मूर्खांची लक्षणे -१

समर्थ रामदासांनी मूर्खलक्षणे लिहून आता इतकी वर्षे झाली. आजच्या काळात ही मूर्खलक्षणे सुसंगत आहेत का हे पाहाण्याचा हा एक प्रयत्न. त्यासाठी ही मूर्खांची लक्षणे काय आहेत हे पाहावे लागेल. यातली काही मूर्खलक्षणे व काही जालपरिचितांचे वर्तन यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
रामदास म्हणतात, जगात मूर्खांचे प्रकार दोन. एक मूर्ख व दुसरा पढतमूर्ख. त्यापैकी मूर्खांची लक्षणे अपार आहेत. त्यातील काही अशी:
१. कामवासनेपायी अत्यंत स्त्रीअधिन जीवन जगणारा तो एक मूर्ख ( समर्थांनी मूर्खलक्षणांची सुरवात कामवासनेपासूनच करावी अं?)
२ इतर नातेवाईकांना बाजूला सारुन जो बाईलबुद्ध्या बनतो, आपले अंतःकरण फक्त बायकोपाशीच उघड करतो, जो सासुरवाडीस अनाहूत जाऊन राहातो, कुलशील न पाहाता कोणत्याही मुलीशी लग्न करतो तो एक मूर्ख
३.मोठ्या अंहकाराने वागतो, तसा अधिकार नसताना दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो, आपण स्वतःच आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा असताना 'आमचे पूर्वज असे होते' वगैरे बढाई मारतो,तो एक मूर्ख
४. काही कारण नसताना जो उगीच हसत सुटतो, दुसर्‍याने दिलेला योग्य सल्ला ऐकत नाही, पुष्कळ लोकांशी जो भांडतो, स्वकीयांना दूर करुन जो परकियांशी मैत्री करतो, येता जाता दुसर्‍याची निंदा करतो, पुष्कळजण जागत बसले असता जो मध्येच हातपाय ताणून झोपतो, दुसर्‍याचा घरी भरमसाट जेवतो, आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो, जुगार, बाहेरख्यालीपणा, चोरी, चहाडी, परस्त्री, पाखरांची झुंज आणि नायकिणीचे गाणे या व्यसनांत जो मग्न असतो तो एक मूर्ख
५. आळशी, ऐकण्याची बुद्धी नसलेला, लाजाळू व विषय निर्लज्जपणे भोगणारा , दुसरा कोणी आपल्याला मदत करील या भरवशावर स्वतःचा प्रयत्न सोडणारा, आळशीपणातच संतोष मानणारा, घरात ज्ञानाच्या गप्पा मारणारा, पण सभेत गांगरुन गप्प बसणारा तो एक मूर्ख
६. जो स्वतःपेक्षा श्रेष्ठ असणार्‍या माणसांशी सलगी करतो, हिताच्या गोष्टी कुणी सांगू लागला की कंटाळतो, न ऐकणार्‍या लोकांना जो शिकवण्याचा प्रयत्न करतो, वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो, सज्जन लोकांना जो भानगडीत अडकवतो, कामवासना भोगण्यासाठी जो एकाएकी लाजमर्यादा सोडतो आणि बेलगाम वागू लागतो (पुन्हा कामवासना!) तो एक मूर्ख
७. रोग असून जो औषध घेत नाही, मुळीच पथ्य करत नाही, जीवनात जे जे आपल्या वाट्याला येईल ते आवडून घेत नाही, जो सोबतीवाचून परदेशी जातो, ओळखीवाचून सोबती जोडतो, महापुरात उडी घालतो, जेथे मान मिळतो तेथे अकारण वारंवार जातो, मिळालेला मान सांभाळू शकत नाही, योग्य गोष्टींचा अभिमान धरत नाही,तो एक मूर्ख
८. आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो, सदा सर्वदा जो अस्थिर चित्त असतो, कारणांचा नीट शोध न घेता अपराध नसून जो शिक्षा करतो, थोड्या खर्चासाठी जो फार कंजूषपणा करतो, देवाची व वडील माणसांची जो पर्वा करत नाही, अशक्त असला तरी वाचाळपणा करतो, काही धरबंद न पाळता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो, जो घरातल्या माणसांवर दातओठ खातो, पण बाहेर मात्र दीनपणाने नरमाईने वागतो, तो एक मूर्ख
९.कामवासनेबाबत (!) ढिला, कृतघ्न, वाचाळ, दुष्टबुद्धी असणारा, डरपोक, निर्लज्ज, वृथा अभिमानी, दुष्टकर्मे करणारा व मलिन राहाणारा तो एक मूर्ख . जो हलक्या माणसांच्या संगतीत राहातो, दुसर्‍याच्या बायकोशी एकांत करतो, रस्त्याने खात खात जातो, आपण कुणावरही उपकार करत नाही, दुसर्‍याने उपकार केला तर ज्याची फेड तो अपकाराने करतो, करतो थोडे, पण बोलतो फार तो एक मूर्ख
१०. जो तापट, आळशी , खादाड, दुर्वर्तनी, कपटी आणि धारिष्ट्यशून्य असतो, विद्या, वैभव, धन, पराक्रम, सामर्थ्य किंवा मान यापैकी काही जवळ नसून जो उगाच अभिमान मिरवतो, उद्धट, खोटा, लबाड, दुराचारी, वाकड्या बुद्धीचा व बेशरम असून जो बेसुमार झोप घेतो, जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर परसाकडे बसतो, सदा बहुदा नग्नप्राय असतो किंवा फिरतो, ज्याचे दात, डोळे, नाक, हात, कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात तो एक मूर्ख
११. वैधृति आणि व्यतिपात अशा वाईट मुहूर्तांवर जो प्रवासाला निघतो, अपशकुनाने दुसर्‍याचा घात करतो, फार राग आला किंवा अपमान झाला तर जो दुर्बुद्धीने आत्महत्या करतो, जो बुद्धीने अस्थिर असतो, तो एक मूर्ख
तूर्तांस इतकी मूर्खलक्षणे पचवण्याचा प्रयत्न करु.
(क्रमशः)
संदर्भः सार्थ श्रीमत दासबोधः प्रा. के.वि. बेलसरे

लेखनविषय: दुवे:

Comments

मुर्खांचे नंदनवन

जग हे एक मुर्खांचे नंदनवन आहे अस रामदासांची मुर्खांची लक्षणे वाचली की जाणवते. त्यांनी शहाण्यांची लक्षणे लिहिली आहेत का?
प्रकाश घाटपांडे

दासबोध!

काही वर्षांपुर्वी दासबोध जेव्हा हातात पडला तेव्हा चाळता चाळता मुर्ख आणि पढतमुर्खांची लक्षणे वाचुन अचंबा झाला होता. आजही त्यातली बरीच लागु आहेत असे मलाही वाटलेले.

दासबोधातील-'दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत् वाचीत् जावे|' अशी वाक्यं वाचली की, खरंच रामदास ५-६ वयापासुन 'विश्वाची चिंता' करीत् असावेत् असं वाटतं!

अगदी

अगदी घाटपांड्यांसारखाच प्रश्न मनात आला.
वाचतो आहे.

मूर्खांचे नंदनवन

जग हे एक मुर्खांचे नंदनवन आहे अस रामदासांची मुर्खांची लक्षणे वाचली की जाणवते.

खरे आहे. पण मूर्खांचे नंदनवन (फूल्ज़ पॅरडाइज़) ही पाश्चिमात्य कल्पना असावी असे वाटते.

(मूर्खानाम शिरोमणी) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तम लक्षणे

मूर्खलक्षणांप्रमाणेच समर्थांनी उत्तमलक्षणेही दिलेली आहेत.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

मस्त

मस्त!

वैधृति आणि व्यतिपात अशा वाईट मुहूर्तांवर

हे मुहूर्त कुठले?हे शब्द पहिल्यांदाच ऐकले / वाचले

अवांतर (फक्त ह घेणार्‍यांसाठीच)
बाकी स्वतः ब्रह्मचारी असले तरी रामदासस्वामिंचा काहि विशिष्ट विषयांचादेखील सखोल अभ्यास दिसतो ;)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

योग आहेत

वैधृति आणि व्यतिपात हे योग आहेत .
घरी पंचांग असेल तर त्यात पाहा दिसतीलच.

आपला
गुंडोपंत

:)

कामवासनेपायी अत्यंत स्त्रीअधिन जीवन जगणारा तो एक मूर्ख
जुगार, बाहेरख्यालीपणा, चोरी, चहाडी, परस्त्री, पाखरांची झुंज आणि नायकिणीचे गाणे या व्यसनांत जो मग्न असतो
दुसर्‍याच्या बायकोशी एकांत करतो,

ऑ? आमची तर समर्थांनी चांगलीच बोंब करून ठेवली आहे! ;)

पुष्कळजण जागत बसले असता जो मध्येच हातपाय ताणून झोपतो, दुसर्‍याचा घरी भरमसाट जेवतो,
दुराचारी, वाकड्या बुद्धीचा व बेशरम असून जो बेसुमार झोप घेतो, जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर परसाकडे बसतो, सदा बहुदा नग्नप्राय असतो किंवा फिरतो,

हे मस्त! :)

आपला,
(मूर्ख) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मूर्खांची अवलक्षणे

जो मुर्ख मुर्ख असतो,तो मुर्ख, मी मुर्ख नाही,हे इतर मुर्ख असलेल्या मुर्खांना 'सदा सर्वदा' भासवत असतो,
आणी जो शहाणा शहाणा नसतो,तो शहाणा स्वत:ला 'सर्व भावे' शहाणा समजला तरीही शहाणा असत नसतो.
जय जय रघुविर समर्थ !

लक्षणे..

हे सर्व वाचल्यावर जग हा मुर्खांचा बाजार आहे असे वाटायला लागले आहे.

आपलाच्.
मुर्ख
धोंड्या
.

सुधारणा

काही लक्षणे अपग्रेड करायला पाहिजेत.

आमचे पूर्वज असे होते

मोठ्या अंहकाराने वागतो, तसा अधिकार नसताना दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो, आपण स्वतःच आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा असताना 'आमचे पूर्वज असे होते' वगैरे बढाई मारतो,तो एक मूर्ख

यातली काही मूर्खलक्षणे व काही जालपरिचितांचे वर्तन यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा

'योगायोग' खराच! :)

 
^ वर