शब्दांचा प्रवास

भाषेची गंमत अनुभवतांना आपल्या संग्रही भाषेचे ज्ञानही सहजपणाने जमा होते हे सांगतांना शांता शेळके यांनी राजीनामा या शब्दाचा गंमतीशीर प्रवास सांगितला आहे.
मी तुमचे काम करायला तयार आहे व मला यासंबधी तुमच्या अटी मान्य आहे (म्हणजे मी राजी आहे) या अर्थाने जे पत्र नोकर मालकाला देतो त्याला राजीनामा असे म्हटले जाते. मूळ अरबी असलेला शब्द मराठीत येतांना मात्र अगदी उलट अर्थाने येतो. माझी तुमच्याकडे काम करण्याची इच्छा नाही (म्हणजे मी राजी नाही ) या अर्थाने मराठीत राजीनामा ( खरे तर नाराजीनामा )दिला जातो.

इंगा दाखवणे या वाक्प्रचाराचा उगम मी कुठल्या पुस्तकात वाचला ते आता आठवत नाही पण हा उगमही असाच रंजक आहे. पूर्वी चर्मकार (चांभार) समाजातील बांधव कातडी कमावण्याचा धंदा करत असत. नुकतेच काढलेले व नदी अथवा तत्सम पाणवठ्यावरून भिजवून वाळत घातलेले कातडे मोठे निब्बर असायचे. त्याला मनासारखा आकार द्यायचा (पादत्राणे बनवण्यासाठी) तर ते पहिल्यांदा नरम पडायला हवे. त्यासाठी या चांभाराकडे इंगा नावाचे औजार होते. त्याने या कातड्याला चांगले बडवून काढले की ते नरम पडे आणि मग ते चांभाराच्या मनासारखे निमुटपणे आकार घेई. आजही एखाद्याला वठणीवर आणायचे तर इंगा दाखवल्याशिवाय पर्याय नसतो.

आपण सहजपणाने भाषा वापरतो पण ती तितक्या सहजपणाने आकाराला आलेली नसते. तिच्यामागे आपले सामाजिक व सांस्कृतिक संचित असते. त्या भाषेच्या नाना कळा समजून उमजून ती वापरली तर ती अधिकाधिक आनंददायी बनते.

टिप. वरील लेखातील माहिती ही संकलन स्वरुपाची आहे. उपक्रमी यात भर घालू शकतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला धागा व माहिती

चांगला धागा व माहिती.

अनेक साध्या शब्दांचा उगम बर्‍याचदा अश्लीलदेखील असतो.

नितिन थत्ते

गलथान

नक्कीच. 'गलथान' कारभार. 'कुत्तरओढ'. कुचंबणा. आदी.

(भोचक)

रविवार पेठ नि कुठेही भेट !

गलथान, कुत्तरओढ, कुचंबणा इत्यादी...

तुमचे निरिक्षण कुत्तरओढ बद्दल बरोबर आहे. गलथान हा शब्द जर गल+थान असा फोडला तर तुम्ही म्हणता तशा दिशेने जाऊ शकेल पण मला वाटते हा शब्द 'गलतान' या अरबी शब्दा वरून आला असावा. गलतान म्हणजे चूक (इनकरेक्ट). ('राँग नंबर' म्हणजे 'रकम गलतान')

त्याअर्थाने चुकीचा कारभार अथवा अनागोंदी (या शब्दामागेही काही छान आख्यायिका आहे) अशा अर्थाने या शब्दाचा मराठीत शिरकाव झाला असावा.

कुचंबणा या शब्दामागची कहाणी जाणून घ्यायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

गलथान्

काही शेळ्यांना गळ्याच्या दोन्ही बाजूला लोंबणारे अवयव् असतात. ते अगदी कुरुप दिसतात्. ते काहीसे गाईच्या सडासारखे दिसतात. थान म्हणजे स्तनचे ग्रामीण रुप. गल म्हणजे गळ्याला लागून् आहे ते. म्हणून गलथान. असाच अजागळ हा शब्द् आहे. अज म्हणजे बोकड आणि गळ म्हणजे ते लोंबणारे प्रकरण.

कुचंबणा

गर्भगळित हाही असाच शब्द आहे.
कुचंबणाची व्युत्पत्ती माहिती नाही.
(मराठीत सहज वापरल्या जाणार्‍या 'लेका' या शब्दालाही असाच अश्लील/लैंगिक संदर्भ आहे).

नितिन थत्ते

अपरोक्ष!

राजीनामा वरुन् असेच एक उदाहरण् आठवले. अपरो़क्ष या (संस्कृत*) शब्दाचा मुळ् अर्थ 'जे डोळ्यांच्या समोर घडले असे', असा आहे असे वाचल्याचे स्मरते. पण सध्या त्याचा अर्थ बरोबर उलटा घेतला जातो.

*तज्ञांनी चुक असल्यास् सांगावे.

परोक्ष अपरोक्ष

उपक्रमवरील मागील चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चुकीचे

"अपरोक्ष"हा शब्द मी तरी "माझ्या नजरेसमोर न घडलेले" याच अर्थाने वापरतो. अर्थात् मी तज्ज्ञ नाही. त्यामुळे माझे म्हणणे बरोबर मानावेच असा आग्रह नाही.

विनायक

चुक्

चुक दुरुस्त केली आहे, धन्यवाद.

राजीनामा

मा राजी ना (मी राजी नाही). एकदम बरोबर.
शरद

नामा म्हणजे मी नाही असे नसावे

मूळ अरबी भाषेत राजीनामा या शब्दाचा अर्थ मी राजी आहे असा आहे. राजीनामा मध्ये नामा हा जो शब्दाचा भाग आहे तो अजून काही अरबी शब्दात येतो. उदा. करारनामा, कबुलीनामा इ. या शब्दातील नामा चा अर्थ लेखी स्वरुपातील मांडणी असा असावा. तो मी नाही असा नसावा.

नामा निराळे राहणे

मूळ अरबी भाषेत राजीनामा या शब्दाचा अर्थ मी राजी आहे असा आहे.

नामा हा शब्द अरबी का फारशी, का दोन्ही? फिरदौसीचा शाहनामाही प्रसिद्ध आहे.

याशिवाय, जाहीरनामा, पंचनामा, हुकूमनामा वगैरे. नामा म्हणजे लिखित किंवा संकलित स्वरुपातील माहिती असे असावे.

नामानिराळे राहणे मधील नामाही हाच का? की नामांतर, नामांकित, नामावली मधील नाव या स्वरुपात येणारा नामा?

शेवटल्या उदाहरणांत संस्कृतोद्भव

नामानिराळे, नामांतर, नामांकित, नामावली येथे संस्कृतोद्भव शब्द आहे.
फारसी (नामह्), संस्कृत (नामन्), लातीन (नोमेन्), या सर्वांचा आदि-शब्द एकच असावा.

नामा म्हणजे

१. नामा म्हणजे पत्र, चिठ्ठी, संदेश. नामा हा फारसी शब्द आहे.

उदा.

सियाही आँख की लेकर मैं नामा तुमको लिखता हूँ
के तुम नामे को देखो और तुम्हें देखे मेरी आँखे

नामा गया कोई न कोई नामाबर गया
तेरी ख़बर न आई ज़माना गुज़र गया

नामाबर म्हणजे पोस्टमन, संदेशवाहक.

२. नामा म्हणजे पुस्तक, दस्तावेज, खत.

उदा. बाबरनामा, जाहीरनामा, पंचनामा, तहनामा मधला नामा

इस दिल का दोगे साथ, कहाँ तक, ये तय करो
फिर इसके बाद दर्ज, दिले-नामा-ए-बय करो

दिले-नामा-ए-बय म्हणजे हृदयाचे विक्रीखत (सेलडीड)

शेवटी चूभूद्याघ्या.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

प्रत्यय आणि उपसर्ग

नामानिराळे, नामांतर, नामांकित, नामावली येथला नाम संस्कृतोद्भव शब्द आहे.

नामानिराळे मध्ये ’नामनिराला’ का झाले नाही? त्यातला नामा फार्सी तर नाही? फार्सीत नामोहरम, नामोनिशान, नामज़द(नामी, प्रसिद्ध), नामदार, नामानिगार(बातमीदार), नामाबर(पोस्टमन), नामा़कूल(फार्सी+अरबी, अयोग्य) हेही शब्द आहेत. म्हणून असे वाटते की नामानिराळा मधला ’नामा’ फार्सी उपसर्ग असावा.--वाचक्‍नवी

हो

नामानिराळा मधला 'नामा' फारसीच आहे. नामज़द म्हणजे नियुक्त. नामाकूल मध्ये 'नामा' नाही. त्यामुळे हा शब्द 'ऑड मॅन आउट' आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

अनेक शब्द

राजीनामा किंवा अपरोक्ष असे उलट अर्थाने रूढ झालेले शब्द अनेक असावेत. इंग्रजीत तर शेकडो आहेत. उदाo फ़ास्ट म्हणजे चपळ किंवा न हलणारा; डस्ट म्हणजे भुकटी पसरणे/ भुक्की झाडून टाकणे; ड्रेस म्हणजे आवरण काढणे/चढवणे; लेफ़्ट म्हणजे शिल्लक राहणे/रिकामे करणे(ही लेफ़्ट लीव्हिंग नथिंग) वगैरे. हिंदीत कल म्हणजे आजच्या आधीचा किंवा नंतरचा दिवस. परवाचा मराठी अर्थ दोनदिवसांमागे किंवा पुढे. भिंतीला रंग काढणे म्हणजे काढून टाकणे किंवा नव्याने लावणे. त्याला मारायचे होते मला, म्हणजे कोण कुणाला मारणार होते? अतिशहाणा म्हणजे वेडा; महाब्राह्मण=हलका ब्राह्मण; महामाया=माया नसलेली कजाग बाई; महायात्रा=अंतिम यात्रा; महा उद्योगी असणे म्हणजे उद्योग न करता नसत्या उलाढाली करणे; उलाढाल=घालमेल/देवाणघेवाण वगैरे वगैरे.--वाचक्‍नवी

महामाया

>>महामाया=माया नसलेली कजाग बाई
महामाया हे बहुधा देवीला उद्देशून म्हणतात. जिला सर्वांनी भिऊन रहावे अशी देवी ती महामाया. म्हणून कजाग बाईला महामाया म्हणत असावेत.
म्हणजे हे उलट अर्थाचे नसावे.
चू भू दे घे

नितिन थत्ते

राजीनाम्याविषयी

राजीनामा शब्दाचा कमीत कमी औपचारिकता म्हणून स्वेच्छेने पदमुक्त होण्याचा अर्ज करणे असा अर्थ असू शकेल. त्या अर्थाने तो नाराजी प्रकट करणारा नामा नाही. पदमुक्त होण्याची इच्छा असण्यासाठी नाराजी सोडून अनेक कारणे असू शकतील. तेव्हा राजीखुषीने पदमुक्त करा यात काही विरोधाभास आढळत नाही. हा अर्थ थोडासा त्या काळातील समाजव्यवस्थेबाबत आहे. वेठबिगार कामगार ज्याप्रमाणे स्वखुषीने पदमुक्त होऊ शकत नाही तसे राजीनामा देणार्‍यांबाबत नसावे.

तुंबड्या म्हणजे काय?

तुंबड्या म्हणजे काय?
तो तर आपल्याच तुंबड्या भरतो आहे म्हणताना ते एखादे पात्र असावे असे वाटते.. मात्र
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी म्हणताना ती एक क्रिया वाटते.

तेव्हा तुंबड्या = एखादे पात्र की (धार लावायची/दगडावर मागूनपुढे घासायची) क्रीया??

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

तुंबडी म्हणजे शोषनलिका

पूर्वी खेड्यापाड्यात शरीरातल्या एखाद्या दूषित झालेल्या भागातलं (उदा. गळू झाल्यामुळे) दूषित रक्त शोषून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची शोषनलिका (पिपेट्) वापरली जायची. तिचं एक टोक शरीराच्या दुखर्‍या भागावर ठेवून दुसर्‍या टोकाला तोंड लावून दूषित रक्त शोषनलिकेत शोषलं जाई. तुंबडीची रचना अशी असे की शोषणाराच्या तोंडाशी शोषलेल्या रक्ताचा संबंध येणार नाही. हे काम न्हावी करीत असावेत. तुंबडी ठराविक मर्यादेपर्यंत भरली की ती रिकामी करून जरूर पडल्यास पुन्हा लावता येत असे. (म्हणून पोट गच्च भरलं की तुंबडी भरली - म्हणजे ते रिकामं झाल्याशिवाय यापुढे खाणं अशक्य आहे -असं म्हणण्याचा प्रघात पडला असावा). जर न्हाव्याला काहीच काम नसलं (रिकामा न्हावी) तर वेळ घालवण्यासाठी तो कुडाला म्हणजे खेडेगावात विशिष्ट सामान वापरून बांधलेल्या कच्च्या भिंतीला तुंबडी लावून बसतो असं म्हणण्याचा प्रघात पडला असावा.
तुंबडीनी रक्त शोषण्याच्या पद्धतीला पर्याय म्हणून जळवा लावूनही ते शोषलं जाई.

धन्यु

मस्त माहिती.

-दिलीप बिरुटे

तुंबडी

तुंबडीचा अर्थ मोल्जवर्थवर शरद कोर्डे यांनी सांगितल्यापेक्षा वेगळा आहे.

मनोगतावर पूर्वी मी दादरकर यांनी म्हणींचा अर्थ दिला होता. त्यात रिकामा न्हावी.... चा अर्थ बघता येईल.

मूळ म्हण "रिकामा नावी कुडाला तुंबे लावी" अशी असावी. मोल्जवर्थवरील अर्थ आणि दादरकर यांचे स्पष्टीकरण मिळते जुळते आहे.

तुंबडीचा अर्थ

मराठी शब्दरत्नाकर ; कै. वा.गो. आपटे यांच्या शब्दकोशात, तुंबडी म्हणजे वाळलेल्या भोपळ्याचे केलेले भिक्षापात्र; शरीरातील रक्त काढण्याचे साधन. असा अर्थ दिला आहे.

स्वतःची तुंबंडी भरणे : स्वतःला पाहिजे तितके पदरात पाडून घेणे.

-दिलीप बिरुटे

हम्म ;-)

तुंबडी म्हणजे वाळलेल्या भोपळ्याचे केलेले भिक्षापात्र; शरीरातील रक्त काढण्याचे साधन.

ओक्के.

पण मूळ म्हण नाविकाबद्दल आहे की न्हाव्याबद्दल? :-) कारण नाविक वर्षातील काही महिने रिकामा राहू शकेल. न्हावी रिकामा का रहावा बरे? वर्षातील काही महिने पुरुषांच्या डोक्यावरील आणि दाढीचे केस वाढत नाहीत किंवा पुरुष त्याकाळात संन्याशांसारखे केस वाढवतात म्हणून न्हावी रिकामे राहतात? ;-) - ह. घ्या. हं.

रिकामा न्हावी

दोन्ही मते योग्य वाटतात (मनोगतावरचे आणि श्री. शरद यांचेही..) चुक-बरोबर कसे ठरवावे?

बाकी न्हावी रिकामा असतो.. सोमवारी/शनिवारी, अमावस्येला वगैरे अजूनही ही दूकाने ओस असतात (तेव्हाच मी जातो हा भाग सोडा ;) )
शिवाय बरेच न्हावी नीट केस कापता येत नसल्यानेही रिकामेच असतात :)

आम्रिकेत स्त्री न्हावी असल्याने बिचारे पुरुष मान खाली घालून गपगुमान बसतात. पर्याय मिळाला तर त्या न्हाविणी रिकाम्या होतीलच ;)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चातुर्मास्?

चातुर्मासात् (तेव्हातरी?) न्हावी रिकामेच असावेत. ;)

रिकामा उपक्रमी...

काहीतरी निरर्थक काम करण्यावरुन त्या म्हणी आल्या असाव्यात.

रिकामा डौल, नाही घरावर कौल. घरात गरिबी असतांना पोकळ बडेजाव दाखविणारा.
रिकामा मापारी कपाळावर हात मारी काम मिळत नसलेला माणूस नशिबालाच दोष देतो.
रिकामे मन कुविचाराचे धन काम नसले की मनात वाईट विचार येतात.
रिकाम्या सुताराची एक म्हण आहे पण आठवेना ? :(

रिकाम्या नाविकाबद्दल काही तरी म्हण असेल, किंवा जोडता येऊ शकेल. बाकी, न्हावी रिकामा का रहावा बरे? पूर्वी खेडेगावात लोकसंख्या कमी असायची, तेव्हा लहानमुलांपासून ते पुरुषमंडळींचे डोक्यावरील एकदा केस काढले की पुढे पंधरा दिवस काहीच काम नसेल. पुन्हा श्रावण वगैरे आल्यावर तर लगेच काम बंद. त्यामुळे न्हावी रिकामे राहात असावे. :)

रिकामा उपक्रमी, अवांतराचा भार वाही. ;)

-दिलीप बिरुटे
[रिकामा उपक्रमी]

रिकाम्या सुताराची

म्हण बरी आठवली नाही हो प्राडॉ? ;) (ह्.घ्या,)
रिकामा सुतार कुल्ले ताशी - अशी आहे ती म्हण!

(कामातला सुतार)चतुरंग

:)

म्हण आठवली. पण तुम्ही एक 'शब्द' [मुद्दाम] विसरला आहात ?
[व्य.नी. टाकला.]

-दिलीप बिरुटे

रिकामा उपक्रमी, अवांतराचा भार वाही

मस्त धागा...

भारताबाहेर भटकताना बरेच वेळा अगदी नेहमीतल्या वापरातले मराठी शब्द अचानक त्यांच्या मूळ रूपात आणि मूळ अर्थासकट अचानक समोर उभे ठकतात. त्यावेळी खूप दिवसांपासून न भेटलेला चांगला मित्र अचानक ध्यानी मनी नसताना परक्या गावात अचानक भेटल्यासारखा आनंद होतो. सौदी मधे एका गादीच्या दुकानावर मरातब हा शब्द वाचून अगदी असेच झाले होते. तसेच 'फक्त', 'व', 'ऐलान' वगैरे शब्द भेटले तेव्हाही असेच झाले.

पण शब्दांचा प्रवास होताना अर्थबदल (कधी कधी अर्थ पूर्णच बदलतो तर कधी केवळ अर्थछटाच बदलते.) होताना दिसते तेव्हा गंमत वाटते. आपण 'तमाम' हा शब्द 'संपवणे, खतम करणे' या अर्थाने वापरतो. पण अरबी शब्द 'छान, उत्तम, चांगले' अशा अर्थाने जातो. म्हणजे एखाद्याचे काम तमाम करणे म्हणजे 'त्याचे भले केले' अशा व्यंगार्थाने वापरले गेले आणि मग तोच अर्थ त्या शब्दाला चिकटला.

बिपिन कार्यकर्ते

तमाम

आपली संस्कृती निवृत्तीपर असल्याने जीवनातून सुटका होणे म्हणजे 'भले होणे' असे समजले जाते. त्यामुळे आपल्याकडे काम तमाम झाले म्हणजे त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचे भले झाले असे समजत असावेत. ;)

नितिन थत्ते

तमाम

तमाम होणे म्हणजे संपणे ह्या अर्थी हिंदीत वापरला जातो. मी तमाम हा शब्द मराठीत मुख्यतः सर्व ह्या अर्थाने वापरलेला पाहिला आहे. तमाम जनता वगैरे.

तमाम

हिंदीतही तमाम हा सर्व या अर्थाने वापरला जातो. "तमाम सबूतोंको मद्देनजर रखते हुवे अदालत इस नतीजेपर......" हे आपण असंख्य वेळा ऐकले आहे.

नितिन थत्ते

तमाम

तमाम अरबी शब्द आहे. आणि अर्थ आहे, सर्व,समस्त,संपूर्ण,अखिल.
अभारतीय शब्दकोशातून साभार....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही...

तमाम अरबी शब्द आहे.

बरोबर.

आणि अर्थ आहे, सर्व,समस्त,संपूर्ण,अखिल.

चूक. तमाम या अरबी शब्दाचा अर्थ 'छान, उत्तम' असा आहे.

उदा.

केफ हालक? (काय म्हणताय? कसं काय?)

तमाम / खुल्लु तमाम (छान / एकदम छान)

बिपिन कार्यकर्ते

चूक कशावरुन ? उपक्रमी काय म्हणतात ?

"तमाम सबूतोंको मद्देनजर रखते हुवे अदालत इस नतीजेपर......"

वरील वाक्य पाहता 'तमाम' शब्दाचा अर्थ 'उत्तम, छान' कसा होईल. तमाम म्हणजे 'सर्व' असा होईल असे वाटते. मी लिहिलेला अर्थ 'अभारतीय शब्दकोषातून घेतला आहे. ते मला चूक वाटत नाही. चूक म्हणनार नाही. आपण म्हणता तसाही अर्थ असेल का ? 'अरबी' 'उर्दु' बोलल्या जाणार्‍या देशात आपण राहता, तेव्हा तो शब्द आपण ऐकला आहे, त्याचा अर्थ आपणास माहिती आहे, असे समजतो. अर्थात आपल्या दाव्याबाबत उपक्रमींचे काय मत आहे ?

मोल्जवर्थवर तमाम पाहावा..!

-दिलीप बिरुटे

तमाम!!!

मालक, मी 'तमाम' या शब्दाच्या मूळ अरबी अर्थाबद्दल बोलतोय आणि तुम्ही उर्दू मधले वाक्य उदाहरण म्हणून देत आहात. असे कसे चालेल? अरबी आणि उर्दू मधे फरक आहेच. लिपीही साधारण सारखी असली तरी बरीचशी भिन्न आहे. त्यामुळे 'तमाम'चा अरबी अर्थ आणि त्या शब्दाचा उर्दू आणि त्याद्वारे मराठीत आल्यावरचा अर्थ यात फरक आहेच.

मला जेव्हा पहिल्यांदा तमाम हा शब्द अरबीमधे सापडला तेव्हा माझ्या अरबी मित्राने त्या शब्दाचा अरबी अर्थ सांगितला, त्यावर त्याला मी तो शब्द माझ्या भाषेतही आहे आणि त्याचा अर्थ 'खतम' (हाही अरबीच शब्द, बाय द वे), संपूर्ण असा काहीसा आहे असे सांगितले तेव्हा त्यालाही गंमतच वाटली होती.

माझ्या मूळ प्रतिसादात मी 'तमाम'च्या मूळ अरबी अर्थाबद्दल लिहिले होते. उर्दू वगैरे मधल्या अर्थाबद्दल नाही. तुम्ही दिलेला मोल्जवर्थाचा दुवाही मराठी अर्थाबद्दलच बोलतो, अरबीबद्दल नाही.

अर्थात आपल्या दाव्याबाबत उपक्रमींचे काय मत आहे ?

एक छोटीशी सुधारणा... 'अर्थात आपल्या दाव्याबाबत अरबी जाणणार्‍या उपक्रमींचे काय मत आहे ?'.

आता एक पृच्छा : अभारतीय शब्दकोश हे काय आहे? जालावर उपलब्ध आहे का? असल्यास दुवा मिळेल का? वाचायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

आपण म्हणता ते बरोबर असेलही (!) पण् आम्ही म्हणतो ते चूक नव्हे.

मोल्सवर्थकृत मराठी शब्दकोश, [छापील शब्दकोश] भाषाशब्दकोष, [हिंदी] आदर्श मराठी शब्दकोश, [मराठी] आणि मराठी विश्वकोश, खंड ७ वा. [तमाम यात सापडला नाही] वरील 'तमाम' शब्दकोशात तसेच मराठी,हिंदी, या शब्दसंग्रहात 'तमाम' चा अर्थ आम्ही आमच्या प्रतिसाद लिहिला तसाच आहे. 'अरेबीकचा' उर्दुचा, शब्दकोश आमच्याकडे नाही. ज्या 'अरबी' तून 'तमाम' शब्द आला आहे. त्या शब्दाचा अर्थ मराठी,हिंदीत आपण म्हणता तसा नाही. तेव्हा, तमाम शब्दाचा अर्थ वरील सर्व अर्थांसहीत उत्तम,छान, असाही असला पाहिजे. तेव्हा आपण म्हणता ते बरोबरही असेल (!) पण आम्ही म्हणतो ते चूक नव्हे, इतकाच या चर्चेचा सारांश. :)

आपल्या दाव्याबाबत अरबी जाणणार्‍या उपक्रमींचे काय मत आहे ?'.

उपक्रमावर खातं आहे की नाही, माहित नाही. गूढ माझ्या मनीचे या अनुदिनीवर सुंदर कविता करणार्‍या कवयत्रि आदरणीय सौ. जयश्री अंबासकर या अरबी जाणतात असे माझे मत आहे त्यांनाच 'तमाम' चा अर्थ विचारला त्या म्हणतात 'तमाम चा मराठीतून अर्थ सर्व, समस्त, संपूर्ण, अखिल असला तरी इथे अरबी भाषेत तुमचा मित्र म्हणतो तसा "छान, उत्तम " असाच आहे. ते लोक म्हणतात, "कुल्लू तमाम" म्हणजे सगळं काही उत्तम आहे. All Well !! '' तेव्हा त्याचा अर्थ आपण म्हणता तसा आहे, असे मानन्यास आम्ही तयार आहोत. :)


अभारतीय शब्दकोश हे काय आहे?

रामदासस्वामी उर्फ रामदास बिसन सोनार या मराठीचा अभिमान बाळगणार्‍या गृहस्थाने परकीय भाषेतून येणार्‍या शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुचविले आहेत. इंग्रजी,उर्दु,अरबी,संस्कृत,पारशी,कानडी,इटालीयन,फ्रेंच, इत्यादी भाषेतील शब्द जे मराठीत रुढ झाले आहेत त्यांना प्रतिशब्द त्यांनी दिले आहेत.
जालावर उपलब्ध आहे का?
नसावे.
असल्यास दुवा मिळेल का?
-निरंक-
वाचायला आवडेल.
आपणास आवश्यक असेल तर, झेरॉक्स प्रत पाठवीन.

असो, आपल्यामुळेच 'तमाम' चा अर्थ 'उत्तम''छान' असाही आहे याचे ज्ञान झाले. मन:पुर्वक आभार...!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फारसीमध्ये तमामशुद

भारतीय भाषांमध्ये हा शब्द थेट अरबीमधून न येता अरबी->फारसी->हिंदी/मराठी या वळणदार मार्गाने आला असावा.

फारसीमध्ये बहुधा "उत्तम" आणि "समाप्त" दोन्ही अर्थ सापडतात. ग्रंथाच्या शेवटी "तमाम शुद" (शाब्दिक अर्थ बहुधा "उत्तम रीत्या परिपूर्ण झाले", लाक्षणिक अर्थ "समाप्त झाले") असे शुभवचन असते.

"तमाम" चा वापर

"शेवट" आणि "सर्व " अश्या अर्थाने होतो याची दोन उदाहरणे.

"तमाम उम्र का हिसाब माँगती है जिंदगी" ही "ये क्या जगह है दोस्तों" या "उमराव जान" या चित्रपटातल्या गाण्यातली ओळ. इथे "तमाम"चा अर्थ सर्व (आयुष्य).

दुसरे उदाहरण आहे

"डूब गया दिन शाम हो गयी
जैसे उम्र तमाम हो गई"

या जुन्या "दाग" मधल्या लताच्या "प्रीत ये कैसी बोल री दुनिया" या गाण्यातल्या ओळी. इथे "तमाम" चा अर्थ (आयुष्य) संपले असा आहे.

विनायक

 
^ वर