योनी मनीच्या गुजगोष्टी

श्रीमती वंदना खरे यांनी अनुवादीत व दिग्दर्शित केलेले

योनी मनीच्या गुजगोष्टी

हे नवीन नाटक मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाबद्दल मी खालील दूव्यांवर वाचले.

समाजातल्या संवदेनशील व बुद्धीवादी म्हणवणाऱ्या लोकांनी हे जे काही कलाविष्कार व समाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून अमेरिकेतून इम्पोर्टेड करण्यास सुरुवात केली आहे त्याचा खरेच समाजाला काही उपयोग होण्यासारखा आहे का. की आपण ही सखोल विचार न करता तत्कालिन सामाजिक परिस्थितीत लैंगिक शिक्षणाचे काम करणाऱ्या कर्व्यांना जे बोलले गेले तशीच प्रतिक्रीया देत आहोत. संततीनियमनाच्या साधनांचा प्रचार करणाऱ्या कर्व्यांचे विचार ऐकून तत्कालिन भल्याभल्या धूरीणांचे डोके नक्कीच गरगरले असेल. या गुजगोष्टींनाही तसे भविष्य आहे की हा सगळा स्टंटचा प्रकार आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

दुवा कुठे आहे ?

>>हे नवीन नाटक मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाबद्दल मी खालील दूव्यांवर वाचले.
मित्रा, दुवा दिसत नाही. दुवा दिला तर आम्ही आपल्याला दुवा देऊ. :)

लैंगिक शिक्षण आणि संततीनियमावर नाटकात काही असेल तर पाहण्यासाठी आणि
वाचण्यासाठीही आवडेल.

-दिलीप बिरुटे

काही दुवे

  1. मनीच्या गुजगोष्टी
  2. योनी मनीच्या सहन न होणाऱ्या गोष्टी
  3. संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  4. पचनी न पडलेला प्रयोग

(आलेल्या सदस्यांत एका वेळी किती 'बाबासाहेब जगताप'!)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यु...!

दुव्याबद्दल धन्यु...!

>>(आलेल्या सदस्यांत एका वेळी किती 'बाबासाहेब जगताप'!)
सध्या सात दिसत आहेत.

-दिलीप बिरुटे
[वेगवेगळ्या लाडवांचा फॅन]

दूवे

खालील दूव्यांमध्ये पहिल्या दूव्यावर श्री. शिरीष कणेकर यांना आपल्या शैलीत संबंधित नाटकावर मांडलेले आपले विचार आहेत. दूसऱ्या दूव्यावर नाटकाच्या अनुवादक व दिग्दर्शिका वंदना खरे यांची श्री. शिरीष कणेकर यांच्या लेखनावरची प्रतिक्रीया आहे.

http://www.loksatta.com/lokprabha/20091204/metkut.htm

http://www.loksatta.com/lokprabha/20091211/lpfront.htm

प्रतिसाद

प्रस्तुत नाटक पाहिलेले नाही आणि संहिताही वाचलेली नाही. मात्र वरच्या दुव्यातले कणेकर आणि खरे यांचे लेख वाचले.

दोन्ही लेखकांनी स्वतःची बाजू विशद करताना व्यंगात्म शैलीचा आश्रय काही प्रमाणात घेतलेला आहे. मात्र , प्रतिवादी पक्षावर टीका करताना लिखाणाच्या भरात प्रतिपक्षावर "विकृत" वगैरे शेलकी विशेषणे लावल्यामुळे दोन्ही पक्षांनी काही "ब्राउनी पॉईंट्स्" गमावले असे मला वाटले.

"स्त्रियांच्या लैंगिकतेचे दमन हा महत्त्वाचा आणि वैश्विक मुद्दा आहे" असे खरेबाई म्हणतात. प्रस्तुत नाटकामागे - पर्यायाने त्यांच्या भाषांतर आणि प्रयोगांच्या प्रयत्नांमागे - या मुद्द्याच्या पाठपुरावा करावा अशी त्यांची भूमिका असावी असा माझा समज झाला. हा मुद्दा मान्य केला तर , प्रस्तुत नाटक या दमनाला वाचा कसे फोडते हे मला दोन्ही लेखांतून समजले नाही. बलात्कार, जवळच्या नातेवाईकाकडून केले जाणारे लैंगिक अत्याचार, अल्पशिक्षित , अशिक्षित समाजामधील स्त्रियांनी अंगावर काढलेले लैंगिक रोग , वेश्यांचे शोषण आणि त्या शोषणामागचा सगळ्यात महत्त्वाचा लैंगिकतेचा मुद्दा , सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजामधेही प्रसंगी आढळणारी अस्थानी शरम आणि हेळसांड (प्रसंगी पॅप्-स्मिअर्स् बद्दलही नसलेली माहिती) या सार्‍या गोष्टींबद्दलच्या प्रबोधनाचा विचार या अशा नाट्यकृतींमधे असतो काय याबद्दल मी साशंक आहे. वरील समस्यांनी पीडीत , शोषित असलेल्या किती स्त्रिया या नाटकाला येतील ? किती जणींना त्यातून काही संदेश मिळत असेल ? याबद्दल मी साशंक आहे.

हे झाले प्रबोधनासारख्या "नोबल्" उद्दिष्टाबद्दल - ज्याचा ओझरता उल्लेख भाषांतरकर्तीने केलेला आहे. राहता राहिला मुद्दा नवतेचा. लैंगिकतेचा मुद्दा - त्यातही लैंगिकतेकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनाकडून पाहण्याचा मुद्दा मराठी साहित्यात नि नाटकांत नवा नाही. तेंडुलकरानी "मित्राची गोष्ट" मधे समलैंगिकतेचा मुद्दा मांडल्याला तीसेक वर्षे होऊन गेली आहेत. नवनव्या लेखिका आयुष्याच्या , समाजाच्या निरनिराळ्या थरातल्या लैंगिकतेबद्दल लिहिताना दिसतात.

थोडक्यात प्रस्तुत नाटकाला संस्कृती बुडविण्याच्या आरोपावरून शिव्या देण्यामधे उशीर झालेला आहे. त्याचबरोबर या नाटकाची तुलना रधोंसारख्याशी करणे सुद्धा गैरलागू ठरेल.

येथे वाचा

नाटकाची अनधिकृत संहिता येथे उपलब्ध आहे. (काही पॉप-अप्सही येतात.)

नाटक प्रबोधनकारक असावे

"व्हजायना मोनोलॉग्स" हे नाटक बघायची इच्छा असून अजून बघणे झाले नाही.

हे एक प्रभावी नाटक आहे, असे मित्रामैत्रिणींकडून ऐकले आहे.

अमेरिकेतील (आणि अन्य देशांतील) अनेक विद्यापीठांमध्ये स्त्रीसुलभ लैंगिकता आणि लैंगिक शोषणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विशेष "व्ही-डे" दिवस आयोजित करतात, तेव्हा या नाटकाचा प्रयोग हमखास होतो (उदाहरणार्थ येथील विद्यापीठात).

स्त्री-लैंगिकतेबाबत आणि शोषणाबाबत अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे, आणि सुशिक्षितांमध्येही आहे. त्यामुळे "लोक नाटक बघतात" म्हणजे "प्रबोधनाची गरज असून फायदा होणारे लोक बघतात" असे म्हणता येते.

कर्क यांनी दिलेली संहिता वाचून बघेन. आणि पुढच्या वेळी संधी आली तर इंग्रजी नाटक तरी आवर्जून बघेन.

असेच्.

मी ही पुष्कळ ऐकले आहे आणि बघण्याची उत्सुकता आहे. मागील् आठवड्यातच हे नाटक आमच्या येथील् विद्यापीठातही लागले होते पण नेमके त्यावेळी दुसरे काम् असल्याने जमले नाही.

अवकाश

वंदना खरे म्हणतात

स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलायला एक ‘अवकाश’ (स्पेस) निर्माण करणारी संधी या नाटकाच्या निमित्ताने तयार व्हावी, हा माझा हे नाटक करण्याचा मूळ उद्देश आहे. या प्रयोगांच्या निमित्ताने स्त्रियांनी आपल्या लैंगिकतेकडे ‘शारीरिक आरोग्य’ या मुद्दय़ापलीकडे जाऊन पाहावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे..’

म्हणजेच नाटकाचा हेतु हा काही लैंगिक शिक्षण /समस्यापुर्ती असा नाही. बोली भाषेतील अनेक लैंगिक शब्द संकोच निर्माण करतात. हा संकोच परंपरागत संस्कार व चालीरीती यातुन निर्माण होणारा असतो. खेडेगावात लैंगिक शब्दांचा सचैल वापर होतो. कुटुंबात बाप मुलाला शिव्या देताना त्याच्या आईच्या योनीचा उद्धार करतो. रमेश धोंगडे संपादित ऑक्सफर्ड इंग्रजी - मराठी शब्दकोशात व्हजायनाचा अर्थ 'पुच्ची' असाही दिलेला आहे. पांढरपेशा बोली भाषेत हा शब्द उच्चारायला संकोच वाटतो. "लई घानघान बोलत्यात ती मान्स" अस पांढरपेशा शहरी लोकांना सांगणारा त्यातल्या त्यात सुसंस्कृत खेडवळ मुलगा त्याच्या वैतागाच्या वेळी मात्र सचैल लैंगिक शब्दांचा वापर करतो. लैंगिकतेच्या ओवी बद्दल आम्ही स्वगत मधे लिहिले आहेच. पुरुष स्पंदन या दिवाळी अंकात प्रसिद्ध केलेल्या या लेखाबाबत बोलताना संपादिका गीताली वि म यांना शब्दांशी अधिक तडजोड करणार नाही कारण आशय हानी होते असे सांगितले होते. त्यांनीही ते मान्य केल होत. उपक्रमावर लिहायच धाडस केल नाही ते कदाचित अस्थानी वाटल् असत.
'योनीमनीच्या गुजगोष्टी' हा शीर्षक अनुवाद कसा प्रमाणित व प्रामाणिक वाटतो. 'पुच्चीवाच्यतेच्या गुजगोष्टी' अस समानार्थी शीर्षक पचायला जड गेल असत. कदाचित सेन्सॉरनेच बंदी आणली असती.
हा पारंपारिक प्रयोगापेक्षा वेगळा प्रयोग आहे. वेगळी गोष्ट ही पचनी पडायला समाजमनाला जडच जाते. हे वेगळेपण पचवण्यासाठी प्रबोधनाचा कांगावा केला तरच ते सुकर होत. करमणुकीचा अविष्कार म्हणुन कांगावा केला असता तर कदाचित संस्कृती रक्षकांच्या हातात कोलीत दिल्यासारखे झाले असते. प्रयोग अजुन पाहिला नाही. पण नक्की पाहिन.
प्रकाश घाटपांडे

नवनवीन विषयांचं स्वागत..

>>वेगळेपण पचवण्यासाठी प्रबोधनाचा कांगावा केला तरच ते सुकर होत. करमणुकीचा अविष्कार म्हणुन कांगावा केला असता तर कदाचित संस्कृती रक्षकांच्या हातात कोलीत दिल्यासारखे झाले असते.

खरं आहे. नाटक म्हणजे काय, विजय तेंडूलकर नाटकाची प्रचलीत व्याख्या सांगतात [संदर्भ नाही. पण हवे असल्यास शोधून देईन] ''एक विशिष्ट विचार मांडण्यासाठी, एक विशिष्ट प्रचार करण्यासाठी, लेखकाने पात्रे आणि घटना यांची मनाप्रमाणे रचलेली एक कमजास्त परिणामकारक किमया''

तेव्हा प्रबोधनाच्या निमित्तानेका होईना, आपल्यासमोर नवीन विषय येत आहेत. 'हळूच कुजबुजणारा' विषय आता मोकळेपणाने बोलल्या जात आहे. बोलल्या जावा. सामाजिक गरज म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे जावे, वगैरे. पण आपल्याकडे तसा मोकळेपणा नाही. काही प्रश्न आणि त्याची उत्तरे बरोबर असली तरी, संस्कृती आणि संस्काराची भानगड जरा आपल्याकडे आडवीच येते, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रबोधन आणि अन्य उद्दिष्टे

[संपादित]

आता मुद्दा आहे प्रस्तुत कृतीबद्दलच्या उद्दिष्टाचा. या चर्चाप्रस्तावाच्या कर्त्याने रधों कर्व्यांचा उल्लेख केला त्यामुळे प्रबोधनाचा मुद्दा मी विचारात घेतला आणि मांडला. "प्रबोधन" हा लेखिकेचा (निदान प्रमुख म्हणता येईल असा ) उद्देश नसावा असे इथे दिसते. "योनिविषयक - आणि पर्यायाने लैंगिकतेबद्दल - चर्चा व्हावी, अशा चर्चेमधे स्त्रियांना अवकाश मिळावे" हे उद्दिष्ट दिसते. इथे परत "कलेकरता कला" सारखे जुनेच प्रश्न वर येतील. जर का अशा प्रकारच्या प्रकल्पांचे उद्दिष्ट awareness generation हे नसेल तर मग अशा चर्चा कशाकरता ? असा प्रश्न केला जाऊ शकतो. असे प्रश्न करणार्‍या कणेकरांना "विकृत" म्हणून लेखिका मोकळी झालेली आहे हे मला रोचक वाटले.

प्रमाणित व प्रामाणिक

'योनीमनीच्या गुजगोष्टी' हा शीर्षक अनुवाद कसा प्रमाणित व प्रामाणिक वाटतो. 'पुच्चीवाच्यतेच्या गुजगोष्टी' अस समानार्थी शीर्षक पचायला जड गेल असत.

प्रकाश राव,
इथे 'व्हजायना' ह्या शब्दाचे भाषांतर करताना योनी हा शब्द वापरला आहे जो योग्य आहे. तुम्ही जो ग्राम्य शब्द दिला आहेत त्यासाठी इंग्रजीक 'कंट' असा शब्द आहे. मूळ शिर्षकच प्रमाणित असल्याने अनुवाद प्रमाणित केला आहे असे वाटते.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सहमत आहे

इथे 'व्हजायना' ह्या शब्दाचे भाषांतर करताना योनी हा शब्द वापरला आहे जो योग्य आहे. तुम्ही जो ग्राम्य शब्द दिला आहेत त्यासाठी इंग्रजीक 'कंट' असा शब्द आहे

मान्य आहे

मूळ शिर्षकच प्रमाणित असल्याने अनुवाद प्रमाणित केला आहे असे वाटते.

अगदी सहमत आहे.
बोली भाषेतील लैंगिकशब्दांना प्रमाणित करताना विद्वज्जनांची मोठी तारांबळ उडत असते. दारु म्हणल की कसनुसच वाटत पण ड्रिंक्स म्हणल की कसं प्रतिष्ठीत वाटतं. पण ड्रिंक चा अर्थ पेय , मद्य दोन्ही होतो.

अवांतर- छावा चे इंग्रजी भाषांतर करताना मोल्स्वर्थ चा अनुवाद पहा
छावा (p. 300) [ chāvā ] m ( H) A young male elephant. 2 fig. Applied to a handsome man, child, colt, buffalo &c.
प्रकाश घाटपांडे

कशाला बरे साशंक?

प्रस्तुत नाटक पाहिलेले नाही आणि संहिताही वाचलेली नाही.

बलात्कार, जवळच्या नातेवाईकाकडून केले जाणारे लैंगिक अत्याचार, अल्पशिक्षित , अशिक्षित समाजामधील स्त्रियांनी अंगावर काढलेले लैंगिक रोग , वेश्यांचे शोषण आणि त्या शोषणामागचा सगळ्यात महत्त्वाचा लैंगिकतेचा मुद्दा , सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजामधेही प्रसंगी आढळणारी अस्थानी शरम आणि हेळसांड (प्रसंगी पॅप्-स्मिअर्स् बद्दलही नसलेली माहिती) या सार्‍या गोष्टींबद्दलच्या प्रबोधनाचा विचार या अशा नाट्यकृतींमधे असतो काय याबद्दल मी साशंक आहे.

नाटक न बघता, संहिताही न वाचता असा प्रतिसाद द्यायला धाडस लागते.

वरील समस्यांनी पीडीत , शोषित असलेल्या किती स्त्रिया या नाटकाला येतील ? किती जणींना त्यातून काही संदेश मिळत असेल ? याबद्दल मी साशंक आहे.

कशाला बरे साशंक? समजावून सांगायला हवे! मला हे नाटक प्रबोधन करणारे वाटले. तुमच्या समजावून सांगण्याने कदाचित माझे मत बदलेलही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तुम्हाला

तुम्हाला हे नाटक प्रबोधन करणारे का वाटले ते सांगा. आपली ऐकायची तयारी आहे.
आणि हो , कशातले काही कळत नसले तरी विधाने करण्याचे "धाडस" माझ्या अंगी आहे हे आधीच मान्य करतो.

मजकूर संपादित.

मला झाले ते आकलन असे

मी नाटकाची संहिता वाचली आहे. मला झाले ते आकलन असे:

लैंगिकतेबद्दल प्रबोधन करणे हा नाटकाचा मुख्य हेतू आहे. प्रियकराला किंवा गायनकॉलजिस्टला स्त्रीच्या देहाची माहिती असते तेवढी माहितीही स्त्रीला अजिबात नसते. स्त्रीने आपल्या देहाबद्दल माहिती करून घ्यायला हवी. त्याच्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. वॅजायना हा शब्द म्हणताना शरमू नये. शरीराचा एक हिस्सा जो जितका आत्यंतिक सुखदायीही किंवा तितकाच दुःखदायीही असू शकतो त्याचा वारंवार उद्घोष केल्यास लाज गळून पडेल. (एखाद्या नाट्यशिबिरातही वेगळे काय असते?) कंडिशनिंग निघून जाईल. भीड चेपली जाईल.

संभोगातले सीत्कार कुणा स्त्रीला मशिदीतल्या अजानीसारखी तर कुणाला घंटानादासारखे भासतात. थोडक्यात सेक्स ह्या विषयाबाबत पुरुषाला वाटते तेते/तसेच स्त्रीलाही वाटू शकते. पण तो विषय तिच्यासाठी टॅबू आहे. विनोदाची पेरणी (आय हॅव लॉस्ट माय क्लिटॉरिस. इट्स गॉन...) क्वचितच एकदोन ठिकाणी केली आहे.. म्हणजेच पुरुषांसारखेच विनोद स्त्रियाही करतात, करू शकतात. एकंदर ह्या नाटकातला धीटपणा, विशेषतः भाषांतर झाल्यावर, भारतीय पार्श्वभूमीवर, कुणाकुणाला सवंग वाटू शकतो, हेदेखील जाणवले.

ह्या नाटकाने प्रेरित होऊन ज्या व्ही-कार्यशाळा होतात त्यांचे काम प्रबोधनाचेच आहे. पण ही नाटकाच्या पुढची पातळी आहे.

शेवटी चूभूद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मी पाहिलेले नाटक

कालच प्रत्यक्ष नाटक पहाण्याचा योग आला. ५ वाजता व ७ वाजता असे लागोपाठ दोन प्रयोग होते.सुदर्शन रंगमंच या प्रायोगिक रंगभुमीच्या पंढरीत हा प्रयोग पाहिला. नाटकाच्या सुरवातीला काही सुचना देण्यात आल्या. त्यात प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखण्यासाठी ज्यांना आता हे पचनी पडत नाही असे वाटल्यास शांतपणे निघुन जाण्याबद्दलही सुचना होती. मोबाईल्स स्विच ऑफ करण्याबाबत सुचना होती जर मोबाईल वाजल्यास नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणि त्यावेळे पुरता थांबवण्यात येईल असे ही सांगण्यात आले. हसु आल्यास जरुर हसावे अशी देखील सुचना होती.आपण कोण ?आपला सामाजिक दर्जा काय या बाबी बाजुला करुन नाटक पहावे.
प्रयोगाला भरपुर गर्दी होती. सुदर्शन हॉलची क्षमता कमी आहे. मासुम या पुरंदर तालुक्यात काम करणार्‍या संघटनेच्या प्रबोधन कृतीचा भाग म्हणुन स्त्री-पुरुष कार्यकर्ते आले होते.
धम्मकलाडु यांना झालेले आकलन अगदी योग्य आहे असा अनुभव मला नाटक पाहिल्यावर् आला.

वॅजायना हा शब्द म्हणताना शरमू नये. शरीराचा एक हिस्सा जो जितका आत्यंतिक सुखदायीही किंवा तितकाच दुःखदायीही असू शकतो त्याचा वारंवार उद्घोष केल्यास लाज गळून पडेल. (एखाद्या नाट्यशिबिरातही वेगळे काय असते?) कंडिशनिंग निघून जाईल. भीड चेपली जाईल.

या मुद्द्या भोवती नाटकाचा बराच भाग होता. सुरवातीलाच प्रेक्षकांच्या तोंडातुन योनी शब्द उच्चारणा करण्यासाठी किती संकोच होतो हे चाचपण्यासाठी 'म्हणा योनी' असे आवाहन केल्यावर प्रेक्षकांनी ही योनी शब्द एकमुखाने उच्चारला.नाटकात सभ्य लोकांत् न वापरता येणारे शब्द चर्वण करता येतात म्हणून काही पुरुशांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील असे मात्र वाटले नाही. कदाचित माझ्या ग्रामीण पार्श्वभुमीमुळे तसे असेल.

संभोगातले सीत्कार कुणा स्त्रीला मशिदीतल्या अजानीसारखी तर कुणाला घंटानादासारखे भासतात

याचा नाट्याविष्कार तर अवर्णनीय.यातील विविध छटा या केवळ ध्वनीपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्याला विनोदाची झालर ही होती. त्यात विविध पेशे, सामाजिक स्थाने, संस्कृती यांचाही आविष्कार . ध्वनितांची केणी च म्हणा ना!
दोन योन्यांची स्वगतांचा सुखद व दु:खद आविष्कार तर उत्तम नाट्यप्रसंग. झाडुवाली बाई आपल्या पुच्चीविषयी बोलताना जपलेली बाईची दु:ख, समुपदेश,पुरुषप्रधानता, व्यभिचार,श्रुंगार,लैंगिक स्वच्छता या विषयी बाबत संवाद तर अप्रतिम. नाट्याविष्कारात प्रमाण भाषा म्हणजे नैतिक वा श्लील व बोली भाषा म्हणजे अनैतिक वा अश्लिल असा दुजाभाव कुठेही केलेला नाही.बोली भाषेतील शब्द उगीचच प्रमाण भाषेत कुठेही भावानुवादित केले नाहीत.जिथे प्रमाण भाषा वापरणे हे उचित आहे तिथ प्रमाण भाषा जिथ बोली भाषा वापरायची गरज आहे तिथ बोली भाषा.योनी शब्द कुठे वापरायचा व पुच्ची कुठ वापरायचा याच भान संवादात आहे.
चुत् या शब्दाभोवती गुंफलेले सांगितिक अप्रतिम. चुत शब्दातील नादमयता ज्या आविष्काराने दाखवली आहे ती पहाता एखाद्याला चुत्या म्हणताना ती शिवी नसुन वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास सन्मान वाटावा इतका उत्तम. 'चुत् बाई चुत्' हा किस बाई किस दोडका किस या धर्तीवर घेतलेला लोकगीतात्मक आविष्कार.शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवी अस वाटाव इतकी नादमयता.
बिभत्स,अश्लील या शब्दार्थांची पारंपारिक पुट गळुन पडावीत असा हा नाट्याविष्कार. योनी भोवती च्या रस, गंध, स्पर्श,दृष्य,श्राव्य अशा सर्व गोष्टी त्यात गुंफल्या आहेत.

ह्या नाटकाने प्रेरित होऊन ज्या व्ही-कार्यशाळा होतात त्यांचे काम प्रबोधनाचेच आहे. पण ही नाटकाच्या पुढची पातळी आहे.

अशा प्रकारची कार्यशाळा हा प्रबोधनाचा भाग म्हणुन घेतली आहेच. १९, २० डिसेंबरला स्नेहसदन नारायण पेठ येथे दोन दिवसांची पुर्ण वेळ कार्यशाळा आयोजित केली आहे.
नाटकाच्या शेवटी पसायदानासारखा योनी वरील संस्कृत श्लोक घेउन एक अध्यात्मिक टच दिला आहे. इथे पुन्हा नादमयतेचा आविष्कार.नाटकानंतर वंदना खरे यांना भेटुन उपक्रमावर याची चर्चा चालु असल्याचे सांगुन निमंत्रण दिले आहे.
प्रकाश घाटपांडे

इश्श!

योनी, मासीक पाळी, गर्भारपण असे बायकांचे विषय निघाले की काही पूरुषांची अगदी गडबड गडबड उडते नै. बायकांच्या विषयात माझा हातखंडा आहे व मला या चर्चेद्वारे सभ्य लोकांत् न वापरता येणारे शब्द चर्वण करता येतात म्हणून काही पुरुशांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.

जाता जाता ....

आता पुरुषांच्या लैंगिकतेवर " मी बाबुराव बोलतोय" किंवा तत्सम शीर्षकाचे नाटकही रंगभूमीवर यायला हरकत नाही.

 
^ वर