आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 3

ज्या मूळ लोककथेवरून वाल्मिकीने रामायण हे महाकाव्य रचले ती कथा, मूळ कधी घडली असेल किंवा आख्यायिका म्हणून रूढ झाली असेल याचा काही अंदाज बांधता येण्याची शक्यता अजमावण्याआधी काही मुद्यांचा परामर्श घेणे योग्य ठरेल असे मला वाटते.
1.य़ुद्धाची हत्यारे :- राम लक्ष्मण यांचे मुख्य हत्यार धनुष्य-बाण हेच होते. रामाच्या वानर सेनेकडे असलेली प्रमुख हत्यारे म्हणजे मोठे पाषाण खंड व झाडांच्या तोडलेल्या फांद्या हे होते. वानर सेना दगड व झाडे शत्रुच्या अंगावर फेकून त्याला जायबंदी करत. राम लक्ष्मण वापरत असलेल्या बाणांची अग्रे धातूंची होती असा उल्लेख मला तरी कुठे आढळला नाही.
2.सीतेची पैंजणे तिला रावणाने पळवल्यावर गळून पडली किंवा रामाने त्याची मुद्रिका हनुमानाजवळ दिली. असे उल्लेख कथेत सापडतात. यावरून सोने किंवा चांदी या धातूंचा उपयोग करण्याची कला लोकांना ज्ञात होती असे वाटते. परंतु हत्यारे बनवण्यास उपयुक्त असे ब्रॉन्झ किंवा लोखंड या सारखे धातू ज्ञात नसावेत.
3.गावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत. नगरांच्या सीमेवरच अरण्ये चालू होत असावीत. सीतेचा त्याग केल्यावर रामाने तिला वनात सोडून ये म्हणून सांगितल्यावर, आपल्याला रामाने वनविहाराला पाठवले असावे या कल्पनेने सीता आनंदली होती. यावरून अरण्ये व नगरे ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत असे वाटते.
4.फक्त रामायणातच, मनुष्येतर प्राणी, कथानकातील प्रमुख पात्रे म्हणून येतात. हनुमान, वाली, सुग्रीव, जांबुवंत व जटायु ही याची उदाहरणे आहेत. यांच्याशी कथेतले मानव सुलभतेने बोलू शकतात. गिरीजन (Tribal) संस्कृतीच्या खूप दाट प्रभावाखाली या कथेचा उगम झाला असावा असे वाटते.
5.कोसल सारखी नगर राज्ये व किष्किंधेसारखी गिरीराज्ये ही तुल्यबळ असावीत असे वाटते.

इ.स.1870-74 या कालात, राल्फ ग्रिफिथ (RALPH T. H. GRIFFITH,) या संस्कृततज्ञाने, रामायणाचे पहिले भाषांतर प्रसिद्ध केले. या भाषांतराच्या Book I chapter XIX मधे रामज्माच्या वेळचे वर्णन आहे. या वर्णनात रामजन्मकाली आकाशातील प्रमुख ग्रह कोणत्या नक्षत्रसमुहाच्या समोर दिसत होते त्याचे वर्णन आलेले आहे. या वर्णनावरून, नवी दिल्ली येथील एक अभ्यासक श्री भटनागर यांनी रामायण काल निश्चिती करता येईल का याचा एक प्रयत्न केला आहे(पुस्तक संदर्भ 1). कोणत्याही कालातील कोणत्याही दिवसाच्या कोणत्याही क्षणी, आकाशातील ग्रह व तार्‍यांची स्थाने काय असतील हे अतिशय अचूकपणे सांगणार्‍या संगणक प्रणाली आता उपलब्ध आहेत अशाच एका प्रणालीचा उपयोग करून श्री भटनागर यांनी असा एक दिवस शोधून काढला आहे की त्या दिवशी आकाशातील ग्रहांची नक्षत्रांच्या सापेक्ष असलेली स्थाने, वाल्मिकी रामायणातील, वर्णनाशी अचूकपणे मिळत जुळत आहेत. श्री. भटनागर यांच्या या प्रयत्नांचे पूर्ण वर्णन वर दिलेल्या संदर्भ ग्रंथात दिलेले आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी ते जरूर वाचावे. श्री भटनागर यांच्या या पुस्तकाप्रमाणे, रामजन्माचा हा दिवस, इ.स.पूर्व 10 जानेवारी 5013 हा येतो.

श्री. भटनागर यांनी शोधून काढलेला हा दिवस, सरळपणे मान्य करणे खूप अवघड दिसते. ग्रिफिथ साहेबाने ज्या मूळ संस्कृत प्रतीचे भाषांतर केले ती एकतर आता उपलब्ध आहे असे वाटत नाही. तसेच त्या प्रतीची विश्वासार्हता काय आहे हे ही सांगणे कठीण आहे.

परंतु ज्या बारकाईने हे वर्णन केलेले आहे, त्यावरून एक गोष्ट मात्र दिसते की हे वर्णन Authentic असलेच, तर ते निश्चितच लोककथेच्या स्वरूपात वाल्मिकीकडे पोचले असावे. काही सहस्त्र वर्षांनंतर कोणाही कवीला असे अचूक वर्णन स्वत:च्या नुसत्या कल्पनेने करता येईल असे वाटत नाही. त्यामुळे इ.स.पूर्वी 5000 वर्षे हा रामकथेचा काल असू शकेल का? असे पडताळून बघण्यासाठी तरी निदान हा काल गृहित धरावा असे मला वाटते.

ग्रिफिथच्या भाषांतरातील वर्णनाप्रमाणे, भरताचा जन्मकाल हा रामजन्माच्या अकरा महिने नंतरचा येतो. हा जन्मकाल, मान्य केला तर रामकथेत सांगितलेले, भरताचे रामाबद्दलचे बंधुप्रेम, त्याची रामाबद्दलची भक्ती वगैरे गोष्टी जास्त सयुक्तिक वाटतात पण त्याच वेळी दशरथाने केलेला यज्ञ, त्याला अग्नीने दिलेला प्रसाद आणि सर्व राण्या एकाच वेळी गरोदर राहून त्यांना झालेली पुत्रप्राप्ती, या सारख्या गोष्टी रामकथेत नंतर घुसडल्या असाव्यात असेच मानावे लागेल.

इ.स.पूर्व 5000 या कालात भारतीय द्वीपकल्पातील तात्कालिक परिस्थिती रामकथा घडण्यासारखी होती का याचा विचार पुढील लेखात करूया.

संदर्भ ग्रंथ 1:- Dating Era of Lord Ram by Pushkar Bhatanagar

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचतो आहे...

वाचतो आहे.
गावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत.
असेलही. पण एक सहज दिसलेली गोष्ट. दशरथाच्या हातून श्रावणाचा खून झाला. अलीकडेच सांगली जिल्ह्यात गेलो होतो. आटपाडी-खानापूर भागात 'श्रावणाची कावड' नावाचे स्थळ आहे. अशी परंपरागत कथा ऐकली की, श्रावण तिथे मारला गेला होता. या अंतराचा हिशेब कसा लावायचा? माझ्या या प्रश्नामागे अभ्यास नाही. केवळ आहे तो चौकस विचार!
अवांतर: नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे एक सीताखाई नावाची दरी आहे. तिथे सीतेचे वास्तव्य होते म्हणतात. याच जिल्ह्यात तळोदा तालुक्यात अस्तंभा/बा नावाचे शिखर आहे. तेथे अश्वत्थामा आहे, अजूनही तो तेल मागत फिरतो वगैरे, मानले जाते. तेथे दर वर्षाला एक यात्राही भरते. एकेरी पाऊलवाटेवरून शेकडो लोक तो डोंगर चढतात.

दंडकारण्य

एक वर्षापूर्वी छत्तीसगढमधील बस्तर भागात गेलो होतो. तेथील दाट अरण्यास दंडकारण्य म्हणतात असे कळले. म्हणजे राम तेथेही राहिला होता असे दिसते.
इरावती कर्वे यांनी लंका मध्यप्रदेशातच असावी असा अंदाज व्यक्त केला होता.

नितिन थत्ते

सीतेचा त्याग?

उत्तरकांड हे मूळ वाल्मिकी रामायणातील नाही असे म्हटले जाते. नसल्यास, त्याचा विचार या लेखाकरता होऊ नये. उत्तरकांडातील धोबी*, शंबूक इ. इ. उल्लेख चक्क मध्ययुगीन आहेत असे वाटत नाही का?

गावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत. नगरांच्या सीमेवरच अरण्ये चालू होत असावीत.

हा कयास योग्य आहे परंतु यासाठी रामायणात अनेक इतर उल्लेख आहेत. जसे, ऋषींचे आश्रम हे राज्यानजिक असत परंतु वनात असत. ऋषींना राज्याश्रय असे परंतु त्यांचे गुरुकुल किंवा आश्रम हे शहराबाहेर असत. ही वने दाट नसावीत किंवा तेथे हिंस्त्र श्वापदांचा वावर नसावा. नगरानजिक आणि अरण्यापूर्वीची ती भूमी असावी.

दुसरा उल्लेख, अहल्येच्या गोष्टीत येतो. तेथे अहल्या शीला झाल्यावर तिला सोडून अरण्यात निघून गेलेले गौतम ऋषी तातडीने किंवा तत्काळ परत येतात. यावरूनही ते फार लांब नसावेत असे म्हणण्यास जागा आहे.

युद्धाच्या हत्याराव्यतिरिक्त, रथ, अवजारे, वाहतूक साधने या विषयी रामायण काय म्हणते हे वाचायला आवडेल. रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेखही आहेच. विशेषतः लंका ते अयोध्या हे अंतर, दसरा ते दिवाळी या कालावधीत कापले गेले हे मानले जाते, ते किती सयुक्तिक यावरही वाचायला आवडेल.

रामायणात रथाचे उल्लेख आहेत. ते संपूर्ण लाकडी असावेत की त्याला धातूची/ लोखंडाची जोड असावी? बाणांचे तीर धातूचे नसतील तर बाकीच्या गोष्टीही धातूविरहीत असाव्यात.

* धोब्याकडून आपटून धोपटून घेण्याइतपत रामायणातील कपडे लवचिक असावेत का हा देखील एक प्रश्न आहेच.

शंका

2.सीतेची पैंजणे तिला रावणाने पळवल्यावर गळून पडली किंवा रामाने त्याची मुद्रिका हनुमानाजवळ दिली. असे उल्लेख कथेत सापडतात. यावरून सोने किंवा चांदी या धातूंचा उपयोग करण्याची कला लोकांना ज्ञात होती असे वाटते. परंतु हत्यारे बनवण्यास उपयुक्त असे ब्रॉन्झ किंवा लोखंड या सारखे धातू ज्ञात नसावेत.

सोने आणि चांदी यांचा उपयोग माहिती होता पण लोखंडाचा नाही हे मला जरा उलगडले नाही. कारण लोखंड सापडण्याचे प्रमाण हे सोन्यापेक्षा नक्कीच मोठे आहे. शिवाय दागिने घडवण्या इतकी कलाकुसर आणि तंत्रज्ञान विकसीत झाले असताना इतर धातूकाम होत असेल असेही 'वाटते'. किंबहुना इतर धातू हाताशी असल्या शिवाय पैजणासारखे दागिने घडवणे मला तरी अवघडच वाटते.

एकुण लेखमाला रोचक आहे भटनागरांचा लेख मुळातून वाचावा असे मात्र वाटून गेले.

सुमारे ३५०० ख्रिस्तपूर्व मध्ये सिंधु संस्कृतीत एका कालखंडात लोखंडाचा वापर होत होता, असे मी संदर्भ ग्रंथात वाचले आहे. (संदर्भ शरद यांच्या लेखात आहेच. )
प्रियाली यांनी उपस्थित केलेल्या धोबी, शंबूक या मुद्यांशी सहमत आहे.

आपला
गुंडोपंत

सोने लोखंडापेक्षा जुने असावे

सोने लोखंडापेक्षा जुने असावे हा चंद्रशेखर यांचा दावा खरा असावा. लोखंडाचा उपयोग अनेक संस्कृतीत इ.स.पूर्व ३०००-१५०० मधला दिसतो. (चू. भू. दे. घे.) सोन्याचे उल्लेख मात्र इ.स.पूर्व ४००० मधीलही दिसतात.

इतर धातू हाताशी असल्या शिवाय पैजणासारखे दागिने घडवणे मला तरी अवघडच वाटते.

नाही ते दगडी अवजारांनीही शक्य आहे. सोने हा मूळातच मऊ धातू आहे. सोन्यासारखा आणखी एक पुरातन धातू म्हणजे तांबे. तांबे पूर्वजांना बर्‍याच काळापासून ठाऊक असावे.

लोखंड सोन्यापेक्षाही महाग होते

सोने लोखंडापेक्षा जुने असावे हा चंद्रशेखर यांचा दावा खरा असावा.

दावा खरा असावा काय आहेच. एवढेच नव्हे, एकेकाळी/सुरवातीला लोखंड सोन्यापेक्षाही महाग होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

किंमत

लोह किंमत या संदर्भात खास असे अजून मला काही लेखन आढळले नाही. आपण ते कशावरून् म्हणत आहात?

आपला
गुंडोपंत

हंमम्

आपले म्हणणे योग्य आहे असे मला आढळले.

जरासा शोध घेतल्यावर
The origins of iron-working in India:
new evidence from the Central Ganga
Plain and the Eastern Vindhyas

हा संदर्भ हाती लागला.
यात श्री राकेश तिवारी Rakesh Tewari उत्तर प्रदेश च्या पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. त्यांनी सदर लेखात भारतातील लोखंडाची सुरुवात याचा उहापोह केला आहे शिवाय भारतातच लोखंडाच्या वापराची सुरुवात झाली. हे तंत्रज्ञान दुसरी कडून म्हणजे इराण आदी ठिकाणांहून आलेले नाही असाही दावा करतात.
जिज्ञासूंसाठी लेख वाचनिय आहे, त्यात शेवटी अनेक संदर्भही आहेत.

आपला
गुंडोपंत

सोने - लोखंड

सोने लोखंडापेक्षा आधी उपयोगात आल्याची शक्यता बरीच आहे. सोने निसर्गातच शुद्ध स्वरूपात आढळते तसे लोखंड सापडत नाही. विशेष प्रक्रिया करून लोखंड शुद्ध करावे लागते. सोने मात्र फक्त स्वच्छ करून घ्यायचे असते. तसेच लोखंड हा तुलनेने कठीण धातू असल्याने सहजपणे आकार देण्यास अवघड असते.

नितिन थत्ते

सुंदर्.

वाचतो आहे. लेखमाला अत्यंत वाचनीय, धन्यवाद.

हत्यारे व इतर

प्रियालीताईंचा आक्षेप एकदम मान्य. उत्तररामचरित्रातील उदाहरण द्यायला नको होते. त्यांनी दुसरी उदाहरणे देऊन माझे काम सुकर केलेच आहे.
आधुनिक मानव (होमो सपियन) वापरत असलेल्या हत्यारांच्या उत्क्रांतीचा इतिहास बघितल्यास खालील टप्पे आढळतात. पाषाणयुग- ताम्रयुग-ब्रॉन्झयुग- लोहयुग. यापैकी ताम्रयुगात, तांब्याबरोबर सोन्याचांदीचाही उपयोग चालू झाला होता.
आपल्याकडे अजून वापरात असलेल्या बैलगाडीचा मूळ आराखडा सिंधु खोर्‍यातील संस्कृतीमधेच प्रथम बनवला गेला. त्यामुळे याच काळात प्राथमिक स्वरूपातील(प्रिमिटिव्ह) घोडे जोडलेले रथ वापरात असण्याची शक्यता आहेच. यात काही भाग तांब्याचे असण्याचीही शक्यता आहे.
चन्द्रशेखर

रामजन्म

आपण श्री. भटनागरांच्या पद्धतीने काढलेला समय इ.स.पूर्व ५१०० म्हणता. श्री. वर्तक, त्याच पद्धतीने गणित करून इ.स.पूर्व ७३२३,डिसेंबर २३ म्हणतात. जर भटनागर यांनी नक्षत्रे कोणकोणती दिली आहेत हे कळले तर श्री.वर्तक व भटनागर यांच्या गणितात का फरक पडतो ते कळू शकेल. तर कृपया श्री. भटनागर यांनी गृहित धरलेली माहिती द्यावी.
शरद

भटनागर व वर्तक

श्री भटनागर यांनी ज्या पद्धतीने ही तारीख काढली आहे त्याचे संपूर्ण वर्णन आपल्या पुस्तकात दिलेले आहे. ते आंतरजालावर उपलब्ध नाही. जास्त माहिती साठी ते पुस्तकच वाचावे लागेल. ते पुस्तक रूपा आणि कंपनी यांनी प्रसिद्ध केलेले आहे.
चन्द्रशेखर

पुष्कर भटनागर

पुष्कर भटनागर यांची पद्धत थोडीफार नेटावर शोधल्यासही मिळू शकेल. एक दुवा मिळाला तो हा असा.

बालकांड

ग्रिफिथच्या भाषांतरातील वर्णनाप्रमाणे, भरताचा जन्मकाल हा रामजन्माच्या अकरा महिने नंतरचा येतो. हा जन्मकाल, मान्य केला तर रामकथेत सांगितलेले, भरताचे रामाबद्दलचे बंधुप्रेम, त्याची रामाबद्दलची भक्ती वगैरे गोष्टी जास्त सयुक्तिक वाटतात पण त्याच वेळी दशरथाने केलेला यज्ञ, त्याला अग्नीने दिलेला प्रसाद आणि सर्व राण्या एकाच वेळी गरोदर राहून त्यांना झालेली पुत्रप्राप्ती, या सारख्या गोष्टी रामकथेत नंतर घुसडल्या असाव्यात असेच मानावे लागेल.

रामायणातील बालकांडातील बराच भाग प्रक्षिप्त असावा असे म्हटले जाते. बालकांड आणि उत्तरकांड यांत रामाला सतत देवत्व देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांडात राम मनुष्याप्रमाणे वागतो. मनुष्याप्रमाणे विचार करतो, असे राम शेवाळकरांनी म्हटल्याचे आठवते. त्यामुळे रामजन्माचा अनैसर्गिक प्रकार रामायणात नंतर घुसडण्याची शक्यता मोठी आहे. परंतु मग याच आधारे, बालकांडातील रामजन्माचा काळही नंतर घुसडला गेल्याची शक्यता आहे काय?

बालकांड

रामजन्माचा काल नंतर घुसडला असण्याची शक्यता तर मक्कीच् आहे. परंतु आकाशातील सर्व महत्वाचे ग्रह व सूर्य- चंद्र यांची नक्षत्राच्या सापेक्ष स्थाने नंतरच्या कालात फक्त कल्पनेने देणे अशक्य वाटते. त्यामुळेच ती मूळ लोककथेतच असावी असे वाटते.
एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रिफिथच्या भाषांतरात आलेला हा रामजन्मकालाचा भाग इतर रामायण प्रतीतून (ज्या जालावर उपलब्ध आहेत) गायब झालेला मला आढळला. या प्रतीत दशरथाच्या राण्यांनी पायस ग्रहण केल्यावर फक्त रामजन्माचा उल्लेख आहे व नंतर विश्वामित्र ऋषि दशरथाच्या दरबारात आल्याचेच वर्णन आहे.त़ज्ञ मंडळी काही मदत करू शकतील का? पुष्कर भटनागर, त्यांना ग्रिफिथने भाषांतर केलेली मूळ रामायण प्रत कोठे मिळाली? या बाबत काहीही खुलासा करत नाहीत.
चन्द्रशेखर

उलट

उलट लोककथेमध्ये नक्षत्रांची स्थाने इत्यादि असणे सयुक्तिक वाटत नाही. लोककथेत नुसती कथा असण्याचीच शक्यता जास्त. उदा. लोककथेत शिवाजी अफजलखानाच्या भेटीचे वर्णन असेल. त्यावेळी पूर्वेच्या आकाशात कोणती नक्षत्रे होती आणि पश्चिमेला कोणती होती याचे वर्णन शाहीर करत बसण्याची शक्यता कमीच. (फारतर शिवाजीच्या कपड्यांवर कसली नक्षी होती त्याचे वर्णन करील).

फलज्योतिषाचे स्तोम वाढल्यानंतरच्या काळात रामाच्या गुणांना पोषक ग्रहस्थिती असल्याचे दाखवण्यासाठी अशी वर्णने घातली गेली असतील?

(अवांतरः विशिष्ट ग्रहनक्षत्र स्थितीवरून काळ ठरवताना पंचांगात वेळोवेळी केल्या गेलेल्या सुधारणा, बदलणारा ध्रुव तारा वगैरे गोष्टींचा विचार केला जातो का?)

पूर्वीच्या काळीही रामाच्या कालावरून काही वाद निर्माण झाला असेल का? त्यावेळी विशिष्ट काळ दाखवण्यासाठी हे उल्लेख (त्या काळातील प. वि. वर्तकादिंकडून) मुद्दाम घातले गेले असतील का?

>>एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रिफिथच्या भाषांतरात आलेला हा रामजन्मकालाचा भाग इतर रामायण प्रतीतून (ज्या जालावर उपलब्ध आहेत) गायब झालेला मला आढळला......... पुष्कर भटनागर, त्यांना ग्रिफिथने भाषांतर केलेली मूळ रामायण प्रत कोठे मिळाली? या बाबत काहीही खुलासा करत नाहीत.

की भटनागर यांनीच ते उल्लेख घुसडले आहेत?

नितिन थत्ते

ग्रिफिथ् यांचे भाषांतर

ग्रिफिथ् यानी रामायणाचे भाषांतर १८७०-७४ या काळात केले. तेंव्हा वर्तक् भटनागर् ही मंडळी जन्मायची होती. तेंव्हा त्यांनी काही घुसडले असणे शक्य नाही
चन्द्रशेखर

त्या काळातले

'त्या काळातले वर्तक' असे मी म्हटले होते. म्हणजे तशा प्रकारच्या व्यक्ती असे मला म्हणायचे होते.
नितिन थत्ते

ग्रीक पद्धत

तासांची महादशा (हॉरोस्कोप), नक्षत्रे, राशी या सर्व ग्रीक पद्धती आहेत. ग्रीकांकडून भारतीयांनी घेतलेल्या असे म्हटले जाते. तर मग रामायण काळात अशी गणिते असणे कसे शक्य आहे?

नक्षत्रे भारतीय

आहेत. राशी ग्रीकांकडुन घेतल्या आहेत. दक्षिण भारतीय ज्योतिष्यामध्ये नक्षत्राला जास्त महत्त्व आहे. बहुधा महाभारतात नक्षत्रांचे उल्लेख आहेत (चू. भू. दे. घे.).

विनायक

बरोबर वाटते

थोडीफार माहिती चाळल्यावर नक्षत्रे भारतीय आहेत हे म्हणणे बरोबर वाटते. धन्यवाद.

प्रतींमध्ये फरक

जर प्रतींमध्ये फरक असेल, तर एखादा भाग (एखाद्याच शाखेच्या लोकांनी) जोडला असायची शक्यता वाटते.

ग्रहांची गती काळात मागे आणि पुढे नेण्याची गणितपद्धती आर्यभट्टाच्या काळातली आपल्यापाशी आहे. त्यामुळेच सर्व ग्रह जेव्हा एका स्थानात होते, ते गणित करून कलियुगाची सुरुवात सांगितलेली आहे. (ही केवळ ५-६००० वर्षांपूर्वी आहे.) "आर्यभट्टीया"त याचा उल्लेख आहे.

खुद्द रामायणात या "कलियुग" कालमापनाचा उल्लेख नाही, हे विशेष. मला वाटते, की पाठभेदयुक्त ग्रहस्थितीपेक्षा तुम्ही वापरलेली अन्य प्रमाणे अधिक पटण्यासारखी आहेत.

 
^ वर