेचा काळ" आणि "पद्यरचनेचा काळ" या गोष्टी रामायणासाठी तरी वेगळ्या केलेत हे उत्तम.

चूक झाली आहे का?

लेखमाला वाचत आहे. आणि एकत्र उत्तर लिहायचे म्हणून लिहीणार होते, परंतु वेळ झाला नाही. लेखमालेबद्दल धन्यवाद.

6.इ.स.600(मौर्य घराण्याचा काल) मधे बौद्ध धर्माचा भारतात उगम झाला. या नंतर महाभारताची रचना झाली असल्याचे कठिण वाटते.

मौर्य काळ हा तुम्ही म्हटला आहे बरीच शतके आधीचा होता. विकीप्रमाणे ख्रि. पू. ३२१ ते १८५ - http://en.wikipedia.org/wiki/Maurya_Empire (अशोकाच्या काळात बौद्ध /जैन श्रमण असत असे वाचले आहे).

असो. सविस्तर वेळ मिळाल्यावर लिहीन.

उलटे

मला धनंजय यांची खालीलप्रमाणे खरड आली आहे.
====
"बौद्ध धर्माच्या उगमाबाबत ई.स."पूर्व", असा "पूर्व" हा कळीचा शब्द लिहायचा राहिला असावा असे वाटते.

गौतम बुद्ध हा ई.स. पूर्व ६व्या शतकातला होता (उगम), आणि बौद्ध धर्माचा प्राथमिक प्रसार हा मौर्य साम्राज्यातील होता (ई.स.पू. ४थे ते २रे शतक), नंतर ई.स.पश्चात च्या गुप्तांच्या काळातही बौद्ध धर्माचा प्रसार होतच होता.

बहुधा गुप्त काळाचा उल्लेख, मौर्यांचा उल्लेख आणि गौतम बुद्धाचा उल्लेख असे काही तिहेरी गुंतागुंतीचे वाक्य रचता/छाटता चंद्रशेखर यांचा लेखनदोष झाला असावा, असा माझा कयास आहे."

------------------------------

असेच असावे असे वाटल्याने "चूक झाली आहे का" असा प्रश्न विचारला आहे.
रामायणानंतर महाभारत आहे, म्हणून ते इ. स. पूर्व ५०० नंतर. आणि मौर्यांच्या काळाआधी. म्हणजे इ. स. पूर्व ३०० च्या आसपास. याचा अर्थ लिहीताना इ. स. पूर्व ५०० - ते - इ.स. पूर्व ३०० असे (उलटे जसे ancient India, ruled by the Mauryan dynasty from 321 to 185 B.C.E. ...) पाहिजे. असे नसल्याने भलताच घोळ होतो आहे!

चांगली मालिका

महाभारत, वाल्मिकी रामायणानंतर लिहिले गेले असावे असे अनुमान काढले तर हाच कालखंड इ.स.पूर्व 300 ते इ.स.500 असावा असे म्हणता येणे शक्य आहे.

महाभारत, रामायणानंतर रचले गेले याविषयी आणखीही संदर्भ देता येतात. जसे, रामायणाचा काळ हा त्रेतायुगातील दाखवला जातो तर महाभारताचा काळ द्वापारयुगाचा. कृष्णाच्या मृत्यूनंतर कलियुग सुरु झाले. विष्णूचा सातवा अवतार राम तर आठवा कृष्ण. यावरुनही रामायण, महाभारताआधीपासून असल्याचे सांगता येईल. युगांच्या गणितावरून रामायण- महाभारताची कालनिश्चिती करणेही येथे लागू आहे. तसे वर्तकादींनी केल्याचे आठवते परंतु आता संदर्भ नाहीत. उत्तरायणाची भरती महाभारतात मागाहून झाल्याची शक्यता किती आहे यावरही विचार होणे आवश्यक आहे. सॉक्रेटिसचे विचार म्हणून प्लेटो आपले विचार मांडायचा असे म्हटले जाते तसे सौती आणि वैशंपायन यांनी जय या काव्यात नेमकी कुठे आणि कशी भर घातली हे कळणे कठिण आहे.

महाभारताची रचना नेमकी कधी झाली हे सांगणे कठिण असले तरी व्यासांनी पुराणांचे संकलन केले. सौतीनेही पुराणांचे संकलन केले. सौती हा व्यासांचा शिष्य असल्याचे कोठेतरी वाचले असले तरी सौती आणि व्यास हे समकालीन नव्हेत. सौतीचा काळ शरद यांनी मागे इ.स.पूर्व ३०० असा दिला होता. परंतु महाभारत, रामायण आणि पुराणांचे लेखन झाले गुप्त काळात. गुप्तांचा काळ इ.स. ३००-५०० दरम्यानचा. या काळात नागरी, शारदा अशा लिपी गुप्तकाळात भरभराटीस आल्या. याखेरीजही अनेक कलाक्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे गुप्तकाळास भारताचा सुवर्णकाळ मानले जाते. भगवद्गीता आणि हरिवंश हे देखील मूळ महाभारताची अंगे आहेत असे वाटत नाही. यांची महाभारताला जोडणीही नंतरची. हे सर्व गुप्तकाळात झाले असावे का हे पाहणे रोचक ठरेल.

मला वाटते या मालिकेचा संदर्भ घेऊन यावर आणखी थोडा शोध घेऊन रामायण-महाभारत घडण्याचा काळ, महाकाव्ये रचण्याचा काळ आणि ती लिहून काढण्याचा काळ असा स्वतंत्र लेख होईल. हे तीनही काळ वेगवेगळे असावेत असे मला वाटते.

जालावर शोध घेताना

प. वि. वर्तकांनी रामायण आणि वेदांची कालनिश्चिती केलेला संपूर्ण ग्रंथच हाती लागला.

जिद्न्यासूंनी अधिक अभ्यास करावा.

चतुरंग

मार्गशीर्ष

गीतेच्या अकराव्या अध्यायात, मार्गशीर्ष हा सर्व महिन्यांमधे श्रेष्ठ असा महिना असल्याचे श्रीकृष्णाचे कथन.

मला वाटते गीतेच्या दहाव्या अध्यायातील हा ३५ वा श्लोक आहे:

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः॥१०- ३५॥ (श्रीमद्भगवद्गीता)

अथवा मराठीत

सामांत मी बृहत्-साम गायत्री मंत्र-सार मी । मी मार्गशीर्ष मासांत ऋतूंत फुलला ऋतु ॥ १०- ३५ ॥ (गीताई)

गीतेतील उल्लेखाप्रमाणे, सर्व महिन्यांत मार्गशीर्ष हा श्रेष्ठ महिना आहे. याचा अर्थ जर मार्गशीर्ष हा प्रथम मास आहे असा घेतला तर तो वर्षारंभाच्या दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबर च्या आसपास सुरू होत असला पाहिजे.

ह्या मधील तर्क समजला नाही. "योगेश्वरा कसे जाणू चिंतनी चिंतनी तुज । कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे ॥ १७ ॥" असे जेंव्हा अर्जूनाने विचारले तेंव्हा त्याला उत्तर देताना श्रीकृष्णाने सर्वप्रथम असे स्पष्ट केले की,

"बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चि त्या तुज । माझा विभूति-विस्तार न संपे चि कुठे कधी ॥ १९ ॥ राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी । भूत-मात्रास मी मूळ मध्य मी मी चि शेवट ॥ २० ॥"

आणि मग विविध गोष्टीत मी कुठे आहे हे सांगताना श्रीकृष्णाने सर्व मासांमधे मी मार्गशीर्ष असे म्हणले आहे . त्याच अध्यायात श्रीकृष्णाने असे ही वेदांमधे स्वतःला सामवेद म्हणले आहे आणि सामवेदात पण बृहत् साम आहे असे म्हणले. तेच छंदामधे गायत्री म्हणले आहे. अर्थात यातील कुठलीच गोष्ट ही प्रथम आहे असे म्हणता येत नाही. सामवेदाच्या आधीचे वेद आहेत आणि गायत्रीच्या आधीचे छंद... मग याचा अर्थ काय? तो नक्की आहे पण अवांतर टाळण्यासाठी लिहीत नाही.

याच संदर्भात वरील तर्काचाच विचार करायचा झाल्यास आज वापरात असलेल्या ग्रेगरीयन कालनिर्णयाप्रमाणे जानेवारी हा महीना पहीला आहे. तेच कालनिर्णय व्यवहारात उतरवताना इतक्या शतकांमधे ख्रिश्चन समाजाने येशूचा जन्म मानला गेलेला आणि म्हणून धर्मासंदर्भातील महत्वाचा महीना डिसेंबर काही पहीला केला नाही.

या वरील दोन मुद्यांवरून लक्षात येऊ शकते की महाभारत कालाचा अंदाज हा केवळ Exclusion Principle नेच करता येणे शक्य आहे.

याचा अर्थ हवा तसा ठोकताळा का? मग इतरत्र हास्यास्पद वाटणार्‍या वर्तकांचे या संदर्भातील तर्क जास्त योग्य वाटतात (त्यांचे उत्तर बरोबर आहे का ते मला माहीत नाही, पण संशोधनातील गृहीत बरोबर वाटते). त्यांनी जो काही काळाचा अर्थ लावला तो महाभारतात व्यासांनी दिलेल्या नक्षत्रांच्या आणि तारकापुंजांच्या स्थिती/वर्णनावरून आणि सध्याच्या खगोलशास्त्रीय संदर्भ घेऊन लावला आहे.

लेखन दोष व इतर काही

श्री. ऋषिकेश यांनी वर म्हटल्याप्रमाणे ही लेखमालिका श्रीकृष्णाने ज्याला प्रथम मास म्हणून संबोधले आहे त्या मार्गशीर्ष मासातच पूर्ण करावी असा मानस होता.त्यामुळे अनवधानाने काही लेखन दोष राहून गेले. ते ज्यांनी दर्शवून दिले त्या सर्वांचे आभार.
१. मौर्य घराण्याचा काल - लेखातील हे वाक्य असे पाहिजे होते.
इ.स.पूर्व २७० (अशोकवर्धन मौर्य काल) या कालापासून भारतीय द्वीपकल्पात बौद्ध धर्माचा भारतात प्रसार झाला. या धर्माचा पगडा इ.स.६०० (हर्षवर्धन गुप्त काल) पर्यंत बराच असल्याने या कालात मूळ महाभारत किंवा जय या ग्रंथाची रचना होणे कठिण वाटते.परंतू मूळ ग्रंथाचे विस्तारीकरण या कालात झाले असल्याची पूर्ण शक्यता वाटते.
२. मार्गशीर्ष हा श्रेष्ठ किंवा प्रथम महिना असल्याबद्दलचा गीतेतला श्लोक १० व्या अध्यायातच आहे. लेखात ११ असा आकडा पडला आहे तो चुकीचा आहे.
३.लोकमान्य टिळकांनी आपल्या ओरायन या ग्रंथात दर्शविल्याप्रमाणे या (महाभारताच्या) कालात नवीन वर्षाचा प्रारंभ, उत्तरायण लागल्यावर (२२ डिसेंबर) ला सुरू होत होता. उत्तरायण चालू होण्याचा काल हा आर्यांच्या धर्मकल्पनांप्रमाणे अत्यंत शुभ काल होता. त्यामुळेच ज्या महिन्यात हा काल सुरू होतो तो महिना म्हणजेच मार्गशीर्ष हा सर्व महिन्यातील श्रेष्ठ महिना कल्पिला असावा असे वाटते.
प्रतिसादांबद्दल परत सर्वांचे आभार
चंद्रशेखर

गृहीतक

श्री. ऋषिकेश यांनी वर म्हटल्याप्रमाणे ही लेखमालिका श्रीकृष्णाने ज्याला प्रथम मास म्हणून संबोधले आहे त्या मार्गशीर्ष मासातच पूर्ण करावी असा मानस होता.

ऋषिकेश ने म्हणले आहे:

"सर्व महिन्यांमधे श्रेष्ठ असा महिना " संपणार्‍या दिवशी लेख टाकला आहात :)

प्रथम मास आहे असे म्हणलेले नाही. तेच श्रीकृष्णाचे, त्याने कुठेही मार्गशीर्षाला पहीला महीना म्हणलेले नाही. हे परत सांगायचे कारण असे की या गृहीतकावर लेखातील निरीक्षणे आणि अनुमान आहेत. जर गृहीतक हेच संदर्भाला धरून नसेल तर अनुमानात पण तृटी येणार किंबहूना वाढणारच...

गृहीतक

आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे. गृहीतक चुकीचे असले तर अनुमान चुकीचे येणारच. मी या लेखात जे गृहीत धरतो आहे ते माझ्या मताने योग्य आहे. या गृहीतकावरून मी काढलेले निष्कर्ष बाकी सर्व गोष्टींचा विचार करता बरोबर असावेत असे निदान मला तरी वाटते. जर एखाद्याला हे गृहीतक चुकीचे वाटत असेल तर मला त्याचा राग लोभ नाही.
चन्द्रशेखर

धन्यवाद

इ.स.पूर्व २७० (अशोकवर्धन मौर्य काल) या कालापासून भारतीय द्वीपकल्पात बौद्ध धर्माचा भारतात प्रसार झाला. या धर्माचा पगडा इ.स.६०० (हर्षवर्धन गुप्त काल) पर्यंत बराच असल्याने या कालात मूळ महाभारत किंवा जय या ग्रंथाची रचना होणे कठिण वाटते.परंतू मूळ ग्रंथाचे विस्तारीकरण या कालात झाले असल्याची पूर्ण शक्यता वाटते.

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. म्हणजे वरील लेखात लेखनदोष म्हणून महाभारताच्या कालनिर्णयाचे वाक्य नाही.

अभिनंदन

लेखमालिका खोलात शिरून वाचली नाही. फक्त वरवर चाळली. नीट वाचून अभिप्राय द्यायचा आहे. पण एकंदर अत्यंत माहितीपूर्ण वाटते आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

हम्म

लेखमालिका खोलात शिरून वाचली नाही. फक्त वरवर चाळली.
असेच बोल्तो

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

धन्यवाद

लेखमालेबद्दल धन्यवाद. आता एकदा सलग वाचन करून मत बनवेन.

युधिष्ठिर राजा सत्तेवर असतांना सप्तर्षी मघा नक्षत्रात

माझ्या कडे असलेल्या बृहत्संहिता
या वराहमिहिरकृत ग्रंथात

आसन्मघासुमुनयःशासतीपृथ्वींयुधिष्ठिरेनृपतौ |
षड्द्विकपंचद्वियुतःशककालस्त्यस्यराज्ञश्च ||
(अध्याय १३, अथसप्तर्षीचारः, श्लोक ३)

असा उल्लेख आहे. म्हणजे युधिष्ठिर राजा सत्तेवर असतांना सप्तर्षी हे मघा नक्षत्रात होते,
(उरलेले गणित तुम्ही करा बॉ! मला गणित फारसे झेपत नाही...)

पुढील श्लोकात सप्तर्षी एका नक्षत्रात १०० वर्षे राहतात असाही उल्लेख आहे.
यावरूनही कालमापनाचा काही तरी लाग लागावा...

वराहमिहिरकृत बृहत्संहिता या ग्रंथाचा काल सुमारे इ.स. ५०० असा मानला आहे. (चू भू देणेघेणे. मी यावर अजून काही डोके लावले नाहीये. आधी ग्रंथावरच वेळ देतो आहे.)

या ग्रंथात विवीध धुमकेतूं विषयीपण अनेक उल्लेख आहेत.
तसेच अध्याय १४ मध्ये भारतात तत्कालिन देशांचे उल्लेख आहेत. नक्षत्रांची स्थिती सांगून मग भारताचा मध्य निश्चित करून सर्व दिशेच्या देशांची माहिती यात दिलेली आहे. ग्रंथात तत्कालिन समाज जीवनाचे सुरेख प्रतिबिंब आहे.

असो,
मी जास्त खोलात जात नाही कारण उपक्रमावर ज्योतिष विषयक काहीही आले तर येथे काही सदस्यांना गंडशूळ, मुळव्याध आणि पित्तकारक प्रकृती उफाळून येतात असे पाहतो आहे, म्हणून तूर्तास इतकेच!

या ग्रंथात महाभारताचा उल्लेख आहे
पण रामायणाचा कोठेही नाही, हे उल्लेखनिय वाटावे!

चंद्रशेखरसाहेब, माझ्या उल्लेखाबद्दल बद्दल आभार! :)

आपला
अविश्वासार्ह, कुडमुड्या ज्योतिषी
गुंडोपंत

ग्रह व तारे

सप्तर्षि व मघा हे सर्व तारे आहेत. ते आकाशात आपापल्या जागी असतात. फक्त ग्रह निरनिराळ्या तारकासमूहासमोर दिसतात
त्यामुळे सप्तर्षिचे तारे मघेच्या तार्‍याजवळ कधीही प्रत्यक्षात दिसणे शक्य नाही. चन्द्रशेखर

हेच म्हणतो

हेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे

मघांत सप्तर्षी ?

.... युधिष्टराच्या कालात ते माघांत होते, सांप्रतही माघांत आहेत. शं.बा.दीक्षित. भा.इ. पान ११८
.. सप्तर्षीचे तारे मघेच्या तार्‍याजवळ कधीही प्रत्यक्षात दिसणे शक्य नाही. चंद्रशेखर.
आली का पंचाईत ?
शरद

हर्षवर्धन गुप्त

हर्षवर्धन गुप्त हा राजा इतिहासात सापडत नाही. सम्राट हर्षवर्धन (इ.स.६०६-६४७) हा पंजाबमधील श्रीकंठ देशातील स्थानेश्वर येथे राज्य करणार्‍या वर्धन घराण्यातील सम्राट. त्याचा गुप्त घराण्याशी संबंध नाही.
शरद

हर्षवर्धन

हर्षवर्धन या राजाच्या नावात गुप्त नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे. नजरचुकीने ते घातले गेले असावे. चु.भू.द्या.घ्या.

चन्द्रशेखर

 
^ वर