जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (उत्तरार्ध)

फोर्थ डायमेन्शन 34
जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (उत्तरार्ध)

मीमॅटिक्स शास्त्र की कल्पनाभरारी?
मीम्स या संकल्पनेचा आपण स्वीकार केल्यानंतर जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलते. मीम्सच्या दृष्टिकोनातून मनुष्यप्राणी हा केवळ मीम्सचे वाहक म्हणून काम करणारा एक जैविक यंत्र असतो. मीम्सचा (आक्रमक) प्रसार, त्यांची अधिकृत नक्कल करण्याचा पुरेपूर प्रयत्न व तुटपुंज्या संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग यातून आपला उद्देश साध्य करून घेणे यासाठी माणसांचा वापर करून घेतला जातो. मुळात मानव हा जनुकांचा गुलामही नाही व वाटेल ते वाटेल तसे वाटेल तेव्हा काहीही करू शकणारा स्वतंत्र प्राणीही नाही. आपण सर्व या उत्क्रांती प्रक्रियाचे सहभागी आहोत व ही प्रक्रिया वृद्दींगत करणाऱ्या मीम्सचे (व जनुकांचे) वाहक आहोत.
मुळातच मीम्सची संकल्पना धक्कादायक व भयकारक आहे. या एका सिद्धांतातून मानवी संस्क्रृती व जैविक उत्क्रांती या दोन्हींचीही उकल होऊ शकते हे विधानही तसेच धक्कादायक आहे. त्याचवेळी सर्व मानवी व्यवहार, सर्जनशीलता, सर्जनक्षमता, बुद्धीचातुर्य, कुशलता इ. सर्व निरर्थक आहेत व खेळविता धनी हा दुसराच कुणीतरी आहे असा अर्थ यातून निघत असल्यामुळे ही थरकाप उडविणारी कल्पना आहे, असे वाटू लागते. परंतु या आरोपात काही तथ्य असू शकेल का? अशा गृहितकांचा वैज्ञानिकरित्या प्रयोग करून काही निष्कर्ष काढता येतील का? मुळात नियंत्रित प्रयोग रचना शक्य आहे का? तसे होत नसेल तर मीमॅटिक्स हे शास्त्र म्हणून निरुपयोगी ठरू शकेल.
मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये मीम्सचे स्थान वादातीत आहे, असे सुसान ब्लॅकमोरला वाटते. मीमॅटिक्स मानवी संस्क्रृती व सामाजिक विकास या संबंधातील अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तर शोधू शकते. आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत, कारण केवळ मनुष्य प्राणीच अनुकरणाचा मार्ग अनुसरू शकतो. पेशीतील जनुकाप्रमाणे हे नवीन रेप्लिकेटर्स कार्य करत असतात. अशा प्रकारे मनुष्य जातीत जीन्स व मीम्स असे दोन रेप्लिकेटर्स कार्य करत आहेत. यामुळेच या पृथ्वीवरील लाखो प्राणीजातीत आपण आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहोत. आपल्यातील मोठा मेंदू, भाषाज्ञान व अतिरिक्त अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षमता यांची कारणं हे दोन्ही रेप्लिकेटर्स असावेत.
आपल्यातील मेंदूच्या विशाल गात्राचे विश्लेषण मीमॅटिक्स नीटपणे करू शकते. जनुकरचित हा मेदू माणसाच्या अगदी जवळच्या नात्यातल्या एप्सच्या तुलनेत गात्र व वजनाने तीन पट मोठा आहे. पारंपरिक सिद्धांतानुसार जनुकीय लाभ, शिकारीचे आधुनिकीकरण, कार्यकुशलता, सहकारी गटात राहण्यासाठी लागणारे सामाजिक कौशल्य यासाठी मोठ्या मेंदूची गरज भासू लागली. आदिमानव ते आधुनिक मानव या अडिच लाख वर्षाच्या संक्रमण काळात मीम्सचा उदय व विकास झाला असावा. दोन-अडीच लाख वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मानवाच्या मेंदूत वाढ न झालेला व दगडी हत्यारांचा उपयोग माहित नसलेला काळ. निसर्गाश्रित जीवनामध्ये एकमेकांना जे काही कळवायचे असेल तेवढे भावनादर्शक ध्वनीने कळवले जात असावे. पण तेवढ्याने मानवाची गरज भागणे शक्य नव्हते. त्याला सृष्टीतील नवनव्या वस्तूंचा निर्देश करायचा होता. माहितीची देवाण-घेवाण करायची होती. केवळ चित्काराने वा हातवारे करून ते शक्य नव्हते. चित्कारांचे व हातवाऱ्यांचे अनुकरण करण्यास शिकणे याला पर्याय नव्हता. चिंपांझीसारखे प्राणी काही प्रमाणात शिकत असल्याचा आभास निर्माण करतात. पण तो आवाका नगण्य मानला जातो. त्या तुलनेने माणसाचे नक्कल करण्याची कसब अप्रतिम आहे. एखाद्या नाविन्यपूर्ण वर्तणुकीची किंवा एखाद्या प्राण्याच्या हालचालीची वा आवाजाची हुबेहूब नक्कल करणे ही सोपी गोष्ट नाही. हे आता नैसर्गिक वाटत असले तरी ही पूर्ण प्रक्रिया फार गुंतागुंतीची असते. नक्कल केल्यामुळे काही लाभ झाले पाहिजेत, ज्याची नक्कल करायची ती अफलातून गोष्ट असावी, ज्याला चांगल्या प्रकारे नक्कल करता येते त्याचा उत्कर्ष होत गेला पाहिजे, इ.इ. अटी पूर्ण होत गेल्याने जनुकं मेंदू मोठमोठा करण्याच्या प्रयत्नात लागले व हा मोठा मेंदू जनुकसंग्रह वाढविण्यास मदत करू लागला.
जनुकं हे नेहमीच एखाद्या 'रोलमॉडेल्स'ची निवड करतात. या ट्रेंडसेटर्सना नेहमीच समाजात उच्च स्थान मिळते. जनुक यांच्याच प्रती काढण्यासाठी प्रयत्न करू लागतात. अशा प्रकारे वंशवृद्धीसाठी या रोलमॉडेल्सच्या गुणविशेषांचे बारीक सारीक वर्तणुकीच्या प्रकारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. वंशवृद्धीसाठी स्त्री-पुरुष अशाच जोडीदाराची निवड करू इच्छितात. मग त्यांचे जनुकं कर्मकांड, फॅशन्स, गाणे, नाचणे, चित्र रंगवणे, घर सजावट करणे इत्यादी गुणांचेही वाहक बनतात. अशा प्रकारे मीम्सच्या उत्क्रांतीमुळे आपल्या मेंदूत कलागुण, धर्म, देव, श्रद्धा इत्यादीबाबत आपुलकी निर्माण करणाऱ्या जनुकांचे संवर्धन होऊ लागते. अशा जनुकांचा संग्रह वाढतो. अशा प्रकारे आपला मेंदूचा जनुक व मीम्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकास झालेला असल्यामुळे अनुकरण करण्यात आपण तरबेज आहोत.
भाषाज्ञान
भाषेचे ज्ञानसुद्धा जनुक-मीम्स या जोडीचीच निर्मिती असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. आजसुद्धा मेदू व भाषाज्ञान यांच्या संबंधाविषयी बरेच संशोधन चालू आहे. परंतु या संशोधनाचे निष्कर्ष जनुकांच्याच बाजूचे आहेत. भाषा ही समाजातील विविध गटांत परस्पर सहकार्य वाढविणारी निर्मिती आहे. भाषेच्या निर्मितीने विचारांना, म्हणजे मेंदूच्या व बुद्धीच्या विकासाला प्रचंड चालना मिळत गेली. शब्दोच्चारांच्या प्रयत्नात जीभ व गळ्यावर मज्जातंतूंचे व मज्जातंतूवर मेंदूचे नियंत्रण असते. श्रवणशक्ती ही देखील बोलण्याशी संबंधित असते.
मीमॅटिक्स मात्र भाषाज्ञानाविषयी वेगळ्या प्रकारे मांडणी करते. रेप्लिकेटर्सच्या लक्षणांमध्ये प्रजननक्षमता, सुस्पष्टता व दीर्घायुष्य यांना फार महत्व दिले जाते. हुबेहूब व दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रती काढू शकणाऱ्या रेप्लिकेटर्सचा सर्वात वरचा क्रमांक असतो. हातवारे करून लक्ष वेधण्यापेक्षा ध्वनीद्वारे लक्ष वेधणे जास्त परिणामकारक ठरते. स्पष्ट शब्दोच्चार व शब्दा-शब्दामधील अंतर यांतून अर्थपूर्ण संभाषण करता येते. विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. नक्कल करण्यास कष्ट पडत नाहीत. काही तुरळक प्रयत्नातून नाविन्य आणता येते. या सर्व मीम्सच्या क्रिया-प्रक्रियांचा मेंदूवर नक्कीच परिणाम झाला असणार. मीम्सच्या स्पर्धेतून व मीम्स-जनुकांच्या संयुक्त प्रयत्नातून भाषा समृद्ध होत गेली, असे मीमॅटिक्सच्या पुरस्कर्त्यांचा दावा आहे.
मीम्सची घोडदौड
मीम्स म्हणजे स्वप्नसदृश चमत्कारिक, जादुई असे काहीतरी नसून माणसाच्या स्मृतीत, कृतीत व नित्य वापरात येणाऱ्या साधनात साठवलेली माहिती असे म्हणता येईल. याचा अर्थ सर्वच्या सर्व गोष्टी मीम्स होऊ शकतात असे नव्हे. कारण ज्या गोष्टींची हुबेहूब नक्कल करता येत नाही व त्यातून सामूहिक फायदा मिळत नाही त्या आपोआपच बाद होतात. चटकदार गोष्टी, अद्भुत- चित्तथरारक मिथके, सोपे-सुलभ-विनाखर्चिक फॅशन्सचे प्रकार, वेशभूषा, खाद्यप्रकार, संगीत, नृत्य, भाषा, भाषाशैली, बोलण्याचे ढंग, म्हणी, धर्म, रूढी, अंधश्रद्धा, शोध, सिद्धांत, वैज्ञानिक जाणिवा, न्यायव्यवस्था, लोकशाही मूल्ये, इत्यादी मीम्सच्या यादीत आहेत. परंतु वैयक्तिक अनुभव, गुंतागुंतीची भावनेची अभिव्यक्ती, खाण्याची-राहण्याची पद्धत, शेजाऱ्याविषयीच्या प्रतिक्रिया, भीतीच्या वा आपत्तीच्या काळातील वर्तणूक इत्यादी गोष्टी मीम्सच्या प्रकारात मोडत नाहीत. कारण या प्रकारच्या गोष्टींची सही सही नक्कल करणे, त्यांचा प्रसार करणे सहजासहजी जमणार नाही. शिवाय अशा गोष्टी दीर्घ काळ टिकणाऱ्या नाहीत. तसेच मनात दडवलेल्या गोष्टी मीम्स म्हणवून घेण्याच्या लायकीचे ठरत नाहीत.
उत्क्रांतीच्या दीर्घ प्रवासात सुधारित व जास्त कार्यक्षम जनुकांप्रमाणे मीम्सचे झेरॉक्स मशीनसुद्धा अद्यावत होत आले आहे. बोलीभाषेचे लिखित भाषेत रूपांतर, मुद्रणयंत्रामुळे प्रती काढण्याच्या वेगात व जास्तीत जास्त लोकापऱ्यंत पोचण्याच्या शक्यतेत वाढ, तारायंत्र ते मोबाइल फोन, साधे पोस्ट कार्ड ते ई-मेल, फोनोग्राफ ते डिजिटल व्हिसिडी प्लेयर, मेन फ्रेम संगणक ते इंटरनेट सुविधा, ही सर्व लाखोंनी प्रती काढणारे, आवृत्तीवर आवृत्ती काढणारे मीम्सची साधने आहेत. आजचा माहितीचा स्फोट हा मीम्सच्या उत्क्रांतीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा ठरत आहे.
डेनियल डेनेट या मानवी जाणिवांविषयक अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मते मीमॅटिक्स हे शास्त्र म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. आज जरी ही संकल्पना धूसर, अर्धे-कच्चे, किंवा मानवी संस्कृतीचे विश्लेषण करण्यास अपुरी वाटत असली तरी मेंदूच्या रचनेत माहिती प्रसार करणारा भाग कुठेना कुठे तरी सापडेल, अशी आशा तो व्यक्त करतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

मीमॅटिक्स शास्त्र की कल्पनाभरारी?

अतिशय सुंदर लेख आवडला
संजीव

 
^ वर