वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने

सध्या उपक्रमावर ज्योतिष वर्ग उपचारापुरते का होईना चालू आहेत. त्यात वास्तुशास्राचाही उल्लेख आढळतो. हल्ली वास्तुज्योतिष हा प्रकार फारच बोकाळला आहे. हा वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?
वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतो व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.
(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... वरुन उधृत)
सुप्रसिद्ध ज्योतिषी व. दा भट काय म्हणतात ते पहा.
. सकाळ दि. २०.५.२००६ च्या वाचकांच्या पत्रात पुण्यातील सुप्रसिद्व ज्येष्ठ ज्योतिषी व ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. व.दा.भट यांचे खालील पत्र प्रसिद्ध झाले.
'' बुद्धी गहाण टाकू नका
नुकतेच पुण्यात एका वास्तुतज्ज्ञाचे 'वास्तुशास्त्राने घटस्फोट टाळता येतो` या विषयावर व्याखान झाले. बेडरुममधील आरसा किंवा टीव्ही वगैरे गोष्टी घटस्फोटाला कारणीभूत होउ शकतात, हे ऐकताना आपण पुण्यात नसून बिहारमधील एखाद्या खेडेगांवात आहोत असे वाटू लागले.ज्योतिषी,वास्तुशास्त्रज्ञ याची वाटचाल एकविसाव्या शतकाकडून मध्ययुगीन काळाकडेे होत आहे असे वाटते. ज्योतिषी अडचणी, संकटे यावर उपाय,तोडगे सांगतात, ते ऐकले तर ज्योतिषांनी बुद्धी गहाण टाकली आहे का, असे वाटते. एक पुण्यकर्म म्हणून पक्ष्यांना धान्य टाकले तर काहीच हरकत नाही, पण संकटातून सुटका होण्यासाठी तो उपाय नाही. वाहत्या पाण्यात निखारे सोडा, लाल फडक्यात अमूक वस्तू गुंडाळून ती खिशात ठेवा असे उपाय सुचविणाऱ्या ज्योतिषांनी आपण पुण्यात आहोत हे विसरु नये. नावांत बदल करुन,स्पेलिंग बदलून किंवा वास्तूत काही बदल करुन प्रारब्ध बदलता येत असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्याचा नसताच खटाटोप केला असे मानावे लागेल.``
हे वास्तु ज्योतिषी व फेंगशुई तज्ज्ञ म्हणजे श्री धुंडीराज पाठक होय. या पत्रानिमित्त ज्योतिष वर्तुळात सुद्धा चर्चा झाली. त्याचा प्रतिवादही काही जणांनी वाचकांच्या पत्रातून केला. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक प्रतिष्ठा देउ इच्छिणाऱ्या ज्योतिषांची कधी कधी मोठी पंचाईत होउन बसते. प्रसिद्ध ज्योतिषी श्री नंदकुमार जकातदार यांनी ही वास्तुशास्त्र ही वेगळी बाब असुन ती फलज्योतिषाच घुसडलेली आहे कारण सध्या त्याची चलती आहे असे सांगितले आहे.

प्रकाश घाटपांडे

लेखनविषय: दुवे:

Comments

एक गंमत

वास्तुशास्त्रावर नको तेवढा विश्वास ठेवणार्‍या एका कुटुंबाची गंमत या निमित्ताने सांगावीशी वाटते. माझ्या ओळखीच्या एका मारवाडी कुटुंबाला आमच्या जवळ आमच्याचप्रमाणे बांधलेले घर हवे होते. त्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर धडपड सुरु होती. धडपड म्हणजे, डील्स बघणे, बिल्डरला भेट देणे, साईटला भेट देणे, कर्जाची व्यवस्था आणि इतर गोष्टींचा अभ्यास. असो.

हे सर्व करताना त्यांना ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधून हवे होते. (बिच्चारा अमेरिकन बिल्डर!) आता आमच्या सब-डिविजनमध्ये केवळ चार पाच प्लॉट शिल्लक होते. मोक्याच्या ठिकाणची ही घरे या कुटुंबाला सोडायची नव्हतीच परंतु आपल्या सोयीनुसार घर बांधून हवे होते. (कस्टम बिल्ट हाऊसचा फंडा बिल्डरने लावलेला नसेल तर असे होणे केवळ अशक्य असते.) या कुटुंबातील बाई मला फोन करून जाम वैताग आणत होती की घर पूर्वाभिमुख हवे. स्वयंपाकघर अमुक दिशेला हवे. खिडक्या तमुक दिशेला हव्यात. बैठकीची खोली अमुकतमुक दिशेला हवी. जिना यंव हवा. लाईट्स त्यंव हवेत. वगैरे वगैरे. सर्वात गंमतीशीर गोष्ट म्हणजे तिने मला सांगितले की

घरातील विहिर "क्ष" दिशेला हवी. तसे नसेल तर घर लाभत नाही. मी तिला वैतागून विचारले "इथे अमेरिकेत घराला विहिर आहेच कुठे?"

"सम्प पम्प साठीचा खड्डा आहे ना. त्यालाच विहिर मानायला हवे."

मी कपाळावर हात मारला आणि यांना या सबडिविजनमध्ये घर या जन्मात मिळणार नाही अशी गाठ मनाशी बांधली.

घटस्फोट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

"वास्तुशास्त्राने घटस्फोट टाळता येतो" हा वास्तुशास्त्रींचा दावा निरर्थकच आहे.पण विवाह मुहूर्तांचे काय? लग्ने यशस्वी व्हावी म्हणूनच ती शुभ मुहूर्तावर लावली जातात ना? श्री.व.दा.भट हे ज्योतिषपरिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा विवाहमुहूर्तांवर तसेच कुंडल्या पाहून केलेल्या गुणमेलनावर विश्वास असणारच. हे सर्व यथासांग पाहून लावलेले अनेक विवाह अयशस्वी होतात. घटस्फोटापर्यंत पाळी येते हे वास्तव आहे.श्री. व.दा.भट या विषयी काय बोलतात?
वास्तुशास्त्र हे जसे अर्थहीन आहे तसेच राशिभविष्यही निरर्थकच आहे. संकटातून वाचण्यासाठी वाहत्या पाण्यात निखारे सोडणे हे जसे अचरटपणाचे तसेच शनी पीडा देतो हे मानणे आणि त्याच्या निवारणार्थ ग्रहशांती करणे वेडेपणाचे आहे.

या निमित्ताने

श्री.व.दा.भट हे ज्योतिषपरिषदेचे अध्यक्ष आहेत.

ते जेव्हा अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ चे अध्यक्ष होते तेव्हा त्या निमित्ताने त्यांच्या भाषणावरील भाष्य वाचा http://mr.upakram.org/node/991

प्रकाश घाटपांडे

सहमत

वास्तुशास्त्र हे जसे अर्थहीन आहे तसेच राशिभविष्यही निरर्थकच आहे.

वरील मताशी सहमत आहे.

खप

वास्तुशास्त्र हे जसे अर्थहीन आहे तसेच राशिभविष्यही निरर्थकच आहे.

वरील मताशी सहमत आहे.

बाबासाहेब या निरर्थक गोष्टीवर वर्तमानपत्रांचा खप / टीव्ही चॅनेलचा टीआरपी अवलंबुन असतो. निरर्थक गोष्टींची अनावश्यक खरेदी ग्राहकाला कशी करायाला लावायची हा सध्याच्या मार्केटींगचा पाया आहे.
जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे व नियतकालिके राशीभविष्ये का छापतात? हे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी मधील विवेचन वाचावे.

प्रकाश घाटपांडे

"आपण हसे लोकाला...

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
...शेंबूड आपल्या नाकाला."
ज्योतिष परिषदेच्या अध्यक्षांनी वास्तुशास्त्रींच्या भाषणाची टिंगल उडवणे म्हणजे उपरिनिर्दिष्ट म्हणीसमान स्थिती असे मला वाटते.

हसु येऊन राह्यलं

'वास्तुशास्त्राने घटस्फोट टाळता येतो` याच्यावर लय हसु येऊन राह्यलं. पर एक गोष्ट सांगू का.
शिकल्या सवरल्या लोकायला अशा कैच्या कै गोष्टींची हौस र्‍हाती.

तुम्हाला म्हून सांगतो. घर बांधल्यानंतर पैसे घरात टीकत नाही म्हणून घराची दोनदा वास्तुशांती केली.
पण बर्कतच नाही आमाला. व्यसन नाय अवांतर खर्च नाय.

कितीबी कमावून आणले तरीबी पैशीची वाट पाव्हीच लागते.
वास्तुशांती करताना वैदिक नाय तर पुराणोक्त पद्धतीत काही दोष तर राह्यले नसन ना ? ;-)

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

काय सांगता?

वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये.

आपल्या लेखावरून
वास्तूशास्त्र हे ज्योतिषात काही लोकांनी नवीनच अवतीर्ण केले आहे की काय,
असा गैरसमज होतो आहे,
असे वाटून मी मला माहिती असलेले सांगतो.

वराहमिहिर कृत बृहत्संहिता या ग्रंथात वास्तूशास्त्रा संबंधी विस्तृत विवेचन केले आहे.
वाचा अध्याय ५३, अथवास्तुविद्या

यात राजगृह कसे असावे ते सामान्य माणसाने घर कसे बांधावे याचे चांगले विवेचन आहे.
तेंव्हा वास्तूशास्त्र हे नवीनच घुसडलेले नसून पूर्वीपासून ज्योतिष्याचा भाग आहे.

बाकी ओकाओकी चालू द्या!

आपला
गुंडोपंत

धर्माचे अंग

ज्योतिष हे धर्माचे अंगच होते. त्यामुळे त्यात कुठल्याही गोष्टी घुसडणे त्यावेळी सहज शक्य होते.
ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे . सिद्धांत, संहिता आणि होरा . बृहत्संहिता हा संहितेचा भाग आहे. फलज्योतिष अर्थात होरा या विषयावर वराहमिहिरचा बृहत्जातक हा ग्रंथ आहे. मुळ वास्तुशास्त्र हा शब्द स्थापत्य शी संबंधित आहे. वास्तुरचनाशी संबंधित आहे. शुभ-अशुभत्व हे नंतर घुसडलेले आहे
प्रकाश घाटपांडे

मग तसे म्हणा ना


शुभ-अशुभत्व हे नंतर घुसडलेले आहे

हे तसे म्हणा ना मग...
हे जणुकाही नवीनच काहीतरी आहे असा आव कशाला आणायचा?

असो,
वराहमिहिरचा बृहत्जातक हा ग्रंथ तुमच्या कडे आहे काय? असल्यास मलाही तो विकत घ्यायला आवडेल...
कुठे मिळाला?

आपला
कुडमुड्या आणि अविश्वासार्ह
गुंडोपंत

 
^ वर