मूर्खांची लक्षणे -२

मूर्खलक्षणांमध्ये समर्थ रामदास पुढे म्हणतातः
१२. जिवलग माणसांना जो अति दु:ख देतो, त्यांच्याशी कधी गोड शब्द बोलत नाही, नीच माणसापुढे मात्र जो अगदी नमून असतो, जो स्वतःला नाना प्रकारे सांभाळतो, मात्र कोणी आश्रयास आला तर त्यास दूर लोटतो,संपत्ती टिकेल या भरवशावर राहातो, मुलगा, कुटुंब, बायको हाच आपला आधार समजून जो ईश्वराला विसरुन जातो, 'जसे करावे तसे फळ पावावे' हे ज्याला कळत नाही तो एक मूर्ख
१३. स्त्रियांना पुरुषांपेक्षा आठपट कामवासना असते, असे म्हणतात (?) (मूळ रचनेत 'पुरुषाचेनि अष्टगुणे, स्त्रियांस ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे, तो एक मूर्ख' असे म्हटले आहे.) अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, दुर्जन माणसाच्या नादाने जो मर्यादा सोडून वागतो, भर दिवसा जो डोळे झाकतो (म्हणजे ज्ञान असून अज्ञानासारखा वागतो असा अर्थ बेलसरे यांनी दिला आहे, पण याचा दिवसा झोपणारा असा साधा अर्थही घेता येईल) तो एक मूर्ख
१४. देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण व स्वामी यांचा जो विश्वासघात करतो , दुसर्‍याच्या दु:खाने जो सुखी होतो, हरवलेल्या वस्तूबद्दल जो शोक करीत बसतो, कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो, कोणी विचारल्यावाचून साक्ष देतो, निंद्य वस्तूंचा जो अंगिकार करतो, जो सरळ अनुमान सोडून बोलतो, आडमार्गाने जातो, नीच कर्म करण्यासाठी सोबती जमवतो तो एक मूर्ख
१५. जो आपली पत राखू जाणत नाही, सदैव थट्टामस्करी करतो, कोणी हसला तर जो चिडतो आणि हातघाईवर येतो, अवघड पैज मारतो, कारण नसताना बडबडतो, पण जरुर असते तेंव्हा जो मुक्यासारखा गप्प बसतो तो एक मूर्ख
१६. स्वतःपाशी चांगला पोशाख किंवा उत्तम विद्या दोन्ही नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो, नातेवाईकांवर विश्वास ठेवतो, चोराला आपली माहिती सांगतो, दिसेल ती वस्तू मागतो, रागाच्या पायी आपणच आपले नुकसान करुन घेतो तो एक मूर्ख
१७ हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो, ज्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो, उत्तरास प्रत्युत्तर देतो, डाव्या हाताने पाणी पितो, जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो, स्वतःच्या घरात चोरी करतो तो एक मूर्ख
१८. ईश्वराला सोडून जो माणसांवर भरवसा ठेवतो, काही सार्थक न करता जो आयुष्याचे दिवस वाया घालवतो,संसारात भोगाव्या लागणार्‍या दु:खासाठी जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्राचा दोष लोकांत उघड करतो, लहानसहान चुकांना जो क्षमा करीत नाही, चूक करणार्‍याला जो सदा धारेवर धरतो, जो विश्वासघात करतो तो एक मूर्ख
१९. श्रेष्ठ माणसांच्या मनातून जो उतरतो, सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो, क्षणाक्षणाला ज्याचे मन बदलते, जुने चांगले विश्वासू नोकर सोडून जो नवे नोकर ठेवतो, ज्यांचा सभेला आवर नसतो ( म्हणजे जे नोकर बेबंद असतात असा याचा अर्थ असावा), जो भ्रष्ट मार्गाने द्रव्य मिळवतो, धर्म नीती, न्याय सोडतो, बरोबर राहाणार्‍या माणसांना तोडतो तो एक मूर्ख
२०. घरे स्वतःची स्त्री सुंदर असून जो स्दैव बाहेरख्याली असतो, जो पुष्कळांचे उष्टे खातो, आपला पैसा दुसर्‍यापाशी ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो, हलक्या लोकांशी देण्याघेण्याचा व्यवहार करतो, घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करत नाही, वाईट वस्तीच्या गावात राहातो, जो सदासर्वकाळ चिंताग्रस्त असतो तो एक मूर्ख
२१. दोन माणसे खाजगी बोलत असताना जो न बोलावता तेथे जाऊन बसतो, दोन्ही हातांनी डोके खाजवतो, जलाशयात चूळ टाकतो, पायाने पाय खाजवतो, नीच लोकांच्या घरी नोकरी करतो तो एक मूर्ख
२२. बायको व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो, भुतांच्या जवळ बसतो, शिस्तीशिवाय कुत्रे पळतो, जो परस्त्रीशी भांडणतंटा करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खांची संगत करतो, कोणाचे भांडण चालू असेल तर ते सोडवण्याऐवजी त्याची गंमत पाहातो, जे खरे आहे ते सोडून खोटे सहन करतो तो एक मूर्ख
२३. श्रीमंत झाल्यावर जो पूर्वीच्या माणसांची ओळख विसरतो, देवब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो, पण दुसर्‍याच्या कामाला उपयोगी पडत नाही, काही वाचताना जो मुळातील काही अक्षरे सोडून देतो किंवा पदरची घालून ते वाचतो, जो स्वतः कधी पुस्तक वाचत नाही , दुसर्‍या कुणाला वाचायला देत नाही, नुसते दप्तरात बांधून ठेवतो तो एक मूर्ख.
समर्थ रामदास म्हणतात की अशी ही मूर्खांची लक्षणे आहेत. वास्तविक मूर्खलक्षणे अगणित आहेत, पण त्यातली काही ही.त्यांचा त्याग केल्याने मनुष्य चतुर होतो. त्यानंतरच्या समासात समर्थांनी उत्तमलक्षणे सांगितली आहेत.
संदर्भः सार्थ श्रीमत दासबोधः प्रा. के.वि. बेलसरे

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचनखूण

साठवली आहे.

खटकेबाज समास

मूर्ख आणि पढतमूर्खांच्या लक्षणांचे समास वाचायला मोठी गंमत वाटते. रामदास हे एक उच्च कोटीचे कवी असल्याची जाणीव होते.

असेच!

मूर्ख आणि पढतमूर्खांच्या लक्षणांचे समास वाचायला मोठी गंमत वाटते. रामदास हे एक उच्च कोटीचे कवी असल्याची जाणीव होते

असेच!

अवांतर:
हा लेख जिथे खरी/जास्त गरज आहे तिथेही टाकलाय ना?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एक लेख एका ठिकाणी

असे धोरण आहे. बाकी समझनेवालोंको इशारा काफी है वगैरे...
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

स्वतःची स्री सुंदर नसल्यास

घरी स्वतःची स्त्री सुंदर असून जो सदैव बाहेरख्याली असतो

वरील वाक्यातून स्वतःची स्री सुंदर नसल्यास बाहेरख्यालीपणा केल्यास तुम्हाला कुणी मूर्ख म्हणणार नाही. त्यामुळे बाहेरख्यालीपणा करायचा असल्यास स्वतःची स्त्री सुंदर नसावी, असा संदेश मिळतो आहे काय?

ह्या मूर्खांच्या लक्षणातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. जसे हरवलेल्या गोष्टींचा शोक करीत बसू नये.

धम्मकलाडू
(ईश्वराला सोडून माणसांवर भरवसा ठेवतो, काही सार्थक न करता आयुष्याचे दिवस वाया घालवतो)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर