एक नवा उपक्रम

नमस्कार मंडळी,

बर्याच दिवसांपासून उपक्रमावर एक नवा उपक्रम सुरू करण्याचा विचार होता. उपक्रमावर भाषा, संस्कृती यांची आवड असलेले आणि अभ्यासू वृत्ती असलेले मराठी भाषिक जगाच्या कानाकोपर्यातून एकत्र येतात. प्रत्येकाची भाषा मराठीच, पण तिच्या छटा वेगवेगळ्या. प्रत्येकाचं गाव महाराष्ट्रच पण त्याचे अक्षांश-रेखांश वेगवेगळे. सगळे जण पाळतात ते १६ संस्कार तेच, पण रुढी वेगवेगळ्या. त्यामुळे होतं काय की एकाच वस्तूला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. जसं काकडीची सालं सोलायला सुरीप्रमाणे मूठ असलेली जी वस्तू वापरली जाते, त्याला कोणी 'सालकाढणं' म्हणतात, तर कोणी 'सोलाणं' म्हणतं. आणखीही एक मजा ंहणजे जागेवर अवलंबून काही काही गोष्टी वापरल्या जातात. जसे 'कणगी'. ही वस्तू आता गावात वापरतात की नाही ते माहित नाही, पण शहरात नक्कीच वापरत नाहीत.

हे पुराण सांगण्याचा उद्देश हा की मला उपक्रमींपुढे एका उपक्रमाचा प्रस्ताव ठेवायचा आहे. आपण भाषेचा एक एक कोपरा निवडून (जसे या आठवड्यात भांड्यांची नावे घेतली तर पुढच्या आठवड्यात रंगांची नावे) त्यावरचे शब्द इथे एकत्रित करुया. त्यानिमित्ताने भाषाविषयक विदा तर निर्माण होईलच, पण आपली आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी नव्याने ओळखही होईल.

सध्या आपण भांड्यांच्या नावांनी सुरुवात करुया. जर सर्वांना हे करताना मजा आली, तर नंतर पुढचे विषयही घेऊ.

हा, तर आता शब्द सुचवायचे कसे? शक्यतो नुसताच शब्द सुचवू नका. ते भांडं कशासाठी वापरलं जातं तेही सांगा. जर ते भांडं विशिष्ट गोष्टीपासून बनवायचा संकेत असेल, तर तेही सांगा. जसे, घंगाळे हे शक्यतो तांब्या-पितळेचे असते. त्याचबरोबर जर तो शब्द वळचणीचा असेल (म्हणजे महाराष्ट्रभर वापरला न जाणारा) तर तो साधारण कुठल्या भागात वापरला जातो तेही सांगा.

मी सुरुवात करते, तव्यावर एखादा पातळ पदार्थ भाजताना तो उचलून परतण्यासाठी टोकाला पातळ, सपाट पत्रा लावलेला असा जो चमचा वापरला जातो, त्याला आम्ही 'कलथा' म्हणतो. (काही जण 'उलथणं' म्हणतात असं ऐकलं आहे). जर हा शब्द वळचणीचा असलाच तर तो रत्नागिरीच्या बाजूचा असावा. आमच्याकडे असलेला कलथा स्टीलचा आहे. आणखी कुठल्या धातूचा असतो, ते माहित नाही.

आता तुम्ही सांगा...

लेखनविषय: दुवे:

Comments

कावळा

रोजच्या वापरातले तेल ठेवण्याच्या उभट भांड्याला 'कावळा' असेही म्हणतात.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

काथवट

काथवट हा शब्द कुठे वापरतात माहित नाही पण बहुतेक परातीला काथवट म्हणत असावेत.

गूगल

गूगलवर काथवट शोधलं असता खालील दुवा मिळाला.

मराठी साहित्य परिषद

लाकडी परातीला काथवट म्हणतात अशा अर्थाचे इतरही काही दुवे होते..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

काथवट

काठोटी-काठवट-काथवट.
भाकरी थापल्या जायची लाकडी काथवटात. त्याला बाजूने दोन त्रिकोणी कान असायचे.
काथवट सरकू नये म्हणून त्या कानांना पायाच्या अंगठ्याने दाबल्या जायचे..अन, धप..धप...बडवल्या जायच्या भाकरी. अहाहा...

च्यायला, मस्त धागा काढला..आवडला !

-दिलीप बिरुटे

हद्दपार शब्द

प्रकाटाआ

चरवी

चरवी - पाणी भरून ठेवण्यासाठी वापरले जाणारे भांडे.

तौली, डोण, उलथणी, सांडशी, फुकणी, पितळी, ताटली, रवी, घडुशी.....

तौली : ऍल्युमिनियमचे गोलाकार भांडे, कालवन किंवा ताक ठेवण्यासाठी वापरतात.
डोण : दगडाचे मोठ्या आकाराचे उभट भांडे, जनावरांना पाणि पिण्यासाठी.
उलथणी : भाकरी फिरवण्यासाठी
सांडशी : पक्कड
फुकणी : चुल फुंकण्यासाठी
पितळी : ताट, मोठे असेल तर थाळा.
रवी : ताक घुसळण्यासाठी वापरात येणारे लाकडाचे साधन्.
घडुशी : घडवंची, पाण्याचे भांडे एकावर एक् रचुन ठेवण्यासाठी

 
^ वर