आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 7

ऋग्वेदकाल (क्रमश :)

लोकमान्य टिळक यांच्या संशोधनाप्रमाणे, ऋग्वेदाच्या सर्वात जुन्या ऋचा, इ.स.पूर्व 4000 च्या आसपास रचल्या गेल्या असाव्यात. याच कालखंडात भारतीय द्वीपकल्पामधे, सिंधु संस्कृती विकसित होत होती. त्यामुळे साहजिकच असा प्रश्न समोर उभा रहातो की या सिंधु संस्कृतीच्या कोणत्याच पाऊलखुणा ऋग्वेदात कशा दिसत नाहीत? मेहेरगड किंवा हडप्पा येथे सापडलेली त्या कालातली घरे (अर्थात अवशेष या स्वरूपात), इमारती, धान्य साठवण्याच्या जागा, पाण्याच्या टाक्या याचा कुठेच ऋग्वेदात उल्लेख नाही. हडप्पाला मिळालेल्या भाजलेल्या मातीच्या टाइल्सवर, चित्ररूपात दिसणार्‍या गेंडा या प्राण्याचा ऋग्वेदात कोठेही उल्लेख सुद्धा नाही. सिंधु संस्कृतीत अदिती किंवा मातृत्वाचे पूजन करण्यात येत होते. त्याला ऋग्वेदात स्थान नाही. ऋग्वेद हा मौखिक आहे त्याच्या रचनाकारांना कोणत्याही लिपीचे ज्ञान होते की नाही हे सांगता येत नाही. सिंधु संस्कृतीत चित्रलिपीच्या स्वरूपात लिपी अस्तित्वात होती. या उलट, ऋग्वेदात अत्यंत महत्वाचे स्थान पटकवणार्‍या घोडा या प्राण्याचे अस्थि अवशेष किंवा साधे चित्र सुद्धा सिंधु संस्कृतीत सापडलेले नाही. ऋग्वेदातील यज्ञाच्या वेदी, अत्यंत बारकाईने वर्णन केलेली यज्ञयागाची भांडी-कुंडी, सिंधु संस्कृतीच्या अवशेषात कुठेच सापडत नाहीत.

खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर अगदी सरळ आहे. ऋग्वेदातील जुन्या ऋचा रचल्या गेल्या तेंव्हाचे त्याचे रचनाकार किंवा आर्य, हे भारतीय द्वीपकल्पात त्यावेळी मुळी रहातच नव्हते. परंतु ते कोठे रहात होते? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र कठिण आहे. कारण एकतर ते भटके टोळीवाले (Nomads) होते. त्यांच्या गुराढोरांना, घोड्यांना जिथे भरपूर चारापाणी मिळेल अशा ठिकाणी त्यांचे स्थलांतर सतत चालू होते. त्यामुळेच ऋग्वेद किंवा काही इतर ग्रंथातून मिळालेल्या माहितीवरून इतिहासतज्ञांनी काही अंदाज बांधले आहेत. यापैकी काही प्रमुख मुद्दे असे आहेत.

1.भाषा - आज प्रचलित असलेली संस्कृत ही भाषा भारतीय-युरोपियन भाषागटापैकी एक समजली जाते. एका मूळ भाषेपासून (Proto Indo Aryan language) संस्कृत, प्राचीन इराणी व युरोपियन भाषा उगम पावल्या असे मानले जाते. ही भाषाजननी, मध्य एशिया मधे कोठेतरी रहाणार्‍या लोकांची भाषा असावी असे मानले जाते.

2.आर्यांच्या मध्य एशिया मधल्या अस्तित्वाबद्दल एक पुरावा उपलब्ध आहे.(पुस्तक संदर्भ 1, पृष्ठ क्रमांक 107) सिरिया या देशाच्या उत्तर भागातील दोन टोळ्यात (Hittites & Mitannis) इ.स.पूर्व 1400 च्या आसपास एक संधी झाला होता. या करारासाठी काही देवांनी साक्षीदार म्हणून यावे असे आवाहन या करारात केलेले आहे. या देवांची नावे अशी. INDARA(इंद्र), MITRAS(IL) (मित्र), URVANAS(IL) (वरूण). या पुराव्यावरून आर्य सिरियामधे वस्ती करून होते असे जरी म्हणता आले नाही तरी त्या भागात आर्यांचा प्रभाव होता हे नक्की.

3.ऋग्वेद आणि पर्शियन धर्मग्रंथ अवेस्टा हे ज्या भाषांच्यात रचले गेले आहेत त्या दोन्ही भाषा पुरातन इंडो-युरोपियन भाषेपासूनच् जन्मलेल्या आहेत. या दोन्ही रचनांच्यात अनेक साम्यस्थळे आढळतात. ऋग्वेदातला 'स' हा अवेस्टा मधे 'ह' बनला आहे. ही विसंगती ध्यानात घेतली तर या दोन्ही रचनांच्यात अनेक नावे सारखीच असल्याचे आढळून येते. उदाहरणार्थ, होम-सोम, दाह-दास, हेप्त हिंदु- सप्त सिंधु. अहुर-असुर. सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे ऋग्वेदातले इंद्र व देव हे अवेस्टामधे खलनायक बनले आहेत तर असुर हा नायक आहे. या फरकामुळे अशी एक विचारधारा पुढे आली आहे की पर्शियन व भारतीय आर्य हे विचारांच्यातील मतभेदामुळे एकाच गटातून फुटून निघालेले असावेत.
4.सरस्वती - असे मानले जाते की आर्य टोळ्यांनी सरस्वती नदीच्या काठी आपल्या पहिल्या वस्त्या भारतीय द्वीपकल्पात स्थापन केल्या. ही नदी सप्त सिंधु या भूभागात होती व सध्याची घग्गर नदी याच नदीचा एक भाग होती. परंतु याच आख्यायिकेसारखी एक आख्यायिका अवेस्टा मधेही दिलेली आहे. या आख्यायिकेप्रमाणे हरह्वती (स च्या ऐवजी ह) ही नदी हारा (सारा) नावाच्या एका काल्पनिक पर्वतावरून वाहत येते. ती अनेक सरोवरे असलेल्या भागातून वाहते. ऋग्वेदातली सरस्वती वृत्र या सर्पाबरोबर लढाई करते तर अवेस्टामधल्या हरह्वतीच्या वाहण्यात दुष्ट असलेल्या देवांचा एक साथीदार, अंग्र मैन्यू हा अडथळे निर्माण करतो. या दोन्ही आख्यायिकांचा विचार केला तर सरस्वतीची आख्यायिका आर्य टोळ्या भारतीय द्वीपकल्प किंवा पर्शिया यांच्यात वस्ती करण्याच्या आधीची असली पाहिजे हे लगेच लक्षात येते. आर्य मध्य एशियातून आले असावेत या अंदाजाला या आख्यायिकेमुळे पुष्टीच मिळते.

5.कॅनिस मेजर (व्याध ) तारकासमूह - मागच्या भागात ऋग्वेदातील वृशकपी व इंद्र या ऋचेत इंद्राणीने केलेला कुत्र्याचा उल्लेख आपण बघितला आहे. लोकमान्य टिळकांनी (पुस्तक संदर्भ 2) हा कुत्रा म्हणजे कॅनिस मेजर हा तारकासमूह असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्राप्रमाणे आयनिक वृत्ताच्या आसपास जे तारकासमूह आहेत त्यांनाच नक्षत्रे म्हटले जाते व ही 27 आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही तारकासमुहाशी (Constellations) भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्र परिचित नाही. त्यामुळेच या तारकासमुहात असलेला सर्वात ठळक तारा व्याध हाच फक्त आपल्याला परिचित आहे. असे असूनही ऋग्वेदातील कॅनिस मेजरचा उल्लेख, ही रचना भारतीय द्वीपकल्पाच्या बाहेर रचलेली असल्याचे दर्शवते. अवेस्टा आणि ग्रीक पुराणांच्यात मात्र या तारकासमुहाचा कुत्रा म्हणूनच उल्लेख आहे. हा तारखासमूह साधारणपणे आकाशात शरद संपातापासून दिसू लागतो. अवेस्टामधे आणि ग्रीक पुराणांच्यात असलेल्या या कुत्र्याबद्दलच्या आख्यायिका एकाच धर्तीच्या असल्याचे लोकमान्यांनी नमूद केले आहे.

वरील मुद्दे लक्षात घेतले तर आर्य टोळ्या मध्य एशियामधेच इ.स.पूर्व 2000 पर्यंत तरी रहात असाव्या असा अंदाज करता येतो. वर म्हटल्याप्रमाणे, आर्य टोळ्या आपल्या गुराढोरांना व घोड्यांना अन्नचारा मिळेल अशी ठिकाणे शोधण्यासाठी सतत फिरत असत. त्यांची एक शाखा गांधारमधे(पर्शिया) स्थिरावली व दुसरी शाखा, अफगाणिस्तान व इराण मार्गे येऊन सप्तसिंधु प्रदेशात स्थिरावली. यामुळेच अवेस्टा आणि ऋग्वेद यात अनेक साम्यस्थळे आढळतात. आर्यांनी सिंधु संस्कृतीवर आक्रमण केले असे म्हटले जाते पण त्यात फारसे तथ्य नसावे असे आता मानले जाते.

भारतीय द्वीपकल्पात स्थलांतर केलेल्या आर्यांच्याकडे भारतात आधी स्थायिक झालेल्या लोकांच्यापेक्षा जास्त प्रगत तंत्रज्ञान, लोकांना आकर्षित करणारी नवी धार्मिक विचारसरणी व सत्ता प्राप्त करण्याची तीव्र लालसा असली पाहिजे. त्यामुळे थोड्याच शतकात त्यांनी आपल्या व्यावहारिक कल्पना भारतीय द्वीपकल्पात रुजवल्या व रूढ केल्या. भारतीय संस्कृतीला आर्य संस्कृती असेच नाव रूढ झाले.

या नंतरच्या कालात, रामायणातील आदर्शवाद, हडप्पामधली मधली प्रगत समाजरचना व आर्यांची व्यावहारिक (Practical) विचारसरणी या तिन्हींचा मिलाफ होऊन त्या पक्या एकजीव झाल्या व एक नवीच भारतीय संस्कृती उदयास आली असे म्हणता येते. या भारतीय विचारसरणीवर इ.स.600 च्या आसपास, गौतम बुद्धाच्या जन्मानंतर, मोठाच परिणाम झाला. परंतु भारतीय संस्कृतीचे मूळ जनमानसात इतके रुजले होते की बौद्ध विचारसरणी मर्यादितच राहिली.

पुढच्या लेखात आपण महाभारतकालाचा विचार करू.

संदर्भ

1.Early India by Romilla Thapar
2.Orion by B.G.Tilak

लेखनविषय: दुवे:

Comments

भटक्या जमाती आणि नागरी समाज

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.

भारतीय द्वीपकल्पात स्थलांतर केलेल्या आर्यांच्याकडे भारतात आधी स्थायिक झालेल्या लोकांच्यापेक्षा जास्त प्रगत तंत्रज्ञान, लोकांना आकर्षित करणारी नवी धार्मिक विचारसरणी व सत्ता प्राप्त करण्याची तीव्र लालसा असली पाहिजे.

यावर थोडे अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे.

तथाकथित आर्यांच्या टोळ्या अमुदर्याच्या प्रदेशात मध्य आशियातून भारतात आल्या असाव्यात हा कयास योग्य वाटतो. परंतु, आर्य येण्याआधी भारतीयांना घोडे माहित नव्हते हा कयास तेवढासा योग्य नाही. अधिक येथे वाचता येईल. सिंधुसंस्कृतीला आर्यांचे उत्कृष्ट जातीचे घोडे माहित नव्हते असे म्हणता येईल फारतर.

पुढील विचार थोडे विस्कळीत आहेत.

भटक्या जमाती प्रगत तंत्रज्ञानाच्या भानगडीत पडत नसाव्यात. प्रगत तंत्रज्ञान हे नगरांत किंवा स्थायिकांना लागते. भटकणार्‍या जमाती कमीतकमी साधने, सामग्री आणि सुविधा बाळगतात. अर्थात, योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर स्थायिक होणे त्यांनाही पसंत असावेच. जगात इतर भटक्या जमातींचा इतिहास पाहिला तर खडतर जीवन, वाईट हवामान, जमिनीची किंवा चार्‍याची कमतरता या जमातींना "बॅटल ऑफ सर्वायवल"मध्ये प्रवीण करते आणि क्रूरही बनवते. अश्वमेध यज्ञ, आर्यांची युद्धे यांचा संदर्भ येथे लागू होईल. नागरी समाजाच्या गरजा यापेक्षा वेगळ्या असतात. त्यांना प्रगत तंत्रज्ञानाची गरज अधिक असते. आर्यांनी सिंधु संस्कृतीत प्रवेश केला असेल तर तो संजाणला आलेल्या पारशांप्रमाणे केला असेल असे वाटत नाही आणि आले असल्यास ते मूळ गटातून फुटल्याने पारशांप्रमाणेच आश्रय मागण्यासाठीच आले असावेत का काय असा प्रश्न पडतो. या गटांत आणि सिंधु-सरस्वती संस्कृतीवासीयांत युद्ध झाल्याच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. त्यामुळे आक्रमण करण्याजोग्या संख्येत आर्य एकत्र आले नसावेत असे वाटते. याचे कारण हिंदुकुशाचा खडतर प्रदेश असण्याची शक्यताही आहे. तेथून युद्ध करण्याजोगी साधने वाहणे कठिण होते.

पारशांनी जसे भारतात येऊन नंतर व्यापार उदीम आपल्या कौशल्याने वाढवला तसेच आर्यांनी केले असल्यास कल्पना नाही. माझ्या कल्पनेचे घोडे आता संदर्भाशिवाय धावू लागल्याने त्यांना वेसण घालते.

आर्यांच्या इंद्र, वरुणादी देवांना महाभारतात उलथून टाकण्याचा आणि विष्णूला सर्वोच्च स्थानी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दिसतो. गोवर्धन पर्वताच्या कथेचा संदर्भ येथे देता यावा. कालांतराने ऋग्वेदातील देवतांना बाजूला सारण्यात आल्याचे लक्षात येते.

यासर्वांवर अधिक वाचायला आवडेल.

स्पष्टीकरण

प्रियालीच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांबद्दल स्पष्टीकरण
१. सिंधु संस्कृतीतले लोक शांतताप्रिय होते. त्यांच्याकडे सैन्यबले असल्याचे सुद्धा काही पुरावे नाहीत. आर्य टोळ्यांच्याकडे त्या भटक्या असल्याने शस्त्रास्त्रांचे प्रगत तंत्रज्ञान होते.
२.आर्यपूर्व भारतीयांना घोडे माहिती असतील किंवा नसतील पण आर्य टोळ्या या प्राण्याला जे महत्व देत होत्या त्या प्रमाणात काहीही खुणा सिंधु संस्कृती अवशेषात मिळालेल्या नाहीत. किंवा सापडलेल्या प्राण्यांच्या अस्थी अवशेषात, घोड्यांचे अस्थीअवशेष सापडलेले नाहीत.
३. सध्याच्या विचारांप्रमाणे आर्य टोळ्या मुख्यत्वे त्यांच्या जनावराना मुबलक चारापाणी मिळण्याच्या आशेने गांधार मधून सप्तसिंधु प्रदेशात आल्या त्यांचे आक्रमण नसून मायग्रेशन किंवा स्थलांतर होते. भटकी जमात असल्याने साहजिकच ते स्वभावाने अतिशय ऍग्रेसिव्ह असावेत. त्यामुळे संख्या अतिशय कमी असूनही भारतीय द्वीपकल्पातील सत्तास्थाने जिंकण्यात त्यांना यश मिळाले असावे. पारशी आश्रय घेण्यासाठी आले. आर्यांचे स्थलांतर निराळ्या स्वरूपाचे असावे.
४. भारतीय किंवा हिंदु संस्कृती ही रामायण, सिंधु खोर्‍यातील प्रगत रहाणी व आर्य विचारसरणी यांचे एकजीव झालेले मिश्रण आहे. त्यामुळेच हे घटक निराळे करून दाखवणे शक्य होत नसावे.
चन्द्रशेखर

संघर्ष

सिंधूसंस्कृती आणि वेद या पूर्णतः वेगळ्या समाजांचे प्रतिनिधित्व करतात ही माहिती प्रथमच वाचली आहे.

सिंधुसंस्कृतीचा नाश (?) होईपर्यंत त्यांनी बरीच प्रगती केली होती यात वाद नाही. माती भाजून विटा व कौले बनवण्याचे तंत्रज्ञान हे नुसते अग्नी पेटवता येण्याचे (यज्ञात पेटवत असतील तशी होळी) द्योतक नसून अग्नीवर चांगले नियंत्रण मिळवले असल्याचे द्योतक आहे.

ऋग्वेदाच्या ऋचा इ. पू. ४००० मध्ये कोठेतरी भारताबाहेर रचल्या गेल्या असतील त्याचवेळी सिंधुसंस्कृती उदयाला येत असेल हे म्हणणे रास्त वाटते. जेव्हा आर्य सिंधुप्रदेशात आले तेव्हा (इ. पू. १५०० ?)सिंधुसंस्कृती चांगलीच प्रगत झाली असणार.

>>सिंधु संस्कृतीतले लोक शांतताप्रिय होते. त्यांच्याकडे सैन्यबले असल्याचे सुद्धा काही पुरावे नाहीत.
सिंधुसंस्कृतीत समाजाचे उच्च नीच थर होते असे वाचले आहे. दंडव्यवस्था उभी केल्याशिवाय हे टिकून राहू शकत नाहीत. तेव्हा कोणत्यातरी प्रकारचे सैन्यबल असावेच. (कदाचित बाहेरून होणार्‍या आक्रमणापासून/स्थलांतर करणार्‍या टोळ्यांपासून बचाव करावा लागेल ही कल्पनाच अस्तित्वात नसेल).

आर्य व सिंधुसंकृतीतील लोकांच्यात युद्धे झाली नसतील. परंतु, सिंधुसंस्कृतीत शेती केली जात असेल आणि त्या शेतांमध्ये आर्यांनी जनावरे घुसवली असतील तर संघर्षाचे प्रसंग उद्भवत असतील. त्यावेळी गनीमी काव्याचा भाग म्हणून आर्यांनी त्यांचे बांध फोडले असतील का? परंतु अशा प्रकारे ही संस्कृती नष्ट झाली नसावी कारण बांध फोडण्याचे उद्योग इतक्या मोठ्या भूभागावर (पंजाब ते गुजरात) केले जाणे शक्य नसावे. बांध फुटून आलेल्या पुरात नगरे नष्ट झाली नसतील तरी शेतीचा नाश झाल्याने आणि त्याचा प्रतिकार करता न आल्याने तसेच त्याबदल्यात पर्यायी अन्नव्यवस्था नसल्याने उपासमारीने नगरे नष्ट झाली असू शकतील.
(आज शेतजमीन सक्तीने उद्योगांसाठी संपादन केल्यावर त्या स्थानिक शेतकर्‍यांवर अशीच वेळ येत असेल का?)
कदाचित अशी उपासमार होऊ लागल्यावर त्या लोकांना गुलाम म्हणून वापरले जाऊ लागले असू शकेल. नगरांचा वापर करण्याची इच्छाच* आर्यांमध्ये (त्यावेळी) नसल्याने ही नगरे पडीक होऊन नष्ट झाली असतील.

* Aryans did not find those cities of any use . They may have simply abandoned those. The bunds may have broken down by decay due to non maintenance which may have caused the floods and subsequent burial of those cities. पूर येऊ लागले असतील तेव्हा त्या नगरांत कोणी रहातही नसेल.
(वरील बराच भाग ह्या माझ्या कल्पनेच्या भरार्‍या आहेत).

नितिन थत्ते

अवांतर प्रतिसाद

माहिती कशाबद्दल ?
श्री.चंद्रशेखर यांनी लेखनाचे शीर्षक " आपले धर्मग्रंथ कधी लिहले गेले ?" असे देऊन सुरवात केली. त्यात ऋग्वेद, रामायण व महाभारत यांचा विचार करणार असे सांगितले. आतापर्यंतच्या ७ लेखात (१) रामायण इ.स.पूर्व५०० वर्षे व (२) वेद इ.स.पूर्व ४००० ही माहिती दिली. त्यापैकी रामायणाचा काल कसा ठरवला ते सांगितलेच नाही व प्रतिसादाच्या उत्तरात " रामायण ही कवीकल्पना आहे, त्याचा काल कसा ठरविणार ?" असे लिहले. ऋग्वेदाचा काळ इ.स.पूर्व ४००० वर्षे असे लो. टिळक यांच्या ग्रंथावरून सांगितले. व त्याच वेळी वेद हिंदुस्थानाबाहेर लिहले गेले असेही सांगितले. आर्य भारताबाहेर असतांना वेद रचिले गेले असतील कारण इ.स.पूर्व २००० पर्यंत ते भारतात आलेलेच नव्हते. लेखांत अवांतर गोष्टी बर्‍याच आहेत. पण ही माहितीही जुन्या ग्रंथातून गोळा केलेली दिसते.
ज्या वेळी भारतातील सरस्वतीची छायाचित्रे मिळाली नव्हती तेंव्हा सरस्वती-हरस्वती यांच्यातील साम्य शोधणे जरूरीचे असेल, पण आता हरयाणा-राजस्थानील भूतकालीन नदी प्रत्यक्ष पहाता येत असतांना इराण-अफगाणिस्थानातील नदीबद्दल शक्यता वर्तवणे अनाठायी नाही कां ? तसेच मेहेरगड येथील संस्कृती व सिंधू संस्कृती यांबाबतीत. या दोहोंमध्ये किमान २५०० वर्षांचे अंतर आहे.(एक इ.स.पूर्व ६००० ते ७००० वर्षे तर दुसरी इ.स.पूर्व ३५०० च्या अलिकडची.} एक संपूर्णत: प्राथमिक शेतीप्रधान तर दुसरी प्रगतीशील व्यापारी (बाह्य देशांशी व्यापार करणारी,विशेषत: जलमार्गाने !) भौगोलिक समीपता एवढे एकच साम्य सोडले तर तर इतर कोणत्याही संदर्भात त्यांना एकत्र आणणे योग्य नव्हे..
सरस्वती इ.स.पूर्व ३००० च्या सुमारास क्षीण होऊ लागली व अंदाजे इ.स.पूर्व १९०० च्या आसपास लुप्त झाली. सरस्वतीची, महानदाची स्तुती करणारे आर्य भारतात इ.स.पूर्व ३००० ते ४००० असलेच पाहिजेत व ज्या अर्थी हरप्पा संस्कृती इ.स.पूर्व १५०० पर्यंत जीव धरून होती त्या अर्थी किमान २००० वर्षे दोघेही एकावेळी नांदत होते.( आर्यांनी हल्ले करून वा नदीचे बांध फोडून ही शहरे नष्ट केली असे पुरावे उत्खननात दिसत नाहीत. अवांतर माहिती)
आता आणिक एक बुडबुडा फोडावयास हरकत नाही. आर्यांना फक्त लढाय़ा माहीत होत्या, शेती नाही, हे चूक. भारतातील आर्य शेती करत होते, त्यांना नांगर-धान्य पेरणी-पावसाची गरज यांची माहिती होती याचे पुरावे वेदात आहेत. आणि तथाकथित अनार्य केवळ शेती करत, त्यांना लढाया माहीत नव्हत्या हीही एक गैरसमजूत. दाशराज्ञ युद्धात पाच आर्य राजांनी पाच अनार्य राजांची मदत घेऊन आर्य भरतांशी युद्ध केले व युद्ध जवळजवळ जिंकलेही होते. म्हणजे हे "अनार्य" चांगले लढाऊ होते. हे झाले वेदकालीन. महाभारतात तर अनेक अनार्य लढाऊ जमाती युद्ध करत होत्या.
हे खरे की उत्खननात घोड्यांचा संबंध सापडत नाही व वेदांत या संस्कृतीचा उल्लेख नाही. पण जसे आपणाला ५० वर्षांपूर्वी सरस्वतीचाबपुरावा मिळाला नव्हता तसे आज आपण या दोहोंमधले संबंध जाणत नाही असे म्हणणे योग्य. उद्या कळेल सुद्धा, कुणास ठाऊक.
हा सर्व प्रतिसाद अवांतर आहे हे मान्य. शरद

सरस्वती

>>पण जसे आपणाला ५० वर्षांपूर्वी सरस्वतीचाबपुरावा मिळाला नव्हता

आश्चर्याची गोष्ट ही की विकिपिडियावरील सरस्वती नदीच्या माहितीवरील पृष्ठावर "आधुनिक शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या"* सरस्वती नदीचा उल्लेखच नाही. त्यावर सरस्वती म्हणून (मॅक्स-मुलरने मान्य केलेल्या) घग्गर-हाक्रा नदीचा (आणि एका दुसर्‍या नदीचा) उल्लेख आहे. आणि सध्या अस्तित्वात असलेल्या छोट्या सरस्वती नदीचाही उल्लेख आहे. या संबंधाने जालावर कोठेही ऑथेंटिक (विश्वसनीय) वाटेल असा दुवा सापडला नाही. कुणाला सापडल्यास येथे द्यावा. जे काही दुवे दिसतात ते हिंदू विचारप्रचारक संकेतस्थळावर दिसतात. त्यामुळे ती सरस्वती भारत-पाकिस्तानातून वाहात होती हे कसे मानावे?
सांगण्याची गोष्ट ही की हीच ती सरस्वती नदी अशा स्वरूपाचा सरस्वतीबाबत पुरावा आजही मिळालेला नाही.

*मध्यंतरी रामसेतू प्रकरणातही "रामाने बांधलेला पूल" असल्याचे नासाने शोधून काढल्याची वावडी होती. त्यानंतर नासाने तो मानवनिर्मित पूल वगैरे असल्याचे म्हणता येत नसून नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली बेटांची रांग असल्याचा खुलासा केला होता. 'the image may be ours, but the interpretation is certainly not ours' असे नासाने म्हटले होते.

नितिन थत्ते

सरस्वती नदी

सरस्वती नदी संशोधना संबंधीत असाही ब्रिटीश काळातील इतिहास उपलब्ध आहे:

आश्चर्याची गोष्ट ही की विकिपिडियावरील सरस्वती नदीच्या माहितीवरील पृष्ठावर "आधुनिक शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या"* सरस्वती नदीचा उल्लेखच नाही.http://www.mr.upakram.org/comment/reply/2224/35295
विकीपिडीया हे स्वेच्छेने माहीती टंकणार्‍या हौशी लोकांचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे त्याचे महत्व जरी कमी झाले नाही तरी त्यातील माहीती ही कायम शास्त्रशुद्ध अथवा समतोल असेलच असे म्हणता येऊ शकत नाही. म्हणूनच विकीपिडीयाच्या त्याच पानावर असेही म्हणून ठेवले आहे: Whether such a transfer of the name has taken place, either from the Helmand to the Ghaggar-Hakra, or conversely from the Ghaggar-Hakra to the Helmand, is a matter of dispute.

हेलमंड नदीसंदर्भातील एक माहीती देखील मी सरस्वती नदीवरील धाग्यात दिली आहे, त्यातील संदर्भ येथे चिकटवत आहे:

अफगाणिस्थानातील हेलमंड नदीस देखील (तीच) हर्वाटी (उच्चार माहीत नाही, पण इंग्रजी अक्षरे कमी करण्यासाठी लिहीत आहे) नदी आहे असे समजले जाते आणि त्याच संदर्भात हेलमंड नदीस देखील सरस्वती समजले जाते. अर्थात ही नदी इराणमधे जाते ॠग्वेदात म्हणल्याप्रमाणे समुद्रात जात नाही.
एडवीन ब्रायंट (2001). "दि क्वेस्ट ऑफ दी ओरीजीन ऑफ वेदीक कल्चर, ऑक्सफर्ड विद्यापिठ प्रकाशन" पुस्तकात दोन महत्वाचे मुद्दे आहेतः एक आहे तो जॉर्ज एर्डोसी नामक संशोधकाच्या १९८९ च्या शोधनिबंधाचा आहे. त्यात म्हणल्याप्रमाणे, "it would be just as plausible to assume that Saraswati was a Sanskrit term indigenous to India and was later imported by the speakers of Avestan into Iran. The fact that the Zend Avesta is aware of areas outside the Iranian plateau while the Rigveda is ignorant of anything west of the Indus basin would certainly support such an assertion."

ब्रायंटचा दुसरा मुद्दा असा आहे, ""any transfer from Iran to India must have occurred before Iranian developed the h phoneme, since s can become h but never vice versa." (The Sanskrit "s" is replaced with a "h" in Iranian, as in Asura --> Ahura, Sarasvati --> Harahvaiti or Sindhu --> Hindu.)"

आता थोडे सध्याच्या शास्त्रीय जगातले: (फायनॅन्शियल एक्सप्रेस, नोव्हेंबर २७, २००९) मधील बातमी प्रमाणे हरीयाणा सरकार हे ऑईल अँड नॅचरल गॅस कमिशनच्या मदतीने सरस्वतीच्या खोर्‍यातील (ज्याचा उपग्रहाच्या मदतीने आणि ऋग्वेद आदींचा संदर्भ लावून अधुनिक मार्ग शोधला गेला) पाण्याच्या विहीरी खणणे चालू आहे. जालावर या संदर्भात अजूनही माहीती उपलब्ध आहे. आडात आहे म्हणूनच पोहर्‍यात येत आहे.

बाकी उतर/चर्चा त्या चर्चेत करतो...

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हरयाणा राजस्थान मधील लुप्त झालेली नदी

शरदजी म्हणतात तशी एखादी मोठी नदी या भागातून वहात असण्याची पूर्ण शक्यता आहे. नदी म्हटली की त्या काठी वस्त्या या असणारच. प्रश्न फक्त एवढाच आहे की ऋग्वेदात व अवेस्टात वर्णन केलेली नदी ही हरयाणा राजस्थान मधून कशी वहात असू शकेल?
चन्द्रशेखर

माझा गोंधळ होतोय

माझा गोंघळ लक्षात आल्याने प्रकाटाआ.
लेख आवडला

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

वृत्राला मारणारा मन्यु ऋग्वेदसूक्त १०.८३

ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलात मन्युसूक्त आहे. त्यातील एक ऋचा अशी -

अ॒भी॑हि मन्यो त॒वस॒स्तवी॑या॒न् तप॑सा यु॒जा वि ज॑हि॒ शत्रू॑न् ।
अ॒मि॒त्र॒हा वृ॑त्र॒हा द॑स्यु॒हा च॒ विश्वा॒ वसू॒न्या भ॑रा॒ त्वं न॑: ॥ ऋ १०.८३.३

ये मन्यो! बलशालींपेक्षा बलशाली तपाने युक्त शत्रूंचा विघात कर.
शत्रूंना मारणारा, वृत्राला मारणारा, दस्यूंना मरणारा - तू आम्हाला सर्व संपत्ती आण.

येथे मन्यू हा वृत्राला मारणारा आहे. हा मन्यू अङ्र मन्यूशी संबंधित आहे का?

(पण दहावे मंडल हे ऋग्वेदातले सर्वात शेवटी लिहिलेले मंडल आहे, हे विसरता कामा नये.)

वृत्राला मारणारी सरस्वती

ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात सरस्वतीने वृताचा वध केल्याचे म्हटले आहे. ती ऋचा अशी
उत सया नः सरस्वती घोरा हिरण्यवर्तनिः |
वर्त्रघ्नी वष्टि सुष्टुतिम |
| (६.६१.७)
विकीपीडिया या बाबत काय म्हणतो ते पहा.
ग्रिफिथने या ऋचेचे भाषांतर करताना वृत्राऐवजी शत्रू असा शब्द टाकला आहे.
चन्द्रशेखर

 
^ वर