सिन्धु-सरस्वती संस्कृती
सिन्धु-सरस्वती संस्कृती
शाळेत असताना हडप्पा-मोहेंजोदडोबद्दल वाचलेले असते. सिन्धू नदीच्या काठी झालेल्या उत्खननात हजारो वर्षांपूर्वीची गावे सापडली व त्यात मडकी, खेळणी,मूर्ती, दागिने इत्यादी सापडले व ती आपल्या प्राचिन संस्कृतीची खूण आहे अशी जुजबी माहिती मिळते. महाराष्ट्रातही नद्यांच्या काठी उत्खनन केल्यावर अश्मयुग.ताम्रयुग व लोहयुग या तीन काळातील अवषेश मिळाले अशीही माहिती पुढे कानावरून गेली. पण पूरातत्वविभाग हा काही रंजनाचा विषय नाही, म्हणून तिकडे दुर्लक्षच झाले. वय वाढत गेले तसे कालबाह्यातही गोडी वाटण्यासारखे आहे असे वाटू लागले व २००० वर्षांमागची लेणी पहातो तर त्या आधी २००० वर्षे काय असावे याचे निदान वाचन तरी होऊ लागले. श्री.चंद्रशेखर यांच्या लेखानंतर वाटू लागले की या संबंधी काही माहिती उपक्रमावरही द्यावी.
(श्री. गुंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे संदर्भ शेवटी देतात. मी आज सुरवातीला देण्याची मुभा मागतो. आज या विषयावर इतकी माहिती जालावर मिळते की इथे दिलेली माहिती ही समुद्रातल्या थेंबाप्रमाणे आहे. आपण Indus civilization किंवा Pre-Hadappa Civilization अशा जागांवर गेलात तर आपणास १५,००० पेक्षा अधीक ठिकाणी अशी
माहिती मिळेल. मी त्यातली किती देऊ शकतो ? या लेखाचा उद्देश "तीळा तीळा, दार उघड" म्हणणे एवढाच आहे. आपण आपापल्या आवडीप्रमाणे खजिन्यातले उचला.)
कराची-लाहोर लोहमार्ग बांधत असतांना दगडांची गरज होती. हडप्पा गावापाशी विटांचे ढीग सापडले.ते लोहमार्गाकरिता वापरले. नंतर ज.कनिंगहॅमला तेथे काही शिक्के, मातीची भांडी, खेळणी आढळली.तेथे १९२०च्या सुमारास उत्खननाला सुरवात झाली. सिन्ध प्रांतात मोहेंजेदाडो येथे एका बुद्ध स्तुपाशेजारी खणतांना (१९२२) एक शहरच सापडले. ते व हडप्पा येथील साम्यावरून या संस्कृतीचा शोध लागला. ही स्थळे सिन्धू नदीच्या किनार्यावर असल्याने त्यांना Indus Civilzation सिन्धुसंस्कृती म्हणून ओळखले जाऊ लागले. मोहेंजेदडो येथे एकावर एक असे सात स्थर सापडले.काळ ठरवण्यात आला इ.स.पूर्व ३००० ते इ.स.पूर्व १४००. काय सापडले या उत्खननात ?
ग्रामरचना :
या शहरात काटकोनातले प्रशस्त रस्ते होते.विटांनी बांधलेली घरे होती. प्रत्येक घरामध्ये विहिर, न्हाणीघर-शौचालय होते. सांडपाणी वाहून नेण्याकरिता विटांनी बदिस्त गटारे होती. ती एका मोठ्या गटाराला जोडून गावाबाहेर काढली होती. सार्वजनीक स्नानघर होते. स्मशान होते. धान्य साठवावयाची गोदामे होती. गावाभोवती तटबंदी होती पण ती हल्ल्या पासूनच्या बचाव्याकरिता नव्हती, पुराचे पाणी गावात येऊ नये या करता होती. रस्त्यावर दिव्याकरता खांब होते. थोडक्यात कार्यक्षम स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत होती.
उद्योगधंदे :
शेती व व्यापार हे प्रमुख.व्यापार खुष्कीने व जलावरून. दक्षीण व पूर्व भारत तसेच सुमेर, इजिप्त,क्रीट इ. परदेशांशीही. सूत कातण्याची व वस्त्रे विणण्याची उपकरणे सापडली आहेत.
कापूस व लोकर यांची (रंगीतसुद्धा) वस्त्रे वापरात व व्यापारात होती.धातू, रत्ने, दगड, मणी, अलंकार,हस्तीदंताच्या नक्षीदार वस्तू, ह्या इतर वस्तू. तांबे बाहेरून आणून कांसे बनवत.
समाजरचना :
चार वर्ग : विद्वान व पुरोहित, क्षत्रिय,व्यापारी (व कारागीर) आणि कामगार. राजे, सरदार, गुलाम यांची प्रथा दिसत नाही.
देवधर्म :
पशुपति(शिव), मातृदेवता ( काली ?) इत्यादींच्या मूर्तींवरून प्राक ऐतिहासिक कालातील हिंदूधर्माची सुरवात वाटते.
मर्तिकप्रथा :
पुरणे व जाळणे, दोन्हीही प्रचारात होत्या.
लिपी :
चित्रलिपीच्या मुद्रा सापडल्या आहेत परंतु अजूनपर्यंत तीचा उलगडा झालेला नाही. ब्राह्मी लिपी हिच्यापासून निर्माण झाली असावी असे वाटते.
कालखंड :
इ.स.पूर्व ३५०० च्या आसपास सुरवात व इ.स.पूर्व १४०० च्या सुमारास लोप.
ही संस्कृती कशी लोप पावली या बद्दल जास्त माहिती द्यावयाची असली तरी ती पुढच्या भागात.इथे तीचा विस्तार कसा झाला त्याची माहिती घेऊ. १९२० च्या सुमारास
उत्खननास सुरवात झाली व ३० वर्षे सुस्तीतच गेली म्हटले तरी चालेल. पण नंतर भारताची पंचाइत झाली कारण हडप्पा-मोहेंजेदाडो पाकिस्थानात गेले. त्यामुळे ASI ने
(भारतीय पूरातत्व विभाग)राजस्थान, पंजाब,हरियाना वगैरे भागात धूमधडाक्याने उत्खननास सुरवात केली. सिंन्धू राहिली दूर, संस्कृती उभी रहावी अशी नदीही जवळपास
नाही.एक घगरा आहे पण ती तर लुकडी-सुकडी. तरीही धक्का बसावा अशी गोष्ट म्हणजे या भागात अशा २५०-३०० जागा सापडल्या.जरा उंचवटा दिसला की हाणा कुदळ, खाली ४००० वर्षांपूर्वीचे एक गाव, किमान खेडेगाव तरी हजर.व त्याच संस्कृतीचे. पाकिस्थानही मागे कसे रहाणार ? त्यांनाही तीच सफलता.एकुण जागा आठशेच्यावर.आणि कुठेकुठे ? उत्तरेस काश्मिर-बलुचिस्थान, पश्चिमेस इराणची हद्द, दक्षिणेस गोदावरीपर्यंत व पूर्वेस दिल्लीच्याही पलिकडे. जगातील सर्वात आकाराने मोठी पूरासंस्कृती ! दोन-तीन गोष्टीत ही संस्कृती तत्कालीन इजिप्त-सुमेरिअन संस्कृतींपेक्षा एकदम वेगळी होती. इथे सम्राट नव्हते; त्यामुळे त्यांचे पुतळे, पिरॅमिड वगैरेंची गरज भासत नव्हती. शांतताप्रिय असल्याने गावाभोवती संरक्षणाचे तट नव्हते. रस्ते, पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याच्या निचर्याची इत्यादी नियोजनबद्ध सोय होती.
धान्याची कोठारे होती. पण यापेक्षाही विस्मयजनक गोष्ट ही होती की वर जेथे खणत होते तेथे पाणी नव्हते पण खाली जेथे गाव होते तेथे विपुल पाणी असावे अशा खुणा होत्या. म्हणजे ४००० वर्षांपूर्वी तेथे विशाल नदी होती व आता तेथे ओसाड रण होते ! चक्रावलेल्या शास्त्रज्ञांनी वेदात शोध घेतला आणि त्यांना सापडली " सरस्वती".
ऋग्वेदातील पूज्य नदी. हिमालयात उगम पाऊन,सिन्धूला समांतर वहात जाऊन गुजराथमध्ये समुद्राला मिळणारी. कालौघात, नैसर्गीक कारणांनी तीचे पाणी कमीकमी होऊ लागले. ती समुद्राला मिळावयाच्या ऐवजी राजस्थानात लुप्त झाली. व नंतर संपूर्णत: नाहिशी झाली.संस्कृत वाङमयात तीचा संपूर्ण इतिहास पहावयास मिळतो. तर आपली ही प्राचिन संस्कृती तीच्या काठची. सिन्धू नदीच्या काठच्या गावांपेक्षा किमान ५-६ पट गावे हीच्या काठावर सापडली. म्हणजे हरप्पा संस्कृतीला खरे म्हणजे सरस्वती संस्कृती म्हणावयाला पाहिजे. आता सर्वजण "सिन्धु-सरस्वती" संस्कृती म्हणतात. नवीन उपकरणे व यंत्रे यांनी तीचा सर्व लुप्त प्रवाह आता दृगोचर झाला आहे.
मी आज दोन नकाशे देत आहे. एकात सरस्वती नदीचा प्रवास पहावयास मिळतो तर दुसर्यात हरप्पा-पूर्व, हरप्पा-सुरवात, हरप्पा-मध्य व हरप्पा -लय या कालप्रवाहातील उत्खनन स्थाने पहावयास मिळतात.
माझी उपक्रमवासीयांना नम्र विनंती आहे की त्यांनी जालावरून आपल्याला आवडलेली उत्खननात सापडलेल्या वस्तूंची चित्रे येथे द्यावीत (जशी देवळांची दिली होती).
दुसर्या भागात ही संस्कृती कशी लुप्त झाली त्याची मिमांसा करू.
शरद
(१)
Comments
सुंदर
सुंदर लेख, आवडला आहे.
आपले सरस्वती संस्कृती असण्याचे म्हणणे कदाचित योग्याही असेल असे वाटून गेले.
जालावर शोध घेतला असता हा दुवा मिळाला.
http://www.harappa.com/indus/indus0.html
भरपूर चित्रे आणि माहिती येथे आहे.
या शिवाय काही ठिकाणी असेही वाचले की सिंधु संस्कृती नंतर लोक गंगेकडे सरकले. ते मात्र मला तेव्हढे पटले नाही. आणि संदर्भासाठी तो दुवाही सापडला नाही..
असो,
आपला
गुंडोपंत
काही संदर्भ
जालावर अजून शोध घेतला असता,
एन्सायक्लोपेडिया इंडिका ही संदर्भ ग्रंथ मालिका महत्त्वाची वाटते.
या मालिकेचे संपादक एस एस शशी आहेत. यात भरपूर माहिती तर आहे. शिवाय अनेक चित्रेही आहेत.
दुसरा संदर्भ ग्रंथ म्हणजे एन्सायक्लोपेडिया ऑफ इंडिया
यातही माहिती आहे पण हा तुलनेने नवा आहे. आणि हा सर्व भारता विषयी नवी जुनी माहिती देतो.
मला तरी एन्सायक्लोपेडिया इंडिका ही मालिका महत्त्वाची वाटते.
या सोबतच 'प्राचीन भारतीय कला' या संदर्भातही शोध घ्यायला हवा असे माझे मत आहे. यावर सुमारे १९५० च्या दशकातही भरपूर लिखाण झाले आहे. परंतु ते सर्व जालावर उपलब्ध असेलच असे नाही.
असो,
तूर्तास इतकेच.
आपला
गुंडोपंत