अग्निसमाधी

अग्निसमाधी
नाव. : श्री. कृष्णा भांड.
जन्म : २३ जून १९८०, वडजी,ता. पैठण, जि. औरंगाबाद.
शिक्षण : वडजी, औरंगाबाद, दावरवाडी, १९९६ ला दहावी पास.
लहानपणापासून देवधर्म व अध्यात्माकडे ओढ.२००४ साली सन्यास घावयाचा म्हणून घरातून निघून गेला. २००५ ला चारधाम यात्रा.
लेखन : २००३ ते २००६ पर्यंत ५०० अभंग लिहले.
मृत्यू :१६ नोव्हेंबर २००६. कार्तिक वद्य एकादशी (श्री.ज्ञानेश्वरसमाधी पर्वकाल)

एका आडवळणाच्या खेडेगावातील एका तरुणाची लहानशी जीवनयात्रा. दहावीनंतर घरातील शेतीची कामे करत असतांना आजूबाजूच्या लोकांना, विशेषत: तरुणांना धार्मिक वळण लावावयाचा प्रयत्न. त्यात बर्‍यापैकी यश. बस. मग या सामान्य वाटणार्‍या तरुणाची इथे नोंद कां ?

नोंद एवढ्यासाठी की त्याने मृत्यूसाठी स्वत: चिता रचली. आपणास बोलावणे आले आहे म्हणून मी जाणार असे लिहून ठेवले,आडवळणांनी घरच्यांना सुचना दिली. व स्वत: चिता पेटवून त्यात प्रवेश केला. घरच्या नोकराला आग दिसली म्हणून तो धावतधावत आला त्यावेळी हा शांतपणे, मांडी घालून जळत होता. सगळे येईपर्यंत फ़क्त राख उरली होती.

आत्महत्या (आपण याला आत्महत्या म्हणू शकाल) बरेच जण करतात. दैनंदिन आयुष्यातील दारूण दु:खे, आधीव्याधी, म्हातारपण, दारिद्र्य, प्रेमभंग वगैरे बरीच कारणे अशामागे असतात. जवळजवळ प्रत्येकाच्या मनात केव्हांनकेव्हा असा विचार येऊनही जातो.पण येथे असली काहीही कारणे नाहीत. हे स्वेच्छामरण आहे. माऊलींच्या समाधीसारखे किंवा.... आतंकवाद्याच्या आत्मघातासारखे. पण हा आत्मघात दिसत नाही. यात काही मिळवावयाचेही नाही. स्वर्ग वा कुटुंबियांना काही लाख. मग कां ? कशाकरतां ?
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

जलसमाधी

सुर्यभान लहाणे वय ५२, या भक्ताने जलसमाधी घेतली. लहाने हे अभंग लिहित.
त्यांनी 'नामगीता' लिहिली. अभंगाची संख्या सातशे. [पाहा बातमी ]

कां ? कशाकरतां ? याची उत्तरं अवघड आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विचार करण्यालायक

"आपल्या जीविताचे कार्य संपले" असे ज्यांना मनापासून वाटते, त्यांच्या विचारांबद्दल कुतूहल वाटते खरे.

श्री. भांड यांच्या अभंगातून किंवा कुटुंबाला दिलेल्या आडवळणी सूचनांमधून काही कळू शकेल, कदाचित.

श्री.ज्ञानेश्वरसमाधी पर्वकालाच्या समयी चिताप्रवेश केला, म्हणजे आपले कार्य ज्ञानेश्वरासारखे आहे, असे सुचवायचे स्पष्टच आहे.

अग्नीसमाधी - गोंडस नाव!

अन्-वान्टेड् या लेखातील उतारा
"विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येलासुद्धा इच्छामरण असे गोंडस नाव देऊन (व इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देऊन) कर्जमाफी, सबसिडी, सात-बारा कोरा करणे या झंझाटातून सुटका करून घेणे शक्य होईल. धर्माने याला 'समाधी' असे नाव देऊन आपली सुटका अगोदरच करून घेतली आहे. गळ्याला फास लावून घेतला तर प्राणायाम समाधी, उंचावरून उडी घेतली तर प्रकाश समाधी, स्वत:ला गुदमरून टाकले तर भूसमाधी, गोळी मारून घेतली तर अग्नीवेध समाधी, पाण्यात बुडले तर जलसमाघी, गाडीच्या खाली जीव दिल्यास वाहन समाघी असे वर्गीकरण करत आध्यात्मिक समाधान करून घेता येईल. जीवन जगण्यासाठी आहे, संपवण्यासाठी नाही हे एकदा लक्षात आल्यास मात्र अशा प्रकारे विचार करण्याच्या मानसिकतेला नक्कीच कलाटणी मिळेल."

आपणास बोलावणे आले आहे म्हणून मी जाणार असे लिहून ठेवले.....
आत्मवंचना की धार्मिक उन्माद!
किमान अशा (अपवादत्मक) घटनांचे उदात्तीकरण होऊ नये ही अपेक्षा.

सहमत

>>किमान अशा (अपवादत्मक) घटनांचे उदात्तीकरण होऊ नये ही अपेक्षा.
सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

सहमत, किंचित असहमत

काही आत्महत्या अशा असतात, की परिस्थितीमुळे जीविताला अर्थ राहिला नाही, पण परिस्थिती वेगळी असती तर जगायला आवडले असते.
या प्रकारच्या आत्महत्या म्हणजे प्रेमभंग झालेल्या, किंवा कर्जात बुडून हताश झालेल्या शेतकर्‍याची आत्महत्या.
या कथा अत्यंत दु:खदायक असतात, असे काही घडू नये याबद्दल समाजाने (म्हणजे आपण) काही केले पाहिजे, हे खरेच.

परंतु जर असे नसले - म्हणजे "परिस्थिती वेगळी असती तर मला जगायचे आहे" अशी व्यक्तीची मनःस्थिती नसली, तर त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करायचा मला (म्हणजे समाजाला) काही अधिकार नाही. हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे उदात्तीकरण आहे, आत्महत्येचे नव्हे.

स्वातंत्र्याचे उदात्तीकरण असल्यामुळेच ऋणको शेतकर्‍याने अस्वतंत्रतेमुळे केलेल्या आत्मघाताचा विरोध होतो. हे शब्दछल नाही.

जस्ट

जस्ट आठवलं, डर्कहैमचा (नावाचा उच्चार माहिती नाही, Durkheim असं आठवतं. बहुदा Emilie असं काही नाव असावं) अभ्यास. आत्महत्यांविषयीचा.

मानसिक कमकुवतपणा

अग्नीसमाधी, जलसमाधी हे प्रकार आत्महत्येचेच आहेत. जीवनात भरलेले नैराश्य आणि त्याला सामोरे जाण्याची हळूहळू संपुष्टात येत चाललेली क्षमता आणि त्याबरोबरच कधीही कुणी न पाहीलेले परंतु आपल्या गुढपणामूळे कायम आकर्षण निर्माण करणारे मृत्युनंतरचे काल्पनिक जग या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहेत. आध्यात्मिक कहाण्यांच्या आत्यंतिक आहारी जाण्यामूळे मोक्ष, स्वर्गप्राप्ती यांचा पगडा डोक्यावर बसून असली कृत्ये हातून घडून जातात. तत्कालिन झिंगलेपणातून असे काही करण्याची हिंमत निर्माण होते. मग ती झिंग रागाची असो की भक्तीची तो एक आत्मघाती अपघातच असतो. सामान्य जीवन जगणारी, रोजच्या हजार दुःखांना सामोरे जाऊन प्रसंगी त्यांना नतमस्तक करणारी माणसे या लोकांपेक्षा खरे तर श्रेष्ठ म्हणायला हवीत.

नेमके!

अग्नीसमाधी, जलसमाधी हे प्रकार आत्महत्येचेच आहेत. जीवनात भरलेले नैराश्य आणि त्याला सामोरे जाण्याची हळूहळू संपुष्टात येत चाललेली क्षमता आणि त्याबरोबरच कधीही कुणी न पाहीलेले परंतु आपल्या गुढपणामूळे कायम आकर्षण निर्माण करणारे मृत्युनंतरचे काल्पनिक जग या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहेत. आध्यात्मिक कहाण्यांच्या आत्यंतिक आहारी जाण्यामूळे मोक्ष, स्वर्गप्राप्ती यांचा पगडा डोक्यावर बसून असली कृत्ये हातून घडून जातात. तत्कालिन झिंगलेपणातून असे काही करण्याची हिंमत निर्माण होते. मग ती झिंग रागाची असो की भक्तीची तो एक आत्मघाती अपघातच असतो. सामान्य जीवन जगणारी, रोजच्या हजार दुःखांना सामोरे जाऊन प्रसंगी त्यांना नतमस्तक करणारी माणसे या लोकांपेक्षा खरे तर श्रेष्ठ म्हणायला हवीत.

नेमके!

(बाबासाहेबांच्या अशा प्रतिसादांचा चाहता) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खरे आहे...

खरे आहे,

बाबासाहेबांचे प्रतिसाद मलाही मनमुराद हसवतात...

आपला
हसरा,

गुंडोपंत

हसवतात???

बाबासाहेबांचे प्रतिसाद मलाही मनमुराद हसवतात...

धम्मकलाडू यांनी म्हटल्याप्रमाणे मलाही वाटतं की बाबासाहेबांनी आत्महत्या करणार्‍या/समाधी घेणार्‍या लोकांच्या मानसिकतेवर नेमका प्रतिसाद दिला आहे.

'मनमुराद हसणे' हा वाक्प्रयोग आपण बहुदा विनोदाच्या संदर्भाने वापरतो, असे मला वाटते. तुम्हालाही तोच अर्थ अभिप्रेत असल्यास, बाबासाहेबांच्या या प्रतिसादात तरी विनोदी असे काही मला आढळले नाही.
तुम्हाला वेगळे काही म्हणायचे असल्यास या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

उन्माद/झिंग ?

श्री.भांड यांनी जा पद्धतीने आपला प्राण सोडला त्याला उन्माद किंवा झिंग म्हणणे उचित वाटत नाही. त्यांच्या मानसिक व्यवहाराबाबत आपण इतक्या उथळपणे कसे मत देऊ शकतो ? आपले नेहमीचे विचार व त्यांचे विचार यात मोठा फरक आहे हे मान्य करून हा फरक मादक पदार्थांच्या/औषधांच्या सेवनाने येणार्‍या उन्माद/झिंग यांच्यापेक्षा वेगळ्या जातीचा आहे एवढे स्विकारावयास काय हरकत आहे ?
दारिद्र्य, प्रेमभंग,दु:सह आजार यांच्यामुळे होणार्‍या आत्महत्या ह्या तर सोडूनच द्या पण आत्मघातकी अतिरेकी देखिल काहीतरी मिळवण्या करिता जीव देतात. इथे तसेही नाही. अगदी समांतर नाही, पण जवळचे उदाहरण म्हणजे "जय हिंद" म्हणत हसतहसत फासावर चढणारा देशभक्त. त्यालाही स्वत:करिता काही नाही तरी देशबांधवांकरिता स्वराज्य मिळवावयाचे आहे. इथे तसेही काही दिसत नाही. "बुडती हे जन, न देखवे डोळा": या करिताही जीव दिलेला नाही. "मला दिलेले काम संपले, मी निघालो" हे जा सहजतेने कारकून पाच वाजता कचेरी सोडताना म्हणतो त्या सहजतेने आयुष्याचा निरोप घेतला आहे. ही सहजता कशी ? हे मला समजावून पाहिजे आहे. कायमचा उन्माद/झिंग
म्हणजे मानसिक संतुलन गमावलेले "वेडे". हा वेडाही नाही. मग कोण ?
(कृपया "उथळपणे" हा शब्द आवडला नाही तर मला "सहज, जाताजाता," असे म्हणावयाचे आहे असे मानून घ्या.)
शरद

समाधी आणि आत्महत्या

जाऊ द्या शरद राव,
जे आपल्याला जमत नाही ते इतरांनी केल्यावर त्याला हिणवणे यातच काही लोक धन्यता मानू शकतात.

समाधी आणि आत्महत्या
यातला फरक ज्यांना समजू शकत नाही त्यांना
माझ्या सारखा अतिसामान्य आणि सुमार बुद्धीचा इसम काय म्हणणार?

यांच्या लेखी ज्ञानेश्वरही आत्महत्या केलेला एक मुर्ख मुलगा असणार...

विनोदी अभिप्राय म्हणून सोडून द्यायचे, झालं!

आपला
गुंडोपंत

 
^ वर