कालबाह्य
कालबाह्य
मनुस्मृतीवर प्रतिसाद देतांना श्री. अभिजित लिहतात
'.... ह्या कालबाह्य ग्रंथावर चर्चा करण्याचा उद्देश काय ? निव्वळ माहिती म्हणून तरी अशी माहिती देणे-वाचणे वेळेचा अपव्यय नाही का ?.उदा. जगाच्या व्युत्पत्तीवर मनु काय म्हणाला यापेक्षा डार्विन काय म्हणाला हेच भारत धरून जगभर शिकवले आणि मानले गेले....'
वाचल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया होती " Origin of species " म्हणजे जगाची व्युत्पत्ती नव्हे. राम-कृष्ण, शिवाजी, टिळक,गांधी यासारख्या व्यक्ती,रामायण,महाभारत, शाकुंतल-मेघदूत सारखे वाङ्मय, फार कशाला घरातील आजी-आजोबा यांसारख्या (लौकिक अर्थाने , सामान्य) व्यक्तीही कालबाह्यच आहेत. त्यानाही वेळेचा अपव्यय म्हणून टाकून द्यावयाचे ? ..वगैरे."
प्रतिक्रिया टंकून झाली पण पाठवली नाही. अभिजित आपल्या घरी येऊन गेलेला एक उत्साही तरूण आहे, त्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना विवाद करून,त्याचे म्हणणे खोडून काढता येईल पण ते योग्य नव्हे. तर ही नवीन पिढीची प्रातिनिधिक भावना आहे असे गृहित धरून त्याचे उत्तर शोधण्याचा विचार करावयाला पाहिजे. का बरे त्याला वाटते की कालबाह्य म्हणजे भूतकालातल्या गोष्टीवर वेळ घालवणे हा अपव्यय आहे ? काळ बदलला म्हणून ? पण तो तर नेहमीच बदलत आला आहे. मग या पिढीतच एकदम बदल का झाला असावा ? दोन उदाहरणे घेऊन मला काय म्हणावयाचे आहे ते सांगावयाचा प्रयत्न करतो.
लहानपणी रामायण-महाभारत, शिवाजीच्या गोष्टी वाचण्यात बालपण गेले. आज माझी नात टिव्हीवर छत्रपती शिवाजी ही सुरेख मालिका पहावयाच्या ऐवजी पोगो पहाणे पसंत करते. तीला काय पहावयाचे दहा पर्याय असतील तर मलाही काय वाचावयाचे याला २-४ तरी पर्याय होतेच की. मग "अभिजात" बद्दल नावड कोठून आली ? मला वाटते याचे कारण पालकांचे बदलेले निकष. आई जर "या लाजिरवाण्या घरात" पहात असेल तर मुलगी पोगो/कार्टूनच बघणार. वडीलांनी ते "बेकार आहे" म्हणून भागणार
नाही. हा फरक एका पिढीत थोडाथोडा पडला. दोन पिढीत त्याने धक्का बसण्याइतका बदलाचे रूप घेतले. पहाणे-वाचणे-बोलणे-वागणे सगळ्यातच (आमच्या दृष्टीने) घसरणच होत गेली. अवनीला शिवाजी कालबाह्य झालेला आहे.
१९६०-७० च्या दरम्यान माझा डॉक्टर मित्र अमेरिकेत गेला. तिकडे स्थायिक झाला. त्याच्या पहिल्या मुलीबद्दल चौकशी केल्यावर कळले की एका वर्षाच्या मुलीला खाणे-पिणे झाले की रात्रभर तीच्या खोलीत एकटी ठेवत. मी बेशुद्ध पडावयाचाच राहिलो. कारण विचारल्यावर तो म्हणाला "मुलांना स्वयंनिर्भर करावयाचे म्हणजे त्यांना लहानपणापासूनच अशा सवयी लावाव्या लागतात." आमची ट्युब लागली. सोळाव्या वर्षी मुलमुली आईवडीलांना टाकून, घर सोडून का जातात. त्यांच्या भावनीक
गरजेच्या वेळी तुम्ही बाजूला झालात, तुमच्या गरजेच्या वेळी ते बाजूला होतात. वृद्धाश्रमात टाकले की मग वर्षात एकदा कार्ड पाठवले की संपले. आई-वडील..कालबाह्य.
मला सागावयाचे आहे की भूतकाळाशी घट्ट नाते जोडावयाचे असेल तर कुटुंबात आईवडीलांनी त्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. मुख्य म्हणजे "वेळ" काढला पाहिजे. मुलांना जुने मग ते पुस्तक असो, व्यक्ती असो, ही टिकवून ठेवण्याची गोष्ट आहे हे अंगवळणी पडले तर कालबाह्य गोष्टींची संख्या कमी होईल. आणि आयुष्याच्या सायंकाळी आपणही कालबाह्य झालो आहोत अशी टोचणी कमी लागेल
जेवढ्या स्पष्ट शब्दात मला जे सांगावयाचे आहे ते उतरलेले नाही याची मला कल्पना आहे. कालबाह्य ही संकल्पना आहे. पूर्वी जुन्या घरात माळ्यावर टाकलेल्या वस्तू ५-१० वर्षांनी काढल्या जायच्या. व त्या वेळी हजर असणार्या प्रत्येकाला आता विस्मरण झालेल्या पण एकेकाळी जीव की प्राण असलेली वस्तू समोर दिसावयाची.
शक्य आहे, अभिजितला २५ वर्षांनी असे ग्रंथ कालबाह्य वाटणार नाहीत. आणि कालबाह्य वाटले तरी त्यांची माहिती वेळेचा अपव्यय वाटणार नाही.
शरद
Comments
पटणारे न पटणारे
खरे आहे परंतु असे बघा की तुम्हाला फक्त वाचायचे पर्याय होते. तिच्यासमोर वाचायचा, टिव्ही पहायचा, डिव्हीडी पाहायचा (म्हणजे स्वतःला ज्या वेळेवर जे पाहायचे आहे ते निवडायचा), व्हिडिओ गेम खेळायचा, त्यापुढील गेम्स असतील जसे वी, एक्स बॉक्स वगैरे असे अनेक पर्याय आहेत. (येथे फक्त एकट्याचे विरंगुळा पर्याय गणतीस धरले आहेत.) तिने नेमके काय करावे? तिचे मित्र-मैत्रिणी पोगो बघतात. त्यावर दुसर्या दिवशी चर्चा करतात त्यावेळेस शिवाजी मालिका पाहून त्या मुलांत आपण किती बावळट आहोत हे दाखवावे (तिला या वयात शिवाजी चांगला की पोगो हे ससंदर्भ पटवून देण्याचा अनुभव नसावा. माझ्या मुलीला अक्कलही नव्हती.)का तिच्या वयाची मुले नव्या तत्रंज्ञानाशी जवळीक साधत असताना त्यांच्याशी फटकून राहावे.
दुर्दैवाने म्हणा हवे तर, असे होणे नाही. मुलांना आपल्या आजूबाजूचे जे करतात त्याचे अनुकरण करण्याची सवय असते.
हेच कारण असेल असे नाही (असूही शकते). अभिजातविषयी नावड उत्पन्न होण्याचे कारण आजकालची मुले त्याच्याशी जवळीक साधू शकत नाहीत हे देखील असावे. त्यांच्या आजूबाजूच्या जगात इतक्या नव्या गोष्टींचा मारा त्यांच्यावर होत आहे की नवीन शिकावे की जुन्याला धरून ठेवावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
मैत्रिणीला एसएमएस करायला शिकावे की महाभारत, रामायण वाचावे यावर त्यांनी आपापला निर्णय घ्यावा आणि आपल्याला काय हवे, नाही ते ठरवावे हे योग्य वाटते.
माणसाला एका वयात आपल्याला काय करायचे आहे, कोणती दिशा घ्यायची आहे त्याची जाणीव होत असते. (प्रत्येकालाच होत असेल असा दावा नाही) ती जाणीव होण्याची वेळ येवू द्यावी.
हे पटणारे आहे. मुलांना पटवून सांगण्याची कला हवी. त्यांच्यात विषयाची गोडी निर्माण होण्याचे प्रयत्न करायला हवेत. परंतु, मनुस्मृतीवर आपण लेख लिहिलात त्यातून अभिजितला गोडी वाटावी असे घडले नाही याचा दोष तुम्हालाही आहे. :-) कारण त्याला पटेल असे आपण मांडू शकला नाहीत. हेच अनेक पालकांच्या बाबतीत होते.
का बरे? आपण कधी ना कधी कालबाह्य होणार असतोच. जसे लहानांनी अभिजात वाचावे अशी अपेक्षा आपण ठेवता त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडीनिवडीत भाग घ्या. नातीबरोबर पोगो बघण्याचा आनंद तुम्हीही मिळवा. कालबाह्य होण्याची टोचणी अजिबात होणार नाही.
खरे सांगा
मलाही काय वाचावयाचे याला २-४ तरी पर्याय होतेच की
ते सारे सोडून तुम्ही रामायण वाचत होता का? इतर पुस्तकेसुद्धा वाचत होता की नाही? आपल्या लहानपणी टेलिव्हिजन नव्हता, कार्टून्स नव्हते. शाळेचा गृहपाठ नव्हता, परीक्षेतल्या मार्कांचे टेन्शन नव्हते, अवांतर क्लास नसायचे . मुलांकडे भरपूर मोकळा वेळ असायचा आणि तो घालवण्याची साधने कमी होती. पुस्तके वाचणे हे त्यातले एक महत्वाचे साधन होते. मी तर जे पुस्तक हाती पडेल ते वाचत होतो.
कालबाह्यता या विषयावरील माझे विचार आपल्या विचारांशी जुळतात. आपणच कालबाह्य झालो आहोत का हा विचार अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. फक्त मी त्यासाठी कोणाला दोष देत नाही. कोणती बाब कालातीत आहे आणि कोणती कालबाह्य ठरेल हे सुद्धा काळच ठरवतो असे मला वाटते.
वाचन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
श्री.आनंद घारे यांनी जे लिहिले आहे त्याच्याशी सहमत आहे.ते लिहितातः......"मी तर जे पुस्तक हाती पडेल ते वाचत होतो."....मी हेच करीत होतो. पण पुस्तक हाती पडणे दुर्मीळच होते. आई कुणाकडून तरी रामायण/महाभारताची पोथी(सुटी पाने) आणून दुपारी मोठ्याने वाचत असे ते ऐकले. वडिलांच्या लहानशा कपाटात विनोबांची गीताई, गीता प्रवचने अशी पुस्तके होती ती वाचली.हॅरीपॉटर,टिनटिन (मराठीत) मिळाले असते तर वाचलेच असते.मात्र पुढे समज आल्यावर अभिजात साहित्य वाचले असते असे वाटते.
आम्हाला बालपणी खूपच मोकळा वेळ मिळत असे. आताच्या मुलांना तसा मिळत नाही हे खरे.
प्रतिसाद
लिखाण आवडले.
काही मुद्दे सुचतात.
१. चक्रमेनिक्रमेण गती : आज जी गोष्ट बिनमहत्त्वाची वाटते ती उद्या महत्त्वाची वाटू शकेल (आणि परत परवा जुनाट किंवा "कालबाह्य" वाटू शकते. ) हे अर्थातच शब्दशः घ्यायला नको. मुद्दा असा की, आपण सतत बदलत असतो. परिस्थिती पालटते तशा स्वतःच्या प्रवृत्तीही बदलत रहातात. आयुष्याच्या विविध राईट्स् ऑफ पासेज मधून आपण जात रहातो तसतसे आपल्या मूळ पिंडावरचे संस्कार बदलत रहातात. थोडक्यात "काय कालबाह्य/बिनमहत्त्वाचे आहे" हे कालपरत्वे बदलू शकते. आपल्यातला काही भाग कालबाह्य ठरल्यासारखे वाटणे किंवा काही गोष्टी आपल्याला कालबाह्य वाटणे हे एका परीने आपल्या वाढीचे लक्षण आहे असेही म्हणता येईल.
२. जगण्याची ईर्षा : चालू काळातल्या घडामोडींबद्दल, बदलत्या ट्रेंड्स् बद्दलची आपली उत्सुकता ही आपल्या जगण्यातल्या ईर्षेशी निगडित रहाते असे मला वाटते. ईर्षा हा शब्द कदाचित चुकत असेल. तेंडुलकरांच्या मृत्यूनंतर गेल्यावर्षी डझनावारी लेख जे वाचले त्यातील अनेक तिशी-चाळीशीच्या आतबाहेरच्या लोकांचे होते (उदा. सचिन कुंडलकर) त्यात असे आवर्जून सांगितले होते की तेंडुलकराना अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत तरुण लोक काय करत आहेत, नवे काम काय चालू आहे याबद्दल इंटरेस्ट राहिला. माझा प्रस्तुत मुद्दा अधोरेखित करायला हे उदाहरण मला योग्य वाटते.
पु. ल. देशपांड्यांना त्यांच्या लिखाणात वारंवार आढळणार्या जुन्या काळच्या स्मरणरंजनाबद्दल विचारले असता ते जे म्हणतात ते मला आवडले : "होय, मी जात्यावर बसून गायलेली गाणी ऐकत लहानपण काढलेले आहे. त्याच्या आठवणी लिखाणात येतात. परंतु म्हणून घरोघरी पुन्हा जाती उघडून गाणी गात बसायला हवे असे काही माझे मत नाही."
लिखाण आवडले
लेखकाला मनापासून वाईट वाटते आहे, तो प्रामणिकपणा लख्ख दिसत आहे.
अभिजात साहित्याकडे दुर्लक्ष करण्यात नुकसान आहे, याबाबत मी लेखकाशी सहमत आहे. सौंदर्य-अनुभूती ही काही प्रमाणात कालबाह्य होत असते, तशी काही प्रमाणात टिकाऊसुद्धा असते. शिवाय वैचारिक साहित्याच्या बाबतीतही फायदा आहे. पूर्वजांचे मत पटले तर सोयच आहे. आणि मत पटले नाही, तर "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" या न्यायानेही फायदा होतो.
मात्र बाकी अनेक मुद्दे थोडे ओढूनताणून बसवले आहे, असे वाटतात. कालबाह्य संकल्पना आणि कालबाह्य व्यक्ती यांची एकच विषय म्हणून भरणा मला पटत नाही. शिवाय काही तथ्येसुद्धा तपशिलांत चुकलेली वाटतात.
माझ्या अनेक चुलत-पुतणे भावंडांमध्ये वयाचे एक-दीड वर्षांचे अंतर आहे. (तसेच माझ्या चुलते-आत्या, मामे-मावशांतही.) माझे असे अनुमान आहे, की मूल लहान असतानाही आई-वडलांना एकांत मिळाला असावा. असे असल्यास एक-दीड वर्षांच्या मुलांना आई-वडलांपसून दूर झोपवायची पद्धत काही पिढ्यांच्या आधीही भारतातच सामान्य असावी.
संयुक्त कुटुंब पद्धत मोडकळीला आली आणि विभक्त कुटुंब पद्धत हल्ली प्रचलित आहे, हे तथ्य आहे (त्यातून लेखातील "वृद्धाश्रम" वगैरे मुद्दा). पूर्वी मान्य असलेली कित्येक सामाजिक बंधने आता जुलुमी आणि कालबाह्य मानली जातात, हेसुद्धा तथ्यच आहे. ही दोन तथ्ये संबंधित आहेत, हेसुद्धा निश्चित. पण त्यातील कार्यकारणभाव लेखक सांगतात तसा मला पटत नाही.
समाजात गेल्या शतकात अनेक फरक झाले आहेत - लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, पिढीजात व्यवसाय चालत नाहित, पूर्वीची अशिक्षित कुटुंबे आता सुशिक्षित आहेत, वगैरे. अशा प्रचंड बदलांच्या कारणामुळे संयुक्त कुटुंबे फुटली हा एक परिणाम, आणि नवशिक्षितांना पूर्वीची बंधने अन्याय्य वाटतात हा दुसरा परिणाम. दोन्ही एका बुंध्यातून फुटलेल्या दोन फांद्या आहेत - पण एक बुंधा, एक फांदी, असे नसावे.
लेखातील "भूतकाळाशी नाते जोडायचे" हा शब्दप्रयोग आवडला. येथे "नाते" आणि "नाळ" यांच्यात फरक केलेला आवडेल. अपत्याने आईशी नाते घट्ट ठेवायचे हे योग्यच. पण रक्तमांस देणार्या जननीशीही जन्मानंतर नाळ मात्र कापलीच पाहिजे, नाहीतर बाळाला आणि आईला दोघांनाही जगणे शक्य नाही.
वेळेचा अपव्यय: वैयक्तिक निर्णय
मूळ प्रश्नाला साधे उत्तर असे देता येईल, की वेळेचा अपव्यय काय आहे याचा निर्णय हा अतिशय वैयक्तिक पातळीवरचा आहे. माझ्या वडिलांना मी रविवारचे हिंदी चित्रपट बघत असे (!) ते विशेष पसंत नसे! ते "हे काय भंकस पाहतेस" म्हणून निषेध नोंदवत, आणि मी माझा हट्ट सोडत नसे! दोघांचेही फारसे काही चुकले नव्हते. आता मात्र मी तो वेळ इतर काही शिकण्यात घालवला असता तर बरे झाले असते असेही कधीकधी वाटते, ते सोडा! अभिजित यांना असे म्हणायचे असावे. असो. तरी काही विषयांचा शोध हा बर्याचजणांच्या दृष्टीने काही इतर विषयांपेक्षा अधिक महत्त्वाचा असू शकतो, हे मान्य केले पाहिजे (मात्र मी त्यावेळी हिंदी चित्रपटांमधे नक्की कसला शोध घेत होते हे गहन कोडे आहे!). मनुस्मृतीचा जो भाग आजवर लोकांपुढे आला आहे त्यावरून बर्याच लोकांचे ही स्मृती वाचावी का नाही यासंबंधी निर्णय करून झालेले आहेत. ती आता तुम्हाला ती लोकांनी वाचावी असे वाटत असल्यास लोकांनी हा वेळ का द्यावा हे तुम्हाला लोकांना सबळपणे पटवून देता आले पाहिजे. पण लोकांनी ते वाचण्याइतका तरी वेळ दिला पाहिजे. ते असो.
मुळात थोडे खोलात जायचे तर असे म्हणता येईल, की कुठचाही ग्रंथ/संकल्पना तेव्हाच कालबाह्य होतो, जेव्हा त्यातील संवेदनांशी नवीन पिढीचा काही संबंध/नाते उरत नाही.
मनुस्मृतीत असे काही असले की जे आजच्या काळालाही छेद देऊन जाईल, उपयुक्त असेल, तर त्यातील काही भाग निश्चित वाचला जाईल. (रोज नेमाने दहा टीव्ही सीरीयल बघणारे वाचतील का? माहिती नाही. पण नक्कीच बरेच जण जे काही वाचण्याची इच्छा बाळगतात ते कधीतरी वाचतील, यात शंका नको). रामायण महाभारत हे आजही काहींना उपयुक्त ग्रंथ असू शकतात. ज्यात काळाच्या पलिकडे जाणारी टिकाऊ, बरीचशी उपयुक्त मूल्ये असतील, काही विशेष वेगळे असेल ते टिकेल. ज्यात असे काही वैशिष्ट्य नसेल, ते नाहीसे होईल.
लहान मुलांच्या एका पुस्तकातील वाक्ये सांगते -"Generally speaking books don't cause much harm. Except when you read them, that is. Then they cause all kinds of problems. Books can for example, give you ideas, I don't know if you've ever had an idea before, but if you have, you know how much trouble an idea can get you into. Books can also provoke emotions. And emotions sometimes are even more troublesome than ideas, Emotions have led people to do all sorts of things they later regret - like, oh, throwing a book at someone else". (पुस्तकाचे नावः "The name of the book is ___" लेखक - Psudonymous bosch).
अशा भावनांचे कल्लोळ मनुस्मृतीमुळे झालेले आहेत, त्यामुळे त्याबद्दल बोलताना कपाळाला खोक पडली तर आश्चर्य नाही! यासाठी अधिक खोलात जाऊन लिहावे लागेल, अशा पुस्तकाचे वेगळेपण, त्याची उपयुक्तता ही पटवून द्यावी लागेल.
.
.
.
.
कळकळ समजली
श्री शरद, आपणास वाटणारी कळकळ जाणवली. मनुस्मृतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तरे दिल्यास त्या पुस्तकाला कालबाह्य ठरवणार्या लोकांना आपल्या मताचा डोळसपणे पुनर्विचार करता येईल. आपणास तसे करणे (उत्तरे देणे) वेळेचा अपव्यय वाटते का?
आभारी आहे
माझ्या प्रतिसादाचा तिरकस अर्थ घेऊन गैरसमज न वाढवता त्यावर चर्चा केल्याबद्दल आभारी आहे. उगाचच मनस्ताप झाला असता..
चित्रा यांच एक वाक्य माझ्या मताचा सारांश आहे.. "मनुस्मृतीत असे काही असले की जे आजच्या काळालाही छेद देऊन जाईल, उपयुक्त असेल, तर त्यातील काही भाग निश्चित वाचला जाईल."
असं काही असल्यास नक्की आवडेल.
उदा: आयुर्वेद, योग ह्या गोष्टी आजही कालबाह्य नाहीत. किंवा महाभारत हे रामायणापेक्षा कमी कालबाह्य आहे. कदाचित कलियुगाला जवळचे असल्याने असेल. ;-)
वेळेचा अपव्यय हा आवडीनिवडीचा भाग असू शकतो. मी शिवाजीमहाराजांच्या कालखंडावरची कृष्णाजी सभसदाची बखर आणि शहाजीराजांवरचं जयराम् पिंड्येंच काव्यही संग्रही ठेवून वेळ मिळेल तेव्हा वाचतो. आता काहींना हा वेळेचा अपव्यय वाटू शकतो. तर ज्यांना मी हे का वाचतो या बद्दल उत्सुकता आहे त्यांना मला हे आवडीपलिकडे पटवून् देता आले पाहिजे. तसे केल्यास त्यांनाही त्यात आवड निर्माण होऊ शकते. "व्हाट्स इन इट फॉर मी?" तेवढा वेळ मी एखाद्या गोष्टीला दिल्यावर कसल्यातरी ***इक(सामाजिक, अध्यात्मिक, बौद्धिक वगैरे) प्रकारचा उत्कर्ष व्हायला हवा ना? मला वाटतं उपक्रमाला माहितीपूर्ण बनवण्याचा हाच उद्देश आहे.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
नोंद
एखादी गोष्ट कालबाह्य आहे का? ही चर्चा दीर्घकाळ चालत असते. पण जसजशी त्या गोष्टीची वर्तमानकाळातील उपयुक्तता अथवा उपद्रवमुल्य हे कमी होत जात तसतसे त्याचा प्रवास हा कालबाह्यतेकडे जातो हे मान्य करण्यास फारशी अडचण नसावी. उपयुक्तता ही नसेल व उपद्रव ही नसेल तर त्याची दखल घेतली जात नाही.
जेवढे प्राचीन तेवढे अस्सल,जुने ते सोने ही देखील एक मानसिकता समाजात दिसुन येते. तसेच जुने सर्वच कालबाह्य ही देखील दिसुन् येते. एखादा नवीन शोध लागला कि हे आमच्या पुर्वजांनी अगोदरच सांगुन ठेवले होते असा साक्षात्कार अनेकांना होतो. त्याचे वर्णन कधी कधी इतके असते कि आपले पुर्वज हे प्रगत मानव होते कि काय असे वाटावे इतके ते वर्णन रसभरीत असते.
ऋषिकेश च्या आजी आजोबांच्या वस्तु ही मालिका ही एक नोंद वही आहे. वस्तु जरी काहींच्या दृष्टीने काही प्रमाणात कालबाह्य झाल्या तरी नोंद ठेवण्याची गरज वाटावी इतपत दखलपात्र आहे.
प्रत्येक पिढीत जनरेशन गॅप ही असतेच. धनंजयने 'नाळ' व 'नात' यातील फरक चांगला समजावुन सांगितला आहे.
प्रकाश घाटपांडे
खुलासा
प्रतिसादांबद्दल मुक्त विचार.
श्री. प्रियाली : त्यांनी (मुलांनी) आपापला निर्णय घ्यावा... एका वयात आपल्याला काय करावयाचे आहे, कोणती दिशा घ्यायची आहे त्याची जाणिव होत असते.
दोन वाक्ये दोन बाजू दाखवतात, नाही ? नवीन मानसशास्त्र काहीही सांगो, मला वाटते मुलांना सांगावे, किशोरांना मार्गदर्शन करावे, तरुणांना मोकळिक द्यावी. विस्तवाला हात लावू नकोस हे मुलाला सांगावे (गरज पडली तर फटका देऊन), कोणते पुस्तक, सेरिअल चांगली-वाईट याचे किशोरवयात कारणे देऊन मार्गदर्शन करावे, (कुणाच्या प्रेमात पडावे याबद्दल) तरुणांना मोकळिक द्यावी. हरिणाचे पिल्लू जन्मल्यावर १० मिनिटात संरक्षणाकरता पळू शकते, माणसाच्या पिल्लाला जाण यावयाला १६ वर्षे. तोवर
आईवडीलांची जबाबदारी ते टाळू शकत नाहीत.
अभिजितला गोडी वाटावी असे घडले नाही हा तुमचा दोष. मान्य. पण माझी अडचण ही की मला संकेतस्थळाच्या मर्यादांचा विचार करावा लागतो. मागे लिहल्याप्रमाणे मला ग्रंथाची ओळख करून द्यावयाची आहे, शोधनिबंध लिहावयाचा नाही. पाच जणांच्या पाच निरनिराळ्या शंकांना सविस्तर उत्तरे देणे अवघड नव्हे, अशक्य आहे. मी फारफार तर सांगू शकेन की श्री.नरहर कुरुंदकर, श्री केळकर यांची पुस्तके वाचा. बर्याच वेळी अशी पुस्तके दुर्मीळ असतात. तरीही असे करून बघावयाला हरकत नाही.
श्री.घारे : ते सर्व सोडून तुम्ही रामायण वाचत होता का ? नाही, त्यात रामायणही वाचत होतो. आज खंत ही की पालक मुलांना आणून द्यावयाच्या पुस्तकात रामायण असेल याचा आग्रह धरत नाहीत. मुलांना वेळ कमी असेल तर पालकांची जबाबदारी वाढली. मुले काय, पालकांचे अनुकरण करत असतातच.
श्री. धनंजय : कालबाह्य संकल्पना व व्यक्ती यांमध्ये सरमिसळ झाली. असेलही. संकल्पनेमध्ये मी वाङ्मय व व्यक्ती ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी विचाराकरिता घेतल्या. इतरही आहेत. तरीही लेखात जास्त अचूकता (Clarity) आली असती तर मलाही बरे वाटले असते. माझे मलाही ते कळत होते.
पूर्वीही लहान मुले आईवडीलांपासून दूर झोपत असत... मान्य. पण कधीही "एकटी" नव्हेत. माझी नातवंडे लहान असतांना त्यांच्या आईवडीलांपेक्षा आमच्याकडेच जास्त वेळ असत. पण वर्षाच्या मुलाने एकटे झोपावयाचे ही कल्पनाच करता आली नसती. तुम्ही म्हणालात ती "नाळ" भूतकालाशी तशी भविष्यकालाशीही होती. अजाणतेपणे मी माझ्या उत्तरायुष्याचा विमा उतरवत होतो म्हणाना.
श्री.चित्रा : संकल्पना-ग्रंथ कालबाह्य होतात .. जेंव्हा त्यातील संवेदनांशी संबंध-नाते उरत नाही. १०० % बरोबर. म्हणून तर जुन्या वाङ्मयाचा, मनुस्मृती-संत साहित्याचा परिचय करून देण्याचा खटाटोप.
श्री.अक्षय : प्रश्नांना उत्तर देणे हा वेळेचा अपव्यय वाटतो का ? नाही राजे. पण सर्व संदर्भ ग्रंथ हाताशी असतातच असे नाही. श्री. केळकरांचे पुस्तक मिळणे अवघड दिसते पण तुम्हाला श्री. कुरुंदकरांचे पुस्तक मिळाले तर बघा.
शरद
दोन बाजू नाहीत
नाही, माझ्या प्रतिसादात जी उदाहरणे आली ती किशोरवयीन मुलांची आहेत. प्रतिसाद घाईत टंकल्याने विस्कळीत झाला. किशोरवयीन मुलांना काय हवे, काय नको याची जाणीव एका विशिष्ट वयात होते आणि त्यांना निर्णय घेऊ द्यावेत. याला नवीन मानसशास्त्र म्हणून फटकारण्याची गरज नाही. विस्तवाला हात लावू नये असे मुलांना आपण सांगत असतोच म्हणून चटका बसायचा राहतो असे थोडेच आहे? उलट, एखादेवेळी चटका बसू द्यावा.
तर मग आपण योग्यप्रकारे ओळख करून देत नाही हा दोष आपला आहे शरदराव. आपण मनुस्मृतीबद्दल जे लिहिले त्यावर बर्याचशा प्रतिक्रिया आपण पुरेसे लिहिले नाहीत हे सांगणार्या होत्या. कालबाह्य गोष्टींची ओळख करून देण्याची आपली कळकळ रास्त आहे आणि अनेकांना आवडेल असेही वाटते परंतु ओळख रोचक स्वरुपात मांडण्याची जबाबदारी केवळ आपली आहे.
मान्य
उद्देश योग्य आहे, स्वतःला रस आहे अशा कुठच्याही विषयाबद्दल अभिरूचीपूर्ण तुम्ही लिहीताच, पण उत्सुकता खरोखरची जागी करण्यासाठी (विशेषतः मनुस्मृतीसारख्या ग्रंथाबाबतीत) तुम्हाला प्रियाली यांनी म्हटल्याप्रमाणे अधिक खोलात जाऊन लिहावे लागेल असे वाटते.
नवनिर्माण
गोष्टी कालबाह्य होणे हे वाहतेपणाचे लक्षण आहे हे खरेच. त्याचबरोबर काळाच्या विपरीत गोष्टी टिकून रहाणे हे तयार होणार्या संस्कृतीचे द्योतकही मानायला हरकत नसावी. आपला आक्षेप/हूरहूर आपण आपल्या संस्कृतीच्या ज्या घटकांना अविभाज्य मानले त्या गोष्टी कालबाह्य होताना दिसत आहेत याची आहे (असे मला वाटले). आणि त्यामुळेच आपली संस्कृतीच बदलतेय अशी सार्थ भिती/चिंता आपल्याला वाटत आहे असे जाणवले.
मात्र सत्याकडे बघितलं तर ज्याप्रमाणे महास्फोट-भूकंप वगैरे भौगोलिक हालचालींने जसे जमिनीचे विशाल महानग एकमेकांवर आदळून पूर्ण नवे भूभाग, डोंगररांगा तयार होतात, त्याचप्रमाणे, माहितीच्या महास्फोटांनंतर जगभरातील भाषा-संकृती-विचार-आचार एकमेकांवर इतक्या मोठ्या प्रमाणात आदळत आहेत की त्यात पूर्वीचे काहीही टिकणे कठिण दिसते. हे पूर्वीही व्हायचं पण या महाफस्फोटाने त्याचा वेग इतका आहे की दोन पिढ्यातच नाहि तर एकाच पिढीतील दोन भावंडांच्या आवडीत, आचारत, विचारात दृश्य फरक आहे. यासगळ्या संकरातून-नवनिर्माणातून पुन्हा नव्या संस्कृती जन्म घेतील-घेताहेत. भारतीय संस्कृती जी तुम्ही अनुभवलीत ती आम्ही नाहि व आमच्या पुढच्या पिढीला तर त्याचा वासही येणार नाहि हे सत्य आहे. तेव्हा शक्य तितक्या त्याच्या आठवणी जपून ठेवाव्यात व काहि कालखंदानी माळ्यावरून काढलेल्या वस्तुंप्रमाणे त्याचा आनंद घ्यावा हे उत्तम. तसंही माळ्यावर ठेवलेल्या वस्तु रोजच्या वापरात असत्या तर त्यांनी तितकाच आनंद दिला असता का हा प्रश्न आहेच!
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे