मराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण

मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...

http://tinyurl.com/y8pzet3

त्यातील खालील दोन सूचना मला व्यवहार्य वाटल्या नाहीत.
१) श चे लेखन करताना देठयुक्त करावे. गाठयुक्त करू नये.
२) ल चे लेखन करताना दंडयुक्त करू नये.

सध्या सगळीकडे श देठयुक्तच लिहिला जातो. तर ल बहुतेक ठिकाणी दंडयुक्तच असतो. आता जुन्या पद्धतीने श आणि ल लिहावा हा आग्रह कितपत व्यवहार्य आहे? निव्वळ या दोन अक्षरांसाठी वेगळा फॉन्ट बनविणे, डाऊनलोड करणे खूपच वेळखाऊ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. यात थोडी लवचिकता दाखवायला हवी.

खालील दोन निर्णय मात्र अतिशय स्वागतार्ह वाटले.
१) अ‍ॅ आणि ऑ यांचा वर्णमालेत समावेश:
अ‍ॅ आणि ऑ हे मराठीत असलेले परंतु इंग्रजी शब्दांमध्ये वैपुल्याने वापरले जाणारे असे दोन स्वरोच्चार आहेत. त्यांचा स्वरांमध्ये समावेश करण्याची आवश्यकता असल्यामुळे वर्णमालेमध्ये, स्वरांमध्ये उच्चारस्थानानुसार अ‍ॅ ए नंतर आणि ऑ ओ नंतर चा समावेश करण्यात आलेला आहे.

२) सॉर्टींग ऑर्डरः
वर्णक्रमाचा विस्ताराने उहापोह केला गेला आहे, ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. पण हा वर्णक्रम नक्की करताना युनिकोडचे सध्याचे धोरण विचारात घेतले गेले आहे का?

शासनमान्य वर्णक्रमः
अंक - विरामचिन्हे - स्वर - स्वरादी - व्यंजने - विशेष संयुक्त व्यंजने

युनिकोडचा वर्णक्रमः
विरामचिन्हे - स्वरादी - स्वर - व्यंजने - विशेष संयुक्त व्यंजने - अंक

वर दिलेल्या क्रमात बदल असू शकतो. मी फक्त एस.क्यु.एल क्वेरी वापरून वरील क्रम पाहिला. युनिकोड मानकात वर्णक्रमाबाबतचे धोरण काय आहे?

Comments

जोडाक्षरांचे नियम

मी 'गमभन'मध्ये यातील जोडाक्षरे काढून पाहिली. त्यात ३ प्रकारचे शब्द लिहिता आले नाहीत.

१) ट, ठ, ड, ढ आणि ह ही व्यंजने आधी आल्यास आणि त्यांच्यापुढे 'य' हे व्यंजन आल्यास त्याचे लेखन '*य' असे करून जोडाक्षर लिहावे. उदा. कोट्यावधी वाट्याला (पान ७ - ३ ब)
२) मुद्दा हा शब्द मला सरकारी नियमाप्रमाणे लिहिता आला. पण मुद्द्याला हा शब्द नियमाप्रमाणे लिहिता आला नाही.
द चे द्वित्त लिहिताना 'द्द' असे लिहावे. -- हे जमले.
'मुद्दा', 'हुद्दा' या शब्दांमध्ये 'द' चे द्वित्त आहे. यांतील 'द्द' ला 'या' जोडताना 'द्या' असे न लिहिता 'द्द्या' असे लिहिणे आवश्यक आहे. (पान ८ - नियम ५) -- हे लिहिणे जमले नाही.
३) उभी जोडणी : या जोडणीमध्ये व्यंजने एकाखाली एक जोडून लिहिली जातात. फक्त क, ट, ठ, ड, ढ, द, ल या व्यंजनांची जोडणी एकाखाली एक अशी करावी. उदा. खड्डा, पट्टा (पान ८ - नियम ५)
युनिकोडमध्ये ते शक्य नाही असे दिसते. काही जोडाक्षरे मात्र दोन्ही प्रकारे लिहीली जातात. उदा. अन्न

य ला जोडलेले द्वित्त

भाडेपट्ट्याने व मुद्द्याला हे दोन शब्द कसे लिहायचे या बाबतीत तज्ज्ञ मंडळी काही मदत करू शकतील का?

http://saraswaticlasses.net/images/allwrong.jpg
Jodakshar

यातील कोणते शब्द बरोबर आहेत?

चर्चा व्हावी

शासनाचे आभार. शंतनू यांनी सर्वप्रथम 'उपक्रमवर' माहिती दिल्याबद्दल त्यांचेही आभार...!

'श' आणि 'ल' च्या विचाराशी सहमत. श ला देठ द्यायची आणि 'ल' ला दंड न देऊ नये हे काही सुलभीकरण झाले नाही. [ल सापडेना गुगलूनही]

मुद्द्याला ऐवजी सरळ मुद्याला सोपे होते.
अवघड झाले उलट. :(

अ‍ॅ 'ऑ' स्वरांचा वर्णमालेत समावेश झाला हे बाकी बरं झालं.
मराठीतील काही शब्द लिहितांना 'लृ' फारसा वापरात नाही.
तेव्हा वर्णमालेत समावेश नसता तरी चालले असते, असे वाटते.

'ऐ' वर एक मात्रा, दोन देता येणार नाही. ही गुंतागुंत राहीलीच.
मागे त्यावर चर्चा झाली होती त्याची आठवण झाली.

असो, शासननियम वाचून चर्चा व्हावी. म्हणजे काय काय बदल झाले ते कळतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शासनपुरस्कृत लिखाण योग्य.

हिंदी लिहिताना आधी शिरोरेघ काढली जाते आणि मग हात न उचलता रेघेखाली अक्षर. मराठीत आधी अक्षर आणि मग शिरोरेषा. त्यामुळे हिंदी अक्षरे मराठीपेक्षा वेगळीच दिसतात. युनिकोडच्या संकेतस्थळावर दिलेली देवनागरी अक्षरे हिंदी वळणाची असल्याने ती मराठीसाठी कधीच योग्य नव्हती. त्या अक्षरांत नुक्तावाले क,ख, ग, ज, ड, ढ, फ़, र आणि ळ आहेत, पण मराठीसाठी आवश्यक असे नुक्तावाले च-छ-झ-व-ञ नाहीत. अर्थात मराठी श आणि ल नाहीतच.
त्यास्तव महाराष्ट्र सरकारने परत देऊ केलेला मूळ मराठी शेंडीफोड्या श, आणि (कुबडी घेतलेल्या लंगड्या श ऐवजी) भरतनाट्यम करणार्‍या नर्तकीसारखा दिसणारा डौलदार ल, यांचा स्वीकार करताना सरकारला अजिबात विरोध करू नये. टकलू श आणि लंगडा ल पाहून पाहून खूप वैताग येत असे. आता तरी शहाणे व्हावे आणि मूळ मराठी श-ल चा पुनरुद्धार करावा. हे श-ल परत मिळावे यासाठी अनेक मराठीचे अभिमानी प्रयत्‍न करीत होते, त्यांचा आवाज़ शासनापर्यंत पोचला म्हणायचा!
शासनाने स्वीकारलेला ख मात्र मला अजिबात आवडत नाही. ’व’च्या पेकाट्यात ’र’ने दुगाणी झाडल्यासारखा तो दिसतो. त्यातल्या र चा शेपटा ’व’ला नेमका कुठे जोडायचा हे निश्चित नसल्याने ख्रिस्त(ख्‌रिस्त) आणि खिस्त(ख्‌+इस्त) हे शब्द सारखेच उमटतात. त्यापेक्षा र आणि व शेजारी ठेवून लिहिलेला मूळ संस्कृत ख अधिक चांगला होता. वरच्या शिरोरेषेवरून सहज ओळखता येत असल्याने खसखस हा शब्द कधीही रवसरवस असा वाचला जात नव्हता. इंग्रजीमध्ये अनेक फ़ॉन्टांत(उदा. टाइम्स् न्यू रोमन्) एफ़्‌ आणि आय्‌ शेजारी टंकले की एच्‌ उमटला असे वाटते आणि आर्‌ आणि एन्‌ पासून एम्‌ (r+n=rn)होतो. अशा जोड अक्षराला इंग्रजीत लिगेचर असे म्हणतात असे इंग्रजी शब्दकोशांत दिलेले असते. कुणीही असल्या लिगेचरांविरुद्ध आवाज़ उठवला असे ऐकिवात नाही. त्यामुळे संस्कृत ’ख’ ला विरोध केलाच पाहिजे असे नाही.
जोडाक्षराची उभी मांडणी शासनाने स्वीकारल्याबद्दल शासनाचे जितके आभार मानावेत तितके थोडेच.
अं-अ: आणि अ‍ॅ 'ऑ' यांच्या वर्णमालेतील क्रमाविषयी शासनाचे मत मात्र विवाद्य आहे.--वाचक्‍नवी

व्यवहार्य?

श आणि ल कसा काढावा हे सांगणार्‍या शासकीय अध्यादेशातीलच श आणि ल जर चुकीचे असतील (पहा - पान १ ते ३) तर त्याची व्यवहार्यता तिथेच स्पष्ट होते असे आपल्याला वाटत नाही का? "जोडाक्षराची मांडणी उभी करावी" असा नियम करून ती उभी होणार नाही. याला शासनाची तर मान्यता मिळाली पण सर्वसामान्य माणसाची मान्यता मिळेल का हे येणार्‍या काळातच ठरेल.

तंत्रज्ञान

१.
तंत्रज्ञानच्या सोयीसाठी अक्षरे बदलली तर ती लोकमान्य होतातच असे नाही. तंत्रज्ञान आवश्यक ते बदल स्वतःत करून घेते.
सावरकरांनी टाइपरायटरला समोर धरून त्यातील अक्षरांची (टाइपांची) संख्या कमी करता यावी म्हणून अ ला उकार, इकार आणि एकार काढायची पद्धत सुचवली होती पण ती सर्वमान्य झाली नाही आणि रेमिंग्टन, गोदरेज आदिंनी ए, इ आणि उ अशीच अक्षरे असलेले टाइपरायटर बनवले. आता टाइपरायटरच कालबाह्य झाल्यामुळे तो प्रश्नही नाहीसा झाला आहे.
२.
शासनाने संगणकीकरणाच्या सोयीसाठी अक्षरे बदलली आहेत असे काहीसे म्हटले आहे. परंतु संगणकावरील आणि आंतरजालावर श आणि ल अशी अक्षरे अगोदरच रूढ झाली आहेत. तसेच ती नसली तरी सध्याच्या यूजर फ्रेंडली जमान्यात तंत्रज्ञानाने यूजरला हवे ते द्यायला हवे. तंत्रज्ञानासाठी यूजरने बदलण्याची अपेक्षा करू नये.
लोकसत्ताच्या सध्याच्या साईटवर शेंडीफोड्या श आहे. तर जुन्यासाईटवर आणि मटाच्या सध्याच्या साइटवर मात्र गाठवाला श आहे.
३.
मिसळपाव आणि उपक्रम ही दोन्ही ड्रुपल आधारित संकेत स्थळे असून सुद्धा दोन्ही कडे अक्षरे काढण्याची पद्धत वेगवेगळी का ते कोडे उलगडलेले नाही. (मिसळपावः ज्ञ = द्+न्+य् ; उपक्रम: ज्ञ = ज्+न्)
४.
उभ्या जोडाक्षरांविषयी. आज उपक्रमावर/मिसळपाववर जोडाक्षरे इंटरनेट एक्सप्लोअररवर उभी दिसतात आणि मॉझिलावर आडवी दिसतात. (फाँटही वेगवेगळे दिसतात).
(३ व ४ हे संगणक तंत्रज्ञानात निरक्षर असल्याने लिहिले आहे. जाणकारांनी माफ करावे).

नितिन थत्ते

तंतोतंत सहमत

सध्याच्या यूझर फ्रेंडली ज़मान्यात तंत्रज्ञानाने यूझरला हवे ते द्यायला हवे. तंत्रज्ञानासाठी यूझरने बदलण्याची अपेक्षा करू नये.
या विधानाशी शंभर टक्के सहमत. संगणकावर जर चिनी लिपी बसू शकते तर मराठीतली चारदोन अक्षरे का टंकता येऊ नयेत? एकच कारण, मराठी तंत्रज्ञांना मराठीचे अजिबात प्रेम नसते. आणि थोडेफार प्रेम असलेच तर ते मराठी परंपरेबद्दल अनभिज्ञ असतात. उपक्रमावर अ वर चंद्र देता येत नाही, स्वरावर रफार देऊन लिहायची नैर्‌ऋत्य, कुर्‌आन, हविर्‌अन्‍न सारखी अक्षरे टंकता येत नाहीत. इतकेच काय पण नुक्तावाल्या अक्षरांची बाराखडीदेखील जमत नाही. कारण परत तेच. प्रेम आणि ज्ञानाचा अभाव!
खास माहिती: मनोगतावर कुबडी घेतलेला ’ल’ नसून चांगला अस्सल मराठी गुटगुटीत, गोबर्‍यागोबर्‍या गालाचा, डौलदार व बांधेसूद ’ल’ असतो. त्यांना कुठून मिळाला?--वाचक्‍नवी

अर्धचंद्र आणि इतर

उपक्रमावर अर्धचंद्र देता येतो. उदा. चाँद
त्यासाठी असे टाईप करा.
chOMda
दुसरे उदाहरण गँवार
त्यासाठी असे टाईप करा.
gEMvaara

अस्सल मराठी ल मनोगतावर असल्याचे आपले मत बरोबर आहे. दुसरे असे की मनोगतावर एकच शब्द/अक्षर अनेक पद्धतीने टाईप करता येतो. उदा. ज्ञ साठी मनोगतावर dny किंवा jYaयापैकी काहीही चालते तर उपक्रमावर फक्त jYa चालते. असे इतर अनेक शब्द/अक्षरांबद्दल दाखवता येईल.

दुसरी उपक्रमावरची वैताग आणणारी पद्धत म्हणजे प्रत्येक अकारांत शब्दाच्या शेवटी a टाईप केला नाहीतर पायमोडके अक्षर उमटते तसे मनोगतावर नाही.

विनायक

वाचक्नवी यांना फक्त अ वरील चंद्राबद्दलच बोलायचे असावे. ए फॉर ऍपल मधील ऍ म्हणत असावेत. मिसळपावावर सुद्धा काही महिन्यांपूर्वीच (नवीन सर्वरवर मायग्रेट झाल्यावर)योग्य प्रकारे ऍपल लिहिण्याची सोय उपलब्ध झाली आधी तेथेही ऍ च होता.

नितिन थत्ते

पायमोडकी अक्षरे

दुसरी उपक्रमावरची वैताग आणणारी पद्धत म्हणजे प्रत्येक अकारांत शब्दाच्या शेवटी a टाईप केला नाहीतर पायमोडके अक्षर उमटते तसे मनोगतावर नाही.---विनायक
आपल्याकडे जर बरहाचे मराठी फ़ॉन्ट्‌स असतील तर उपक्रमावर ’इंग्रजी’चा पर्याय ठेवून मराठी टंकता येते. बरहामध्ये अकारान्‍त शब्द टंकित केल्यावर इंग्रजी a टंकायची गरज़ नसते. असे मी पहिल्यापासून करीत असल्याने, मला वैताग येण्याची संधीच मिळाली नाही आहे. मध्येच रोमन अक्षरे उमटवायची असतील तर F11 किंवा F12 या कळी दाबून फ़ॉन्ट बदलता येतात. त्यासाठी उपक्रमाच्या पानाच्या वरच्या टोकाला जाऊन मराठीचे इंग्रजी करायच्या लिहिण्याच्या पद्धतीचा पर्याय वापरावा लागत नाही.
पायमोडक्या अक्षरासाठी ^ किंवा ^^ या कळी आहेत.

’बरहा’मध्ये उभ्या किंवा आडव्या ज़ोडणीच्या ज़ोडाक्षरांचा विकल्प असतो. उदाo क्क किंवा क्‍क, च्च किंवा च्‍च, च्‍र किंवा च्र, क्‍ष किंवा क्ष वगैरे. शिवाय, र्‍हस्व आणि दीर्घ मात्रा(ऎ-ए, ऒ-ओ) हेही ठसे उपलब्ध आहेत.
मनोगतावर लिहिता येतो तसा ’अ’वर चंद्र, किंवा ’अ’ला वेलांटी-मात्रा-उकार देण्याच्या युक्त्या मात्र बरहावर मला अजून सापडलेल्या नाहीत---वाचक्‍नवी

अ‍ॅ आणि ऑ

अ‍ॅ आणि ऑ

दक्षिणेत, सिंहलभाषेत 'अ‍ॅ' स्वर यौरोपीय आक्रमणापूर्वीपासूनच अस्तित्त्वांत आहे. सिंहलभाषेतील स्वरक्रम ह्याप्रमाणे:

अ, आ, अ‍ॅ, अ‍ॅऽ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ए, एऽ, ऐ, ओ, ओऽ, औ,

सिंहल स्वरमालेमध्ये ऑ, ऑऽ, लृ, लॄ, अं, अ: हे स्वर पूर्वी अस्तित्त्वांत असल्याचे सांगितले जाते, परंतु माझ्या अभ्यासात मला तसे आढळले नाही.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

विशेष संयुक्त व्यंजने

परिशिष्ट एक कलम ५ - क्ष आणि ज्ञ हे देवनागरी वर्णमालेतील परंपरेने चालत आलेले विशेष लेखन चिन्हाकार आहेत. वास्तवात ती जोडाक्षरेच आहेत. म्हणून या दोन जोडाक्षरांचा वर्णमालेमध्ये 'विशेष संयुक्त व्यंजने' म्हणून निर्देश करण्यात आला आहे.

यालाच जोडून र्‍य आणि र्‍ह या दोन जोडाक्षरांचा देखील वर्णमालेत समावेश व्हायला हवा. ते शक्य नसेल तर निदान युनिकोडच्या वर्णमालेत यांचा समावेश होऊ शकतो का याची चाचपणी करायला हवी. तसे झाले तर अर्ध्या र चा प्रश्न कायमचा निकाली निघेल. चंद्रकोरीतला र् फक्त य आणि ह लाच जोडला जात असल्यामुळे त्यांना वेगळी ट्रीटमेंट द्यावी असे मला वाटते.

 
^ वर