श्रद्धाळू महाराष्ट्राचे दूर्देव

श्रद्धा या विषयावर उपक्रमवर बरीच चर्चा चालू आहे. एखाद्या विषयाचे सर्वंकष पैलु विचारात घेऊन चर्चा करण्याची आणि त्यातुन अनेकांना आपली मते ठाम करण्यात किंवा त्या मतांबद्दल पुनर्विचार करायला भाग पाडण्याची इथली परंपरा आहे. असो. श्रद्धेबद्दल किंवा अंधश्रद्धेबद्दल मत मांडतांना फार काळजीपूर्वक विधाने करावी लागतात. कारण केलेल्या विधानाला पटवून देण्याची जबाबदारी प्रत्येकवेळी आपल्यावर असते. तशी ती प्रत्येक ठिकाणीच असते. एक संवेदनशील माणुस म्हटला की त्याला जगाच्या वाईटाची चीड असतेच. आणि मानव्याच्या हिताच्या कसोटीवर एखादी गोष्ट उतरते का याचे उत्तर शोधत अशी संवेदनशील माणसे आपली मते बनवित असतात. त्यांनी ती तशी बनवली की ती त्रिकालाबाधित सत्य असतातच असे मात्र नाही. अशी मते जशी जशी दृष्टी मिळेल तशी तशी बदलत जाण्याची आवश्यकताही ओघाने येतेच. एखाद्या श्रद्धाविषयाचा श्रद्धा बाळगणाऱयाला तोटाच सहन करावा लागतो आणि ती त्याने बाळगावी अशी हाकाटी पिटून कुणी त्याच्या तोट्यावर आपल्या फायद्याची पोळी भाजून घेत असेल तर ती श्रध्दा अंधश्रद्धा या सदरात टाकायला हवी. विठ्ठलाच्या दर्शनाने शब्दातीत असे काही समाधान मनाला वाटत असेल आणि 'नाही नाही फक्त दर्शनाने किंवा चिंतनाने असे समाधान वाटता कामा नये त्यासाठी अभिषेकच करायला हवा अन्यथा तुमचे समाधान म्हणजे निव्वळ थापाच.. ' असे म्हणून कुणी भरीस घालत असेल तर तुमचा प्रवास श्रध्देकडून अंधश्रद्धेकडे न्यायचा हा प्रयत्न आहे असे म्हणता येते. जीवन जगण्याला श्रद्धेचा आधार हवा हे एकूणच जगाच्या अथांग पसाऱयात मान्य करावे लागणारे विधान आहे. किंबहूना बहूतांश मानवसमुहांच्या बाबतीत ते तसे मानने गरजेचे ठरते. एखाद्या विवेकाने नास्तिकवादाचा पूरस्कार करणाऱया व्यक्तीची तो जर त्याच्या कुलदैवताच्या दर्शनाला गेला तर त्याची नेहमीची श्रध्दाळू मंडळी थट्टा करतील. त्याहीपेक्षा त्याने तेथे जाऊन अभिषेकच केला नाही. निव्वळ हात जोडून परत आला. म्हणजे सगळी दर्शनयात्रा फुकाची गेली असे म्हणून त्याला मुर्ख ठरवण्यात त्यांची अहम्अहीका लागते. मी लग्न झाल्यावर तुळजापूरला गेलो आणि आम्ही फक्त दर्शनाला आलो आहोत आम्हाला अभिषेक वगैरे काही करायचा नाही असे स्पष्टपणे अभिषेकाचा आग्रह धरणाऱया व्यक्तीला सांगितले. (त्याने अभिषेकाचे एकशे एक्कावन्नवाला, पाचशे एकवाला आणि एकहजार एक्कावन्नवाला असे प्रकार सांगितल्यावर मला मळमळायला लागले होते. माझ्या मित्रांच्या मते मी कमालीचा चुंगूस असल्याने असे झाले असावे.) तेव्हा त्याने मग एवढ्या दूरवर आलातच कशाला असे स्पष्टपणे मला विचारले. आता तर अभिषेकांच्या अतिरेकाने तुळजाभवानीच्या मुर्तीची झीज होत आहे आणि या अभिषेकातल्या आम्लधर्मी पदार्थांवर व एकूणच अभिषेकांच्या संख्येवर नियंत्रण न आणल्यास मुर्तीची न भरून येणारी हानी होऊ शकते असा अहवाल पुरातत्व खात्याने दिला आहे. यावर नेमकीच पूजारी मंडळींची बैठक जिल्हाधिकाऱयांनी बोलावली होती. त्यात या सर्व बाबींना कडाडून विरोध करण्यात आला. त्यासाठी भाविकांच्या श्रद्धेचे कारण देण्यात आले. मला वाटते मुर्ती हवी की अभिषेक असा प्रश्न निर्माण होत असेल तर भाविकांनी अभिषेकाच्या बाजूने असण्याचे काहीच कारण नाही. पंढऱपूरला अशा अभिषेकांवर यापूर्वीच नियंत्रण आणल्या गेले आहे. पण आर्थिक लाभार्थ्यांना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नसावे. मला तरी वाटते पंढरपूरच्या विठ्ठलातले देवत्व जसे अस्पृश्य़स्पर्शाच्या भीतीपायी काढून ठेवण्यात आले होते तसे भवानीमातेतले देवत्व काढून एखाद्या कठीण संगमरवरी मुर्तीला घडवून तिच्या ठायी ठेवावे आणि मग अभिषेकांचा हा सोपास्कार चालू ठेवावा. मग भाविक नेमके अभिषेकांच्या पक्षातले आहेत की देवीच्या फक्त दर्शनाने त्यांना नवी उभारी मिळते ते सिद्ध होईल. शेवटी श्रद्धाविषय हा कुणाच्या (म्हणजे कुणा समुहाच्या ) आर्थिक, सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक फायद्याचा विषय म्हणून तो जनमानसांचा तोटा करून लादला जातो काय हे पहाणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा चांगली की वाईट याचे उत्तर हे दोन्ही प्रकारांना देता येते. श्रद्धा खऱी की खोटी याचे उत्तर मात्र ती खरेच आपणाला काही मानसिक समाधान देते आहे की आपण लुबाडलो जात आहोत, निष्क्रीय बनत आहोत आणि फुकटच्या फायद्याची अपेक्षा करत आहोत. स्वतःला किंवा कुणाला फसवत आहोत, लुबाडत आहोत, पांगळे करत आहोत या प्रश्नाच्या उत्तरात आहे. विलासराव देशमुखांना हवेतुन तावीज काढून देणाऱया सत्य(?) साईबाबा विषयी आणि विलासरावांच्या त्यांच्या प्रती असलेल्या श्रद्धे(?)विषयी आपण ऐकले, वाचले असेल. (त्याच विलासरावांच्या मुख्यमंत्री काळात अंनिस जादूटोणाविरोधी कायदा अमलात येण्याची अपेक्षा करीत होती) आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच अशोक चव्हाणांनी या बाबांची पाद्यपूजा वर्षा या सरकारी निवासस्थानी आयोजित केली आहे. अशोकरावांचे म्हणणे आहे की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे मग त्यांनी हे सगळं नांदेडला का आयोजित करू नये हा ही प्रश्न उरतोच. महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून जे काही गेल्या दहा वर्षांपासून अस्तित्वात येण्याचा प्रयत्न करते आहे. त्याचा जन्म या अघोरी प्रकाराने होईल याची अपेक्षा विवेकी महाराष्ट्राने बाळगू नये. कारण सत्तेच्या पायरीवर पोचण्यासाठी जनतेच्या भल्याचा विचार करायचे सोडून बाबाबूवांची मनधरणी करणाऱयांचाच सगळीकडे बोलबाला आहे. अशोक चव्हाणांना आता महाराष्ट्रानेच या बाबांचे नाव मतदारयादीत नसल्याचे दाखवून द्यायला हवे. अवघे राज्य ज्या सरकारवर विकासासाठी विसंबून आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच ठायी आत्मविश्वासाची वानवा असावी यापेक्षा दूर्देव ते कोठले.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरेरे!

आता तर अभिषेकांच्या अतिरेकाने तुळजाभवानीच्या मुर्तीची झीज होत आहे आणि या अभिषेकातल्या आम्लधर्मी पदार्थांवर व एकूणच अभिषेकांच्या संख्येवर नियंत्रण न आणल्यास मुर्तीची न भरून येणारी हानी होऊ शकते असा अहवाल पुरातत्व खात्याने दिला आहे. यावर नेमकीच पूजारी मंडळींची बैठक जिल्हाधिकाऱयांनी बोलावली होती. त्यात या सर्व बाबींना कडाडून विरोध करण्यात आला. त्यासाठी भाविकांच्या श्रद्धेचे कारण देण्यात आले.

अरेरे! हे वाचून वाईट वाटले. मूर्ती झिजली तर चालेल परंतु आमचा स्वार्थ अभिषेकाद्वारे फळायला हवा अशी श्रद्धा राखणार्‍यांविषयी काय बोलावे? शिकागोच्या मंदिरात गणेशचतुर्थीच्या दिवशी दूध, मध आणि इतर पदार्थांचे पाट ड्रेनेज पाईपमधून रोंरावत वाहताना पाहून असेच वाईट वाटले होते.

असो. सत्यसाईबाबांचे आशिर्वाद मिळाल्याचे कळते.

अवांतरः तुळजाभवानीची मूर्ती शाळीग्रामाची आहे ना? आणि शाळीग्रामाची सहसा झीज होत नाही असे म्हटले जाते. चू. भू. द्या. घ्या.

अवांतर

तुळजाभवानीची मूर्ती गंडकी नदीतील शिळेची आहे असे कमलाकर भ. प्रयाग यांनी लिहिलेल्या तुळजापूर महात्म्य या पुस्तकात वाचले होते.
पुस्तक 'महात्म्य' नावाचे असले तरी इतिहासाचे अध्यापन करून लिहिलेले असल्याने विश्वास ठेवायला हरकत नाही.
बाकी लहानपणी एकदा स्वतःच देवीला अभिषेक केल्याने (हो,हो! खुद्द मी माझ्या हाताने देवीच्या मूर्तीवर केळ्यांचा लेप लावला होता.) 'ड्रेनेज'बद्दल बोलण्याचा अधिकार गमावला आहे. :(
अर्थात् त्यावेळी थोडे विचित्र वाटले होते - नाही असे नाही ;) - हे आठवते.

श्रद्धा- अश्रद्धा

आमचे मते अंधश्रद्धा हा शब्द पिवळापितांबर म्हणल्यासारखे आहे. सश्रद्ध व अश्रद्ध असे द्विमितीत वर्गीकरण केल्यास अंधश्रद्ध हा सश्रद्ध या संवर्गात मोडतो. खरतर अश्रद्ध हा वर्ग केवळ पारंपारिक श्रद्धा नसलेला असा आहे. तो ही माणुसच असल्याने निसर्ग साखळीतुन / जैवरासायनिक प्रक्रियेतुन् तो वेगळा नाही. त्याच्या श्रद्धा कदाचित वेगळ्या असतील. माणसाचे विचार / भावना म्हणजे शेवटी मेंदुतील केमिकल लोच्या अस आम्हाला वाटत.कोणाच्या कशा होतील ते सांगता येत नाही. अनिश्चितता या गोष्टीला सश्रद्ध व अश्रद्ध माणसाच्या मेंदुतील प्रतिसाद कदाचित वेगवेगळे असतील. हा प्रतिसाद शरदरावांच्या परत एकदा श्रद्धा या पोस्ट साठी नोंदवला आहेच्
स्वतः अश्रद्ध असुन् इतरांच्या श्रद्धेचा आदर करणारी माणसे (अथवा उलट) आहेतच की . हे असेच चालत रहाणार. माणसाच्या पिंडातच श्रद्धेची/अश्रद्धेची बीज असली पाहिजेत

एखाद्या श्रद्धाविषयाचा श्रद्धा बाळगणाऱयाला तोटाच सहन करावा लागतो आणि ती त्याने बाळगावी अशी हाकाटी पिटून कुणी त्याच्या तोट्यावर आपल्या फायद्याची पोळी भाजून घेत असेल तर ती श्रध्दा अंधश्रद्धा या सदरात टाकायला हवी.

अंधश्रद्ध कोणाला म्हणावे हा प्रश्न जरी कळीचा असला तरी त्याला आपले शोषण होते असे वाटत नाही त्याला ते पोषणच वाटते म्हणुन अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम अधिक अवघड आहे. सोयी साठी समाज विघातक श्रद्धा या अंधश्रद्धा या सदरात टाकल्या आहे. विघातक कशाला म्हणायच या प्रश्नावर काथ्याकूट चालुच रहाणार आहे. सतीची चाल हा पुर्वी धर्मश्रद्धेचा भाग मानला होता व ब्रिटिशांनी त्यात ढवळाढवळ केली असे काही धर्म पंडितांचे म्हणणे होते. आजच्या काळात या धर्मश्रद्धेला सश्रद्ध माणुस देखील अंधश्रद्धा म्हणेल. एकुण श्रद्धा हा प्रकार स्थल काल समाज सापेक्ष असल्याने त्याचे विश्लेषन अधिक अवघड आहे.
सत्यसाईबाबाच्या डोक्यावर पाया ठेवणारे हे केवळ श्रद्धेपोटी असे करतात असे मानणे देखील अंधश्रद्धा आहे. मोठेमोठे राजकारणी उद्योगपती यांचा काळापैसा पांढरा करण्याची 'किमया' तिथे आहे. बाबा बुवांचे प्रस्थ केवळ श्रद्धेपोटी निर्माण झाले नाही त्यात एक मोठी समांतर अर्थव्यवस्था दडलेली आहे. भारतासारख्या देशात 'धार्मिक' या लेबल खाली अनेक अधार्मिक गोष्टी चालतात. श्रद्धेच भांडवल करुन कायद्याला वेठीस धरणारे राजकारण आपल्याला नवीन नाही.

प्रकाश घाटपांडे

या वरून आठवले...

...भवानीमातेतले देवत्व काढून एखाद्या कठीण संगमरवरी मुर्तीला घडवून तिच्या ठायी ठेवावे आणि मग अभिषेकांचा हा सोपास्कार चालू ठेवावा...

थोडेसे आठवणीतूनः चाफळचे राममंदीर हे समर्थरामदासांनी बांधले होते. त्यातील रामाची मुर्ती ही समर्थांना नदीत मिळाली होती. त्या विषयी कथापण आहेत पण लक्षात नाही. तरी देखील त्याचे श्रद्धेप्रमाणेच ऐतिहासीक महत्व होते. बर्‍याच वर्षांपुर्वी त्या मंदीराचा जिर्णोद्धार हा बिर्ला समुहाने केला. तो करताना त्यांनी मूळ मुर्ती काढून बिर्लास्टाईलच्या राम-लक्ष्मण-सीतेच्या मुर्ती तिथे ठेवण्याचा हट्ट केला. त्याला विरोध झाला. प्रकरण कोर्टात गेले पण शेवटी भांडण तंटा जास्त न होता, सहजतेने सलोखा झाला आणि मागे जरी बिर्ला मुर्ती असल्या तरी समर्थांनी शोधलेली मुर्ती पुढे तशीच ठेवण्यात आली.

सत्यसाईबाबाच्या डोक्यावर पाया ठेवणारे हे केवळ श्रद्धेपोटी असे करतात असे मानणे देखील अंधश्रद्धा आहे. (इति: घाटपांडे)

बॉस्टन (केंब्रिज) मधील एमआयटी मधे नव्वदच्या सुरवातीस स्वामी चिन्मयानंदांचे भाषण होते. त्यांच्याकडून तत्वज्ञान ऐकण्यासाठी जसे अमेरिकन्स आणि त्यांचे शिष्य नसलेले होते तसेच भाविकही होते. स्वामीजींना हॉलमधून व्हिलचेअर वरून आणत असताना या भाविकांनी श्रद्धेने नुसताच घेराव घातला नाही तर थोडेसे गुढघ्यावर बसत त्यांचे (स्वामिजींचे) हात हातात घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतले... त्यावेळेस मला कळले की जुलमाचा केवळ रामरामच नव्हे तर आशिर्वादही असू शकतो...

अश्रद्धा

त्यांनी बिर्लास्टाईलच्या मूळ मुर्ती काढून राम-लक्ष्मण-सीतेच्या मुर्ती तिथे ठेवण्याचा हट्ट

त्यांनी मूळ मुर्ती काढून बिर्लास्टाईलच्या राम-लक्ष्मण-सीतेच्या मुर्ती तिथे ठेवण्याचा हट्ट
असे म्हणायचे आहे ना?

श्रद्धा हा एक न संपणारा विषय आहे. आणि श्रद्धेच्या नावाखाली काय काय खपवता येते हाही.
मध्यंतरी आचार्य डॉकिन्स म्हणाले होते की निरिश्वरवाद्यांनी एकत्र येऊन एक धर्म स्थापन करावा. आणि अमक्या गोष्टींवर आमची श्रद्धा आहे, तस्मात् आम्हाला असे वागू द्यावे, शिकू / शिकवू द्यावे असे म्हणावे. कारण धार्मिक लोक धर्माच्या नावाखाली वाट्टेल तसे वागतात तर मग आम्ही मागे का रहावे? :-)

बरोबर

त्यांनी मूळ मुर्ती काढून बिर्लास्टाईलच्या राम-लक्ष्मण-सीतेच्या मुर्ती तिथे ठेवण्याचा हट्ट असे म्हणायचे आहे ना?

बरोबर! चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी वर देखील (मूळ प्रतिसादात दुरूस्त करतो).

मध्यंतरी आचार्य डॉकिन्स म्हणाले होते की निरिश्वरवाद्यांनी एकत्र येऊन एक धर्म स्थापन करावा. आणि अमक्या गोष्टींवर आमची श्रद्धा आहे, तस्मात् आम्हाला असे वागू द्यावे, शिकू / शिकवू द्यावे असे म्हणावे. कारण धार्मिक लोक धर्माच्या नावाखाली वाट्टेल तसे वागतात तर मग आम्ही मागे का रहावे?

मागे कोण राहतोय? :) सगळेच पुढे आहेत. सश्रद्ध, अश्रद्ध आणि अंधश्रद्ध. कधी कधी वाटते की हे भांडण अधुनिक आणि विज्ञानवादी पण संस्कृती आवडत असल्याममुळे असलेल्या सश्रद्ध विरुद्ध (संस्कृती जपण्याशिवाय) तसेच पण अश्रद्ध यांच्यातले आहे. अंधश्रद्ध त्यात कुठे मधे पडत नसावेत. त्यांना जे करायचे ते करत राहतात. ;)

 
^ वर