एक नवा उपक्रम

नमस्कार मंडळी,

बर्याच दिवसांपासून उपक्रमावर एक नवा उपक्रम सुरू करण्याचा विचार होता. उपक्रमावर भाषा, संस्कृती यांची आवड असलेले आणि अभ्यासू वृत्ती असलेले मराठी भाषिक जगाच्या कानाकोपर्यातून एकत्र येतात. प्रत्येकाची भाषा मराठीच, पण तिच्या छटा वेगवेगळ्या. प्रत्येकाचं गाव महाराष्ट्रच पण त्याचे अक्षांश-रेखांश वेगवेगळे. सगळे जण पाळतात ते १६ संस्कार तेच, पण रुढी वेगवेगळ्या. त्यामुळे होतं काय की एकाच वस्तूला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. जसं काकडीची सालं सोलायला सुरीप्रमाणे मूठ असलेली जी वस्तू वापरली जाते, त्याला कोणी 'सालकाढणं' म्हणतात, तर कोणी 'सोलाणं' म्हणतं. आणखीही एक मजा ंहणजे जागेवर अवलंबून काही काही गोष्टी वापरल्या जातात. जसे 'कणगी'. ही वस्तू आता गावात वापरतात की नाही ते माहित नाही, पण शहरात नक्कीच वापरत नाहीत.

हे पुराण सांगण्याचा उद्देश हा की मला उपक्रमींपुढे एका उपक्रमाचा प्रस्ताव ठेवायचा आहे. आपण भाषेचा एक एक कोपरा निवडून (जसे या आठवड्यात भांड्यांची नावे घेतली तर पुढच्या आठवड्यात रंगांची नावे) त्यावरचे शब्द इथे एकत्रित करुया. त्यानिमित्ताने भाषाविषयक विदा तर निर्माण होईलच, पण आपली आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी नव्याने ओळखही होईल.

सध्या आपण भांड्यांच्या नावांनी सुरुवात करुया. जर सर्वांना हे करताना मजा आली, तर नंतर पुढचे विषयही घेऊ.

हा, तर आता शब्द सुचवायचे कसे? शक्यतो नुसताच शब्द सुचवू नका. ते भांडं कशासाठी वापरलं जातं तेही सांगा. जर ते भांडं विशिष्ट गोष्टीपासून बनवायचा संकेत असेल, तर तेही सांगा. जसे, घंगाळे हे शक्यतो तांब्या-पितळेचे असते. त्याचबरोबर जर तो शब्द वळचणीचा असेल (म्हणजे महाराष्ट्रभर वापरला न जाणारा) तर तो साधारण कुठल्या भागात वापरला जातो तेही सांगा.

मी सुरुवात करते, तव्यावर एखादा पातळ पदार्थ भाजताना तो उचलून परतण्यासाठी टोकाला पातळ, सपाट पत्रा लावलेला असा जो चमचा वापरला जातो, त्याला आम्ही 'कलथा' म्हणतो. (काही जण 'उलथणं' म्हणतात असं ऐकलं आहे). जर हा शब्द वळचणीचा असलाच तर तो रत्नागिरीच्या बाजूचा असावा. आमच्याकडे असलेला कलथा स्टीलचा आहे. आणखी कुठल्या धातूचा असतो, ते माहित नाही.

आता तुम्ही सांगा...

लेखनविषय: दुवे:

Comments

भगोणं

ज्यात साठवण करता येऊ शकेल अशा भांड्याला भगोणं म्हणतात. माझे वडिल (मूळ पश्चिम महाराष्ट्र) हा शब्द वापरतात. तोटी असलेल्या गोल भांड्याला (ज्यात पाणी साठवतात.) नाशिकमध्ये पंचपात्री असे म्हणतात. इतरत्र त्याला दुसरं नाव असल्याचं ऐकिवात आहे. सांडशीला काही लोक चिमटा तर काही पकड म्हणतात असं ऐकलं आहे. अजून आठवलं की सांगेन.

(भोचक)

बरोबर

उत्तम प्रकल्प!
मात्र वळचणीला हा शब्द प्रयोग तेव्हाढासा चपखल वाटत नाही.
(बाजूला पडलेले - विसरलेले - वापरात नसलेलेथासे म्हणायचे आहे का?

वळचणीची गोष्ट ही लगेच लागणारी नसते, पण लागली तर हाताशी असावी म्हणून वळचणीला असते.
तुम्हाला हे अपेक्षित नसावे!

बाकी -
त्या तोटी असलेल्या किंवा नसलेल्या उंचशा पिंपाला पंचपात्री असेच म्हणतात!
आणि लहान बसकटआअणि काठ असलेल्या पाणी पिण्याच्या भांड्याला फुलपात्र असे म्हणतात. मात्र यालाच काहीवेळा पंचपात्री असेही संबोधन आहे.
तांब्याच्या डिशवजा भांड्याला ताम्हण म्हणतात.
नागोबाच्या फणीचा आकार असलेल्या गोलाकार चमच्याला पळी म्हणतात.

कुटायला खलबत्ता वापरतात. याचे अनेक प्रकार असतात. येथेही ते अनेक सदस्यांनी अनुभवले आहेतच! ;))

आपला
गुंडोपंत

कोठी

त्या तोटी असलेल्या किंवा नसलेल्या उंचशा पिंपाला पंचपात्री असेच म्हणतात!

ह्या पाण्याच्या पंचपात्रीला अमरावतीकडचे लोकं पाण्याची कोठी किंवा पिंप म्हणतात.

चिमटा

उपक्रम आवडला...

गरम भांडे उचलायला वापरणार्‍या (इंग्रजीतील) टाँगला "चिमटा" म्हणतात तसेच साळशी (?) असेही म्हणतात...

साळशी

साळशी ऐकलेलं नाही. सांडशी मात्र ऐकलं आहे.
ओघराळं... कशाला म्हणतात नेमकं आठवेना. म्हणजेच हा धागा महत्त्वाचा ठरणार!

तेचे ते...

साळशी ऐकलेलं नाही. सांडशी मात्र ऐकलं आहे.

तेच ते... म्हणजे मला कुठला शब्द परीचीत आहे हे समजले असेलच :)

ओघराळं...

म्हणजेच "डाव" ना? :)

'ओगराळं' म्हणजे द्रवपदार्थ वाढण्यासाठी

वापरण्यात येणारा खोलगट डाव, ज्याला एक दांडा आणि खाली वाटीसारखा खळगा असतो.

ओघळारं

ओघळ येऊ नये म्हणून ओ(घ/ग)राळं हा शब्द आला असेल?

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

ओगराळ

माझ्या घरी (इंदूर) ह्या भागात ओगराळ हे दांडा असेलला खोळगट डावच आहे पण ते द्रव पदार्थापेक्षा गव्हाचे पीठ घेण्यासाठी वापरतात आणि ते परिमाण म्हणून ही वापरतात जसे एक ओगराळे आटा घे

उपक्रम आवडला.

उपक्रम आवडला.
कोकणात 'सांडशी'ला / 'पकडी'ला / 'चिमट्या'ला 'गावी' (स्त्री.) असं म्हणतात.
तसंच तुम्ही ज्याला 'कालथा' म्हटलं आहे, त्याला घरात 'उलथनं(णं)' असं म्हणायची सवय आहे. कुणाकुणाकडे 'काविलथा' असंही म्हणतात.
भात वाढण्याच्या रुंद गोलसर चपट्या हाताला घरी 'भातवाढणं (पं)' म्हणतात. पण त्याला 'भाताचा हात', 'थप्पी' ही नावंही ऐकली आहेत. हे थप्पी नाव गवंड्याच्या थापीशी साधर्म्य साधणारं आहे. हे आकारसाधर्म्यामुळे असेलसं वाटतं.
'पळी', 'ओगराळं', 'डाव' ही सगळीच नाव वापरातली.
ताक करण्याच्या उभट भांड्याला 'गंज' म्हणतात, तर ते साठवायच्या भांड्याला 'गुंड' म्हणतात. साधारण हंड्यासारखा, खूपच छोटेखानी, पण कडा तासून गोलसर केलेला असा हा 'गुंड' असल्याचं आठवतं.

भात वाढणे

भात वाढण्याच्या रुंद गोलसर चपट्या हाताला घरी 'भातवाढणं (पं)' म्हणतात.

याला खानदेशात 'भात्या' असेही म्हणतात. (खानदेशात भात हा 'लक्झरी' खाद्यप्रकार समजत असत, तेथे भात वाढण्यासाठी स्वतंत्र भांडे असणे याविषयी साशंक आहे.)

उपक्रम

उपक्रम आवडला.
हे थोडेसे चावट किंवा हीन अभिरुचीचे वाटेल परंतु "टमरेल" हा शब्द "टंबलर" मधून आला असावा असे मला वाटते. याशिवाय याची काही दुसरी देशी व्युत्पत्ती आहे काय ?

प्रश्न : तसराळं म्हणजे काय ?

तसराळं.

तसराळं म्हणजे कान नसलेली जरा मोठी कढई.
नितिन थत्ते

तसराळं

तसराळं कढई प्रमाणे 'कढण्यासाठी' वापरत नाहीत असे वाटते. तो ताटली>ताट>ताम्हण>तसराळं>परात असा प्रकार असावा.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

चांगला उपक्रम

काही जण 'उलथणं' म्हणतात असं ऐकलं आहे

यासाठी 'उचटणं' असा शब्दही ऐकला आहे.

सराटा

याला 'सराटा' असाही शब्द प्रचलीत आहे.
हा शब्द बहुदा विदर्भात वापरला जातो का?

आपला
गुंडोपंत

हाच शब्द

हिंदी भाषक प्रदेशातही हाच शब्द वापरला जातो.

आणखी एक. थोडसं विचित्र वाटेल. पण आपल्या सांडशीला इकडे इंदूरमध्ये हिंदी भाषक 'संडाशी' असे म्हणतात.

(भोचक)

तसराळं म्हणाजे पसरट आकाराचा मोठा बाउल् (बोल)

हा दुवा पहा आणि त्यावरचे चित्र

वा!

हे पुराण सांगण्याचा उद्देश हा की मला उपक्रमींपुढे एका उपक्रमाचा प्रस्ताव ठेवायचा आहे. आपण भाषेचा एक एक कोपरा निवडून (जसे या आठवड्यात भांड्यांची नावे घेतली तर पुढच्या आठवड्यात रंगांची नावे) त्यावरचे शब्द इथे एकत्रित करुया. त्यानिमित्ताने भाषाविषयक विदा तर निर्माण होईलच, पण आपली आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी नव्याने ओळखही होईल.

वा! छान कल्पना..

आपला,
(शब्दवेल्हा़ळ) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

कालथा

त्याला आम्ही 'कलथा' म्हणतो. (काही जण 'उलथणं' म्हणतात असं ऐकलं आहे). जर हा शब्द वळचणीचा असलाच तर तो रत्नागिरीच्या बाजूचा असावा. आमच्याकडे असलेला कलथा स्टीलचा आहे. आणखी कुठल्या धातूचा असतो, ते माहित नाही.

आम्ही कालथा म्हणतो..! आमच्या माहितीप्रमाणे हा शब्द आमच्या देवगडातला आहे. आमच्या दहीबावच्या वाडीत जिलबीमावशीच्या सुनेनं वैट नजरेनं बघतो म्हणून साखरप्याच्या कोकमंवाल्या नाना पटवर्धनाच्या लेकाला कालथा फेकून मारला होता..! पुढे हा 'कालथा' त्या पंचक्रोशीत काही काळ गाजला होता.

असो,

आपला,
(आख्या देवगडात ऐकू जाईल अशी शिंक आणि ढेकर देणार्‍या दतू अभ्यंकराचा नातू) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

रोळी

रोळी - पूर्वी तांदुळ धुण्यासाठी वापरत असत. साधारणपणे टोपलीसारखी असते. पण उभट असते. बांबूपासून बनवतात.

शिंकाळं- काथ्याचं बनवलेलं. हे छताला टांगतात. मांजर, उंदिर यापासून बचाव करण्यासाठी खाद्यपदार्थ यात ठेवले जात असत.

कातण- शंकरपाळे करताना लाटलेली पोळी कापण्याचे साधन. या क्रियेलाही कातणं असे म्हणतात.

वरून फोडणी घालण्यासाठी जे लोखंडी भांडं वापरतात, त्याला माझी आजी फोडणाळं म्हणते. तर तेलाचा 'कावळा' असतो.

तिखट-मीठ-मसाल्याच्या डब्याला मिसळण्याचा डबा असे म्हणतो. काही ठिकाणी त्याला मिश्रणाचा डबा म्हणतात, तर काही ठिकाणी पंचपाळं असंही म्हणतात.

मिरज-नाशिक-इंदूरची भाग्यश्री
(आमच्या इंदुरात गॅसच्या सिलिंडरला 'टंकी' असं म्हणतात.)

रोळी

उत्तम उपक्रम. आवडला.

मोड येण्यासाठी कडधान्ये रोळीत उपसावीत असा शब्दप्रयोग अनेकदा वाचला आहे. त्याचा अर्थ आज लागला.

सिलिंडर

सिलिंडरला महाराष्ट्राबाहेर 'बाटली/बोटल' देखील म्हटले जाते.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

होय

सिलिंडरमध्ये गॅस भरण्याच्या प्लॅण्टला 'बॉटलिंग' प्लॅण्ट म्हणतात.

नितिन थत्ते

अजून एक

आंघोळीचे पात्र (बहुतकरून तांब्याचे ) : घंगाळं

पदार्थ तळताना वापरायचा : झारा.(काही ठिकाणी झारी असे म्हणताना पाहिले आहे.)
पाणी प्यायच्या भांड्याला : पेला , फुलपात्र.

अवांतर : या धाग्यात अजून तरी "भांडी वाजों" लागलेली नाहीत ! ;-)

'हद्दपार शब्द'

उपक्रम चांगला आहे. भांड्यांवरून लीला दीक्षित ह्यांच्या 'हद्दपार शब्द' ह्या लेखाची आठवण झाली. ह्या लेखातला एक उतारा :

"आज स्वयंपाकघरातील असे कितीतरी शब्द नवीन मंडळींना ठाऊक नाहीत. ते कदाचित कोशात रहातील. त्यांची जरा या ठिकाणी नोंद करते. पूर्वी भात चुलीवर शिजायचा. तांब्याचं एक मोठं सतेलं सतत चुलीवर असायचं. ते बाहेरून मशेरीने पूर्ण काळं व्हायचं. त्याला म्हणायचं 'मेशरं' किंवा 'मशेरकं'. स्वयंपाकाला पाणी सारखं त्यातून घ्यायचं. भात करायला आकारानुसार तांब्याची तपेली, सतेली असायची. शेरभर भात मावेल ते 'शेरकं', तसंच 'दशेरकं' असायचं. तांदूळ मोजायला लाकडांचे 'निठवं' असायचं. भाताला तांदूळ काढायचे त्याला 'ओयरा' म्हणायचे आणि शिजत लावताना तो तपेल्यात 'वैरायचा'. फोडणी करायच्या मोठ्या लोखंडी पळीला म्हणायचे 'थावर'. भरपूर ताक ठेवायला असायचा 'गुंड'. तो कथलाचा असायचा. ताक वाढायला 'कथली' तर तूप वाढायला 'तांबली.' चूल पेटायची 'शेणी' किंवा 'गोवरी'ने. तिला 'थापट्या' पण म्हणत. ओगराळे, तसराळे, टोप, वेळणी (ताटली) रोवळी (बुरडाचीच असायची) वरणभात (एकात वरण एकात भात असं जोड भांडं. वर दांडा असे) बोगणी, भगुलं अशी नाना भांडी आठवताहेत."

मूळ लेखाचा दुवा: http://www.marathiabhyasparishad.com/node/66

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

सांडशी= कडची

सांडशीला मराठवाड्यात काही ठीकाणी 'कडची' असंही म्हणतात.

समृद्ध माजघर

स्त्युत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि आभार.

हळद-तिखट-हिंग-मोहरी-मेथी-जिरं वगैरे ठेवतो त्या प्रचंड सोयीच्या भांड्यांना आम्ही "पाळं" म्हणतो
पूर्वी चुलीबरोबर "फुंकणी" असायची.."स्टोच्या पीन"नेही एकेकाळी माजगर गाजवलं होतं
पिण्याच्या पाण्याचे भांड आकारावरून "फुलपात्र्", "भांडं", "पेला","ग्लास"-"गिलास" होते. भाजी चिरायला "सुरी", "सुरा", "विळी"; खवायला "खवणी", किसायला "किसणी", सोलायला "सोलाणं", कुटायला "खल' आणि "बत्ता", वाटायला "पाटा" व "वरवंटा" (आणि हल्ली या सगळ्याला मिक्सर, त्याची वेगवेगळी पाती, भांडी), दळायला "जातं", मळायला "परात", लाटायला "पोलपाट" आणि "लाटणं", भाजायला "तवा",
भाजी करायला आकारानूसार "कढई", "पातेलं", फोडणीचं "फोडणाळं", ढवळायला पदार्थानूसार "डाव","झारा", "उलथणं", "चमचा", वाढून घ्यायला प्रमाणानूसार "ताट", "ताटली", "वाडगा", "बाऊल", "वाटी", "द्रोण", "ठोकाची वाटी", नंतर उभ्या "गंजा"तून येणारं ताक.
जेवण झालं की "पानाचा डबा", त्यातील सुपारीचा "अडकित्ता", (चुना लावयच्या काडीला एक शब्द होता तो विसरलो)

याशिवाय काहि खास पदार्थ जसे मोदक असले की "मोदकपात्र" बाहेर निघतं, चकलीचा "सोर्‍या", करंजीचा "साचा", शेवेची "चकती", "पुरणाचं यंत्र", शंकरपाळ्यांचं "कातण", लिंबुसरबतासाठीचे "दाबके"

याशिवाय "पोळ्यांचा डबा", "भाताची भांडी" आहेतच

आपल्या समृद्ध माजघरातील ही निवडक मंडळी. अजून आठवतील त्याची भर घालेनच

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अरे बापरे!

बरेच आठवले की तुला.

काही राहिलेले, चाळायला "चाळणी", गाळायला "गाळणी", कांडायला "कांडणी" आणखीही मिळतील.

फिरकी

करंजी किंवा कानवले करायला "फिरकी" वापरतात...साचा कदाचित छोट्या करंज्या किंवा मटार करंजी, उकडीची करंजी वगैरे करायला वापरत असतील.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

विकी

उत्तम प्रकल्प. कल्पना आवडली.
(हा खरे तर विकीपीडीयासाठी उत्तम प्रकल्प आहे. तिथे तक्त्याच्या स्वरूपात किंवा क्रमांकाने देणे शक्य व्हावे यासाठी केवळ. पण इथे असला म्हणूनही चांगलेच आहे. )
बरेचसे वापरातले शब्द वर आलेले आहेतच. पण काही वर न वाचलेले देते. शिवाय थोडे गावाप्रमाणेही उच्चारात फरक झालेले दिसतात. आमच्याकडे चिमटा, गावी, सांडशी हे तिन्ही शब्द (घरातली जी बाई बोलते आहे त्याप्रमाणे) वापरले जात असत. तसेच पाणी पिण्याचे भांडे, पेला, फुलपात्र हे तिन्ही शब्द वापरले जात असत. आजीचा एक "चंबू" असे पाणी प्यायला. चंबू छोटा, गोल बुडाचा, (॰छोट्या सुरईसारखा) असे. तसेच "गडू" असे. हे बहुदा पितळेचे किंवा स्टीलचेच पाहिलेले आहेत. पूजेच्या भांड्यांना "उपकरणी" म्हटले जाते.

सपाट बुडाच्या पातेल्याला "लंगडी" म्हणतात.
आमच्याकडे कणीक मळायला "परात" असे (बहुदा पितळेची). ( भांड्यात "मोडते" का नाही माहिती नाही पण धान्य निवडण्यासाठी "सूप").
पाणी आणायला "घागर", ठेवायला "माठ" (माठ मातीचा) किंवा "कळशी" (धातूची). )

गडवा

'गडवा'हा बहूतेक करून पितळेचा असतो. पिण्याचे पाणी वाढण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.
'जार' किंवा 'जग' - पिण्याचे पाणी वाढण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.

विकी सुरुवात

विकीवर लेखाची सुरुवात केली आहे.
हद्दपार शब्द
(लेखाचे नाव इथून साभार)

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

पण

विकिवरील
लेखाचे नाव तेव्हढे समर्पक वाटत नाही.
कारण यातले अनेक शब्द अजूनही वापरात आहे. जसे खलबत्ता.

यावर अजून विचार व्हायला हवा आहे.
असो, सुरुवात केली हे छान केले.

आपला
गुंडोपंत

मस्त !

>>विकीवर लेखाची सुरुवात केली आहे.
क्या बात है ! मस्त उपक्रम.
>>लेखाचे नाव तेव्हढे समर्पक वाटत नाही.
हम्म, सहमत आहे.

-दिलीप बिरुटे
(मराठी विकिपीडियाची गोडी असलेला)

छायाचित्रे

भांड्याची छायाचित्रे विकीवर टाकल्यास खूप बरे होईल

हद्दपार शब्द

हद्दपार शब्दाच्या ऐवजी अनवट / विस्मृतीत जाऊ लागलेले शब्द...

धागा वाचला आणि चारोळी आठवली :

भातुकलीची बोळकी मिळाली
परवा कपाट लावताना,
माझी किती उडाली धांदल,
गेल्या काळामागे धावताना...

_________________________________________________
आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!

चुकीचा शब्द

वळचणीचा असेल (म्हणजे महाराष्ट्रभर वापरला न जाणारा) हा अर्थ बरोबर नाही. वळचण = छपराची खालची कड
अधिक संदर्भ खाली बघा.
(अवांतर - मला दुवा देऊन त्याच्या पुढे लिहायला जमत नाही. लिहिले तर ते दुव्याचाच भाग होते. म्हणून वर मजकूर आणि खाली दुवा असे लिहितो. कोणी उपाय सांगा)
मोल्सवर्थचा कोश

दुवा


दुवा संपताना '>'<'/'a'> दिसेल. त्या नंतर मजकूर लिहील्यास ही अडचण येऊ नये.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

वटकान

आमचे आजोबा पितळीत जेवायचे..मग रस्सा सगळीकडे पसरू नये म्हणून पितळीच्या खाली "वटकान" लावायचे. ह्याला शुद्ध मराठी शब्द आठवत नाही. "ओटकन" वगैअरे म्हणत असतील तर कोणास ठाऊक..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

अटकन

आमच्या पितळ्याच्या उंच काठाच्या ताटांना "अटकन" तर आम्ही ही लावायचो हो!
अटकन म्हणजे ताटाखाली लावायचा एक चपटा लाकडी तुकडा.

आपला
गुंडोपंत

वटकन

रस्सा ताटात पसरु नये म्हणून लावतात ते आमच्या मराठवाड्यात 'वटकन'

-दिलीप बिरुटे

वटकन

पलंगावर झोपलेले मूल झोपेत लोळून खाली पडू नये म्हणून गादीखाली उशी किंवा पांघरुणाची घडी लावून गादीची बाजू जरा उंच करतात. तेव्हा गादीला वटकन लावणे असेच म्हणतात.
तेव्हा वटकन ही एखादी गोष्ट एका बाजूने उंच करण्यासाठी खाली लावण्याच्या वस्तूचे सामान्य नाम असावे. त्याला 'भांडी'प्रकार म्हणता येणार नाही.

मातीची भांडी

दासोपंतांनी मराठी भाषेची श्रेष्टता पटविण्याकरिता मातीच्या घटाकरिता किती निरनिराळी नावे आहेत ते सांगितले आहे.आपल्या यादीत हीही जमा करा. सगळी भांडी मातीची आहेत.पाणी साठवणे हा मुख्य उपयोग पण स्वयंपाकघरात इतरही उपयोग होत असणार.

संस्कृतें ' घटु ' म्हणती !आतां तया घटांचे भेद किती !
कवण्या घटाची प्राप्ती ! पावावी तेणें !!
हारा,डेरा, रांजणु !सुदा,पगडा,आनु !
सुगड,तौली,सुजाणु ! कैसी बोलेल ?!
घडी, घागरी, घडौली ! आळंदे, वाचिके,बौळी !
चिटकी, मोरवा,पातली ! सांजवणे ते !!
ऐसे प्रतिभाषे वेगळाले ! घट असती नामाअथिले !
एकें संस्कृते सर्व कळे ! ऐसे कैसेन? !!

दासोपंत
शरद

स्तुत्य उपक्रम

पातेली (काठाची गोल पसरट मोठी भांडी) आणि तपेली (काठाची गोल पसरट छोटी भांडी) असे दोन वेगळे शब्द ऐकले आहेत.
लोणची, गुळांबे आणि साखरांबे चिनी मातीच्या बरण्यात घालून त्यांची तोंडे बांधली जात.
बाटली हा शब्द रूढ व्हायच्या आधी काचेची बरणी म्हटले जात होते.
'सांडशी'चा आकार हल्लीच्या चिमट्यापेक्षा वेगळा असे. त्याच्या दोन्ही लांब बाजूंसही (हाताने धरण्याच्या) अंतर्वक्र अर्धवर्तुळाकार दिलेला असे. त्यामुळे गोलाकार भांडे गोल कठाच्या सहाय्याने उचलता येई.
प्रवासाला जाताना पितळाचा 'फिरकीचा तांब्या' पाणी भरून घेतला जाई. याच्या तोंडावर फिरकीचे झाकण असून त्यावर पितळाचेच हँडल असे.
ताटे ठेवायला ताटाळे असे.अर्थात् ते भांडे नव्हे.
शेर, मापटे, चिपटे हे शब्द मोजमापाच्या भांड्यांना वापरले जात.
उखळ, मुसळाचा उल्लेख या चर्चेत झाला आहे की नाही ते माहित नाही.
पूजेचे गंध उगाळून 'थाटी'नामक लहानशा ताटलीत काढले जाई/जाते.

सध्या इतकेच.

तोंडाचा आकार

>>बाटली हा शब्द रूढ व्हायच्या आधी काचेची बरणी म्हटले जात होते.

बाटली लहान तोंडाची, बरणी मोठ्या तोंडाची.

नितिन थत्ते

सतेली म्हणजे काय ?

सतेली म्हणजे काय असू शकेल? इंदिरा संतांच्या कवितेत हा शब्द आलाय.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥

नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून

(भोचक)

सतेली म्हणजे

सतेली म्हणजे साजूक तूप ठेवण्याचे भांडे, हे स्टील आणि चांदीचे असू शकते

दगडी

'दगडी' म्हणजे चीनी मातीची जाड वाटी. ह्या दगडीमध्ये 'सातूचे पिठ', चाहा पोळी खाल्याचे आठवते!

'किटली '- तेल ठेवण्यासाठी वापरायचे विशिष्ठ आकाराचे भांडे.

दगडी

दगडापासून बनवलेली दगडी जेवताना पानात वाढायचे मीठ (पूड - स्वयंपाकात खडेमीठ वापरत) ठेवण्यासाठी (पावसाळ्यात मिठाला पाणी सुटे) वापरत.

 
^ वर