बुधिया, पा आणि आपण
काहि वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच बुधिया या (तेव्हा) चार वर्षाच्या मुलाच्या धावण्यासंबंधीत बातम्यांनी भरलेले रकाने वाचले. ज्या वयात रेकॉर्ड म्हणजेच काय हे कळत नाहि त्यावयात त्याला एका रेकॉर्डसाठी त्याला ६५ कि.मी धाववलं गेलं होतं. त्यावेळी त्या मुलाला प्रसिद्धी बरोबरच सहानूभूती मिळाली होती. त्याच्या प्रशिक्षकांना बहुदा दंड/शिक्षा झाल्याचेही आठवते. आज बालदिनाच्या निमित्ताने त्या बुधियाची पुन्हा आठवण झाली.
अशी अचानक आठवण होण्यामागे म्हटलं तर काहिच कारण नाहि आणि म्हटलं तर बरीच आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भोवती मला सतत दिसणारे बुधिया. एक नाहि तर अनेक बुधिया. बुधिया कुठे दिसत नाहि? मॉल्समधे काचा पुसताना, हॉटेलात टेबल पुसताना, गॅरेजवाल्याकडे टायर धरून उभा असलेला, घरोघरी फूलपूडी वाटणारा.. तुम्ही जिथे बघाल तिथे आपल्या इच्छेने किंवा परिस्थितीने आपले बालपण सोडून इतरांच्या तालावर पळणारा बुधिया आजही दिसतो
पण निदान ह्या बुधियांना काहि लोक, मालक, पालक यांचबरोबर प्रमाणात परिस्थिती पळवत असते पण सध्या चांगल्या सिस्थितीत असणार्या घरांमधूनही दिसणार्या बुधियांचे काय?
आमच्या ओळखीतील एक पालक आपल्या मुलीला "डान्स क्लास" बुडबिल्याबद्दल धरून फटकावणार इतक्यात नटराजासारखा मी त्यांच्याकडे पोचलो. पुढे गप्पांच्या ओघात तिच्याच आईने मी कशी छाऽऽन नाचायचे पण लग्न झालं आणि सगळंच बंद झालं अशी माहिती दिली. आणि म्हणूनच ही आई मुलीला इच्छा असो नसो डान्स शिकवणारच असा स्वतःशी पण करून बसली आहे. स्वतःच्या इच्छे विरूद्ध आईच्या इच्छेखातर / जबरदस्तीने डान्समागे पळणारी ती चिमुरडी बुधियाच नाहि का?
असा विचार मनात आला आणि मग तर मला बहुतांश मुलांचा बुधिया झालेला दिसू लागला. सिग्नलवर, रेल्वे स्टेशनवर पोटाची खळगी भरत पळणारा बुधिया.. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकापाठोपाठ एक कळणार्या/न कळणार्या परिक्षा देत रॅट रेस मधे जिवाच्या आकांताने पळणारा बुधिया.... केवळ आपल्या प्रशिक्षकांच्या इज्जतीखातर खाड्या पोहत पार करणारा बुधिया... दर मे महिन्यात दिवाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची इच्छा असूनही एका नवीन कँपला जबरदस्ती जाणारे बुधिया... एक ना दोन सारीकडे मला बुधिया आणि फक्त बुधियाच दिसू लागले.
बरं हे प्रकरण बुधियावरच थांबलं असतं तरी मी हा लेख लिहायला घेतलाही नसता. त्यात आज अमिताभचा नवा "पा" हा चित्रपट येतोय आणि त्यात अमिताभने अकाली वृद्धत्त्व येणार्या मुलाची भुमिका केली आहे वगैरे वगैरे लिहिलेले वाचले आणि मनात आले खरंतर हल्ली प्रत्येक पालक मुलांना मोठे करायच्या इतका मागे आहे की काहि वर्षांनी सगळीच मुले अशी वागतील का? मुलांचा बुधिया झालाच आहे आता तर टॅलेंट शोज वगैरेंनी त्यांचा "पा" करायचा ठरवला आहे की काय कोण जाणे.
जोपर्यंत पालक मुलांना त्यांना जे हवे आहे त्यात उत्तम कसे बनता येईल अशी मार्गदर्शकाची भुमिका घेत नाहित तो पर्यंत ह्या बुधिया आणि पा च्या गराड्यात हरवलेल्या मुलांचा बालदिन हा एकाच दिवशी साजरा होणार
तेव्हा ह्या बालदिनानिमित्त सर्व मुलांना आपले बालपण जपण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. !!!
Comments
उत्तम प्रकटन
हा लेख दुर्लक्षित का राहावा ते कळले नाही बॉ? :-( समयोचित लेख आहे. अजूनही फुलवता आला असता.
आजकाल सर्वच मुलांचा बुधिया होत आहे हे निरीक्षण बर्याच अंशी खरे आहे.
खरे आहे. बर्यांच घरांत मुलांना काय करायचे आहे हे त्यांना न विचारता केवळ पालक सर्व निर्णय घेत असतात. तसे त्यात सर्वच चुकीचे आहे असे नव्हे. अनेकदा तसे करणे गरजेचे असते कारण लहान वयात मुलांचा कल पारखणे पालकांनाच शक्य असते. परंतु, मुलांचा कल नाही हे कळूनही आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्ती करण्याची मुले साधने आहेत असे वाटणारे पालक नजरेत येत असतात हे देखील सत्य आहे.
नुकतीच झी टिव्हीवर सारेगमप लिटल चॅम्प्स स्पर्धा पूर्ण झाली. "नॉक आउट"च्या वेळेस यांतील पोरांची दया येत असे. डोळे गच्च बंद करून प्रार्थना करणारी आणि नंतर धाय मोकलून रडणारी मुले पाहिली की "अरेच्चा! यांचे जीवन आताच सुरु झाले आहे आणि या जीवघेण्या स्पर्धेत शिखरावर पोहोचण्याचा प्रचंड आणि वेडा दबाव त्यांच्यावर आहे" याची प्रकर्षाने जाणीव होत असे.
असो. लहान मुलाच्या पायांत त्याच्या वडिलांचे बूट असणारा फोटो अगदी नेमका वाटला.
बालहक्क
पालकच गोंधळलेत्.
अवांतर- बालमजुरीच्या कायद्याची जर खरोखरीच अंमलबजावणी झाली तर अनेक मुले शिक्षणापासुन वंचित होतील.
प्रकाश घाटपांडे